माझ्या २-BHK च्या प्रशस्त आरशात
सायंकाळी चेहरा दिसला
नाव माझं , चेहरा माझा , रंग (वा बेरंग ही ) माझाच
थक्क झालो त्याला पाहून ,
हा मी की कोणी दुसराच ?
नव्या दमाची , नव्या गतीची जाणीव केसांना ही झाली
पळत्या मनानं , ताणल्या मेंदूनं त्यांची ही दशा केली
गेली ती तरूण सळ सळ अन तो मराठी ताठा
हुजरे गिरीने झुकले खांदे अन वाकला अभिमानी कणा
गेली ती स्वत्व -खुणेची अनवट अन परखड भाषा
इंग्रजी झुलीने गांजलेला अस्तित्वाचा रम्य कवडसा
स्वार्थाच्या साठमारीनं गमावलेली मुक्त राने
शहराच्या वेदिवर चढलेली सस्य शामल हरित वने
ना-कर्त्यांनी दडवलेली मातीतली शिक्षण शिल्पे
नफे खोरांनी पसरवलेली हुजुरांची ती आत्म-चरित्रे
इथंच या १२ मजली इमारतीच्या तळात, अजूनही तो दगड असेल
म्हणत असेल
मराठ मोळ्या हैवाना, जागा हो अन उचल धनुष्य
इथून जरा उठ अन पहा टिचक्या परिघा पलीकडलं दृश्य
हेही जमलं नाहीतर एकंच सोपी गोष्ट कर
पलीकडच्या नदीतल्या खडकांना आपटून हे कोतं मन मुक्त कर
पुढचं नदी पाहून घेईल अन कातळ वाहून नेतील
वाराही आहेच सोबतीला
असेच त्यांनी धाडलं आहे अनेक फितुरांना अन अघोर्यांना
तोफेच्या तोंडी द्यायची लायकी ज्यांची
आज मुजरे घडतात त्याच गनिमांना
मनोरे अन कलादालने यातच अस्तित्व खितपत पडतंय
वाघजई च्या ढाण्याला पिंजर्यातच बरं वाटतंय
हर हर ती पेशवाई गेली इंग्रज पातशाही गेली
स्वकीयांनीच लादलेली लोलुप शाही मात्र तरारली
उत्सव अन प्रेक्षकांसाठी आता शस्त्रे उरली
कोथळा काढणारी वाघनखे कायमची झडली
नाकर्त्यांच्या गाफिलीने मुलुख ओसाड झालाय
इतिहास पुन्हा इशारा देतोय , पण रक्षक कुठे उरलाय ?