बाबा रामदेव हे नाव आता सर्वतोमुखी झालेले आहे. योगापासुन सुरुवात करुन त्यांनी राजकारणात किंवा समाजकारणात म्हणुया प्रवेश केलेला आहे. मात्र हा लेख त्यांच्या राजकारणाचा किंवा समाजकारणाचा विचार करणारा नाही. त्यांच्या उदयामागची कारणे शोधणे हा या लेखाचा उद्देश आहे. आणि ही कारणे सामाजिक आणि योगिक दृष्टीकोनातुन तपासुन पाहण्याचा मानस आहे. रामदेवांचा उदयामागची कारणे शोधणे इतके महत्वाचे आहे काय? तर याचे उत्तर हे की अनेक योगसंस्था रामदेवांच्या अगोदरपासुन कार्यरत आहेत. मग रामदेवांनाच एवढी अभूतपूर्व प्रसिद्धी मिळण्याचे कारण काय? आपल्या समाजात असे काय बदल झालेत कि रामदेवांनाच लोकांनी इतकं डोक्यावर घ्यावं? या व तदानुषंगीक अशा अनेक प्रश्नांची उकल करण्याचादेखिल हा प्रयत्न आहे.
ज्यांना योग या विषयाबद्दल थोडीफार माहीती आहे त्यांना साधारणपणे ही कल्पना असेल कि भारतात गेली कित्येक दशके अनेक संस्था या क्षेत्रात भरीव काम करीत आहेत. योगविद्या गुढातुन बाहेर येऊन समाजात व्यवस्थित रुळलेली आहे. आणि या टप्प्यावर हे काम कदाचित रामदेवांच्या जन्माअगोदरच होऊन गेलेले आहे. मला चटकन निदान चार अशा संस्था माहित आहेत ज्यांनी योग विषयात केलेलं कार्य जगप्रसिद्ध आहे. पहिली लोणावळ्याची स्वामी कुवलयानंद यांनी स्थापन केलेली “कैवल्यधाम”. दुसरी स्वामी योगेंद्रांची सांताक्रुझ, मुंबई येथील “योग इन्स्टीट्युट”. तिसरी बी.के. एस. अय्यंगार यांची पूणे येथील “अय्यंगार मेमोरियल”. आणि चौथी स्वामी सत्यानंद सरस्वती यांची “बिहार स्कुल ऑफ योग” ही मुंगेरस्थित संस्था. या चारी संस्था जरी योग विषयात काम करीत असल्या तरी त्यांच्या योगविषयक दृष्टीकोनात मात्र फरक आहे. त्यानुसार त्यांच्या शिकवण्यातही फरक आहे. मात्र या संस्था पारंपरिक योगविद्येची भलावण करतात यात शंका नाही. या संस्थांची अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत आणि जगभर योगक्षेत्रात या संस्थांचा दबदबा आहे. या अगदी मोठ्या संस्था बाजुला ठेवल्या तरी या व्यतिरिक्त इतर काही संस्थांनीदेखिल या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहेच. मुंबई शहरात स्वामी कुवलयानंदांचे शिष्य श्री. सदाशिव निंबाळकर याची “योग विद्या निकेतन” गेली अनेक वर्ष कार्यरत आहे. निंबाळकरांची पुस्तके तर “क्लासिक” गणली जावी अशी आहेत. त्यानंतर श्री. निकम गुरुजींची “अंबीका योग कुटीर”, ठाण्यात घंटाळी येथील श्री. व्यवहारे गुरुजींची संस्था, अशा अनेक संस्था आहेत. मात्र या संस्था सर्वसामान्य लोकांना कितपत माहीती आहेत याची शंकाच आहे.
रामदेवांची गोष्ट मात्र अगदी वेगळी आहे. योग करो न करो. रामदेवांचे नाव घरोघरी सर्वांना माहित आहे. त्यांनी शहर आणि गावांत योग शिबीरे घेऊन अवघा देश विंचरुन काढला आहे. अगदी सर्वसामान्य लोकांना ते ज्ञात आहेत. रामदेव त्यांच्या पूर्वसुरींपेक्षा अनेक बाबतीत वेगळे आहेत. उपचारांच्या भागात ते फक्त योगावरच थांबत नाहीत. “सूक्ष्म व्यायामाच्या” अंतर्गत ते अॅक्युप्रेशर देखिल वापरतात. रामदेवांच्या उपचार प्रक्रियेत आयुर्वेदाचे महत्त्वाचे अंग आहे. उपचारांमध्ये आयुर्वेदाचा ते सढळ हस्ते वापर करतात. त्यांनी परदेश वार्या केल्या आहेत. आणि माहिती अशी आहे कि ते तेथेही प्रसिद्ध आहेत. “पातंजल योगपीठ” ही अतिशय भव्य वास्तु त्यांनी बांधली आहे. जेथे ते योग उपचार आणि योग संशोधनाचे काम करतात. त्यांनी आयुर्वेदिक औषधेही बनवण्यास सुरवात केली आहे. लोकांची या औषधांच्या दर्जाबद्दल अतिशय चांगली मते आहेत. रामदेव फक्त दूरदर्शनमुळे घरोघरी पोहोचले आहेत असे नाही. त्यांची पुस्तके, विविध रोगांवरील योगोपचाराच्या डिव्हीडी प्रकाशित झाली आहेत. युट्युब सारख्या साईटवर त्यांच्या चित्रफीती उपलब्ध आहेत. हे सारं काही फक्त गेल्या दहा पंधरावर्षात रामदेवांनी केलेले आहे. रामदेवांचा हा झपाटा पाहिला तर विलक्षण आश्चर्य वाटल्यावाचुन राहात नाही. त्यांच्या जन्माअगोदर काही दशके स्थापन झालेल्या संस्था योगवर्तुळाबाहेर परिचित नसाव्यात आणि उण्यापुर्या दहा पंधरा वर्षात रामदेव बाबांचे नाव सर्वतोमुखी व्हावे याची कारणे साधी, सोपी आणि सरळ नाहीत.
कुठल्याशा चॅनलवर बाबा होऊ घातलेल्या आणि त्यात साफ अयशस्वी ठरलेल्या एकाने मला सांगितले कि रामदेवांचे यशस्वी होण्याचे कारण ते नौली करतात ज्यामुळे लोक प्रभावित होतात. हे कारण मला पटले नाही. नौली ही योगातील एक क्रिया आहे ज्या योगे साधक पोटाचे स्नायु डावीकडुन उजवीकडे आणि उजवीकडुन डावीकडे गरगर फिरवतो. हे क्रिया लोकांना प्रभावित करत असली तरी ही आपल्याकडे नवीन नाही. कुठल्याही योग केंद्रात ही क्रिया करणारे एखाद दोघेजण असतातच. कठीण क्रिया करणे किंवा कठीण आसने करणे हे अशा तर्हेच्या लोकप्रियतेमागचं कारण असु शकत नाही. डोंबारी गावोगाव अचाट शारिरीक प्रयोग करुन दाखवत होतेच. जिमनास्टीकमधले शारिरीक लवचिकतेचे अनेक आकर्षक प्रकार लोकांना नवीन नाहीत. रामदेवांच्या यशाची कारणे सामाजिक आहेत, मात्र निव्वळ सामाजिक कारणातुन त्यांचा यशस्वी प्रवास लक्षात येणार नाही, त्यासाठी त्यांचे जे क्षेत्र आहे त्या योगमार्गाचादेखिल विचार करणे भाग आहे.
बाबा रामदेव यांच्या उदयाचे कारणे शोधताना ते आपल्या पूर्वसूरींपेक्षा कसे वेगळे आहेत हे पाहणे उद्बोधक ठरेल. जुन्या स्थापन झालेल्या संस्था जर पाहिल्या तर असे लक्षात येईल कि त्यांची प्रचार प्रसाराची पद्धत, त्यामागची भूमिका ही आजच्या आधुनिक योगगुरूंपेक्षा अगदी वेगळी होती. म्ह्णुनच कैवल्यधाम असो कि योग इन्स्टीट्युट, बिहार स्कूल असो कि अय्यंगार मेमोरियल कुणीही इतक्या वर्षात झपाट्याने पसरलेले नाही. याचे कारण प्रचिनांची अशी समजुत होती की फार पसरल्याने देण्यात येणार्या ज्ञानाचा योग्य दर्जा राखला जाणार नाही. त्यामुळे व्हायचे काय की जगभरातुन तुम्ही आमच्याकडे या. आमच्याकडे आहे ते सर्व आम्ही तुम्हाला शिकवु. तुम्ही आपल्या देशात जाऊन त्याचा प्रसार करा. मात्र आम्हाला तेथे आमची शाखा ऊघडायला सांगु नका अशीच सर्वांची भूमिका राहिली. म्ह्णुन काही तुरळक अशी केंद्रे या संस्थांच्या नावावर आहेत. या संस्थाच्या केंद्रांच्या प्रसाराची तुलना रामदेवांच्या प्रसाराशी केली तर बैलगाडीची तुलना जेटशी केल्यासारखे होईल. याशिवाय दुसरा मुद्दा हा शास्त्राचा आहे. योगमार्ग हा अत्यंत प्राचिन अशा तंत्रमार्गातुन आल्याचे मत आहे. ही प्राचिन पुस्तके पाहिल्यास अनेक पूस्तकातुन एक भूमिका घेतलेली दिसते. शंकराने हे गुप्त ज्ञान पार्वतीला देताना परखड इशारा दिला “अभक्ताय न दातव्यं गोपितं रक्ष पार्वती”. आपल्या परोक्ष दिले जाणारे ज्ञान सत्पात्री आहे की नाही याची खात्री नाही. त्याचा दुरुपयोग होणारच नाही याचीही खात्री नाही नाही. दर्जा नीट राहील कि नाही याबद्दल शंका आहे. तेव्हा आहे ते पुरे आहे. पसरण्यापेक्षा सखोल जाणे बरे हि भूमिका प्रचिनांची आहे. हे योग्य कि अयोग्य, यामुळे फायदा झाला कि नुकसान यावर चर्चा करता येईल मात्र तो वेगळा विषय आहे.
यानंतर महत्त्वाचा मुद्दा योगशिक्षणाचा आहे. ज्यांनी योगाची पुस्तके वाचली आहेत त्यांच्या एक लक्षात येईल की या पुस्तकांचा उपयोग फक्त माहिती मिळविण्यासाठी असतो. ही पुस्तके वाचुन योगाभ्यास करता येत नाही. पुस्तक कितीही ओघवत्या भाषेत लिहिलेले असले किंवा सोपे असले तरीही प्रत्येक पुस्तकात एक इशारा दिलेली आढळतो. “अनुभवी शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करावा अन्यथा अपाय होऊ शकतो.” या सुचनेमुळे योगाभ्यास हा “मॉर्निग वॉक” ला जावं, “लाफ्टर क्लब” जॉईन करावा किंवा धावायला सुरुवात करावी या इतका सोपा ठेवलेला नाही. सर्वसामान्य माणसांमध्ये योग माहित नसला तरी या इशार्याची बहुधा माहिती असते त्यामुळे ते स्वतःहुन पुस्तके वाचुन योगाभ्यास करण्याची शक्यता जवळपास नसतेच. रामदेवांची भूमिका मात्र अगदी वेगळी आहे. ते आधुनिक योगगुरु आहेत. योगाच्या प्रचार प्रसारासाठी कटीबद्ध आहेत. तो प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी ते तडजोडी करायला तयार आहेत. त्यामुळे ते त्यांच्या पूर्वसूरींपेक्षा वेगळ्या मार्गाने जातात. त्यांच्या मनात योगाच्या मुक्त प्रचाराबाबत कसलिही शंका नाही. दूरदर्शनवर पाहुन योगविद्या शिकवण्यात त्यांना कसलाही धोका वाटत नाही. एकदा या बाबींबद्दल नि:शंक झाल्यावर रामदेवांचा रथ भरधाव निघाला त्यात नवल ते काय?
त्यामुळे सर्वप्रथम रामदेवांनी मिडीयाचा अत्यंत प्रभावीपणे आणि आक्रमक तर्हेने वापर केला. ते फक्त आस्था चॅनलवरच आले नाहीत तर इतर चॅनल वर देखिल त्यांचा राबता राहिला. पुस्तके, डीव्हीडी या माध्यमांद्वारे त्यांनी योगविद्या शिकवण्यास सुरुवात केली. कुठला तरी वर्ग गाठुन, अनुभवी गुरुचे मार्गदर्शन घेतलेच पाहिजे हा समज त्यांनी लोकांच्या मनातुन काढुन टाकला. त्यांनी “योग” हे जवळपास प्रोडक्ट असल्याप्रमाणे त्याचे मार्केटींग केले. त्यांचे रांगडे व्यक्तीमत्व या सार्यांना पोषकच ठरले. स्थानिक अथवा हिंन्दी भाषेतुन समोर बसलेल्या लोकांशी संवाद, अधुन मधुन त्यांना त्यांच्या चुकिच्या सवयींबद्दल चिमटे काढणे, मध्येच विनोदाची पखरण, रोग पुढच्या पायरीवर पोहोचला असल्यास सोपे आयुर्वेदिक उपाय. त्याबरोबरच दिनचर्या कशी ठेवावी याचे शिक्षण. आणि हे सारे करत असतानाच वेद,पुराणातल्या कथा, त्यातील शिकवणुक सांगत सार्या वातावरणाला दिलेले धार्मिक अधिष्ठान हे मिडीयात अत्यंत लोकप्रिय झालं आणि रामदेव नाव एकदम चलनी नाणं बनुन गेलं. समोर योगासारखा विषय शिकवणारा माणुस आपल्याच भाषेत बोलतोय हे सामान्य जनतेला अप्रुप वाटल्यास आश्चर्य नाही कारण योगशिक्षक हा माणुस परीटघडीचे कपडे घालणारा साधारणपणे उच्च मध्यमवर्गातील असतो. मात्र रामदेव हे जनतेला आपले वाटुन गेले.
रामदेवांनी योगात आणलेला अपार सोपेपणा त्यांना उच्चभ्रु लोकांना जवळ आणण्यात कारणीभूत ठरला, कसलिही अंगमेहनत करण्यास नाखुश असलेल्या या लोकांना फक्त कपालभाती आणि अनुलोमविलोम करुन आरोग्य राखण्याची खात्री मिळु लागली. जेवढं जमेल तेवढं करा. नपेक्षा फक्त प्राणायाम करा. तुमच्या सोयीच्या वेळी करा. ध्यान किंवा प्राणायामाला पद्मासनाची गरज नाही. हे असे असंख्य बदल रामदेवांनी पारंपरिक योगशिक्षणात केले. त्यामुळे बागांमध्ये, खुर्च्यांवर बसुन कपालभाती करणारी माणसे दिसु लागली. ज्यांना योगाच्या तात्विक भागात रस आहे ती माणसे बाबांकडुन तत्त्वज्ञान ऐकु शकतात. ज्यांना नाही ती प्राणायामावर लक्ष केंद्रीत करु शकतात. कसलिही सक्ती नाही. रामदेव सतत संस्कृतातले श्लोक म्हणत असले तरी त्याचा दाब वाटुन माणसे बुजुन जात नाहीत. आणि इतर उच्चभ्रु अध्यात्मिक गुरुंप्रमाणे झुळुझुळु इंग्रजी बाबा बोलत नसल्याने शिक्षण फारसे नसलेला वर्ग “नर्वस” होण्याची शक्यताच नाहीशी होऊन जाते.
डॉक्टरी उपचारांचा वाढलेला खर्च, नाना तर्हेच्या चाचण्या, न परवडणारी औषधं तर लोकांना रामदेवांकडे आकॄष्ट करण्याचे कारण ठरलीच पण त्याहिपेक्षा ज्याला “वर्ड ऑफ अॅशुरन्स” म्हणता येईल तो घटक निर्णायक ठरला. कुठलाही डॉक्टर, उच्च रक्तदाब, मधुमेह “क्युअर” होइल असे सांगत नाही. रामदेव मात्र “१००% क्युअर” हा शब्द वापरतात. या शब्दाने जादुचे काम केले दिसते. योगाच्या इतर आधुनिक पुस्तकांमध्ये योगातल्या दाव्यांबद्दल सावध आणि शास्त्रिय पवित्रा घेतलेला दिसतो. रामदेव मात्र बहुधा एडस वगळता जवळपास सर्वच रोगांवर “१००% क्युअर” आहे असे म्हणतात. त्याबद्दल त्यांच्या केंद्रातल्या संशोधनाचे आकडे ते देतात. ज्यांना उपचारांचा फायदा झालेला आहे अशी माणसे उत्साहाने इतरांसमोर त्यावर बोलतात. हे सारं योगक्षेत्रात नवीन आहे.
त्यामुळे भाषेतला सोपेपणा, योगाचे केलेले सहजिकरण, मिडियाचा केलेला आक्रमक वापर, उपचारांबद्दल लोकांना दिलेली ठाम खात्री, सारा देश उभा आडवा विंचरुन घेतेलेली शिबीरे, आपल्या कार्याला दिलेले धार्मिक अधिष्ठान ही रामदेवांचा प्रभाव झपाट्याने पसरण्याची काही कारणे आहेत असे मला वाटते.
सामाजिक दृष्टीकोनातुन रामदेवांचा उदयाची कारणे पाहिल्यावर आता योगाच्या बाजुने काही गोष्टी पाहणे आवश्यक आहे. रामदेवांनी योगाच्या क्रांतीची सुरुवात केली असे म्हणायला हरकत नाही. ज्या माणसांना योग म्हणजे फक्त आसने अशी काही जुजबी माहिती होती ती माणसे कपालभाती करु लागली. अनुलोम विलोम, प्राणायाम, कपालभाती जणुकाही नेहेमीच्या वापराचे शब्द झाले. योगाबद्दल दूरस्थ भाव गळुन पडला. योग हा विशिष्ठ वर्गाने आचरण्याची विद्या राहिली नाही. योगाबद्दलची भीती देखिल नाहीशी झाली. घरोघरी माणसे रामदेवांचा कर्यक्रम पाहु लागली. त्यांची पुस्तके वाचली जाऊ लागली. त्यांची औषधे लोकप्रिय होऊ लागली. या सार्या गोष्टी जे सकारात्मक घेतल्या पाहिजेत. या बाबी जमेच्याच म्हणायला हव्यात. मात्र पारंपरिक योगाभ्यास शिकवणार्या संस्था याबाबत काय म्हणतील? यावर त्यांनी टिका केली तर त्यामागे काय रामदेवांच्या लोकप्रियतेबद्दल हेवा असेल काय? या संस्थांनी फारसे न पसरणे हे स्वतःहुन स्विकारले याचा उल्लेख केला आहेच. मात्र त्यांचे आक्षेप काय असतील, असु शकतील याचा अंदाज बांधायला हरकत नसावी..
सुलभीकरणाचे फायदे एका मर्यादेपर्यंत असतात. मात्र काही बाबतीत ते मर्यादेबाहेर गेले कि त्याचा परिणाम भलताच होतो. बाबा रामदेवांनी योग अतिसुलभ केला. अर्थात याची सुरुवात त्यांनीच केली असे म्हणता येणार नाही. एका उदाहरणाने हे स्पष्ट करावेसे वाटते. अलिकडे ध्यानाच्या शिबीरात किंवा तत्सम अभ्यासात सर्वप्रथम घाईघाईने एक गोष्ट सांगितली जाते कि पद्मासन घालण्याची आवश्यकता नाही. कसेही बसा फक्त ताठ बसले म्हणजे झाले. हे सांगताना सांगणार्याच्या चेहर्यावरचा उदारपणा तर अगदी गोळाकरण्याइतका दाट झालेला दिसतो. ऐकणारेदेखिल हळुच सुटकेचा निश्वास सोडतात. जणुकाही कुठल्याशा शिक्षेपासुन सुटका झालेली आहे. खरी गोष्ट अशी आहे कि पारंपरिक योगवर्गात सुरुवात सुखासनापासुन होते. त्यानंतर काही महिन्यांनी किंवा क्षमतेनुसार योगाच्या सरावाने जसजसं शरीर लवचिक होते तशी माणसे अर्धपद्मासनापर्यंत प्रगती करतात. त्यानंतर पुढे शक्य झाल्यास पद्मासनापर्यंत मजल जाते. पद्मासनाचे स्वतःचे फायदे आहेत. आसनांचे स्वतःचे असे शास्त्र आहे. मात्र या अतिसुलभीकरणाने होते हे कि लोकांना पद्मासन करण्याची मुळी गरजच नाही असे वाटते. ही भावना बरोबर नाही असे माझे मत आहे.
रामदेवांनी प्राणायाम अतिसुलभ केला. माणसे कपालभाती करु लागली. इतर प्राणायाम रामदेवांनी कुंभकविरहित ठेवले आहेत त्यामुळे तुलनेने धोका कमी झाला. पूरक, कुंभक, रेचकाचे प्रमाण ठरवण्याची भानगड रामदेवांनी ठेवली नाही. ते फक्त “लंबा लो लंबा छोडो” एवढच म्हणतात. त्यामुळे झालं हे की माणसे बागेत खुर्च्यांवर बसुन गप्पा मारत कपालभाती करु लागली. पुढे काही वेळा प्राणायाम बाजुला राहुन फक्त नखावर नखे घासुन टकलावर केस उगवण्याचा प्रयत्न सुरु झाला. पारंपरिक योगवर्गात प्रथम आसने त्यानंतर प्राणायाम असा सर्वसाधारण क्रम असतो. हा क्रम रामदेवांच्या योगवर्गात शिकलेली माणसे पाळतात काय याबद्दल शंका वाटते. दुसरा महत्त्वाचा भाग हा कि रामदेव आसने जरी दाखवत असले तरी ते प्राणायामावर अतिरिक्त भर देतात. एकुणच अनुलोम विलोम आणि कपालभाती केला तर बाकी फारसं काही करण्याची आवश्यकता नाही अशी समजुत यातुन वाढीला लागण्याची शक्यता वाटते. या गोष्टी पारंपरिक योगाभ्यास शिकवणार्या संस्थांच्या पचनी पडतील असे वाटत नाही.
यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अनेक मार्गांची सरमिसळ. भगवान पतंजली हे योगसूत्राचे प्रणेते मानले जातात. त्यांच्याबद्दल एका प्रसिद्ध श्लोकात म्हटलं गेलंय ” योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्यच वैद्यकेन” म्हणजे योगाने चित्ताचा आणि वैद्यकाने शरीराचा मल नाहीसा करणार्या अशा पतंजलीला (नमस्कार असो). अशातर्हेने आयुर्वेदाशीदेखिल पतंजलीचा संबंध आहे. मात्र अधिकृतपणे योगाच्या व्यासपीठावरुन आयुर्वेदाचे उपाय सांगीतले जात नाहीत. आयुर्वेद हा योगाचा सहोदर जरी मानला गेला तरीही ही क्षेत्रे वेगळीच राहीली. योगातले षटकर्म आणि आयुर्देवाचे पंचकर्म यात काही बाबतीत साम्य आहे तरीही त्यांची सरमिसळ केली जात नाही. रामदेवांनी मात्र योग आणि आयुर्वेद हे दोन्ही एका व्यासपीठावर आणले. त्यात सुक्ष्म व्यायामाचा अंतर्भाव करुन अॅक्युप्रेशरला प्रवेश दिला. अभ्यासाच्या अखेरीला जोरजोरात ठहाके लगावुन लाफ्टरक्लबही आणला. रामदेव जरी प्रथम योगाची भलावण करतात आणि अगदीच नाईलाज झाला तर औषधे वापरा म्हणतात तरीही अशा तर्हेची सर्वसमावेशक उपचारपद्धती ही योगपरंपरेहुन संपूर्णपणे भिन्नच म्हणायला हवी. माणसाला बरं वाटणं महत्वाचं मग उपचारपद्धती कुठलीही असो हे मला मान्य आहे. येथे फक्त रामदेव हे योगविद्येच्या बाबतीत परंपरेहुन अगदी भिन्न मार्गाने गेले हे दाखवण्याचा प्रयत्न आहे.
तर अशा तर्हेने पूर्वसूरींहुन वेगळ्या मार्गाने रामदेवांनी सुरुवात करुन भूतो न भविष्यती असं यश मिळवलं. आणि योगक्रांतीची सुरुवात केली. आता योगाचा झंझावात सुरु झाला आहे. हे वादळ थांबणार नाही असं वातावरण निर्माण झालं आणि नेमक्या त्याच वेळी रामदेवांना राजकारणात जाऊन जनतेत बदल घडवण्याची प्रेरणा झाली. योगवर्गात योगाभ्यासाबरोबरच प्रार्थना सुरु झाल्या. इतिहासातील प्रेरणादायी प्रसंग सांगणे सुरु झाले. त्यावर टिप्पणी करणेही आलेच. “ठंडा मतलब..” .वगैरे म्हणुन शितपेयांविरुद्ध युद्ध छेडले गेले. आता तर चुकुन ते चॅनल लावले तर योग वगळता बाकी सारे काही चाललेले असते. त्यातच अण्णा हजारें बरोबर जाण्याचा प्रयत्न झाला. वेगळ्याने आंदोलनाचाही प्रयत्न झाला. यासार्यात योग कुठेही दिसेना. कपालभाती, अनुलोमविलोम यांच्याशी निगडीत असलेले रामदेवांचे नाव ज्याक्षणी उपोषण आणि राजकारणासाठी घेतले जाऊ लागले. तक्षणीच होऊ घातलेली योग क्रांती विरुन गेली असे मला नम्रपणे म्हणावेसे वाटते. रामदेवांना ज्यातर्हेचा बदल या जगात हवा आहे तो त्यांना योगात राहुन करता आला नसता काय? समाजात कुठल्याही तर्हेचा बदल घडवण्यासाठी राजकारणाला पर्याय नाही काय? एखाद्या क्षेत्रात आपल्याला अमाप यश मिळालं म्हणुन आपण राजकारणात देखिल यशस्वी होऊ अशी अटकळ रामदेवांनी बांधली होती काय? तेथले हिशोब वेगळे असतात. तेथे लागणारी कौशल्ये वेगळी असतात याची त्यांना जाणीव झाली नसेल काय? योगक्रांतीची सुरुवात होण्याचा काळात रामदेवांनी आपला मार्ग बदलुन या क्रांतीचा मार्ग खच्ची केला ही अलिकडल्या काळातील अत्यंत दुर्दैवी घटना आहे असं मला वाटतं.
अतुल ठाकुर
चांगले निरीक्षण! "चांगला"
चांगले निरीक्षण!
"चांगला" शिक्षक मग कुठलाही असो, विद्यार्थ्याचे व्यक्तीमत्त्व घडवतो. त्यात सर्व आलेच. व्यायाम,सुध्रुढ शरीर, इंद्रियनिग्रह, चांगले विचार, स्पष्ट उच्चार, समाजकारण, राजकारण, अध्यात्म! विद्यार्थांच्या आकलन्-शक्ती नुसार त्या त्या वेळेस जी साधने उपलब्ध आहेत ती साधने वापरून शिक्षण पोहोचवतो. नवीन शिक्षण्-पद्धतीचा शोध लावतो.
समाज हा विद्यार्थी धरला आणि वरचे वाचले तर रामदेव बाबांचे कौतुक करायला हवे.
"सोशल नेटवर्कींग" (सामाजिक जालव्यवस्था?) मधे "पोहोच" किंवा "reach" ला फार महत्त्व आहे. ताजे उदाहरण द्यायचे म्हणजे Facebook ने WhatsApp ला विकत घेतले ते याच मुख्य कारणासाठी. भारतातील बाकीच्या विचारधारानी रामदेव बाबांची वाढती लोकप्रियता आणि जनसामान्यांपर्यंत जाणारी पोहोच पाहून त्याना आपल्या विचारसरणीत सामील केलेय हे दुर्दैव. खरे उलटे व्हायला पाहिजे होते.
शेवटी माणसेच ती! चालायचेच!!
लेख आवडला.
लेख आवडला.
चांगलं अॅनालिसिस. आणखी एक
चांगलं अॅनालिसिस.
आणखी एक योग संस्था जी भारताबाहेर जास्ती फेमस आहे ती म्हनजे चेन्नईमधली कृष्नम्माचार्य योग मंदीरम्
माझ्या मद्रासमधल्या मैत्रिणींनाही ही संस्था माहित नाही आणी अमेरिकेतून दरवर्षी नियमितपणे तिथे शिकण्यासाठी जाणारी मंडळी इथे मला दिसतात
चांगला लेख. शेवटच्या
चांगला लेख.
शेवटच्या परिच्छेदातील नि:ष्कर्ष मात्र अनेकानेक कारणांमुळे अमान्य होतो. असो.
लेख आवडला. योग सुलभता जेवढी
लेख आवडला.
योग सुलभता जेवढी रामदेवांनी आणली तेवढी कोणीच आणली नाही हे खरेच. अचानक लोकं योगाकडे वळली आणि निरोगी राहण्याचे फायदे समजावून घेऊ लागली. ह्या सर्व बदलात मला खालिल बाबी मात्र खटकल्या.
१. योग आणि आर्युवेद ह्यांची सांगड घालणे.
२. कुठलाही रोग बरा होतो ह्याचा प्रसार करणे.
रामदेव बाबांनी "आरोग्य" ही लिमिट का माणावी? राजकाराणात त्यांची स्वतःची मते असू शकतात हे मला मान्य आहे. खरेतर चांगली माणसं राजकारणात उतरली तर राजकारण हे समाजकारण होऊ शकेल. पण इथे त्यांची चूक झाली. प्रसिद्धिच्या ओघात ते स्वतःला "चाणक्य" समजू लागले आणि गणित बदलले. , आंदोलन करणे हे ठिक पण वाटेल ते बोलणे, परदेशी जे असेल ते वाईटच आणि स्वदेशी सगळे चागंलेच, आर्युवेद म्हणजे प्रमाण ह्यामुळे आताशा तर बरेच लोकं "रामदेवबाबा कल्ट" असे संबोधून लोकांना मोडित काढतात. पण त्यांनी तुमच्या पूर्वाध देखील समजून उमजून वाचावा.
अजूनही वेळ गेली नाही, ते ऑलरेडी खूप प्रसिद्ध आहेत. आता परत त्यांनी "आरोग्य" हा विषय घेऊन जनजागृती करावी.
एखाद्या व्यक्तीला त्याच्या
एखाद्या व्यक्तीला त्याच्या अंगभूत गुणांमुळे तसेच त्याने ते पूर्णतया आत्मसात करण्यसाठी रात्रंदिवस केलेल्या मेहनतीमुळे त्याची ललाटी जे यश उमटते ते विशिष्ट एका घटकासाठीच असते. सचिन तेंडुलकरने क्रिकेटमध्ये बॅट टेकवेल त्या त्या ठिकाणी विक्रम उभे केले पण म्हणून उद्यापासून "मी फुटबॉल मैदानात जाऊन असेच विश्वविक्रम करणार" असे उदगार त्याच्या मुखातून कधीच बाहेर येणार नाही, इतका तो विनित आहे. रामदेवबाबांच्या संदर्भात अगदी मान तुकवून बोलायचे झाल्यास 'योग' मधील ते भीष्माचार्य ठरले आहेत. अगणित शिष्यवृंद आणि सार्या जगभर नाव पसरलेली ही व्यक्ती. पण यश डोक्यात काय गेले आणि हे योगसम्राट राजकारणाच्या आखाड्यात उतरले आणि आता ते आले, त्यानी पाहिले, त्यानी जिंकले असाच धोशा सुरू होणार असे वातावरण त्यांच्या गणंगांनी निर्माण केले. असे होत नसते....त्यातही भारताच्या राजकारणात. गेंड्याची कातडी असलेली आणि मगरीची पाठ असलेली जमात असते या क्षेत्रात. यांचा नायनाट होणे केवळ अशक्य....बाहेरच्यांनी म्हणायचे आत बसलेले सारे लुटारू आहेत....आणि असे म्हणणारे ज्यावेळी आत येतील त्यावेळी बाहेर नंबर लावणार्यांनी नवे लुटारू म्हणत याना संबोधन करायचे. हा पाठशिवणीचा खेळ अहोरात्र दिल्ली सत्तेसाठी चालू राहाणार आणि एक रामदेव आणि एक अण्णा हजारे यांचे काहीही वाकडे करू शकत नाही, हे तर आता स्पष्ट झालेच आहे. गाजावाजा केलेले अरविंद केजरीवाल पुरते दोन महिनेही सत्तेच्या पद्मिनीला सांभाळू शकले नाहीत....हा सारा विचार करता रामदेवबाबांनी योगशिक्षक म्हणून कमाविलेल्या नामाचा {जे अस्सलच होते} वापर योगाच्या अधिक प्रसार आणि प्रचारासाठी केला असता तर सार्यांनीच मनःपूर्वक स्वागत केलेच असते.
याचा विचार करता अतुल ठाकुर यानी लेखात शेवटी म्हटल्याप्रमाणे "...योगक्रांतीची सुरुवात होण्याचा काळात रामदेवांनी आपला मार्ग बदलुन या क्रांतीचा मार्ग खच्ची केला..." याला मी अनुमोदन देत आहे.
बाकी लेखात योग सामर्थ्याविषयी लिहिलेले विचार अत्यंत अभ्यासनीय असेच आहेत.
लेख आवडला.
लेख आवडला.
चांगला लेख !
चांगला लेख !
केदारला कानामात्रवेलांटीसकट
केदारला कानामात्रवेलांटीसकट अनुमोदन.
चांगलाच आढावा घेतला आहे...
चांगलाच आढावा घेतला आहे...
मित्रा केदारः योग आणि
मित्रा केदारः
योग आणि आयुर्वेद ही निगडीत आणि एकमेकांना पूरक शास्त्र आहेत. या दोन्ही शास्त्रांचा माझा स्वतःचा अभ्यास जेव्हा सुरु झाला तेव्हा मला हे हळूहळू उमगायला लागल आहे.
बाकी तुझ्या दुसर्या बुलेट ला अनुमोदन. बाबा रामदेव काहीही क्लेम करत फिरत असतात. खरतर तुझ्या सर्व पोस्टीलाच अनुमोदन.
अशोक, तुमची पोस्ट सुद्धा अतिशय उत्तम आहे. नेहमीसारखीच!
आणि खूप दिवसांनी एखाद्या मस्त लेखावर पोस्ट टाकाविशी वाटली असा छान लेख इथे टाकल्याबद्दल अतुल ठाकूर तुम्हाला तर खूप धन्यवाद. मायबोलीवर आजकाल तुमचा लेख दिसला की पट्टकन वाचावासा वाटतो.
लेख आवडला. एकुणच अनुलोम
लेख आवडला.
एकुणच अनुलोम विलोम आणि कपालभाती केला तर बाकी फारसं काही करण्याची आवश्यकता नाही अशी समजुत यातुन वाढीला लागण्याची शक्यता वाटते >> माझी अशी समजुत खरोखरच झालेली होती.
लेख आवडला. सर्व पैलूंचा
लेख आवडला. सर्व पैलूंचा व्यवस्थित विचार केला आहे; नेमका आणि नेटका मांडला आहे.
बाबा रामदेव यांनी योगातून योगासने वजा केली की काय असे वाटे. दुसर्या परिच्छेदात वर्णन केलेल्या वेगवेगळ्या योगगुरूंचे रामदेव यांच्या योगाबद्दल काय मत आहे ? माझ्या लहानपणी दूरदर्शनवर स्वामी धीरेन्द्र ब्रह्मचारी योगासने दाखवायचे. सूत्रनेती, जलनेती त्यावेळी जादूचे प्रयोगच वाटायचे.
इंग्लिश मिडिया रामदेवना spiritual leader का म्हणते? spiritual leader ची उपाधी मिळाल्यावर social and political leader व्हायची हुक्की रामदेवना आली. पण त्यासाठी लागणारी strength and purity of character त्यांच्याकडे नाही. (अन्य राजकीय नेत्यांकडेही यातले काही असतेच असे नाही, पण आपली नेतागिरी धकवून नेण्यासाठी लागणार्या अन्य हातोट्या तसेच सामर्थ्यस्थळे तर असतात).
आख्ख्या आयुष्यात माणूस "
आख्ख्या आयुष्यात माणूस " श्वासावर" लक्ष केंद्रित करुन त्याचे नियमन करीत नाही.
अगदी पूजेला बसल्यावर "प्राणायामे विनियोगः" असे म्हणून यजमानास प्राणायाम शिकवायला गेले तरी ते करण्याची इच्छाच नसल्याने व वेळही नसल्याने(?) केवळ "नाकाला हात लावण्यापुरता" हा प्रयोग होतो.
तेव्हा श्वासावर नियंत्रण/नियमन व त्याचे अवधान बाळगणे या कृति रामदेवबाबान्नीच लोकप्रिय केल्या त्याला तोड नाही.
बाकी चालुद्यात.....!
जेवढे चांगले आहेत तेवढे
जेवढे चांगले आहेत तेवढे घ्यायचे. त्यांची उत्पादने (वाणसामान) पर्याय म्हणून चांगले आहेत. बरीच स्वस्त आहेत, चवी वेगळ्या आहेत. त्यांनी जे फायदे होतात असं त्यांचे म्हणणे आहे, ते होतात की नाही ह्याचा मी काही अभ्यास केलेला नाही. जर ते बिस्किटांत खरच मैद्याऐवजी कणिक वापरत असतील तर काय वाईट आहे? त्यांची आरोग्य बिस्किट 'गुड डे' सारखी आहेत त्याच्या अर्ध्या किंमतीत.
छान लेख.
छान लेख.
योगक्रांतीची सुरुवात होण्याचा
योगक्रांतीची सुरुवात होण्याचा काळात रामदेवांनी आपला मार्ग बदलुन या क्रांतीचा मार्ग खच्ची केला ही अलिकडल्या काळातील अत्यंत दुर्दैवी घटना आहे असं मला वाटतं. सहमत !
चांगलं अॅनालिसिस. लेख आवडला.
चांगलं अॅनालिसिस. लेख आवडला.
सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक
सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार
लेख आवडला.नाशिकच्या
लेख आवडला.नाशिकच्या योगविद्याधामचेही कार्य मोठे आहे.
बर्याच दिवसांनी एक सुंदर लेख
बर्याच दिवसांनी एक सुंदर लेख वाचनात आला. लेखातील प्रतिपादन तर आवडलेच पण मांडणी त्याहूनही आवडली. विविध मुद्द्यांचा परामर्श वेगवेगळ्या परिच्छेदांत घेऊनही एकातून दुसरा मुद्दा आणि परिच्छेद आपोआप उलगडल्यासारखी सलगता आणि ओघ जाणवतो. विचारांचा नेमकेपणा आणि ते व्यक्त करण्यासाठी नेमकी शब्दयोजना आवडून गेली.
लेखातल्या मतांशी सहमतच.
लेख आवडला. हीरा यांना
लेख आवडला.
हीरा यांना अनुमोदन.
लेख आवडला! मला आठवतेय आस्था
लेख आवडला!
मला आठवतेय आस्था वगैरे चॅनल्सना , तिकडच्या बुवाबाजीला मी हसायचे. पण एकेदिवशी चॅनल सर्फ करताना एक भगव्या कपड्यातला माणूस हातावर चालताना, तर कधी तो पोट खपाटीला न्यायचा व्यायाम करताना दिसला व उत्सुकता ताणली गेली. मला अगदी लख्ख आठवतेय रामदेव बाबांना पहिले कधी पाहीले होते ते. त्यांनी त्यांच्या फिट राहण्यावरून , सर्व योगासनं लिलया करण्यावरून लक्ष वेधून घेतले. पुढे कधीतरी त्यांचे बोलणेही ऐकले. डोळा मारण्यावरून हसूनही झाले. पण बोलतात चांगले बरका असेही निरीक्षण होते. एकंदरीत मत चांगले होते...
पण ते राजकारणात आले अन मत बदलले. कशाला नस्त्या उठाठेवी यांना असं झाले. योग करत होते ते बरं होते. अजुनही त्यांनी फक्त योगासनांवर लक्ष केंद्रीत करावे असे आपले मला वाटते.
सचिन स्वतः उत्तम टेनिस खेळतो.
सचिन स्वतः उत्तम टेनिस खेळतो. बॅकहँड , फॉरहँड स्मॅश व्हॅली उत्तम प्रकारे मारु शकतो.. टेनिस चे सामने देखील बघायला जातो.. रॉजर फेडरर चांगला मित्र आहे त्याचा.. .. परंतु ....
.
...
...
.
.
.
.
मला नाही वाटत सचिन रॉजर फेडरर ला टेनिस बद्दल सल्ला देत असेल
बस्के, >> पण ते राजकारणात आले
बस्के,
>> पण ते राजकारणात आले अन मत बदलले. कशाला नस्त्या उठाठेवी यांना असं झाले.
राजकारणाचा जो उकीरडा झाला आहे तो कुणीतरी साफ करायला हवाच ना? रामदेवबाबांसाठी राजकारण ही नसती उठाठेव आहे हे मत टोकाचं वाटतं.
आ.न.,
-गा.पै.
लेख् आवडला.
लेख् आवडला.
छान लेख.
छान लेख.
फारच छान आढावा घेतला
फारच छान आढावा घेतला आहे.
गा.पै. - अनुमोदन +१०१
चाणक्यला आता आपण मानतो, पण त्या काळात लोक म्हणालेच असतील, की शिक्षकाला काय करायच्या आहेत राजकारणाच्या उठाठेवी ?
चांगल्या लोकांचे संघटन सहजा सहजी होऊच शकत नाही राजकारणासाठी, याचे हे उत्तम उदाहरण आहे.
कि रामदेवांचे यशस्वी होण्याचे
कि रामदेवांचे यशस्वी होण्याचे कारण ते नौली करतात ज्यामुळे लोक प्रभावित होतात. हे कारण मला पटले नाही. +१
इंदिरा गांधी यांचे मार्गदर्शक धिरेंद्र ब्रह्मचारी सुध्दा नौली करायचे.
लेख अतिशय सुंदर.
१९८५ पर्यंत २५ लोकांना एका वेळेला योग शिकवण्याचे तंत्र योग विद्या धाम ने विकसीत केले जे बाबांनी एक वेळी ५०० किंवा त्याही पेक्षा जास्त लोकांना शिकवण्याचे तंत्र आणले. हे आणखी एक महत्वाचे कारण असेल.
बाकीच्या योगवर्गात किमान महिनाभर आसने/प्राणायाम केल्याशिवाय फरक दिसत नाही जो बाबांनी केवळ ५-६ दिवसांच्या शिबीरात केवळ प्राणायामाने दाखवला. हा ही एक फरक आहेच.
रामदेवबाबांच्या प्राणायम मुळे
रामदेवबाबांच्या प्राणायम मुळे फायदा झालेल्यांनी आपले अनुभवपण शेअर करावेत.
Pages