उद्घाटन

Submitted by आतिवास on 14 November, 2013 - 06:23

“नमस्कार” एवढ्या गर्दीत त्या गृहस्थांनी मला नमस्कार केला.
प्रतिक्षिप्त क्रियेने मीही नमस्कार करती झाले.
“कोण आहेत हे?” मी शेजारी बसलेल्या माणसाला विचारलं.
“अरे, तुम्हाला माहिती नाही? सांसद आहेत ते आपले.” त्याने आश्चर्याने मला न्याहाळत सांगितलं.

मला लगेच त्यांच्या नमस्काराच कारण समजलं. त्या मंडपात आम्ही दोनच स्त्रिया होतो – एक होत्या जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी. त्यांना खासदार ओळखत होते. अर्थातच त्या व्यासपीठावर होत्या. दुसरी होते मी. मी बेधडक गर्दीत मिसळून फोटो काढत होते आणि लोकांशी बोलत होते. शिवाय माझ्या हातातल्या वहीत मी अधून मधून लिहित होते. हे सगळं मी नेहमीच करते. आणि त्यामुळे अनेकदा मी पत्रकार असल्याचा समज फैलावतो. आजही तसंच झालेलं दिसतंय. म्हणून त्या खासदारांनी ओळख नसताना मला नमस्कार केला होता.

तिकडे व्यासपीठावर बसलेले खासदार माझ्याकडे पहात होते. ‘नमस्कार तर केला पण ही बाई आहे कोण’ असे भाव त्यांच्या चेह-यावर दिसत होते. त्यांनी एकाला बोलावून काहीतरी विचारलं. त्याने दुस-याला. त्याने तिस-याला. मला काही काम नव्हत. त्यामुळे मी ती साखळी लक्ष देवून पाहत होते. अखेर त्याची सांगता मघाच्या माझ्या शेजा-याने मला ‘तुम्ही पत्रकार आहात का?” अस विचारण्यात झाली. मी कोण आहे (आध्यात्मिक अर्थाने नाही तर लौकिकार्थाने) ते सांगितलं. आलेल्या वाटेने निरोप परत गेला. माझ्याकडे लक्ष द्यायची गरज नाही याची खात्री पटून खासदार महोदय सैलावले.

राजस्थानमधल्या एका गावात ‘प्रधानमंत्री ग्राम सडक योजने’च्या रस्त्याचं उदघाटन होत – त्याच्याशी माझा खर तर काही संबंध नव्हता. पण अनेक वेळा खेडयापाडयात भटकताना ‘सडक, वीज, पाणी’ लोकांसाठी किती महत्त्वाचे असतात हे पाहिलं होतं. विशेषत: जिथं मुल-मुली शाळेत जाऊ शकत नाहीत, आजा-यांना वेळेत उपचार मिळत नाहीत, शेतातला भाजीपाला सडून जातो किंवा जनावरांना खायला घालावा लागतो – तेव्हा गावक-यांच्या मनात जे येतं ते फक्त त्यांनाच कळेल. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेबद्दल माझ मत चांगलं आहे. आणि शिवाय मी कधी रस्त्याच उदघाटन बघितलं नव्हतं. म्हटल चला, हेही एक पाहू काय असत ते.

आम्ही मुख्य रस्ता सोडून डावीकडे वळलो तेंव्हा मोहरीची फुललेली शेत समोर आली.

Mustard Rajsthan 7 January 12 .jpg

सरकारी कार्यक्रम असल्याने गाडयांचा ताफा होता. रस्त्यावर जो तो थांबून कुतुहलाने त्याकडे पहात होता. काही अंतर पक्क्या सडकेनं गेल्यावर आम्ही डावीकडे वळलो तर तिथ एक मोठा मंडप दिसला. त्याच्या आत कोणी नव्हतं. आधी मला वाटलं गावात कोणाचंतरी लग्न असणार – पण तसं काही नव्हतं. हा मंडप रस्त्याच्या उदघाटन कार्यक्रमासाठी होता हे मला दोन तासांनी कळलंच.

आम्ही मंडपापाशी न थांबता कच्च्या रस्त्याने पुढे गेलो. जिकडे तिकडे पुरुष निवांत बिडया फुंकत बसले होते. दोन दिवसांपूर्वी पाऊस झाला होता त्यामुळे शेतात काम नव्हतं. थंडीही होती चांगलीच. आम्ही एका विशाल महालवजा घरापाशी उतरलो. सुटाबुटातले एक गृहस्थ पुढे आले – त्यांनी आमचं स्वागत केलं. हे या गावातले गृहस्थ – आता दिल्लीत उच्चपदस्थ अधिकारी आहेत. एवढया छोटया गावातून येऊन दिल्लीत स्वत:च एक स्थान निर्माण करणं ही काही सोपी गोष्ट नाही. मला त्या गृहस्थांच कौतुक वाटलं.

रस्ता या गृहस्थांच्या घरावरून जाणारा – किंबहुना त्यांना घरापर्यंत आणणारा - असल्यामुळे बरेच अधिकारी हजर होते. सिमेंटची गुणवत्ता, इंटरलॉकिंग टाईल्स, रस्त्याची रुंदी, त्याची भारवाहक क्षमता, स्थानिक शेतक-यांच्या पाईप टाकून पाणी नेण्याचा गरजा लक्षात घेऊन केलेली रस्त्याची रचना .... अशी देशातल्या ज्येष्ठ इंजिनीअर्स केलेली चर्चा शिक्षणदायी होती. तसे काम प्रत्यक्षात होते का हा प्रश्न वेगळा अर्थातच!

चहापान झालं आणि ट्रे घेऊन आणखी एक माणूस आला. आमच्या ग्रुपमधल्या कोणीच त्यातल काही घेतलं नाही तेव्हा माझ तिकडे लक्ष गेलं. जमलेल्या गर्दीत जाऊन तो माणूस परत आला तेव्हा मी त्याचा हा फोटो काढला.

Atithy Rajsthan 7 January 12.jpg

धूम्रपानाच्या धोक्यांबाबत इतकं सगळं सांगितलं जातं; ते किती व्यर्थ आहे याचा साक्षात्कार होता तो माझ्यासाठी.

मग आम्ही सगळे परत त्या मंडपात गेलो. खासदार आले आणि तो रिकामा मंडप क्षणात भरून गेला.

Unapur people 7 January 12.jpg

मग अनेकजण बोलले – सगळे अगदी थोडक्यात – दोन शब्दांच्या बरंच जवळ पोचेल इतकंच – बोलले. त्यात बरीच माहिती मिळाली. म्हणजे उदाहरणार्थ या योजनेत एक किलोमीटर रस्ता बनवायला अंदाजे चाळीस लाख रुपये खर्च होतात. या योजनेच्या माध्यमातून देशात रोज १५६ किलोमीटर रस्ता निर्माण होतो – हे उद्दिष्ट मला आठवतं तसं आधी बरंच जास्त होतं – ते होत नाही असं दिसल्यावर हुशारीने उद्दिष्टच खाली आणलं गेलं. राजस्थानमध्ये मागच्या अकरा वर्षांत (२००० मध्ये ही योजना आली.) ८८६० नवे रस्ते निर्माण केले गेले. या रस्त्यांची लांबी ३४, ७९५ किलोमीटर आहे आणि यातून १०७०३ गावे जोडली गेली.

ही सगळी माहिती ऐकत असताना मला त्या अनामिक गावातील अनामिक चेहरे दिसत होते. विकासाच्या किमतीबद्दल आपण – ज्यांनी विकासाची फळे चाखली आहेत – बोलणे आणि त्यामुळे इतरांना संधी नाकारणे हा एक प्रकारचा दांभिकपणा आहे. रस्ते शहरात लागतात तसेच खेडयातही लागतात – फायदे आपण भोगायचे आणि त्यांच्या फायद्याची गोष्ट समोर आल्यावर मात्र पर्यावरण प्रेम जागे व्हायचे हे बरोबर नाही.

कार्यक्रम संपला. मंडपाच्या बाहेर अनेक स्त्रिया उभ्या होत्या – त्यांची जागा नेहेमी अशी परिघाबाहेर का – हा प्रश्न मला पडलाच. मी त्यांच्याशी गप्पा मारल्या.

Women in Rajsthan 7 January 12.jpg

आम्ही जेवलो.
टिपीकल राजस्थानी बेत होता – दाल बाटी आणि चुरम्याचे लाडू.

Churma Laddu Rajsthan 7 January 12.jpg

परत निघालो. तोवर मघाचा मंडप उतरवण्याचे काम जवळजवळ उरकलं होत. दोन तासांपूर्वीच्या कार्यक्रमाची नामोनिशाणी दाखवणारा उदघाटनाचा फक्त फलक तिथ होता.

इथं रस्ता नक्की होणार का – अशी शंका माझ्या मनात आली.
होईल इथं बहुतेक.
कारण दिल्लीचे ते अधिकारी. त्यांचे भाऊ इथं राहतात आणि त्यामुळे या अधिका-याच इथं नियमित येणं असतं.

उदघाटन झालेले सगळेच रस्ते इतके भाग्यवान असतात का पण?

*अन्यत्र पूर्वप्रकाशित

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रोज १५६ किमी ? इथे काही गडबड आहे का?
बाजपेईंच्या वेळी रोज दिवसाला ११ किमी रस्ता बनायचा, आणि युपीए -२ मध्ये .... फारच कमी असं वाचलय कुठेतरी.