डाळ तांदूळाची खिचडी - कमलाबाई ओगले पद्धत (फोटोसहीत)

Submitted by दक्षिणा on 23 January, 2014 - 13:17

लागणारा वेळ - एकूण खिचडीसाठी तसा वेळ कमी लागतो अगदी. १५ मिनिटं.

लागणारे जिन्नस - तांदूळ, डाळ (कोणतीही मूग किंवा तूर) मी तूरीची घेतली आहे. (दोन्ही मिळून अर्धी वाटी, धणे, सुकं खोबरं, जिरे, मीठ, गुळ, कोथिंबिर, ओलं खोबरं. बाकी नेहमीचं फोडणीचं साहित्य. (तेल, मोहरी, हिंग आणि हळद. आणि कढिलिंबाची पानं.

पुर्वतयारी - डाळ आणि तांदूळ खिचडी करण्या अगोदर जितके जास्त वेळ भिजवू तितकं चांगलं. (मी डाळ तांदूळ धुवून त्यात अर्धा तास पाणी तसंच ठेवून दिलं होतं आणि ते काढून टाकल्यावर अजून अर्धा तास ठेवले होते.) या व्यतिरिक्त तव्यावर धणे, जिरे आणि सुकं खोबरं छान भाजून त्याची मिक्सरवर पूड करून घ्यावी. ती अशी दिसते.

20140119_111731.jpgक्रमवार पाककृती - कढईत तेल तापवायला ठेवून चांगलं तापलं की त्यात मोहरी तडतडवून घ्यावी. मग हिंग आणि हळद घालून त्यात कढिलिंबाची पाने घालावीत वर सांगितल्याप्रमाणे भिजवलेले तांदूळ आणि डाळ घालून छान परतावं. एकिकडे पाणि गरम करायला ठेवावं. तांदूळ आणि डाळ जितके छान परतू तितकी खिचडी पटकन शिजते, हलकी व मऊ होते.

20140119_111738.jpg

मग त्यात एकिकडे गरम केलेलं पाणी घालून झाकण ठेवून शिजवावी.

20140119_111901.jpg

खिचडी शिजत आली की त्यात धणे जिरे खोबर्‍याची केलेली मसाला वजा पूड, मीठ आणि गुळ घालावा.

20140119_112440.jpg

एकसारखी करून घेऊन पुन्हा झाकण ठेवून खिचडी पूर्ण शिजवून घ्यावी.
नंतर वरून ओलं खोबरं कोथिंबीर घालून गरम गरम खावी. खाताना वरती तुपाचा गोळा घालायला विसरू नये.

20140119_114230.jpgवाढणी प्रमाण - एक माणसासाठी दोन वेळेला किंवा दोन माणसांसाठी एकावेळेला. आवडली तर एकाच माणसाला एकाच वेळेला Proud

माहितीचा स्रोत - कमलाबाई ओगले यांचं पुस्तक

तळटिप - खिचडीबाबत - यात मिरची किंव तिखट नसल्याने आजारी लोक, म्हातारे किंवा लहान मुलं आरामात खाऊ शकतात. नको असल्यास गुळ वगळू शकतो. Sad
आवांतर - मी अजून बेसिकच पदार्थ करायची प्रॅक्टीस करत असल्याने या भाज्या आणि खिचड्या पाहून कृपया मला हसू नये. Proud

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे सुकं खोबरं प्रकर्ण खास वाटतय. तिखट घालायचं नसल्यास मी फोडणीत लवंगा, दालचिनी ह्यांचे काही(च) तुकडे टाकते... त्यामुळे खिचडीला एक प्रकारचा सात्विक फणकारा येतो.

वावा..
मस्त फोटो.
मुगाच्या खिचडीत फक्त भरपूर ओलं खोबरं आणि दालचिनीचा तुकडा घालून मस्त चव येते.

वॉव दक्षु खूप्पच टेंप्टिंग फोटो आलेत...

दक्षिणा बाय सुग्रण बाय झालीये..

मै भी ट्राय करीनच.. ऑफकोर्स मायनस गूळ Wink

बेसिक काय दक्षिणा? मस्त जमलीय की खिचडी. कोथिन्बीर जास्त दिसतीय फोटोत तेवढे पुढच्या वेळी लक्षात ठेवशीलच. पण मलाही कोथिन्बीर सढळ हाताने घालायची सवय आहे.:फिदी: काही वेळेस कच्चा कान्दा पण घेते त्या बरोबर. काही जण यावर लसणाच्री चरचरीत फोडणी पण घालतात.

फोटो छान आलेत.

छान आहे हि पद्धतपण. करुन बघेण नक्कीच.

माझी आज्जी खिचडी करताना सुके खोबरे (न भाजता), जिरे, धणे, लसुण, तिखट आणि अजुन कायकाय खलबत्त्यात कुटायची मग ते खिचडीत टाकायची. मस्त वास सुटायचा. नाशिक भागात व त्या पुढे सगळीकडे तूरडाळच वापरतात खिचडीसाठी.
मूगडाळीची खिचडी म्हणजे फक्त मुगडाळ, तांदुळ आणि हळद घालुन करतात आमच्याकडे.

अहाहा... ऐकत नाहीस हं! Happy पाककृती आणि वर्णन दोन्ही पण मस्त Happy
दरवळणारा सुगंध इथपर्यंत आला. ते कोथिंबीर खोबरं हातानी बाजूला करून भांड्यात डोकवावंसं वाटतंय...
खायला घेताना इतरांनी लिहिलेल्या जिनसांसोबत लिंबाची फोडही चालेल.

पुढच्या वेळी करशील तेव्हा या सगळ्यासकट खिचडीचा फोटो काढून इथे डकव.

वा छान क्रमवार लिहीलीस. Happy अशी मी (वजा सुक खोबरे अन गूळ) सालीमुगडाळीची करते, तुरीच्या डाळीची नुसती हळद मीठ घालून शिजवून वरून फोडणी घेतो. वारंग्याच्या खिचडीची कृती देऊ का तुला? (वारंगा नावाचे नांदेडजवळ एक गाव आहे तिथे बसेस थांबतात खिचडीच्या हॉटेल समोर. अप्रतिम पण झणझणीत खि. मिळते तिथे)

खिचडीला एक प्रकारचा सात्विक फणकारा येतो.>>>> मला कसलीतरी याद यून र्‍हायली. सिंडीबायला पण यील. Proud

दक्षिणा, छान आहे फोटो.
धणे, जीरं, सुक्या खोबर्‍याबरोबर जरा लवंग दालचिनी मिरी भाजून सगळं वाटून घेतलं की झालाच मसालेभाताचा मसाला.

मी मूगडाळ आणि उडीदडाळ वापरतो. उडदामुळे खिचडी थोडी चिकट आणि मऊ होते. कधी कधी नुस्तीच उडीद वापरुनही करतो. त्यानेही छान होते.

सुक्या खोबर्‍याचा तुकडा गॅसवर थेट भाजून मग वाटायचा आणि घालायचा. एक 'जळकी' चव येते मग मुडाखिला Happy आमच्याकडे नेहेमी दक्षिणाने दिलेल्या पद्धतीनेच खिचडी करतात; पण डाळ नेहेमीच मुगाची. म्हणून मुडाखि.

तूर डाळीची खिचडी- मागच्या पानावर बिल्वाने लिहिलेय अगदी तीच पद्धत.

आणि सालीच्या मूगडाळीची- सिंडीने लिहिली आहे तशी.

सर्वच खिचड्या एक नंबर होतात Happy वर तूप, शेजारी पापड आणि वाटीत कढी. यम्मी.

लक्ष्मी गोडबोले, तुमच्या आयडीला वापरते, करते बरं दिसतं हो वाचायला Lol

दक्षे, मस्त! Happy फक्त मुगाच्या डाळीची खिचडी केली/खाल्ली आहे. सुकं वाटण आयत्यावेळी करुन घालण्याऐवजी मी रोजचा गोडा मसाला घालते. गूळ अज्जिबात घालत नाही.

ह्या खिचडीला अजून चार चाँद लागण्यासाठी फोडणीसाठी कढई/पातेल्यात तेल घालू तेव्हा आधी त्यात एखादी सांडगे मिरची तळून घ्यावी आणि नंतर ती बाजूला काढून त्यातच फोडणी करावी. नंतर परतलेल्या डाळ तांदुळावर आधण घातल्यावर हीच मिरची चुरुन घालावी किंवा नंतर खिचडी खाताना डावीकडे म्हणून घ्यावी.

सगळ्यांचे आभार. अनेकांचे मोलाचे सल्ले टिपून पुढच्या वेळी वापरीन नक्की.
फक्त फायनल फोटोत जरा घोळ झालाय ते नक्कीच Sad नेक्स्ट टाईम लक्शात ठेविन.

दक्षिणा, छान आहे फोटो.>>+

वर्षे अगं तुप, लिंबू, पापड, लोणचं झालच तर सांडगी मिरची घेऊन जा सोबत तिच्याकडे Proud

दक्षिणा, मस्त रेसिपी आणि फोटो एकदम छान आले आहेत. मी मु.खि. ची रेडी टू कूक वापरुनच केली आहेत अशी केली की टेस्टी नाही होत. Sad एकदा, तुमच्या रेसिपीने करुन बघते.
कविन Proud पण खिचडीच्या साईड डीशने तों.पा.सु. Uhoh
नुसत लिंबू नको त्यापेक्षा लिंबाच गोड लोणच एकदम टेस्टी लागत.

लक्ष्मी गोडबोले, तुमच्या आयडीला वापरते, करते बरं दिसतं हो वाचायला हाहा

छे हो... लक्ष्मी हे लक्ष्मीप्रसादचे शॉर्ट फॉर्म आहे. लक्ष्मी मित्तलदेखील पुरुषच आहेत

आमच्या इथे 'पंकज'मध्ये हा प्रकार गुजराती थाळी बरोबर फार मस्त मिळतो. त्यामूळे आवडीचा झाला आहे..घरी किंचित वेगळ्या प्रकारे केला जातो. आता ह्या प्रकारे पण ट्राय करायला हरकत नाही.. Happy

वाह! फोटो आणि कृती तोंपासु. कृतीबद्दल थँक्स गं. खिचडी अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. ह्या पद्धतीने करून पाहीन. जुन्या मायबोलीतील श्यामली की सीमाने दिलेल्या कृतीनुसारही मस्त होते खिचडी.
अजून पाकृ येऊ देत.

दक्षे मस्त आहे ग रेसिपी. छान दिसतेय.

मी दर शनिवारी खिचडीच करते. आलटून पालटून एकदा बिना फोडणीची एकदा फोडणीची. दोन्ही मध्ये मटार, गाजर, बटाटा ठरलेले असतात. कधी तरी वालाचे बिरडेही घालते.

मुडाखि... वा वा! लैच आवडते. होस्टेलातलं माझं कम्फर्ट फूड होतं ते.

पुण्यातून घरातून (हळूच लपवून) नेलेल्या पितळी रोळीत मुगाची साधी किंवा छिलका डाळ + तांदूळ अर्धा पाऊण तास भिजवून निथळायचे. त्यातच (शॉर्ट कट) तिखट, गरम/गोडा/ क्वचित मॅगी मसाला, मिरीदाणे, लवंग, तमालपत्र, वेलदोडा घालून ठेवायचे. अंदाजाने मीठही घालायचे. मग हॉट प्लेटवर माझ्याकडील एकुलते एक असे हँडलयुक्त पॅन ठेवून त्यात तेल, मोहरी, जिरे, हळदीची फोडणी करायची व सर्व घटक पदार्थ पॅनमध्ये स्वाहा करायचे. जमेल तितका वेळ परतायचे. पेशन्स संपला की पॅनच्या काठापासून एक-दीड इंच जागा उरेल इतपत पाणी घालायचे, चमच्याने खिचडी ढवळून सारखी करायची आणि मग पॅनवर झाकण ठेवून शब्दकोडे सोडविणे किंवा शेजारणीशी गप्पा मारायला जाणे असे उद्योग करायचे.
अधून मधून खिचडीवरचे झाकण काढून तिला ढवळायचे. हॉटप्लेटच्या मंदगतीने ती खिचडी अर्ध्या तासात तयार व्हायची. सोबत रूमवर असेल ते लोणचे / चटणी, काकडी-टोमॅटोचे काप आणि वाफाळत्या खिचडीवर (विकतचे) साजूक तूप!

त्यानंतर घरी कितीतरी वेळा खिचडी केली पण तशी चव पुन्हा नंतर कधी जमलीच नाही!

Pages