पुस्तकांची जपणूक व साठवण कशी करावी?

Submitted by हर्पेन on 8 January, 2014 - 05:16

माझ्याकडे माझी स्वतःची अशी विकत घेतलेली / मिळालेली पुस्तके बरीच झाली आहेत.

पुस्तक खरेदीच्या सुरुवातीच्या काळात माझे घर पुण्यात होते आणि मी नोकरीच्या निमित्ताने इतरत्र असायचो. त्यावेळी पुस्तकांची एकूणच संख्या थोडकी होती. तसेच कामाच्या मुक्कामी माझ्याबरोबर मी मोजकीच पुस्तके ठेवायचो आणि बाकी सर्व पुस्तके घरी पुण्यालाच असायची. ती कोण कोण नेऊन परत न दिल्यानंतर किंवा नीट न हाताळता परत केल्याचे अनुभव आल्यावर मी त्यांना एका ट्रंकेत / माळ्यावर ठेवायचो.

मधल्या कालावधीमध्ये लग्न, मुले अशा घर-संसारी गोष्टीत गढल्यामुळे पुस्तकांकडे जरा दुर्लक्षच झाले होते. मग मुले झाल्यावर ती लहान असताना पुस्तकांवर रेघोट्या मारणे पाने फाडणे अशा त्यांच्या उद्योगाची भीती वाटल्याने बरीचशी पुस्तके माळ्यावरच ठेवलेली होती / आहेत. पण आता मुले जरा जाणती झाली आहेत व त्यांच्यातही वाचनाची आवड निर्माण व्हावी असे वाटत असल्याने पुस्तके खाली काढली / काढत आहे.

मी मागे एकदा काही पुस्तकांची यादी केलेली होती व त्या प्रमाणे पुस्तकांना ठेवले होते पण पाहिजे ते पुस्तक पाहिजे त्या वेळी सापडतेच असे नाही.

आपण मायबोलीकर आपापल्या पुस्तकांचा सांभाळ कसा करता हे जाणून घेण्यासाठी व शिकण्यासाठी हा बाफ उघडत आहे.

लिहायला (झालेच तर) सोपे जावे म्हणून काही मुद्दे / प्रश्न मांडत आहे. अर्थात ह्या व्यतिरिक्तदेखिल माहिती पुरवावी ही विनंती. Happy

आपण पुस्तके खणात कशा रीतीने लावता.
यादी / साठवण अगदी लायब्ररी पद्धतीने / अकारविल्हे करता का?
पुस्तके खणात ठेवताना पुस्तकांचे लेखकानुसार / अकारविल्हे / साहित्य प्रकारानुसार किंवा आणिक कोणत्याही प्रकारे वर्गीकरण करता का?
अशा वर्गीकरणाचे फायदे / तोटे काय?
कुणाला दिलेले पुस्तक, परत आले की नाही याची आठवण / नोंद कशी ठेवता?
पुस्तके कडी कुलुपात ठेवता काय?

तर आपल्या उत्तरांच्या प्रतिक्षेत Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुस्तक घरी आणले की माझी मुलगी पुस्तकाच्या मुखपृष्ठाला आणि मलपृष्ठाला कडेला (जिथुन आपण पान उलटतो तिथे) पारदर्शक सेलोटेप लावते. त्यामुळे पुस्तक सतत हाताळले तरी मुखपृष्ठाचे पान खराब होत नाही. अर्थात हे केल्यावर ती परत कव्हर घालतेच पण सेलोटेपमुळे तो भाग कडक राहतो आणि सतत हाताळणी केली तरी पाने वळत नाही.

एका पुस्तक नेणा-याने मी पहिल्या पानावर माझे नाव लिहिलेले ते फाडुन टाकले आणि मग मला पुस्तक परत द्यायचे नाकारले Happy तेव्हापासुन मी मुद्दाम पुस्तकात अध्ये मध्येही नाव लिहिते.

लोल पुस्तकांची लायब्ररी कशी ठेवायची ह्या विचारावर एका वाचकाने एक आख्खे पुस्तक लिहिले, तिला काय आणि कसे वाटते त्याबद्दल. फारच मनोरंजक आहे. Ex Libris: Confessions of a Common Reader त्याचे नाव. एकदा प्रत्येकाने वाचावे असे.

मी देखील अनेक प्रकार करून पाहिले पण आताचा प्रकार मला थोडा बरा वाटतो आहे.

फिक्शन साठी ( दोन कप्पे)

१. इंग्रजी एकीकडे आणि मराठी एकीकडे.
२. परत दोन्हीत मध्ये लावून ठेवताना उंची आणि जाडी नुसार वर्गीकरण त्याच पुस्तकांची चळत चांगली दिसते, शोधायला त्रास होतो हे खरे पण आता सवयीने काही वाटेनासे झाले आहे.

नॉन फिक्शन - वेगळा कप्पा - परत तीन कप्पे.

३. तत्वज्ञान / गीता/ उपनिषिदं वगैरेंची भाऊगर्दी (मराठी इंग्रजी) एकत्रच तो कप्पा वेगळाच. त्यात इतर नाही.
४. इतिहासाची सर्व एकत्र त्यात दुसरे कुठलेही नाही.
५. इतर सटर फटर नॉन फिक्शन वेगळी.

ही झाली माझी. शिवाय मुलीची सर्व फिक्शन आहेत, त्यांचा एक कप्पा मात्र वेगळा.

पूर्वी मी लेखकाच्या आडनावानुसार वर्गीकरण करत असे. त्यात मराठी इंग्रजी लेखक एकमेकांच्या शेजारी बसत पण ते ही शोधायला अवघड होते हा अनुभव. म्हणजे जी एंच्या बाजूला अ रा बसत. तर अ रांनाही त्रास अन जी एंना पण Happy मग मध्ये लगेच कोणतरी भलताच इंग्रजी गृहस्थ असे !

लोकांना दिल्यावर मी नोंद करत असे, एका एक्सेल मध्ये. आता नाही करत. लक्षात राहतं कारण माझ्याकडे असणारी पुस्तकं सहसा लोकं आनंदाने वाचतील असे नाही, बरेच इंग्रजी लेखकही कॉमन वाचकाना माहिती नसतात Wink हा फायदाच.

मात्र घरात एक वेगळी जागा आहे.तिथे खास लायब्ररी बनवली आहे. पुस्तके कुठेही पडलेली मला आवडत नाहीत.

पुस्तके कडी कुलुपात ठेवता काय? >>>>>> पुस्तके कडी कुलुपात ठेवायला आवडेल मला Happy

सध्या तरी बॅगेत ठेवली आहेत.. आधी कपाटात होती, पण तिथे मात्र असं खास वर्गीकरण करायला जागा नव्हती, त्यामुळे बसतील तशी ठेवायचे. माझ्याकडे एक छोटी डायरी आहे, त्यात माझ्याकडच्या सगळ्या पुस्तकांची यादी आहे. दुसर्‍या एका डायरीत कोणते पुस्तक कोणाला दिले याची माहिती असायची. पुस्तक परत आल्यावर ते खोडुन टाकायचे. पुस्तक कोणाला दिल्यावर १०-१२ दिवसांनी फोन करुन वाचुन झालं का विचारायचे, जेणे करुन समोरचा पुस्तक परत द्यायचं आहे हे विसरणार नाही. सध्या कोनालाही पुस्तक देणं बंद केलय.

पुस्तकाच्या मुखपृष्ठाला आणि मलपृष्ठाला कडेला (जिथुन आपण पान उलटतो तिथे) पारदर्शक सेलोटेप लावते.>>>>> हे मस्तय..

पुस्तके कुठेही पडलेली मला आवडत नाहीत.>>>>>>> माझ्या रुमच्या बाहेर पुस्तके गेलेली मला आवडत नाही Wink पुस्तकांच्या बाबतीत मी जरा जास्तच पझेसिव आहे, त्यामुळे सहजासहजी बाकी कोणाला वाचायला, हाताळायला देत नाही.. Sad

bookshelf.jpg

सगळ्यात वरच्या कप्प्यात मराठी कवितासंग्रह कवींच्या नावाच्या/टोपणनावाच्या क्रमानुसार , मग पुस्तकाच्या प्रकाशनाच्या क्रमानुसार.
दुसर्‍या कप्प्यात मराठी गद्य : लेखकांच्या आडनावांच्या , मग प्रकाशनवर्षाच्या क्रमाने.
तिसर्‍या कप्प्यात इंग्लिश लिटरेचर, सगळ्यात डावा डोलारा हॅरी पॉटरचा. बाकीचे पुस्तके आकारमानानुसार.
त्याखाली इग्लिश नॉन-फिक्शन, माझ्या अभ्यासाची पुस्तके, डिक्शनरीज : आकारानुसार : जाडजूड पुस्तके खाली.
त्याखालच्या कप्प्यात : सेल्फ हेल्प - DIY बूक्स - ही उभी असल्याने उंच पुस्तके कडेला
त्याखाली वृत्तपत्रांच्या न टाकवणार्‍या पुरवण्या. कात्रणे.
कपाटावर एका गेल्या दोन वर्षांतली नियतकालिके.
गेल्या चार पाच वर्षांतले दिवाळी अंक प्लास्टिकच्या जाडजूड पिशव्यांत बंद करून माळ्यावर.
मराठी पुस्तकांना कव्हर घातलेली आहेत. इंग्रजी बहुतेक हार्डबाउंड आहेत.

पुस्तके कपाटाच्या मागच्या बाजूला चिकटून न ठेवता थोडी जागा सोडली आहे.

नरसिंह राव यांच्या घरात नुसती पुस्तकांचीच एक खोली होती. तशी किमान एका खोलीची एक भिंत बुकशेल्फ्सनी भरलेली असावी असे स्वप्न आहे. (त्यासाठी आधी मोठे घर घ्यावे लागेल, त्यासाठी लॉटरी घ्यावी लागेल.)

माझी पुस्तकं धान्यांच्या कोठ्यामधे भरून ठेवली आहेत. चार कोठ्या आहेत. तीन्मधे एंग्लिश आणि एकामधे मराठी आहेत. इंग्लिशमधे आभ्यासाची पुस्तकं, नोट्स आणि जर्नल्स मिळून दोन कोठ्या. एकामधे फिस्क्शन वगैरे. पुस्तक एकावर एक रचून ठेवलेली आहेत. प्रत्येक पुस्तकावर नाव घातलेलं आहे. शिवाय पुस्तक कधी विकत घेतलं ते ठिकाण आणि तारीख. पुस्तक कधी वाचून झालं ती तारीख घालून ठेवलेली आहे. खूप पूर्वी पुस्तक वाटल्यावरचं मत एका कागदावर लिहून तो कागद पुस्तकात ठेवत असे, हल्ली अशा नोट्स फेसबूक अथवा ब्लॉगवर टाकते.

माझ्याकडे कुणीही पुस्तक वाचायला मागत नाही, मागितलंत तर मी सरळ "नाही" असं सांगते. वाटलं तर घरी या रोह दोन तास आणि वाचा पुस्तक. नाहीतर तुमच्या वादिला मी हेच पुस्तक गिफ्ट देइन असं सांगते.

मोठी पुस्तके वाचण्यासाठी कुराण वाचण्यासाठी वापरतात तो लाकडी स्टॅन्ड मला गिफ्ट म्हणून मिळालाय. (कुराणासकट!!!) तो मी वापरते. बरा पडतो.

पुस्तक घरी आणले की माझी मुलगी पुस्तकाच्या मुखपृष्ठाला आणि मलपृष्ठाला कडेला (जिथुन आपण पान उलटतो तिथे) पारदर्शक सेलोटेप लावते. त्यामुळे पुस्तक सतत हाताळले तरी मुखपृष्ठाचे पान खराब होत नाही. - ग्रेट

जागा असेल तर नक्कीच कधीही नजरेसमोर राहतील अशी ठेवेन मी पुस्तक' .
शेल्फ ला काचेचे दरवाजे, धूळ बसू नयेम्हणून . आणि पुस्तकाना कव्हरं प्लॅस्टिकची . ( पांढरी खाकी नाहीतर वर्त्मानपत्राचीकव्हर घातली तर मला ती बुरखा घालून चेहेरा लपवलेली वाटतात. :). )

वाचली सगळी उत्तरे, सुंदर उत्तरं आहेत सगळ्यांचीच, काही शंका आहेत पण आत्ता पुरेसा वेळ नाहिये, उद्या विचारतो.

सगळ्यांचे अनेकानेक धन्यवाद Happy

पुस्तकाच्या मुखपृष्ठाला आणि मलपृष्ठाला कडेला (जिथुन आपण पान उलटतो तिथे) पारदर्शक सेलोटेप लावते.>>>>>
हे छान आहे. मीही करणार Happy

मी मुद्दाम पुस्तकाला पांढरं कव्हर घालते आणि त्यावर मोठ्या अक्षरात माहीती लिहिते.
मीही पुस्तकाच्या अध्ये मध्ये नावं लिहिते.

कोणी माझं पुस्तक खराब केलं, घेतलं आणि परत दिलं नाही तर त्याचा अतिशय व्यवस्थीत योग्य शब्दात अपमान करते! इतका की पुन्हा त्याने ते मागू नये!
हे कितीही वाईट असलं तरी माझा पुस्तकांसाठी जीव तुटतो त्यामुळे चालतं!

भरत दादा , आयेम सो जेलस ऑफ यूअर कपाट!
माझी पुस्तके एका बॅगेत भरुन ठेवलीयेत. काही पुस्तकं शोकेस मध्ये खाली जो मोठ्ठा कप्पा आहे त्यात ठेवलीयेत.

पुस्तकांची खुप सारी भली मोठ्ठी कपाट असलेली एक रूम हे माझं ड्रिम आहे Happy

माझी पुस्तकं एका बॉ़क्स मधे भरुन माळ्यावर आहेत अरेरे>>+१११

माझंही असंच झालंय. लग्नापूर्वी मारे हौसेने स्व-कमाईतून अनेक पुस्तके खरेदी केली आणि लग्नानंतर सासरीही घेऊन आले. सासरी वाचनाची कोणालाही आवड नाही अशी परिस्थिती आणि त्यातही नवरा- नणंदा इंग्रजी माध्यमातले पण तरीही हट्टाने एका शो-केसमध्ये छान रचून ठेवली होती. पण मध्यंतरी काही आर्थिक अडचणींमुळे दोन रूम्स जोडून मोठे केलेल्या घराचा अर्धा भाग विकावा लागला तेव्हापासून जागा नसल्याकारणाने सर्व पुस्तके वरती माळ्यावर पडून आहेत.

काही वर्षांपूर्वी घरात खुप पुस्तके साठली. जेव्हा पुस्तके शोधणे जिकिरीचे होऊन बसले तेव्हा वस्तूंवर किंमतीची असतात तशी लेबल्स आणून सर्व पुस्तकांना लायब्ररीत लावतात तसे कोड घातले - आडनावाचे आद्याक्षर आणि क्रमांक दिला. उदा. K001 असे. त्या लेबलवर पारदर्शक सेलोटेप लावून मग पुस्तकांना प्लास्टिक कव्हर्स घालुन त्या क्रमांकाप्रमाणे कपाटात लावली. प्रत्येक पुस्तकावर नाव घालून अधल्यामधल्या पानांवर काही आम्हालाच समजतील अशा खुणा केल्या. जेणे करून आपले पुस्तक लगेच ओळखता येईल. एकीकडे सर्व पुस्तकांची एक्सेल लिस्ट बनवली. त्या पुस्तकासमोर त्याचा कोड क्रमांक फीड करून मगच ते कपाटात ठेवलं. ही यादी अकारविल्हे असल्यामुळे पुस्तक शोधणे सुकर झाले. पुस्तके सर्व प्रकारची आणि जवळपास ७५० ते ८०० असल्यामुळे त्यांचे वर्गीकरण करून मग हे सगळे करण्याइतका उत्साह आणि वेळ दोन्ही नव्हतं. शिवाय पुढे त्यात अ‍ॅड होत जाण्या-या पुस्तकांचा प्रश्न निर्माण झाला असता. हे सगळे करायला ३-४ महिने लागले, नव-याने आणि मी दोघांनी मिळून केले. नवी पुस्तके आधी एक्सेल यादीत आणि पुढचा क्रमांक टाकून कपाटात ठेवता येऊ शकत. कोडमुळे एखादे मिसिंग पुस्तकही लगेच समजायचे. दिलेली पुस्तके कपाटातच ठेवलेल्या एका फुल्स्केपवर नाव आणि तारखेसकट नोंदवून ठेवत असू. केव्हा देणार हे देतानाच विचारल्यामुळे त्यानंतर लगेच फोन करायचोच. तरीही दोन पुस्तके हरवलीच. पण तो फार छान कोपरा होता घराचा.

सगळी पुस्तके लावून झाली तेव्हा कितीतरी वेळ त्याच्याकडे बघतच राहिलो होतो आणि आनंदित होऊन मस्त पार्टी पण केली होती Happy

दोन वर्षांपूर्वी घर बदलले, तेव्हा जागेचा प्रश्न आला, तेव्हा ही यंत्रणा कोलमडली. पुस्तके काही काळासाठी पेट्यांमधे गेली आणि मग नव्या पुस्तकांना कोड देऊन कव्हर्स घालणेही मागे पडायला लागले. सध्या पुरतेच थंडावले आहे आणि नवे घर, त्यात पुस्तकांसाठी मोठी जागा ही तजवीज झाल्याशिवाय ते पुन्हा रुळावरही येणार नाही Sad
आता कुणाकडेही छान लावलेली पुस्तके बघितली की छान तर वाटते पण खुप हळहळही होते.

मयेकर किती छान लावलेत कपाट
नरसिंव्ह राव यांच्या घरात नुसती पुस्तकांचीच एक खोली होती. तशी किमान एका खोलीची एक भिंत बुकशेल्फ्सनी भरलेली असावी असे स्वप्न आहे <<<< हे म्हणजे अगदी अगदी

पुस्तकांची नीट काळजी घ्यायची हि लहानपणापासुन आवड. त्यामुळे प्रत्येक पुस्तकाला नीट कव्हर घालुन, पुन्हा त्याला प्लॅस्टीकचे कव्हर घालायचे. त्यावर पुस्तकाचे नाव, विकत घेतल्याची तारीख लिहायचे. दुसरयांनी वाचायला घेतलेली पुस्तके स्वतःची आहेत सांगुन परत न करणे हा अनुभव मला देखील आला त्यामुळे मी देखील पुस्तकांच्या मधल्या काही पानांमध्ये नाव लिहीते. आधी एका वहीत सर्व पुस्तकांची अनुक्रमणिका लिहुन ठेवायची. आता हे काम माझा कंम्प्युटर सांभाळतो. हल्ली मला पुस्तकांना खाकी कव्हर घालायला आवडत नाहीत. कारण पुस्तकांची मुखपृष्ठे इतकी सुंदर असतात की ती पहाणे हा देखील एक छान अनुभव असतो.

घरी एक कपाट बनवुन घेतले आहे खास फक्त पुस्तके ठेवण्यासाठी. त्यात मग विषयानुसार कप्पे केले आहेत. मला वाचनालयात असतात तशी उभी पुस्तके ठेवायला आवडतात. कारण त्यामुळे हवे ते पुस्तक लगेच नजरेच्या टप्प्यात येते. मध्ये मध्ये सर्व पुस्तके काढुन नीट पुसुन, डांबर गोळ्या कपाटात ठेवते. पुस्तकांना मध्ये मध्ये थोडी हवा दाखविली कि ती देखील फ्रेश झाल्यासारखी वाटतात.

सध्या कॅरी करायला बरी पडतात. म्हणुन ईबुक्सचा पर्याय असेल तर तेच खरेदी करते. हवी तेव्हा, हवी तेथे वाचता येतात. हल्लीच्या नविन अ‍ॅप्समुळे नोट्स काढणे, बुकमार्क करुन ठेवणे सोपे झाले आहे.

मयेकर, तुमचे कपाट छान दिसते आहे पण पुस्तकाचे नाव असलेला भाग आत गेल्यामुळे सापडायला अडचण होत नाही का?

माझी सगळी पुस्तकं उभी ठेवली आहेत. बर्‍याच पुस्तकांवर मागच्या कडेवर नाव असते तो भाग दर्शनी ठेवून. मराठी, इंग्रजी, इंग्रजी टेक्निकल या तीनच क्याटेगर्‍या बनवून त्याप्रमाणे पुस्तकं शेल्फवर ठेवली आहेत. मला पुस्तकांच्या कपाटासमोर उभं राहून रँडमली पुस्तक काढून वाचायला सुरूवात करणे आवडते म्हणून. बाकी काही सॉर्टिंग केलेले नाही. आपल्याकडे कुठली पुस्तकं आहेत याची नक्की माहिती असावी म्हणून एक यादी बनवली होती आणि ब्लॉगवर टाकली होती २-३ वर्षांपुर्वी. आता ती अपडेट करायला हवी आहे.

मीही उभी ठेवली .... होती.
कविता निराळ्या, ऐतिहासिक निराळी, जीए निराळे, पुलं निराळे, दिवाळी अंक निराळे, इंग्रजीतही काव्य आणि गद्य, मुलांची निराळी, बाकी टेक्निकल, असं काय काय सॉर्टिंग... केलं होतं.
एकदा.
फार फार पूर्वी.
पण एकूण ते तसं तितकं काटेकोर टिकत नाही. असू दे.
ती आहेत, ती मनात आलं की हाताळता - वाचता येतात याचं सुख मोठं आहे.
अधूनमधून धूळ झटकते.
बाकी इथल्या कोरड्या हवेला राहतातही चांगली. बुरशी, वाळवी इ. प्रकार होत नाहीत.

भारतात, विशेषतं मुंबईत किंवा अन्य दमट ठिकाणी असाल तर मात्र त्याची काळजी घ्यावी. ते स्प्रे मिळतात ना वाळवीपासून संरक्षण करणारे? ते वापरावेत.

पण एकूण ते तसं तितकं काटेकोर टिकत नाही >>> +१ Happy

घरात पुस्तक ठेवता येइल अशी जी काही ठिकाणं आहेत तिथे सगळीकडे सगळ्यांची १-२ पुस्तकं सापडतातच. ही (अ)व्यवस्था पण आवडते मला.

हवेला निर्वात पोकळी मानवत नाही त्याच न्यायाने कुठलीही जागा मोकळी असेल तर आमच्या घरात तिथे लगेच पुस्तकांची चळत घुसते. अजून नशीबाने स्वैपाकघर फक्त पुस्तकफ्री आहे. एकुणातच उंट आणि अरबाचा तंबू अशी परिस्थिती आहे Proud

शिवाय अ‍ॅन फॅडिमनचं पुस्तक वाचल्यानंतर या गैरशिस्तीविषयीचा अपराधी भावपण पूर्ण गेलेला आहे!! कुठली पुस्तकं कुठे आहेत ते सहसा डोक्यात असतंच. वेगळी यादी वगैरे नाही. फक्त मराठी गोष्टीच्या पुस्तकांचा कप्पा वेगळा ठेवलाय.

आमच्याकडे एक छान शेल्फ आहे खास पुस्तकांसाठी.. साबा आणी साबुंना वाचनाची आवड असल्याने.
(त्याचा फोटो टाकते लवकरच)

त्यात साबुंनी मराठी (फिक्शन), मराठी (नॉन फिक्शन), त्यांची आणी माझी कायदेविषयक, इंग्रजी (फिक्शन आणी नॉन फिक्शन), साबांची धार्मिक असे वेगवेगळे कप्पे केले आहेत.

शिवाय आता टेपरेकॉर्ड मध्ये वाजणार्‍या कॅसेट्स बाद झाल्याने ह्या कॅसेट ठेवण्यासाठी जे शेल्फ होते ते रिकामे करुन त्यातही लहान पुस्तके ठेवली आहेत.

आमच्याकडे फार पुर्वीपासुन एक फळा आहे. हॉलमध्ये अगदी दर्शनी भागात भिंतीत रंगवलेला. कोणीही काहीही घेऊन गेले (भांडी, बागकामाची हत्यारे, घोडी, पुस्तके, फाईल, पैसे इ.) कि आम्ही त्यावर ते नाव आणी दिनांक टाकुन लिहितो. आम्हाला त्यात काहीही लाज वाटत नाही. उलट पुढच्या वेळेला तो माणुस घरी आला आणी त्याने ते वाचले कि लोकलज्जेखातर तो गपचुप नेलेली वस्तु परत आणुन देतो. (एखाद वेळेस तिसर्‍याच माणसाने "अहो आज अमुकअमुकांकडे फळ्यावर तुमचं नाव वाचलं. तुम्ही त्यांचे ५३० रु. देणं आहात म्हणुन" अश्याही घटना घडलेल्या आहेत). ज्यांना आपलं नाव फळ्यावर यायची लाज वाटते ते काही मागायच्या फंदात पडत नाहीत.

विषयानुसार पुस्तके लावावी तर आकार कमी जास्त असतात. आकारानुसार लावावी तर विषय वेगळे येतात. विषय व आकार यांना प्राधान्य दिल तर जागेचा पुरेपुर वापर होत नाही.
कधी कधी बेसावध क्षणी मित्र नातेवाईक यांना पुस्तके दिली जातात व नंतर मग ते दोघांच्याही लक्षात राहत नाही. लोक वेळेवर व आठवणीने पुस्तक परत करीत नाही असा बहुसंख्यांचा अनुभव आहे.

मला उभी ठेवलेली आवडत नाहीत. मान वाकडी करुन नाव वाचतावाचता मान मोडते. त्यापेक्षा एकावर एक, बाजुवर लिहिलेली नावे झटझट वाचता येतील अशी ठेवलेली आवडतात. अर्थात वेगवेगळे कप्पे व 'भक्कम' शेल्फ हवेच. शेल्फ चा आडवा कप्पा पुस्तकाच्या आकाराचा हवा अथवा थोडस्साच मोठा नाहीतर पुढच्या रिकाम्या जागेत पसारा ठेवला जातो. शेल्फला दार व पुस्तकांना पारदर्शक कव्हर हवे नाहीतर वाळवी लागु नये म्हणुन काहीतरी ठेवणे जे अपायकारक नसेल.

नरसिंव्ह राव यांच्या घरात नुसती पुस्तकांचीच एक खोली होती. तशी किमान एका खोलीची एक भिंत बुकशेल्फ्सनी भरलेली असावी असे स्वप्न आहे>>>> माझी आईकडे असताना ही चैन होती. माझ्या वाट्याला जो ब्लॉक आलाय त्यात किचन आणि हॉल अशा दोन खोल्या होत्या. हॉल अर्थात बेडरूम कम स्टडी रूम झाली आणी किचनभर पुस्तकं, डीव्हीडी, सीडी असा दरबार. पण तेव्हा अभ्यासाचीच पुस्तकं जास्त असायची.

स्वतःचं घर बांधलं की मी एकवेळ किचन बांधणार नाही, पण वाचायला स्पेशल खोली नक्की बांधणार. त्यात मस्त हॅमोक वगैरे टाकून पुस्तकं वाचत बसणार. Happy

कुठली पुस्तकं कुठे आहेत ते सहसा डोक्यात असतंच. वेगळी यादी वगैरे नाही. फक्त मराठी गोष्टीच्या पुस्तकांचा कप्पा वेगळा ठेवलाय. >> +१. त्यातल्या त्यात एका लेखकाची एकत्र ठेवली आहेत. नि त्यातही आवडत्या लेखकांची नकळत एकत्र झालेली आहेत. मलाही कुठलेही पुस्तक कधीही काढून वाचावेसे वाटते पण सब्कॉन्शसली ते कुठे आहे हे आपोआप लक्षात येते.

बाप रे ... इतकी सुव्यवस्था!
आमची एक खोली जवळजवळ पुस्तकांचीच आहे. घरी पुस्तकाची दोन कपाटं आहेत, शिवाय एका खोलीला खिडकीशेजारच्या जागेत केलेली पुस्तकांची कपाटं आहेत. या सगळ्यातून पुस्तकं ओसंडून वाहात असतात. घरातल्या प्रत्येक फ्लॅट सरफेसवर, बसायच्या / झोपायच्या जागेशेजारी हाताला लागेल असं एक तरी पुस्तक मिळतंच. काही महिन्यांपूर्वी लेक चालायला लागल्यापासून तिच्या हाताला लागणार्‍या ठिकाणी पुस्तकं ठेवता येत नाहीत त्याचा फार त्रास व्हायचा, पण त्या जागा आता तिच्याच पुस्तकांनी व्यापलेल्या असतात. एवढी पुस्तकं जवळपास असल्याशिवाय घरच्यासारखं वाटत नाही मला.
संदर्भपुस्तकं वेगळी ठेवणं एवढं एक पथ्य वगळता सगळी पुस्तकं केवळ आकारविल्हे लावलेली आहेत (नाही तर दुसरं घर घ्यावं लागेल पुस्तकं ठेवायला!) पुस्तकांची यादी नाही, पण आपण विकत घेतलेली पुस्तकं अजून तरी लक्षात असतात. पुस्तकं शोधायची म्हणजे पहिल्यांदा घरात बाहेर कुठे आहे का ते बघायचं. तिथे नसेल तर कपाटामध्ये. तिथे नसेल तर आईकडे. (आईकडे तर १९६५- ७० पासूनचे नॅशनल जिऑग्राफिकचे अंकसुद्धा आहेत.) आईकडेही मिळालं नाही, तर ते वाचायला नेलेलं म्हणून जगात कुठेही असू शकतं. काही मोजक्या लोकांना सोडून मी पुस्तकं वाचायला देत नाही त्यामुळे परत न मिळण्याची वेळ तशी कमी येते.
कव्हर आवर्जून घालते ते संदर्भपुस्तकांना. बाकी पुस्तकं किती वेळा वाचणार त्यावर ठरतं कव्हर घालायचं का ते. पुस्तकाचे कोपरे वाकू नयेत म्हणून सेलोटेप लावायची कल्पना आवडली.

मी विषयानुसार पुस्तकं ठेवते. आर्ट, ट्रॅव्हल, कविता, कथा-कादंबर्‍या, पर्यावरण, फेमिनिझम वगैरे. आणि मग त्यातही आवडत्या लेखकांची एकत्र म्हणजे रस्किन बॉन्ड, ओर्‍हान पामुक, जीए, गौरी, सानिया, बोकिल वगैरे. इंग्रजीतही तसंच शक्यतो. पण इंग्रजी पुस्तकांमधे मुलींचीही एकत्र असल्याने सॉर्टिंग टिकत नाही.

एक रॅक मी वाचायची राहिली आहेत, लगेच वाचायला हवीत अशा पुस्तकांकरता ठेवते.
एका खणात उगीच घेतलीत असं वाटणारी सगळी एकत्र, जी मी काही महिन्यांनी ज्याला हवी असतील त्याला किंवा मग रद्दीत देऊन टाकते.
पुस्तकं सतत काढत राहिली नाहीत तर नव्या पुस्तकांना जागा रहातच नाही. कपड्यांचं कपाट आणि पुस्तकांचं कपाट महिन्यातून एकदा निट लावायचंच असा माझा निश्चय असतो, शक्यतो पाळते.

मला पुस्तकांना कव्हर्स घातलेली अजिबातच आवडत नाहीत. मजा जाते. जी लोकं पानांचे कोपरे दुमडतात त्यांचा मी तीरस्कार करते.

पुस्तकांचं कपाट बंद असेल तर त्यात वेखंडाच्या मुळ्या लहान तुकडे करुन अधे मधे टाकून ठेवाव्या. अजिबात काही कसर, वाळवी फिरकत नाही. हा सल्ला अरुण टिकेकरांचा.

किती छान आणि उपयुक्त धागा. आमच्याकडे आम्ही तिघेही वाचनकिडे आहोत. पुस्तके विकत घेऊन वाचणारे.
एक मोठं कपाट भरून इंग्रजी आणि मराठी पुस्तकं असली तरी बरीच पुस्तके घरभर असतात. मुलीच्या आवडत्या पुस्तकांची सतत भर पडत असते. तरी बरं दर २ वर्षांनी तिची जुनी पुस्तके जी तिला परत वाचाविशी वाटत नाहीत ती पब्लिक लायब्ररीला देतो. आमच्या घरी बेडच्या दोन्ही बाजुला, मुलीच्या खोलीत, बैठकीच्या खोलीत, कॉफी टेबलच्या खाली सगळीकडे पुस्तके सापडू शकतात. Happy यात शिस्त लावण्याचा बरेच वेळा प्रयत्न झालाय. पण ये रे माझ्या मागल्या अशी स्थिती आहे. या धाग्यामुळे आता परत एकदा कपाट आवरलं जाईल.

मागच्या ३-४ वर्षात किंडल आल्यामुळे इंग्रजी पुस्तके कमी विकत घेतली गेली. किंडल वर वाचायला मुलीला आणि नवर्‍याला खूप आवडते आणि विशेषतः प्रवासात खूप सोयीचे होते. मी मराठीवेडी असल्याने प्रवासात माझं हे ओझं असतंच.

पुस्तकांची खोली आणि खोलीभरून पुस्तकं >> स्वप्न आहेच. एक मोठं कपाटभर पुस्तकं असली तरी वाचायचा एक शांत कोपरा तयार करायला हवा घरी.

आमच्या घरी लेकीच्या पुस्तकांसाठी (आणि खेळण्यांसाठी) खास शेल्फ बनवून घेतलं आहे.

यात ती तिची पुस्तकं सिरीज (उदा. टिनटिन कॉमिक्स, अ‍ॅस्टेरिक्स , ए टू झेड मिस्टरीज वगैरे), सर्वसाधारण गोष्टींची पुस्तकं, आर्ट क्राफ्ट रिलेटेड, नॉलेज बुक्स, कोडी- जोक्स वगैर अशी पुस्तकं एकत्र करून ठेवते. विकत घेतलेली पण अजून न वाचलेली पुस्तकं एका वेगळ्या शेल्फमध्ये आहेत. काही पुस्तकं जी तिला अतिशयच आवडतात ती वगळता बाकीची पुस्तकं दर काही महिन्यांनी सॉर्ट् करून बाहेर निघतात. मग ती पुढे काही वाटांनी जातात.

माझी पुस्तकं एका चेस्ट ऑफ ड्रॉवर मध्ये , एका शेल्फमध्ये आणि बेडसाईड टेबल्समध्ये आहेत.

पुस्तकं उभी ठेवल्याने त्यांच्या स्पाईनवर लिहिलेल्या नावांमुळे ओळखण्यास आणि काढण्यास सोपं पडतं हा अनुभव आहे.

कव्हरं घालत नाही. आवडतही नाही. हार्डबाउंड पुस्तकांना जॅकेट असेल पुस्तक वाचून होईपर्यंत ते काढून ठेवते. अति हाताळण्यानं ते फाटण्याचा संभव असतो. हे असं जॅकेट का घालत असतील? कोणाला यामागचं कारण / लॉजिक माहित असेल तर सांगा.

मामी शेल्फ प्रचंड क्युट आहे.
मला पण लहान असताना असं मिळालं असतं तर........ <स्वप्नात मग्न मोड>

>> हार्डबाउंड पुस्तकांना जॅकेट >> मला पण हाच प्रश्न आहे. कशासाठी असतं हे?

मामी, मस्त आहे शेल्फ.

सिंड्रेला, मराठी पुस्तके , विशेषतः कवितासंग्रह उभे ठेवले तर जागा पुरत नाही. कपाटातले कोणतेही पुस्तक शोधायला दोन मिनिटांच्या वर वेळ लागत नाही.(काढलेले पुस्तक जागेवर लावायला जास्त वेळ लागतो.)

जवळजवळ ५०+ पुस्तके होती, कॉलेजच्या वाचनालयाला दिली. सध्या डीव्हीडीवर १०००+ पुस्तके आहेत. पुढे भारतात आल्यावर खास वाचनखोली बनवायचा विचार आहे. पण कितपत जमेल शंकाच आहे. पुस्तकांना आधी जाड कागदाचे आणि नंतर टाईम्सच्या ग्लेझ्ड कागदाचे कव्हर्स लावुन त्यावर पुस्तकाचे नाव (अगदी बाहेरुन दिसेल अश्याही नावाच्या स्ट्रिप्स) चिकटवल्या होत्या.

१. पुस्तकं उभी ठेवत नाही,

१. पुस्तकं उभी ठेवत नाही, एकावर एक आडवी ठेवते.
२. एक्सेलमध्ये त्यांची सविस्तर नोंद ठेवते - पुस्तकाचं नाव, लेखक, प्रकाशक, प्रकाशन वर्ष, किंमत, कधी विकत घेतलं आणि शेवटचं कधी वाचलं ते. त्यावरुन कोणत पुस्तकं जास्त वाचलं जातं (आणि म्हणून संग्रहात ठेवलं पाहिजे) आणि कोणतं काढून टाकायचं त्याचा अंदाज येत राहतो.
३. पुस्तकांना कव्हर लगेच घालते. कव्हरवर पुस्तकाचा क्रमांक, नाव आणि लेखक लिहिते.
४. पुस्तकं क्रमानुसार (एकावर एक ) ठेवते. प्रत्येक विभाग २५ पुस्तकांचा. एखादं पुस्तकं पाहिजे असल्यास एक्सेलमध्ये त्याचा नंबर पाहते आणि नेमक्या ठिकाणी ते पुस्तकं मिळतंच - ९९.९९ टक्के वेळा!
५. पुस्तकांच कपाट बाहेरच्या खोलीत न करता झोपायच्या खोलीत आहे. त्यामुळे उगाच 'दिसलं पुस्तक म्हणून मागा' अशा लोकांचा त्रास होत नाही. आणि ज्या मित्र -मैत्रिणींना पुस्तकं हवी आहेत त्यांना आपल्याला देता येतात.
६. एक्सेल यादीमुळे पुस्तकं लेखक /विषय अशा पद्धतीने शोधता येतात. म्हणजे 'गीता' असा शब्द 'शोधा'त दिला की गीतेवरची माझ्या संग्रहात असलेली सगळी पुस्तकं हायलाईट होतात आणि त्यातनं पाहिजे ते निवडता येतं
७. वर्षातून किमान एकदा सगळी पुस्तकं काढून पाहते. कव्हर बदलणं, नको असलेलं पुस्तक संग्रहातून काढून टाकणं (काही वेळा खराब झाल्याने, काही वेळा त्यातला रस संपल्याने, काही वेळा त्याच विषयावरचं अधिक चांगलं पुस्तक मिळाल्याने ...) हे काम करतेच. त्यामुळे पुस्तकं चांगली राहतात आणि माझ्या संग्रहाबद्दल माझं ज्ञानही ताजंतवानं राहतं Happy
८. कुणाला पुस्तक वाचायला दिलं की त्याची नोंदही एक्सेलमध्ये करते. त्यामुळे पुस्तकं आठवणीने परत मागायला सोपं जातं (बहुतेक पुस्तकं परत येतात असा अनुभव आहे कारण आम्ही एकमेकांना पुस्तकं देत-घेत राहतो.)
९. पुस्तकांवर प्रेम असलं तरी एखादं पुस्तक परत नाही आलं तर त्याचा जीवाला त्रास करुन घेत नाही. तसंही एखादं अगदी आवडलेलं पुस्तकही आपण आयुष्यात कितीदा वाचतो? नवीन घेणं - हा तर पर्याय असतोच.
१०. बरेच महिने सलग मी घराबाहेर असते (दुस-या शहरात) तेव्हा दर घरभेटीत मोजकी पुस्तकं सोबत घेउन जाते. उरलेली व्यवस्थित झाकून ठेवते - वर्तमानपत्रं आणि पातळ चादरी/ओढणीने!

मस्त धागा. वाचते आहे. 'अकारविल्हे' हा शब्द कैक दिवसांनी वाचनात आला. Happy
सगळे फोटो एकसे एक आहेत. दारं नसलेलं पुस्तकाचं कपाट ... :(... त्याची स्वच्छता कशी राखता??
मामे, ती कडेची घसरगुंडी वर चढून पुस्तकं काढण्यासाठी का?

सगळे फोटो एकसे एक आहेत. दारं नसलेलं पुस्तकाचं कपाट ... अरेरे... त्याची स्वच्छता कशी राखता?? >>> दर १०-१५ दिवसांनी धूळ झटकायची.

मामे, ती कडेची घसरगुंडी वर चढून पुस्तकं काढण्यासाठी का? >>> डावीकडची शिडी चढण्यासाठी. पुस्तकं घेऊन घसरगुंडी वरून खाली यायचं. Happy

आधीच्या घरात एक वेगळं डिझाईन करून घेतलं होतं. पण यात कमी पुस्तकांची सोय होती.

@ नंदिनी,
तुमच्याकडे फिक्शनची पुस्तके आहेत हे वाचुन आनंद झाला पण तुम्ही पुस्तके मागणार्‍याला नाही म्हणता.
मग माझा वाढदिवस १८ एप्रिलला असतो. :)) .
धन्यवाद.

मस्त धागा.
मी पण पुस्तके उभीच ठेवते. दादर च्या आयडीअल मधे ट्रान्सपरन्ट कव्हर्स मिळतात, ती खरच आणा. ८०% पुस्तकांना होतातच, फ्लेक्सिबल आहेत आणि पुस्तके छान ही दिसतात.
सध्या मी नविन आयडीया शोधली आहे. पेपर बॅग्स मधे मी दोन्/तीन पुस्तके उभी ठेवते. त्यामुळे मागच्या बाजूला धूळ बसत नाही. त्यासाठी हिमालया मधे मिळणार्या पेपर बॅग्स पर्फेक्ट आहेत. उद्या फोटो टाकते.

मामी, कपाट मस्त आहे, घरी आलेल्या मुलांना पण खुप मजा येत असेल..
प्रत्येकजण पुस्तकांचा किती विचार करतो, सोय पहातो आणि आपापल्या परीने कशी काळजी घेतो हेसुद्धा वाचण्यासारखं आहे.

अतिशय मस्त & उपयुक्त धागा. माझे सध्याचे कपाट ओसंडून वाहत असल्याने नवीन करयचे असा ह्या वर्षीच बेत आहे. त्यावेळी खूप मदत होईल .
१.आमच्याकडे माझी मराठी पुस्तके & पीसी चे एक कपाट कम टेबल आहे.हे बेडरूमच्या कॉमन लोउंज मध्ये आहे.
२. लेकीला तिची पुस्तके प्राणप्रिय असल्याने ती तिच्या रूममध्येच असतात.
३. टेकनिकल & काम संदर्भातील पुस्तकांसाठी ऑफिस मध्ये एक कपाट. हि फक्त आमच्या रेफ साठी असतात.
४. ऑफिस मधील कॉमन वापरासाठी वेगळे कपाट
५. लेकासाठी पण त्याच्या रुम मध्ये एक कपाट.
६. सध्या वाचायचच (कामासाठी) आहे अशी & अवांतर वाचनाची & लायब्ररी मधून आणलेली अशी पुस्तके हाताला लागतील अशी कुठेही असतात.

सगळी कपाटे काचेची दार असलेली. मला पुस्तके दिसली की आवडते. पण दार मस्ट.

पुस्तकांचं कपाट बंद असेल तर त्यात वेखंडाच्या मुळ्या लहान तुकडे करुन अधे मधे टाकून ठेवाव्या. अजिबात काही कसर, वाळवी फिरकत नाही. हा सल्ला अरुण टिकेकरांचा. - हे करून पाहते

दादर च्या आयडीअल मधे ट्रान्सपरन्ट कव्हर्स मिळतात, ती खरच आणा. ८०% पुस्तकांना होतातच, फ्लेक्सिबल आहेत आणि पुस्तके छान ही दिसतात. - नक्की कशी म्हणजे शोधणे शक्य होईल मला माझ्या इथे
अतिवास - मलापण पुस्तके आडवी ठेवायचा मोह होतो. पण उभी जास्त छान दिसतात म्हणून ठेवत नव्हते.आता तशी ठेवून बघेन. हे एक्सेलमध्ये त्यांची सविस्तर नोंद चे काम केले पाहिजे

माझे एक स्वप्न आहे. एक मोठी खोली.एक भिंत मोठ्या काचेच्या खिडक्या. एक भिंत पुस्तकांचे कपाट. एक भिंत डीव्हीडी चे कपाट.एक भिंत मोठा LCD TV. मस्त Bose che स्पीकर. एक Tab , खाली कार्पेट. रुमभर खुर्च्या, Reclyners, Hammok, Resters. एक बेल मेड ला बोलवायला. फोन नाही. आणि भरपूर सारा मोकळा वेळ.

अनेकानेक धन्यवाद सर्वांचे... बरंच नवीन काही समजतंय, शिकायला मिळतंय
आता बर्‍याच कल्पना मिळाल्या / मिळत आहेत.

भरत आणि मामी यांच्यासारख्या बिनदाराच्या खणांमुळे आपल्याला हवे ते पुस्तक चटकन मिळण्याबरोबरच आपल्या अनुपस्थितित कुणालाही पुस्तकं हाताळता येणे, परत जागेवर न जाणे, गहाळ झालेली चटकन लक्षात न येणे इत्यादी प्रकार होण्याची भिती वाटते.

नंदिनी - धान्य साठवायच्या कोठ्या म्हणजे चौकोनी लाकडी का? फोटो टाकणार का?

मामी आणि सामी, वर उल्लेखलेल्या फोटोंच्या प्रतिक्षेत

परत एकदा धन्यवाद Happy

नंदिनी - धान्य साठवायच्या कोठ्या म्हणजे चौकोनी लाकडी का? फोटो टाकणार का?<>> नाही. चौकोनी, मेटलच्या. त्याच कोठ्या एकाला एक जोडून त्यावर पातळ गादी बनवून घेतली आहे. पाहुण्यांना बसण्यासाठी अथवा सुनिधीची खेळणी वगौइरे ठेवण्यासाठी वापरता येते. फोटो आज उद्या टाकेन.

आमचे विंचवाचे बिर्हाड असल्याने सध्या ही सोय केलेली आहे.

फोटो मोबाईल वर काढ्ल्यामुळे स्पष्ट नाहीत.
१. पुस्तकांचे पुर्ण कपाट. मागच्या बाजूला आरसा आहे. पुस्तके जरा अस्ताव्यस्त आहेत. Happy
00.jpg

२. पेपर बॅग्स चा उपयोग पुस्तके ठेवण्यासाठी
01_3.jpg03_1.jpg

पुस्तकप्रेमींसाठी काही टिप्स …

१. पुस्तकांना कव्हर घालण्यासाठी बाजारात मिळणारा 'स्टीकर पेपर' वापरल्यास पुस्तके सुंदर दिसतात व खराब होत नाहीत. स्टीकर पेपर म्हणजे एक पारदर्शक व एक पांढरा असे दोन कागद एकमेकांना चिटकलेले असतात, पैकी पांढरा कागद सोलून काढून पारदर्शक व चिकट कागद कव्हरसाठी वापरावा. कव्हर चिकटवतना सुरकुत्या पडणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी. सवयीने जमते! २२" X २८" आकाराच्या एका कागदाचे चार भाग कापून चार कव्हर्स म्हणजे वेष्टने होतात. एक कागद दहा रुपयांना मिळतो. वेष्टन फारच सुंदर दिसते व बरेच टिकते.( हे वाक्य "हा पदार्थ उपवासाला देखील चालतो अशा स्टाईल मध्ये !")
एकदा वाचलेले पुस्तक विसरायला होते. म्हणून एक प्रकरण वाचून झाल्यावर त्यातील सारांशपर दोन ओळी एका "Post-It " नोटवर लिहून तेथेच चिकटवल्यास पुन्हा पटकन लक्ष्यात येते व पुस्तक खराब होत नाही.

२. पेपर पुस्तके वाचण्यापेक्षा किंडलवर पुस्तके खरेदी करून वाचणे फार उत्तम. हि पुस्तके वाचून दाखविणारी 'ॲपस' उपलब्ध आहेत. उदा. "vBookz PDF Voice Reader". Acrobat Reader देखील फाईल मोठ्याने वाचून दाखवू शकतो. अर्थात ' ऑडिओ-बुक्स' वापरणे फारच चांगला पर्याय आहे. डोळ्यांना ताण देखील येत नाही हा बोनस !

३. web-library चे सभासद होवून महिना ४० डॉलर्स मध्ये अक्षरशः हजारो ebooks आणि ऑडिओ-बुक्स आपण डाउनलोड करू शकता.
उदा. www.onlinebooks.com वर लॉग करून पुस्तके सभासद न होता ही पाहू शकता. आपण आश्चर्य चकित व्हाल याची खात्री!

आपल्या वेळेसाठी आभार!

मस्त धागा! मी पुस्तकांना transparent plastic covers घालते. थोडे किचकट काम आहे पण पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ झाकलेले आवडत नाही.सुरेशजींनी सांगितल्याप्रमाणे पुढच्या वेळी स्टीकर पेपर वापरून बघेन. पुस्तकं लेखकांच्या नावाने लावते. म्हणजे सर्व पुलं, गोनीदा, J.K. Rowling वै.
खूप उपयोगी माहिती मिळत आहे!
उदा. www.onlinebooks.com वर लॉग करून पुस्तके सभासद न होता ही पाहू शकता.>> लिंक वर गेल्यास काहीच दिसत नाहीये!

Jigyasa,

उदा. www.onlinebooks.com वर लॉग करून पुस्तके सभासद न होता ही पाहू शकता.>> लिंक वर गेल्यास काहीच दिसत नाहीये!>>पहा www.webbooksmanager.com. This is the main Java site ! Good Luck, jigyasajee!

Bookshelf.jpg

हे आपले एक मल्टीपरपज वॉल युनिट आहे. सद्या माझी पुस्तके इथे ठेवलेली आहेत. नाव दिसावे अशी व्यवस्था केली आहे. डावीकडून उजवीकडे विषयवार क्रम लावलेला आहे.

लेकांच्या आणि बायकोच्या पुस्तकांची काळजी त्यांचे ते घेतात. काय वाचायचे ह्याच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असल्याकारणाने कुटुंबियांच्या पुस्तकांचा मुद्दाम वेगळा उल्लेख करत आहे.

Pages