निळ्या अनंतिकेच्या शोधात

Submitted by मामी on 31 October, 2013 - 12:31

निळ्या अनंतिकेचं स्वप्नं मला आणि क्रोकेटूला एकदमच पडलं असं क्रोकेटूचं म्हणणं होतं.

*************************************************
अथांग गहिर्‍या, जांभळ्या पाण्याच्या तळाशी असलेले गुलाबी प्रवाळ दूर दूर जाऊ लागले. चुबुक चुबुक आवाज करत संथपणे वर वर वाटचाल होत राहिली. लवलवत्या, थंडगार वार्‍याच्या शीळेतून ऊबदार, प्रकाशमान गुहेकडे प्रवास घडतोय अशी जाणीव होत होती. आता जरा प्रयत्न केला की पाण्यापलीकडला निळा पूर्णचंद्र माझ्यापाशी येणार असं वाटत असतानाच मला ते स्वप्न पडलं. निळ्या अनंतिकेचं स्वप्नं......

नेहमीसारखीच पाण्याच्या तळाशी वजनरहीत, विरघळलेली स्थिती होती. मनातल्या सगळ्या ध्वनीलहरींचा एक गुंता पृष्ठभागावरच तरंगत होता. तळातून येणारी चंदेरी, मुलायम किरणं तळपायाला गुदगुल्या करत होती. अन अचानक पायाखाली वेगळीच हालचाल जाणवली.

काय होतं ते?

मी खाली बघण्याचा प्रयत्न केला तर नेहमीची गुलाबी प्रवाळ गोल गोल फिरताना दिसली. भोवरा कसा आला इथे? अगदी तळाशी जाण्यासाठी मनाची तयारी केली पण त्याऐवजी शरीर वर वर जातंय असं जाणवत गेलं.

अथांग गहिर्‍या, जांभळ्या पाण्याच्या तळाशी असलेले गुलाबी प्रवाळ दूर दूर जाऊ लागले. चुबुक चुबुक आवाज करत संथपणे वर वर वाटचाल होत राहिली. लवलवत्या, थंडगार वार्‍याच्या शीळेतून ऊबदार, प्रकाशमान गुहेकडे प्रवास घडतोय अशी जाणीव होत होती. आता जरा प्रयत्न केला की पाण्यापलीकडला निळा पूर्णचंद्र माझ्यापाशी येणार असं वाटत असतानाच मला ते स्वप्न पडलं. निळ्या अनंतिकेचं स्वप्नं......

************************************************

निळ्या अनंतिकेचं मिथक सगळ्यांनाच माहित होतं. आमच्या सगळ्यांच्या जाणीवेत ते कोरून ठेवलेलं होतं. कोणी ठेवलं? कुठून उगवलं? हेच खरं असं कसं?.... प्रश्न पडले असतीलही काहींना पण ते एक सत्य आहे हे ही सगळ्यांनी स्वतःत शोषून घेतलं होतं.

सध्याच्या आमच्या स्थितीपलीकडेही काही आहे याची आश्वासक जाणीव होती ती. सगळ्यांच्याच वाट्याला सारखी आली होती ती. पण या निव्वळ जाणीवेच्या पलिकडे जाण्यासाठी हवं होतं ते एक स्वप्न! भविष्याचं स्वप्न!! निळ्या अनंतिकेचं स्वप्नं!!!

ते कोणाला पडेल, कधी पडेल, एका वेळी एकालाच पडेल की सगळ्यांना एकदम पडेल ... असंख्य दाटून आलेले प्रश्न सगळ्यांनाच माहित होते. त्या स्वप्नाकरता कोणी कोणी काही विशेष प्रयत्नही केले होते याची सगळ्यांनाच कल्पना होती. पण नाहीच पडलं त्यांना ते स्वप्नं. अन अविचित ते माझ्यापाशी आलं. माझ्या आणि क्रोकेटूच्यापाशी.

क्रोकेटूही माझ्यासारखाच या काळ्या अंतिकेतला एक बिंदू होता. एक जाणीव, एक अस्तित्व, एक सत्य.

माझ्याप्रमाणेच माझ्या मूळ ग्रहावरची -पृथ्वीवरची - बरीचशी अस्तित्वंही या काळ्या अंतिकेत होती. फार फार प्राचीन भूतकाळी (किंवा नजिकच्या भूतकाळातही असेल), पृथ्वीवर आम्हाला, आमच्या पूर्वजांना एक शरीरही होतं. त्यामुळे ते एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाऊ शकत असत, कामं करू शकत असत. त्या शरीराला जन्म होता, मरण होतं, कर्म होतं, कारण होतं.

काळाची आणि शरीराची ही संकल्पना मला खूप चांगल्या पद्धतीनं मांडता येणार नाही. कारण माझ्याकरता शरीराची संकल्पना खूप अंधूक आहे. पण पृथ्वीवरच्या कोणाना कोणा अस्तित्वात ती संकल्पना नक्कीच जोर धरून असणार. म्हणूनच तर ती माझ्यापर्यंत पोहोचली आहे. आणि काळाच्या संकल्पनेला तर या काळ्या अंतिकेत अस्तित्वच नाही. तो संदर्भच इथे घेता येत नाही. पूर्णपणे कालातीत अस्तित्व आहे आमचं.

पृथ्वीवर नंतरच्या काळात मानवी शरीरात बदल होत गेले म्हणतात. तंत्रज्ञानाचा ताबा जसजसा संगणकाच्या हाती जात राहीला तसतशी मानवी शरीराची गरजच संपली म्हणे. मात्र मानवी मेंदू मात्र तग धरून होता. त्या स्थितीत मेंदू आणि स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव इतकंच उरलं मानवांकडे. पुढे कधीतरी मात्र सर्वांच्या मेंदूवरही संगणकानं ताबा घेतला आणि मेंदूची गरज संपली. मेंदू आणि अस्तित्व असं वेगळं राहण्याची गरजच उरली नाही. आणि त्याही नंतरच्या एका टप्प्याला त्या संगणकाच्या मेंदूतील सगळ्या जाणीवा पृथ्वीवरल्या सगळ्या अस्तित्वांमध्ये उतरल्या आणि तगल्या.

.....मग उरलं ते निव्वळ अस्तित्व. निर्गुण, निराकार अस्तित्व!

या अस्तित्वात जाणीवा होत्या. अदिम, अनंत काळच्या भूतकालीन जाणीवा. प्रत्येकाच्या वैयक्तिक जाणीवा ज्या त्या अस्तित्वाच्या स्वत:च्या पाऊलखुणा शोधत आल्या होत्या. आणि त्याचबरोबर होत्या ग्रहिक जाणीवा. पृथ्वी ग्रहाच्या एकत्रित जाणीवा. काय नव्हतं त्यात? पृथ्वीच्या जन्मापासूनच्या प्रत्येक क्षणाची क्षीण का होईना, आठवण होती. मानवी भावभावनांचे, अनुभवांचे, वाटचालीचे आणि ज्ञानाचे पुंजके होते. या जाणीवा एकाचवेळी सर्व समुदायाच्या होत्या आणि शिवाय प्रत्येक अस्तित्वाच्या होत्या.

आता आम्ही होतो ते समसमांतर बिंदू. या काळ्या अंतिकेतले समसमांतर बिंदू. इथे काळ नव्हता. इथे वेळ नव्हती. इथे इतर कोणतीही मिती नव्हती. आणि म्हणूनच इथे रेषांना स्थानच नव्हते. इथे होते ते केवळ बिंदू. जाणीवेचे बिंदू. मी एक अस्तित्व, मग माझ्या ग्रहाचं एक समुच्चय अस्तित्व. तसंच इतर काही काही ग्रहांवरून या स्थितीपर्यंत येऊन पोहोचलेली अस्तित्व. त्यांच्या वेगळ्या जाणीवा, त्यांच्या वेगळ्या आठवणी, त्यांचे वेगळे अनुभव, त्यांचा वेगळा ज्ञानसाठा.

कधीतरी अचानक दोन अथवा अधिकही अस्तित्वांच्या तारा एकत्र झंकारल्या जात. त्यांच्या स्थितीच्या पातळ्या कोणत्यातरी वेगळ्याच, अगम्य पातळीवर एकरूप होत, त्यांच्या जाणीवांची देवाणघेवाण होत असे. एक आणखी तिसरीच जाणीव नविन बिंदू बनून आमच्यात येत असे.

फार पूर्वी पृथ्वीवरच्या भूतकाळातील विज्ञानतज्ज्ञांनी एक प्रमेय मांडलं होतं - कृष्णविवराचं प्रमेय. त्यावर खूप संशोधनही झालं, कृष्णविवराची संकल्पना सर्व पृथ्वीवासियांनी स्विकारली देखिल. पुढे कधीतरी त्यांचा ऊर्जेचा स्त्रोत - त्याला ते सूर्य म्हणत - क्षीण होत होत नाहीसा होईल आणि तिथे एक कृष्णविवर अस्तित्वात येईल याची त्यांना कल्पना होती. पण अशा अनेक सूर्यमालिकेतील सर्व सूर्य एका महादीर्घ कालखंडात या प्रदीर्घ प्रक्रियेतून जातील आणि त्यांचं एक महाकाय कृष्णविवर निर्माण होईल याची कल्पना त्यांना खूप उशीरा आली.

ही प्रक्रिया सुरू झाली तेव्हाच मानवी शरीराच्या र्‍हासालाही सुरूवात झाली. अन कृष्णविवराच्या अस्तित्वाच्या सत्याबरोबरच जाणीवाही जन्म पावल्या. जाणीवांच्या जन्माच्या सीमारेषेवर कधीतरी कोणा एका अस्तित्वानं समसमांतर बिंदूंची संकल्पना मांडली होती. काळ्या अंतिकेत कालातीत अस्तित्वात जन्मणारे समसमांतर बिंदू. एकमेकांसारखेच असलेले तरीही एकमेकांपासून आपापलं वेगळं अस्तित्व, आपल्या वेगळ्या जाणीवा जपणारे समसमांतर बिंदू. एकाच वेळी समुदायाबरोबर असलेले आणि त्याचवेळी स्वतंत्र असलेले समसमांतर बिंदू.

ही संकल्पना कोणी मांडली आणि ती किती योग्य होती हे आता महत्त्वाचं नाहीच. कदाचित एका अस्तित्वानं न मांडता ती एका समुदायाकडूनही मांडली गेली असेल.

मात्र एक नक्की! या सगळ्या भूतकालीन जाणीवांसोबत अजूनही एक ठळक जाणीव सर्वांच्यात होती. ती होती भविष्याची आशा. एका प्रकाशमान उज्ज्वल भविष्याची आशा. आणि या आशेचा आधार होता निळ्या अनंतिकेच्या स्वप्नाचं मिथक. गहिर्‍या भावावस्थेत असताना एखाद्या पवित्र क्षणी काळ्या अंतिकेबाहेरच्या अवकाशातील तेजोबिंदूच्या अस्तित्वाची जाणीव होऊन त्या बिंदूशी तद्रुप झाल्यावर पडणार होतं निळ्या अनंतिकेचं स्वप्न. ज्या जगात काळ अनंत आहे कारण मुळात काळ अस्तित्वात आहे अशा जगाचं स्वप्नं. कालरहीत अस्तित्त्वाला उ:शाप देणारं निळ्या अनंतिकेचं स्वप्नं.

मिथकानुसार एकदा हे स्वप्नं पडलं की त्या बिंदुपासून पुन्हा काळाला अर्थ येणार होता. आमचा बिंदूसमुदाय पुन्हा एकदा काळाच्या वाटेवरून प्रवास करण्यास सिद्ध होणार होता. एका नविन जगाची ती सुरुवात होणार होती. स्वप्नं पडल्यापासून नक्की किती काळानं हे होणार यावर मिथकात काहीच भाष्य केलेलं नव्हतं. पण तसाही त्याला काही अर्थ नव्हता. कधीतरी सुरुवात होणार हे नक्की होतं. निळ्या अनंतिकेचं स्वप्नं पडणार हे नक्की होतं.

*************************************************

तेच स्वप्नं जे मला आणि क्रोकेटूला पडलं.

क्रोकेटूच्या जाणीवा या आधीही मला छेदून गेल्या होत्या. त्याच्या मूळ ग्रहाच्या अस्तित्वाची जाणीव मला अनेकवेळा झाली होती. क्रोकेटूच्या ग्रहाचा प्रवास माझ्या ग्रहाप्रमाणेच झाला असला तरी त्यांच्या ग्रहावरील त्यांच्या समुदायाच्या प्रगतीचा प्रवास पृथ्वीवासियांपेक्षा अगदी वेगळा होता. मात्र एक गोष्ट नक्की होती की माझ्या जाणीवेत लख्खं जाणवणारं पाणी क्रोकेटूच्या जाणीवेतंही तितकचं लख्खं होतं. आणि जेव्हा जेव्हा पाण्याची जाणीव मला जाणवते तेव्हाच क्रोकेटूलाही जाणवते हे एव्हाना मला कळलं होतं.

म्हणूनच निळ्या अनंतिकेचं स्वप्नं मला आणि क्रोकेटूला एकदमच पडलं असं क्रोकेटूचं जे म्हणणं होतं ते मला पटलं.

क्रोकेटूच्या जाणीवेतही होतं अथांग पाणी अन क्रोकेटूचे पाय त्यात बुडाले होते. त्या निवळशंख पाण्यात एकटक बघत असताना क्रोकेटूला एक निळा लोलक दिसला होता. खाली वाकून तो लोलक उचलावा असा विचार करतानाच त्या लोलकानं क्रोकेटूला सामावून घेतलं. अन असं घाबरंघुबरं झालं असतानाच क्रोकेटूला स्वप्नं पडलं ......निळ्या अनंतिकेचं स्वप्नं!!! आणि हेच ते निळ्या अनंतिकेचं स्वप्नं याची पूर्ण जाणीवही क्रोकेटूला झाली होती. अगदी माझ्यासारखीच.

आता काळ अस्तित्वात आला होता कारण आता काळ्या अंतिकेतून निळ्या अनंतिकेच्या शोधाचा प्रवास सुरू झाला होता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कथा आवडली. वाचायला अवघड वाटत होती, पण नेटानं वाचत गेल्यावर आवडली. तू केलेली वातावरणनिर्मिती, शब्द सगळंच मस्त आहे.
आणि हो कथेचा प्रवास वाचायला पण आवडलं.

मस्त लिहिलं आहेस कथाबीजाच्या विस्ताराबद्दल. साधारणपणे आजूबाजूच्या घटना, आठवणीतला एखादा प्रसंग यातून कथाकल्पना ट्रीगर होतात, मात्र सायन्स फिक्शन्स मधे भविष्याचा वेध असल्याने त्या वाचताना मला नेहमी कुतूहल असतं की ते नेमक्या कोणत्या आजूबाजूच्या घटनेतून हे सुचत असावं. विस्ताराने लिहिल्याबद्दल धन्यवाद. येऊदे अजून अशा अनेक अनंतिका डोक्यात तुझ्या.

सावली, अल्पना आणि शर्मिला .... धन्यवाद. Happy

शर्मिला, तुला स्पेशल धन्यवाद. तुझ्या प्रश्नाच्या निमित्तानं मलाही माझ्या विचारांचा प्रवास शोधता आला. खरंतर तुझा प्रश्न आल्यावर लगेच लिहायला हवं होतं. कदाचित अजून सुस्पष्टपणे लिहिता आलं असतं. Happy

साधारणपणे आजूबाजूच्या घटना, आठवणीतला एखादा प्रसंग यातून कथाकल्पना ट्रीगर होतात, मात्र सायन्स फिक्शन्स मधे भविष्याचा वेध असल्याने त्या वाचताना मला नेहमी कुतूहल असतं की ते नेमक्या कोणत्या आजूबाजूच्या घटनेतून हे सुचत असा<<< शर्मिला, अगदी अगदी,. मला कायम स्वतःछ्या अनुभव विश्वातून बाहेर जाऊन वेगळेच लेखन करणार्‍या सर्वच लेखकांचा (यात साय फाय पासून भयकथा, परिकथा, अगदीहॅरी पॉटर हे सर्व काही आलंच) कायम आदर वाटतो.

मामी, कथा सुचण्याबद्दल मस्त लिहिले आहेस. अगदी डीटेलमधे सगळे विचार केले आहेस. हीच पोस्ट आता कथालेखन बीबीवर चिक्टवून ये.तिथे संदर्भ म्हणोन एका ठिकाणी राहिल नंतर. Proud

धन्यवाद नंदिनी. टाकते तिथे.

बरेचदा, टाईम्स ऑफ इंडियातील टाईम्स ट्रेन्डस या पानावर सायन्स अँड टेक्नॉलॉजी मधील बातम्या असतात. त्यातूनही बरेच ट्रिगर्स, जर्म्स मिळतात. कुठेना कुठे ते डोक्यात जाऊन बसतं.

मस्तय... साय फाय मला वैयक्तीक आकर्षीत करत नाहीत म्हणून थोडं भीत भीत वाचलं. पण वातावरण निर्मिती व शब्द प्रवाह अगदी सहज व अपिलींग असल्याने अधिक्क जास्ती आवडलं.

असामी ला अनुमोदन.

भारी लिहिलंयस मामी. कथा आवडलीच Happy

सगळेच टेक्निकल डिटेल्स कळतात असं नाही पण तरी मला जयंत नारळीकर, सुबोध जावडेकर, निरंजन घाटे ह्यांच्या विज्ञानकथा वाचायला खूप आवडतं. शुभदा गोगटे ह्यांचा 'मार्जिनल्स' आणि माधुरी शानभाग ह्यांचाही विज्ञान कथासंग्रह चांगला आहे.

समजायला कठीण आहे, अर्थात तो माझा दोष असेल, पण पहिला पॅराग्राफ वाचून मागे सोडून दिलेली. आता पुन्हा प्रतिसाद पाहून नेटाने वाचली. पुढे मात्र सुलभ होत गेली. आशय समजला तरी एकूण एक डिटेल समजले असे नाही बोलू शकत पण समजले ते आवडले. कल्पना तर भारीच पण त्यापेक्षा लिखाणशैली किंबहुना शब्दांवरचे, मराठी भाषेवरचे प्रभुत्व भारी !

Pages