प्रचिती म्हणींची - मराठी भाषा दिवस २०१४ - मृण्मयी

Submitted by मृण्मयी on 28 February, 2014 - 14:57

आमच्या आजीची शब्दसंपदा, बोलण्याची पध्दत आणि सतत बोलू शकण्याची ताकद आजकालच्या मराठीत सांगायचं तर 'अनमॅच्ड' होती. बरं शब्दांचा, म्हणींचा समृध्द खजिना असूनही किंवा असल्यामुळे, सरळ बोलणं कमीच! घरात कुणी धाकट्या काकाबद्दल 'कुठे गेलाय' विचारलं की "गेलाय उकिरडे फुंकायला" हे तिचं उत्तर. माझ्या वडलांबद्दल विचारलं तर "तो 'बडवतोय' लष्कराच्या भाकरी!" म्हणीतला 'भाजतोय' हा सर्वमान्य शब्द तिला अमान्य होता. स्वरचित म्हणीतर जागोजागी वापरल्या जायच्या. माहेरी आलेल्या आत्यांनी जराजरी कुरकूर केली तर आजी म्हणायची. "हाता-तोंडाशी गिळायला देतात वहिन्या तर खावं-प्यावं, चार दिवस आराम करावा! पण नाही! यांचं आपलं 'का रे पाव्हण्या कुथतोस, तर म्हणे बसल्या जागी करमेना..!" ही म्हण आम्ही इतरत्र कुठेही ऐकलेली नाही. Happy

बरं आपण दुसर्‍याला ज्याबद्दल बोल लावतो, तेच स्वतःदेखिल करतो याचं कायमच भान असेल असं नाही. शेजार्‍यांच्या कुत्र्याच्या पायाला पोटीस बांधण्यासारखी लोकसेवा करण्यापासून घरात कामाला असलेल्या प्रत्येकाची जातीनं विचारपूस करून, त्यांना ओ येइस्तोवर खायला घातलं की तिचा दिवस सार्थकी लागायचा.

एकदा घरी काम करणार्‍या बाईंच्या नवर्‍यानं त्यांना दारूच्या नशेत मारलं. दुसर्‍या दिवशी आजीनं तिच्या अंगावरच्या जखमा बघितल्या. 'तुला झाशिची राणी व्हायला सांगते. पण तू ऐकत नाहीस. त्याच्या हातातली काठी घेऊन त्याला बडवत जा. तुला सांगून समजत नाही' वगैरे ऐकवून झालं. बाई बिचार्‍या खाली मान घालून ऐकत होत्या. मग तिच्या मुक्या मारावर लेप लावून झाले. तिला खायला घालून वेदना शामक औषध दिलं. काकाला सांगून बाईंच्या नवर्‍याला पाचारण करण्यात आलं. तोवर त्यांची रात्री चढलेली उतरली होती.

तो आल्याआल्या आजीकडून पहिला प्रश्न झाला,
"काय रे, गिळलं होतंस काही की उपाशीपोटी प्यालास?"
मुंडी खाली घालून बाईंचा नवरा म्हणाला, "जी, खाऊनशान प्यायलो."
"मग, घरी येऊन मुकाट पडायला काय होतं? मारापिटी कशाला करतोस?"
"चुकी झाली."
"मग बायकोची माफी माग. पुन्हा हात उगारलास तर तोडायला मीच तिला दांडकं आणून देईन. समजलं? अन् काय रे, रोज ढोसावी कशाला?"
"कष्टाचं अंग दुखते, आजीबाई".
"रद्दीच्या दुकानात नुस्ताच बसतोस नं? तिथे कसले कष्ट पडतात तुला? तुझी बायको बघ, चार घरी कामं करते. घरचं बघते! तिला नाही पडत कष्टं? ती नाही तुझ्यासारखे पिऊन तमाशे करत!"

संवाद पुढे बराच वेळ चालला. हा सगळा धिंगाणा घरापुढल्या अंगणात सुरू असल्यामुळे फाटकातून आत येणार्‍या प्रत्येकाला पुढल्या रांगेचं तिकिट काढल्यागत वाटत होतं. पुढला अर्धा-पाऊण तास बाईंच्या नवर्‍याला फैलावर घेऊन झालं. त्यानं आजीच्या पाया पडपडून 'आता पिणार नाही. हात उगारणार नाही'च्या शपथा घेतल्या. आमच्या आजीनी त्याला बायकोच्या पाया पडून माफी मागायला लावली. त्यानं तिचं जास्तं डोकं फिरवलं असतं तर, मला खात्री आहे, तिनं त्याला सगळ्या बघ्यांच्याही पाया पडायला लावलं असतं. बहुतेक पुढला बराच काळ माणूस सुतासारखा सरळ होता.

.... पाया पडून झाल्यावर तिसरा अंक संपला. तेव्हा आमच्या घरचा गोडलिंबाचा पाला आपल्याच दारातल्या झाडाचा आहे या समजुतीनं रोज न्यायला येणार्‍या एक आजी म्हणाल्या, "म्हातारीनं शिद्दा केला मसन्याले! पन आजीबाईचं तरी बघा, कोनाची म्हस आन् कोनाले ऊठबस!"

सगळ्या म्हशी आजीला आपल्याच वाटतात हे त्यांना कोण सांगणार?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडलं.

आज्यांचा म्हणीसंग्रह भारी असायचा पण. आम्ही पण आईच्या आईचं काही प्रसंगी बोलणं ऐकून फिदीफिदी हसायचो.

मस्तच Happy
स्वरचित म्हणी बद्दल त्या तर कधी कधी खतरनाक असायच्या...

Happy इथला मजकूर "आयजीच्या जीवावर बायजी उदार" वाटत असल्याने काढलेला आहे Happy

सगळ्यांना धन्यवाद!

>>आजीबई पण वल्ली दिसतायत
हो हो. शिवीपण कसली भारी आहे! Proud

वर मूळ लेखात लिहायचं राहिलं, 'पिणे' प्रकरणावरून आजीची आणखी एक म्हण आहे. पिणार्‍याची लाज आणि कुरपाची खाज, दोन्ही निरर्थक! Lol (कुरूप म्हणजे हाता-पायाला गोल फोडासारखं काहीतरी येऊन त्यावरच्या त्वचेचं सेन्सेशन नाहिसं होतं, ते.)

Lol

का रे पाव्हण्या कुथतोस, तर म्हणे बसल्या जागी करमेना..! <<<

मृ, ही म्हण आमच्या घरी 'का रे पावन्या कुथतो, तं बसला जागा रुततो' अशी वापरतात. Happy

Happy दोन्ही आज्या भारी आहेत.
माझी आजीसुद्धा बोलताना म्हणींची खमंग पेरणी करत असते. 'आधी गुतू नये , मग कुथू नये', ' भिड भिकेची बहिण ', ' एक् नकार शंभर विघ्ने निवारी' ह्या म्हणी अस्मादिकांनी वारंवार ऐकल्या आहेत. Proud

आवडल्याच आज्जी! Happy छान लिहिले आहे. माझ्या आजीची आणि तिच्या तोंडच्या काही खास म्हणींची आठवण झाली.
Happy

अती तिथे माती, भित्यापाठी ब्रह्मराक्षस, भीड भिकेची बहीण, दुभत्या गायीच्या लाथा गोड, भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी, साखरेचे खाणार त्याला देव देणार, गाढवाला गुळाची चव काय, वरातीमागून घोडं, अगं अगं म्हशी मला कुठे नेशी, भरवशाच्या म्हशीला टोणगा इत्यादी म्हणी नेहमीच्या बोलण्यातही सहज पेरायची ती. पादा पण नांदा, हौसेने केला वर, त्याला दिवसा ताप रात्री ज्वर, धू म्हटलं की धुवावं... वगैरे काही ठेवणीतल्या 'सालंकृत' म्हणी विशिष्ट माणसांसाठी आणि नेमक्या प्रसंगांसाठी राखीव असत!

भारीच ! Happy कोनाची म्हस आन कोनाले ऊठबसचा इतिहास असा आहे तर ! मायबोलीकरांना ( खास करुन कंपूकरांना Wink ) ह्या म्हणीची प्रचिती कायम तुझ्या पोस्टींतूनच आलेली आहे.

म्हणींच्या धाग्यावरुन आमच्याकडच्या वंशपरंपरागत म्हणी साभार :
आमच्याकडे माझ्या आज्या आणि पणज्या ह्यांना अगदी सर्रास म्हणी पेरत बोलताना ऐकलं आहे. अगदी विक्षिप्त म्हणी ! पणजीचा जन्म १९०० सालचा. काही म्हणी तिच्या अगदी आवडत्या. सतत वापरायची.

तरण्या झाल्या बरण्या, म्हातार्‍या झाल्या हरण्या ( हे आम्ही भावंडं लोळत पडलो की हमखास ऐकू यायचं )
अंगात नाही बळ, चिमटा काढून पळ ( ही म्हण खास तिच्या एका दमेकरी सुनेसाठी )

घरात वातूळ पदार्थ शिजले की ह्या म्हणी आल्याच पाहिजेत तिच्याकडून :
पादर्‍याला पावट्याचं निमित्त
अटकूबाई मटकूबाई पावट्याचं खाणं, अर्धी रात्र झाली नाही .. ढुं** म्हणतं गाणं !

आजीची खास :
आई ती आई, इतरांवरुन वणवा जाई ( आईसारखं प्रेम दुसरं कुणी करु शकत नाही )

माझ्या मावसबहिणीची मुलगी म्हणजे आजीची पहिली पणती. आजीकडून अगदी हक्काने लाड पुरवून घेते. एकदा मात्र आजी तिच्या घरी गेली असताना ती भलतीच भाव खायला लागली. आजीकडे बिलकूल बघेना. तर बहिणीच्या सासरच्या नातेवाईकांसमोर आजीने बेधडक ऐकवलं ...
जावयाचं पोर हरामखोर
जावयाच्या जावयाचं पोर महा हरामखोर Proud

>>तरण्या झाल्या बरण्या, म्हातार्‍या झाल्या हरण्या ( हे आम्ही भावंडं लोळत पडलो की हमखास ऐकू यायचं )
अंगात नाही बळ, चिमटा काढून पळ ( ही म्हण खास तिच्या एका दमेकरी सुनेसाठी )>> Lol अगो

पुन्हा एकदा, सगळ्यांना मनःपूर्वक धन्यवाद!

गजानन, Lol म्हणजे आजीची म्हण अगदीच स्वरचित नव्हती तर!

>>धू म्हटलं की धुवावं... Lol
'कपडे' येत नाही डोक्यात!

अगो, Biggrin तुफान आहेत आजीच्या म्हणी! अंगात नाही बळ.... Proud

>>त्या इतरत्र कुठेच ऐकू न आलेल्या म्हणी अजून लिही बरं इकडे!
वर्षू, आता सगळ्या आठवत नाहीत. घरी इतरांना विचारून नक्की लिहीन.

एक आठवली. एखाद्या कृतीतून इच्छा असलेलं फळ, निकाल मिळणार नाही हे माहिती असूनही ती कृती करत राहण्याबद्दल तिच्याकडे अत्यंत अचरट म्हण होती (की वाक्प्रचार).. "लेंड्या पेरून भेंड्यां (उगवण्या)ची वाट बघणे" Proud

Pages