'त्रिंगलवाडी' : एक सुंदर नजारा

Submitted by Yo.Rocks on 17 October, 2013 - 04:54

पावसाने उघडीप घेतलेली.. हिरव्या निसर्गाने रानफुलांचे आभूषण परिधान केलेले.. सैरवैर सुटलेला वारा... निळ्या नभात मेघांची सुरु झालेली धक्काबुक्की.. सुर्यदेवांना लपाछुपी खेळण्यास मिळालेली आयती संधी... तर एकीकडे चांगला पाउस होउनही केवळ एकच ट्रेक झाला म्हणून वैतागलेले संसारग्रस्त दोघे... आता ट्रेकला वाट करुन देण्याची मनाला लागलेली ओढ.. दोघांना शनिवारीच ऑफीसला सुट्टी लागलेली नि दोघांच्या सौ. लोक्स कामावर गेलेल्या म्हणजेच ट्रेकला अगदी निर्धास्तपणे जाण्याची मिळालेली आयती संधी... !

इथे जाउ तिथे जाउ करत शेवटी सोप्प्या श्रेणीत गणला जाणार्‍या 'त्रिंगलवाडी'वर शिक्कामोर्तब झाले.. जाणारे अर्थात आम्ही दोघेच.. अस्मादीक व रोहीत एक मावळा * रो.मा !

ऐनवेळी ठरवाठरवी करुन एकदिवसीय ट्रेक करणे म्हणजे बर्‍याच गोष्टींची जुळवाजुळव करणे... सर्वात जिकरीचे काम म्हणजे वेळेचे महत्त्व... पण आम्ही परंपरेला जाग देत उशीराच उठलो.. परिणामी ठाण्याहून पहाटे साडेपाचची ट्रेन पकडण्याची बाता करणारे आम्ही दोघे कसेबसे शेवटच्या मिनीटाला सातच्या गाडीत हजर झालो.. तपोवन एक्स्प्रेसचा जनरल डबा ! म्हटले शनिवार आहे.. मस्तपैंकी शिरा-पोहे- उपमाचा नाश्ता पार्सल घेउन ट्रेनमध्येच गट्टम करू असे खादाडस्वप्न पाहीलेले.... पण कसले काय.. आधीच उशीरात उशीरा.. पोटात गेला नाही शिरा.. पण 'अरे जरा आत शिरा' म्हणत गर्दीला ढकलत कसेबसे दरवाज्यावरच उभे राहीलो.. !

आता भुकेल्या पोटीच फक्त तीन-चार बिस्कुटांचा आधार घेत 'इगतपुरी' स्टेशनची वाट बघण्यात धन्यता मानली.. गाडी कसारा घाटातून इगतपुरीकडे मार्गाक्रमण करु लागली नि अचानक थंड हवेची झुळूक स्पर्श करुन गेली.. भुगोलात 'इगतपुरी' थंड हवेचे ठिकाण म्हणून वाचले होते त्याचा अनुभव मात्र आता घेत होतो.. सिमेंट काँक्रीटचे लोंढे मागे पडून आता गर्द हिरव्या झाडीचे पट्टे दिसू लागले.. अधुनमधून सोनकीचे दर्शन होउ लागले.. नि आम्ही मनोमनी ट्रेकसाठी सज्ज झालो..

दोन तासांच्या ट्रेनसफरीनंतर इगतपुरी स्टेशन एकदाचे आले नि आम्ही पहिले खादाडीच्या शोधात बाहेर पडलो.. आधी उजवीकडे एसटी स्टँडकडे जाणार्‍या रस्त्यावरील एका झोपडीसदृश गाडीवर शिळ्या बेचव मिसळीची चव चाखली नि हिरमोड करुन घेतला.. त्यात तिथल्या मामांना त्रिंगलवाडीचा खात्री करण्यासाठी पत्ता विचारला तर मामा जोशमध्ये विचारु लागले.. 'कुठे जायचे ते सांगा.. सिंगलवाडी की टिंगलवाडी' !!!!' चटकन ठस्सका लागला.. जल्ला मिसळीशिवाय !

'आम्ही बघतो काय ते' म्हणत पाय काढला.. नि पुन्हा मागे फिरलो... एका दुकानात चौकशी केली तर कळले स्टेशनबाहेर डाव्या बाजूला उडपी हॉटेल, बॉम्बे कॅफे अशी चांगली हॉटेल्स आहेत.. तिथूनच मग दुपारच्या खाण्याचे मेंदुवडा-इडली पार्सल (अगदी चटणी-सांबारासकट !!!) घेउन आम्ही पुन्हा एसटी स्टँडकडे जाणार्‍या वाटेला लागलो.. वाटेतच डॉ. आंबेडकर यांचे चौक लागते तिथेच डावीकडे एक चढणीचा रस्ता जातो तिथून पुढे सरकलो.. ते चढण काय पार केले नि अगदी शांतमय परिसरात येउन थडकलो.. अगदी सुनसान रस्ता.. तिथल्या भयावह शांततेला थंड हवेची सोबत.. तिथेच एक जुने चर्च नि मागच्या झाडीत वसलेली कबरीस्तान.. नि कुठूनतरी खाटीक पक्ष्याचा चिरकणारा आवाज.. शिवाय पावसाने काळोख केला होता तेव्हा अगदी भुतपटात शोभेल असे चित्र !

पुढे सरळ चालू लागलो तसे थंड हवेचा झोत वाढू लागला.. एव्हाना पावसाने थोडेफार शिंतोडे उडवायला सुरवात केली होती.. काही अवधीतच दोन वाटा झाल्या एक डावीकडे वळून लगेच संपत होती तर दुसरी उजवीकडच्या चढणीवर जाउन लुप्त झालेली.. त्या दुसर्‍याच वाटेने आम्ही चालून गेलो नि समोर सुंदर नजारा उभा राहीला..
एका बाजूला हिरव्या डोंगरांची रांग.. तर उजवीकडे भलामोठा तलाव.. रेल्वे टँक म्हणतात.. नि त्या तलावाला अगदी शोभुन दिसेल असा हिरव्या रंगाचा काठ.. त्यात उमललेली छोटछोटी रानफुले नि गवत रवंथ करणारी गुरे.. पलिकडे एका अवाढव्य पहाड हा तलाव आपल्याच मालकीचा असल्याचे भासवत होता.. त्याचा माथा ढगांमध्ये बेधुंद झालेला..अर्धाभाग सुर्यकिरणांमध्ये न्हाउन निघालेला.. तर अर्धाभाग मेघांच्या सावलीत गुरफटलेला.. इतरत्र सुद्धा अशेच पडसाद उमटताना दिसत होते.. सरत्या पावसाळ्यात दृष्टीस पडणार्‍या निसर्गाचे हे अगदी साजेसे रुप.. त्या 'मालक' पहाडाची एक सोंड डावीकडच्या डोंगराच्या सोंडेशी हातमिळवणी करताना दिसली.. नि आमच्या ट्रेकमध्ये लागणार्‍या वाघोली खिंडीची ओळख पटली..

- -

- -

एकंदर ट्रेकारंभ अगदी दणक्यात झाला होता.. ही तर खरी सुरवात होती.. पावसाची इथे कृपादृष्टी असतेच तेव्हा इथला निसर्ग सुंदर नजराणा पेश करणारच.. अश्या रम्य परिसरात कोणीही खुळावेल.. इथेच तलावाकाठी बसून निसर्गाविष्कार अनुभवावा असे वाटत होते.. पण रो.मा चे आपले भलतेच.. गेला लगेच तलावकाठच्या झुडूपात मासे पकडायला ! जल्ला ट्रेक दोन दिवसाचा असो वा एक दिवसाचा या साहेबांना कळ लागतेच.. !!

या तलावकाठच्या बाजूनेच डांबरी रस्ता थेट वाघोली खिंडीकडे घेउन जातो.. प्रथमदर्शनी हा रस्ता थेट पहाडाच्या उदरात घुसतो की काय असेच वाटते..

इथली वाटचाल करताना ट्रेकमध्ये नेहमीच मोहक वाटणार्‍या रानफुलांचा ताटवा लागला.. नि साहाजिकच आमचा वेग अगदी कासवछाप झाला.. इगतपुरी रेल्वे स्टेशनपासून इतक्या जवळ असा रमणीय परिसर असेल असे वाटले सुद्धा नव्हते.. पुढच्या खेपेस या तलावाकाठीच एक फॅमिल पिकनिक करु असे स्वतःशीच खोटे आश्वासन देत आम्ही खिंडीकडे निघालो..

- -

- -

रस्ता अगदी सरळ.. पण खिंड जशी जवळ आली तसा उंचीला मोठा पण लांबीला छोटा चढ लागतो.. 'खिंड' या इतिहासातील सुप्रसिद्ध शब्दालाच इतके वजन आहे की कोणालाही साहाजिकच कुतुहल वाटावे.. खिंडीत उभे राहीले की वार्‍याचा झोत स्वागत करणारच... दोन्ही कडून खिंडीत येणारा रस्ता दिसणारच.. दोन प्रदेशांना एकत्र आणण्याचे महत्त्वाचे काम ही खिंडच करते.. इथेही या खिंडीमुळेच पलिकडच्या गावांना इगतपुरीच्या अगदी जवळ आणले गेले.. या खिंडीतच देवीचे मंदीर आहे..

खिंडीपासून पलिकडचा रस्ता सुरु होतो.. रस्ता म्हणाल तर अगदी कच्चाही नाही पक्काही नाही.. पण गाडी नक्कीच जाउ शकते.. इथूनच इगतपुरीला कॉलेजला जाणार्‍याला त्रिंगलवाडीची दिशा विचारली तर 'कुठे चालत जाताय.. गाडी आणायची ना' असा सल्ला मिळाला... त्याच्या बोलण्यात तथ्य होते खरे.. त्रिंगलवाडी दुरवर अगदी मुंगीसदृश वाटत होती... पल्ला बराच मोठा गाठायचा होता.. पण त्याचसाठी तर आम्ही आलेलो.. घडयाळ्याकडे बघून लेटस गो केले.. ट्रेकमध्ये सर्वात त्रासिक बाब म्हणजे रस्त्यावरुन चालणे.. इथे तर अगदी वळसे घेत जाणारा होता.. आम्हाला त्रिंगलवाडीची दिशा तर कळली होती.. साहाजिकच मागचा पुढचा विचार न करता रस्त्याला फाटा देत आम्ही शेतमळयातून जाणारी पाउलवाट पकडली.. रस्त्याला उजवीकडे ठेवले.. आमच्यासाठी शॉर्टकट पेक्षा हिरव्यागार रानाने नटलेल्या वाटेचा आस्वाद घेणे महत्त्वाचे होते..


(दुरवर समोर दिसतोय तो त्रिंगलवाडी किल्ला)

- -

कधी एखादा धनगरवाडा लागतोय.. तर कधी छोटेसे घर.. कधी पिवळ्याधम्मक फुलांची शेती लागतेय.. तर कधी हिरवीगार भातशेती.. कधी विविधरंगी रानफुलांनी सजलेले हिरवे रान.. शेतमळ्यातून जाणारी वाट म्हणजे नांगी वर करुन अभिवादन करणार्‍या खेकडयांची भेट तर ठरलेली.. नि सभोवताली क्षितीजाच्या आड येणारी सह्याद्रीरांग.. आमच्या ट्रेकचे प्रायोजन तर इथेच सफल झाले होते..

अशावेळी आपले ट्रेकमार्क उडडाण असतेच !! (फोटो By रो.मा)

- -


(बुध्या डोंगर नि मागे कावनईचे डोके दिसतेय)

पुढे दोन- तीन घरांची वाडी लागली नि तिथून मात्र रस्त्याची वाट धरावी लागली.. एक छोटा ओहळ पार करुन पुढे कंटाळवाण्या रस्त्यावर आलो... आतापर्यंत बरीच वाट तुडवली होती.. गेले दोन तास चालतच होतो.. सध्या वारंवार ट्रेक्स होत नाहीत म्हणून की काय माहीत नाही पण रो.मा. ची थकबाकी सुरु झाली.. रस्त्यावरच मग क्षणभर विश्रांती घेउन पुन्हा तंगडतोड सुरु केली..

रस्त्याच्या दुतर्फा असलेली हिरवीगार शेतं, शेतामध्ये वेढलेली पिटुकली घरं व शेतापलिकडे दिसणारे हिरवे डोंगर.. असा नजारा असताना चालणेही सुसह्य होउन गेले.. काही अवधीतच त्रिंगलवाडी गावात पोहोचलो.. गावातल्या मंदीरातील देवीला मनोमन नमस्कार करुन गावच्या मागून जाणारी बटबटीत चिखलाची ढोरवाट पकडली.. धरणाच्या भिंतीवर चढून गेलो नि समोर... समुद्रापरी लाटांच्या तालावर झुलणारे धरणाचे पाणी व त्यापल्ल्याड ध्यानस्थ बसलेला त्रिंगलवाडी किल्ला !

किल्ल्याची चढाई फारशी वाटत नव्हती.. पण एव्हाना मध्यदुपार होउन गेलेली.. किल्ल्याचे चरण स्पर्श जरी करायचे तरी बराच पल्ला गाठणे बाकी होते.. तिथे पोचणार कधी.. चढणार कधी.. फिरणार कधी नि उतरणार कधी.. सार्‍या प्रश्नांचा कल्लोळ बाजूस सारुन डावीकडून लेटस गो केले.. इथूनच आमची आतापर्यंतची खिंडीपासूनची घोडदौड दिसून येत होती.. जल्ला बरीच पायपीट झाली होती.. नि अजुन बरीच बाकी होती..


(आतापर्यंतची घोडदौड.. अगदी उजवीकडच्या खिंडीतून इथवर मजल मारली होती)

धरण अगदी मोठे असले तरी भिंत पुर्णपणे बांधलेली नाही.. साहाजिकच पाणी भरुन ओसंडून वाहणेच नाही.. धरणाचे पाणी जिथून बाहेर पडते तिथूनच आम्ही उतरुन पुढे गेलो.. ही जागा खूपच मस्त वाटली.. क्षणभर इथेच ट्रेक संपवूया असा खोडकर विचारही आला..

- -

उजवीकडची पाउलवाट पकडली नि धरणाच्या काठाकाठाने मार्गाक्रमण सुरु ठेवले.. भेटलेल्या एका गुराखीला विचारले तर किल्ल्याचा माथा गाठण्यास अजुन दिडेकतास तरी लागणार होता.. ! पण त्रिंगलवाडीचे स्थान आता लक्षात आल्याने चुकण्याचा संभव नव्हता तेव्हा लवकारात लवकर अंतर कापण्याचे ठरवले.. वातावरणही ढगाळ असल्याने उन्हाच्या तडाख्याचा प्रश्नच नव्हता. तिथे डावीकडचा म्हळुंग्याचा डोंगर आपल्या दणकट शरीरयष्टीने लक्ष वेधून घेत होता.. शेवटी एकदाचे धरणाचा जलाशय मागे पडला तसे म्हळुंग्याला पाठ करत गर्द हिरव्या झाडीत जाणारी वाट पकडली.. तत्पुर्वी हातात बेचकी मिरवता जाणारी शाळकरी पोरांची भेट झाली..

सभोवतालची हिरवाई तशीच असली तरी पाउलवाटेचे स्वरुप पदोपदी बदलत होते.. नि पुन्हा एकदा उत्तम क्षणभर विश्रांतीसाठी अगदी योग्य जागा सामोरी आली.. अगदी हिरवागार गालिचा पांघरलेला नि त्यावर एकच लाल मातीची रेघ उमटवलेली.. जन्मतः शीतल वाटणार्‍या हिरवळीवर थकल्याभागल्या जीवांना मस्तपैंकी लोळून डुलकी काढण्याची हुक्की येणारच.. पण आम्ही या मोहात फसलो नाही..

त्या मोहजलातून बाहेर पडलो नि त्रिंगलवाडी अगदीच समोर आला.. पण वाट मात्र उजवीकडे जात होती.. वेळही आता भराभर निसटून जात होता.. तेव्हा पुन्हा एकदा मुळ वाटेला बगल देत बिनदिक्तपणे बंधार्‍यावरुन चालायला घेतले.. पण त्रिंगलवाडीने त्याच्यापर्यंत पोहोचण्यातच इतके नैसर्गिक अडथळे निर्माण करुन ठेवलेले की थांबणे मस्टच होते.. मग ती अगदी यशचोप्रांच्या सिनेमांमध्ये दिसणार्‍या पिवळ्या फुलांसारखी बाग असो वा गर्द जांभळ्या रानफुलांची वस्ती असो..

- -

- -

अखेरीस आम्ही त्रिंगलवाडीला चरणस्पर्श झालो.. इथेच एक भलीमोठी गुहा आढळते.. दहाव्या शतकात कोरलेली जैन लेणी म्हणे.. इतकी प्राचिन लेणी पहाणे खरच भाग्यवान समजावे.. बरीच पडझड झालेली आहे पण जे काही अवशेष शिल्लक आहेत ते पाहूनच त्याकाळची सुंदरता, कल्पकता सहज लक्षात येते.. मग ते प्रवेशद्वार असो वा प्रवेशद्वाराच्या बाहेरील ओसरीचा परिसर.. सारे काही शिल्पकामाने बांधलेले.. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस झरोक्यासाठी बांधलेल्या खिडक्या.. सारे काही अप्रतिम.. हे न्याहाळतच आत शिरलो तर गुहेतील ऐसपैस अशा सभामंडपात झिरपणार्‍या पाण्याचाच काय तो खळखळाट निनादत होता.. चार खांबांपैंकी सध्या एकच खांब शिल्लक आहे.. अनपढ लोकांचे गिरवणे सोडले तर खांबावरील नक्षीकामही उल्लेखनीय.. नि समोरच अजुन एक गुहा (गाभारा) तिथे जैन धर्माचे प्रथम तीर्थकर भगवान आदिनाथजी (ऋषभदेव) यांची भग्नावस्थेतील मुर्ती आहे.. त्रिंगलवाडीच्या कुशीत असलेली ही लेणी म्हणजे खरच एक खजिना आहे..

- -

- -
प्रवेशद्वाराची एक सुंदर बाजू

- -

- -
प्रवेशद्वारावरील सुंदर नक्षीकाम

- -
गुहेच्या आतील परिसर

इथेच आम्ही आमचे पार्सल उघडून खादाडी कार्यक्रम उरकला नि गुहेच्या डाव्या बाजूने वरती जाणारी वाट पकडली.. फारसा चढ नाही.. जेमतेम पंधरा वीस मिनीटांचा चढ असावा.. पण आमची तंगडतोड अगदी इगतपुरीपासून सुरु असल्याने दमछाक होणे भाग होते.. वाटेत एक छोटी माची लागते जिथे एक घर व शेती आहे.. पुढे ही वाट त्रिंगलवाडीच्या सोंडेवर आणून सोडते.. इथे पोहोचलो नि सभोवतालच्या परिसराने वेड लावले.. चोहोबाजुंचा निसर्ग हिरव्या रंगात माखला होता.. वार्‍याला उधाण आले होते.. कडयावरची सोनकी तेरडयाचे ताटवे अगदी प्रसन्न मनाने डोलत होते.. आम्ही सगळे शांतपणे बघत पुढे जात होतो.. तरीसुद्धा अधुनमधून घडयाळ्याकडे लक्ष जात होतेच.. तीन वाजत आले होते नि आम्ही अजुन माथा गाठला नव्हता..

- -

--

- -

समोरच त्रिंगलवाडीच्या शेंडयाची कातळभिंत उभी राहिली.. जाण्यासाठी दोन्ही बाजूने वाट होत्या त्यापैंकी आम्ही मागची सरळ वाट पकडली.. काही अंतरावरच कातळात कोरलेल्या पायर्‍या नजरेस पडल्या.. म्हटले गुप्त दरवाज्याकडे नेणार्‍या पायर्‍या असाव्यात.. पुढे जाउन अजुन काही वाट दिसतेय का म्हणून खात्री केली नि त्या पायर्‍यांकडेच वळालो.. सहजासहजी नजरेस न पडणार्‍या या पायर्‍या सध्याच्या पावसाने चांगल्याच ओल्याचिंब नि शेवाळाच्छादीत झालेल्या.. पायर्‍या चढून गेल्यावर समोरच कातळात कोरलेली हनुमानाची मोठी मुर्ती आशिर्वाद देण्यासाठी उभी दिसली नि बाजूलाच गुप्त दरवाजा.. हे पाहताच ट्रेक सार्थक झाल्याचे समाधान मिळाले..

- -

आतापर्यंत आम्ही फक्त दोघेच या परिसरात होतो तोच कुठूनतरी खालच्या गावातला एक कॉलेजकुमार समोर आला.. गुरांना घेउन आला होता.. एकटेपणा कंटाळलेला तेव्हा आमच्याबरोबर स्वतःहून फिरण्यास आला... आमच्यासाठी बरेच झाले कारण आधीच वेळ कमी होता.. शिवाय माथ्यावर भरमसाठ रान वाढलेले.. त्याचे अजुन दोन सवंगडीदेखील आमच्यामध्ये येउन सामिल झाले.. त्याच्याच मागून रानातून वाट काढत आम्ही वाडयाचे अवशेष, खांबटाके व बारामाही पाण्याचे टाके पाहीले..

- -

गुहेच्या पुढील पाण्याच्या टाकीतील बारामाही असणारे पाणी चवीला उत्तम

- -

आकाशात ढगांची गर्दी झाली असल्याने दुरवरचा प्रदेश काही पहायला मिळणार नव्हता पण माथ्यावरची भटकंतीदेखील समाधान देण्यास पुरेशी होती.. नि त्यामध्ये सर्वोच्च क्षण म्हणजे माथ्यावरील मंदीराचा परिसर... अख्खा दिवस त्या जागेवर बसून काढण्याइतपत सुंदर जागा... ! गाभार्‍यात शेंदुर लावलेल्या गणपतीची, देवीच्या मुर्ती आहेत.. तर बाहेर शिवलिंग आहे.. इथेच मग त्या सवंगडयांसोबत गप्पाटप्पा करत क्षणभर विश्रांती घेतली.. तो कॉलेजकुमार म्हणे रोज पहाटे साडेचार उठून इगतपुरीच्या कॉलेजमध्ये चालत जातो !! आम्ही तर आजच्या दिवसभरच्या तंगडतोडीपुढे हतबल झालेलो..

- -

त्या सवंगडयांचा निरोप घेउन आम्ही आता पुढच्या बाजूस असणार्‍या पायर्‍यांनी खालीउतरण्यास सुरवात केली.. चारच्या आत खाली म्हणत सुसाट निघालो..

पण मघाशी वरती येतानाच सोंडेवरच्या एका खडकाने 'पुन्हा भेटा' म्हटले होते.. सो इथे उडयांचे प्रकार झाले.. तंगडतोडीने अगदी मेटकुटीस आलेला रो.मा देखील उडया मारण्यासाठी मात्र अगदी ताजातवाना झाला.. या एकमेकांच्या फोटोशूटमध्ये पंधरा मिनीटे आमची अशीच गेली.. जल्ला त्यावेळेत खाली पोहोचलो पण असतो... नॉssनसेन्स !

खाली उतरुन आता आलो त्याच वाटेने जायचे नव्हते.. म्हणजेच त्रिंगलवाडी गावातून येताना धरणाच्या डाव्या बाजूने आलो होतो तर आता उजव्या बाजूने जायचे ठरले होते.. एवढी तंगडतोड थकलेल्या रो.मा ला तरी सोसवणारी नव्हती.. तेव्हा आम्ही जिथपर्यंत रस्ता येतो त्या गावाकडे मोर्चा वळवला.. शिवाय त्या सवंगडयांनी गावातून इगतपुरी/घोटी कडे जाण्यास पिकअप गाडी मिळेल असे अगदी छातीठोकपणे सांगितले होते.. त्यावर मी त्याला 'जर असे घडले तर तू यंदा बारावीला बोर्डात नक्कीच पहिला येशील' अशी गोड शुभेच्छाही दिलेली.. पण कसले काय.. गावात पोहोचलो तर सांगितले गेले त्रिंगलवाडीतूनच गाडी मिळेल.. रो.मा अजूनही आशावादी होता तर एकीकडे आता पायदळीच इगतपुरी गाठावे लागणार हे मी समजुन गेलेलो.. धरणाला पुरता वळसा घालत वाटेतल्या तीन- चार छोटया गावांचे थांबे घेत गेलेल्या लांबलचक अश्या रस्त्याने नुसते चालणे म्हणजे खूपच कंटाळात्मक नि वेदनादायी होते.. संपुर्ण वाटचालीसाठी दिडेकतासाची तंगडतोड करावी लागली.. या रस्त्याने यायचे तर गाडी हवीच.. अन्यथा सरळ धरणाच्या त्या डावीकडील पाउलवाटच पकडावी !!

हाशहूश करत एकदाचे त्रिंगलवाडीत पोहोचलो.. मला तरी त्रिंगलवाडी हे पायथ्याचे गाव वाटलेच नाही.. जल्ला इथून किल्ला दिडेक तासावर पडतो.. शिवाय या रस्त्याने गेलो तर तीन चार गावंही लागतात.. एव्हाना पाच वाजत आले होते.. आता त्रिंगलवाडीहून इगतपुरी गाठायचे तर अजुन दिड-दोन तासांची अजुन तंगडतोड शिल्लक होती !! तरीसुद्धा आम्ही अंधुक आशा ठेवून इथे-तिथे चौकशी केली.. पण दुपारी दोन-तीन नंतर घोटीकडे जाणारी गाडी मिळणे म्हणजे चमत्कारच.. रो.मा तर अगदी कुणाच्या घरासमोर दोन-तीन बाईक लावलेल्या पाहून विचारायला निघाला.. पण घरात बायकाच दिसत होत्या तेव्हा बाईकचा विचार सोडून दिला.. Proud शेवटी पुन्हा त्याच वाटेने, त्याच बंधार्‍यावरुन जाण्यास सुरवात केलेली... त्रिंगलवाडीकडे येताना अगदी जोशमध्ये होतो पण आता सारे अवसान गळत चालले होते.. रो.मा ने पुरती शरणागती पत्करलेली तेव्हा त्याला तर अगदी चालत-ढकलत नेत होतो.. संध्याकाळी साडेसहाच्या ट्रेनचे लक्ष्य ठेवले होते.. तेव्हा जल्ला भाग रो.मा भाग म्हणत रो.मा ला चालते केले.. एसटी महामंडळाने या गावापर्यंत एसटीची सोय का नाही केली म्हणून मनोमनी लाखोल्यादेखील अर्पण केल्या..

अखेरीस इगतपुरी स्टेशन एकदाचे आले.. बहुतेक जण स्वेटर घालून हिंडताना दिसत होते.. आम्ही मात्र घामाघूम झालेलो.. शेवटी संध्याकाळी सातची ट्रेन पकडून मुंबईकडे रवाना झालो..

म्हटले त्रिंगलवाडी.. एक सोप्पा ट्रेक म्हणून ख्याती.. पण आपल्यासाठी कुठलाच ट्रेक सोप्पा नसतो.. खासकरुन तुमचे स्वतःचे वाहन नसेल वा एसटीची सोय नसेल अशा परिसरात ट्रेक करणे म्हणजे अवघडच.. पिक-अप ची वडापदेखील जर नाही मिळाली तर अधिकच समस्या.. त्यात पहाटे निघून एकादिवसात आटपून परतायचे म्हणजे आपल्याच तंगडीची पिसे काढत ट्रेक करणे.. टोटल लावली तर दिवसभरात सात-आठ तासांची तंगडतोड झालेली.. पण संपुर्ण वाटचाल नेत्रसुखद निसर्गामुळे प्रसन्न वाटली.. त्रिंगलवाडी किल्ल्याचा परिसर खरे तर ह्याच मोसमात पहाण्यासारखा.. अगदी निसर्गकोंदण..नि ट्रेकींग कम नॅचरल ट्रेलची असली मजा चाखायची असेल तर इगतपुरी गाठा नि सुरवात करा तंगडतोडीला..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्या बात है यो ....... कस्लं भारी लिवतो रे तू - वाचायला सुरुवात केली की थांबताच येत नाही मग....
फोटुकरता सगळं परत नीट बघावं लागतं .... फोटु पण जबरीच....

सुंदर.

अफलातून वर्णन आणि सुंदर फोटोज… आपले त्रिंगलवाडी किल्ल्याचे जवळपास सगळेच फोटो एकाच Angle ने काढले आहेत…पण ऋतूबदलाची मजा मात्र त्यात स्पष्ट जाणवत आहे.

खरं तर त्रिंगलवाडी गाव किल्ल्याचा पायथा नाही. आधी त्रिंगलवाडी किल्ला त्याच्यावरून त्रिंगलवाडी गाव आणि त्या गावाचं धरण म्हणून त्रिंगलवाडी धरण. पायथ्याशी जिथे थोडीफार घरं आहेत त्याला तळेवाडी म्हणतात (हेम चुकलं असेल तर दुरुस्त कर). घोटी जवळच्या टाके फाट्यापासून त्रिंगलवाडी पायथ्या पर्यंत रिक्षा मिळतात.

बाय द वे इडली - वडा सांबारचं काय केलंत ?? Wink

सुंदर!!

प्रचि ४ हे नक्की काय आहे? प्रचि की पेन्टिंग? Happy

त्रिंगलवाडी नाही झाली तरी भटकण्यासाठी खुप छान जागा आहे.

छान

झक्कास ट्रेक झालाय पण फार तंगड तोड करायला लागली, मावळे जास्त असते तर कदाचीत एवढा त्रास जाणवला नसता........ पु. ट्रे. शु.

मस्त रे यो .. भारी लिव्हलयस.. तु पण साहित्यिक लिहायला लागलस... Wink

बाय द वे इडली - वडा सांबारचं काय केलंत ?? >>
स मित्रा.. जे नेहमी होत तेच.. इडली सांबारात बुडवुन वड्याला चटणी लावली. Happy

यो, वर्णन कमाल, अन् फुलं-मंदिर-खोरं असे सगळेच प्र.चि. धम्माल!!!
शेवटचा कोलाज फारंच सुंदर जमलाय..
बापरे, खरंच तंगडीची पिसे काढत ट्रेक झालाय....

मस्तपैंकी शिरा-पोहे- उपमाचा नाश्ता पार्सल घेउन ट्रेनमध्येच गट्टम करू असे खादाडस्वप्न पाहीलेले.... पण कसले काय.. आधीच उशीरात उशीरा.. पोटात गेला नाही शिरा.. पण 'अरे जरा आत शिरा'
>> हे वाचताना म्हणजे अग्गदी, यो आपल्यासमोर बसून ट्रेक वृतांत रंगवून सांगतोय, असं वाटतंय... Lol

या वेली फोनलंस कित्या नांय? .. ठोस्सा!
अरे तुम्ही जर स्वतःचे वाहन नसतांना येणार होता तर तुला मी वेगळा मार्ग सांगितला असता.. विपश्यना केंद्रावरुन पुढे गेल्यावर केंद्रामागचा अवाढव्य बगाडा/ बघाडा डोंगर संपतो तिथे चढायला लागायचं आणि त्याच्या कुशीतून जात रहायचं. डावीकडे कसारा घाट/ विहीगांव दरी दिसते. २-३ डोंगरांना कन्नी दिल्यावर थेट तू वर्णिलेल्या किल्ल्याच्या धारेवर यायला होतं. मधल्या एका डोंगरावर छोटं मंदिरही आहे. उजवीकडे थोडं खाली उतरून लेणी करुन येता येतं. इगतपुरीपासून इथवर अंदाजे २ तास लागतात. संध्या. चहाला ठाण्यात गेला असतास.. त्रिगलवाडी गांवाचो काय्येक समंध येना नांय ह्या वाटेंन्.. Happy
ता.क.- हा मार्ग बहुतेक सांगातीमध्येही दिला आहे.

हे वाचताना म्हणजे अग्गदी, यो आपल्यासमोर बसून ट्रेक वृतांत रंगवून सांगतोय, असं वाटतंय... >>>>>>
हे तर नेहमीचंच आहे यो च्या वर्णनात.. Happy

फोटो पाहूनी जीss व जळला.. !

फारच भारी लिहिता .सूर्याची लपाछपी ,हिरव्या कुरणावर लाल रेघ . .('लाल माती निळे आकाश' अनंत काणेकर नंतर कोण हा प्रश्न सुटला ) .फोटो काय त्या उड्या काय फारच छान .तलावाकडच्या झुडुपातली मासेमारी आणि तंगडीची पिसे या नवीन वाकप्रचारांची टोटल नोंद घेण्यात आली आहे .घरातून निघालो ,जवळच्या स्टेशनवरून चालत किल्ला गाठला ,परत नऊच्या आत टिव्हीसमोर बसलो इतके सरळ झाले तर ती भटकंती म्हणजे काय ती सीएसटी कर्जत लोकल आहे ?थोडा गावाला वळसा हवाच .रच्याकने ईगतपुरीहून सातची गाडी कोणती ?

धन्यवाद Happy

आपले त्रिंगलवाडी किल्ल्याचे जवळपास सगळेच फोटो एकाच Angle ने काढले आहेत…पण ऋतूबदलाची मजा मात्र त्यात स्पष्ट जाणवत आहे. >> हो रे ओंकार.. अगदी अगदी

त्रिंगलवाडी नाही झाली तरी भटकण्यासाठी खुप छान जागा आहे.>> +१ पण शक्यतो पावसाळ्यातच Happy

हेम.. मस्त माहिती.. पुन्हा या वेगळ्या मार्गाने जाण्यास हरकत नाही.. अरे आमचा सगळा धावपळीत चलता म्हणात लक्षातच रवाक नाय.. नि त्या सांगातीचा झेरॉक्स कधी देतस ता वाट बघतय.. Happy

ईगतपुरीहून सातची गाडी कोणती ?>> माहीत नाही.. बहुतेक तपोवनच लागलेली.. आम्ही वडाभजी खात बसलेलो.. मग कळले गाडी लागली सो धावतपळत पकडली.. तशा पण असतात सीएसटी - कुर्ल्याला जाणार्‍या गाडया..

मस्तच रे.........
तू फोटोंच्या जोडीला लिहितोस पण असे मस्त..... अगदी तिथे गेल्यासारखे वाटते..........:)
पहिले तीन फोटो खासच आवडले

​तुझा सुंदर साहित्यिक वृत्तांत वाचताना … नेहमीची Patented उडी… शोधत होतो … वाटलं… बहुतेक यो … उडी मारायला विसरला … पण लगेच उडी ची प्र. चि. दिसली … वाह … उत्तम … ट्रेक दरम्यान वयाच्या ७०व्या वर्षी सुद्धा ...काठी घेऊन उडी मारतानाचा तुझा फोटो मी 'आत्ता' Virtualize करतोय … Wink
सगळ्या प्र.चि झकास …
"शिरा" ​​चा किस्सा … ह्या वृत्तांताच्या अगदी 'शिर'पेचात शोभेल असा लिहिलास Happy ​…

ट्रेकळावे,
दत्तू तुपे

Pages