विंचुर्णीचे धडे
गौरी देशपांडेचं "एकेक पान गळावया" या बहुचर्चित पुस्तकांएवढं कदाचित प्रसिद्ध नसेल पण या पुस्तकावरही गौरीचा मोहक ठसा जाणवतोच. १९९६ चं हे पुस्तक. पुस्तक रूढ अर्थाने कोणत्र्या प्रकारात बसते माहित नाही. ही विंचुर्णीची चित्रे आहेत गौरीने रेखाटलेली. त्या चित्रांची प्रेक्षक म्हणून गौरी थोडीशी दिसते. त्याबरोबर पार्श्वभूमीला तिची मुले, नवरा हेही अधे मधे दिसतात. तशी ही आत्मकथा नव्हे पण एका महत्त्वाच्या टप्प्यावर अनुभवलेलं आयुष्य इथे गौरीने रेखाटलं आहे. या पुस्तकाची प्रस्तावना, अर्पणपत्रिका तेवढीच वाचनीय आहे. आपल्याला विंचुर्णीसारख्या खेड्यात जाऊन रहायची बुद्धी का झाली याचं सुरेख वर्णन यात आहे. याला कारण झालं गौरीच्या स्वप्नातलं कम्युन! प्रत्यक्षात त्या कम्युनमधे बरं वाईट सगळंच असणार आहे विंचुर्णीसारखं. स्वप्न बघायला हवीतच पण प्रत्यक्षात आणखीही खूप काही त्याबरोबर मिळतं. पाहिजे असलेलं आणि नको असलेलंही!
पुणे मुंबईच्या गजबजाटातून बाहेर पडून दुष्काळग्रस्त विंचुर्णीला घर बांधायला कारण झाले ते गौरीचे मेव्हणे आणि बहीण. ते आधी तिथे जाऊन राहिले होते ते पाझर तलाव आणि त्यांच्या मेंढ्यांच्या प्रकल्पासाठी. गौरीने तिथे घर बांधले आणि तिथून हलूच नये असे सुरू केले. मग घराबरोबर विंचू, साप, मांजरे कुत्री सगळी गोळा झालीच. पाहुणे रावळे मुली नातवंडे सगळे ये जा करत होते. असेच मेंढ्यांचे काम पण गौरीने गळ्यात घालून घेतले.
या घरासोबत या सगळ्या प्राणी-मित्रांची चित्रे अतिशय सुरेख उतरली आहेत मग तिथल्या गोरख, नानी, मीराबाई अशा लोकांची स्वभावचित्रे अगदी प्रत्ययकारी आली आहेत यात नवल ते काय! या सगळ्यात पार्श्वभूमीला हमखास नसणारी वीज, मग तिथे आपोआप झालेली काळोखाची सवय, पाझरतलाव, तलावात होडी चालवणारी गौरी हे सगळं मुळातून वाचलं पाहिजे.
नंतर तर पुण्याला प्रोफेसरकी स्वीकारून तिकडे रहायला जावे लागले तरी विंचुर्णीचे घर होतेच. संधी मिळताच तिथे धाव घ्यायची हे गौरीचे आयुष्य होऊन बसले. विंचुर्णीच्या लोकांना सुधारायचा प्रयत्न केल्यानंतर ते अशक्य आहे हे समजून गौरीने सोडून दिले. विंचुर्णीचे धडे हे पुस्तकाचं शेवटचं प्रकरण तर अगदी अभ्यसनीय. त्यात अशा गावांकडे आदर्शवाद म्हणून धावलेल्यांची निराशा, अशा गावकरी लोकांसाठी काम करणार्या संस्थांच यश अपयश हे सगळं गौरीने लिहिलं आहे. तसंच विंचुर्णीकडून आपल्याला काय शिकायला मिळालं तेही लिहिलं आहे.
ते म्हणजे (१)आपल्या हातून कोणाचे फार भले होणार नाही. (२)संघटना या निराशाजनक असतात. (३) माणसांना प्रेम लावले की ती आपली होतात असे नव्हे. दृष्टीआड झाली की ती मनातून हळूच निखळून जातात. हा धडा अवघड असला तरी याचा अर्थ असा नाही की माणसे जोडूच नयेत! ज्यांच्या आधारे आयुष्य काढले ती तत्त्वे फोल आणि अडगळीची म्हटल्यावर माणसाने काय करावे हा आणि असेच प्रश्न. कोणाकडून मोठ्या अपेक्षा ठेवू नयेत आणि तरी ठोकर लागलीच तर ते सगळेच मागे ठेवून पुढे चालू लागायचे हा सगळ्यात मोलाचा धडा!
पुस्तकात सामाजिक संस्थांबद्दल लिहिलेलं सगळंच पटेल असंही नाही.पण आपले सगळे ग्रह, पूर्वग्रह बाजूला ठेवले तर निव्वळ लिखाण म्हणूनही आवडू शकेल. सगळ्या पुस्तकभर वेगवेगळ्या व्यक्तिरेखा आणि विंचुर्णीचे धडे या शेवटच्या लेखात कथनाच्या ओघात सामाजिक आणि वैयक्तिक संबंधांचा उहापोह आणि खास गौरीच्या अशा टिप्पण्या आहेत.
पुस्तकाच्या शेवटाला उपसंहारात म्हटल्याप्रमाणे गौरी अधे मधे ताजी होण्यासाठी विंचुर्णीला जाते, हवे तसे जगते, लिहिते, कष्ट करते. या सगळ्यामुळे तब्बेत छान रहाते! पण त्या विंचुर्णीला काही द्यायच्या आदर्शवादाला मात्र तिने बाजूला ठेवले आहे. शेवट गौरी म्हणते की "विंचुर्णीने मला जे काही दिले ते अनमोल आहे. खरी खंत अशी आहे की, काही कारणाने का होईना - मी विंचुर्णीला फारसे काहीच दिले नाही!"
(टीपः गौरींचे २००३ मध्ये निधन झाले.)
छान लिहिलं आहे मला गौरीचं
छान लिहिलं आहे
मला गौरीचं लेखन तितकंसं आवडत नाही, पण हे पुस्तक मात्र अपवाद.
मला गौरींचं लेखन अतिशय आवडतं,
मला गौरींचं लेखन अतिशय आवडतं, त्यांची विंचुर्णी अन विंचुर्णीतल्या त्या त्यांच्या ललितलेखनातही कुठेकुठे झळकून जातात. छान लिहिले आहे ज्योती, एका चांगल्या पुस्तकाची आठवण जागली.
विंचुर्णीचे धडे खूप
विंचुर्णीचे धडे खूप वर्षांपूर्वी वाचले होते, मला आवडले होते आणि मला गौरी देशपांडेंचे लेखन आवडते, ज्योती छान लिहिलेय.
मस्त लिहिलंय मी पण पुस्तक
मस्त लिहिलंय
मी पण पुस्तक बर्याच वर्षांपूर्वी वाचले होते, शेवटचा धडा घेण्याजोगा
विंचुर्णीचे धडे हे पुस्तकाचं शेवटचं प्रकरण तर अगदी अभ्यसनीय. त्यात अशा गावांकडे आदर्शवाद म्हणून धावलेल्यांची निराशा, अशा गावकरी लोकांसाठी काम करणार्या संस्थांच यश अपयश हे सगळं गौरीने लिहिलं आहे. तसंच विंचुर्णीकडून आपल्याला काय शिकायला मिळालं तेही लिहिलं आहे. लक्षात राहीलेले
छान परिचय!
छान परिचय!
थोडक्यात पण छान लिहिलेय.
थोडक्यात पण छान लिहिलेय.
माझे अगदी आवडते पुस्तक.
माझे अगदी आवडते पुस्तक. त्यातील ते एकट्यानेच एक ड्रिंक बनवूनसूर्यास्ता च्या वेळी तळ्याकडे बघत ती चीअर्स करते तो क्षण अतिश सुरेख आहे. इतरांची कटकट आणि शहरा च्या गजबजाटाला कंटाळून ती घरी येते तेव्हा चा. ह्या वर एक मालिका करायची फार इच्छा आहे. बरेचसे संवाद आ णि घटना चित्रद् र्शीच आहेत.
त्यांनी मला पर्सनली भावनिक आधार दिला आहे हे मी कधीच विसरू शकत नाही. पण त्यांच्यासाठी आप ण ही काही करू शकलो नाही हे ही.
वरदा, भारती, अन्जू, हर्पेन,
वरदा, भारती, अन्जू, हर्पेन, फारएण्ड, डेलिया, अश्वीनीमामी सर्वांना मनापासून धन्यवाद!
विंचुर्णीचे धडे खूप
विंचुर्णीचे धडे खूप वर्षांपूर्वी वाचले होते, मला आवडले होते आणि मला गौरी देशपांडेंचे लेखन आवडते, ज्योती छान लिहिलेय.>>>>>>>>>> +१
छान लिहिलं आहे. खरच
छान लिहिलं आहे. खरच
सुरेख परिचय...
सुरेख परिचय...
माझे अत्यंत आवडीचे पुस्तक
माझे अत्यंत आवडीचे पुस्तक
आणि त्यावर लिहील्याबद्दल धन्यवाद 
येळेकर, सुजा, पुरंदरे शशांक,
येळेकर, सुजा, पुरंदरे शशांक, मी नताशा, मनःपूर्वक धन्यवाद!
ज्योति.... एखाद्या निवडक
ज्योति....
एखाद्या निवडक पुस्तकावर तुम्ही काही लिहावे असे मला वाटत होतेच आणि त्यातही तुम्हाला 'गौरी देशपांडे' लिखाण भावले ही तर फारच अगत्याची गोष्ट. गौरीचे निधन होऊन दहाएक वर्षे ओलांडली असली तरी तिची जी काही आठदहा पुस्तके आहेत तेवढी तिचे नाव मराठी साहित्यविश्वास ठळकपणे नोंदविण्यास पुरेशी आहेतच. विशेष म्हणजे ज्या 'एकेक पान गळावया' चा तुम्ही उल्लेख केला आहे, ते तर गौरीचे पहिले असूनही मी वाचले मात्र प्रसिद्धीनंतर साताठ वर्षांनी. त्या अगोदर 'तेरुओ'...'निरगाठी'....आणि हे "विंचुर्णीचे धडे' पूर्ण झाले होते. किंबहुना विंचुर्णीमुळेच गौरी यांचे समग्र साहित्य मिळवावे हीच इच्छा मने दाटली. तुम्ही परीक्षणही छानच केले आहे.
एके ठिकाणी तुम्ही शेरा लिहिला आहे..."...पुस्तकात सामाजिक संस्थांबद्दल लिहिलेलं सगळंच पटेल असंही नाही...". त्याबाबत आपण काही जास्त लिहू शकत नाही, कारण गौरी देशपांडे ह्या इरावती कर्वे यांच्या कन्या आणि कर्वे घराण्याचे नाव सामाजिक पातळीवरील कार्यात फार अग्रक्रमाने घेतले जात असे. त्यामुळे गौरी आणि जाई या दोघींचाही या ना त्या निमित्ताने सामाजिक संस्थांशी संबंध येतच असे....त्या अनुभवातील काही कटू प्रसंगही त्यांच्या पदरी असणारच.
असो....एक सुंदर पुस्तक तुम्ही निवडलेत त्याबद्दल धन्यवाद, ज्योति.
अशोक पाटील
अशोकदा, धन्यवाद! >>>गौरी
अशोकदा, धन्यवाद!
>>>गौरी देशपांडे ह्या इरावती कर्वे यांच्या कन्या आणि कर्वे घराण्याचे नाव सामाजिक पातळीवरील कार्यात फार अग्रक्रमाने घेतले जात असे. त्यामुळे गौरी आणि जाई या दोघींचाही या ना त्या निमित्ताने सामाजिक संस्थांशी संबंध येतच असे....त्या अनुभवातील काही कटू प्रसंगही त्यांच्या पदरी असणारच. >>>
अगदी नेमके! आमच्यासारखे लोक जेव्हा अशा मोठ्या माणसांनी लिहिलेले काही वाचतात तेव्हा आमचा अगदी "बेंबट्या" होतो. कारण दोन्ही बाजूंचं पटत असतं! तेव्हा त्याबद्दल विचार करायचं काम वाचकांवर सोडून द्यावं आणि आपण उत्तम त्याचा परिचय करून द्यावा हेच खरे!
@ कामत मॅडम "अगदी नेमके!
@ कामत मॅडम
"अगदी नेमके! आमच्यासारखे लोक जेव्हा अशा मोठ्या माणसांनी लिहिलेले काही वाचतात तेव्हा आमचा अगदी "बेंबट्या" होतो. कारण दोन्ही बाजूंचं पटत असतं! तेव्हा त्याबद्दल विचार करायचं काम वाचकांवर सोडून द्यावं आणि आपण उत्तम त्याचा परिचय करून द्यावा हेच खरे!"
१००% पटले
मी गौरी देशपांडे ह्यान्ची
मी गौरी देशपांडे ह्यान्ची १००% फॅन. हे पुस्तकही आवडत्या पुस्तकांमधल. तशी सगळीच आवडतात! मस्त. बाकी पुस्तकांचाही परिचय लिहावा, ही विनन्ती
आधी माहीत नव्हतं या
आधी माहीत नव्हतं या पुस्तकाबद्दल..एका चांगल्या पुस्तकाचा परिचय झाला...धन्यवाद!!
jayant.phatak, अनया, सुशांत
jayant.phatak, अनया, सुशांत खुरसाले मनःपूर्वक धन्यवाद!
अनया, गौरीच्या इतर पुस्तकांची ओळख करून द्यायचा जरूर प्रयत्न करीन!
माझ्या अत्यंत आवडत्या
माझ्या अत्यंत आवडत्या लेखिकेच्या अत्यंत आवडत्या पुस्तकावर लिहिल्याबद्दल धन्यवाद !
छान लिहिलंयस गं...
आता तिच्या बाकीच्या पुस्तकांबद्दल पण येउ दे नं.. उत्खनन, चंद्रिके गं..., निरगाठी...
आता तिच्या बाकीच्या
आता तिच्या बाकीच्या पुस्तकांबद्दल पण येउ दे नं.. उत्खनन, चंद्रिके गं..., निरगाठी...>> खरेच.
मितान, आणि येळेकर धन्यवाद!
मितान, आणि येळेकर धन्यवाद! अशाच आवडलेल्या पुस्तकांबद्दल जरूर लिहीन.
मध्ये गौरीच्या मुलीचे
मध्ये गौरीच्या मुलीचे (उर्मिला देशपांडे) पण पुस्तक आले होते पॅक ऑफ लाइज म्हणुन..
हे घ्या
http://asyoublogit.blogspot.com/2010/06/pack-of-lies-by-urmila-deshpande...
मध्ये गौरीच्या मुलीचे
मध्ये गौरीच्या मुलीचे (उर्मिला देशपांडे) पण पुस्तक आले होते पॅक ऑफ लाइज म्हणुन.. >>>>>
छान आहे.मी अनुवाद वाचला होता.मायबोलीवरील एका धाग्यात (नाव आठवत नाही) ह्या पुस्तकाचा संदर्भ वाचला होता.एक सशक्त लिखाण वाचल्यासारखे वाटले.
सुंदर परीचयासाठी मनापासून
सुंदर परीचयासाठी मनापासून धन्यवाद!