अन्या - ७

Submitted by बेफ़िकीर on 10 December, 2013 - 05:47

पतंग उडेपर्यंतच प्रश्न असतो. एकदा तो वार्‍यावर उडाला की आणखी वर जाणे हे त्या उंचीनेच शक्य होते.

सफाई अभियानामुळे लाभलेल्या उंचीचा फायदा असा झाला की पुढील भरारी सुलभ झाली. अन्याला पाटलांच्या घरी पूजेसाठी जावे तर लागले नाहीच, उलट पाटील आपल्या कुटुंबियांसकट अवलिया बाबांच्या झोपडीसमोर हजर झाले आणि भक्तीभावाने त्यांना अभिषेक घालून गेले.

तावडे पाटील! वय पंचावन्नच्या आसपास! राजकारणात मुरलेला गडी! त्याने हेरलेले होते. आत्ता जनमानसाविरुद्ध अवलिया बाबाला आपल्याच वाड्यात आणण्याचा प्रश्न प्रतिष्ठेचा करणे योग्य होणार नाही. आपणही सगळ्यांप्रमाणेच व सगळ्यांइतकेच श्रद्धाळू आहोत हे दाखवण्याची ही सुसंधी आहे. सर्वांच्या मनातील मूक विनंतीचा मान ठेवून पाटलांनी बाबांच्या झोपडीतच अभिषेक घडवून आणला आणि अश्याप्रकारे तालुक्यातील प्रमुख गावातील दोन शक्ती एकमेकांना सामीलच झाल्या जणू!

राजकारण्यांचे डोके काळाच्या कित्येक पावले पुढे चालते म्हणूनच ते राजकारण करू शकतात. येणार्‍या क्षणाला जमेल तसे स्वीकारायचे हा पिंड असलेल्यांना राजकारण जमत नाही. अन्या तर अजुन पोरगाच होता, पण पवार आणि इग्या ह्यांनाही दुनियादारी ठाऊक नव्हती. तावडे पाटील झोपडीत येणे आणि त्याच्या लेकी सुनांनी अवलियाबाबांबरोबरच आपल्याहीसमोर नतमस्तक होणे ही त्यांच्यासाठी यशाची परमावधी होती. यापेक्षा अधिक काही त्यांनी स्वतःही अपेक्षिलेले नसावे.

मात्र इगो दुखावला गेलेला तावडे पाटील थंड डोक्याने खेळ्या करणार होता. आज ह्या पोरगेल्याश्या बाबाचे नाणे चलतीत आहे, आज त्याला हाताशी ठेवणेच योग्य आहे, पुढचे पुढे बघू हा धूर्त विचार त्याने केलेला होता. लोकांना वाटले की भावनेच्या व भक्तीच्या भरात पाटलाने अवलियाबाबांसाठी एक वेगळी, स्वच्छ, देखणी जागा देऊ केली व तेथे लहानसे मंदिर कम आश्रम बांधण्याचेही ठरवले. पण असे करून पवार, इग्या आणि अवलियाबाबा हे कायम आपल्या बाजूने राहणार हे पाटलाने ताडलेले होते. तावडे पाटील येत्या दोन वर्षात आमदारकीला उभा राहणार होता. या दोन वर्षांत अवलिया बाबाला अधिकाधिक लोकप्रिय करत राहणे आणि त्याला आपल्या पंखाखाली ठेवूनही आपणच त्याच्या पायाशी आहोत असे भासवत राहणे हे तावडे पाटलाचे नियोजन होते. त्याचे हे नियोजन इतके गुप्त होते की पाटलीणबाईंनाही समजले नसते. आपला नवरा अचानकच धार्मिक झाल्याचे पाहून गहिवरून आलेल्या पाटलीणबाईंनी अवलियाबाबांवर श्रद्धेची उधळणच सुरू केली. या लहानश्या वयाच्या बाबामुळे आपला नवरा देवाधर्माकडे वळू शकेल हेच त्यांच्यासाठी खूप होते. आजवर घरात मद्य आणि मांस व्हायचे ते ह्यायोगे बंद पडलेले होते. तावडे पाटील आता हे सगळे स्वतःच्या शेतातल्या घरी जाऊन करू लागला होता.

इकडे गावकरी संभ्रमात पडले होते. कालकालपर्यंत आपल्या आवाक्यात असलेला अवलिया बाबा अचानकच अप्राप्य होऊ लागला होता. आजवर कोणीही सोम्यागोम्या एक नारळ किंवा दोन रुपयांचे नाणे पुढे करून बाबांच्या पायांवर कोसळू शकत असे. आता नखरेच अमाप झाले होते. बाबांचे निद्रेतून उठणे, प्रातर्विधी, स्नान, फलाहार, जप, प्रार्थना, आरती हे सगळे मंदिराच्या आत बंदिस्त वातावरणात होऊ लागले होते. दर्शनासाठी बाबा एकदम सकाळी अकरा वाजता यायचे ते बारापर्यंत बसून पुन्हा आत जायचे. त्यानंतर दर्शन फक्त पवार आणि इग्याचेच व्हायचे. अवलियाबाबा अधिकाधिक दुर्मीळ होणे यात अवलियाबाबा अधिकाधिक महान होण्याची किल्ली होती. तावडे पाटलाने पवार आणि इग्याला एक दिवस जवळ बसवून सगळे काही नीट समजावलेले होते आणि त्याचप्रमाणे अवलिया बाबा ह्या उत्सवमूर्तीची दिनचर्या आता झालेली होती. अचानक अवलिया बाबा कधी स्त्रीवेषात दर्शन देत तर कधी नग्नावस्थेत, कधी डोक्यावर मुकुट असे तर कधी कृष्णाप्रमाणे हातात बासरी असे! गावकरी संभ्रमात पडण्याचे कारण हे होते की गेल्या कित्येक दिवसांत या बाबांमुळे कोणाचेच काहीच भले झालेले नसताना या बाबांचे प्रस्थ तर वाढतच आहे, मग नेमका आपल्याला ह्या बाबांपासून फायदा तरी काय? गावकर्‍यांना हवे होते गुप्त धन, रोगापासून मुक्तता, नोकरी, पीकपाणी, व्यवसाय, अन्न, घर, शहरात स्थलांतर! पण बाबांचे तर स्वतःचेच सगळे फावताना दिसत होते. पूर्वीसारखे आता जपजाप्य, नामःस्मरण करू म्हणावे तर पवार आणि इग्या ह्यांच्याचसमोर बसून करावे लागत होते. नाही म्हणायला मंदिरात एक सुबक मूर्ती तेवढी होती दत्ताची!

तरी प्रसाद, नैवेद्य, आरत्या, जप या सर्वांमुळे एक किमान पवित्र वातावरण तरी नक्कीच निर्माण होत होते तेथे! आज अवलिया बाबा या तालुक्यात उगवून आठ महिने झाले होते. अन्याचे आई बाप त्याला शोधायला एकदाही येऊन गेले नाहीत. इतकेच काय तर दुबेकडून जसे गावाकडे हे कळले की ते चोरटे पोर मोठा महाराज होऊ लागलंय तरी पब्लिकला घेणे न देणे! उलट चारदोन टाळकी येऊन नमस्कारच करून गेली.

पतंगाला उंची मिळालेली होती. राहण्यास तीन खोल्या, एक मंदिर, एक भक्तांना मार्गदर्शन करण्यासाठी मंडप इतका जामानिमा, त्यात पुन्हा भक्तांची ऊठबस, पावित्र्य, दत्ताचे स्थान, आरत्या, जयघोष हे पाहून कोणाची जीभ उचलेना हे म्हणायला की हा भोंदू अन्या आहे. ह्याचे खायचे वांधे होते गेल्या वर्षीपर्यंत! ह्याला लाथा घाला आणि अटक करा! उलट लोक 'आपले काही चुकू नये' या विचाराने त्या आश्रमाला हातभारच लावून जात होते.

तावडे पाटलाकडे मसलतीसाठी, शिकारीसाठी किंवा कोणत्याही निमित्ताने येणारी तालेवार मंडळी न चुकता बाबांचे दर्शन घेऊन जायची. अवलिया बाबा ही जणू आता तावडे पाटलाची खासगीच मालमत्ता झाल्यासारखी होती. तावडे पाटलाची बायको तर दिवसातून तीन चकरा मारायची. अवलिया बाबांचे फोटो आता आश्रमाबाहेर विकण्यास ठेवण्यात येऊ लागले. अधूनमधून स्वच्छता अभियान, लहान मुलांना अन्नवाटप, मोफत शिक्षण, संस्कार वर्ग, महिलांसाठी खास यात्रा असले उपक्रम केले जात होते. एकंदरीत फारच हॅपनिंग प्लेस झाली होती ती!

आणि अन्या? अन्या फुगू लागला होता. रोजचे दणकून खाणे आणि बसून राहणे! निव्वळ आठ महिन्यात लुकड्याचा बाळसेदार आणि बाळसेदाराचा गबदूल असा त्याचा प्रवास झालेला होता. त्यात मागच्या दाराने पवार आणत असलेले बांगडे आणि पापलेटं होतीच. बिडी ओढायला शिकला होता. आठवड्यातून दोनदा रात्री सोमरस प्राशू लागला होता.

पवार आणि इग्याची मनमानी सुरू झाली होती. आलेल्यांच्या रांगा काय लावायचे, डाफरायचे काय, पैसे काय काढायचे! काहीही! आता तेही कोपायचे वगैरे! इग्याने तर एकदा स्वतःचीच पूजा करून घेतली होती. पवारचे अजुन तितके साहस होत नव्हते. खाऊन पिऊन तब्येत कमावलेले पवार आणि इग्या आता चांगले गरगरीत झालेले होते. अंगात रग आली होती. चेहर्‍यावर आधीचे सात्विक भाव लोपून त्या जागी आता अधिकाराचे आणि दुराभिमानी भाव आलेले होते. तोंडात मात्र अव्याहत जय गोरक्षनाथ किंवा गोरखनाथ हे नाम असायचे. स्वतःचे स्थान जपण्यासाठी अवलिया बाबांचे स्थान त्यांनी केव्हाच पूजनीय करून टाकलेले होते.

पण गावाला हवे होते चमत्कार! धूर्त इग्या आणि महाधूर्त तावडे पाटील ह्यांनी घेतलेल्या चौघांच्या गुप्त मीटिंगमध्ये हेच ठरलेले होते. लवकरच गावाला चमत्कार दाखवायचा. पूर्ण योजना आखली गेली. शहरातून एक संधिवात बराच नियंत्रणात आलेला रुग्ण आश्रमासमोर आणण्यात आला. येताना तो अगदी खुर्चीवर बसवून चौघांनी उचलून आणण्यात आला. हे झाले काहीच दिवसांपूर्वी! गर्दी तुडुंब झालेली असताना सगळ्यात मागे यनपुरे नावाचा एक पोक्तवयीन गृहस्थ सगळ्यात मागे खुर्चीवर बसून विनम्र भावाने हात जोडून प्रार्थना करत होता. पवार आणि इग्या भक्तांवर नियंत्रण ठेवत रांग मॅनेज करत होते. अनवाणी आलेले आणि उन्हात खोळंबलेले भक्त दत्ताच्या मूर्तीसमोर कोसळून काहीबाही ठेवून जात होते. अवलिया बाबा गेले सहा दिवस बाहेर आलेलेच नव्हते. आणि अचानक आतल्या दारापाशी जोरजोरात आवाज झाले. पवार आणि इग्या आतल्या दिशेला धावले. ध्यानीमनी नसताना दारात अवलियाबाबा नग्नावस्थेत उभे असलेले दिसले. अवघ्या अंगावर भस्म लावल्यामुळे बैराग्यासारखे दिसणारे ते अवलियाबाबा हे अवलियाबाबाच आहेत हेही कळायला गावकर्‍यांना दोन चार क्षण लागले. तोवर पवार आणि इग्या बाबांच्या पायांवर कोसळलेले होते. दोघांनाही लाथेने तुडवत आणि हातातील काठी उगारत अवलिया बाबा संतप्त चेहरा करून गर्दीत घुसले. ह्या असल्या अवतारातील बाबांचे दर्शन घ्यायला पुढे होण्याची कोणाची हिम्मत होईना! गर्दीने पटापटा मागे मागे सरकत बाबांना वाट करून दिली. ताडताड ढांगा टाकत चालत बाबा आश्रमाच्या बाहेर आले आणि समोरच खुर्चीवर भक्तीभावाने बसलेल्या यनपुरेच्या खुर्चीवर काठीचा एकच तडाखा हाणला. चुकून काठीच मोडली तसे मग बाबा लाथा घालू लागले खुर्चीला! यनपुरेला समजले की ही खुर्ची काही मोडत नाही आहे. तसा मग तोच कोलमडल्यासारखा झाला आणि भुईसपाट झाला. आता खुर्ची एकीकडे आणि यनपुरे एकीकडे अशी अवस्था झाली तसे मग बाबांनी यनपुरेच्या पाठीत मोजून सहा लाथा घातल्या. लत्ताप्रहारांनी ओरडायच्या ऐवजी यनपुरे आनंदाने हासून जय गोरखनाथ म्हणत होता. स्तिमित झालेले गावकरी तो प्रकार बघत होते. अचानक अवलिया बाबांनी वाक्य फेकले.

"आम्हास भेटाया खुर्चीवं बसून येतूस? लाजलजा न्हाय तुला? र्‍हा उबा??????"

आणि चमत्कार घडला. एक पाऊल टाकता येत नसलेला यनपुरे कोणाच्याही आधाराविना उभा राहिला आणि त्याचक्षणी ओरडून म्हणाला......

"संधीवात?? संधीवात ग्येला?? आँ? मी उभा र्‍हायलो! जय गोरखनाथ"

अवलिया बाबांच्या पायावर तो यनपुरेही कोसळला. तसा प्रसाद म्हणून बाबांनी हातातील काठीचा एक अलगद प्रहार त्याच्या पाठीवर केला आणि म्हणाले......

"ह्यापुडं आमच्याकं दर वर्षी सवताच्या पायांनी याचं! ग्येला तुझा रोग"

तसेच उग्र चेहरा ठेवून ताडताड चालत अवलिया बाबा आपल्या कक्षात गुप्तही झाले.

गावकर्‍यांनी त्या क्षणीचा सर्वात मोठा भक्त ठरलेल्या यनपुरेलाच लोटांगणे घातली. यनपुरेचे आणि त्याला उचलून आणणार्‍यांचे भोजन आज तावडे पाटलांच्या घरी ठरले. यनपुरेने आपली कर्मकहाणी गावाला सांगितली. म्हणाला संधिवाताने उठता येईना की बसता येईना! चर वर्षे अशीच रखडून काढली. परवा स्वामींनी स्वप्नात येऊन सांगितले की आम्ही कोर्‍हेला तुझी वाट पाहतोय, लगेच ये. तसा इकडे आलो. स्वामींनी दिलेल्या लाथांच्या प्रसादाने रोग गेला. आता ह्या प्रकाराला काय म्हणावे?

गावकरी अवाक झालेले होते. बरं त्याला स्टँडपासूनच काय तर शहरात बसमध्ये बसल्यापासूनच अनेकांनी दुर्बल असलेले व परावलंबी असलेले पाहिलेले होते. आता तो चांगला उभा होता. फिरत होता. गेल्या सहा दिवसांत एकदाही न दिसलेले बाबा बरोब्बर योग्य त्याच भक्ताला स्वतःहून दर्शन द्यायला पुढे आलेले बघून तर गाव चकीतच झाले. हे म्हणजे गजानन महाराजांसारखेच चाललेले होते.

यनपुरेने तावडे पाटलांनी आधीच दिलेले सहा हजार रुपये आश्रमाच्या विकासासाठी देणगी म्हणून दिले. दुपारी भोजनानंतर यनपुरे शहराकडे निघून गेला तसे गाव पवार आणि इग्याकडे धावले. आता ज्यांना संधिवात नव्हता असेही त्या गर्दीत जमा झाले. जो तो आपापला आजार सांगू लागला. आणि धूर्त इग्याने सर्वांना उद्देशून जाहीर केले की खर्‍या भक्तासाठी महाराज स्वतःहून बाहेर येतात, त्यांना आम्ही पाचारण करू शकत नाही. फक्त भक्ती खरी असायला हवी.

पुढचे सहा दिवस तालुक्याला दुसरा विषय नव्हता. या कालावधीत अवलिया बाबा पाटलांकडच्यांनासुद्धा भेटला नाही. आतच बसून राहिला.

मुळातच बर्‍यापैकी बर्‍या असलेल्या माणसाला बरे केल्याचे श्रेय लाटून अवलिया बाबाने आपली उंची अधिकच वाढवली. तावडे पाटलाने मांजाला ढील दिली तसा अवलिया बाबाचा पतंग आणखी वर गेला. इग्या आणि पवार ह्यांनी बनलेला मांजा अधिकच धारदार झाला. काहीच दिवसात हा पतंग छाटाछाटी सुरू करणार होता. प्रश्न इतकाच होता, की हा पतंगही छाटला जाऊ शकतो ह्याची पतंगाला आणि मांजाला जाणीव होती की नव्हती!
====================

तालुक्यात स्वबळावर प्रवेशलेल्या अन्याला येऊन दिड वर्ष झालं आणि त्याचं प्रस्थ काहीच्या काहीच वाढलं! त्यातच इग्याच्या सुपीक डोक्यातून प्रकटदिन ही कल्पना निघाली. प्रकट दिन आहे असा गाजावाजा सुरू झाल्यावर वाटेल तिथून लोक यायला सुरुवात झाली. काही प्रमाणात पैश्यांचा ओघही सुरू झाला., एव्हाना शकुंतला जांभळेही बरी होऊन परतलेली होती. तिचा नवरा जांभळे शिक्षा भोगत असल्याने ती पूर्णवेळ ह्या आश्रमाबाहेरच एक खोली घेऊन राहात असे. दोडा आता मलूल झाला होता. बाबांना रात्री कोंबडं लागू शकतं कारण तसा त्यांच्याही महाराजांचा आदेश आहे असे सरळसोटपणे जाहीर करून टाकल्यामुळे अन्याला आता ऑफिशियली कोंबडी मिळू लागली. मधूनच पवार काही बातम्या आणत असे आणि त्याबरहुकूम महाराज आपना चमत्कार दाखवून सगळ्यांना अवाक करत असत. गावात तर दोन म्हातारे असे होते की त्यांना झालेले रोग बरे झालेले नसूनही ते आता अवलिया बाबांच्या कृपेने बरा झालो असे छातीठोकपणे सांगू लागले होते.

प्रकटदिनाच्या पहाटे तीन वाजताच बाबांचे स्नान उरकले आणि त्यांना भरजरी वस्त्रे चढवण्यात आली. अत्तराने देह माखला गेला. गळ्यात फुलांच्या माळा आल्या. डोक्यावर मुकुट आला. कपाळ गंधाने माखले. उदबत्यांनी गुदमरल्यासारखे होऊ लागले. बाहेर गर्दी केव्हाच जमू लागली होती. बराच मोठा थाट आणि गाजावाजा करून शेवटी एकदाचे अवलियाबाबा प्रकटले. त्यांचे ते रूप पाहून दर्शनाला झुंबड उडाली. लोकांनी वाट्टेल ते वाहायला सुरुवात केली. पैसे, नारळ, हार ह्यांचे ढीग जमा होऊ लागले. इग्या आणि पवारचे घसे ओरडून ओरडून बसले. खास व्यवस्था बघण्यासाठी ठेवलेली पाटलाच्या वाड्यावरची पोरे आता लायनी लावू लागली, खेकसू लागली. नाही नाही त्याला जोर चढला. कोणीही कोणावरही ओरडू लागले. बायकापुरुषांच्या लायनी वेगवेगळ्या झाल्या. कोणीतरी तर चक्क फोटोही काढले. लखलखाट झाला.

पहाटे अडीचलाच उठून बसल्यामुळे अन्याच्या डोळ्यांवर पेंग आलेली होती. काल रात्री खाल्लेली कोंबडी अजुनही पोटात गुरगुरत होती. शौचाला लागली होती पण जायची सोय राहिली नव्हती. एक बिडी मारावीशी वाटू लागली होती. कडक चहा प्यावासा वाटू लागला होता. कोप वगैरे झाल्याचे अ‍ॅक्टिंग करून आत जाऊन सगळे उरकून यावे की काय असे मनात येऊ लागले होते. पण जनतेचा रेटा हालूच देत नव्हता जागेवरून! बायाबापड्या आपल्या तान्ह्यालहान्यांना पायावर ठेवून जात होत्या. म्हातारीकोतारी विस्फारलेल्या नजरेने हात जोडून जात होती. त्यातच काही मुसलमान घुसले तशी काहींमध्ये चलबिचल झाली. पण लगेच इग्याने ओरडून सांगितले की अवलिया बाबा आधीपासूनच धर्म मानत नाहीत. कारण नसताना आश्रमाच्या आवारात हिंदूमुस्लिम भाईभाईची आरोळी ठोकली गेली. एकमेकांना मिठ्या मारल्या गेल्या. पुन्हा कॅमेर्‍यांचा लखलखाट झाला. इकडे अन्याच्या पोटाची अवस्था वाईट झालेली होती. अती उत्साहात असलेल्या पवारने त्यातच निष्कारण एक न ठरलेली घोषणा केली. अजुन अर्ध्या तासाने महाराजांना अभिषेक होईल. त्या सोहळ्यात गावकरी सहभागी होऊ शकतील. ही धावाधाव झाली. कोणी आपल्या घरचं टमरेल आणायला गेला तर कोणी पाणी गरम करून आणायला! गर्दी उसळतच होती. लांबून पाहणारी तावडे पाटलाची माणसे तावडे पाटलाला बातमी पोचवत होती की ही असली गर्दी जर इथे उसळणार असेल तर ह्या बाबालाच तिकीट द्यायची वेळ आणतील पक्षश्रेष्ठी! तावडे पाटील ही स्तुती समजून खदखदून हासत होता.

आश्रमाबाहेरच गोरगरिबांसाठी प्रसादाच्या जेवणाच्या पंगती बसलेल्या होत्या. कोणीही येऊन भात चिवडून चार घास खाऊन जात होते. बुंदी मात्र फटाफट संपत होती. पिकलेली, कशीशी दिसणारी केळी त्यातच मिसळून खाल्ली जात होती. पत्रावळींचे ढीग एकीकडे साचत होते. त्यावर कावळे घिरट्या घालत होते. कुत्रे आजूबाजूला आशाळभूतपणे हिंडत होते. एवढी गर्दी उसळू शकेल असा अंदाज असलेल्यांनी सकाळपासूनच स्टॉल्स थाटलेले होते. पिपाण्या, शेव चिवडा येथपासून ते खेळणी आणि कपडे ह्यातले काहीही विकले जात होते. तालुक्याच्या गावातील इतर कोणत्याही देवळाकडे आज एकही भक्त फिरकला नव्हता, पण एकही माणूस असा नव्हता जो ह्या उत्सवाला आलेला नव्हता. हा उत्सव कित्येकांसाठी श्रद्धा व्यक्त करण्याची तर त्याहून जास्त लोकांसाठी पर्वणी किंवा पैसे मिळवण्याची संधी होऊ पाहात होता. हे सगळे तटस्थ नजरेने पाहणारा अन्या आता दोन्ही हात पोटाखाली दाबू लागला तसे इग्याला जाणवले की काहीतरी घोळ आहे. घाईघाईत इग्याने घोषणा केली अभिषेकाआधी महाराज निसर्गावस्थेत येणार आहेत व त्यासाठी काही काळ ते कुटीत चाललेले आहेत. भक्तांनी आजवर अनेक जैन साधू पाहिलेले होते. ह्या महाराजांना तसल्या अवस्थेत पाहायला कोणालाच अडचण नव्हती.

कुटीत आल्याआल्या अन्याने अंगावरचे कपडे ओढून काढले आणि इग्याला उद्देशून शिवी हासडत म्हणाला

"भाडखाव, कवाचा खानाखुना करतूय आत यायचं म्हून, लक्षच न्हाय तुमचं भडव्यांचं"

इग्याने हात जोडले आणि स्वतः पेटवलेली बिडी अन्याच्या हातात देऊन अन्याला शौचालयाकडे पिटाळले. काही वेळाने अंगाला पूर्ण भस्म लावलेल्या नैसर्गीक अवस्थेत अन्या दारात उभा राहिला. पुन्हा एकवार जयघोष झाला. अभिषेकासाठी पवारने तयार करून घेतलेल्या एका चौरसाकृती जागेत अन्या बसला आणि वरून गुदमरेल इतके कोंबट पाणी अंगावर पडू लागले. काही असले तरी हे पाणी आत्ता सुखद वाटत होते. अन्याल प्रत्यक्ष धक्का बसू नये ह्यासाठी उभारण्यात आलेली मानवी यंत्रणा मात्र हां हां म्हणता कोसळली. ज्यांनी इतरांना अडवायचे होते त्यांनीच आधी स्वतः महाराजांवर पाणी घालण्याची घाई केल्यामुळे त्यांचे गर्दीकडे दुर्लक्ष झाले. या क्षणभरात ही माणसे गर्दीच्या रेट्यात दूर फेकली गेली आणि जो तो बाबांच्या अंगाशी झोंबू लागला. अन्याला आता मात्र ती गुदमर आणि घुसमट सहन होईनाशी झाली होती. आणि अचानक एका तरुण स्त्रीचे सर्वांग अन्याच्या शरीरावर रेटले गेले. कितीतरी वेळ ते तसेच राहिले. ती तरुणी अन्याकडे हबकलेल्या आणि घाबरलेल्या नजरेने तर अन्या तिच्याकडे मंत्रावलेल्या नजरेने पाहात राहिला. गर्दीच्या रेट्याने दोघेही मागेपुढे हालत राहिले. काही क्षणातच शरमलेली ती तरुणी बाजूला होऊ शकली आणि अन्याला जाणीव झाली की ह्या असल्या अभिषेकांचा हा एक फारच मोठा फायदा आढळत आहे. ती तरुणी लांब लांब जाता जाता अन्याकडे पाहून मंद हासत होती. कोणाच्या लक्षात येणार नाही अश्या पद्धतीने अन्याही गालातल्या गालात हासत होता. अन्याला मनात वाटत होते की ही आता परत कधी दिसणार! पण तितक्यातच त्याच्या टकुर्‍यात आले की आपण काही कोणी सामान्य नाही आहोत. त्यने ताबडतोब पवारकडे पाहिले. पवारने अन्या सुचवत असलेल्या दिशेला पाहिले. ती तरुणी गर्दीतून बाहेर पडत असतानाच पवारने तिला व तिच्या वडिलांना अडवले व सांगितले, तुमची जी अडचण आहे ती महाराज समक्ष ऐकणार असे म्हणत आहेत. तो माणूस वेडापिसा झाला. तरुणी हरखली. बरं आजवर महाराजांनी अनेकदा असे चमत्कार केल्याचे त्यांना माहीत होते की जो खरा भक्त असतो त्याला महाराज बरोबर ओळखून स्वतःच अ‍ॅप्रोच होतात. तो माणूस वाट्टेल तितका वेळ थांबायला तयार झाला. पवारने त्यांना त्या दिवशी तेथेच राहण्याची अध्यात्मिक आज्ञा केली व त्यांना ती ऐकावी लागली. आता ते लांब झाडाखाली बसून स्वतःचे फळफळलेले भाग्य पुन्हा पुन्हा स्मरू लागले. इकडे अन्याचे लक्ष एका वेगळ्याच घटनेने वेधून घेतलेले होते. दुसर्‍या एका दिशेला लांब एका उघड्या जीपमध्ये तीनचारजण असे होते जे फोटोही काढत होते आणि एकमेकांचे लक्ष वेधून घेऊन वेगवेगळ्या गोष्टींचे फोटो काढत होते. अन्याला तो प्रकार काहीसा संशयास्पद वाटला. ते भाविक नक्कीच नव्हते, त्यांचे पोषाखही भिन्न होते. अन्याने फारसे लक्ष दिले नाही, पण मनात मात्र ते नोंदवून घेतले.

मधेच एकदा अन्याला उलटा धरून नेणारा हवालदार सहकुटुंब येऊन पाया पडून गेला. लोकांच्या अंगात येऊ लागले. भर उन्हात लोक वाटेल तसे घुमू लागले. ते पाहून बावचळलेली कुत्री लांब लांब पळत भुंकू लागली. झाडाखाली बसलेल्या वडील व मुलीला पवारने प्रसादाचे भोजन पाठवले.

भोजनपश्चात अवलिया बाबा विश्राम करण्यासाठी कुटीत गेले. ताटकळणारे भक्त निराश झाले पण टिच्चून बसून राहिले. सायंकाळी पाच वाजता पीतांबर नेसवलेले महाराज कुटीबाहेर येते झाले. आणि नेमके त्याचवेळी तावडे पाटील, त्यांचे कुटुंबीय आणि काही इतर नातेवाईक दर्शनाला आले. ते पाहून भाविकांचे मनच भरले. पाटलीणबाईंनी मनसोक्त पूजा केल्यावर मग आरती, जप, नामस्मरण, प्रार्थना हे प्रकार झाले. चमत्कारापुढे जग नमते हे माहीत झाल्यामुळे आधीच ठरलेल्या दोघा तिघांना महाराजांनी काठीच्या प्रहारांनी ऑन द स्पॉट बरे केले. जयघोष दुमदुमला. आणि अचानक एक चमकदार डोळे असलेला, निर्भीड चेहर्‍याचा, मध्यम अंगकाठीचा इसम महाराजांसमोर चालत आला व म्हणाला......

"गेली आठ वर्षे पाठदुखी आहे, महाराजांनी उपाय करावा अशी प्रार्थना"

अन्याला वाटले हा इसम पवार किंवा इग्यानेच पेरलेला आहे. पवारला वाटले इग्याने आणि इग्याला वाटले पवारने! शहानिशाही न करता अन्याने हातातील काठी अलगदपणे त्या इसमाच्या पाठीवर मारली व विचारले......

"आता?"

तो इसम ताठ उभा राहिला व म्हणाला......

"नाही महाराज...... अजुन एकदा कृपया"

अन्याची नकार ऐकायची व पचवायची सवय गेल्या दिड वर्षात नामशेष झालेली होती. त्याने किंचित रागानेच दोन फटके पाठीत घातले व सर्वांकडे बघत जोरात म्हणाला......

"भक्ती पुरती खरी नसंन् तं ज्यादाचे उपाय कराव्ये लागत्यात... त्येच ह्याचं झालंन्"

मात्र महाराजांना न घाबरता तो इसम पुन्हा ताठ उभा राहिला आणि म्हणाला......

"मला अजिबात बरे वाटत नाही आहे महाराज, बहुधा तुमचा हा उपाय माझ्यावर चालेना बघा"

आत्ता कुठे अन्या, इग्या आणि पवारची ट्यूब पेटली. हा माणूस आपण कोणीच आणलेला नसून हा कोणी तिसराच आहे व आव्हान देण्याच्या मनस्थितीत आलेला आहे हे त्यांना जाणवले. काहीतरी अतिशय प्रभावी असे अक्षरशः क्षणार्धात करायची वेळ आलेली होती. इतर वेळी अफलातून डोके चालवणार्‍या पवार आणि इग्याचे डोके अश्यावेळी कामच द्यायचे नाही. अश्यावेळी लागायचे अन्याचे स्वतःचेच डोके! अन्याने डोके चालवलेच! म्हणाला......

"वाक पुन्ना"

तो माणूस पुन्हा कंबरेत वाकला. अन्याने मागेपुढे न बघता एक सणसणीत तडाखा त्याच्या पाठीत हाणला तसा खच्चून ओरडत तो माणूस मातीत पडला. त्याचे सहकारी धावत आले व त्यांनी अन्याकडे रागाने बघत त्या माणसाला उचलले व लांबवर नेऊन जीपमध्ये बसवले. जीप सुरू करून निघून जाताना त्यातील एक जण ओरडून लांबूनच म्हणाला......

"अरे तू कसला महाराज? तुझे बिंगच फोडतो आता"

जीप वेगात निघून गेली तसा संतप्त नजरेने अन्या ओरडला......

"जो खोटं म्हणंन् त्याला इंगा मिळंन्"

गर्दीने भावुकतेने व भयाने हात जोडले तसा अन्या आत निघून गेला.

बर्‍याच वेळाने तिघे आत जमले आणि अन्याने दोघांना भोसडले. प्रथमच पवार आणि इग्याने अन्याचे इतके बोलणे ऐकून घेतले असेल. अन्याच्या तोंडच्या शिव्या ऐकून त्यांना स्वतःचे भाषादारिद्र्यही जाणवले. शेवटी अश्या प्रकारची माणसे येऊच देणार नाही अशी प्रतिज्ञा केल्यावर अन्याने त्यांना दोन घास खाऊ दिले. तेवढ्यात दारावर थाप पडली. दचकून तिघे एकमेकांकडे बघू लागले. इग्याने खर्जातल्या आवाजात विचारले......

"कोन? म्हाराज निद्रा घेत्यात......उद्याच्याला या"

बाहेरून आवाज आला नाही तसे तिघेही आणखीनच घाबरून बसले. पुन्हा दारावर थाप पडल्यावर इग्याने खवळून विचारले......

"आरं कोन्ने?????? आं??"

"आमी जी..... थांबाया सांगितलं व्हतं मला आन् प्वारीला"

तिघांची ट्यूब पेटली. पण आता झोपडीत तळलेल्या मच्छीचा वास पसरलेला होता. पवार खेकसला आतूनच.

"अर्ध्या तासानं म्हाराज याद करतील तवं थांबा भाईरच"

"व्हय जी"

तिघांनी ताव मारला. उदबत्त्या वगैरे लावून वातावरणातील अपवित्रता नष्ट केली. आणि मग दोघांना आत येऊ दिले. पेंगुळलेली ती मुलगी वचकून तिघांकडे बघत होती. तिचा बाप म्हणाला......

"म्हाराजांनी थांबवलंन् म्हून थांबलो व्हतो... काय सेवा?"

"अडचन काय हाय तुझी?" - अन्याने विचारले.

जगात अडचण नाही असा कोण माणूस आहे? माणसाचा जन्म म्हणजे सर्वात शेवटी मिळणारी सुटका येईपर्यंत असलेली तक्रारींची साखळी! भारावून जात तो माणूस म्हणाला......

"प्वारीला टाकलीय सासरच्यांनी... "

आता पोरीला सासरचे का टाकतात किंवा त्याची काय काय कारणे अशू शकतात ह्याचे किंचितही ज्ञान नसलेला अन्या गप्प बसला. पवारने विचारले...

"का?"

"मूल व्हईना म्हून"

पवार आणि इग्यामध्ये आँखमिचौली झाली. इग्याने अवलियाबाबांसमोर बसून हात जोडले आणि म्हणाला...

"म्हाराज, तुमचा भकत तुमी थांबाया सांगितलंन् म्हून थांबलाय. आता त्यावं किरपा तेवढी करा. प्वारीला मूल व्हईना."

तिला मूल होत नाही तर त्यात आपण काय करायचं असतं हे अन्याला कुठे माहीत होतं? त्याने विचारलं......

"मंग?"

"न्हाई आता रातचं ठिवून घ्या... सकाळच्याला भस्म द्या मंतरल्यालं... मंग जातील"

"चालतंय... जा गणं आतमदी"

अन्याने डायरेक्ट त्या मुलीला स्वतःच्या खोलीत जायचाच आदेश दिला. हे भलतंच झालं! तिच्या बापाला आता काही बोलताच येईना. नाही म्हणालो तर म्हाराजांचा अपमान झाला असे मानून अख्खं गांव आपल्याला बदडायचं! हो म्हणालो तर पोरीची खैर नाही. इकडे पवार आणि इग्या या दोघांची तिसरीच गोची झाली. खुद्द महाराजांच्याच खोलीत ती तरुणी गेली तर आपण काय करणार हे त्यांना समजेना! पण मांजराच्या गळ्यात घंता बांधणार कोण? अन्याने ऐनवेळी गोची केली होती सगळ्यांची! बापाकडे बघत बावरलेली ती तरुणी आतल्या खोलीत गेली. पवारने तिच्या बापाला उठवले आणि बाहेरचा मंडप दाखवून म्हणाला इथे पसरा पथारी! बापाच्या लक्षात सगळा मामला आलेला होता. बहुधा लवकरच आपली मुलगी गरोदर राहील व कश्यामुळे का होईना सासरी नांदू लागेल असे वाईटातून चांगले काढत तो बिचारा आडवा झाला.

इकडे ती मुलगी आत गेल्यावर अन्या घाईघाईत उठला आणि आत गेला. आतूनच स्वतःच्या खोलीचे दार लावून घेताना त्याने ना इग्याकडे पाहिले ना पवारकडे! हे दोघे एकमेकांकडे बघतच बसले. दोघांनाही मनातून हसू येत होते की हे पोरगं करणार काय आतमध्ये?

त्या पोरीच्याही लक्षात मामला आलेला होता. पण बाप बाहेरच आहे म्हंटल्यावर बापाची संमती आहे असेच मानावे लागत होते. आत्ता बोंब मारण्यात अर्थही नव्हता आणि एवढ्या मोठ्या महाराजांनी आपल्याला काही केले तर कदाचित आपले कल्याणच होईल असे काहीतरी विचित्र भावनांचे मिश्रण तिच्या मनात तयार झाले.

परिस्थिती अशी झाली की त्या मुलीची अब्रू जाणार हे तिचा बाप, पवार, इग्या आणि खुद्द ती मुलगी ह्या सर्वांना समजलेले होते आणि एक प्रकारे मान्यही झालेले होते, पण अब्रू घ्यायची म्हणजे करायचे काय हे अब्रू घेणार्‍यालाच माहीत नव्हते. ह्या असल्या विचित्र तिढ्यात अन्या त्या मुलीकडे पाहू लागला आणि घोर आश्चर्य...... त्या मुलीने स्वतःच स्वतःचा पदर सरकवला.

हातात आलेल्या सत्तेचा हा एक निराळाच लाभ अवलिया बाबांना आज समजला होता......

==================

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अन्या देवयानी खोब्रागडेन्च्या कामवालीला शोधायला गेलाय, कारण तिने अन्याला अमेरीकेला नेऊन नोकरी लावुन देण्याचे आश्वासन दिले होते, ते पाळले नाही. अन्याला खूप म्हणजे खूपच राग आलाय.:खोखो:

Light 1

अन्या वेशांतर करुन पळुन गेलाय त्या आसारामपुत्र नारायणसाईसारखे................................. मी शोध घेत आहे. सापडला तर कळविण ................

देवा! बेफिकीर आदी अन्त नसलेल्या मालीका बघण्या ऐवजी तुमच्या कथा पूर्ण करा. नाहीतर माबोकर नवीन वर्षाचा सन्कल्प करतील............................................................. तुमच्या कथा न वाचण्याचा.:खोखो:

Pages