पुण्याचा दुर्दैवी कायापालट

Submitted by बेफ़िकीर on 4 December, 2013 - 03:57

प्राथमिक शाळेमध्ये सकाळी साडे दहा वाजेपर्यंत पाटीवर पेन्सिलीने लिहिताना गारठलेल्या बोटांची पंचाईत होत असे. कानटोपी / माकडटोपी, स्वेटर, बूट मोजे याशिवाय सकाळी शाळेला निघणे अशक्य! कुठेही पाणी प्या, उत्तम चव आणि तृप्ततेची हमी! भरपूर झाडे, टेकड्या, पाऊस, शांतता, मैदाने वगैरे पुण्याची श्रीमंती असे!

इतर सर्व शहरांप्रमाणेच येथेही तांत्रिक विकास झाला व त्याचे सर्व फायदेतोटेही झाले. पण महाराष्ट्रातील इतर कित्येक शहरांच्या तुलनेत पुण्याचा विकास किंवा पुण्याचा कायापालट हा वेगळ्या गतीने व वेगळ्या प्रकारे झाला. हा विकास व हे बदल तीन ठळक घटकांमुळे झाल्याचे लक्षात येईल. हे बदल व असा विकास महाराष्ट्रातील कोणत्याच शहराचा होऊ शकला नाही. मुंबईची गोष्टच वेगळी आहे कारण ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे.

हे तीन घटक पंधरा पंधरा वर्षांच्या हप्त्यात प्रभावी ठरल्यासारखे वाटते.

१९७० ते १९८५ - ऑटोमोबाईल सेक्टर -

टेल्को, बजाज ऑटो व बजाज टेंपो या सर्वांनी मिळून दुचाकी, तीनचाकी व चारचाकी (बस/ट्रक/मेटॅडोर इ.) क्षेत्रे काबीज केली. संपूर्ण देशात तर त्यांचा सप्लाय झालाच पण त्यामुळे पुण्याचे स्वरूप बदलले. हे बदल कोणते?

१. सायकलींची जागा स्वयंचलीत दुचाकींनी घेणे
२. टांग्यांची जागा रिक्षांनी घेणे
३. प्रदुषण वाढणे
४. दुचाकी व तीनचाकीसाठी कर्जे, त्यांचे हप्ते, डाऊन पेमेंट, असे सर्व अर्थकारण आरंभणे

यातील काही फरक इतर शहरांमध्येही असेच झालेले असणार, पण पुण्यात आणखी एक फरक असा पडला की तंत्रज्ञान अभियांत्रिकी व ऑटो अभियांत्रिकी या क्षेत्रातील लोकांना नोकर्‍या मिळू लागल्या. शासकीय सेवा, बँका यात आयुष्य व्यतीत करणार्‍यांना आता ऑटो मॅन्युफॅक्चरर्स व त्यांच्या अ‍ॅन्सिलरीजकडे जॉब्ज मिळू लागले. हा फरक खास पुण्यापुरता व काही प्रमाणात औरंगाबादपुरता (बजाज ऑटो) व अत्यल्प प्रमाणात अहमदनगरपुरता (कायनेटिक) होता. लुना, टीव्हीएस ५०, बजाज एम फिफ्टी, बजाज एम एटी या वाहनांनी मध्यमवर्गीयांचे खिसे काबीज केले. इतर शहरांमधून लोकांनी नोकरीसाठी पुण्यात येण्याचे प्रमाण या ऑटो क्षेत्रामुळे जबरदस्त वाढले.

इ.स. १९८५ ते २००० - शिक्षणक्षेत्र विकास

तसेही आधीपासूनच विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतीक राजधानी वगैरे वगैरे उपाधी प्राप्त झालेल्या पुण्यात प्रथमच खासगी कॉलेजेस मोठ्या प्रमाणावर येऊ लागली. राजकीय पुढार्‍यांनी सुरू केलेली ही कॉलेजेस डोनेशन व भरमसाठी फिया आकारू लागली. शिक्षण अधिकजणांना उपलब्ध होणार यामुळे शासनाने हे सारे संमत तर केलेच पण गुणवत्ताही बर्‍यापैकी घसरू दिली. विचित्र तिढे निर्माण होऊ लागले. पी सी एम ला ९३ टक्क्याला सी ओ ई पी क्लोज झाल्याने ९२ टक्केवाल्यावर सायन्सला जायची वेळ येणे आणि तेव्हाच दोन लाख देणगी आणि वार्षिक आठ हजार फी भरण्याची कुवत असलेल्या पंचाहत्तर टक्क्यांवर खासगी अभियांत्रिकीत प्रवेश मिळणे असेही प्रकार झाले. पण हे सारे प्रकार थांबवले गेले नाहीत. ते तसेच चालू राहिले व तीच शैक्षणिक संस्कृती ठरू लागली. या शिक्षण क्षेत्रात पडलेल्या फरकामुळे पुण्यात आणखी एक मोठा फरक पडला. फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, काश्मीर व राजधानीतून विद्यार्थ्यांचा ओघ सुरू झाला. बक्कळ पैसे असलेल्यांची मुले दिमाखात इंजिनियरिंगला जाऊन मोटारसायकली उडवू लागली.

हे असे शिक्षण मिळू लागणे हे महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये का झाले नसेल? त्याची कारणे बहुधा जरा गंमतीशीरच असावीत. पुण्याची हवा, पाणी, वाढ होण्यास असलेला भरपूर वाव, मुंबई व इतर शहरांशी सोपे कनेक्शन, त्या काळी गुन्हेगारीचे प्रमाण अत्यल्प असणे अशी अनेक कारणे असू शकतील. उदाहरणार्थ, मुलाला शिकायला परगावी पाठवायचे झालेच तर नागपूरच्या उन्हाळ्याच्या तुलनेत पुण्याला पाठवणे लोकांना रुचणार यात शंका नसावी.

शिक्षणक्षेत्रातील ह्या क्रांतीकारक टप्प्यामुळे पुणे हे देशाचे फेव्हरिट एज्युकेशन सेंटर ठरले. विद्यार्थ्यांचा अखंड प्रवाह सुरू झाल्यामुळे पुण्याचे परिवर्तन अर्थातच अत्यंत वेगाने होऊ लागले. रस्ते, इमारती, होस्टेल्स, टेलिफोन बूथ, झेरॉक्स मशीन्स, दुचाकी, दुचाकी दुरुस्ती, मेस, टपर्‍या, याशिवाय करमणुकीची साधने अश्या अनंत व्यवसायांना एक जबरदस्त उड्डाण मिळाले. पुणे व देशातील इतर तुलना करता येण्याजोगी शहरे ह्यांच्यातील फरक व तफावत मोठ्या प्रमाणावर वाढणे येथेच सुरू झाले.

इ.स. २००० ते २०१३ - इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी -

या विषयावर काही नाही लिहिले तरी चालण्यासारखे आहे कारण हा चालू कालखंड असून तो सर्वज्ञात आहे. पुन्हा एकदा पुण्यात 'वाढीस असलेला वाव', पाण्याची व विजेची उपलब्धता, दळणवळण, कनेक्टिव्हिटी त्यात आता वरती शिकून बाहेर पडणारे व नोकर्‍या शोधणारे विद्यार्थी हे सर्वच घटक कामी आले. पैशाकडेच पैसा जातो म्हणतात तसे जो येईल तो पुण्यातच कंपनी थाटू लागला. या कालावधीत पुण्यातील काही विभागांना युरोपसारखे दिसता येऊ लागले.

पाच पाच धरणे आता कमी पडतात. जागांचे भाव अप्राप्य पातळीला पोचलेले आहेत. शिक्षण व इतर सर्व बाबी अतिशय महागलेल्या आहेत. वातावरण प्रचंड प्रदुषित झालेले आहे. वाहतुक अत्यंत बेशिस्त आणि अपुर्‍या रस्त्यांवर होत आहे. वीज कमी पडत आहेच. बाहेरून येणार्‍यांचा ओघ थांबतच नाही आहे. अत्यंत काटेकोर आणि अप्रिय निर्णय घेतल्याशिवाय पुण्याचा र्‍हास थांबणे हे एक दूरचे व सत्यात न उतरणारे स्वप्न वाटत आहे.

पुण्याने कायम पेन्शनरांचे शहर म्हणूनच राहावे असे कोणीच म्हणणार नाही, पण अनप्लॅन्ड ग्रोथ आणि नुसतीच उपभोग घेण्याची प्रवृत्ती (काँट्रिब्यूट न करण्याची प्रवृत्ती) ह्यामुळे जो र्‍हास होत आहे त्याचे कित्येक दृष्य परिणाम सभोवती आधीच दिसत आहेत.

हा असा विकास बुलढाणा, औरंगाबाद, नागपूर, परभणी, कोल्हापूर, सोलापूर, जळगाव किंवा तत्सम शहरांत झाला नाही. असा विकास देशातील चार ते पाच मध्यम आकाराची व पुण्याशी तुलना करता येण्याजोगी शहरे सोडली तर इतरत्र झाला नाही.

पुण्याचच असा कायापालट होण्यामागे वर लिहिल्याप्रमाणे हवा, पाणी, वाढ करण्यास असलेला वाव, सुशिक्षित व अशिक्षित मॅनपॉवर उपलब्ध असणे, कनेक्टिव्हिटी हे सर्व घटक एकाच ठिकाणी होते. पण या पंचेचाळीस वर्षांमध्ये एक जन्मजात पुणेकर म्हणून आजतागायत एकदाही कोणत्याही राजकीय पक्षाकडून अथवा नेत्याकडून काही भरीव व ठोस नियोजन आकारास आलेले पाहिलेले नाही, हे दुर्दैवी आहे. बी आर टी की काय ती योजना जवळपास फेल गेलेली आहे. मेट्रो होणे लांबच आहे, कर्वेरोडला पर्याय काढता आलेला नाही. बसेस पुरेश्या नाहीत. टू व्हीलर्सच्या संख्येवर नियंत्रण नाही. पार्किंग उपलब्ध नाही. जागांचे भाव अवाच्या सवा झालेले आहेत. पाणी व वीजकपात नित्य आहे.

पुण्याच्या अंगभूत गुणवैशिष्ट्यांमुळे विकासास मिळालेला वाव हा पुणेकरांनी व इतरांनी हपापल्याप्रमाणे उपभोगला, पुढार्‍यांनी पोळ्या भाजून घेतल्या आणि आता ह्या शहराची दुरावस्था लवकरच कुत्रेही खाणार नाही अशी होईल.

फार पूर्वी पाहिलेल्या पुण्यावर असलेले अपरिमित प्रेम हा लेख लिहिण्यास कारणीभूत ठरले.

-'बेफिकीर'!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दर वेळी पुणे भेटीत हे पाहून हताश व्हायला होतं >>> टोटली. जाशील त्या गल्लीबोळात प्रचंड धूळ आणि आवाज चालू असतो. मेन रोड्स सगळे तुंबलेले असतात. करिष्मा कडे जाणारा रस्ता इतका मोठा असूनही ब्लॉक झालेला असतो. शहराचं तापमान सतत वाढलेलं राहतंय.
नुसतं कोथरूडच नाही तर बाहेरही हे रिडेव्हलपमेंटचं लोण आहे. शिवणे, उत्तमनगर वगैरे भागात पण इमारती उभ्या राहतायत. आता फक्त खडकवासला बुजवून किंवा आर्मीच्या जागा बळकावून बांधकामं करायची शिल्ल्क राहिली आहेत. सिंहगड तरी सोडणार आहेत की नाही कोण जाणे! Angry

युनिव्हर्सिटीच्या बाजूला प्रचंड टोलेजंग इमारती झाल्या आहेत. तिथेही आता छान वाटेनासं झालं आहे.

कितीही गाजावाजा केला तरी मेट्रो हा एक पांढरा हत्ती आहे. मेट्रो स्टेशनपर्यंत पोचणे हेही एक दिव्य बनू लागले आहे. पूर्ण बांधून झालेल्या मेट्रोमुळे रस्ते अरूंद झाले आहेत आणि कोंडीत भर पडत आहे.
पीएमटी (किंवा आज जे काही नाव असेल ते) का सुधारत नाहीत? बस शहराच्या कानाकोपर्यात जाऊ शकतात. पण बहुतेक बस अत्यंत दयनीय अवस्थेत आहेत. मोडकळीला आलेल्या, धूर ओकणार्‍या बस. बघणेही त्रासदायक आहे. मेट्रो बांधली म्हणजे पीएमटी भंगारात काढली पाहिजे असे काही नाही.
बस व्यवस्था धडधाकट असली तर वाहतूक कोंडी कमी होईल पण तशी लक्षणे नाहीत. लोकांना स्वतःचे वाहन रस्त्यावर आणावेच लागते.
वाहतूक कोंडी सुरू होताच लोक लढाईत उतरलेले मुरारबाजी देशपांडे असल्यासारखे कुठल्याही लेनमधे , फुटपाथवर, जिथे जागा मिळेल तिथे घुसून पुढे जाऊ पहातात आणि त्यातून आणखी जास्त कोंडी होते.
अनेकदा सिग्नल लाल असतानाही तुफान वेगाने वाहने जात असतात त्यामुळे इच्छा असूनही सिग्नलला थांबणे अशक्य होते. मागचा येऊन ठोकर मारून आपल्यालाच शिवीगाळ करेल अशी भीती. अगदीच अनागोंदी आहे.

या बिल्डिंग्ज च्या सहाव्या सातव्या मजल्यांवरून बघितल्यावर पूर्वी जिथे टेकड्या वगैरे दिसायच्या तिथे आता धुळीने भरलेले मळकट आकाश अन त्या बॅकग्राउंड वर लांबपर्यत दिसणार्‍या अनेक अजस्त्र क्रेन्स हा नवा कॉमन सीन आहे. हे दृष्य एखाद्या डिस्टोपिअन सिनेमातल्यासारखं दिसतं! कुठूनही मला सिंहगड आणि पर्वती दिसली नाही. Sad
कदाचित आपण १-२ वर्षांनी येतो त्यामुळे आपल्याला जास्त खटकत असावे.

पीएमटी (किंवा आज जे काही नाव असेल ते) का सुधारत नाहीत? >>> याबद्दल असा एक प्रवाद ऐकल आहे की दुचाकी/चारचाकी बनवणार्‍या कंपन्यांनी राजकारण्यांशी संधान बांधून ही सुधारणा जाणूनबुजून होऊ दिली नाहीये. खखोदेजा.

मैत्रेयी, पूर्ण पोस्टला मम.
पर्वतीवरून पाहिलंस तर जास्त डिस्टोपिअन वाटतं. मधेमधे इतके अजस्त्र टॉवर्स झालेत जे आयसोअर्स आहेत. बाकी पुणं धुळीच्या लेअरखाली असतं. ते दिसत नाही. पुण्यात अधूनमधून असणारी झाडं, हिरवाई अजिबातच दिसत नाही. उगवता सूर्य केविलवाणा दिसतो. भयाण होत चाललंय.

हो एकेकाळच प्रसन्न शहर अगदी अमिबासारख कसही वाढुन अजस्त्र, अवघड अस काहिस होवुन गेलय...खुप अस्वस्थ वाटत पुण्याकडे बघुन...प्रदुषण तर इतक वाढलय ..काहि डेकेड मधे दिल्ली होइल की काय अशिच भिती वाटते.

आमचा एक मित्र नुकताच पुण्याला गेला आहे, त्याने लिहीले आहे की मेरा भारत महान ऐवजी मेरा भारत महाग असे म्हणण्याची वेळ आली आहे.
तसे हा मित्र खूप श्रीमंत, म्हणजे भारतातल्या लोकांसारखाच आहे, इतर अमेरिकन लोकांसारखा गरीब नाही.
तोसुद्धा असे म्हणतो तर मी बापडा काय म्हणणार?
१९५५-१९६० मधे दोन आण्याचा (१३ पैसे) बटाटेवडा नि चार आण्याचा (२५ पैसा) खाणारे आम्ही! आता १०० रुपयाखाली काहीच मिळत नाही म्हणे!

पुणे मुंबईतील धुळीच्या बातम्या वाचल्या की गावी कायमचे राहण्याची संधी आयुष्यात मिळाल्याबद्दल दैवाचे आभार मानले जातात.

पुण्याची खऱ्या अर्थाने धूळधाण होत चालली आहे++१

आमच्याच घरातला अनुभवः नवर्‍याचं ऑफिस खराडीला आहे , घरापासून २५ किमी.
वर्क फ्रॉम होम असतं ३ दिवस तेव्हा ठीक आहे, जेव्हा ऑफिसडे असतो तेव्हा त्याने सुरूवातीला ऑफिस कॅबचा ऑप्शन घेतला होता. तो कॅब ड्रायव्हर दरवेळी वेगळा असतोच. (म्हणजे असणारच) तर वेगात जायचं नि खच्चकन ब्रेक दाबायचा. असं त्याने २५ किमी हाणलं. घरी आल्यावर नवर्‍याला मळमळायला लागलं. हे असं २-३ वेळा झाल्यावर तो स्वतः गाडी घेऊन जायला लागला. मग स्वारगेट रूटवर मेट्रो सुरू झाली म्हणून मेट्रोने जायचं ठरलं. पण नव्यानेच सुरू झाल्यामुळे मेट्रोला कनेक्टिंग बसेसची फ्रिक्वेन्सी नव्हती हे लक्षात आलं. घराखाली बसस्टॉपवर २० मिनिटं वेटिंग, मग स्वारगेट मेट्रो लगेच मिळाली, तिथून सिव्हिल कोर्ट ट्रान्जिट पण लगेच मिळून रामवाडिला तो स्वारगेटपासून ४० मिनिटांत पोचला. पण तिथली कनेक्टिंग बस नुकतीच निघून गेल्यामुळे पुन्हा पाऊण तास वेटींग. वन वे २ तास लागले पब्लिक ट्रन्स्पोर्टला. असंच रात्री येताना. आता आपलीच गाडी आणि आपणाच चालवत न्यायची. मेट्रो सरसकट सोयिची अजूनतरी झालेली नाही.. पण हां, काही रूट्सना मेट्रोमुळे फायदा झालाय.
रस्त्यावरचे खड्डे, धूळ, रस्त्यांची काढलेली कामं, वाढलेलं प्रदूषण आणि रिकाम्या जागांवर असलेले स्टॉल्स/ फेरीवाले/ झोपडपट्ट्या आणि अशा सगळ्या गोष्टी हे सगळं असह्य होत चाललंय. चालणं, गाडी चालवणं काहीच नको असं वाटतं.

वर कोणीतरी सिंहगडाचा उल्लेख केलाय. तर, तिथेही तुळशीबाग करून टाकली आहे. पिठलं-भाकरीची दुकानं, महाराजांची चित्रं असलेली लॉकेट्स-मॅग्नेट्स-फ्रेम्स आणि असं सगळं काही मिळणारी दुकानं अशी नुसती जत्रा असते. (प्रतापगडावरही हेच आहे दुर्दैवाने)
लोक बदलत नाहीत तोवर काहीच बदलणार नाही. आणि लोक बदलतील असं वाटत नाही.

पुण्याची खुपच अनस्ट्र्क्चर्‍ड पद्ध्तीने वाट लागली.
पुण्यातले कौलारु घर होते आमचे आणि तेही अगदी पुण्याच्या मध्यवर्ती भागात( चिंचवड म्हणजे पुणे न्हवे त्याकाळची गोष्ट आहे Proud .
मग ते घर जावून, बिल्डिंग वगैरे वगैरे झालं. आता तो भाग गचाळ वाटतो. नुसता गोंगाट आणि बाहेरून आलेला नॉर्थ जत्था. त्यात ती कॉलेजं. प्रगतीचा भाग म्हणत स्विकारायचे… Wink आता हातच चोळत बसतो बघत. Wink
——-
लहानपणी शाळेत जाताना, पायी जायचो .. बाबा सांगायचे दोन्ही हात चोळायचे व भरभर चालयचे मग थंडी वाजत नाही ते आठवलं.

-जन्मानं पुणेकर पण सध्या कुठलेच ठिकाण आपले नाही असे वाटणारी.

>>> आता मेट्रो आलीय ना? मग प्रॉब्लेम काय आहे?
गाड्या वापरू नका.

मेट्रोचे जाळे तेवढे विस्तृत नाही रानभुली!

(पुण्यात मेट्रो फारशी यशस्वी होणार नाही हे माझे आवडते, पण माझ्या मित्रवर्तुळात वादोत्पादक ठरलेले मत आहे हा वेगळाच भाग! मेट्रो एखाद्या शहरात आणण्याआधी त्या शहराचा आधीचा पोत जाणून घ्यायला हवा. मुंबई, कोलकाता येथे मुळातच लोकल ट्रेन सर्व्हिस ही शहराअंतर्गत होती. पुण्यात लोकल म्हणजे 'लोणावळा - पुणे' वगैरे!)

अर्थात, पुण्यातील मेट्रो यावर वेगळा धागा आहेच व या धाग्याचा तो विषय नाही.

आजकालचं पुणं बघून मला हताश व्हायला होतं. 2008 साली मी अशाच स्वरूपाचा लेख लिहीला होता. तुझा लेख 2013 चा आहे आणि आता 2025 चालू आहे. आणि परिस्थिती अजूनच आटोक्याबाहेर गेली आहे.

पुण्यात मेट्रो फारशी यशस्वी होणार नाही हे माझे आवडते, पण माझ्या मित्रवर्तुळात वादोत्पादक ठरलेले मत आहे हा वेगळाच भाग! >> अगदी बरोबर कारण मुंबई, कोलकत्तामध्ये रेल्वे लाइन च्या आजूबाजूला सगळी वस्ती वसत गेली आणि पुढे दूरवरचे भाग हे बस, रिक्षा अशा साधनांनी जोडले गेले. पुण्यात ज्या प्रकारे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे बोन्साय करून ठेवले आहे इतक्या वर्षात की लोकांना स्वतःची गाडी सोयीची वाटू लागली. मेट्रो आल्यावर पण बदल दिसत नाही आहे कारण ज्याप्रकारे तिचा मार्ग ठरवला आणि आता गर्दीची ठिकाणे जोडली जात आहेत, त्यामुळे अजून तरी काही वर्षे मेट्रो बाळसे धरणार नाही. PMPML ला त्यांचे बस मार्ग नव्याने ठरवावे लागतील आणि मुख्य म्हणजे सेवा खूप सुधारावी लागेल. BRT ला आता पूर्ण शहरात गुंडाळुन ठेवले तर बरे होईल, कारण अपुऱ्या बसे सेवेमुळे आधीच गर्दीने ओसंडुन वाहणाऱ्या रस्त्यावर BRT चे मार्ग अगदीच रिकामे दिसत राहतात, त्यात लोकांना स्टॉपला जाताना वाहतूक थांबते त्यामुळे आधीच हळू असणारी वाहतूक अगदी रांगत जाते.

मेट्रो चा धागा बहुतेक उडवला असेल.
मला परवा पिंपरीपर्यंत लिफ्ट मिळाली होती हे लक्षात नाही आलं.
नंतरचा पुणे शिनस्टे पर्यंतचा प्रवास मस्तच झाला. पण आधी लिफ्ट नसती मिळाली तर मग अवघड होतं.
सहमत.

पुण्यात मेट्रो फारशी यशस्वी होणार नाही हे माझे आवडते, पण माझ्या मित्रवर्तुळात वादोत्पादक ठरलेले मत >>> माझेही हेच मत. मुळात लोकांना तसली सवय नाही हा एक भाग झाला. पण सोयीचं नाही मेट्रोने जाणं. कनेक्टिव्हिटी नाही. पार्कींग लॉट्स नहीत. किंवा पार्क अँड राईड सारख्या सुविधाही नाहीत.
लकडीपूलावरून एक जनरल नजर टाकली तर ती जी काय मेट्रो स्टेशन्स दिसतात ती नजरेला टोचतात भयंकर. कुरूप झालंय माझं शहर Sad

सिंहगडाचा उल्लेख केलाय. तर, तिथेही तुळशीबाग करून टाकली आहे >>> Sad

या बदलत्या पुण्याशी जोडून घेता येत नसल्याने माहेर दुरावल्यासारखं फीलिंग येतं दर वेळी भारतवारीत.

पुण्यातल्या स्पीडब्रेकर्सचा प्रसाद घेतलेला आहे. त्यांचा उल्लेख विसरून जायच्या आधी..
ही आयडिया कशी वाटते सांगा
https://www.youtube.com/shorts/PwmrORmuYCA

पुण्यात वाहतुकीचे नियम जास्त कडक केले आणि ते कठोरपणे लागू केले तर काही सुधारणा होऊ शकेल.

नाशिकमधे सळया नेणार्‍या एका ट्रकमुळे अनेक लोकांचा जीव गेला. अशा प्रकारे वाहतूक करताना जे नियम, कायदे पाळावे लागतात ते धाब्यावर बसवले गेले. पण कुणाला शिक्षा होईल अशी लक्षणे नाहीत. पुण्यातही असे घडू शकते.
https://www.dainikprabhat.com/nashik-accident-%e0%a5%a4-brothers-posted-...

वाहनाचे प्रदूषण जास्त काटेकोरपणे मोजले तर कदाचित हवा काही प्रमाणात स्वच्छ होऊ शकेल. पण हे करणार कोण? कित्येक वर्षे महानगरपालिकेच्या निवडणुकाही झालेल्या नाहीत त्यामुळे लोकप्रतिनिधीच नाहीत!

हताश होतेय खरंच पुण्याची स्थिती वाचून. काही वर्षांपूर्वी (बहुतेक मेट्रोचं काम चालू होतं) कर्वे रोडच्या कोणत्या तरी हॉटेलमधे मित्रमैत्रिणी भेटायचं ठरलं होतं तिथे रिक्षावाल्याने मला अलिकडे सोडलं पलिकडे नाही जात म्हटला वळसा पडेल मी बरं म्हणून उतरले पुढे थोडी चालत निघाले म्हटलं कुठेतरी रस्ता ओलांडता येईल तर सगळीकडे हे मोठ्ठे बांधकाम सामानाचे ढिग, मोठी भिंत काय करावं हेच समजेना. नळस्टॉपचा सिग्नल बराच मागे राहिला होता तिथून क्रॉस करावे तर. शेवटी फोन केला म्हटलं मी इकडे समोरच्या साईडला अडकले आता परत रिक्षा घेऊ का वळून यायला? सगळे हसायलाच लागले नुसत्या समोरच्या साईडला यायला रिक्षा? हे फक्त अमेरिकावासीच बोलू जाणे. अरे म्हटलं मग कोणीतरी या घ्यायला ... या चक्रव्हुहातून कुठून बाहेर निघू मी कळत नाहीये? शेवटी आलं कोणीतरी घ्यायला कुठून आले त्यांनाच माहित.

एके काळी रोज केलेला आकुर्डी- शिवाजीनगर प्रवास, स्टेशनवरून लगेच कनेक्ट असलेली बहुतेक २७ नंबरची डेक्कनला जाणारी बस तिथून त्या ब्रिजवरून चालत गरवारे कॉलेज हा सगळा प्रवास आठवला. विमलाबाई स्टॉपपासून कधी डायरेक्ट निगडी-वारजे माळवाडी बस तो तिथला परिसर आत इतका अनोळखी परका वाटतो की मी इतकी वर्ष खरंच इथे येत होते का विश्वास बसत नाही.

लहानपणीची पुण्याची आठवण म्हणजे रात्री अगदी सध्याच्या मुक्तांगण शाळेपर्यंत पेशवे पार्क मधल्या वाघ - सिंहांच्या डरकाळ्या ऐकू येत असत. कॉलेज मध्ये असताना फर्ग्युसन, जंगली महाराज, कर्वे रोड दिवसातल्या ठराविक वेळांनाच गजबजलेले असत. प्रभात, भांडारकर रोड म्हणजे कधीही गेलं तरी शांत परिसर.
आता नुसतं वाढता वाढता वाढे झालंय. मेट्रो चे रुट ठरवताना नेमका कोणता विचार केला होता, हा मोठा प्रश्न आहे. आता तर दररोज एक नवा मेट्रो मार्ग जाहीर करणं सुरू आहे.
पी एम टी/ पी एम पी एम एल हा तर कितीतरी वर्षांपासून संशोधनाचा ( की वादाचा) विषय आहे. मध्यंतरी काही काळ तुकाराम मुंढे पी एम टी चे आयुक्त होते. तेव्हा मात्र बस सर्व्हिस अभूतपूर्व सुधारली होती. मग लगेचच त्यांची बदली केली गेली.
ट्रॅफिक च्या बाबतीत तर पुण्याने जागतिक पातळीवर लौकिक मिळवलाय! हे सगळं कमी होतं म्हणून की काय स्मार्ट सिटी नावाचं एक प्रकरण आणलं गेलं. बी आर टी सारखे ह्याचे सुद्धा बारा वाजले.

मेट्रो चे रुट ठरवताना नेमका कोणता विचार केला होता
>>> किती एरियाज मध्ये जास्तीत जास्त एफएसआय वाढवून, बिल्डिंगा बांधून अजून जास्त पैसे ओरपता येतील हा .

>>>>>लहानपणीची पुण्याची आठवण म्हणजे रात्री अगदी सध्याच्या मुक्तांगण शाळेपर्यंत पेशवे पार्क मधल्या वाघ - सिंहांच्या डरकाळ्या ऐकू येत असत. कॉलेज मध्ये असताना फर्ग्युसन, जंगली महाराज, कर्वे रोड दिवसातल्या ठराविक वेळांनाच गजबजलेले असत. प्रभात, भांडारकर रोड म्हणजे कधीही गेलं तरी शांत परिसर.
+१

६ वर्षात पुणे जाणे झालेले नाही. पण २०१८ मध्ये गेलेले. तेव्हाही आवडले नव्हते.

रात्रीच्या वेळी पेशव्यांच्या सिंहाच्या डरकाळ्या ऐकल्यात.

वरचे प्रतिसाद वाचता एकंदरीत आता पुण्यात धूळ+घाण झाली असावी असे वाटते.

एकूण पूर्वीचं पुणं राहिलं नाही ऐकू येण्याच्या लिस्टीत अमेरिकेत तनाने गेलेलं माबोकर हे एक वाढवायला हवं. इथे पुण्यात रहाणारे पुणेकर गुमान सहन करत आहेत म्हणजे ते थोड्याच दिवसांत सात भिकार म्हणणारे हुबईकर होतील बहुतेक.

Pages