कॅलिफोर्नियास्थित माझ्या मुलीच्या घरासमोरच सायप्रसचे एक उंचच उंच झाड आहे ज्याचे मी गमतीने नाव ठेवले आहे,- 'अमिताभ' ! तसा संपूर्ण कॅलिफोर्निया घनदाट वृक्षराजीने बहरलेला आहे, अगदी मेपलच्या सडसडीत खोडापासून ते रेडवूडच्या भारदस्त बुन्ध्यांपर्यंत! या झाडांकडे केंव्हाही नजर टाकली तर हमखास दिसतात इकडून तिकडे पळणाऱ्या अनेकविध रंगांच्या चिमुकल्या खारोट्या ! या बुद्धिमान, शिस्तबद्ध आणि कामसू खारींच्या देशातील तशाच कर्मयोगी माणसांच्या अथक प्रयत्नांची हि एक कथा नव्हे तर गाथा !
___________
खारोट्यांनी बांधला पूल !
"हॅलो डॉक्टर, मै आप से चेकअप करवाना चाहता हूँ !''
दुपारी क्लिनिकच्या पायऱ्या चढतानाच 'अण्णा बॅटरीवाले' माझी वाट अडवून उभे होते. क्लिनिकच्या शेजारील इमारतीमध्ये अण्णांचे ट्रकसाठी लागणाऱ्या बॅटऱ्यांचे दुकान होते. पुण्यातील उत्तरभारतीयांच्या संघटनेचे अध्यक्ष असलेले अण्णा त्या भागातील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व होते.
"आजकल तबियत जरा नरम रहता है। आप कि भाभी ने कहा कि आप से चेकअप करवा लू, तो इसिलये आप के पास चला आया !''
त्याच दिवशी संध्याकाळी अण्णा माझ्यासमोर बसून सांगत होते, ""आजकल हर शाम को मुझे हलकासा बुख़ार होता है। भूक नही लगती और वजन भी थोडासा उतर गया है।''
अण्णांची तपासणी करताना त्यांना थोडासा ताप असल्याचे जाणवले. त्यांच्या पोटाची तपासणी करताना मात्र मला धक्काच बसला. अण्णांची 'पाणथरी' म्हणजे 'स्प्लीन', जी नेहमी आपल्या छातीच्या पिंजऱ्याखाली दडलेली असते, ती त्यांच्या बेंबीपर्यंत वाढलेली माझ्या बोटांना जाणवत होती. आपल्या देशात अशा प्रमाणामध्ये पाणथरी होण्याचे मुख्य कारण असते, वारंवार होणारा हिवताप म्हणजे मलेरिया. दुसरे कारण म्हणजे आण्णांचे कुटुंब उत्तर प्रदेशातून व्यवसायासाठी इकडे आल्यामुळे तिकडे पसरलेला एक साथीचा आजार 'काला आझार'! हे दोन्ही आजार डास चावल्यामुळे होतात. पण आण्णांना डास चावल्याचे आठवत नव्हते व गेली अनेक वर्षे ते उत्तर प्रदेशातील त्यांच्या गावीदेखील गेलेले नव्हते. त्यामुळे आता तिसऱ्या निदानाची शक्यता होती आणि ती म्हणजे 'ल्युकेमिया' अर्थात 'रक्ताचा कर्करोग'! शत्रूलाही होऊ नये असा हा आजार. हे गांर्भीय माझ्या चेहऱ्यावर दिसू नये याची काळजी घेत मी त्यांना म्हणालो, "अण्णासाहेब, पोटामध्ये थोडी सूज दिसतेय. उद्या सकाळी काही न खाता या म्हणजे रक्त तपासून पाहू !''
"आप सही कह रहे हो । आपकी भाभीभी ही कह रही थी कि आजकल मेरे पेटका साईझ काफी बढ़ गया सा लगता है। चलो, कल देखते है।''
अण्णांना प्रत्येक गोष्ट हसतहसत स्वीकारण्याची सवय होती. त्यांच्या लेखी माझा वैद्यकीय व्यवसाय आणि मेलेली बॅटरी पाणी घालून पुनर्जीवीत करण्याचा त्यांचा व्यवसाय यात काही फारसा फरक नव्हता.
दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता माझी हॉस्पिटलची सकाळची फेरी आटोपून मी क्लिनिकमध्ये पोहोचलो. त्यावेळी म्हणजे सुमारे 2001 साली माझ्या क्लिनिकमध्येच माझी छोटी लॅबोरेटरी माझ्या सौ. चालवीत असत. मी पोहोचताच उत्तेजित आवाजात तिने माझे स्वागत केले.
"अहो, ही ट्यूब पहा ना. यातील बफ्फी लेयर खूपच वाढलेला दिसतोय! डब्ल्यु.बी.सी. काऊंट देखील खूपच वाढला आहे. त्यांची स्लाईड मी तुम्हाला पाहण्यासाठी मायक्रोस्कोपवर लावून ठवली आहे. यांना ल्युकेमिया दसतो आहे.''
सौ. माधुरीने दाखविलेल्या ट्यूबमध्ये अण्णांच्या रक्ताचा नमुना होता. एरवी अशा ट्यूबमधे दोन थर असतात, तळाशी असलेला लाल थर जो रक्तातील लाल पेशींमुळे असतो तर वरील थर पाण्यासारखा असतो ज्याला प्लाझ्मा असेही हणतात. अण्णांच्या रक्ताच्या ट्यूबमध्ये एकसारख्या रुंदीचे तीन थर दिसत होते. पारदर्शक आणि लाल थरांच्यामध्ये एक पांढरा शुभ्र थर दिसत होता. हा थर रक्तामधील पांढऱ्या पेशींमुळे होता.ज्या खूपच वाढल्या होत्या. नॉर्मल व्यक्तींमध्ये तांबड्या पेशींच्या तुलनेमध्ये पांढऱ्या पेशी अत्यल्प म्हणजे प्रत्येक मायक्रोलीटरमध्ये फक्त पाच ते दहा हजार असतात व त्यामुळे त्या ट्यूबमध्ये दिसत नाहीत. अण्णांच्या पांढऱ्या पेशी पाच लाखांपर्यंत वाढल्या होत्या. अखेर मला आलेला संशयच खरा ठरला होता. अण्णांना ल्युकेमिया झाला होता.
पांढऱ्या पेशी म्हणजे आपल्या शरीरातील सैनिक पेशी! शरीरामध्ये प्रवेश करुन आजार निर्माण करणाऱ्या जंतूंपासून त्या आपले संरक्षण करतात. शरीरातील हाडांमधील पोकळ भागांमध्ये असलेल्या अस्थिमज्जेमध्ये असलेल्या मूलपेशींपासून (स्टेमसेल्सपासून) पांढऱ्या पेशी तयार होतात व त्यांचे आयुर्मान साधरणतः तीन ते चार दिवसांपर्यंत असते. या पेशींची अमर्याद वाढ होण्यालाच 'ल्युकेमिया' अथवा 'रक्ताचा कर्करोग' म्हणतात. हा ल्युकेमिया आजार दोन प्रकारचा असतो. एक 'ऍक्युट' म्हणजे भरभर वाढणारा ज्यात सुमारे वर्षभरात मृत्यु ओढवतो असा असतो. तर दुसरा, 'क्रॉनिक' म्हणजे हळूहळू वाढणारा असतो त्यामध्ये रुग्ण दहाबारा वर्षे जगतो. अण्णांना हाच म्हणजे "क्रानिक मायलॉईड ल्युकेमिया-सीएमएल' हा आजार होता.
अमेरिकेमधील ओरेगॉन युनिव्हर्सिटीमध्ये संशोधनाचे काम करणारे एक अतिशय बुद्धिमान रक्तविकृतीतज्ज्ञ डॉक्टर आहेत, डॉ.ब्रायन ड्रुकर! आपल्या आयुष्यातील तीस वर्षे त्यांना रात्रंदिवस एकच ध्यास होता, तो म्हणजे रक्ताच्या कर्करोगावर उपाय शोधण्याचा ! जगामध्ये अनेक शास्त्रज्ञ हेच शोधण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत होते. पण त्यांना अजून यश येत नव्हते. प्रत्येक आजार हे जणू एखादे कोडेच असते. आपल्या लहान मुलांसाठी आपण एक चित्रकोडे नक्कीच वापरले असेल. एका चित्राचे अनेक तुकडे पुन्हा एकत्र जुळवून पुन्हा सपूर्ण चित्र तयार करताना माझ्या मुलांना मीही मदत केल्याचे मला आठवते. डॉ.ब्रायन यांनी नेमके तेच केले.
सन 1911 :
डॉ.पिटान रुस यांनी रॉकफेलर युनिव्हर्सिटीमध्ये एक अभूतपूर्व शोधनिबंध प्रसिद्ध केला. कोंबड्यांना 'सारकोमा' नावाचा एक प्रकारचा कॅन्सर म्हणजे मांसाचा कर्करोग होत असतो. काही परिस्थितीजन्य गोष्टींमुळे हा कॅन्सर एका कोंबडीपासून दुयऱ्या कोंबड्यांपर्यंत पसरतो असे डॉ.रुस यांच्या लक्षात आले. हे सिद्ध करण्यासाठी डॉ.रुस यांनी या मांसकॅन्सरच्या गोळ्याचा द्रवरुप रस काढून तो निरोगा कोंबड्यांना इंजेक्शद्वारे दिला आणि काय आश्चर्य! त्या कोंबड्यांनाही सारकोमा हा कॅन्सर झाला. म्हणजेच कॅन्सर हा आजार संसर्गजन्य आहे आणि तो काही रासायनिक संयुगांमुळे होतो हे रुस यांनी प्रथमच सिद्ध केले होते. या संसर्गाचे मूळ कारण हे विषाणू म्हणजे व्हायरस असावे हा तर्कही त्यांनी बांधला होता. पण त्यांच्या या शोधाचे महत्त्व जगाला समजण्यासाठी व त्या शोधासाठी डॉ.रुस यांना नोबेल पुरस्कार मिळण्यासाठी तब्बल 1960 सालाची व स्वतःच्या सत्याऐंशीव्या वाढदिवसाची वाट पाहावी लागली. व्हायरस म्हणजेच विषाणूंमुळे कॅन्सर होतो हे समजण्यापर्यंत शास्त्राची प्रगती झाली होती पण अजून खूप पुढचा पल्ला गाठणे बाकी होते.
सन 1960 :
पेनसिल्व्हेनिया युनिव्हर्सिटीमधील शास्त्रज्ञ डॉ.नोबेल यांनी रक्ताचा कर्करोग अर्थात ल्युकेमिया विषयी आणखी एक अपूर्व शोध प्रसिद्ध केला. मानवी शरीरातील तांबड्या पेशींव्यतिरिक्त प्रत्येक पेशीमध्ये एक न्युक्लिअस म्हणजे केंद्रक असतो. या प्रत्येक केंद्रकामध्ये तेवीस गुणसूत्रांच्या (क्रोमोझोमच्या) जोड्या असतात. ही गुणसूत्रे डीएनए या संयुगाची बनलेली असतात. या डीएनएच्या विशिष्ठ गटांना 'जीन' असे म्हणतात. प्रत्येक गुणसूत्रावर अशा हजारो जीन्स असतात. आपल्या शरीरातील प्रत्येक कामासाठी एक 'जीन' ठरलेली असते. आपली उंची, त्वचेचा रंग, आपल्या चेहऱ्याची ठेवण इत्यादी प्रत्येक गोष्ट ही जीन्सवर अवलंबून असते. आपण आपल्या आई अथवा वडीलांसारखे का दिसतो याचे कारणही आपल्या जीन्सच! डॉ.रुसने शोधलेल्या व कर्करोग तयार करु शकणाऱ्या द्रवामध्ये 'व्ही-सर्क' नावाची 'कर्करोग' तयार करु शकणारी 'जीन' अथवा 'ओंकोजीन' असल्याचा शोध पुढे इतर संशोधकांना लागला होता. डॉ.नोवेल यांना सीएमएल या ल्युकेमियाच्या रुग्णांच्या रक्ताचे पृथक्करण करताना एक नवीन गोष्ट दिसली. या रक्तामध्ये एक नवीन व नेहमीपेक्षा खूप लहान असे एक नवीन गुणसूत्र दिसत होते. त्यांनी त्याचे नाव ठेवले 'फिलाडेल्फिया' गुणसूत्र! त्यांनी या नवीन 'फिलाडेल्फिया' गुणसूत्रामुळे ल्युकेमिया होतो असे प्रतिपादन केले अर्थातच त्यांच्यावर इतर शास्त्रज्ञांनी विश्वास ठेवला नाही.
सन 1973 :
शिकागो युनिव्हर्सिटीमधील शास्त्रज्ञ डॉ. रोली यांनी "फिलाडेल्फिया' गणसूत्र कसे तयार होते याचा शोध लावला. त्यांनी शोधले की काही विषाणू पेशींमधील केंद्रकामध्ये प्रवेश करुन गुणसूत्रांमध्ये बदल घडवू शकतात. आपल्या शरीरामध्ये काही मूळ-पेशी म्हणजे स्टेमसेल्स असतात की ज्यांच्यापासून नवीन व विविध प्रकारच्या पेशी तयार होवू शकतात, नवे रक्त तयार होवू शकते, एवढेच नव्हे तर प्रजननदेखील होवू शकते. मूळ-पेशी म्हणजे जणू आपल्या प्राणपेशीच! काही विषाणू या मूळपेशींच्या केंद्रकावरच घाला घालतात. उदाहरणार्थ एडस्चे विषाणूदेखील याच जातीचे असतात व ते आपल्या शरीरातील सीडी-4 या सैनिक पेशींच्या केंद्राकाचा ताबा घेतात आणि रुग्णांच्या शरीराची संरक्षक व्यवस्थाच संपूर्ण कोलमडते आणि व्याधीजर्जर होवून तो दगावतो. असो! डॉ.रोली यांनी शोधले की काही विशिष्ट विषाणूंच्या हल्ल्यामुळे गुणसूत्र क्रमांक नऊ व बावीस यांचे प्रत्येक दोन तुकडे होतात व या तुकड्यांची अदलाबदल होवून दाने नवीनच गुणसूत्रे तयार होतात. पैकी बावीस क्रमांकाचे गुणसूत्र जे आधीच लहान असते ते आता अधिकच लहान होते व तेच हे 'फिलाडेल्फिया' गुणसूत्र! पण हे नवीन तयार झालेल्या गुणसूत्रामध्ये एक नवीन ओंकोजीन तयार होते जी एक नवीन प्रथीन संयुग तयार करते आणि त्यामुळे निर्माण होतो सीएमएलचा भस्मासूर! या नवीन संयुगामुळे पांढऱ्या पेशींची अनैसर्गिक व अनियंत्रित अशी वाढ होवू लागते व ल्युकेमिया होतो!
पण अजूनही हा बदल नेमका कसा झाला हे शास्त्रज्ञांना कळत नव्हते.
सन 1976 ः
शास्त्रज्ञांना एका नवीन संयुगाचा शोध लागला, टायरोसीन कायनेज ! शरीरामध्ये अनेक प्रक्रिया संयुगाद्वारे घडविल्या जातात, त्यांना संप्रेरक म्हणतात. ही संयुगे पेशींना संदेश देवून काही क्रिया सुरु अथवा बंद करतात. अशा प्रकारचा महत्त्वाचा म्हणजे पेशी विभाजनाचा संदेश देणारे व काही 'चालू' करणारे संयुग होते टायरोसीन कायनेज! सीएमएल मधील रुग्णांमध्ये हेच संयुग अपरिमित प्रमाणात तयार होते आणि सतत मूळ-पेशींना विभाजनाचा चुकीचा संदेश देते. परिणामी पांढऱ्या पेशींची अमर्याद वाढ होवून सीएमएल ल्युकेमिया होतो.
सीएमएलचे कारण आणि त्यामागील शास्त्रीय कारण समजले होते. आता या आजारावरील उपाय दूर नव्हता!
आपले कथानायक डॉ.ब्रायन ड्रुकर यांनी हे चित्र एकत्र जुळवले आणि सीएमएलवर मात करण्याचा चंग बांधला. त्यांनी जगप्रसिद्ध 'नोव्हार्टीस' या औषधे तयार करणाया संशोधक कंपनीशी संपर्क साधला.
डॉ.ब्रायन म्हणतात, "सीएमएल हा आजार एखाद्या मोटारगाडीसारखा आहे, जिचा वेग वाढविण्याचे एक्सिलेटर पेडल अडकून बसल्यामुळे इंजिन जोरात फिरते आहे, रेस होत आहे. काही तरी करुन ते पेडल सोडवले पाहिजे. असे समजू या की मूळ-पेशी हे एक कुलूप असून टायरोसीन कायनेज ही त्याची किल्ली आहे. अशी किल्ली तयार केली पाहिजे की जी टायरोसीन कायनेजचे काम होवू देणार नाही. तरच आपण ल्युकेमिया बरा करु शकू!''
नोव्हार्टीस कंपनीने त्यांचे शेकडो शास्त्रज्ञ या कामाला लावून टायरोसीन कायनेज संयुगासारखेच असणारे पण थोडेसे वेगळे अशी पाच हजार संयुगे तयार केली. प्रयोगशाळेमध्ये टायरोसीन-कायनेज-ल्युकेमिया ही ओंकोजीन उंदरांना टोचून सीएमएल झालेले उंदीर तयार केले आणि त्यांना ही नवीन संयुगे देवून हजारो प्रयोग केले आणि अहो आश्चर्य! काही संयुगांमुळे उंदरांचा ल्युकेमिया बरा झाला!
आता माणसांना हे औषध देवून पहावयाचे होते.
26 एप्रिल 1999 :
मि.बड., पुरुष. वय वर्षे पंचावन्न
पांढऱ्या पेशी ३,५०,००० !
निदान : सीएमएल
डॉ.ब्रायन यांनी "ग्लीव्हेक' हे नवीन औषध सुरु केले.
17 मे 1999 :
एकवीस दिवसांत इतिहास घडला,
पांढऱ्या पेशी १०,०००! अगदी नॉर्मल!
आणि "ग्लीव्हेक' ठरली होती जादूची गोळी ! डॉ. ब्रायन यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. "सिफिलीस' या एकेकाळी असाध्य समजल्या जाणाऱ्या आजारावर "अर्सेनिक' ही जादूची गोळी सापडल्यानंतर डॉ.अर्लिच यांना झाला होता तसाच ! कारण थोर सशोधक डॉ. पॉल अर्लीच हेच डॉ. ब्रायन यांचे आदर्श होते.
ह्या जादुई औषधाची बातमी इटरटनेटद्वारे संपूर्ण जगात पसरली. पण ग्लीव्हेक कोठेच उपलब्ध नव्हते. मिस म्याक्नामारा नावाच्या एका सीएमएल पिडीत महिलेने पुढाकार घेवून चारशे सीएमएल रुग्णांच्या सह्या जमवून नोव्हार्टीस कंपनीच्या अध्यक्षांना अर्ज दिला आणि मग ग्लीव्हेकचे व्यावसायिक उत्पादन सुरु झाले. वैद्यकीय चाचण्या सुरु झाल्या. अमेरिकेतील औषधांना परवानगी देण्याबाबत अतिशय कडक नियमावली पाळणाऱ्या "एफडीए' या संस्थेने तिच्या इतिहासात प्रथमच म्हणजे केवळ पंधरा दिवसांतच ग्लीव्हेकला मान्यता दिली. पण या औषधाची किंमत सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर होती. ग्लीव्हेक आता भारतात येवून पोहोचले.
मुंबई, मार्च 2001 :
भारतामधील सुप्रसिद्ध रक्तशास्त्रज्ञ डॉ.एम.बी.आगरवाल यांनी आयोजित केलेल्या वैद्यकीय निरंतर शिक्षण परिषदेला मी उपस्थित होतो. नेमके त्याच कॉन्फरन्समध्ये ग्लीव्हेकविषयी चर्चा झाली. त्याच अनुषंगाने मागील आठवड्यामध्ये निदान झालेली अण्णांची केस मी सरांच्या कानावर घातली. ""डॉ.शिंदे, तुमची केस या औषधासाठी अगदी योग्य आहे. त्यांना तुम्ही माझ्याकडे पाठवून द्या. ती त्यांची बोन-मॅरो टेस्ट करीन. येथे मुंबईमध्ये आता पांढऱ्या पेशींमधील "फिलाडेल्फिया क्रोमोझोम' शोधण्यासाठी आणि मोजण्यासाठी 'फिश टेस्ट' देखील उपलब्ध आहे. एकदा योग्य प्रकारे निदान व आजार कितपत बळावला आहे याचे स्टेजींग झाल्यानंतर "ग्लीव्हेक' सुरु करता येईल.''
"सर, पण या माणसाला ग्लीव्हेकचा महिना दीड लाख रुपये खर्च कितपत परवडेल याची मला जरा शंकाच आहे.''
"अरे, काही काळजी करु नका. सुरुवातीचे तीन महिने तरी मी त्यांना माझ्याकडील "सॅम्पल' देईन. नंतरचे नंतर पाहता येईल.''
दोनच दिवसांनंतर अण्णा मुंबईला डॉक्टर आगरवालांकडे जाऊन धडकले. अण्णांच्या फिश टेस्टमध्ये बावीस टक्के पेशींमध्ये फिलाडेल्फिया क्रोमोझोमचे हिरवे ठिपके दिसत होते. आगरवाल सरांनी त्यांना ग्लीव्हेकच्या गोळ्या देवून एक महिन्यानंतर पुन्हा बोलावले होते.
दोनच महिन्यांनी आगरवाल सरांचे पत्र घेवून अण्णा मला भेटले. आश्चर्य! अण्णांचे सर्व रिपोर्टस् नॉर्मल आले होते. त्यांची वाढलेली पाणथरी देखील आता पुन्हा लहान झाली होती. त्यांचा ताप निवला होता. सडकून भूक लागत होती आणि वजनही वाढले होते. अण्णांच्या घरी आनंदीआनंद होता. अण्णांना ग्लीव्हेक आता आयुष्यभर घ्यावे लागणार होते. हा माणूस एवढे पैसे कसे उभे करणार हा एक गहन प्रश्न होता आणि नेमका हाच प्रश्न जगातील अनेक गरीब सीएमएल पिडीत रुग्णांना पडला होता.
पण त्यांच्या मदतीला धावून आला एक देवदूत, मॅक्स!
कोण होता हा मॅक्स?
1987 साली मॅक्समिलानो रीव्हारोला या मुलाला वयाच्या सोळाव्या वर्षी सीएमएल झाला होता. तेव्हा ग्लीव्हेकचा शोध लागलेला नव्हता. उपलब्ध औषधांचा काहीच उपयोग होत नव्हता. अस्थिमज्जारोपणाशिवाय दुसरा उपाय राहिला नव्हता. आईवडिलांनी तब्बल दोन वर्षे संपूर्ण अमेरिकेतील अस्थिमज्जा नोंदवह्या शोधल्या पण योग्य "मॅच' मिळाला नाही. कर्करोगाची पंढरी, ह्युस्टनमधील एम.डी.अँडरसन हॉस्पिटलमध्ये मॅक्सचे अस्थीमज्जारोपण झाले पण दुर्दैव! रोपण फसले आणि चार वर्षे लढा देवून, आई-वडिलांना आठवणी मागे ठेवून मॅक्स देवाघरी गेला. आपल्या मुलाची आठवण म्हणून उर्वरित आयुष्यभर सीएमएलच्या रुग्णांना मदत करण्याचा वसा घेतला त्याच्या आईने, पॅट्रीशिया गार्सिया उर्फ पॅटने! त्यासाठी तिने एक सेवाभावी संस्था सुरु केली; तीच 'इंटरनॅशनल मॅक्स फाउंडेशन' !
दरम्यान गरीब रुग्णांना आपल्या संशोधनाचा फायदा मिळावा या उद्देशाने नोव्हार्टीस कंपनीने एक 'रुग्ण सहाय्य योजना' सुरु केली आणि मग गरीब रुग्ण आणि नोव्हार्टीस यांच्यातील दुवा बनली-मॅक्स फाउंडेशन!
आजमितीला एक्क्याऐंशी देशांतील साठ हजारांपेक्षा जास्त रुग्णांना नोव्हार्टीसने मॅक्स फाउंडेशनद्वारा मोफत ग्लीव्हेक दिले आहे, देत आहे आणि देत राहणार आहेत. मॅक्स फाउंडेशनच्या मदतीने आणि ग्लीव्हेकच्या कृपेमुळे आजही- बारा वर्षांनंतरही अण्णांची तब्येत उत्तम आहे.
मॅक्स फाउंडेशनच्या या महादिंडीमध्ये आपल्या डोक्याला कर्करोगमुक्तीचे कफन बांधलेल्या पॅट गार्शिया, विजी व्यंकटेश सारखे असंख्य वारकरी व सलमान खानच्या 'बिईंग ह्युमन' सारख्या अनेक सेवाभावी संस्था सामील झालेल्या दिसतील. म्हणूनच मोहंमद सेईनी या गेली पंधरा वर्षे ग्लीव्हेकले दिलेले आयुष्य जगणाऱ्या एका वारकऱ्याला मजरुह सुल्तानपुरी यांच्या काव्यपंक्ती आठवतात.
"अकेला ही निकल पडा था गानिबे-मंजिलकी तरफ, रास्तें में लोग मिलते गये और कारवॉं बन गया!''
ग्लीव्हेकच्या शोधामुळे आणि यशामुळे कर्करोगाच्या उपचारामध्ये एक नवे पर्व सुरु झाले. अनेक नवनवीन संयुगे आता इतर काही कर्करोगांसाठी वापरली जात आहेत. कर्करोगाचा शेवट होण्याची सुरुवात तर झाली आहे. काळाच्या उदरामध्ये आणखी काय दडले आहे हे कोणास ठावूक? निदान आत्तापुरते तरी म्हणावेसे वाटते,
"मनःपूर्वक धन्यवाद डॉ.ब्रायन, नोव्हार्टीस, मॅक्स आणि सर्व खारोट्यांनो !''
==============
सुरेश शिंदे, लेखाबद्दल
सुरेश शिंदे,
लेखाबद्दल धन्यवाद!
कर्करोग विषाणूंमुळे होतो यावर अधिक संशोधन झाले आहे का? Four Women Against Cancer हे पुस्तक कितपत विश्वासार्ह आहे?
आ.न.,
-गा.पै.
श्री.
श्री. गामाजी'
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !
कर्करोग विषाणूंमुळे होवू शकतो हे निर्विवादपणे सिद्ध झाले आहे.
आपण उधृत केलेले हे पुस्तक (२००५) मी वाचलेले नाही. ॲमेझोनवर देखील खूपच त्रोटक माहिती आहे.
पुनश्च्य एकदा धन्यवाद !
डॉ. सुरेश शिंदे,एम.डी.
छान लिहिलंय डॉक्टरसाहेब
छान लिहिलंय डॉक्टरसाहेब .खारोट्यांना धन्यवाद .
ब्रिल्यंट! धन्यवाद डाॅ.
ब्रिल्यंट! धन्यवाद डाॅ. शिंदे!!
वाह... डॉक्टर, खुप चांगला
वाह... डॉक्टर, खुप चांगला लेख.
सुंदर..माहितीपुर्ण लेख
सुंदर..माहितीपुर्ण लेख
खरच ...खुप सुन्दर
खरच ...खुप सुन्दर
सुंदर, माहितीपूर्ण लेख.
सुंदर, माहितीपूर्ण लेख. आवडला.
डॉक्टरसाहेब,
सुरेख, माहितीपूर्ण लेखाखातर मनःपूर्वक धन्यवाद!
"http://www.ojlife.com/2012/jun/lifestyle/end-cancer-within-reach"
"एन्ड ऑफ कॅन्सर इस विदीन रीच"
सुरेख, माहितीपुर्ण लेख
सुरेख, माहितीपुर्ण लेख डॉक्टर!
तुमचा ब्लॉग वाचत आहे.
उत्तम लेख! चांगली माहिती!
उत्तम लेख! चांगली माहिती! धन्यवाद!
अतीशय उत्तम! डॉक्टर शिन्दे
अतीशय उत्तम! डॉक्टर शिन्दे धन्यवाद. हा लेख सुद्धा वरवरचा न वाटता खूप तळमळीने लिहीलाय असे वाटतेय, नव्हे खात्री आहे. डॉक्टर लिहीत रहा, तुमचे अनूभव आमच्यासाठी उत्तम मार्गदर्शक ठरतील.
सुरेख, माहितीपुर्ण लेख !!!
सुरेख, माहितीपुर्ण लेख !!!
खुप दिवसांनी असा महितीपूर्ण
खुप दिवसांनी असा महितीपूर्ण लेख वाचला. माझ्यासाठी सर्व माहिती नवीन होती.
तुम्हाला शक्य असेल तेव्हा अजुन लेख लिहा.
धन्यवाद ! उत्तम माहिती !
धन्यवाद ! उत्तम माहिती !
सुरेख, माहितीपुर्ण लेख
सुरेख, माहितीपुर्ण लेख डॉक्टर!
तुमचा ब्लॉग वाचत आहे.
>>+१
खूप चांगला लेख आहे. नावामुळे
खूप चांगला लेख आहे.
नावामुळे मी वाचलाच नव्हता.
डॉ एम बी अग्रवाल एम डी ला आमचे शिक्षक होते.
माहितीपूर्ण लेख.सरळ सोप्या
माहितीपूर्ण लेख.सरळ सोप्या लेखनशैलीमुळे अधिक वाचनीय.
माहितीपूर्ण लेख.सरळ सोप्या
माहितीपूर्ण लेख.सरळ सोप्या लेखनशैलीमुळे अधिक वाचनीय. >>> +१००...
तुम्हाला शक्य असेल तेव्हा अजुन लेख लिहा. >>>> +१००...
सुंदर, माहितीपूर्ण लेख.
सुंदर, माहितीपूर्ण लेख. आवडला.
अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत
अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत एवढी छान माहीती दिल्याबद्दल डॉ. शिंदे तुम्हाला खुप खुप धन्यवाद .
माहितीपूर्ण लेख.सरळ सोप्या
माहितीपूर्ण लेख.सरळ सोप्या लेखनशैलीमुळे अधिक वाचनीय. >>>+१००००००००
तुम्हाला शक्य असेल तेव्हा अजुन लेख लिहा. >>>> +१०००००००००००
खूप छान माहिती!!
खूप छान माहिती!!
मॅक्स फाउंडेशनशी नक्की कसा
मॅक्स फाउंडेशनशी नक्की कसा संपर्क साधावा? ही माहिती लेखात दिलीत तर लाखात एक लेख होइल
उत्तम माहितीपर लेख. धन्यवाद.
मॅक्स फाऊंडेशनची
मॅक्स फाऊंडेशनची लिंक
http://www.themaxfoundation.org/aboutus/default.aspx
छान माहितीपूर्ण लेख धन्यवाद
छान माहितीपूर्ण लेख
धन्यवाद डॉक्टर !!!
छान लेख! मला माहित नव्हते
छान लेख!
मला माहित नव्हते ल्युकेमियावर उपचार (पक्षी: गोळी) सापडलाय..
चांगला लेख.
चांगला लेख.
छान लेख. अतिशय माहितीपुर्ण.
छान लेख. अतिशय माहितीपुर्ण.
धन्यवाद.
छान माहितीपूर्ण लेख
छान माहितीपूर्ण लेख
अतिशय माहितीपूर्ण आणि उत्तम
अतिशय माहितीपूर्ण आणि उत्तम लेख.
Pages