मी डोलवत आहे तसा डुलतोय माझा गारुडी

Submitted by वैवकु on 13 October, 2013 - 12:47

दिसतो तसा असल्यामुळे मी वेगळा आहे म्हणे
त्यांच्यातला नसलो तरी मी चांगला आहे म्हणे

जे बोललो मित्रा तुला विसरून जा इथल्याइथे
डोळे नको भिजवूस तू मी मस्करा आहे म्हणे

थोडे अधिक देता मला चिडवायच्या बहिणी तिला
आई तुझा सगळ्यांमधे हा लाडका आहे म्हणे

आधी मला नात्यातला मावस-बिवस वाटायचा
हा देह नावाचा कुणी माझा जुळा आहे म्हणे

संपेल ह्या चिंतेमधे संपून जाते जिंदगी
संपेल ह्या चिंतेमधे हा फायदा आहे म्हणे

मी डोलवत आहे तसा डुलतोय माझा गारुडी
वेडे जगत तो तर तिथे निश्चल उभा आहे म्हणे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>वेडे जगत तो तर तिथे निश्चल उभा आहे म्हणे
विचाराच्या दृष्टीने मला बरोबर वाटत नाहीये. तुम्हाला जे म्हणायचे आहे ते शब्द अजूनही स्पष्ट यायची धडपड करत आहेत. अर्थात हे माझे मत झाले.

धन्यवाद खारकर
आपले मत कुणासही पटावे असेच आहे पण मला जे म्हणायचे होते ते तश्याच पद्धतीने मी म्हटले आहे ह्याची मला खात्री आहे

वेडे जगत म्हणे (असे म्हणते ) की 'तो' तर 'तिथे' निश्चल उभा आहे..खरेतर मी जसे डोलवत आहे तसा माझा गारुडी डुलतो आहे ( तो माझ्या तालावर नाचतो आहे ) असे म्हटले आहे
हा विठ्ठलाचा शेर आहे आणि हे मला आणि विठ्ठलाला समजले तरी बास ह्या विचारानेच तो तसा केला इतराना जर हा शेर विठ्ठलाचा आहे हे स्व्तःहून उमजेल तर त्यानाही ते आवडेल असे मानून तो गझलेत समाविष्ट केला व सर्वांसमोर आणला आहे Happy
काही मोजक्या लोकाना माझ्या गझलेत विठ्ठलाचा शेर असतो हे माहीत आहे आणि त्याना आवडतेही त्या लिमिटेड ऑडियन्स करता हा शेर सहज समजेल असा आहे Happy

वेडे जगत !!.. "तो तर तिथे निश्चल उभा आहे " ..म्हणे !!<<< असे वाचू शकता Happy

पुनश्च धन्यवाद

Pages