आंतरजालाच्या मोहमयी दुनियेत पाऊल पडले की पहिल्यांदा कळते की इथे आपण व्यक्त होऊ शकतो शिवाय त्यावर इतरांची मते लगेचच कळू शकतात,
......आणि मग काय करू आणि काय नको असे होते.
माणूस झपाट्याने लिहू लागतो.
कुठल्या फॉर्ममधे लिहायचे आहे, त्याचे नियम काय आहेत, किमान साहित्यीक गरजा काय आहेत ह्या आणि अशा अनेक इतर विषयांची गरजच काय असे वाटू लागते.
मी लेखक्/कवी झालोय असे कुठेतरी मनात रूजू लागते मग कालांतराने फक्त लिहायचे इतकेच आणि इतकेच वाटू लागते.
माध्यमक्रांतीने उपलब्ध करून दिलेल्या संधीमुळे खरोखरंच किती गांभीर्याने लिहिणारे निर्माण होतात?
की आंतरजालावर लिहिणे हे लिहिण्याची हौस पुरवण्याचे साधन आहे?
अलिकडच्या काळात जसा इ-वेस्टचा मुद्दा पुढे आलेला आहे तसा किमान साहित्यमुल्ये नसलेल्या अशा लेखनाचे ही संकेतस्थळे नेमके काय करतात?
काही मित्रांशी(अगदी सिनेमात लिहिणार्यांशीसुद्धा) चर्चा झाली तेव्हां ह्यावर संमिश्र प्रतिक्रीया ऐकायला मिळाल्या.
चर्चेतून मिळालेली मते,
१. ह्यातून उगाच भारंभार आणि दर्जाहीन लिहिणारे निर्माण होत आहेत.
२. संख्या जास्त असली तरी त्यापैकी गंभीरपणे लिहिणार्यांची उल्लेखनीय संख्या असून ते साहित्यक्षेत्राला गवसलेले नवे तारे आहेत.
३. ह्यातले बरेचजण पुढे टिकत नाहीत, वेळ, पैसा आणि आंतरजाल असल्यामुळे जस्ट टाईमपास चाललेला असतो, हे काही खरे नाही.
४. इतके स्ट्राँग माध्यम असताना आता पुस्तके छापण्याची काय गरज आहे? जे चांगले असेल ते वाचले जाईल आणि त्याची प्रशंसा केली जाईल.
आपल्याला काय वाटते??
अशी चर्चा आधी झाली असल्यास लिंक द्यावीत, लेख अप्रकाशित करेन.
पुस्तक छपाईत अंतर्भूत असलेला
पुस्तक छपाईत अंतर्भूत असलेला आर्थिक भाराचा भाग आंतरजालीय लेखनात समाविष्ट होताना दिसत नाही. आता मायबोलीवरच पाहिले तर आढळेल की कोणीही रोज कितीही धागे काढू शकेल व तेही मोफत!
मुळात लेखन, वाचन, अभिप्राय, लेखनसंस्कृतीत रसिकांचा आश्रय मिळाल्यामुळे टिकून राहणे, संकेतस्थळाने अश्या निवडक लेखक, कवी, कलाकारांना अधिक वाव देणे हे सर्वच मोफत असल्याने (नेट कनेक्शनचा व सर्व्हरस्पेसचा खर्च बाजूला ठेवून) दर्जाचे महत्व घटत जात असावे.
समजा:
१. लेखन प्रकाशित करणे
२. अभिप्राय देणे
३. धाग्यांच्या संख्येवर मर्यादा
या सर्वांसाठी आर्थिक सहभागाचे निकषही असते तर लेखनाच्या गुणवत्तेकडे वाटचाल होणे हे थोडे सहज झाले असते. अर्थात मग असेही झाले असते की मुबलक पैसे खर्च करू शकणारे लिहीतच सुटले असते. पण त्याचा परिणाम शेवटी संकेतस्थळावरील वाहतूक कमी होण्यातच झाला असता.
'
मान्य. बर्यापैकी. पण असही
मान्य. बर्यापैकी. पण असही नाही की लेखक/ कवी जन्मालाच येतो. अर्थात काही लोकांत ती कला उपजत असते, तर काहींना अपघाताने {एखादी स्पर्धा वगैरे} कळते, तर काहींना माहिती असुनही ती फारशी पुर्वी वापरली गेली नव्हती. पुर्वी एक लेख छापणे म्हणजे एकतर वर्तमानपत्र किंवा पुस्तक असे छापील (अन खर्चिक) साधन होतं पण आता संकेतस्थळे, ब्लॉग्ज आले, अन अश्या लेखकांसाठी नविन दालन उपलब्ध झालं. आधीच मराठीत {हे तुम्ही मराठी लेखक/ कवींसाठी लिहिलय, हे समजुन} वाचक कमी, मग लेखक ते किती असतील? त्यात लोकं लिहिताहेत, हे काय कमी आहे? आजही कित्येक ब्लॉग्ज कोणी वाचुन प्रतिक्रियाच दिली नाही म्हणुन त्यावर लिहिल्या जात नाही. त्यात माझ्या ब्लॉगचाही समावेश आहेच.
उलट मी म्हणेन की अधिकाधिक लिहीण्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. मग ते कसही असो. इथेच काही दिवसांपुर्वी कोण्या लेखिकेचं लिखाण वाचुन त्यावर बर्याच उलटसुलट प्रतिक्रिया आल्या होत्या, पण हळूहळू बाईंनी नेटाने लिहिलं, चुका कमी केल्या आणि आता चांगलं लिहित आहेत. मला खरच आनंद होतो, की कोणी मराठीत लिहितय.
शेवटी एकच म्हणेन (अगदी संदर्भ सोडून असेल), जसं ज्ञानेश्वर माउलींनी म्हटलय, हंसाची चाल खुप डौलदार असते, पण म्हणुन इतरांने चालुच नये काय?
अवांतरः- कित्येक नावाजलेले लेखन मला अजिबात कळलेले नाही. मी अजुनही सोपं साधं काही असलं की मला खुप भावतं. असो.
फारशी पुर्वी वापरल्या गेली
फारशी पुर्वी वापरल्या गेली नव्हती. <<<
हे वापरल्या गेली नव्हती हे काय प्रकरण आहे? वापरली गेली नव्हती असे का लिहीत नाही?
रॅपिडेक्स म्हणजे फाड फाड
रॅपिडेक्स म्हणजे फाड फाड इंग्लिशसारखे का?
खालची कविता बघा. त्यांचा उपहास नाही करायचा, पण र ला ट आणी ट ला फ जुळवल्यासारखी वाटली. ह्याला साहित्य कसे म्हणणार्?:अओ:
http://www.maayboli.com/node/44874
कठीण आहे ती कविता.
कठीण आहे ती कविता.
धन्यवाद बेफिकीर. चुक दुरुस्त
धन्यवाद बेफिकीर. चुक दुरुस्त केली आहे. ते बोलीभाषेनुसार लिहिले होते.
आणि हेच मी पुन्हा लिहु इच्छितो की जशी बेफिकीर यांनी माझी चुक दाखवली आणि दुरुस्त केली, तसच माणुस चुकातुन शिकत असतो. वर ज्या कवितेबद्दल लिहिलेय, त्यांचे पुर्वीचे लेख बघितले तर बरीच सुधारणा (शुद्धलेखनाच्या) आहेत, त्यामुळे किमान वाचनीय झाली हेही कमी नाही ना.
थोडसं सकारात्मक बघा. नविन लेखकांना वेळ द्या आणि सुधारण्याची संधीही. नाही पटलं तर दुर्लक्ष करणे सहज शक्य आहेच न?
विजय देशमुख, तुम्ही जे
विजय देशमुख, तुम्ही जे लिहिलेत ते 'पूर्णतः चुकीचे' आहे असे माझे म्हणणे नाही. ते बोली भाषेनुसार असल्यास ते त्या त्या ठिकाणी योग्य मानले जाईलच. पण पूर्वी असा प्रयोग कधीच कुठेच ऐकलेला नव्हता आणि गेल्या सहा महिन्यात मात्र वारंवार वाचायला मिळाला. व्याकरणाच्या दृष्टीने ते योग्य नसावे असे मात्र वाटते.
बेफिकीर, विदर्भात असा प्रयोग
बेफिकीर,
विदर्भात असा प्रयोग नेहमीच केला जातो.
बेफिकीर, अगदी बरोबर.
बेफिकीर, अगदी बरोबर. व्याकरणाच्या दृष्टिने ते चुकच आहे. चिनुक्स म्हणतात ते अगदी अचुक. विदर्भात मराठी भाषा हिंदी व्याकरण वापरुन चालवली जाते.
पण इथे ते अपेक्षित नाही, म्हणुन मी माझं चुकलं म्हणालो. कथेत वा इतरत्र ते चाललं असतं, पण शक्यतो प्रतिसादात नाही.
ओके चिनूक्स आणि विदे
ओके चिनूक्स आणि विदे
आंतरजालीय सोयीसुविधामुळे
आंतरजालीय सोयीसुविधामुळे व्यक्ती अगदी सहजपणे "आपण लिहू शकतो" असे समजत चालल्याची भावना सुशिक्षित समाजात जरी रुजत चालली असली तरी तो ज्वर झपाट्याने उतरू लागतो हेही खरे. सुरुवातीला तडफेने लेखन करणारी ही मंडळी काही दिवसांनी ऊर्जेचा स्त्रोत आटल्यासारखी शांत होतातही. त्यावेळी त्याना कळून चुकते की आहे हाताशी कॉम्प्युटर, नेट आणि कार्यालयातील मोकळे वातावरण म्हणून काही आपण रुढार्थाने 'लेखक' संज्ञेला पात्र होऊ शकत नाही. आजच्या वेगवान युगातही साहित्यासाठी साधना करणे फार गरजेचे आहे आणि त्याचबरोबर वाचनही. वाचनामुळे आपल्या लेखन साहित्याला एक दर्जा आणि पात्रता लाभते हे ज्या दिवशी होऊ पाहात असलेल्या लेखकाला कळेल तो त्याच्यासाठी सुदीन. मराठी साहित्यात "दिसामाजी काहीबाही लिहिणे' हरदिनी घडत असतेच. तेवढ्या तुटपुंज्या भांडवलावर कुणी मर्ढेकर वा करंदीकर होतो म्हणत असेल तर मग कठीण होईल या भाषेचे.
आजकालच्या प्रकाशन संस्थांनाही आपण 'अमुक एका लेखकाला वर आणले' असा बेंडबाजा वाजवायची भारी हौस असते. ते आणि त्यांचे हितबांधव अशा लेखकाच्या शोधार्थ असतातच. जालीय दुनिया आणि 'ब्लॉग' स्पर्धेच्या माध्यमातून बर्यापैकी नाव झालेल्या लेखकांना निमंत्रितही केले जाते. पण एखाद्याकडे २५-३० पानी कवितांचं पुस्तक, ४०-५० पानी कादंबरी ओढूनताणून, फॉण्ट साईझ वाढवून कशीबशी १०० पानापर्यंत नेलेली, अशी या शतकातील परंपरा सांभाळण्यासाठी याच "होतकरू" लेखकाने प्रथम प्रसिद्धीसाठी किमान तीस हजार घालावेत [कादंबरी असेल तर हा आकडा ५० पर्यंत जातो] असे सुचविले जातो आणि मग ह्या जालीयरावातील लेखकराव तिथे मरतोच. तसे पाहिले तर हा सारा व्यवहार आर्थिक आर्याशी विणला गेला असल्याने तुमचे बी कितीही दाणेदार असले तरी आजकालच्या समाजशास्त्रीय जमिनीत उगवण्यासाठी माती आणि पाऊसही तुमच्याकडेच असला पाहिजे असे सूत्र आहे.
हे लेखन नामक प्राण्याला जमण्यासारखे नसतेच.
श्री.विजय दिनकर पाटील यांच्या निष्कर्षातून ठळक झालेल्या मुद्द्यापैकी क्रमांक १ चा मुद्दा पटायला काही हरकत नाही. पण चला, त्या निमित्ताने चार पैसे खर्चून "जाल" हे एक माध्यम तरी निर्माण झाले आहे जिथे किमान अशा विषयाच्या माध्यमाद्वारे चर्चांना व्यासपीठ तरी मिळत जाते. पूर्वी माझ्या कॉलेजच्या जमान्यात तलावाकाठी नदीकाठी फिरायला मित्रांच्यासमवेत गेलो असता अशा चर्चा व्हायच्या, पण घरी परतताना सायंकाळच्या हवेसमवेत त्या विरूनही जायच्या. जालावरील स्नेहमंडळी ही कधीच पाहाण्यात नसतात, तरीही मी इथे जे मुद्दे मांडत जात आहे, ते किमान काही गंभीर प्रवृत्तीच्या सदस्यांच्या नजरेस पडतील इतपत आशा तर असतेच. मुद्द्यांना विरोध जरूर होत असतो पण लिखाण नष्ट होत नाही हा जालाचा एक फायदाच.
क्रमांक २ च्या मुद्द्यात उल्लेख केल्याप्रमाणे जालावर लिखाण [त्यातही ब्लॉगर्स] करणार्यामध्ये गंभीर लिखाण करणारे नक्की दिसतात. त्यांच्याशी पत्रव्यवहार करायलाही भावते. ही म्हटली तर एक प्रशंसनीय बाब होय. "मायबोली" चे कित्येक विषय असे काही फुलत गेलेले पाहिले आहेत मी, की जरी काही विषयांमध्ये मी सरळ भाग घेतला नसला तरी त्यांचे वाचन करीत राहाणे हा निखळ आनंदाचा पुरावा ठरावा. क्रमांक ३ मध्ये म्हटल्याप्रमाणे त्यातील बरेचजण पुढे टिकत नसले तरी तो भाग वैयक्तिक निर्णयाचा असू शकतो. अन्य कारणेही असतीलच.
क्रमांक ४ समवेत होकारात्मक भूमिका घेणे अवघड होईल. छापील पुस्तकांची गरज ही नित्यनेमाची गरज असणार आहे. जालाचा कितीही मोठा वाटा मिळो शेवटी आपल्या नंतरची पिढीला ज्ञान देण्यासाठी पुस्तकांची गरज ही लागणारच. जालीय दुनिया शेवटी तुम्हाला गाईड करू शकेल.
तूर्तास इतकेच.
अशोक पाटील
#अशोकशी सहमत .विजय तुम्ही
#अशोकशी सहमत .विजय तुम्ही म्हणता तसे सर्वच जण पाट्या टाकू लेखक नाहीत .आपण केलेला प्रवास ,पाकृ ,फोटो चार जणांनी वाचावे पाहावे या हेतूने येथेतरी लिहिणारे अधिक आहेत .चालू घडामोडीवर आपले विचार मांडतात .हेच जर त्यांनी वर्तमानपत्रांकडे पाठवले असते तर शंभरात ९९वांचे केराच्या टोपलीत गेले असते ,एकाचा काटछाट होऊन अथवा एकच फोटो छापला गेला असता .
>>>> तसे पाहिले तर हा सारा
>>>> तसे पाहिले तर हा सारा व्यवहार आर्थिक आर्याशी विणला गेला असल्याने तुमचे बी कितीही दाणेदार असले तरी आजकालच्या समाजशास्त्रीय जमिनीत उगवण्यासाठी माती आणि पाऊसही तुमच्याकडेच असला पाहिजे असे सूत्र आहे. <<<< उघडेनागडे सत्य आहे हे तथाकथित "साहित्यविश्वातील".
विजयराव, तुमचे १ ते ४ सर्व मुद्दे बरोबर आहेत.
पण यापेक्षाही काही वेगळे घडत असते.
मी नेटवर आलो, म्हणजे मी केवळ लेखकच बनतो असे नाही, तर मी त्याचबरोबर वाचकही असतोच.
त्याशिवाय, इथल्या आयडीमागे अदृष्य राहू शकण्याच्या तथाकथित करामतीमुळे कित्येक मते मी चारचौघात उघड बोलू शकणार नाही/व्यक्त होऊ शकणार नाही, व्यक्त न झाल्याने माझी कुचंबणा होत असेल, तर ती देखिल इथे (केवळ माबो नाही, नेटवर) व्यक्त होता आल्याने बंद होते.
सर्वात महत्वाचे म्हणजे वैचारिक "क्रिएटीव्हिटी" निर्माण व्हायला मजसारख्या बहुसंख्य सामान्यांकरता शालेय जीवनातील निबंध/पत्रलेखन इत्यादीक बाबी पुरेशा ठरलेल्या नसतात, पण आपणही चार शब्द जुळवून काही एक विचार खरडू शकतो हा विचारच माणसाला उत्साही बनविण्यास कारणीभूत होतो. उद्या ही मानसिक गरज संपली/वा भासलीच नाही तर माणूस आपसूक नेटलेखनापासून दूरावतो.
या कोणत्याही लेखनात लग्गेच कुणी "लेखक" म्हणून आयडेंटीटी मिलविण्याकरताच लिहीतो असे मानणे चूकीचे ठरेल.
माझ्यासारखी व्यक्ती गेली नेट यायच्या आधीच्या वीसेक वर्षात अनेकवार "वाचकांच्या पत्र्यव्यवहारात" काही एक मते लिहून पाठवायची, त्यातील एक श्यामची आईवरील मत अन झेडपीच्या शिक्षकांबाबतचे पत्र सोडले, तर बाकी कोणतेही पत्र, ते ते विषय वा भाषा जहाल वाटल्याने म्हणा वा त्या त्या वर्तमानपत्राच्या "धोरणाला" साजेसे नसल्याने ना प्रसिद्ध झाले, ना त्याची कधी पोहोच मिळाली.
हा अनुभव गाठीशी असल्याने, जेव्हा नेटवर मजकुराद्वारे (रेडीमेड प्रश्नावर बारीक बटणे क्लिक करुन नव्हे) मत मांडण्याची सुविधा उपलब्ध झाल्यावर त्याचा लाभ घेतला गेला नाही तरच नवल.
हे करताना मला माझी मूळ "आयडेन्टीटी" गुप्त ठेवायची होती, तो बेत मात्र येथिल काही बालिश/आडग्यांनी हाणून पाडला.
रश्मी, कितीही अनाकलनीय असेल
रश्मी,
कितीही अनाकलनीय असेल किंवा उद्दाम असेल किंवा तुम्हाला न आवडणारे असेल; दुसर्याच्या साहित्याची लिंक देणे बरे नव्हे!!
काही लेखक स्वत:च्याच कृतीवर
काही लेखक स्वत:च्याच कृतीवर टीका करतात .उदा: कथाकार व्यं . माडगुळकर "ग्रामीण कथा लेखन म्हणजे चित्तूर पकडायला जाण्यासारखे आहे .प्रत्येक वेळी तो मिळेलच असं नाही ,आता माझेच पाहातो कथा लिहायला जातो तर एक लेखच होतोय कथा अशी नाहीच ."
मला मेल, इमेल, फोन , एसेमेस,
मला मेल, इमेल, फोन , एसेमेस, फॅक्स, ट्विटर, फेसबुक या सर्व माध्यमांद्वारे तुम्ही लिहू नका नाहीतर गंभीर परिणाम होतील अशा धमक्या येतात. नुकत्याच त्यातल्या काही इथेही आलेल्या दिसतील :फिदी:. पण या भ्याड धमक्यांना न भिता मी साहीत्य प्रसवण्याचे उद्योग चालूच ठेवणार आहे. अशा मंडळींना त्यातून नैराश्य येऊन त्यांनी आत्महत्या केल्या तर श्रद्धांजली वाहणेत येईल !
पुस्तकांचे महत्व कमी होणार
पुस्तकांचे महत्व कमी होणार नाही. अजूनही पुस्तके छापली जात आहेतच. पुढे मागे जर कागद खुपच महाग वा दुर्मिळ झाला तर गोष्ट वेगळी.
पण या माध्यमाची एक खासियत म्हणजे मल्टीमिडीया.. यात मी फोटो, ऑडीओ, व्हीडीओ अशा सगळ्याच रुपात व्यक्त होऊ शकतो. मराठी पुस्तकांच्या बाबतीत तरी रंगीत छपाई अजून महाग आणि दुर्मिळच आहे.
आणखी म्हणजे जिवंत प्रतिसादांच्या बाबतीत, पुस्तक आणि नाटक यांच्या मधले हे माध्यम आहे. पुस्तकांच्या बाबतीत बर्याच कालावधीनंतर तर नाटकाच्या बाबतीत प्रत्यक्ष प्रतिसाद मिळतो.
तसेच चुका सुधारण्यासाठी / किंवा नुसते सुधारण्यासाठी पण इथे संधी असते. आपले पोस्ट सुधारण्याचे / बदलण्याचे इतकेच नव्हे तर मागे घेण्याचे स्वातंत्र्य आहे. जे पुस्तकाच्या बाबतीत पुढच्या आवृत्तीपर्यंत आणि नाटकाच्या बाबतीत पुढच्या प्रयोगापर्यंत नाही.
आणि दर्जाचे म्हणाल तर सर्व माध्यमांत सर्व दर्ज्याची निर्मिती होत असते. जे चांगले असते ते काळाच्या ओघात टिकतेच.
#दिनेश +१
#दिनेश +१