नोंद

Submitted by निलेश_पंडित on 27 November, 2013 - 02:46

काय देऊ संयमाची मी तुला आता हमी
पाहताना केस ओले, मोकळे अन रेशमी

का असा घायाळ होतो मी अचानक नेमका
काजळाने माखलेल्या लोचनांनी नेहमी

हाय का ना मोजती स्वप्ने कुणी विरहातली
मी तुला मग पाहण्याची नोंद होइल विक्रमी

बोट-पदराचा असा चाळा सखे नाही बरा
या तुझ्या अस्वस्थतेचा अर्थ घ्यावा काय मी

राग-रुसवा … त्यात मिसळे हासणे अवखळ तुझे
खेळ हा साधा तुला पण टाकतो मज संभ्रमी

आठवांचा भार नाही पेलणे सोपे जरी
एकटे जगण्यास त्यांची नित्य होते बेगमी

- निलेश पंडित

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान गझल.... रोमॅंटिक असली तरी संयत आहे.
विक्रमी आणि बेगमी हे शेर सर्वात विशेष वाटले.

"का असा घायाळ होतो मी अचानक नेमका काजळाने माखलेल्या लोचनांनी नेहमी" >>> या सुंदर शेरातील माखलेल्या हा शब्द थोडा खटकतो असे वैम. माखणे म्हणजे कसेतरी लावणे/चोपडणे असा सर्वसाधारण अर्थ.
या शब्दाऐवजी ’रेखलेल्या’ शब्द सुचतोय, पण तोही तितकासा ठीक वाटत नाही.
वैम. कृगैन.

सर्वांचे आभार.

भिडे काका … अगदी चपखल आणि उत्तम सूचना … आपण म्हटल्या नंतर मलाही वाटलं की "माखणे" यात चोपडण्याचा भास आहे … रेखणे मला अगदी समर्पक वाटतो.

स्वागत निलेश, सर्व लेखन शुभेच्छा! तुमच्या सुंदर सुंदर रचना आम्हाला वाचायला मिळोत इथे .

धन्यवाद … सर्वांचे मनापासून आभार … भारतीताई … तुम्ही आणि उल्हास भिडे काका यांचे विशेष आभार कारण तुमचा मर्ढेकरांच्या कवितांवर आधारित लेख आणि उल्हास भिडे काकांनी केलेली मायबोलीची प्रशंसा यामुळे मी इथे आलो … आणि खरंच हा एक उत्तम मंच आहे …

वाह वाह काय सुंदर आणी रोमॅंटिक झाली आहे गझल....मतला, विक्रमी, संभ्रमी आवडले...
पु.ले.शु.

मनापासून आभार डॉक्टरसाहेब … आपल्या सारख्या अनुभवी आणि उत्तम गझलकारा कडून दाद मिळाली की विशेष समाधान वाटतं.