छत्रपती (शार्दुलविक्रिडित)

Submitted by संतोष वाटपाडे on 27 February, 2014 - 21:56

होता बाहुबली विराट जगती राजा शिवाजी असा,
ज्याने गाजविला विशाल भगवा राष्ट्रात चोहीकडे....
सीमापार कुठे टपून बसले होते फ़िरंगी जरी,
कोणाचीच नसे बिशाद बघण्या एकत्र राज्याकडे....

जातीभेद मुळी पसंत नव्हता कोणासही थोडका,
गावोगाव सुखी तमाम जनता नांदायची चांगली..
मो्ठी आक्रमणे करुन जितले साम्राज्य जे जे नवे,
किल्लेकोट तळी नवीन सगळी त्यांनी तिथे बांधली.....

कोळी चर्मकरी सुतार कुणबी युद्धावरी धावले,
न्हावी ब्राम्हण आणखी मरहटे सारे उभे ठाकले......
झाले कैक लढे जिथे यवनही हारविला फ़ारदा,
योद्धे वीर असे तुटून पडता शत्रू रडू लागले.....

तानाजी तगडा मुरार खपला शेलार बाजी प्रभू ,
सैन्यातील अनेक वृध्द लढले मृत्युमुखी जाहले....
होते छत्रपती म्हणून अवघे हे पर्व नावाजले,
सह्याद्रीस तसेच राज्य दिधले जैसे अयोध्येतले...

किल्ले प्रांत जुने पुन्हा लढविले ताब्यातही घेतले,
राजा छत्रपती गुणी चमकला राष्ट्रात चोहीकडे...
शत्रू लोळविले जहाल सगळे होते जरी क्रुर ते,
झंजावात सदा असे खवळते मागावरी रांगडे....

-- संतोष वाटपाडे (नाशिक)

Group content visibility: 
Public - accessible to all site users