मागे वळून पाहतांना…

Submitted by nisha_kulkarni on 7 March, 2014 - 10:41

जीवनाची वाट चालतांना कधी कधी मध्येच थबकावेसे वाटते. वा आपण किती अंतर चाललो, काय मिळविले? काय गमावले, पुढे काय? आपले ध्येय काय? आपल्याला कुठे जायचे आहे? असे प्रश्न मनाला पडतात.

आमच्या लग्नाला जून 2014 मधे 35 वर्षे पूर्ण होतील. विचार केल्यास हा काळ कसा गेला कळतच नाही. लग्नाच्या आधीपासून मी नोकरी करत होते. पण घरच्यांचे सहकार्या मिळाल्यामुळे मी पुढे नोकरी करू शकले. सासूबाई नव्हत्या पण माझे सासरे नाना यांचा मला पूर्ण पाठिंबा होता. मोठा मुलगा तीन महिन्यांचा होता तेंव्हा त्याला सोडून शाळेत जातांना मला रडू आले, तेंव्हा त्यांनी मला धीर दिला व त्याची मुळीच काळजी करू नकोस असे सांगितले. माझ्यापेक्षा जास्त ते मुलांची काळजी घेत. मुलांना त्यांचा खुपच लळा होता. त्यांच्या भरावश्यावर मुलांना ठेवून मी निर्धास्तपणे शाळेत जात असे.

आमचे मोठे कुटुंब. दोन् नणंद,त्यांची लग्ने झालेली होती. भावांमधे माझे मिस्टर मोठे. त्यांच्यापेक्षा लहान तीन दीर व एक नणंद. एवढे कुटुंब. मोठी वहिनी म्हणून सगळ्यांच्या अपेक्षा. घरात सगळे सण-वार, लहान मुलांचे करणे, पाहूनचार यांचे करणे यात वेळ कसा निघून जाई कळलेच नाही. माझ्यापरिनी मी ते सर्व सांभाळण्याचा प्रयत्न केला. यामधे यांची साथ फार मोलाची होती. कारण माहेरी मी बहिणींमधे सर्वात लहान असल्यामुळे लाडकी होते. तर सासरी मोठी असल्यामुळे सर्वांच्या माझ्या कडून फार अपेक्षा होत्या. कुणाला न दुखावता मी त्या होतील तशा पूर्णा केल्या. आमच्या घरी यांना माणसांचे फार वेड. त्यामुळे घरात सतत मित्र व नातेवाईकांचा राबता असे. मी मुलांचा अभ्यास घेत असे व त्याचबरोबर थोड्याफार दुपारी ३ ते ५ ट्युशंस. मुलांबरोबर माझ्या छकुल्यान्ना ही अभ्यासाचे वळण लागले. मग मोठेपणी त्यांना अभ्यास कर असे सांगावे लागलेच नाही. मोठा मुलगा ईंजीनीयर तर लहान मुलगा बँकेत ओफीसर् आहे. मुलांना नोकर्‍या लागल्या तसे ते म्हणू लागले आई रिटायरनमेण्ट घे. परंतु नाती साठी रिटायरनमेण्ट घेतली. सदोतिस वर्षे नोकरी झाली. २०११मधे माझे मिस्टर रिटायर्ड झाले तेंव्हाच मग त्यांच्या बरोबर स्वेच्छानिवृत्ती घेतली.

हिंडण्या-फिरण्याची आवड आम्हाला पहिल्यापासूनच होती. मुले लहान असतांनाच आम्ही अष्टविनायक, गोवा, म्हैसूर-उटी, पाहून आलो. आता निवृत्त झाल्यावर तर दर वर्षी कुठेतरी सहलीला जातोच. काश्मीर, वैष्णवदेवी, दिल्ली, आग्रा, मथुरा, वृंदावन पाहून झाले. जेष्ठनागरिक संघा बरोबर केरळ-कन्याकुमारीची सहल झाली. आता नुकतेच आम्ही गया, काशी, लखनऊ येथे अधिवेशनच्या निमित्ताने जाऊन आलो.
फिरणे होताय तोपर्यंत आपला भारततरी पूर्ण पाहावा असे वाटते.

सुसंस्कृत व सुस्वभावी मुले व सुना हे आमचे वैभव आहे. नात तर आमच्या काळजाचा तुकडा आहे. तिच्याशी बोलण्यात वेळ कसा जातो कळत नाही. तिच्याशी खेळतांना लहान झाल्यासारखे वाटते. व अंगात उत्साहाचा झरा वाहतो असे वाटते.

मला गाण्याची लहानपणापासून आवड. पण संसाराच्या धबडग्यात गाणे शिकणे राहून गेले. पण यांचे प्रोत्साहन व पुत्णीच्या साथी मुळे मी वयाच्या ५३व्या वर्षी गाण्याची पहिली परीक्षा मेरिटमधे पास झाले. याचे यांना केवढे कौतुक! निवृत्त झाल्यावर दिवसभर घरी काय करावे? पुन्हा गाण्याच्यापरीक्षा द्यावा का? असा विचार करीत होते. तेंव्हा यांनीच मला की तू कीर्तन महाविद्यालयात प्रवेश घे. तिथे तुझे गाणे ही पूर्ण होईल व तुझी वाचनाची, आध्यात्माची आवड ही पूर्ण होईल. मला हे आवडले. मी आता कीर्तन महाविद्यालयात दुसर्‍या वर्षाला आहे. वाचनाची आवड मला पहिल्या पासून आहेच. आमच्या शाळेचे वाचनालय़ फार समृद्ध. तेथे मी चांगल्या लेखकांच्या कथा, कादंबर्‍या वाचल्या. नंतर आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन केले. अजूनही करतेच आहे. देवाने माझे डोळे शेवट पर्यंत चांगले ठेवावे हीच इच्छा

संध्याकाळी आपण फिरायला जातो, कधी बगीच्यात तर कधी नुसतेच लांबवर फेरफटका मारायला. तसेच मला आयुष्याबद्दल ही वाटते.. आयुष्याच्या संध्याकाळची ही कातरवेळ समजू नये तर निवांतपणे, आपल्याच तन्द्रित आपल्याला वाटेल त्या ठिकाणी फिरावे. थोडावेळ नातवंडामधे घालवावा, आपल्याला आवडेल ते काम करावे. आयुष्याच्या या वाटचालीत जीवनाचा जोडीदार शेवटपर्यंत असावा असे वाटते. समर्थं वचनानुसार 'संसार करावा नेटका, मग परमार्थ साधावा' या प्रमाणे वागावे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे साधेशे मनोगत आवडले. एकंदरीत परिपुर्ण कौटुंबिक जीवन जगलात तुम्ही. वर्क्-लाईफ बॅलन्स छान जमविलात. कलोपासना केलीत, वाचन केले, पर्यटनाची हौस भागवली. माणसे जपलीत, नाती जपलीत. मुलांवर चांगले संस्कार केलेत. मागे वळून पाहताना तुम्ही कृतार्थ असल्याचे जाणवतेय. अजून काय हवे आयुष्या कडून?

लिखाण चांगले आहे. विविध अनुभव अजून तपशिलवार येवू द्यात. आता लिखाणाचाही आनंद लुटा.
शुभेच्छा !

एकदम प्रामाणिक मनोगत. >> + १ खरंच छान लिहीलं आहे. एका समाधानी, तृप्त संसारी स्त्रीचे मनोगत वाटतंय. मागे वळून पाहताना तुम्हाला आयुष्यातील खडतर प्रसंगांनी दिलेलं धैर्य आणि पुढच्या वाटचालीचं बळ शब्दबद्ध केलंत कटू आठवणी टाळून हे फारच पॉझिटिव्ह विचारसरणीचं लक्षण आहे. तुम्हाला तुमच्या कीर्तन महाविद्यालयात यश लाभो आणि तुमची आवड अधिकाधीक जोपासता येवो हीच इश चरणी प्रार्थना. पुढील लेखनासाठी शुभेच्छा

काकू खूप आवडलं तुमचं हे मनोगत..
तुमच्या समृध्द सहजीवनाची सुरेल मैफल उत्तरोत्तर अशीच रंगत जावो या शुभेच्छा!!

धन्यवाद नंदिनी, अदिति, इडली, आर्च, ऋयाम, चौथा कोनाडा, dreamgirl, कुसुमिता१२३४, rajshree8, श्रीयू.
तुमच्या प्रतिक्रियान् मुळे अजुन लिहिण्याची प्रेरणा मिळेल.