२६ ऑगस्ट २०१३
माझा चार दिवसांचा आजार आणि तिचा चार दिवसांचा आळस... पाचव्या दिवसाला झटकून, श्रावणी सोमवारचा मुहुर्त साधून आमचे देवदर्शनाला जायचे ठरले.. अर्थातच.. तिनेच ठरवले.. कारण ती जेवढी आस्तिक तेवढाच मी नास्तिक.. त्यामुळे नेहमीसारखेच, ‘जाणे गरजेचे आहेच का??’ इथपासून वादाला सुरूवात.. घरापासून चालतच पंधरा-वीस मिनिटांवर महादेवाचे मंदीर असल्याने माझी नकारघंटा वाजवायला जास्त वाव नव्हताच.. आजारपणाचा फायदा उचलून सकाळपासून टाळलेली आंघोळ.. नाईलाजाने जेव्हा संध्याकाळी उरकावीच लागली, तेव्हा आता अखेर जाणे निश्चितच हे समजून चुकलो.. तरीही तिचे हे देवदर्शन सुकर घडू देणार्यातला मी अजिबात नव्हतो.. अन पहिली चकमक उडाली, जेव्हा मी स्वच्छ आंघोळ करून माझ्या निर्मळ झालेल्या शरीरावर जुनीपुराणी कळकट मळकट जीन्स चढवली..
"जीन्स आणि तंबाखू.., मळल्याशिवाय मजा येत नाही" .... या माझ्या युक्तीवादाचे तिच्या भक्तीवादापुढे काही एक चालले नाही आणि ती मला बदलावी लागलीच.. पण लागलीच.. मी दुसरा मुद्दा उपस्थित केला की छत्रीचे ओझे मी बरोबर घेणार नाही आणि पाऊस आला तर तिथूनच टॅक्सीने परत येणार.. तिने हसतच याला मान्यता दिली आणि गेले चार दिवस पावसाची रिपरिप फारशी नव्हतीच हे आठवल्यावर मला तिच्या या हसण्यामागचे रहस्य उलगडले.. तसे चालत जायचा ना तिला फारसा उत्साह ना मला फारसा आळस, त्यामुळे जाताना चालत जायचे आणि येताना टॅक्सीने यायचे याला दोघांनीही मान्यता दिली.. देवदर्शनाला चालत गेल्याचे तिला समाधान आणि एकवेळचे टॅक्सीचे भाडे वाचवल्याचे मला.. चालताना तिचा वेग असा होता, की जणू ‘चलो बुलावा आया है..’, त्यामुळे निरुत्साहाने रेंगाळत चालणार्या माझी फरफटच होत होती.. पण मला खरी चिंता होती ती देवदर्शनासाठी लागलेल्या रांगेची.. आपली कसलीही श्रद्धा नसताना वा कुठलाही स्वार्थ साधला जाणार नसताना त्या रांगेत उभे राहणे म्हणजे आयुष्यातील वेळ फुकट गेल्यासारखेच मला वाटते.. त्यातही एक नास्तिक म्हणून सर्वात जास्त कोणत्या गोष्टीचा त्रास होत असेल तर तो रांगेतील आजूबाजुच्या लोकांनी मलाही आस्तिक समजण्याचा.. पण सुदैवाने रांग नावाचा प्रकार अस्तित्वात नव्हता.. मात्र पुरेशी वर्दळ होती.. इतर कुठल्याही सोमवारापेक्षा श्रावणी सोमवार जास्त स्पेशल असल्याने हाराफुलांची दोनचार दुकाने जरा जास्तच उठून दिसत होती.. त्यात रचून ठेवलेली ताटेही तशीच भरगच्च भासत होती.. आजूबाजूला कोणाला ऐकू न जाईल अश्या आवाजातच बायकोच्या कानात कुजबुजलो, छोटेवालेच घे हं .. पण ते काही होणे नव्हते हे अनुभवानेच ठाऊक होते.. नेहमीचे नारळ-फूल-फुटाणे-अगरबत्ती व्यतिरीक्त दुध की दहयाची थैली आणि उमलायच्या आतच खुडलेले कमळाचे एक फूल पाहून समजलो कि हे नेहमीच्या बजेटमधील प्रकरण नाही.. मागाहून किंमत समजली तेव्हा अंदाजलेले बजेटही गोंधळले होते.. त्यातल्या त्यात एकच दिलासा वाटला कि कमळाचे फूल पुर्ण उमललेले नव्हते अन्यथा पैशाचे पाकीट खालीच होते.. हो खरेच खाली होते, कारण एटीएम कार्डच्या भरवश्यावर राहायची सवय लागल्याने आता केवळ टॅक्सीच्या भाड्यापुरतेच पैसे उरले होते..
मंदीराच्या दारात चपला काढून पायर्या तर चढलो, पण नेहमीसारखे नजरेआड होईपर्यंत मागे वळून वळून बघत माझी नजर चपलांवरच अडकली होती.. बूट असते तर हारवाल्याकडेच ठेवले असते पण फ्लोटर्स असल्याने पुढेच काढूया असा विचार केलेला.. मात्र जवळपासच्या चपला पाहता तुलनेने माझ्याच नवीन वाटत असल्याने चूक केली की काय असे आता वाटू लागले होते.. तिला यातले काही सांगायची सोय नव्हतीच अन तशीही ती गाभार्याच्या जवळ पोहोचली देखील होती.. आता मागे रेंगाळत बसून शिव्या खाण्यापेक्षा पटकन देवदर्शन उरकून आपल्या चपलांकडे परत येऊया असा विचार करत त्वरेने निघालो.. इथून माझी भुमिका न सांगता सांगकाम्यासारखी..! ज्या देव्हार्यावर ती डोके टेकवेल त्या देवाचे चरणस्पर्श आपणही करायचे.. जिथे ती स्तोत्र म्हणने सुरू करेल तिथे क्षणभरासाठी हात आपणही जोडायचे.. मात्र क्षणभरासाठीही गर्दीत तिच्यापासून वेगळे व्हायचे नाही.. कधी कुठचे फूल उचलून माझ्या डोक्याला लावायला म्हणून मला शोधेल हे सांगता येत नाही आणि तेव्हा आपण चुकूनही तिच्यापासून लांब असता कामा नये, नाहीतर........
तर हो नाही करता एकंदरीत हे सारे सोपस्कार पार पडले आणि आम्ही गाभार्याबाहेर पडणार इतक्यात तिला अग्ग बाई नंदीचे पाया पडायचे राहिलेच की हे आठवले.. मी शांतपणे माझ्याही वाटणीचे आता तूच पडून ये असे सांगून बाहेर पडलो आणि तुलनेने एका मोकळ्या जागेत येऊन थांबलो. थोड्याच वेळात गर्दीतना वाट सारत पाठोपाठ ती देखील आली. आजूबाजुच्या कोलाहलाकडे दुर्लक्ष करत निवांत बसलेल्या आसपासच्या भाविकांकडे बघून तिलाही दोन घटका बसायचा मोह झाला.. ज्याची विचारणा होताच मी तात्काळ परवानगी दिली.. एवढी पायपीट करून आल्यावर याची गरज खरे तर दोघांनाही होतीच.. जिथे उभे होतो, तिथेच फतकल मांडली.. तिने तेवढे आपले तोंड देवाच्या दिशेने राहील याची काळजी घेतली.. आम्ही दोघे एकत्र असूनही आमच्यात जेमतेम बोलणे होते असा हा एक दुर्मिळ योग.. ती आपल्या देवभक्तीत चूर तर मी आजूबाजुच्या भाविक जोडप्यांचे निरीक्षण करण्यात मग्न.. काही विवाहित तर काही अविवाहित प्रेमी युगुलं.. पण वरकरणी पाहता त्यातील एकही आस्तिक-नास्तिकाची जोडी वाटत नव्हती.. प्रत्येक जोडीतील दोहोंच्या चेहर्यावर सात्विकच भाव दिसत होते.. त्यातील मुलगा वा पुरुष अगदी डोक्याला रूमाल गुंडाळून वा किमान कपाळाला लालसर टिका लाऊन तरी दिसत होता.. ते पाहता हि माझ्यासारख्या दाढीची खुंटे वाढवून अन जीन्स टी-शर्ट मध्ये खोचून फिरणार्या मुलाबरोबर देवळात यायला चिडते यात काही वावगे वाटण्यासारखे नव्हते.. किंबहुना तश्याही अवस्थेत का होईना न संकोचता मला बरोबर घेऊन येते याचे मला कौतुकच वाटायला लागले.. अन आज माझी फरफट करत, माझ्यावर दमदाटी करत, मला मंदीरात घेऊन यायचे कारण म्हणजे माझाच लांबलेला आजार होता हे न समजण्याएवढा मी बावळट नव्हतो..
तिची देवावर श्रद्धा आहे जी देवावरच्या विश्वासातून आली आहे आणि माझी तिच्या विश्वासावर श्रद्धा आहे जी माझ्या तिच्यावर असलेल्या प्रेमातून आली आहे.. कितीही गुंतागुंतीचे वाटले तरी हेच एक कारण आहे जे मी कितीही लंगड्या सबबी बनवल्या तरी आजवर तिच्या देवदर्शनाच्या आड आलो नाही... परतताना तिने समोर धरलेला प्रसाद त्याच विश्वासाने आणि त्याच श्रद्धेने प्राशन करत, ठरल्याप्रमाणे टॅक्सीला हात दाखवला..
गाडीभाडे, हारफुले, अन इकडतिकडचे खाणे.. नेहमीसारखेच आज तू मला कितीला कापलेस याचा हिशोब मी तिला मांडून दाखवत असतानाच कुशीत शिरून ती मला ‘थॅंक्स’ म्हणाली.. जे कधी तिला पाचशे रुपयांचे जेवण खाऊ घातले तरी म्हणत नाही, वा कधी पाच हजारांची शॉपिंग करवून दिली तरी म्हणेलच याची खात्री नसते... ते असे थोडक्यात आले.. ते ही अगदी मनापासून.. खर्रंच, स्सालं सुख सुख म्हणजे आणखी काय असते..
- तुमचा अभिषेक
---------------------------------------------------------------------------------------------------------
ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (१) - http://www.maayboli.com/node/43411
ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (२) - http://www.maayboli.com/node/43482
ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (३) - http://www.maayboli.com/node/43589
ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (४) - http://www.maayboli.com/node/43694
ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (५) - http://www.maayboli.com/node/44009
---------------------------------------------------------------------------------------------------------
सर, तुम्ही आता असं का लिहीत
सर, तुम्ही आता असं का लिहीत नाही?
>>>
कारण आधी लिहून झाले आहे
आता वेगळे लिहेन...
धन्यवाद धनुडी
असं म्हणजे ह्या प्रतिचं, ह्या
असं म्हणजे ह्या प्रतिचं, ह्या क्वलिटीचं...
हो ते समजले.. गमतीने लिहिले
हो ते समजले.. गमतीने लिहिले होते
खूप छान लिहिलंय.
खूप छान लिहिलंय.
धन्यवाद शर्मिला
धन्यवाद शर्मिला
Pages