सखा

Submitted by vaiju.jd on 17 October, 2013 - 13:39

||श्री||

तू मला आवडतोस हे मी खुपवेळा सांगितलंय.
न मागताही कितीतरीवेळा तुलाच तुझ्याकडे मागितलंय.
तू मला हवा आहेस माझा प्रिय सखा म्हणून
वाटतं, माझी सारी स्वप्न तूच फक्त घेशिल जाणून.
नकळत अंतर दूर करून अंतरंगी शिरलास तू!
माझ्या सार्‍या स्वप्नांमध्ये कधी भरून उरलास तू!
हातात असावा तुझा हात, चालताना चंद्रावरची पाऊलवाट.
चांदण्यांची फुले वेचताना , नकळत साद घालील पहाट.
ओंजळभर मोती आणू , समुद्रात मारुन बुडी.
उगवतीला वर येऊ, किरणांची करून शिडी.
वर्षासरींच्या धाग्यामध्ये मोत्याचा ओवेन सर.
तू माझ्या केसात माळ, मी तुझ्या अंगावर.
मधुमदिर चांद्ररसाची चव चाखावी तुझ्या ओठी
वेणुवनातून एक सुरावट तू आणावीस माझ्यासाठी
तू, मी आणि सूर बासुरीचे पायातळी यमुनाकांठ.
तुझे पसरले बाहू किनारा, मी धावावे होऊन लाट.
एक ‘जागती’ अशी सरावी, सरेल त्याहून अधिक उरेल.
कित्ती दानं दिली-घेतली, हिशेब न त्याचा मागे उरेल.
रातराणीचा धुंद सुगंध दरवळून यावा तुझ्या मिठीत
मी केलेल्या प्रतीक्षेचे प्रतिबिंब दिसावे तुझ्या दिठीत
पण स्वप्नांना अपूर्णतेचा शाप अन् आयुष्ये मात्र चौकटबंद
तरीही तुझी स्वप्न पहाण हा माझा लाडका छंद
माझी स्वप्नं पूर्ण करायला तू मला साथ देशिलं?
तू मला आवडतोस, माझा प्रिय सखा होशिलं?
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users