“माझी गझल निराळी” या गझलसंग्रहाचे प्रकाशन
“माझी गझल निराळी” या गझलसंग्रहाचे प्रकाशन दि. १० नोव्हेंबर २०१३ रोजी दुपारी २.०० वाजता चंद्रपूर येथील चांदा क्लब ग्राउंडवर शेतकरी संघटनेच्या खुल्या अधिवेशनात शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी यांच्या शुभहस्ते आणि शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. रवी देवांग, स्वभापचे प्रांताध्यक्ष माजी आमदार अॅड. वामनराव चटप, पी.टी.आयचे माजी अध्यक्ष मा. वेदप्रताप वैदीक, माजी खासदार भूपेंद्रसिंग मान, माजी आमदार सौ. सरोजताई काशीकर, महिला आघाडीच्या प्रांताध्यक्षा सौ. शैलाताई देशपांडे, युवा आघाडीचे अध्यक्ष संजय कोले, अनिल धनवट, माजी मंत्री रमेश गजबे, अॅड दिनेश शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत विमोचन करण्यात आले.
“माझी गझल निराळी” या गझलसंग्रहाला जेष्ठ संगीतकार गझलगंधर्व सुधाकर कदम यांची प्रस्तावना लाभली असून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गझलगायक गझलनवाज भिमराव पांचाळे, प्रदीप निफ़ाडकर, स्वामी निश्चलानंद, किमंतू ओंबळे, प्रमोद देव यांचे अभिप्राय लाभले आहे. पुणे येथील शब्दांजली प्रकाशनने हा गझलसंग्रह प्रकाशित केला असून www.pustakjatra.com या संकेतस्थळावर ऑनलाईन विक्रीस उपलब्ध करण्यात आलेला आहे.
गझलसंग्रह : माझी गझल निराळी
पृष्ठे : ८८
किंमत : ७०/-
कवी : गंगाधर मुटे "अभय"
प्रकाशक : राज जैन
शब्दांजली प्रकाशन,
नर्हे गाव, पुणे
-------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------
दिनांक : १६-०९-२०१४
अंकूर वाङ्मय पुरस्कार - २०१३
माझी गझल निराळी’ गझलसंग्रहाला यंदाचा
स्व. सुरेश भट स्मृती गझल पुरस्कार जाहीर
महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रात गेल्या सव्वीस वर्षापासून कार्यरत असलेल्या व नवोदित साहित्यिकांचे एक हक्काचे विचारपीठ असलेल्या अंकूर साहित्य संघातर्फ़े दरवर्षी "अंकूर वाङ्मय पुरस्कार" देण्यात येतात. या सर्व पुरस्कारासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे ४३५ पुस्तके प्राप्त झाली होती. ५०० रू. रोख, शाल श्रीफ़ळ देवून अंकूर साहित्य संमेलनात सत्कार, मानचिन्ह, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सन २०१३ चे पुरस्कारासाठी १ जानेवारी २०१३ ते ३१ डिसेंबर २०१३ या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांचा विचार करण्यात आला. अंकूर वाङ्मय पुरस्कार - २०१३ च्या स्व. सुरेश भट स्मृती गझल पुरस्कारासाठी परिक्षक मंडळाने ’माझी गझल निराळी’ या गझलसंग्रहाची निवड केलेली आहे.
पुरस्कार वितरण नोव्हेंबर/डिसेंबर २०१४ मध्ये गोवा येथे होणार्या अ.भा. अंकूर मराठी साहित्य संमेलनात होणार आहे.
माझी गझल निराळी येथे वाचा.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
अभिनंदन मुटे सर.
अभिनंदन मुटे सर.
अभिनंदन मुटेजी. पुस्तकाचं
अभिनंदन मुटेजी.
पुस्तकाचं कव्हर खूप देखणं आहे. तुमची लेखणीही असंच सुंदर लिहीत राहील, हीच शुभेच्छा!
मनःपूर्वक अभिनंदन व पुढील
मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा!
अभिनंदन मुटेजी.
अभिनंदन मुटेजी.
अभिनंदन!
अभिनंदन!
बेफिकीरजी,वैवकुभाऊ,
बेफिकीरजी,वैवकुभाऊ, स्वातीताई
भिमराव दादांनी कैच्याकै लिहिलेले नाही. निदान मला तरी तसे वाटत नाही. "काव्याच्या प्रकृतीला अनुसरून अभिप्राय" हे तत्व आपण स्विकारायला हवे. हे लिहिण्याचे मी धाडस करत आहे कारण अभिप्रायदात्यांनी एकत्र बसून आपसात विचारविनिमय करून अभिप्राय लिहिलेले नाही; तरीही आलेले सर्व अभिप्राय समानार्थी आशय व्यक्त करणारेच आहेत.
"माझी गझल निराळी" पुस्तकातील अभिप्राय वाचले तर माझ्याशी सहमत व्हायला हरकत नसावी.
परत एकदा सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार.
काव्याच्या प्रकृतीला अनुसरून
काव्याच्या प्रकृतीला अनुसरून अभिप्राय" हे तत्व आपण स्विकारायला हवे.<<<
येथील काही गझलांवर अभिप्राय देताना आपण हे तत्व मनापासून विसरला होतात हेही विसरायला हवे का?
भिमराव दादांनी कैच्याकै लिहिलेले नाही<<< ते कसे कैच्याकै लिहितील? ते लिहीतच नाहीत. ते गायक आहेत.
अभिनंदन मुटे सर ! मुखपृष्ठ
अभिनंदन मुटे सर !
मुखपृष्ठ खूप छान आहे. सूचक आहे. तुम्ही शेतकर्यांच्या भावना मांडता, त्याला अनुसरून सर्व डिझाय्निंग आहे. डिझायनरला विशेष शुभेच्छा द्याव्यात.
दादांचा अभिप्राय अकारण व अवास्तव वाटतो.
<<< येथील काही गझलांवर
<<< येथील काही गझलांवर अभिप्राय देताना आपण हे तत्व मनापासून विसरला होतात हेही विसरायला हवे का? >>>
काही गझलांवर ????? जरा लिंक द्या बघू!
डॉ. अभय बंग यांचा
डॉ. अभय बंग यांचा अभिप्राय
Dr. Abhay Bang
SEARCH
Society for Education, Action & Research in Community Health
प्रिय श्री गंगाधर मुटे,
स. न.
’रानमेवा’ व ’माझी गझल निराळी’ मधील काही गझला वाचल्या. श्री शरद जोशी व किंमतु ओंबळे यांनी अतिशय सुयोग्य शब्दात तुमचे मुल्यांकन केले आहे असे वाटले. वर्ध्याच्या मातीत या गझला उगवल्या असल्याने अजूनच आपुलकी वाटली.
शुभेच्छासह
(स्वाक्षरी)
अभय बंग
आदरणीय डॉ. मधुकर वाकोडे यांचा
आदरणीय डॉ. मधुकर वाकोडे यांचा अभिप्राय.
वाकोडेजींच्या अभिप्रायाची
वाकोडेजींच्या अभिप्रायाची प्रतिमा दिसते आहे ती पोस्ट्कार्डाची स्कॅन कॉपी आहे काय ? खूप दिवसांनी पोस्ट्कार्ड बघितले मन हळवे झाले
वैवकु, ती पोस्टकार्डाची स्कॅन
वैवकु, ती पोस्टकार्डाची स्कॅन कॉपी आहे.
डॉ.विकासजी आणि भारतीजी आमटे
डॉ.विकासजी आणि भारतीजी आमटे यांचा अभिप्राय.
आदरणीय, डॉ.विकासजी आणि भारतीजी आमटे यांचा "माझी गझल निराळी" ला लाभलेला अनमोल अभिप्राय.
डॉ. भारती आमटे यांची
डॉ. भारती आमटे यांची प्रतिक्रिया वाचली (अभिप्राय ) छान आहे पटला
उत्तम बाज साधलेला आहे<<< ह्या एकाच वाक्यात त्या सर्वकाही सांगून गेल्यात असे मला वाटते मी ह्यालाच मुटेशैली म्हणत असतो जिचा प्रभाव माझ्या गझलेवर नसला तरी माझ्या मनावर खूप आहे .मला ही शैली खूप खूप आवडते
बाकी आशय विषयाबाबत इतकेच की प्रत्यक्ष जगून पाहिलेल्या क्षणांतून मुटेसरांची कविता बहरते फुलते-खुलते आणि दरवळत राहते
मुटेशैलीचा विजय असो !!!
धन्यवाद मुटेसर
(आपली दोनही पुस्तके न वाचताच अभिप्राय देत आहे त्याबद्दल क्षमस्व पण मला ती मिळतील(फुकटात..
) अशी काही सोय झाल्यास वाचूनही अभिप्राय देईनच (तोही फुकटात ;)).. )
प्रतिक्षेत ........
~वैवकु
मुटेशैलीचा विजय असो !!!<<<<
मुटेशैलीचा विजय असो !!!<<<<
<<<मुटेशैलीचा 'अभय' आहे तेच बास की राव अजून 'विजय' कशाला ????
असो
अभिनंदन मुटेसर अभिनंदन !!:)
नवाकु : ???? वैवकु : मी
नवाकु : ????
वैवकु : मी मार्चच्या पहिल्या आठवड्यात पुण्यात येतोच आहे. तेव्हा तुम्हाला पुस्तके नक्कीच मिळतील आणि तेही फुकटात.
पण एक मेख आहेच. मी फुकटात देईन पण तुम्हाला ती बरीच महाग पडतील आणि हे तुम्हाला नंतर कळेल की ह्याने तर आवळा देऊन भोपळा काढलेला आहे.
आवळा देऊन भोपळा काढलेला
आवळा देऊन भोपळा काढलेला आहे.<<
अजून तरी माझा माझ्या गझलसंग्रहाचा काही विचार सुरूही झालेला नाही त्यामुळे आपण निश्चिंत असा ....थोडक्यात ; भोपळा अजून पेरलाच नाही आहे तर उगवणारच कसा !

पण तुम्ही आधी पुण्यात या तर.... मला भेटा तर .... मग बघू ...पुढच्यापुढे हरी !!!!
अवांतर : तो जो कुणी आहे ना तो नवाकु नाही नएकु नावाने त्रिखंडत फेमस आहे
असो ...
माझ्या जीवनातला हा सोनेरी आणि
माझ्या जीवनातला हा सोनेरी आणि अविस्मरणीय दिवस. कदाचित माझ्या वाढदिवसानिमित्त मराठी रसिकांनी आणि शब्दांजली प्रकाशनचे प्रकाशक श्री Raj Jain-Patil यांनी दिलेली अनमोल भेट आहे.
माझे आजवर तीन पुस्तके प्रकाशीत झाली.
१) “रानमेवा” (काव्यसंग्रह) १० नोव्हेंबर २०१०
२) ” वांगे अमर रहे” (ललित लेख संग्रह) २२ जुलै २०१२
३) “माझी गझल निराळी” (गझलसंग्रह) १० डिसेंबर २०१३
पैकी दुसरी आवृत्ती काढायची बातमी “माझी गझल निराळी” ने ऐकवली. मराठी गझल रसिकांचे आणि शब्दांजली प्रकाशनचे प्रकाशक श्री Raj Jain-Patil आणि Nivedita Patil-Jain यांचे शतश: आभार.
तुषार देसले यांचा अभिप्राय
तुषार देसले यांचा अभिप्राय
प्रमोद गुळवेलकर
स्टेट बॅंक ऑफ़ हैदराबाद
शहाजंग शाखा, औरंगाबाद
दि : ०२-०२-२०१४
प्रिय श्री गंगाधर मुटे ’अभय’
यांस स. नमस्कार
आपली दोन्ही पुस्तके दोन दिवसात वाचून काढली. समाधान वाटले.
गझल संग्रहातील "दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे, कुठे लुप्त झाले फ़ुले-भीम-बापू, ते शिंकले तरीही" या गझल खूप उत्तम झाल्या आहेत. कवीचे तरल संवेदनाक्षम मनाचे प्रतिबिंब या रचनांतून उमटले आहे. "माझी ललाट रेषा, मजला फ़ितूर झाली’ ही एक अप्रतिम गझल. पुन:पुन्हा ही गझल वाचतांना कै. सुरेश भटांचा वसा चालवणारा कुणी एक भेटल्याचा आनंद वाटला. तुम्ही भटांची नक्कल करता, असे नव्हे पण त्यांच्या रचना वाचतांना येणार्या तरल अनुभूती, मोजक्या शब्दयोजनेतून मिळणारी चपखल अभिव्यक्ती आणि जगावेगळी फ़किरीवृती तुमच्या साहित्यकृतीत सम्यकपणे आढळतात.
तुमचा हात असाच लिहीता राहो, हि सदिच्छा व्यक्त करून हा लेखनप्रपंच थांबवतो.
अमर वांग्याविषयी नंतर लिहीन. औरंगाबादला कधी येणं केलंत तर भेटीमुळे स्नेह वृद्धिंगत होईल.
आपला
प्रमोद गुळवेलकर
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
तोंडी, लेखी व प्रयोगशाळेतही
तोंडी, लेखी व प्रयोगशाळेतही मेरीटचे गुण घेणारा
"गझलसंग्रह : "माझी गझल निराळी"
हल्ली अनेक कवी गझल लेखनाकडे वळले आहेत. अरबी, फारशी, उर्दू अशी होत होत गझल मराठीत आली. मराठीपूर्वी ती हिंदी व गुजराथीत आली. पूर्वीची गझल ही शराब आणि शबाब ह्या विषयाभोवतीच घुटमळत होती. आता ती विविधांगी बनत चालली आहे. जनजीवनातील अनेक सत्ये परखडपणे गझलेमध्ये मांडली जात असताना गंगाधर मुटे सारखे मातब्बर, कर्तबगार, प्रॅक्टिकल अनुभवी कवी गझलेच्या प्रेमात पडले व त्यातून व्यक्तिगत अनुभव अवलोकन व चिंतन याद्वारे सृजनशील लेखणीतून सत्य मांडण्यात शतप्रतीशत यशस्वी झाले व साकारला गझलसंग्रह "माझी गझल निराळी".
आपल्या दैनंदिन जीवनातील अनुभवाचं चिंतन त्यांनी आपल्या गझलेत ओतलं तेव्हा वाचकाला त्यातील यथार्थता पटते. हेच मुटेंच्या यशस्वी गझलेचं गमक आहे.
उदा.
"गाळून घाम विणले मी वस्त्र स्वावलंबी
केल्यात पार चिंध्या खिजवून पावसाने"
हा कृषकाच्या जीवनातील भयाण भेसूर असा अनुभव. या एकाच शेरात संपूर्ण कृषकाचे जीवनच समोर येते. अशा ताकदीचा यथार्थ शेर लिहिणारा गझलकार विरळाच.
एक सच्चा शेतकरी, शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता जेव्हा हे जाणतो की गझलेचे सहा शेर सहा स्वतंत्र कविता ठरू शकतात. वेगवेगळा आशय आनंद देऊ शकतात तेव्हा हा एक शेतकरी व्याकरणाचा अभ्यास करतो. गझल तंत्राचा अभ्यास करतो व यशस्वी गझल लिहितो. ही गोष्ट वाटती तेवढी सोपी नाही. मी एक रसिक या नात्याने त्याच्या चिंतनाला अभ्यासाला, अनुभवाला व त्यांच्या गझलांना वंदन करतो.
म्हटलेच आहे "सिर्फ बंदीशे अल्फाज काफ़ी नही गझल के लिये, जिगर का खूं भी चाहिये असर के लिये" आणि खरोखरच गंगाधर मुटे यानी आपल्या गझलांमध्ये प्रत्यक्ष प्राण ओतला म्हणून त्या परिणामकारक ठरल्या आहेत.
ज्यांच्या गझलांना सुधाकर कदमांची (पुणे) प्रस्तावना, भीमराव पांचाळेंचे पाठबळ, प्रदीप निफ़ाडकर, प्रमोद देव(मुंबई), स्वामी निश्चलानंद(अरुणाचल प्रदेश) यांच्या कौतुकाची छाप मिळावी त्या गझलांवर माझ्यासारख्या एका छोट्या व्यक्तीने तोंडी, लेखी व प्रयोगशाळेतही मेरीटचे गुण घेणाऱ्या ह्या गझलावर चार शब्द लिहिणे ही केवळ औपचारिकताच.
"मरणे कठीण झाले" ह्या पहिल्याच रचनेत आश्वासक भरवशाचं असं काहीच राहिलं नाही त्यामुळे माणूस भरकटत चालला. यदाकदाचित तो रस्त्यावर आला तरी त्याला चकवणारे असे खूप आहेत असा आशय व्यक्त होतो.
"दिसतात अभय येथे चकवे सभोवताली
रस्ताच जीवनाचा सुचणे कठिण झाले"
स्वलेखनाने स्वानंदा सोबत परमार्थही साधावा बघा हा शेर
"आनंद भोगताना परमार्थही साध्य व्हावा
असलेच कार्य कर तू दोहे मला म्हणाले"
कर्म और भाग्यका किताब है जिंदगी, पाप और पुण्य का हिसाब है, जिंदगी जेव्हा कर्म करताना भाग्य फळाला येते तेव्हा आपसूकच नशीब फळते.
"प्राक्तन फिदाच झाले यत्नास साधतांना
मोती पुढ्यात आले वाळूस गाळतांना"
भारतातील सद्य परिस्थितीचे वर्णन खालील शेरामध्ये बघा. सर्वांना नोकरी हवी मग शेती कुणी करायची असा काहीसा आशय.
निघून गेलेत शहाणे सर्व साहेब बनायला
मूर्ख आम्ही येथे उरलो, मोफत अन्न पिकवायला
आसवांची अनेक रूपे जसे बेजार आसवे, दिलदार आसवे, कलदार आसवे, हळुवार आसवे, अंगार आसवे, झुंजार आसवे रेखाटलेली आहेत "भांडार हुंदक्यांचे" या रचनेत. दुःखांत सोबतीला नाही कुणी सवे, साथ ज्यांनी निभवली ती फक्त माझी आसवे, असा काहीसा आशय असणारा हा त्यातील एक शेर.
धुत्कारले जगाने, नाकारले सख्यांनी
तेव्हा दिला मनाला आधार आसवांनी
शेतकरी ग्रामीण जनतेची परिस्थिती खूपच वाईट आहे. त्याला सगळेच नाडवतात. जंगली श्वापदे, शहरी नागरिक, सहकार, सावकार, निसर्गासह सगळेच. वर्षानुवर्षे हेच सुरू आहे. म्हणून आता त्याच्या समस्या संपतील असं काहीतरी करायला हवं. वाचा "शस्त्र घ्यायला हवे" ही गझलरचना. (पान क्र २८) नमुन्यादाखल एक शेर;
श्वापदे पिसाळलीत शस्त्र घ्यायला हवे
झोपले असेल शेत जागवायला हवे
गझलकार गंगाधर मुटे यांची शेती, शेतकरी, त्यांच्या समस्यांचा पूर्व अभ्यास व अनुभव. म्हणून बहुतेक सर्व गझलांमधून कळवळा, वास्तवता, गरिबी, त्याला छळणारे नेते, पुढारी, अधिकारी, उत्पन्न खर्च वगैरे सर्व शेती संबंधितच विषय आढळून येतो. आपमतलबी पुढारी, सत्ताधारी व विरोधकही सर्व नाटकी भाषा बोलतात. प्रलोभने पेरतात त्यांना त्यांची जागा दाखविली पाहिजे, याकडे अंगुलीनिर्देश करणारी "नाटकी बोलतात साले" ही रचना. त्यातील एक शेर बघा.
"कोणीतरी यांची आता पडजीभ उपटली पाहिजे
नाटकी बोलतात साले की गरिबी हटली पाहिजे"
गंगाधर मुटेंच्या गझलांत सुंदर अशा प्रतिमा व प्रतीकांची वापरही दिसून येतो; जसे शुभ्र कावळे, पांढरे पक्षी, चकवे, बत्तीस तारीख, मेड इन चायना, वाचाळ राजसत्ता, रानहेला, राजकीय पहेलवान वगैरे वगैरे. बघा हा जबरदस्त शेर;
"लोंढेच घोषणांचे दिल्लीवरून आले
येणार वित्त आहे बत्तीस तारखेला"
"सोकावलेल्या अंधाराला इशारा आज कळला पाहिजे
वादळ येऊ दे कितीही पण दीप आज जळला पाहिजे"
वरील शेर वाचला की आठवतो, "तुफानातील दिवे आम्ही तुफानातील दिवे, वादळवारा पाऊस धारा मुळी ना आम्हा शिवे" यूज अँड थ्रो च्या काळात माणसाचंही मन सुद्धा नाटकी झालं, बेभरवशाच झालं. असा आशयाचा हा शेर;
"चला वापरा एकदा आणि फेका हवी ती खरीदी नव्याने करा
इथे काळिजेही दिखाऊ-विकाऊ हृदय भासते मेड इन चायना"
पशू पक्षी ही किटके किती बघ मेळ करून राहती, आपत्ती येता कोणती अती संघटुनिया धावती, तू मानवाचा देह असुनि का न तुजही भावना, ऊठ आर्यपुत्रा झडकरी कर सामुदायिक प्रार्थना या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सामुदायिक प्रार्थनेच्या आशयासी साम्य असणारा मुटे यांचा हा शेर वाचा;
पाखरेही एकी करतात जरासे पंख फुटल्यावर
पण तुला कधी मिशा फुटणार? सांग माणूस म्हटल्यावर?
शेती करणे म्हणजे कनिष्ठता, मूर्खता याउलट नोकरी करणे म्हणजे श्रेष्ठपणा असा जो सध्या सामाजिक समज रूढ झाला आहे त्यावर मार्मिक टिप्पणी करताना मुटे लिहितात,
"शेती करून मालक होणेच मूर्खता
सन्मान मोल आहे कर अभय चाकरी"
जास्तीत जास्त शरीर उघडे टाकून कमीतकमी वस्त्र वापरण्याच्या ’फॅशन’वर आसूड ओढताना मुटे म्हणतात
"ललना पाहून कपडे शरमले
मते पाहताच नेते नरमले"
भ्रष्टाचारावरही श्री मुटे आसूड ओढून लिहितात की, ही व्यवस्थाच किडली आहे
"टाळूवरील लोणी खाण्यास गुंतला जो
सत्कारपात्र तोची मशहूर थोर झाला"
"सरकारी खजिन्यावर मारून घ्यावा हात
चिरीमिरी दिली तरी मिटून जाईन वाद"
एकंदरीत अशा ७४ दालनांचा हा वैभवशाली खजिना आहे. याला हवा रत्नपारखीच. वाचकही भाग्यवान, हा खजिना वाचून आणि भाष्य करून मी धन्य झालो. पण यावरील हे भाष्य किंवा या समीक्षणात मावेल एवढी मुटेंची गझल लहान नाही. ती संग्रहीच असावी आणि वेळोवेळी वाचावी, अभ्यासावी अशी आहे.
गझलकार श्री मुटे यांना पुढील साहित्य प्रवासासाठी शुभेच्छा.
- तुळशीराम बोबडे
अकोला
---------------------------------------------------------------------------------------------------------------
"माझी गझल निराळी" प्रस्तावना
"माझी गझल निराळी" प्रस्तावना - श्री सुधाकर कदम
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले……..!
कोणताही साहित्यप्रकार हा त्या-त्या साहित्यिकाच्या स्वभावानुरूप आकार घेत असतो. मग ती कथा असो, कादंबरी असो, वा कोणताही काव्यप्रकार असो... कथा वाचूनही लेखकाच्या स्वभावाचे पैलू कळतात की हा लेखक कोणत्या धाटणीचा आहे. आणि कवितेत तर त्या कवीचे अंतरंगच उलगडून ठेवलेले असतात. शिवाय कवी हा इतर कोणत्याही साहित्यिकाहून अधिक संवेदनशील असतो. अगदी झाडावरून गळणारं पिकलं पान पाहून सुद्धा त्याचं मन हेलावून जातं. केवळ कविता वाचूनच जातीवंत कविचा जीवनपट नजरेसमोर उभा ठाकतो.
गझल हा तसा तंत्रानुगामी काव्यप्रकार... यात मात्रांचे, वृत्ताचे बंधन असल्यामुळे फार कमी कवी या प्रकाराकडे वळले आहेत. आणि या प्रकाराकडे वळलेल्यांमध्येही फार कमी लोकांनी चांगली गझल मराठी साहित्याला दिली आहे. गझलकारांचा आकडा शेकड्यांनी असला तरी सकस गझल लिहिणा-यांची संख्या उणीपुरीच आहे.
गंगाधर मुटे हे असेच एक उल्लेखनीय नाव आहे. मातीचं गाणं लिहिणार्या या कवीची नाळ मातीशी कायम जुळलेली आहे. रानमेवा हा त्यांचा काव्यसंग्रह आधीच प्रकाशित झाला आहे. मुळात शेतकरी असल्यामुळे मातीशी तसेही नाते जडलेले. शिवाय गंगाधर मुटे हे शेतकरी संघटनेचे खंदे कार्यकर्ते असल्यामुळे शेतक-यांच्या अडी-अडचणींना, व्यथांना त्यांच्या लेखणीतून वाचा फुटलेली दिसते.
पुसतो सदा आसवांना तो पदर भुमिचा ओला
आसू पुसता हळूच पुसतो आली जाग शिवारा
अशी रचना त्यांच्या लेखणीतून सहज साकारते. अनेकदा त्यांची लेखणी पीक, पेरणी या विषयावर मार्मिक टीप्पणी करते. अशावेळी व्यथा सांगत असतानाच ते पुसटसे बंडखोर देखील होताना दिसतात... त्यांची ही एक गझल पहा...
कसा जोम यावा खुरटल्या पिकांना, नवे बीज ते अंकुरावे कसे?
तणांचाच जेथे असे बोलबाला, तिथे अन्य काही रुजावे कसे?
पुन्हा आज होऊ नये तेच झाले, कशा थांबवाव्यात वाताहती?
हवेनेच केला जिथे कोंडमारा, तिथे प्राण जाणे टळावे कसे?
तुझा पिंड आहेच विश्वासघाती, तसा एक अंदाज आहे मला
तरी जीव गुंतून जातो तुझ्याशी, मनाचे पिसे कुस्करावे कसे?
जरी सत्य तू बोलशी मान्य आहे, परी त्यास आहे कुठे मान्यता?
सही आणि शिक्क्याविना व्यर्थ सारे, पुरावे तुझे मान्य व्हावे कसे?
कशी एकटी हिंडते रानमाळी, जरी अर्धवेडी भिते ना कुणा
तिला फ़क्त भीती जित्या माणसांची, पशूंना तिने घाबरावे कसे?
कसा व्यर्थ नाराज झालास आंब्या, वृथा खेद व्हावा असे काय ते
फ़ळे चाखण्याचेच कौशल्य ज्याला, तया ओलणे ते जमावे कसे?
शिवारात काळ्या नि उत्क्रान्तलेल्या खुज्या माकडांचा धुमाकूळ तो
जिथे कुंपणे शेत खाऊन गेली, तिथे त्या पिकांनी लपावे कसे?
’अभय’ काळजी त्या मृताची कशाला, स्मशानात जागा हवी तेवढी
समस्या इथे ग्रासते जीवितांना, विसावा कुठे अन् वसावे कसे..!
(खुरटणे = वाढ खुंटणे, तण = पिकांत वाढणारे अनावश्यक गवत, ओलणे = ओलीत करणे,पाणी देणे)
कसा जोम यावा खुरटल्या पिकांना, नव्या पिकांची नवीन भाषा, मरणे कठीण झाले, भुईला दिली ओल नाही ढगाने, भाजून पीक सारे पाऊस तृप्त झाला, आत्महत्या बळीच्या तू रोख वामना, गहाणात हा सातबारा... या त्यांच्या रचना विशेषत्वाने शेतक-यांच्या व्यथा मांडणा-या आहेत. पण गंगाधर मुटे हे कुठेही एकाच विषयात अडकून पडलेले दिसत नाहीत. मातीचं गाणं लिहिणारा हा कवी शृंगार देखील काव्यात तितक्याच खुबीने मांडताना दिसतो... आणि...
ती बोलली तरी का शब्दास नाद येतो
त्या बोलक्या स्वरांचे झंकार चित्तवेधी
असा एखादा शेर आपल्याला वाचायला मिळतो.
मक्ता या गझलेतील एका परंपरेची कास गंगाधर मुटे यांनी धरलेली दिसते. मक्ता म्हणजे कवीचे नाव अथवा टोपणनाव असलेला शेवटचा शेर... गंगाधर मुटे हे काव्यात आपले अभय हे टोपणनाव वापरतात. मक्ता लिहिताना एका गोष्टीची विशेष काळजी घ्यावी लागते. ती म्हणजे मक्त्यामध्ये आपले नाव लिहिताना तेथे एखाद्या मौल्यवान शब्दाची जागा वाया तर जाणार नाही ना ? किंवा हे नाव त्या शेराच्या अर्थाला पूरक आहे ना ? या गोष्टींची काळजी घेणे. आणि अशी काळजी गंगाधर मुटे यांनी घेतलेली दिसते... मक्ता असलेले त्यांचे काही शेर पहा...
संचिताचे खेळ न्यारे... पायवाटा रोखती
चालता मी अभय रस्ता काळही भारावला
अभय एक युक्ती तुला सांगतो मी, करावे खरे प्रेम मातीवरी या
भुईसंग जगणे... भुईसंग मरणे... भुईसंग झरणे... वगैरे वगैरे
आता अभय जगावे अश्रू न पाझरावे
आशेवरी निघावे ही वाट चालताना
नको रत्न मोती, न पाचू हिरे ते
अभय ते खरे जे मिळाले श्रमाने
आत्मह्त्या बळीच्या तू रोख वामना
मी अभयदान इतके मागून पाहिले
घे हा अभय पुरावा त्यांच्या परिश्रमाचा
ती माणसेच होती जी कोहिनूर झाली
गंगाधर मुटे यांना कवितेच्या, गझलच्या रुपाने जगण्याचे संचित गवसले आहे. म्हणूनच तर ते म्हणतात...
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले
खूप काही चांगले लिहिण्याची क्षमता असणा-या गंगाधर मुटे यांना पुढील गझल लेखनासाठी शुभेच्छा...
जागतिक दृष्टिदान दिन सुधाकर कदम
सोमवार, १० जून २०१३ जेष्ठ गझलगायक, संगीतकार
पुणे
=^= ० =^= ० =^= ० =^= =^= ० =^= ० =^= ० =^= ० =^= ० =^= ० =^= ० =^= ० =^= ० =^= ० =^= ० =^= ० =^=
परिघाबाहेरची गझल
परिघाबाहेरची गझल
आनंदऋतू ई-मॅगझिनच्या निमित्ताने दर्जेदार कविता आणि गझल शोधता शोधता गंगाधर मुटे साहेबांची कविता नजरेस पडली. कविता, व्यंग, नागपुरी तडका आणि गझल अशा विविध माध्यमातून चौफेर स्वैर साहित्य भ्रमंती करणाऱ्या एका संवेदनशील आणि ऋजू व्यक्तिमत्वाशी ओळख होण्याचा योग जुळून आला. आनंदऋतू ई-मॅगझिनमध्ये दर महिना कविता आणि गझल प्रकाशित करण्याची मुटे साहेबांनी परवानगी दिल्याने नव्याने झालेली ओळख परिचयात बदलली. तशी प्रथमदर्शनीच वेगळी वाटणारी त्यांची गझल पण परिचयाची वाटू लागली.
सुरेश भट साहेबांनंतर काही काळापुरती गझल ही चार लोकात आणि चार गावात कैद झाली होती. तेच तेच, त्याच त्याच भाषेत आणि शैलीत लिहणारे लोक स्वत:ला गझलकार समजू लागल्याने, गझल त्याच त्याच साच्यात गुदमरली होती. कल्पना करून वृत्तांमध्ये बसवलेली कपोलकल्पित दु:खे! वास्तवाशी सुतराम सोयरसुतक नसलेल्या स्वप्नाळू प्रतिमा आणि अलंकारांनी गझल गुदमरली होती. शहरी भागाचा आणि एका ठराविक वर्ग समाजाचा गझलेवर ठसा स्पष्टपणे दिसू लागला होता. काही काळापुरती तर गझल एका ठराविक समाज विशेषाची मक्तेदारी बनून गेली होती. एका ठराविक समाज विशेषाबाहेरचं किंवा ठराविक परिघा आणि भूगोला बाहेरचं काही लिहणं किंवा मांडणं हे गझलेला वर्ज्य मानलं गेलं होतं. कोणी तसा प्रयत्न केलाच, तर त्याला गझलेच्या व्याकरणात रक्तबंबाळ करून, शाब्दिक कसोट्यांमध्ये जेर करून स्वत: होऊन गझल लेखानातून बहिष्कृत करण्यासा भाग पाडलं जाऊ लागल्याने, गझलेमध्ये तोच तोच पणा आला. त्यामुळे साहजिकच सुरेश भटांनी नावारुपाला आणलेली आणि लोकाश्रय मिळवूने दिलेली गझल लोकांपासून दुरावली आणि एका आम्ही म्हणजे मैफिल मानणाऱ्या एका वर्तुळात सिमटली गेली.
हे सर्व सांगण्याचे प्रयोजन म्हणजे गंगाधर मुटे साहेबांची गझल. ती वाचता क्षणीच, परिघाबाहेरची वाटते. तिच्यामध्ये कदाचित ती गझलेची नजाकत नसेलही, पण जी गझलेची रग आहे, ती मात्र सोळा आणे अस्सल आहे. प्राचार्य प्र. के. अत्रेंनी उत्कृष्ट आणि सकस साहित्य कसं असावं? यासंबंधी एका ठिकाणी असं म्हटलं होतं की, "ऊस जसा ज्या जमिनीत रुजून येतो, त्या जमिनीची त्याला गोडी येते. तसं खरं साहित्य ज्या जमिनीतून फुलून येतं, तिचा त्याला गंध यावा." गंगाधर मुटे साहेबांची गझल या परिमाणाला पुरेपूर उतरते. त्यांची कोणतीही गझल वाचली, तरी तिच्यामध्ये प्रथमच जाणवतो तो तिचा अस्सल गावरान बाज आणि शेतकरी साज! या गझलेमध्ये एक बंडखोरपणा आहे. पण त्यात उर्मटपणाचा लवलेशही नाही हे या गझलेचं मोठं वैशिष्ट्य आहे. वाचकाना या गझलेमध्ये चंद्र तारे, ऊन वारे, प्रेमाचे शिडकावे आणि प्रियकर प्रियेसीचे शृंगारमय बारकावे कमीच सापडतील, पण शेतकऱ्यांचा आक्रोश आणि पीडितांच्या व्यथा मात्र भरभरून मिळतील. कारण ही गझलच लिहली गेली आहे, शोषितांच्या आणि श्रमकऱ्यांच्या ऊपेक्षेला वाट करून द्यायला! श्रमिकांची दु:खे कधी गझलेमध्ये सांडलेली दिसत नाहीत, कारण गझलेमध्ये मांडण्याइतकी ती सुवासिक आणि अलंकारिक नसतात, असा एक अघोषित वृथा समज पसरवण्यात आला आहे. गंगाधर मुटे साहेबांची वास्तववादी गझल या गैरसमजाला छेद देण्याएवढी पूर्ण सक्षम नक्कीच आहे.
"माझी गझल निराळी" या गंगाधर मुटे साहेबांच्या गझल संग्रहास मन:पूर्वक शुभेच्छा!
किमंतु ओंबळे
संपादक
दिनांक: ५ मे २०१३ आनंदऋतू ई-मॅगझिन
ठाणे
== ० == ० == ० == ० == ० == == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == ० ==
परीक्षकांचीच परीक्षा घेणारा
परीक्षकांचीच परीक्षा घेणारा गझलसंग्रह
दि. १४/०२/२०१४
प्रति,
श्री. गंगाधर मुटे,
आर्वी छोटी, ता. हिंगणघाट, जि. वर्धा
सप्रेम नमस्कार
अलीकडेच प्रकाशित झालेली तुमची 'वांगे अमर रहे' व 'माझी गझल निराळी' ही दोनही पुस्तके वाचली. वाचकाला अस्वस्थ करण्याचे व विचार करायला भाग पाडण्याचे काम या लिखाणातून निश्चितपणे झाले आहे. कृषिप्रधान भारतातील, शेतात घाम गाळणार्या शेतकरी समाजाचे दुर्दैवी भयाण वास्तव परिणामकारक शब्दांत या लिखाणात व्यक्त झाले आहे.
'वांगे अमर रहे' या लेखसंग्रहातील प्रत्येक लेखात तुम्ही मांडलेली व्यथा भारताच्या अर्थव्यवहारातील व्यंगांवर नेमकेपणाने बोट ठेवणारी आहेच आणि त्याचबरोबर 'शेतकर्याचा आसूड' ओढण्याची ताकदही त्यातून समर्थपणे प्रगट झाली आहे.
गणित विषयात पदवी घेतलेल्या तुमच्यासारख्या शेतकरी कुटुंबातील तरुणाकडून या साहित्यकृतींची निर्मिती अधिकच अभिनंदनीय व परीक्षकाचीच परीक्षा घेणारी झाली आहे. दुसर्या बाजुने असेही म्हणता येईल की, शेतकरी संघटनेने मांडलेले अर्थशास्त्र कदाचित इतरांपेक्षा अधिक बारकाव्याने तुम्हाला समजले व त्यामुळेही ते परिणामकारक शब्दांत तुमच्या साहित्यात उतरले आहे. साहित्यनिर्मितीसाठी अनेक बाजू किंवा उद्देश्य असू शकतात. तथापि, सामाजिक अन्यायाविरुद्ध पोटतिडीकीने जी वेदना व्यक्त होते ती सामाजिक परिवर्तनाकडे नेमकेपणाने अंगुलिनिर्देश करणारी ठरते आणि म्हणूनच मूल्यवान ठरते. तेच मूल्य आपल्या पुस्तकांतील या शब्दांना प्राप्त झाले आहे असे म्हणणे अतिशयोक्त ठरू नये. 'आनंदाचे डोहीं, आनंद तरंग' याप्रमाणे आनंदाच्या डोहात डुंबण्याचा अनुभव घेण्याचे सामर्थ्य या शब्दांत आणि अनुभूतीत नसेल तथापि, तुकारामांच्या अभिव्यक्तीतील 'नाठाळाचे माथां, हाणूं काठी' असा आत्मविश्वास त्यांतून व्यक्त झाला आहे. समाजातील कुप्रथा, जातीपातींच्या अतूट भिंती आणि लोककल्याणकारी राज्याच्या नावाने चाललेल्या भ्रष्ट कारभारातील विसंगतीवर वेगवेगळ्या कालखंडात अनेक समाजधुरीणांनी (उदा. गाडगेबाबा, महात्मा फुले इ. इ.) कठोर शब्दांत आवाज उठविला याची आठवण करून देणारा तुमचा आक्रोश आहे असे वाटते. या पुस्तकांच्या निमित्ताने तुलना करण्यासाठी मी जे लिहिले आहे त्यामुळे काहीना आश्चर्यही वाटेल. परंतु, ज्या देशात, आजच्या परिस्थितीत, घाम गाळणारा व कष्ट करणारा जगाचा पोशिंदा शेतकरी लाखोंच्या संख्येने आत्महत्या करतो आहे त्या परिस्थितीत कोणत्या शब्दांचा प्रयोग करावा? शरीराला महारोग झाला म्हणजे त्या शरीराची संवेदना नष्ट होते; तथापि, त्याच्यावरही उपचार करता येऊ शकतात. मात्र, आज समाजमनाला बधीरतेचा असा कोणता रोग झाला आहे की ज्याचा शोध घेऊन त्यावर उपचार करणे कठीण व्हावे, अशक्यप्राय व्हावे? त्या व्यवस्थेचे वर्णन-विश्लेषण कोणत्या शब्दांत करावे? अश्या परिस्थितीत तुमच्यासारखा तरूण आपल्या ठिकाणी असलेल्या प्रतिभेच्या माध्यमातून काही मांडतो आहे, लिहिण्यासाठी सुधारण्याच्या अपेक्षेने सतत धडपडतो आहे त्यामुळे अशा प्रकारे तुलनात्मक मांडण्याचा प्रयोग मी करतो आहे.
सन १९८० नंतरच्या दोन दशकांत महाराष्ट्रात शेतकरी संघटनेचे वादळ उठले. भूतकाळाचे अचूक विश्लेषण आणि भविष्यकाळाचा नेमका वेध घेणारे शरद जोशी यांचे नेतृत्व संघटनेला लाभले. संघटनेच्या भरतीचा हा काळ. या भरतीच्या लाटा छातीवर झेलण्यासाठी असंख्य तरूण यात उतरले. शतकानुशतके घाव झेलून वेदना मुकी झालेल्या व सदान् कदा मनं मारली जाऊन मुर्दाड झालेल्यांना नवी ऊर्मी, नवी प्रेरणा या विचाराने निश्चितपणे मिळाली. लाखोंच्या संख्येने शेतकरी भाऊबहिणी रस्त्यावर उतरले. शेतकर्याच्या व कष्टकर्याच्या स्वातंत्र्याची प्रेरणा घेतलेल्या आणि घरदार सोडून काम करण्यासाठी तयार झालेल्या तरूण संघटनापाईकंची फौज उभी राहिली. पारतंत्र्यानंतर प्रथमच शेतकरी भावांच्या बरोबरीने मायभगिनी तुरुंगात जाण्यासाठी घराबाहेर पडल्या. धास्तावलेल्या स्वकीयांच्या सरकारातील आमच्याच राज्यकर्त्या पोरांनी आपल्या भावांच्या छातीत गोळ्या घालून त्यांचे बळी घेतले, मायभगिनींना लाठ्याकाठ्यांनी सोलून काढले. महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर इतर राज्यांतही शेतकरी संघटनेच्या प्रभावाखाली शेतकर्यांची एकजूट झाली. राज्य सरकारे आणि केंद्र सरकार यांना संघटनेच्या अर्थशास्त्रीय विचारांची दखल घेण्याशिवाय पर्याय उरला नाही. मात्र संघटनेच्या मागण्यांची पूर्तता अजूनही पूर्णत्वाने झालेली नाही. त्यामुळे चळवळीचे सामर्थ्य टिकविणे आणि वाढविणे आवश्यक असल्याचा तुम्ही मांडलेला आशावाद योग्यच आहे.
संघटनेचा विचार जितका मूलगामी आणि परिवर्तनवादी तितका तो समाजाच्या विविध थरांतून व विविधांगांतून खोलवर रुजतो. शेतकरी संघटनेला असे भाग्य लाभले. संघटनेच्या विचारांचा व आंदोलनांचा प्रभाव साहित्यक्षेत्रातही झालेला आहे. विशेष करून ग्रामीण साहित्यिक नव्याने लिहू लागले. एक नवीन साहित्यधारा तयार झाली. सकस आणि परिवर्तवादी साहित्यलेखकांची दमदार पिढी संघटनेच्या विचाराने प्रभावित होऊन लिहू लागली, बोलू लागली. आज ही यादी लक्षात घेण्याइतपत मोठी झाली आहे. संघटनेच्या या मंतरलेल्या कालखंडात काम केलेल्यांची पिढी आता वृद्धत्वाकडे झुकली आहे. अनेकजण परलोक(!)वासी झाले आहेत. परंतु, हा वारसा समर्थपणे पुढे सुरू राहील याचा भरवसा तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांकडे पाहून 'अभय' देणारा वाटतो.
'घामाची कत्तल जेथे, होते सांजसकाळी
तुतारी फुंकते तेथे, माझी गझल निराळी' आणि
'युगानुयुगे ते बोलले, ऐकत आलो आम्ही
आता माझ्या मतल्याची ऐकवण्याची पाळी'
ही तुमच्या गझलेमधली भूमिका केशवसुतांच्या 'तुतारी'ची आठवण जागविणारी आहे यात शंका नाही.
सभोवतालचे भयाण वास्तव आणि उद्ध्वस्त ग्रामव्यवस्था यांचे चित्रण वेगवेगळ्या गझलांमध्ये टोकदार शब्दांत व्यक्त झाले आहे.
'बाभूळ, चिंच, आंबा; बागा भकास झाल्या
मातीत ओल नाही, तगणे कठीण झाले'
'शिवारात काळ्या, नि उत्क्रांतलेल्या खुज्या माकडांचा धुमाकूळ तो
जिथे कुंपणे शेत खाऊन गेली, तिथे त्या पिकांनी लपावे कसे?'<
'टाळले होते फुलांनी, आयुष्यभर भेटायचे
आज मात्र सडा पडलाय, मस्त तिरडी सजवायला'
'दिसतात अभय येथे चकवे सभोवताली
रस्ताच जीवनाचा सुचणे कठीण झाले'
'विज्ञानाने हात टेकले अन् बुद्धीही हतबल झाली
पूजन-अर्चन, जंतर-मंतर, तमाम तेव्हा करून गेलो'
अश्या प्रकारच्या ओळींतून हे वास्तव स्वरूपात व्यक्त झाले आहे. जीवन जगण्यातील हतबलता आणि त्यामुळे होणारी आत्महत्या याची व्यथा
'असे गैर ती आत्महत्या कधीही, म्हणे कास्तकारास समजावुनी
परी कारणांचा जरा शोध घ्यावा, अशी सुज्ञता दाखवेना कुणी'
अश्या ओळींतून व्यक्त झाली आहे. तरीसुद्धा या प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडण्याची जिद्द ठाम आहे.
'राजसत्ताच कोपली बघ, तुझ्या श्रमाच्या कमाईवर
तुझी शक्ती मनगटात तू, पूर्ण एकवटली पाहिजे'
'आता अभय जगावे अश्रु न पांघरावे
आशेवरी निघावे ही वाट चालताना'
या ओळींमधून तुमची संकटावर मात करण्याची लढावू वृत्ती व्यक्त झाली आहे.
राजकारणी आणि एकूणच भ्रष्ट राजसत्ता यांचे विकृतिकरण नेमक्या शब्दांत गझलांमधून व्यक्त झाले आहे.
'घराणे उभे राहिले गावगावी, कुठे लोकशाहीस नेतो आम्ही?
सग्यासोयर्यांचे अता राज्य आले, पदे भोगण्याला नवी वारसे'
'आम्हास नाही कुठेच सत्ता, कुठेच नाही अभय पदांचे
लबाड वंशात जन्म ज्यांचा, तमाम त्यांचा पुढार आहे'
'जरा गंध नाही मुळी झोपडीला, नव्या इंडियाच्या युगाचा नव्या
कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू, मिटवले कुणी पावलांचे ठसे'
'लोंढेच घोषणांचे, दिल्लीवरून आले
येणार वित्त आहे, बत्तीस तारखेला'
'भ्रष्ट आचारास सत्ता, मुख्य झाला स्रोत आहे
घाव घाला केंद्रस्थानी, एकदा द्या मात अण्णा'
या प्रकारच्या अनेक गझलांमधून या विकृतीचे चित्र मांडले गेले आहे ते निश्चितच विषण्ण करणारे तर आहेच आणि त्याच बरोबर विचार करायला लावणारे आहे. या सगळ्या विसंगतीत तुमची मातीशी असलेली अतूट नाळ
'अभय एक युक्ती तुला सांगतो मी करावे खरे प्रेम मातीवरी या
भुई संग जगणे, भुई संग मरणे, भुई संग झरणे वगैरे वगैरे'
या शब्दांमधून व्यक्त झाली आहे, ती खरोखरी भावणारी वाटली यात काही शंका नाही.
गझल या काव्यप्रकाराची हाताळणी तुम्ही अगदी अलीकडे सुरू केली तथापि त्यात जे लिखाण केले त्यामुळे तुमच्या प्रयत्नांना दाद देणे भाग आहे. मात्र त्याच वेळी तंत्राच्या मार्गाने जाताना अंतःकरणातल्या ऊर्मी व्यक्त करताना काही राहून तर जात नाही ना याचा विचार होण्याची आवश्यकता व्यक्त करावीशी वाटते.
'वांगे अमर रहे' या लेखसंग्रहातील शेवटचा 'असा आहे आमचा शेतकरी' हा लेख सर्वांनाच अंतर्मुख व्हायला लावणारा आहे. आणि 'शेतकरी समाजासाठी कार्य करणे हे तुलनेने अधिक कठीण काम असले तरी ऐतिहासिक आणि महान कार्य आहे याची खूणगाठ मनाशी पक्की बांधून घेणे गरजेचे आहे' असा व्यक्त केलेला आशावाद बरेच काही सांगून जाणारा आहे. एकूणच सर्व लेखसंग्रह अभ्यासनीय झाला आहे
पुस्तके वाचण्याची संधी जाणीवपूर्वक करून दिली याबद्दल मनापासून धन्यवाद आणि पुढील साहित्यिक वाटचालीसाठी अंतःकरणपूर्वक शुभेच्छा.
श्री. श्याम पवार
महाळुंगे (इंगळे), जि. पुणे
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
गझलविश्वाची परिभाषा बदलणारा
गझलविश्वाची परिभाषा बदलणारा गझलसंग्रह : ’माझी गझल निराळी’
मागच्या विजयादशमीलाच 'माझी गझल निराळी' हा गंगाधर मुटेंचा गझलसंग्रह प्रकाशित झाला आणि लागलीच दुसरी आवृत्ती. “वाह! हार्दिक शुभेच्छा गंगाधर मुटेजी !!” असेच उद्गार निघाले, जेव्हा ही बातमी ऐकली. या गझलसंग्रहाची प्रकाशनापूर्वीच अनेकांना प्रतीक्षा होती त्यापैकी मी सुद्धा एक होतो. शेतकर्यांच्या वेदनांची कैफियत मांडण्यासाठी त्यांनी गझल हा काव्यप्रकार निवडावा हेच मुळी धाडसाचे काम आहे. हा गझलसंग्रह विषयाच्या अनुषंगाने अद्वितीय असाच आहे. “शेतकर्यांचा आसूड” या महात्मा फुलेंच्या पुस्तकानंतर शेतकर्यांच्या जीवनाला समग्र स्पर्श करणारे लिखाण माझ्या वाचनात आले नव्हते. ही पोकळी गंगाधर मुटेंच्या समर्थ लेखणीने भरून काढली आहे.
मी तसा या प्रांतात नवखाच. दोनशेच्या आसपास गझला लिहिल्यानंतर मला अद्यापही हे उमगले नाही की नेमके मी कोणासाठी लिहीत आहे. परंतू गंगाधर मुटेंकडे मात्र याचे स्पष्ट उत्तर आहे. त्यांचे लेखन त्या तमाम कष्टकऱ्यांसाठी आहे ज्यांच्याकडे या उद्दाम राज्यकर्त्यांनी युगानुयुगे जाणून बुजून दुर्लक्ष केले आहे.
असेच एकदा फेसबुकवर पडणार्या शेकडो गझलांच्या पावसाचा आनंद लुटत आणि अधून मधून एखादा शेर लिहीत बसलो होतो. अनेक विषय होते - हृदय आणि त्याच्या विविध विकारांचा आशय असलेले, 'उमदा खयाल' वाले. तेवढ्यात मेसेज बॉक्स मध्ये प्रसिद्ध विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, लेखक, कवी, असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व लाभलेले माझे स्नेही, अमर हबीब यांचा मेसेज डोकावला. तो असा होता- “काय हो, आपल्याला परिचित एखादा शायर आहे का, जो शेतकर्यांच्या दयनीय स्थितीवर लिहितो?” मला सुरुवातीला वाटले अमर हबीबजींना असे म्हणावयाचे आहे की “काय हो, तुम्हाला काही उद्योगबिद्योग नाही का? कसल्या गझला लिहिता? जरा ज्वलंत सामाजिक विषयाचे भान ठेवून लिहीत चला.” परंतू त्यांना खरेच कुठेतरी याच विषयावर व्याख्यान द्यायचे होते. मी विचारात पडलो 'गझल आणि शेतकरी'! बापरे!! याप्रसंगी वीज चमकल्यागत गंगाधर मुटे हे नांव माझ्या डोळ्यासमोर आले आणि लागलीच मी त्यांना गंगाधर मुटें हेच एकमेव व्यक्तिमत्त्व शेतकर्यांची गार्हाणी गझलेतून मांडते हे बिनदिक्कतपणे सांगितले होते..
एकंदर काय तर हजारोंच्या घरात आज महाराष्ट्रात मराठी गझलकारांची संख्या गेली असूनही, कास्तकारांच्या मूक वेदनांना समाजासमोर मांडणारे गंगाधर मुटे हेच एकमेव नांव! हा स्तंभ मला टाळताही आला असता परंतू मुद्दाम लिहितोय. गझलेचे अध्वर्यू सुरेश भट यांनी मराठी गझलेचे दालन येणार्या पिढ्यांसाठी खुले केले हे अंतिम सत्य. सुरेश भटांनंतर सर्वार्थाने मराठी गझलेचा झेंडा अटकेपार रोवणारे दोन व्यक्तिमत्त्व मला ज्ञात आहेत, एक इलाही जमादार व दुसरे भीमराव पांचाळे! याचा अर्थ असा मुळीच नाही की आम्ही निव्वळ सुमार लिहितो...!
काय आहे ही गझल? फक्त दोन ओळींची पूर्ण कविता? तरीही अभिव्यक्तीचे एक सशक्त माध्यम. आज माझ्यासारख्या पामराकडेही १९४ अक्षरगणवृत्तं आणि ४६ मात्रावृत्तांची यादी का यावी? अर्थातच मराठी मातीत गझलेची पाळेमुळे आता अगदी खोलवर रुजू लागली आहेत. गंगाधर मुटेंच्या 'माझी गझल निराळी' या गझलसंग्रहाची पहिली आवृत्ती हातोहात संपणे हे त्याचेच द्योतक आहे!
काव्यलेखनाचा हा प्रपंच समाज घडवण्यासाठी केलेला पाहून आनंद होतो. शेतकर्यांच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांच्या संघर्षाची मशाल सदैव तेवती ठेवण्याचे कठीण काम गंगाधर मुटेंजीनी लीलया पेलले आहे. ८८ गझलांचा हा संग्रह गझलविश्वाची परिभाषा बदलणारा असा आहे.
घामाची कत्तल जेथे, होते सांज सकाळी
तुतारी फुंकते तेथे, माझी गझल निराळी
या मतल्याने त्यांनी आपली गझल सुरू करून पुस्तकाच्या अगदी सुरुवातीलाच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. उठसूट गझलेचे वाटोळे करत सुटलेल्या बाजारबुणग्यांना खालील शेर बरेच काही सांगून जातो.
शब्दांची गुळणी नोहे, नव्हेच शब्द धुराडा
निद्रिस्थी जागवण्याला, गातो शेर भुपाळी
अस्मानी सुलतानीच्या फेर्यांत अडकलेला शेती व्यवसाय अधोरेखीत करताना ते म्हणतात,
अडदांड बेत ओला शिजवून पावसाने
केला शिवार खच्ची भिजवून पावसाने
वातानुकूलित काव्य आणि रणरणत्या उन्हात कष्टकर्यांच्या घामातून झरणारे काव्य, इंडिया आणि ग्रामीण भारतातील फरक स्पष्ट करून जाते. हा गझलसंग्रह त्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण वाटतो.
तुझे तडाखे सोसून काया झिजून गेली सुकून गेली
तरी निसर्गा ! कुठे मनाने यत्किंचित मी खचून गेलो ?
अशा या दुर्दम्य इच्छाशक्तीचा आधार घेत गंगाधर मुटेंची गझल उभी राहते आणि ती जगण्याचे बळही निर्माण करते... नव्हे बेसूर जीवनाला सुरात आणते..
वृत्तात चालण्याचे शब्दांस ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले!!
वाह! क्या बात है!
खरे तर गंगाधरजींची गझल सर्वच मानवी भावनांना स्पर्श करताना दिसते. त्यांची गझल बेमालूमपणे एखादवेळी गझलप्रांताच्या मूळगावी सुद्धा लाजतमुरडत जाऊन येते आणि हळुवार यौवनसुलभ वंचनांचा ठाव घेते. मग हे वेगळेपणही रसिकमनाचा ठाव घेणारे ठरते. त्यांची प्रेमरसाने ओतप्रोत भरलेली एक गझल मला बरीच भावली...
किती गोड ताज्या स्मृती त्या क्षणांच्या, तुझे ते बिथरणे वगैरे वगैरे
छुप्या पावलांनी हळुवार येणे, दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे
ही गझल शृंगार रसाने ओतप्रोत भरलेली तर आहेच शिवाय ती गंगाधर मुटेंच्या समर्थ लेखणीची साक्ष देणारीही आहे. बहोत बढिया, लाजवाब आणि जबरदस्त गझलियत असलेली गझल म्हणजे ही गझल. त्यानंतरचे शेर तर शायराला शब्दांची पकड मिळाल्याने लाभलेली समाधी अवस्थाच.......... अव्वल नंबर गज़ल आहे ही.
ही गझल वाचली की मला हसरत मोहनीच्या गझलेची आठवण होते... उर्दू मराठीची गज़लियत समपातळीवर येत असल्याचे पाहून आनंदही वाटतो. तीच ती गझल जी गुलाम अली ने गायीली. चुपके चुपके रात दिन आँसू बहाना याद है। मधील हा शेर पहा-
खेंच लेना वो तेरा परदे का कोना दफ़तन
और दुपट्टेसे तेरा वो मुँह छुपाना याद है!
देशाचा पोशिंदा हा राजकारणात चेष्टेचा विषय होवून बसला आहे. शेतकरी संघटनेच्या शरद जोशींनी उभ्या महाराष्ट्रात कुचकामी व्यवस्थेविरुद्ध संघटनेच्या माध्यमातून एल्गार पुकारला तेव्हा मी अंबाजोगाईत महाविद्यालयीन शिक्षण घेत होतो. भाईंच्या त्या बोलबाल्याच्या लढ्यात माझ्या सख्या भावाला तेव्हा शिक्षण सोडून स्वतःला झोकून द्यावे लागले होते. त्यांना प्रेरित करणारे आजही त्या सुखद क्षणांना जपतात, हा सत्याच्या जपणुकींसाठीचा आदर्श असावा. माझ्या तरुण मनाला तेव्हा वाटले होते माझा शेतकरी बाप आता युगानुयुगांच्या जोखडातून मुक्त होईल. परंतू दुर्दैवाने तो लढा पुढे कमजोर होत गेला. त्याला बळ देण्याचे काम गंगाधर मुटेंनी गझलेच्या माध्यमातून नक्कीच केले आहे. ही आशा पल्लवित करणारी 'अन्नधान्य स्वस्त आहे' ही गझल मनाचा ठाव घेणारी आहे...
कोरडा दुष्काळ तेव्हा पांढरे पक्षी दिसेना
कंच पिकलेल्या सुगीला मात्र त्यांची गस्त आहे!
वाह! किती सुंदर अभिव्यक्ती आणि किती सखोल आशयगर्भता!!
मिर्झा ग़ालिब आणि बहादूर शाह जफ़र यांचे जीवन आणि गझल वेगळे केले जाऊ शकत नाहीत. गझल जगावी लागते तेव्हाच निपजते. गंगाधरजींच्या बाबतीतही ही उक्ती मला योग्य वाटते. ज्यांना मातीच्या कळांची जाण नाही, ते या काळ्या आईवर काय लिहिणार? प्रत्यक्ष राबते हातच राबणार्यांच्या जाणिवांची सशक्तपणे अभिव्यक्ती करू शकतात. गंगाधरजींचा हा मतला हे सिद्ध करण्यासाठी स्वयंसिद्ध आहे;
कसा जोम यावा खुरटल्या पिकांना, नवे बीज ते अंकुरावे कसे?
तणांचाच जेथे असे बोलबाला, तिथे अन्य काही रुजावे कसे ?
वाह.....!! अगदी साक्षात कास्तकारच ही खंत व्यक्त करू शकतो!
अण्णा हजारेंनी निर्माण केलेली चळवळ भारतीय इतिहासात सुवर्णअक्षरांनी नक्कीच नोंदवली जाईल. “गोरे गेले काळे आले ! देशाचे वाटोळे झाले !!” असे म्हणत दिल्लीच्या तख्ताला पळताभुई थोडी करणार्या या आंदोलनाच्या प्रभावाखाली कोण येणार नाही? गंगाधरजींसारखे व्यक्तिमत्त्व, ज्याला अन्यायाची चीड व चाड आहे, ते तर न आले तर नवलच! त्यांची 'वादळाची जात अण्णा' ही गझल म्हणजे ज्वलंत सामाजिक परिस्थितीवर जळजळीत प्रहार करण्याच्या प्रक्रियेतून साकारलेले एक सुंदर शिल्पच जणू-
धर्म सत्तेचा कळेना, का असा सोकावलेला ?
भ्रष्ट नेते मोकळे अन् , कोठडीच्या आंत अण्णा !
* * *
भ्रष्ट आचारास सत्ता, मुख्य झाला स्रोत आहे,
घाव घाला केंद्रस्थानी, एकदा द्या मात अण्णा!
* * *
आस अण्णा श्वास अण्णा, 'अभय' तेचा ध्यास अण्णा.
अग्निलाही पोळणार्या, वादळाची जात अण्णा !!!!!
गझलेचे एक दिलखुलास रूप म्हणजे हझल. 'माझी गझल निराळी' मधील एकूण ६ हझल अतिशय विनोदी तथा हझलविश्वाला समृद्ध करणार्या अशाच आहेत. त्यातील मला अतिशय आवडलेले ५ शेर मी इथे मुद्दाम अधोरेखीत करतो आहे-
मारली मी मिठी त्या क्षणी वाटले
शेरणीच्याच जबड्यात गेला ससा
* * *
भोजनाचा लुटा स्वाद पंक्तीमध्ये
अक्षता टाकण्याला असा वा नसा
* * *
करा बंद कानात आकाशवाणी
अरे मच्छरांनो बघा पेंगतो मी
* * *
उगाच पिळतोस रे मिशा तू, कडमडणे हा विकार आहे
तिच्या खुट्याला तुझ्याप्रमाणे, टुकार घोडे हजार आहे
* * *
बघा जरा हो बघा जरासे, कसा भामटा फुगून गेला
मुरूम-गिट्टी अमाप खातो, तरी न देतो डकार आहे..
वाह वा! माझी हझल निराळी !!
गझलकाराचे व गझलेचे वय जसजसे वाढत जाते तसतसे ते दोघेही तरुण होत जातात असे माझे गुरु तथा सुरेश भटांचे शिष्य आदरणीय प्रा. सतीश देवपूरकर म्हणतात. याचा प्रत्यय हा गझलसंग्रह वाचून येतो. गंगाधर मुटेंची गझल विविध खयालांना एकत्र घेऊन पुढे पुढे अधिकच संपन्न होत गेलेली आहे. गझल निर्मितीत चिंतनाला अतिशय महत्त्व आहे. शिवाय एखाद्या शेराच्या परिपूर्णतेसाठी तास न् तास चालणारा रियाज ही तेवढाच महत्त्वाचा असतो. वृत्तबद्ध रचनांची बांधणी म्हणावी तेवढी सोपी नाही परंतू रियाजाअंती ती सहज साध्य आहे मात्र कमीतकमी शब्दांत दांडगा विचार मांडणे तसे जिकिरीचेच काम आहे. वैचारिक प्रगल्भतेचे प्रतिबिंब तेव्हाच गझलांतून अगदी सहज उतरत जाते, जेव्हा एखादा गझलकार एखाद्या रचनेत रात्रंदिवस अडकून पडतो. दोन मिसरे एका सेकंदातही सुचू शकतात किंवा त्याला दोन दिवसही लागू शकतात. अशावेळी चिंतनाच्या विविधपैलुंची झलक एखाद्या शेरामध्ये एकाचवेळी दिसून येते. गंगाधरजींचा काही गझलांचा या अंगाने विचार केला तर त्यांची वैचारिक ठेवण गझलकार म्हणून प्रथम श्रेणीची वाटते. गझलकार हा प्रथम दर्जाचा विचारवंतही असायलाच हवा. त्यांचा हा मतला आणि काही शेर या बाबीची प्रचिती नक्कीच करून देतात. पाहा
घमासान आधी महायुद्ध होते !!
पुढे माणसांचे यशू-बुद्ध होते !!
किती सुंदर विचार मात्रांची कसलीही सूट न घेता मांडलेले आहेत! 'रूप सज्जनांचे' ही गझल सुद्धा तितकीच नितांत सुंदर झाली आहे. नमुन्यादाखल एक शेर......
लेऊन फार झाले, हे लेप चंदनाचे !!
भाळास लाव माती, संकेत बंधनाचे !!
असे सुंदर शेर सहज साध्य असत नाहीत. यासाठी करावा लागतो तास न् तास रियाज. यासाठी जगावी लागते गझल. याचसाठी शायर लिहीत राहतो तहयात. गझल साधनेत गंगाधरजी कुठेच कमी पडलेले नाहीत हेच यातून स्पष्ट होते.
'माझी गझल निराळी' च्या दुसर्या आवृत्तीत नवीन दोन गझलांची भर पडत आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे. 'टिकले तुफान काही' आणि 'अमेठीची शेती' या दोन्ही गझला परत शेतकर्याच्या डोक्यावरील फाटक्या आभाळाची जाणीव करून देतात. खरे आहे आपले, गंगाधरजी, अपूर्णतेची खंत घेऊन पोशिंदा आजही हळहळतो आहे.
ललकारण्या दिशांना, उठले तुफान काही !!
त्यातील फार थोडे, टिकले तुफान काही !!
* * *
निद्रिस्त चेतनेचे, सामर्थ्य जागवाया,
पोटात सागराच्या घुसले तुफान काही !!
या दोन्हीही गझलांतील एकूण एक शेर दर्जेदार आहेत. नवचैतन्य जागवणारे आहेत. न्याय्य हक्कांच्या लढ्याची तुतारी फुंकणारे आहेत. पिढ्या न् पिढ्या अंधारात खितपत पडलेल्यांना आशेचा किरण दाखवणारे आहेत. आपल्या लेखणीच्या ताकदीची चुणूक दाखवणारे आहेत. त्याच त्या राजकारणाचा वीट आलेल्या समाजाच्या डोळ्यात अंजन घालणार्या आहेत. हा गझलसंग्रह वाचून 'साये में धूप' या दुष्यंत कुमारांच्या गज़लसंग्रहाची आठवण झाली. त्यांची एक गज़ल गंगाधर मुटेंच्या विचारांशी मिळती जुळती आहे, त्यातील दोन शेर येथे देणे मला क्रमप्राप्त वाटते.
सिर्फ हंगामा खडा करना मेरा मक़सद नही,
मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए ।
* * *
मेरे सीने में नही तो तेरे सीने में सही,
हो कहीं भी आग, लेकीन आग जलनी चाहिए।
यापुढेही पिढ्यानपिढ्यांच्या अबोल आवाजाला गंगाधरजींनी असेच बोलते करत राहावे. त्यांचे चळवळीतील कार्य यशस्वी व्हावे, यासाठी विधाता त्यांना सर्वतोपरी बळ तथा उदंड आयुष्य देवो हीच सदिच्छा!
गंगाधर मुटे यांना 'माझी गझल निराळी' च्या दुसर्या आवृत्ती निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा !!
- राज पठाण
अंबाजोगाई, जि. बीड.
दि. ०६ मार्च, २०१४
== ० == ० == ० == ० == ० == == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == ० ==
शेतकर्याला अभय देणारी निराळी
शेतकर्याला अभय देणारी निराळी गझल
“ग्रंथ हेच गुरू” असे म्हटले गेले आहे. ग्रंथ असंख्य आहेत पण शेतकर्यांच्या जीवनातील प्रश्न जाणून घेणारे, ते मांडणारे व त्यावर उपाय सांगणारे ग्रंथ दुर्मिळ आहेत. गझलकार कवी श्री गंगाधर मुटे यांचे “माझी गझल निराळी” हा गझलसंग्रह अशा दुर्मिळ पुस्तकापैकीच एक आहे.
शेतकर्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणारे सुप्रसिद्ध लेखक श्री अमर हबीब यांचे भेटीसाठी अंबेजोगाईला गेलो होतो. त्यांनी आवर्जून मला हा गझलसंग्रह दिला आणि म्हणाले “सर, माझ्याकडे या गझलसंग्रहाच्या दोन प्रती आहेत. एक तुम्ही न्या, वाचा व कवीला तुमचा अभिप्राय कळवा”
मी लातूरला आलो आणि रात्री वाचायला सुरुवात केली. पहाटे चार वाजेपर्यंत मी वाचतच राहिलो. त्यात गुंतत गेलो कारण वाचताना ओळी मनाला भिडू लागल्या. टिपण काढत गेलो. दुसर्याच दिवशी अमर हबीब यांना फोन केला. पुस्तक वाचल्याचे आणि त्यावर टिपण काढल्याचे सांगितले आणि अत्यंत चांगले पुस्तक भेट दिल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानले.
माणसाचे जगणे केवळ स्वतःच्या मनावर, मर्जीवर अवलंबून नाही. सभोवतालची परिस्थिती अशी कठीण होत आहे की जगणे काय मरणेही कठीण झाले आहे. एवढेच नव्हे तर हसणे किंवा रडणे या मानवी मनाच्या नैसर्गिक प्रक्रिया ही माणसाच्या अधीन राहिल्या नाहीत. या परिस्थितीला शासन, शासनकर्ते व नोकरदार हेच जबाबदार आहेत, कारण “खाऊ लुटून मेवा” हे शासकांचे ब्रीद झालेले आहे. अर्थसंकल्पात असणारी जनसामान्यासाठीची तरतूद त्यांच्यापर्यंत पोहचतच नाही, त्याची विदारकता
अर्थसंकल्पात होती खायसाठीची व्यवस्था
कागदावर आकडे अन् माल सारा फस्त आहे
या ओळीतून ठळकपणे मांडली आहे. शासनकर्ते निधीचे वाटपही समानतेने करत नाहीत. त्यामध्येही नागरी व गावठी असा भेद करतात. वास्तविक लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालविलेल्या लोकशाही राज्यात शासक हे सेवक आहेत पण तेच मालक म्हणून मिरवू लागले आहेत.
जोपर्यंत समस्यांचे, प्रश्नांचे निदान नीट होणार नाही तोपर्यंत रोग नीट होणार नाही हे सत्य आहे.
तेच तेच रोग आणि त्याच त्याच औषधी
एकदा तरी निदान नीट व्हायला हवे
शेतकरी व त्यांचे प्रश्न याची जाण गझलकाराला आहे. प्रश्नाचे अचूक निदान कवीस आहे. हे प्रश्न का? कशामुळे व कोणी निर्माण केले याचेही भान आहे. या प्रश्नाची उत्तरेही त्याला माहीत आहेत. पण ते सोडवणे मात्र त्याच्या हातात नाही. फक्त संघर्ष करणे, लढणे आहे. या अफाट देशाचे राज्य दिल्लीच्या तख्तावरून चालते व तेथील वास्तवातील विसंगती कवीकडून दाखवली जाते.
लोंढेच घोषणांचे दिल्लीवरून आले
येणार वित्त आहे, बत्तीस तारखेला
याचा दुष्परिणाम शेतकर्याच्या आत्महत्येत होत आहे कारण राज्यकर्ते भेकड आहेत. ते स्वतः भेकड आहेत ते जनतेला काय अभय देणार? त्यामुळे मृत्यू सोकावलाय कारण त्याला शेतकर्याच्या रक्ताची चटक लागली आहे. निसर्गही शेतकर्याला साथ देत नाही कारण पाऊसही वेळेवर येत नाही. त्यामुळे कवी व्यथा मांडतो
भाजून पीक सारे, पाऊस तृप्त झाला
उद्ध्वस्त शेत आधी, मागून थेंब आला
शिवाय शेतकर्याला फक्त कोरडा उपदेशच केला जातो. आत्महत्या करणे चूक आहे, असे सांगितले जाते ते कवीलाही मान्य आहे. पण त्याचा प्रश्न आहे की,
असे गैर ती आत्महत्या कधीही, म्हणे कास्तकारास समजावुनी
परी कारणांचा जरा शोध घ्यावा, अशी सुज्ञता दाखवेना कुणी
शेतकर्याच्या दु:खाची भाषा सत्तेस कळेल असे ज्ञान कुणी दाखवत नाही कारण सत्तेमुळे नेते चळून गेले आहेत, ते धनवंतांना कुरवाळतात तर श्रमिकाला छळतात. अधिकारीही लाचखोरीला निर्ढावलेले आहेत त्यांमुळे ते
अभय लाचखोरीत तो शिष्ट प्राणी
कुणाच्याच बापास ना घाबरे तो
तर नेतेही मुजोर झालेत कारण
नसतेच जे मिळाले केव्हाच सातजन्मी
ते सर्व प्राप्त होता नेता मुजोर झाला
उलट सत्तेचा वापर जनतेवर अन्याय करण्यासाठीच करतात. शेती करून मालक होणे त्यामुळेच मूर्खता ठरत आहे. तर लाचखोरी करता येणार्या नोकरीला सन्मान मिळत आहे.
शेती करून मालक होणेच मूर्खता
सन्मान मोल आहे कर ’अभय’ चाकरी
असे त्यामुळेच स्वतःला बजावतो आहे. या नेत्यांना स्वार्थ मात्र कळतो. एरव्ही बेमुर्वत वागणारे नेते निवडणुकीच्या वेळी मात्र नरम होतात ते अगदी मोजक्या शब्दात व्यक्त करताना कवी म्हणतो
मते पाहताच
नेते नरमले
वास्तविक पैसा जनतेचा असतो पण नेते मात्र ते कसाही उधळतात.. नेते असे वागत असले तरी, सामान्य माणूस मात्र कष्टाने मिळणार्या संपत्तीसच खरे धन मानतो.
नको रत्न मोती, न पाचू हिरे ते
अभय ते खरे जे मिळाले श्रमाने
सरकारी योजनांचे पैसे मिळवायचे तर चिरीमिरी द्यावी लागते तरच वाद होत नाही. नेते जनतेत परस्परात भांडणे लावतात. अशांचा जयजयकार करू नये असे आग्रहाने कवी सांगतो.
छाया नरोत्तमाची, अभयास उब देते
त्यांचा उदो कशाला? जे कलह माजवीती
शेतीच्या दुर्दशेचे वास्तव कवी मांडतो ते असे
कायम गहाण सारे करण्यास सातबारा
बँकेसमोर झाले लाचार शेत आहे
या देशाचे दुर्दैव की येथे ना समाजवाद रुजला ना साम्यवाद रुजला, भांडवलशाही मात्र प्रबळ झाली. भ्रष्टाचारी, कंत्राटदार कसे गर्वाने वागतात.
बघा जरा हो बघा जरासे कसा भामटा फुगून गेला
मुरूम-गिट्टी अमाप खातो, तरी न देतो डकार आहे
समाजाच्या वाटेला सत्तेचा अल्पसाही वारा मिळत नाही कारण येथे घराणेशाहीच जोपासली गेली आहे. लबाडांच्या वंशात जन्म मिळणार्यांनाच तेथे वाव आहे.
अम्हांस नाही कुठेच सत्ता, कुठेच नाही "अभय" पदांचे
लबाडवंशात जन्म ज्यांचा, तमाम त्यांचा पुढार आहे
तर कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू? या गझलेत कवी म्हणतो
"घराणे" उभे राहिले गावगावी, कुठे लोकशाहीस नेतो अम्ही?
सग्यासोयर्यांचे अता राज्य आले, पदे भोगण्याला नवी वारसे
कवीला प्रश्न पडतो
का लोळतात पायी सिंहासने तयांच्या?
अद्भुत नवल कसले, त्यांच्या कुळात होते?
सामान्यांच्या प्रश्नाबाबत पूर्वी पक्षांच्या चळवळी व्हायच्या त्या आता कमी झाल्या आहेत. म्हणून कवीला वाटते की
वादंग वा दुरावा पंक्तीत उरला नाही
डावी उपाशी नव्हती, उजवी जेवली होती
कारण सगळ्यांनीच आता कुठे ना कुठे काही काळ तरी सत्ता उपभोगल्या आहेत.
घामचोरीची तक्रार दाखल केली तेव्हा
विरोधक प्रसन्न नव्हते, सत्ता कोपली होती
अशी दोन्ही बाजूंनी सामान्यांची कुचंबणा होत आहे.
कवीची जातकुळी नारायण सुर्वे यांच्या व्यथांशी साम्य दाखवते. पूर्वी साहित्यात चंद्र, प्रेयसी यांची म्हणजेच प्रेमाची वर्णने प्रामुख्याने असायची. वास्तव जीवनापासून ती शेकडो मैल दूर असायची. कवी नारायण सुर्वेने एका कवितेत म्हटले आहे. भाकरीचा चंद्र शोधण्यातच आयुष्याचा खूप काळ गेला. गझलकार “अभय” म्हणतात
शोधात भाकरीच्या निम्मी हयात गेली
स्वप्नेच वांझ झाली तारुण्य जाळताना
शेतकर्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत असे केवळ शाब्दिक बुडबुडे उडविणारा हा कवी नाही. हा कृतिशील कवी आहे. प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी शेतकर्यात एकी पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे.
शेतीत राबणाऱ्या खंबीर हो 'अभय' तू
एकीत चालण्याचा करूया सराव सस्ता
शेतकर्यांच्या प्रश्नाची फारशी गांभीर्याने चर्चा होत नाही. आकांताची दखल घेतली जात नाही पण नको त्या प्रश्नांची मात्र चर्चा होते,
आकांत बेदखल का अमुचे जगात होते?
ते शिंकले तरीही चर्चा नभात होते
शेतकर्याने आंदोलन केले तर त्यांना लाठीमार, गोळीबाराला सामोरे जावे लागते
लाठी उगारताना, बंदूक रोखताना
का वाटला तुला रे माझा उठाव सस्ता?
असा रोकठोक प्रश्न शासनकर्त्यांस विचारतात अन शेतकर्याला आपल्या बचावासाठी क्रांतीचा नवा उग्र मार्ग अवलंबावा लागेल असेही ठासून सांगतात. कवी म्हणतात
सत्याग्रहास आता रक्तात माखवावे
शिकवू चला नव्याने क्रांतीस डाव सस्ता
या क्रांतीला शब्दांच्या माध्यमाची जोड हवी. रशियातील क्रांतीच्या वातावरण निर्मितीला मॅक्झिमा गॉर्कीच्या “आई” या कादंबरीची मदत झाली होती. म्हणूनच कवी आत्मविश्वासाने म्हणतात
घामाची कत्तल जेथे, होते सांज सकाळी
तुतारी फुंकते तेथे, माझी गझल निराळी
गझल माझी बंड आणि अन्यायाला दंडही
शेतकर्यांच्या मुक्तिसाठी आयुधांची थाळी
कवी केवळ संघर्ष करणारा नाही तर त्याला विधायकतेच्या निर्मितीचा ध्यासही आहे.
चेतनेला पेरून देते अभयतेची खते
संघर्षाला पिकवताना प्रतिभा बनते माळी
मानवी जीवनात प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी प्रसंगी युद्धाचा मार्ग अवलंबावा लागतो. पण मानवी जीवन केवळ संघर्षासाठी नाही. त्याला सुख, शांती व समाधानाची नैसर्गिक आस असते. त्यामुळेच कवी मार्मिक शब्दांतून ते व्यक्त करतो.
घमासान आधी महायुद्ध होते
पुढे माणसांचे यशू-बुद्ध होते
शासनकर्त्यांना स्वतःच्या सावलीचीही भिती वाटते. त्यामुळे त्यांना शस्त्राच्या क्रांतीची भीती वाटतेच वाटते. पण शब्दाच्या शस्त्राचीही वाटते. हा कवी नारायण सुर्वे प्रमाणेच संत तुकाराम महाराजांचाही मागोवा घेत चालणारा आहे. त्यामुळेच तो शब्दांना शस्त्राइतके सामर्थ्यवान मानतो. तुकोबाराय म्हणतात,
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने
शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू
कवीही शब्दाला शस्त्र बनवतो पण शासनकर्त्याला त्याची भिती वाटते. त्यामुळे
मी म्हणालो फक्त इतुके "शब्द माझे शस्त्र आहे"
चक्क माझ्या भोवताली चोख बंदोबस्त आहे
कारण आजवरच्या लेखकांनी कधीही ही नोंद केली नाही की,
पुस्तकाने कोणत्याही नोंद नाही घेतली की
कष्ट आणिक भाग्य-लक्ष्मी हाच रेशो व्यस्त आहे
शासनकर्ते समाजावर सवलतीचा वर्षाव करून त्याला कामापासून दूर करत आहे. तर काहींना साहेब बनण्यात भूषण वाटते. कष्ट करणारा शेतकरी मात्र मूर्ख ठरत आहे.
सारे काही सवलतीत; धान्य, इंधन, साखर, तेल
कोण तयार होईल मग, इथे हाडे झिजवायला
निघून गेलेत शहाणे, सर्व ’साहेब’ बनायला
मूर्ख आम्ही उरलो इथे, मोफत अन्न पिकवायला
पण हे फार काळ चालणार नाही कारण जनतेला आता कळू लागले आहे, म्हणून कवी निर्धाराने-निश्चयाने म्हणतो,
श्रमास मातीत गाडण्याला, नव्या दमाचा विरोध आहे
नवीन शाई, नवे मनसुबे, अभय जनांची नवीन भाषा
एवढेच नव्हे बळीराजाला पाताळात घालणार्या वामनाची सत्ता उलथून टाकण्याची ईर्ष्या मनात आहे
मामला तीन पद भूमीचा, तुझ्या सिंगावर घेच तू
त्या बटू वामनाची सत्ता, "अभय" पालटली पाहिजे
गझल म्हटली की त्याग, प्रेम, शृंगार, यांचाच प्रामुख्याने समावेश असतो. पण गंगाधर मुटे उर्फ “अभय” या गझलकाराच्या गझलांमध्ये शेतकर्यांचे जीवन, त्यांचे प्रश्न, त्या प्रश्नांची कारणे, त्याची जबाबदारी कोणाची व ते प्रश्न सोडविण्यासाठी काय करायला हवे, हे सर्व त्यांनी “गझल माझी निराळी” मधून समर्पक व यथार्थपणे मांडली आहे. ही गझल खरोखरच नावाप्रमाणे इतरांपेक्षा निराळी आहे. ती शेतकर्यांचे दु:ख सांगणारी आहे. ती केवळ शेतकर्याचे दु:ख, व्यथा मांडत नाही तर शेतकर्याला साथ, अभय देणारी आहे. ताज्या गारपिठीच्या तडाख्यानंतर शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकर्यांना धीर देणार्या संघर्षाला व जगण्याला प्रवृत्त करणार्या या गझला खरोखरच कौतुकास व धन्यवादास पात्र आहेत.
- विजय शंकरराव चव्हाण
पद्मावती अपार्टमेंट
पद्मनगर, लातूर
===================================================================================
"वांगी" "निराळी" Online
"वांगी" "निराळी" Online उपलब्ध
माझी "वांगे अमर रहे" व "माझी गझल निराळी" ही पुस्तके पुस्तकजत्रा सोबतच आता BookGanga आणि amazon वर Online विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत
* * * *
www.bookganga.com/eBooks/Books?AID=5216407646190881869
* * * *
www.amazon.in/Mazi-Gazal-Nirali-Gangadhar-Mute/dp/B00J9C8OYO
* * * *
http://www.pustakjatra.com/default/mazi-gazal-nirali-gangadhar-mute/p-25...
* * * *
BookGanga, amazon आणि शब्दांजली यांना लाखलाख धन्यवाद!
* * * *
(No subject)
"प्रहार" मध्ये "माझी गझल
"प्रहार" मध्ये "माझी गझल निराळी"
दैनिक "प्रहार" मध्ये "माझी गझल निराळी" चे प्रकाशित झालेले पुस्तक परिचय आणि संक्षिप्त समीक्षण.
धन्यवाद प्रहार आणि Aditi Paradkar Londhe

* * * * * *
* * * * * *
Pages