सासामुमो - ३

Submitted by इंद्रधनुष्य on 27 January, 2014 - 01:02

सासामुमो - २

सटाणा तालुक्यातील मुल्हेरगड हा प्राचिनकाळी मयुरगड म्हणुन ओळखला जात असे. रत्नपूरचा राजा मयूरध्वज याच्या नावा वरुन गडाला मयूरगड हे नाव पडले. मुल्हेर गडाला महाभारत कालीन इतिहास आहे. तेराव्या शतकात बागलाणच्या बागुल राजाने बांधलेल्या या किल्ल्यावर अकबर, शाहजहान, औरंगजेब आदी मुघल राजांनी राज्य केले. १६७२ला मुल्हेरचा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला.

या ४,९२० फुट उंच किल्ल्याचे दोन भाग पडतात. पहिला टप्पा मुल्हेर माची म्हणून ओळखला जातो. जिथे गणेश मंदिर, सोमेश्वर आणि रामेश्वर मंदिर आहेत. तसेच राजवाड्याचे अवशेष आढळतात. सोमेश्वर मंदिरा पासून जवळच मोती टाके आहे. टाक्यातील पाणी पिण्यास उपयुक्त आहे.
(स्त्रोतः trekshitiz)

प्रचित्र १

सकाळचा चहा नाष्टा उरकला. बॅग पॅक करुन मंदिरात एका ठिकाणी सुरक्षीत ठेवुन आम्ही गडफेरीला निघालो. मोती टाक्या पासुन वर चढत गेलं की गडाच्या दुसरा टप्प्यात म्हणजेच बालेकिल्ल्यात प्रवेश मिळतो. बालेकिल्ल्यावर भडंगनाथांचे मंदिर आहे. आणि तेथुनच शेजारील मोरागडावर प्रवेश करणारी वाट आहे.

प्रचित्र २

आमचा मुक्काम माचीवरील सोमेश्वर मंदिरात होता. मंदिरा पासुन बालेकिल्ल्यावर जायला मोती टाक्याला वळसा घालून जाणारी लांबची वाट आहे. वेळ वाचावा म्हणून आम्ही ती वाट न घेता मंदिरा समोर दिसणार्‍या मोरागडाची वाट पकडली.

प्रचित्र ३

मोरागडवर हा मुल्हेरचा जोड किल्ला आहे. दोन गडांच्या खिंडला एका भिंतीने जोडण्यात आले आहे. या भिंती पर्यंत पोहचल्यावर दोन्ही गडावर प्रवेश करता येतो. या खिंडी कडे जाण्यासाठी मंदिरा समोरील घळीची वाट पकडावी लागते. या घळीच्या वाटेने अर्धा तासात आम्ही मोरागडच्या पहिल्या दरवाजा पाशी पोहचलो.

प्रचित्र ४

प्रचित्र ५

प्रचित्र ६

मोरागडाचा विस्तार फारसा नाही. कातळात कोरलेल्या पायर्‍या आणि मुख्य दरवाजा हे मोराचे प्रमुख आकर्षण आहे. दरवाजा शेजारी गुहा आहेत. वर पठारावर तुरळक अवशेष आढळतात. एक पाण्याच टाकं सोडलं तर दुसर विशेष अस काहीच नाही.

प्रचित्र ७

प्रचित्र ८

गडावरुन मांगी, तुंगीचा परिसर स्पष्ट दिसतो.

प्रचित्र ९

प्रचित्र १० मोरागड वरुन दिसणारा मुल्हेरचा बालेकिल्ला आणि मागे हरगड

प्रचित्र ११ मोरागडच्या पुर्वेकडे धुक्यात हरवलेला गुजराथ मधिल डांगचा परिसर..

तिथे जास्त वेळ न दवडता आम्ही मुल्हेरच्या दिशेने निघालो. परत खिंडीत उतरुन मुल्हेर मोराला जोडणार्‍या भिंतीवरुन मुल्हेरच्या गुप्त दरवाज्या खाली आलो.

प्रचित्र १२

कातळ फोडून बनवलेला या दरवाज्यात मोठ्या शिळा कोसळुन पडल्यामुळे अर्धबंद अवस्थेत आहे. दरवाजातून कसरत करत वर मुल्हेरगडा वर आलो. दरवाज्याच्या डाव्या बाजुची वाट पकडून भडंगनाथाच्या उजाड मंदिरा समोर पोहचलो.

प्रचित्र १३

मंदिरा शेजारील वाटेवरुन खाली उतरत दरीच्या दिशेने गेल्यावर वाटेत ठिकठिकाणी तटबंदी दिसत होती. तिथून साल्हेरच्या परिसराचे विहंगम दृष्य दिसते.

प्रचित्र १४

तटबंदीच्या वाटेवर बरच गवत वाढल्याने पुढची वाट सापडणे कठिण जात होते. पाया खालील गवत तुडवत मंदिरा पासून दहा मिनीटांच्या चालीवर डावीकडच्या कड्यात पाण्याच्या टाक्यांची साखळी दिसली. यातील बहुतेक टाक्यांतील पाणी शेवाळ साचल्याने खराब झाले होते. मात्र पहिल्या टाक्यातील पाणी फक्त पिण्यास उपयुक्त आहे.

प्रचित्र १५

रिकाम्या बाटल्या भरुन घेतल्या आणि टाक्यांपासून पुढे गडाच्या पश्चिमेला निघालो. भडंगनाथाच्या मंदिरा कडून निघाल्यावर वरच्या पठारावर एक कमान दिसत होती. दरवाजातून खाली उतरण्या आधी आम्ही तिकडे मोर्चा वळवला.

प्रचित्र १६

Heavn's Gate चे प्रचि काढण्यात बराच वेळ वाया घालवला. एव्हाना उन्हाचे चटके जाणवू लागले होते आणि समोरचा हरगड आमची प्रतिक्षा करत होता. पण आज हरगड करण्या एव्हढा वेळ आणि ताकद आमच्यात शिल्लक नव्हती. कारण दुपार पर्यंत मुल्हेर उतरुन परतीच्या प्रवासाला निघायचे होते.

प्रचित्र १७

प्रचित्र १८

पश्चिमेकडील दरवाजाच्या सावलीत घटकाभर विश्रांती घेऊन आम्ही मुल्हेरच्या बालेकिल्ल्याचा निरोप घेतला. बालेकिल्ल्याच्या कड्या खालुन जाणार्‍या वाटेवर पुर्ण सावली होती. हीच वाट पुढे हरगडच्या खिंडीला जाऊन मिळते.

प्रचित्र १९

प्रचित्र २० बालेकिल्ल्याच्या कड्या मधे बजरंगबलीची मुर्ती कोरलेली दिसते.

आम्हाला मुल्हेर माची वरिल मोती तलाव, रामेश्वर आणि राजवाड्याचे अवशेष पहायचे होते म्हणुन आम्ही सरळ न जाता उजविकडची वाट पकडली. पण पुढे गेल्यावर कातळात ही पाऊलवाट गडप झाली. वाट चुकलो होतो पण परत मागे फिरुन वळसा घालुन खाली उतरण्या पेक्षा ढोरवाटां वरुन कसरत करत मोती टाक्या पाशी पोहचलो.

प्रचित्र २१

माची वरिल जंगलामुळे वाटांचा अंदाज येत नव्हता. मोती टाक्यातून सोमेश्वर मंदिराला पाणी पुरवणारी पाईप लाईन टाकण्यात आली आहे. त्या वाटेने मंदिर कडे निघालो खरं पण वाटेतील काटेरी झाडांनी आमच्याशी जरा जास्तच लगट केली. दोन्ही गडांचा फेरफटका करुन परत येई पर्यंत ११ वाजून गेले होते. मंदिरात परतल्यावर पोटोबाची आराधना सुरु केली.

तीन दिवस निसर्गाच्या सान्निध्यात घालवलेल्या त्या अमुल्य क्षणांनी मनावर एक आगळीच मोहनी घातली होती. त्या निवांत वातावरणातून परतायला मन तयारच होत नव्हते.

प्रचित्र २२

सोमेश्वराचा आणि त्याची देखभाल करणार्‍या बाबाचा निरोप घेउन परतीचा प्रवास सुरु केला. वाटेत रामेश्वर मंदिर बघण्याचा बेत होता. परंतु पाठीवरिल ओझ्यामुळे आणि त्या जंगलतील वाटांमुळे रामेश्वरचा बेत रद्द करावा लागला. वाटेतील गणेश मंदिराचे दर्शन घेउन पायथ्याकडे निघालो.

प्रचित्र २३

प्रचित्र २४

आदल्या दिवशीच्या रिक्षा वाल्याचा नंबर घेऊन ठेवला होता. त्याला फोन करुन पायथ्याला येण्यास सांगितले. गावात पोहचताच ताहराबाद साठी लगेच दुसरा रिक्षावाला तयारच बसला होता. मुल्हेर ते ताहराबाद हा अकरा कि.मी. चा प्रवास विस एक मिनिटात पार पडला. ताहराबादच्या एस्टी स्थानकात नाशिकला निघालेली एस्टी पकडली. नाशिक ते साल्हेर या मार्गावर गाड्यांची अजिबात कमी नाही... हे योरॉक्सचे विधान तंतोतंत खरे ठरत होते. पहिल्या दिवशीची ताहराबादची सकाळची दोन तास प्रतिक्षा सोडली तर पुर्ण ट्रेक मधे गाडी साठी कुठेच विलंब झाला नव्हता.

प्रचित्र २५

या अनोळखी प्रांतात ट्रेक करताना बरेच काही नव्याने अनुभवास मिळाले. बागलाण प्रांतातील गुजराथी मिश्रीत मराठी, त्यांच्या खाण्यातील रुची बदल, साधेसुधे रहाणिमान, उसाच्या मळ्यात कष्ट उपसणारे शेतकरी, एस्टी स्थानकावर वाघिणीची भिती घालणारे गावकरी, मुल्हेरमाची वरिल बाबा... या सगळ्यांच्या साथीने आमचा बागलाणचा सर्वांग सुंदर ट्रेक अगदी उत्तम रित्या पार पाडला. हरगड जरी राहिला असला तरी त्याची रुखरुख अजिबात वाटली नाही. खर तर ही एक संधीच आहे आमच्या साठी.. पुन्हा एकदा बागलाणच्या लोकांना भेटायची.

धन्यवाद Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

म्या पैला..:P

मुल्हेरच्या सोमेश्वरमंदिरातला मुक्काम ही must to do अशी गोष्ट आहे... जबरी शांतता.... आणि फक्त शांतता... समोर मोरागड, बाजूला मुल्हेरची भिंत, आत प्रशांत गाभारा... खल्लास!

२५ वा फोटॉ झक्कास आलाय...

मस्त वर्णन आणि फोटोज Happy

हरगड जरी राहिला असला तरी त्याची रुखरुख अजिबात वाटली नाही. खर तर ही एक संधीच आहे आमच्या साठी.. पुन्हा एकदा बागलाणच्या लोकांना भेटायची.>>>>> Happy Happy

मस्तच इंद्रा जबरी फोटु अन झकास वर्णन..
परत तेथे गेल्यासारखे वाटले..
रामेश्वरच मंदिर खरच बघण्यासारख आहे.. पण त्याची काळजी न घेतल्यामुळे बरीच पडचढ झाल आहे.

देवा छान जमले आहे -- फोटो आणि वर्णन , अहं वॄत्तांत

एकंदरीत दोन दिवसांची "सॅन्क्शनड लिव" जबरद्स्त वापरली म्हणायची Wink