गणपती दर्शनासाठी पुण्यात गेलो होतो. पुण्यातील शनिवारवाड्याजवळून जात असताना माझ्या लहान मुलाने बाजीरावांच्या घोड्यावरील स्वार झालेल्या पुतळ्याकडे लक्ष वेधून विचारले, ‘‘बाबा हा शिवाजी का? मी नाही म्हणताच मग कोण? बाजीराव पेशवे म्हटल्यावर ते बाजीराव ‘सिंघम’ का? असा उलट प्रश्न त्याने केला. तो लहान असल्याने मी जास्त लक्ष दिले नाही. सध्याच्या पिढीला बाजीराव सिंघम माहिती आहे मात्र, बाजीराव पेशवे माहिती नाही. मुलाला इतके दिवस आपण शनिवारवाडा कसा दाखविला नाही याचे मलाच आश्चर्य वाटले. गणपती पाहायला वेळ होता. तेव्हा तासाभरात शनिवारवाडा दाखवू असे ठरवून मुलाला शनिवारवाडा दाखवून आणला. त्यानिमित्ताने का होईना मीही बºयाच वर्षांनी शनिवारवाडा पाहणार होतो. लहान असताना शनिवार पेठेतील आजी व मावशीकडे गेलो की मी, माझे मावसभाऊ असे सारेजण शनिवारवाड्यात लपाछपी खेळायला जायचो. मजा यायची.
मराठ्यांच्या भरभराटीचा व अस्ताचा साक्षीदार ठरलेला ‘शनिवारवाडा’. पुण्यात शनिवारवाड्यासमोर घोड्यावर बसलेला, हातात भाला घेऊन शत्रूच्या उरात धडकी भरणारा आवेशपूर्ण असा पुतळा दिसतो. बºयाच लोकांना (पुण्याच्या नव्हे) हा पुतळा कोणाचा समजत नाही. पुण्याच्या वाढत्या इमारतींच्या साम्राज्यात आपले जुने अस्तित्व टिकून राहिलेला हा शनिवारवाडा म्हटले की आठवण होते बाजीरावांची. शत्रूच्या उरात धडकी भरणारा हा यौद्धा आपल्या अतुल पराक्रमामुळे अजय ठरला. बाजीरावांविषयी अनेक कथा, कादंबºया, ऐतिहासिक पुस्तके लिहिली गेली. त्यातील मी वाचलेली काही ऐतिहासिक पुस्तकांतील संदर्भ घेऊन बाजीरावांविषयी काही मुद्दे मांडण्यासाठी हा लेख प्रपंच. ‘ध’ चा ‘मा’ झाल्यास जरूर कळवा.
‘अ मॅन हू नेव्हर लॉस्ट अ बॅटल’ असं ज्याचं वर्णन केलं जातं. ज्यानं कधी पराभव पाहिला नाही, ज्यानं आपल्या मनगटाच्या जोरावर अनेक युद्ध जिंकली, दिल्ली काबीज केली. ज्याच्या पराक्रमामुळे इराणपर्यंतच्या पातशाह्या हादरल्या त्या जगातल्या एकमेव, अजेय, अपराजित यौद्धाचे नाव म्हणजे ‘बाजीराव’. उत्तम संघटनकौशल्य असलेला हा पराक्रमी यौद्धा. मराठेशाहीला नर्मदेच्या पलिकडे मराठी घोडदळ नेणारा हा पहिलाच सेनापती. बाजीरावांनी दिल्लीपर्यंत धडका मारून मराठ्यांचा दरारा निर्माण केलेला होता.
बाळाजी विश्वनाथ भट : (पेशवे)
बाळाजी विश्वनाथ भट हे मुळचे कोकणातील श्रीवर्धनचे. त्यांचा घराण्याकडे दंडाराजपुरी व श्रीवर्धन परगण्यांची देशमुखी साधारण १४०० सालापासून होती. दंडाराजपुरी तेथून जवळच जंजिरा त्यामुळे साहाजिकच सिध्दीच्या त्रासाला कंटाळून बाळाजी देशावर आले. ताराबाई राजारामाची कर्तबगार पत्नी. राजारामाच्या मृत्यूनंतर आपला मुलगा शिवाजीस गादीवर बसून पराक्रमाने ७ वर्ष औरंगजेबाबरोबर झुंज दिली. ताराबाई महाराणींचे सेनापती धनाजी जाधव यांचेकडे बाळाजींनी चाकरी केली. ताराबार्इंना शह देण्यासाठी औरंगजेबाच्या मृत्युपश्चात मोगलांनी शाहू महाराजांना १७०७ ला कैदेतून सुटका केली. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली. शाहू महाराज व ताराबाई यांच्यामध्ये स्वराज्याच्या राजगादीसाठी संघर्ष सुरु झाला. छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र म्हणून शाहू महाराजांना अनेक मातब्बर सरदारांचा पाठिंबा होता. ताराराणींचा पक्षाही मजबूत होता. शाहूमहाराज दिल्लीवरून साताºयास येण्यास निघाले. वाटेत खानदेशात ते आले. तेथे धनाजी जाधव, खंडेराव दाभाडे, शंकराजी नारायण सचिव यांना शाहूमहाराजांनी पत्रव्यवहार करून बोलावून घेतले. त्यासाठी बाळाजी भटांना बरोबर घेऊन जाधवराव शाहूमहाराजांनी भेटले. पुढे शाहूमहाराज साताºयास आले. बहिरोपंत पिंगळे हे त्यांचे पेशवे होते. त्यांच्याकडे लोहगड व राजमाची किल्ला होता. मराठ्यांच्या आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे हे ताराबार्इंच्या पक्षातील. आंग्रेनी शाहू महाराजांच्या बहिरोपंत पेशव्यास तसेच निळो बल्लाळ या चिटणीसास राजमाची किल्यात कैद करून पुण्याजवळील असलेले लोहगड, राजमाची किल्ले ताब्यात घेतले होते. त्यावेळी बाळाजी विश्वनाथ फौज घेऊन लोहगडाजवळ आले. आंग्रे ओळवण (सध्याचे वळवण) येथे त्यांना भेटले. कोकणातील असल्यामुळे बाळाजी विश्वनाथ आणि कान्होजी आंग्रांचे जवळचे संबंध होते. अांग्रे यांनी समंजसपणा दाखवून वाद मिटविला. पिंगळे यांच्यावर शाहूमहाराज नाराज झाले होते. त्यांना दूर करून पेशवाई दुसºयाला देण्याचा त्यांचा विचार झाला. खानदेशातून महाराज साताºयास येत असताना बाळाजी विश्वनाथ त्यांच्याबरोबर होते. त्यांच्यातील कर्तेपणा पारखून महाराजांनी २७ नोव्हेंबर १७१३ रोजी पेशवे पद बाळाजींना बहाल केले. आपल्या मनमिळावू स्वभावामुळे महाराष्ट्रातील सर्व पराक्रमी सरदांना शाहूमहाराजांच्या बाजूने वळवून घेतले. पुढे बाळाजींनी दिल्लीपर्यंत स्वारी केली व सासवड येथून आठ वर्षापर्यंत कारभार सांभाळला. बाळाजी पेशवे १२ एप्रिल १७२० ला सासवड मुक्कामी अल्पशा आजाराने मरण पावले.
श्रीशाहूनरपति हर्षनिधान ॥ बाळाजी विश्वनाथ मुख्यप्रधान ॥
अशी बाळाजींची मुद्रा होती.
‘पेशवे’पद
पेशवे हे शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील एक महत्वाचे पद - ‘पेशवे’ पेशवे म्हणजे पंतप्रधान. शिवाजीमहाराजांच्या राज्याभिषेकावेळी मोरोपंत पिंगळे पंतप्रधान होते. बाळाजी पेशव्यांच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांच्या दरबारात पेशवे पदावरून वाद वाढू लागले. दरबारातील श्रीपतराव व अष्टप्रधानांनी हे पद (पेशवे) कोकणस्थांमध्ये न देण्याचा आग्रह धरला. पण शाहूमहाराजांनी स्वराज्याचा पेशवा म्हणून बाळाजी विश्वनाथ भट यांचा पुत्र विसाजी अर्थात बाजीराव यास पेशवे पद देण्याचे नक्की केले. बाजीरावांना पेशवे पद हे वंश परंपरेतून मिळाले नव्हते तर बाजीराव हा तरुण, युद्धनिपुण होता. तसेच बाळाजी विश्वनाथांबरोबर सतत राहिल्याने बाजीरावांना युद्धाचा तसेच राजकाराणाचा अनुभव प्राप्त झाला होता. म्हणून शाहू महाराजांना तोच पेशवे पदासाठी योग्य वाटला. १७ एप्रिल १७२० ला शाहूमहाराजांनी पेशवाईची वस्त्रे बाजीरांवाना बहाल केली. बाजीराव त्यावेळी केवळ २० वर्षांचे होते.
बाजीराव पेशवे :
बाळाजी विश्वनाथ भट यांचा बाजीराव हा मोठा मुलगा. तर चिमाजी आप्पा धाकटा. आईचे नाव राधाबाई. बाजीरावांचे मूळ नाव विसाजी. मात्र, बाजीराव बल्लाळ व थोरला बाजीराव या नावानेही प्रसिद्ध होते. वयाच्या तेराव्या काशीबाई नावाच्या मुलीशी त्यांचा विवाह झाला (१७१३). बाजीरावांना चार मुलगे झाले. त्यांपैकी नानासाहेब व रघुनाथराव हे पुढे प्रसिद्धीस आले. दुसरी पत्नी मस्तानीस समशेर बहाद्दूर नावाचा मुलगा झाला. समशेर बहाद्दूर पुढे पानिपतच्या लढाईत (१७६१) ठार झाला. आपल्या अवघ्या २० वर्षांच्या कारकीर्दीत बाजीरावांनी ४० महत्त्वाच्या लढाया केल्या. त्यात माळवा (डिसेंबर १७२३), धर (१७२४), औरंगाबाद (१७२४), पालखेड (फेब्रुवारी १७२८), अहमदाबाद (१७३१) उदयपुर (१७३६), फिरोजाबाद (१७३७), दिल्ली (१७३७), भोपाळ (१७३८), वसईची लढाई (मे १७३९) या मोठ्या लढायांचा समावेश आहे आणि विशेष म्हणजे सर्व लढायांमध्ये ते अजिंक्य ठरले.
बाजीरावांना हरवणं त्याच्या काळातल्या शत्रूंनाही जमलं नाही. मराठेशाहीला नर्मदेच्या पलिकडे मराठी घोडदळ नेणारा हा पहिलाच सेनापती. चारशे वर्षांच्या यवनी अंमलानंतर दक्षिणेतून जाऊन दिल्ली काबीज करणारा बाजीराव हा पहिलाच. दिल्लीपर्यंत धडका मारून मराठ्यांचा दरारा निर्माण केलेला होता. भीमथडीची तट्टे नर्मदेपार नेल्यामुळे उत्तरेकडचे काबुली घोडे दक्षिणेत येण्याचे बंद झाले. बाजीरांवानी उत्तरेत घुसून गुजरात, माळवा, बुंदेलखंड जिंकून नर्मदा आणि विंध्य पर्वत यातील सर्व महत्त्वाचे व्यापारी मार्ग आपल्या ताब्यात घेतले. भविष्यात महाराष्ट्रावर परकीय संकट कोसळू नये म्हणून महाराष्ट्राच्या बाहेर आपली सत्ता असायला हवी हे जाणून बाजीरावाने उत्तरेत शिंदे, होळकर, बांडे, पवार हे मराठा सरदार उभे केले. त्यामुळे ग्वाल्हेर, इंदौर, देवास आदी संस्थानं पुढे आली.
बाजीरावांची देशभर मोठी दहशत होती. १७३९ मध्ये इराणचा बादशाह नादिरशाह याने दिल्लीवर आक्रमण केलं तेव्हा बाजीराव दिल्लीकडे निघाला. ‘बाजीराव निघालाय’ या एवढ्या बातमीनेच नादिरशाह याने दिल्ली सोडली आणि तो परतला. पराक्रमासाठी आणि विजयासाठी ‘बाजी’ हा शब्दप्रयोग तेव्हापासून रुढ झाला असावा. बाजीरावाने शनिवारवाडा बांधला आणि साताºयाच्या राजगादी इतकेच महत्त्व पुण्याला मिळवून दिले.
॥ श्रीशाहूनरपति हर्षनिधान बाजीराव बल्लाळ मुख्यप्रधान॥
अशी बाजीरावांची मुद्रा होती.
कुशल सेनापती
बाजीरावाच्या युद्धकौशल्याची जाणीव आपल्याकडे नाही. पण अमेरिकन लष्कर आजही ती जाणीव ठेवून आहे. लष्करी डावपेच आणि रणनीतीच्या अभ्यासक्रमात आजही बाजीरावाने निजाम-उल-मुल्क याच्याविरुद्धची १७२८ मध्ये पालखेड इथे केलेली लढाई अमेरिकन सैनिकांना शिकवली जाते. त्यासाठी पालखेडचं कायमस्वरूपी मॉडेलच तयार केलं गेलेलं आहे. बाजीरावाने निजामाला पूर्ण पराभव करण्यासाठी त्याला पालखेडच्या कात्रीत कसं पकडलं याचा ‘स्ट्रॅटेजिक वॉरफेअर’च्या अभ्यासाचा भाग म्हणून आजही सांगितलं जातं. बाजीराव शत्रूला स्वत:च्या स्थळी आणून मात देत असे. मैदानात अनुकूल परिस्थिती नसेल तर वाट पाहून कसलेल्या शिकाºयाप्रमाणे हमला करायचा. कदाचित पुढील काळात या युद्धतंत्राचा विसर पडल्यामुळे ‘पानिपता’सारखा प्रसंग ओढावला. बाजीराव हे मोठे युद्धनीतीज्ञ होते. म्हणूनच ते अजेय राहिले. त्यांच्या कारकीर्दीतली एकही लढाई ते हरले नाही. म्हणून त्यांची तुलना नेपोलियनसारख्या युद्धनिपुण सेनापतीशी केली जाते. युद्धनीतीतील बारकावे, गनिमी कावे, शत्रूला आपल्या सोयीच्या व मोक्याच्या ठिकाणी आणून हरविणे, त्यासाठी दबा धरून बसणे, सक्षम गुप्तचर यंत्रणा वापरणे आदी तंत्र छत्रपती शिवाजीमहाराजांसारखेच वापरले असल्याचे दिसून येते. बाजीराव पराक्रमात शिवाजी महाराजांच्या बरोबरीचा होता की नाही याबाबत नक्कीच वाद नाही. शिवाजीमहाराजांच्या युद्धतंत्राचा ठसा बाजीरावांवर नक्कीच पडलेला होता.
घोडदळ ही बाजीरावांची सर्वात मोठी ताकद होती. बाजीरावाने पायदळ आणि तोफखाना बाळगणेच सोडले होते. त्या काळाच्या लढाईचा मुख्य केंद्रबिंदू म्हणजे सशक्त घोडदळ. बाजीराव घोड्यावर लहानाचा मोठा झाला असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. सहा फुट उंची असलेले बाजीराव हे उत्तम सेनापती होते. बुद्धी आणि शक्तीचा अद्वितीय संगम म्हणजे बाजीराव. घोड्यावरच्या बांधलेल्या पिशवीत भाजलेले चणे घेऊन ते खात खात दौड करीत, सैनिकांसह प्रवास करी. त्यांच्यासोबतच राही. त्यांच्याबरोबर जेवण करत असे. त्याच्या फौजा ७५ किलोमीटर प्रतीदिन या वेगाने जायच्या. घोड्यावर मोजकीच शिधा व शस्त्र असल्याने मराठा सैन्याची गतिमानता जास्त होती. सैन्याचा अंतर कापण्यासाठीचा हा वेग त्या काळातला सर्वोत्तम वेग होता. त्या काळात मुघल सैन्य दिवसाला ५ ते ६ मैल या वेगाने प्रवास करत असत. शत्रूला सुगावा लागायच्या आतच हल्ला झालेला असायचा. बाजीरावांची गुप्तचर यंत्रणा ही त्याची दुसरी मोठी बाजू. शत्रुच्या हालचालींबाबतची क्षणाक्षणांची माहिती त्यांना मिळायची. मार्गात येणाºया नद्या, नद्यांचे चढ, उतार, पर्वत, घाट या सगळ्यांची अचूक माहिती असायची.
मस्तानी :
बाजीरावाच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मस्तानी. पेशवे दप्तरातील पत्रांवरून तिचे नावे मस्तान कलावंत होते व बाजीरावांच्या (नानासाहेब) लग्नसमारंभात तिला नाचगाण्यासाठी आणण्यात आले होते. तर निजामाच्या नाटकशाळेतून बाजीरावाने तिला आणली अशीही एक आख्यायिका आहे. महंमदशहा बंगशपासून मुक्तता केल्याने छत्रसालेनेच तिला बाजीरावाला अर्पण केली असेही म्हणतात. खरे काय ते देवे जाणे. परंतु बाजीरावाने सहकारिणीचा दर्जा देऊ केल्यानंतरही अनेक प्रसंगाना तोंड द्यावे लागले. मस्तानीसारख्या यवन स्त्रीवर प्रेम करून तिला शनिवारवाड्यात आणणारा म्हणून ब्राह्मणांनी या पेशव्याला उपेक्षितच ठेवलं. काही ब्राह्मणांनी तसेच घरातील नातेवाईकांनी मस्तानी प्रकरणावरून त्यांना आयुष्यभर छळले. हिंदुस्थानभर आपल्या नावाचा धाक बसविणारा बाजीराव घरच्या कुरघोड्यांना तोंड देऊ शकले नाही. पुण्यातल्या तत्कालीन ब्राह्मणांना तसेच खुद्द बाजीरावांच्या आईला व बंधू चिमाजी अप्पांना ते काही पटले नाही. मस्तानीपासून समशेरबहाद्दर नावाचा मुलगाही झाला. अतुलनीय पराक्रम गाजवूनही बाजीराव उपेक्षित राहिल्यासारखाच वाटतो. मस्तानी त्यांचे प्रेम हे कदाचित त्याचे कारण असावे. बाजीराव-मस्तानीच्या प्रेमकथेवर अनेक लहान मोठ्या तर काही अतिरंजक कादंबºया लिहिल्या गेला. नुकतीच टिव्हीवर 'श्रीमंत पेशवा... बाजीराव मस्तानी' मालिका पाहण्यात आली. अनेक कथा, कादंबºयामधून रंगेल व शौकीन म्हणून बाजीरावांचे वर्णनही आले. लोकांना खरा इतिहास कधीच आवडत नाही. काहीतरी रंजक, मनोरंजनात्मक कहाणी तयार करून चुकीचा इतिहास गळी उतरविला की बरे वाटते. एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या गुणांचा आदर्श घेण्यापेक्षा त्यातील वाईट? गुण कसे उचलायचे ते आपण पाहता असतो. शेवटी चांगले काय आणि वाईट काय हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. असल्या रंजक कहाण्यांमधून बाजीरावाच्या पराक्रमी प्रतिमेचं प्रचंड नुकसान होते. योद्धा बाजूला राहून एक प्रेमीवेडा पेशवा तेवढाच पुढे आपल्यापुढे मांडला जातो. मस्तानी हे बाजीरावांच्या आयुष्यातलं शृंगारिक पर्व जरी असलं तरी त्यावरून बाजीरावाला छंदीफंदी चौकटीत बसवणं अन्यायकारकच ठरेल. शेवटी प्रत्येक व्यक्तीला स्वतचे असे खासगी आयुष्य असतेच म्हणून काही बाजीरावांनी केलेल्या पराक्रमाची माती होत नाही. खरे तर मस्तानी-बाजीराव हे प्रेमाचे प्रतिकच. एका परजातीतील स्त्रीवर त्याकाळात प्रेम करून सहचारीणीचा मान देण्याचे धाडस ‘बाजीराव’च करू शकेल.
रावेरखेडी :
२८ एप्रिल १७४० ला (वैशाख शुद्ध त्रयोदशी १६६२) मध्य प्रदेशातील नर्मदेकिनारी असलेल्या रावेरखेडी येथे ज्वर आल्याने बाजीरावांचे निधन झाले. बाजीरावांना केवळ ४० वर्षांचे आयुष्य मिळाल. तिथे पुढे नर्मदातटावर नानासाहेबांनी ग्वाल्हेर संस्थानच्या देखरेखीखाली बाजीरावांची समाधी बांधली. उत्तरेत जाण्यासाठी नर्मदा नदी ओलांडावी लागे. हे मोठे सैनिकी ठिकाण होते. नर्मदेच्या तटाजवळ असलेली ही समाधी महेश्वर धरण प्रकल्पामुळे पाण्याखाली जाणार असल्याचे मध्यंतरी वाचण्यात आले. रावेरखेडी हे बुडित क्षेत्रात येत असून समाधीसह इतर अनेक भाग पाण्याखाली जाणार आहे. महाराष्ट्रापासून एवढ्या लांब ठिकाणी त्याकाळात घोडेस्वारी करत बाजीराव कसे गेले असतील याचं आश्चर्य वाटते. घोडेस्वारीचं त्याचं कौशल्य अफाट असावं.
आपल्या घरातील व जातीपंथातील लोकांशी मानसिक युद्ध खेळून हरलेला? तरीही जिंकलेला हा ‘राऊ’ रावेरखेडीस चिरविश्रांती घेत खरा यौद्धाच ठरला. बाजीराव पेशव्यांचा हा इतिहास दैदिप्यमान आणि गौरवशाली आहे. हा इतिहास आपण दुर्लक्षित केला नाही तर चिरंतन टिकणारा आहे.
अनेक लोकांचा बाजीराव पेशवे व त्यांच्या परिवारातील विविध व्यक्तींविषयी नावावरून संभ्रम होतो. कोणाचा मुलगा कोण? काका कोण? हेच कळत नाही. पहिला बाजीराव, दुसरा बाजीराव, बाळाजी ऊर्फ नानासाहेब पेशवे अंताजी ऊर्फ चिमाजी अप्पा, रघुनाथ ऊर्फ राघोबादादा. भाऊसाहेब अशा विविध नावांमुळे पेशवे इतिहास सर्वसामान्य माणासाला समाजायला अवघड जातो. पूर्वी आजोबांचे नाव मुलाला देण्याची पद्धत असल्याने हा नावातील संभ्राम तयार झाला. यासाठी मी सर्वसामान्य वाचकाला समजेल अशी पेशव्यांची वंशावळी तयार केली आहे ती पाहण्यासाठी येथे क्लिक करा. (पेशवे वंशावळी) पेशव्यांच्या वंशावळेत दत्तक व औरस व अनौरस मुले, तसेच बहीणी यामुळे ही यादी अजून वाढेल त्यामुळे नाहक महत्त्वाच्या व्यक्ती संबंधी माहिती अपूर्ण राहील. यासाठी महत्त्वाच्या व्यक्तींचाच यादीत समावेश केलेला आहे. वेळ मिळाल्यास सदर व्यक्तींचे फोटोसहित देण्याचा मी प्रयत्न करेन.
(पेशवे वंशावळी)
http://ferfatka.blogspot.com/2013/10/blog-post.html
पेशवे
http://ferfatka.blogspot.com/2013/10/blog-post_9.html
काही ठळक घटना :
- २० फेब्रुवारी १७०७ रोजी अहमदनगर येथे औरंगजेबाचा मृत्यू
- १८ आगस्ट १७०० - बाजीरावांचा जन्म.
- १७०७ - कैदेतून शाहूमहाराजांची सुटका.
- बाळाजी विश्वनाथ - १७१३ ते १७२० पेशवाई प्रारंभ.
- बाळाजी विश्वनाथ - १२ एप्रिल १७२० ला सासवड मुक्कामी अल्पशा आजाराने मरण पावले.
- १७ एप्रिल १७२० ला शाहूमहाराजांनी पेशवाईची वस्त्रे बहाल केली
- १७२८ निजामाविरुद्ध पालखेडची लढाई
- २८ एप्रिल १७४० ला रावेरखेड येथे मृत्यू
- १७ डिसेंबर १७४० चिमाजी आप्पा एदलाबाद येथे मरण पावला.
मराठा साम्राज्याचे पेशवे (पंतप्रधान)
- सोनोपंत डबीर १६४०-१६५२
- श्यामपंत कुलकर्णी रांझेकर १६५२-१६५७
- मोरोपंत पिंगळे १६५७-१६७४
- राज्याभिषेकोत्तर (१७१२-१८१८)
- मोरोपंत पिंगळे १६७४-१६८३
- मोरेश्वर पिंगळे १६८३-१६८९
- रामचंद्रपंत अमात्य १६८९-१७०८
- बहिरोजी पिंगळे १७०८-१७११
- परशुराम त्रिंबक कुलकर्णी
- (पंतप्रतिनिधी) १७११-१७१३
- साम्राज्याचे शासक १७१२-१८१८
- बाळाजी विश्वनाथ भट १७१२-१७१९
- बाजीराव पेशवे १७२०-१७४०
- बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब १७४०-१७६१
- माधवराव पेशवे १७६१-१७७२
- नारायणराव १७७२-१७७३
- रघुनाथराव पेशवे १७७३-१७७४
- सवाई माधवराव पेशवे १७७४-१७९५
- दुसरा बाजीराव १७९५-१८५१
- नानासाहेब १८५१-१८५७
- पेशवाईचा अस्त.
शिवाजीमहाराजांचे अष्टप्रधान मंडळ
१) प्रधान २) आमात्य ३) सचिव ४) मंत्री
५) सुमंत ६) न्यायाधिश ७) दिव्यशास्त्री ८) सेनापती
संदर्भ :
१) ऐतिहासिक गोष्टी व उपयुक्त माहिती (भाग १) - लोकहितवादी
२) दक्षिणेतील सरदारांच्या कैफियती, यादी वगैरे - पुरुषोत्तम विश्राम मौजे, डी. बी. पारसनीस
३) पेशव्यांची बखर : भीमराव कुलकर्णी
४) भारताचा इतिहास : डॉ. श. गो. कोलारकर
बाजीरावांविषयी काही मुद्दे मांडण्यासाठी हा लेख प्रपंच. ‘ध’ चा ‘मा’ झाल्यास जरूर कळवा.
(No subject)
Pages