पोहे फॅन क्लब

Submitted by प्राची on 22 November, 2013 - 23:42

पोहे, पौवा, पहुवा, चिवडा, चिडवा.... ही आणि अशी अनेक नावे असलेले गोरे गोरे, बारीक, शेलाट्या बांध्याचे पोहे. Happy
जाड पोहे, पात़ळ पोहे, भाजके पोहे, नायलॉन पोहे...अनेक रुपं
'पोहे' न खाल्लेला मराठी माणूस मिळणे अवघड आहे.
'पोहे' हा आयटम नसलेली किराणामालाची यादी मिळणे अवघड आहे.
कांदेपोहे, दडपे पोहे, कोळाचे पोके, मेतकूट पोहे, लावलेले पोहे.... अश्या बर्‍याच पाकृ आहेत पोह्यांच्या.

तुम्ही केलेले नवे नवे प्रयोग, जुन्या परंपरागत चालत आलेल्या पाककृती....सगळ्या या एका धाग्यावर एकत्र करू या.
पोहे फॅन क्ल्बचे सदस्य व्हा
जुन्या लिंक्स द्या.
नव्या पाकृ लिहा.

चला तर मग.... Happy

प्रतिसादात दिल्या गेलेल्या पाककृती आणि लिंक्स.

१. प्राची - कृती -
पातळ पोहे एका पसरट भांड्यात घ्या.
त्यावर चवीप्रमाणे मीठ, साखर, लाल तिखट, मेतकूट घाला. (मेतकूट भरपूर घालायचे.)
एका छोट्या कढईत तेल गरम करून त्यात मोहरी-जिरे, हिंग्,हळद यांची फोडणी करा.
गरम गरम फोडणी पोह्यांवर घालून हाताने सगळे नीट मिक्स करा. सगळा मसाला पोह्यांना नीट लागला पाहिजे.
पांढरा पोहा दिसता कामा नये.

हे झाले पोहे तयार. आता -
१. त्यावर नुसती काकडी किसून घाला आणि खा.
२. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून घाला. वर किसलेली काकडी आणि लिंबू...अहाहा!!!!
३. चिराचिरी करायचा कंटाळा आलाय? नुसते पोहे वाटीत घेऊन आडवा हात मारा.

हे पोहे भरपूर प्रमाणात करून ठेवले तरी राहता डब्यात ३-४ दिवस.
मग जसे लागतील तसे वापरायचे. स्मित

२. अश्विनीमामी -
माझ्या साबा एक अद्वितिय प्रकार करतात. तो मी एकदाच खाल्ला आहे. पातळ पोहे तळून घ्यायचे. त्यात हल्के तळलेले काजू, ओले खोबरे टोमाटो मिरची कोथिंबीर इत्यादी. पाव्हण्यांसाठी केले होते त्यामुळे फार हाणता आले नव्हते.

३. पौर्णिमा -
पातळ पोहे, तेल, तिखट, काळा मसाला, मीठ, दाणे आणि कोथिंबीर! ऑस्सम लागतात हे पोहे. पोहे भिजवायचे नाहीत, तसेच कच्चे खायचे.
४. प्राची -
जाड पोहे घ्यायचे. त्यावर लाल तिखट, साखर, मीठ, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, ओले खोबरे घालायचे. आणि पाण्याचा हात लावत लावत मिक्स करायचे सगळे. पोहे ओलसर होतील एवढे पाणी लावायचे म्हणजे मसाला चांगला लागतो पोह्यांना. झाले पोहे तयार.
५.योगेश कुलकर्णी -
एक वाटी साधे कच्चे पातळ पोहे अन १ ते दीड वाटी आमरस. एका बोलमध्ये घ्यायचे अन ५ मींट मुरले की हाणायचे.
६.योगेश कुलकर्णी -
भाजक्या पोह्यात सातूच पीठ घालायचं काकडी चोच्वून / कोच्वून घालायची तिखट मीठ घालायचं वर फोडणी घालायची. अप्रतीम लागतो हा प्रकार.
७.भरत मयेकर
इंदोरी पोहे
८. योगेश कुलकर्णी -
नेहेमीचे फोडणीचे पोहे भिजवून घ्यायचे त्यात आवडीनुसार भाजके दाणे वा खारे दाणे / फुटाणे घालायचे. कोथिंबीर हवी असेल तर. त्यात एकाच ठिकाणावर मीठ, चवीपुरती साखर, तिखट, चिमूट हळद घालायची (हे सगळं पसरून नाही घालायचं) मग टेस्पूनभर तेलाची जीरं मोहोरीची खमंग फोडणी त्या तिखटामिठावर ओतायची, हवी तर वर बारीक चिरून हिमी घालायची. व्यवस्थित सगळं मिसळायचं, थोडी भुजिया शेव असेल तर उत्तमच! अन खायचं एकट्यानी. एका बोलमध्ये पटकन होणारा पण तरीही पोट भरणारा प्रकार.
९. लक्ष्मी गोडबोले -
आधी कांदापोहे करुन घ्यायचे नेहमीप्रमाणे.
मग तव्यात आम्लेट करायचं .. ते अर्धवट झालं की प्लेटभर कांदेपोहे त्यात घालायचे आणि उलथन्याने हलवायचे... आम्लेट फाटून त्याचे तुकडे तुकडे होतील .. ते पोह्यात मिक्स होतात ...
१०.के अंजली -
भिजवलेले जाडे पोहे+ उकडलेला बटाटा+ भिजवून वाटलेले मूग+तिखट्मीठ्कोथिंबीर असं सगळं मिक्स करुन याचे आप्पे किंवा पॅटीस पण छान होतात.
११. आरती. - आलेपाक.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मानव यांच्याशी सहमत, तांदूळ पहले पानी मे शिरा, बाद में पोहा, फिर वह खाके जो मज्जा आया, उसको उपमाच नहीं!

सही !
मला घ्या पोहे फॅन क्लबात, सस्ता सुंदर टिकाऊ सारखं सोपं वाट्टेल तसं रूप घेणारे पोहे. रेसिपी पोस्ट काही

पोह्यात नारळाचं दूध आणि गूळ घालून एक छान पदार्थ होतो, जो मंगलोरकडे करतात. स्वीट पोहा मंगलोर असं गूगलवर शोधून पाहा.

कोळाचे पोहे.
नारळाचं दूध काढणे. चिंचेचा कोळ, चवीपुरता गूळ, मीठ त्यात घालून वरून तूप-जिरं-ओली मिरची+सुकी मिरची, कढिलिंबाची चरचरीत फोडणी देणे. हा कोळ तयार. थोडक्यात, चिंचेचं सार. जरा आंबटगोड, जरा तिखट, खमंग.

खायच्या ५ मिनिटं आधी जाड पोहे धुवून घेणे. वाडग्यात कोळ घालून, हवे तेवढे भिजवलेले पोहे वरून घालून घेणे. कोथिंबीर घालणे. बरोबर तोंडी लावायला पोह्याचे पापड/ मिरगुंडं असतील तर मज्जानू लाईफ.
पोहे अगदी मऊ न करता थोडे कमी वेळ भिजवून कोळात घातले तर क्रिस्पी लागतात. अर्थात हे आवडीनुसार.
https://www.maayboli.com/node/38055
ही रेसिपी.

13 पाने झालीत

पण एकही फोटो नाही, नुसतीच लिखापढी आहे इथे

कोळाचे पोहे ( बेळगांव स्पेशल)
भिजविलेले पोहे, चिंचेचा कोळ, तोंडली/वांगी, कांदा ऊभा चीरलेला, तिखट,मीठ, फोडणीचे साहित्य.
फोडणीत कांदा परतावा, तोंडली किंवा वांगी ऊभे काप करून परतावे, नंतर तिखट कोळ घालून थोडे परतून पोहे घालावे, थोडी साखर किंवा गुळ घालावे. ओले खोबरे व कोथींबीर सजावटी साठी.
पोह्यांचा बीसी बेळे भात, पोह्यांचा दही भात. चीबूड आणि पोह्याची खीर.

मस्त दिसताहेत पोहे पांढऱ्या खोबऱ्याने अजून छान दिसले असते. मला खोबरं आणि लिंबाचं गोड लोणचं आवडतं पोह्यांबरोबर

खोबरे मलाही आवडत नाहीत पोह्यात. लिंबाशिवाय मात्र मजा नाही. लहानपणी एकदा लिंबू नसल्याने मी ईतका चिडलेलो, की लिंबू घरात नाही तर पोहे केलेतच कश्याला... त्यानंतर पोहे भिजवायच्या आधी आमच्या घरात लिंबू चेक करतात Happy

इंदोर मध्ये हेड साब के पोहे खाल्ले. युट्युब विडिओ मुळे कळाले होते.
फार छान होते.
एक दिवस तिथल्या पद्धतीने उसळ सहित. काबुली चण्याची थोडी तर्रीदार उसळ, पनीरचा तुकडा शेव कांदा वै घालून पोहे. जरा साशंक होतो पण मस्त लागले. नेमका रविवार होता आणि तुफान गर्दी होती.
दुसऱ्या दिवशी बिनाऊसळ पोहे खाल्ले.
शेव आणि कांदा टाकून. ते ही फार छान चवीचे.

Pages