उस्ताद जौ़क

Submitted by समीर चव्हाण on 15 September, 2013 - 04:09

जौ़क प्रामुख्याने ओळखला जातो एकतर गा़लिबचा प्रतिस्पर्धी म्हणून किंवा बहाद्दुरशाह जफ़र आणि दाग़ देहलवीचा उस्ताद म्हणून. ह्याचे मुख्य कारण जौ़कचे मोठेपण ठरवण्यासाठी त्याचे उपलब्ध असलेले अत्यल्प साहित्यः शे-दीडशे गझला, काही कसीदे-मसनवी, आणि फुटकर. त्याचे बहुतांश साहित्य दुर्देवाने गदरमध्ये जळून खाक झाले. जौ़कचा एक विद्यार्थी आजा़द ह्याच्या म्हणण्यानुसार जौ़कची ५०० शेरांची एक अपूर्ण मसनवी (दीर्घकाव्य) गदर मध्ये नष्ट झाली. ह्यावरून जौ़कच्या कामाची कल्पना येते. जौ़कचे बहुचर्चित किस्से जौ़कला जनमानसात टिकवून आहे असे म्हणणे कदाचित अतिशयोक्तिचे होईल. मात्र त्यात तथ्य नाही असेही नाही. ह्या प्रपंचाचा एक उदेश्य जौ़कचे मला भावलेल्या शेरातील सार उलगडून दाखवणे वा त्याचा प्रयत्न आहे.

साधेपणा, स्पष्टता जौ़कच्या शेरांतील विशेष गुण अनेक शेरात सहज आढळतो. विचारांच्या खोलीसोबत हे गुण जपणे किती अवघड आहे हे पाहण्यासाठी एक शेर पाहूया:

उसे हमने बहुत ढूंढा, न पाया
अगर पाया, तो खोज अपना न पाया

ती गोष्ट खूप शोधली, मात्र मिळाली नाही.
जर कळाले तर एवढेच कळाले की ह्यात मीच हरवलो.

दिसायला साधा-सुधा हा शेर अतिशय गुंतागुंतीचा आहे.

पुढील शेर अतिशय बोलका आहे. विचारांतील सफाई पाहण्याजोगी आहे:

क्यों कह के मुक़रता है कि मैं कुछ नही कहता
कह जो तुझे कहना है कि मैं कुछ नही कहता

भावनांची तीव्रता कमालीची चित्रदर्शी बनवता येते हे पुढील शेरातून कळून येते:

फिर तो आये खै़र से हम जाके उस मग़रूर तक
पर उछलता ही रहा अपना कलेजा दूर तक

म्हणींचा वापर सगळ्याच मोठमोठ्या कवींनी पुरेपूर केलाय. जौ़कचाही रंग पाहण्याजोगा आहे:

छुपा के पान ये किस के लिए बनाते हो
हमारे क़त्ल का बीडा़ कही उठाते हो

पुढील शेराने मला बुचकळ्यात पाडले होते. विदिपांशी बोलल्यानंतर अर्थ उलगडला:

कहे एक जब सुन ले इंसान दो
कि हक़ ने ज़बां एक दी कान दो

इथे हक़ चा अर्थ ईश्वर असा आहे. माणसाला निर्मीत्याने एक तोंड आणि दोन कान दिलेत.
जौंक म्हणतो त्याची उपयुक्तता सार्थ आहे. माणूस एका तोंडाने बोलत असला तरी ऐकताना आपल्या सोईनुसार्/फायद्यानुसार माणूस ऐकतो, अर्थ लावतो.

वर दिलेल्या शेराप्रमाणे जौ़कच्या शेरांत लहान-सहान निरीक्षणे भरभरून आहेत. उदाहरणार्थः

अगर ये जानते चुन-चुन के हमको तोडेंगे
तो गुल कभी न तमन्नाए-रंगो-बू करते

गुल्=फूल, तमन्नाए-रंगो-बू म्हणजे रंग-गंध ह्यांची अभिलाषा.

इस तपिश का है मज़ा दिल ही को हासिल होता
काश, मैं इश्क़ में सर-ता-ब-क़दम दिल होता

जौ़क त्याच्या अब तो घबरा के ये कहते है कि मर जायेंगे, मर गये पर न लगा जी तो किधर जायेंगे
किंवा लायी हयात, आये; कजा़ ले चली, चले, अपनी खुशी न आये न अपनी खुशी चले
ह्या प्रसिध्द गझलांमुळे सर्वसामान्यांना माहित असावा.

लायी हयात, आये, क़ज़ा ले चली, चले
अपनी ख़ुशी न आये न अपनी ख़ुशी चले

बेहतर तो है यही कि न दुनिया से दिल लगे
पर क्या करें जो काम न बे-दिल्लगी चले

कम होंगे इस बिसात पे हम जैसे बद-क़िमार
जो चाल हम चले सो निहायत बुरी चले

हो उम्रे-ख़िज़्र तो भी कहेंगे ब-वक़्ते-मर्ग
हम क्या रहे यहाँ अभी आये अभी चले

दुनिया ने किसका राहे-फ़ना में दिया है साथ
तुम भी चले चलो युँ ही जब तक चली चले

नाज़ाँ न हो ख़िरद पे जो होना है वो ही हो
दानिश तेरी न कुछ मेरी दानिशवरी चले

कजा़=मृत्यू, बिसात=जुआ, बद-क़िमार=जुआरी, उम्रे-ख़िज़्र=अमर, ब-वक़्ते-मर्ग=मरण्याच्या वेळेस, राहे-फ़ना=हरवलेली वाट, खिरद्=बुध्दी, दानिश, दानिशवरी=समज, समजूतदारपणा

गा़लिबच्या गझलेतील आकर्षकता त्याच्या शेरात नसली तरी कल्पनेतील उंची त्याच्या लिखाणात सहज दिसून येते.

सुराग़ उम्रे-गुजिश्ता का ढूंढिए गर जौ़क
तमाम उम्र गुज़र जाय जुस्तजू करते

ढोबळ अर्थ असा आहे: गतकाळाचा आढावा घ्यायचा झाला तर एक आयुष्यही कमीच आहे.

ऐ अहले-नजर आलमे-तसवीर को देखो
तसवीर का क्या देखना तसवीर में क्या है

जौ़क म्हणतो चित्र काय पाहतोस, चित्रात काय आहे. पाहायचे असेल तर ज्या भाववस्थेत तू हरवलास त्याला पाहा/समजून घे.

जो दिल से अपने दमे-आतशीं निकल जाये
फ़लक के पांव तले से ज़मीं निकल जाये

दमे-आतशीं =जलती आह

पुढील शेर अर्थाने सोपा आहे:

आदमीयत और शै है, इल्म है कुछ और शै
कितना तोते को पढा़या पर वो हैवां ही रहा

शै=वस्तू, इल्म=ज्ञान, हैवां=सैतान

कलाकुसरीचा आणि कल्पकतेचा हा एक अप्रतिम नमुना:

दर्दे-दिल से लोटता हूं मेरा किसको दर्द है
मैं हूं लफ्जे़-दर्द जिस पहलू से देखो दर्द है

दर्द हा शब्द उर्दूत लिहिल्यावर तो डावीकडून उजवीकडे वाचा वा उजवीकडून डावीकडे तो एकच असतो.

पुढील शेर मला अत्यंत आवडतो:

बेक़रारी का सबब हर काम की उम्मीद है
नाउमेदी से मगर आराम की उम्मीद है

अस्वस्थता काम होण्याची आशा जागवते तर निराशा कामाची शक्यता पुसट करते.

..............................

गा़लिब आणि जौ़कचे दोन-तीन किस्सेतरी रोचक आहेत. एक किस्सा देत आहे; तो कमी लोकांना माहीत असावा, असे वाटते. गा़लिब, जौ़क, आणि मोमिन हे प्रतिस्पर्धी असले तरी इतरांच्या चांगल्या कवितांना हेरणारे आणि सर्वसामान्यांत मान्य करणारे मोठ्या मनाचे कवी होते. जौ़क आपल्या मित्रांमधे आणि विद्यार्थ्यांमधे बसून गा़लिबचा एका शेराबद्दल म्हटले होते: ``मिर्जा़ को खुद अपने अच्छे शेरोंका पता नही है" तो शेर असा आहे:

दरियाए-मआ़सी तुनुक-आबी से हुआ खुश्क
मेरा सरे-दामन भी अभी तर न हुआ था

अर्थ असा: माझ्या सद-याचे टोक भिजलेही नव्हते आणि पापाची नदी पाण्याच्या अभावाने आटली.
गा़लिबचा कल्पनाविलास अनेकदा आश्चर्याच्या पलीकडला असतो, हे लक्षात येते.
.............................

ह्या लेखाचा माझा मुख्य संदर्भ सं सरस्वती सरन कैफ़ ह्यांचे राजपाल प्रकाशनाचे जौ़क और उनकी शायरी हे पुस्तक आहे. दुर्दैवाने कुल्लियाते-जौ़क देवनागरीत उपलब्ध नाही आहे.
ह्या परिचयाचा शेवट जौ़क ने लिहिलेल्या शेवटच्या शेराने करत आहे (मुग्फ़रत=माफ करणे):

कहते है जौ़क आज जहां से गुज़र गया
क्या खूब आदमी था, खुदा मुग्फ़रत करे

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छुपा के पान ये किस के लिए बनाते हो
हमारे क़त्ल का बीडा़ कही उठाते हो..

व्वा... जबरी शेर आहे...

लायी हयात, आये, क़ज़ा ले चली, चले
अपनी ख़ुशी न आये न अपनी ख़ुशी चले

सानी मिसरा हा एका नोकराने सहज उच्चारला होता आणि त्यावर उस्ताद जौक नी गिरह बांधून मतला तयार केल्याचा किस्सा प्रसिद्ध आहे.

फारच छान लेख. मन्;पूर्वक आभार समीर.

मनःपूर्वक केलेला परिचय, लेख आवडला.जौक यांचा काळही लेखात स्पष्टपणे उल्लेखित करा ना नवनिर्वाचितांसाठी :). असेच लिहित रहा.
क्यों कह के मुक़रता है कि मैं कुछ नही कहता
कह जो तुझे कहना है कि मैं कुछ नही कहता
यात कुठेतरी 'उनको ये शिकायत हैं के हम कुछ नही कहते' चं बीज झळकून गेलंय असं वाटलं.

लायी हयात, आये, क़ज़ा ले चली, चले
अपनी ख़ुशी न आये न अपनी ख़ुशी चले ..साधेपणाच, पण किती साध्या शब्दात जीवनवैचित्र्य .

खूप खूप धन्यवाद सर
असेच उत्तमोत्तम शायरांवरचे लेख अजून येवूद्यात

बेक़रारी का सबब हर काम की उम्मीद है.......नाउमेदी से मगर आराम की उम्मीद है<<<काम व आराम ह्या शब्दांची अशीच मजा एका शेरात आली होती बेफीकीरजींचा तो शेर बहुधा असा होता ...

करावा वाटला आराम तेंव्हा काम करताना
मिळावे काम आता वाटते आराम करताना

ह्यातल्या बर्‍याच शेरांवर आपली चर्चा झाली होती. अजून काही मस्त शेर ऐकायला मिळाले.

जो दिल से अपने दमे-आतशीं निकल जाये
फ़लक के पांव तले से ज़मीं निकल जाये>>>

अप्रतिम. विशेषतः फ़लक के पांव तले से ज़मीं निकल जाये ही कल्पनाच इतकी अफाट आहे की बस!

धन्यवाद समीर.

धन्यवाद मित्रांनो.
जौ़कचा जन्म १७८९ तर देहान्त १८५४ मध्ये झाले.
इतरही काही गोष्टी आहेत ज्या सवडीनुसार समाविष्ट करीन.
जसे गा़लिब आणि जौ़क चे काही किस्से. आज लिहायचे ठरवून बसलो. एका बैठकीत इतकेच करू शकलो (रविवारी घरात बसून असे काही करणे अवघड आहे, हे समजून घ्यालच). जौ़कचा एक विद्यार्थी आजा़द ह्याच्या म्हणण्यानुसार जौ़कची ५०० शेरांची एक अपूर्ण मसनवी (दीर्घकाव्य) गदर मध्ये नष्ट झाली. ह्यावरून जौ़कच्या कामाची कल्पना येते.

धन्यवाद.

टीपः लेख संपादित केला आहे. एक छोटासा किस्सा dotted lines मधे टाकला आहे.

>>
ऐ अहले-नजर आलमे-तसवीर को देखो
तसवीर का क्या देखना तसवीर में क्या है
<<

फार आवडला हा शेर! Happy
धन्यवाद, समीर.

धन्यवाद, स्वाती.
आभार तर खरे मी तुम्हा लोकांचे मानायला हवे.
इथे कानपुरात राहूनही फार थोड्या लोकांसोबत उर्दू कविता वाचल्याचा वा समजल्याचा आनंद शेअर करता येत आहे.
मायबोलीमुळे हे सहज शक्य आहे.
वाचन एके वाचन संवादाशिवाय दीर्घकाळ करणे अवघड आहे, हे मला पुरते कळून चुकलेय.

समीर

समीर , आभार नंतर दिलेल्या तपशीलांबद्दल. वाचनाचा निर्भेळ आनंद खूपदा आपल्याला संवादाला/ लेखनाला उद्युक्त करतोच..

उसे हमने बहुत ढूंढा, न पाया
अगर पाया, तो खोज अपना न पाया

सुराग़ उम्रे-गुजिश्ता का ढूंढिए गर जौ़क
तमाम उम्र गुज़र जाय जुस्तजू करते

ऐ अहले-नजर आलमे-तसवीर को देखो
तसवीर का क्या देखना तसवीर में क्या है

फार फार आवडले हे शेर!!

मनापासून आभार समीर.

...

शम्स-उल-उलेमा मौलाना मुहम्मद हुसेन 'आजाद' हे जौक यांचे सर्वात आवडते शागीर्द होते. आजाद यांचीही आपल्या उस्तादांवर नितांत श्रद्धा होती. उस्तादांचे सर्व लिखाण त्यांनी भक्ती भावाने जपून ठेवले होते.

जौक यांच्या निधनानंतर ३ वर्षांनी १८५७ मध्ये बंडाच्या धामधूमीत बंडवाले सैनिक आजाद यांच्या वाड्यात घुसले आणि बंदुका दाखवून ताबडतोब घराबाहेर पडण्यास सांगितले. आजाद म्हणतात, 'हे ऐकताच माझ्या डोळ्यासमोर अंधेरी आली. ऐश्वर्याने भरलेल्या माझ्या वाड्यात मी हैराण होऊन उभा राहीलो. इथून काय घेऊन मी बाहेर पडू? मनाशी म्हंटलं 'महम्मद हुसेन, खुदाची दुवा झाली, तर ही सगळी संपत्ती पुन्हा मिळवता येईल. पण उस्तादांची काव्यसंपदा गेली तर ती द्यायला उस्ताद कुठून मिळणार?, तिचा बचाव कर, ती गेली तर उस्तादांचा नामोनिशाणही राहाणार नाही. असा विचार करून उस्तादांच्या लिखांणाचे बाड उराशी धरून आझाद यांनी घर सोडले. अशी त्यांच्या आपल्या उस्तादांवर निष्ठा होती. त्यांचे काव्यधन वाचवण्यामध्ये आजाद यांनी मोलाची कामगिरी बजावली.

जौक यांच्या शेरातील आशय सुलभपणा फार भावतो . एवढा उत्तम परिचय करून दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार समीरजी .