१५ ऑगस्ट १९४७ ह्या दिवशी भारताला स्वातंत्र्य तर मिळालं, परंतु त्याआधीचा १५० वर्षांपुर्वीचा भारत ते स्वातंत्र्य मिळाल्यादिवशीचा भारत ह्या कालावधीत इंग्रजांनी त्यांच्या राजकारण आणि राज्यकारण सुकर होण्यासाठी केलेले बदल ह्यामुळे भारत कित्येक बाबतीत परावलंबीच राहिला होता. कारण त्या बदलांमुळे भारतीयांचे राहणीमान बदलले होते आणि ते त्या बदलांना स्वबळावर निभावून, जनतेला पुढे घेऊन जाणे हे स्वतंत्र भारतापुढे एक आव्हान होते. अश्याच अनेक आव्हानांपैकी एक होते इंधनामध्ये स्वावलंबी होणे. जळाऊ लाकूड ते केरोसिन/घरगुती वापराचा गॅस, बैलगाडी किंवा घोडागाडी ते मोटार, मातीचे रस्ते ते डांबरी रस्ते आणि सर्वच बाबतीत औद्योगीकरणाकडे चाललेली वाटचाल ह्यामुळे आता पाय मागे घेणे शक्य नव्हते. एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून जगात पाय रोवताना भारताची विकसनशील राष्ट्र म्हणून ओळख निर्माण होणे अत्यावश्यक होते. पाण्यात पडल्यावर गटांगळ्या खात खात का होईना, पोहायला शिकले जाते तसेच स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या मंत्रीमंडळाने भारत घडवण्यासाठी जी पावले उचलली त्यातलंच एक म्हणजे इंधन तेल क्षेत्रातील स्वावलंबनासाठी निर्माण झालेली भारताची मूळ राष्ट्रीय तेल कंपनी - इंडियनऑयल.
पंडित नेहरूंच्या दूरदृष्टीमुळे तेल शोधणे, तेल शुद्धिकरण आणि तेल खरेदी/विक्री व्यवहार चालवण्यासाठी १००% सरकारच्या मालकीच्या इंडियन रिफायनरीज् लिमिटेडची स्थापना ऑगस्ट १९५८ मध्ये झाली. तसेच, देशभरचे तेल विक्री व्यवहार सांभाळण्यासाठी अजून एका १००% सरकारी मालकीच्या कंपनीची स्थापना ३० जून १९५९ रोजी झाली ती म्हणजे ’इंडियन ऑयल कंपनी लिमिटेड'. ह्या कंपनीचे कार्य होते, दळणवळणाच्या/भौगोलिक अडचणींवर मात करून प्रांत आणि ऋतूमानाप्रमाणे बदलणार्या गरजांप्रमाणे देशाच्या कानाकोपर्यापर्यंत इंधन तेल पुरवणे. भारताच्या स्वबळावर इंधन मिळवण्याचा श्रीगणेशा ह्या कंपनीद्वारे १७ ऑगस्ट १९६० रोजी झाला. रशियामध्ये उत्पादन केल्या गेलेल्या ११३९० मेट्रिक टन डिझेलची पहिली आयात "एम.व्ही. उझ्गोरोड" ह्या जहाजाने मुंबई बंदराच्या पिरपाव धक्क्याला उतरवली गेला. त्यावेळी तेल क्षेत्रावर बर्मा शेल, एस्सो इस्टर्न इन्कॉर्पोरेशन, कॅल्टेक्स (इंडिया) लिमिटेड, इंडो-बर्मा पेट्रोलियम आणि आसाम ऑइल कंपनी ह्यांचे साम्राज्य होते. इंडियनऑयलच्या समोरचे पहिले आणि मोठे आव्हान होते ते ह्या भारतात घट्ट पाय रोवलेल्या बाहेरच्या कंपन्यांशी सर्वशक्तीनिशी टक्कर देणे. दरम्यान, १ सप्टेंबर १९६४ रोजी इंडियन ऑयल कंपनी, इंडियन रिफ़ायनरीज् लिमिटेडचे तिच्यात विलिनीकरण झाल्यावर, तेल शुद्धीकरण व विक्रीचे संयुक्त कार्य असलेली इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड ह्या नावाने स्वतंत्र कंपनी म्हणून ओळखली जाऊ लागली.
कालांतराने एकापाठोपाठ एक करत तेल शुद्धीकरण प्रकल्प निर्माण केले गेले. भारताचे स्वत:चे तेल शुद्धीकरण प्रकल्प सुरू व्हायच्या आधी तयार पेट्रोलियम पदार्थ आयात करावे लागत. त्यासाठी परकीय चलनाचा जास्त व्यय होत असे. तेल शुद्धिकरण कारखाने आल्यावर तेल उत्पादक देशांकडून कमी किंमतीत मिळणारे कच्चे तेल आयात करून देशांतर्गतच काही प्रमाणात तयार पेट्रोलियम पदार्थांची कमी खर्चात निर्मिती होऊ लागली आणि परकीय चलनाची भरपूर बचत होऊ लागली.
भारताची ओ.एन.जी.सी. जरी तेल उत्खननात कार्यरत असली तरी जगातील तेल उत्पादक देशांच्या वर्चस्वाला दबून, लागेल त्या किंमतीने आपल्या देशाची वाढती गरज पुरवण्यासाठी इंधन आयात करावे लागते. ह्या परिस्थितीला छेद देण्यासाठी इंडियनऑयल प्रतिवाह (अपस्ट्रीम) तेल क्षेत्रातही देशांतर्गत आणि देशाबाहेरही सहभाग वाढवत आहे. एवढंच नाही तर ज्या देशाला स्वत:चा तेल उद्योग नव्हता त्या देशाची मूळ तेल कंपनी आज हळूहळू बहुराष्ट्रीय कंपनी बनत आहे.
इंडियनऑयलच्या जनुकांमध्ये भारताच्या संरक्षण यंत्रणांचे सेवा करण्याचे समीकरण बसवले गेले आहे. ह्याचा पुरावा म्हणजे, १९६५च्या युद्धामध्ये, इंडियनऑयल परिवाराने आपल्या तिन्ही संरक्षण दलांना अविरत तेल पुरवठा नेटाने आणि जिवावर उदार होऊन केला होता. ही गरज लागू शकते म्हणून तेलाचा मोठा साठा असलेला श्रीनगर डेपो १९६३मध्येच स्थापन केला गेला होता. इंडियनऑयलचा विमानांना लागणार्या इंधनाचा व्यवसायही १९६४ मध्ये आपल्या हवाई दलाला इंधन पुरवूनच सुरू झाला आणि पुढे नागरी हवाई वाहतुकीसाठी १९६५ पासून इंधन पुरवले गेले. पुन्हा १९७१च्या युद्धामध्येही हेच कार्य कुठल्याही वित्त अथवा मनुष्यहानीची पर्वा न करता केले गेले. बांगलादेश मुक्ती संग्रामाच्या वेळी तर इंडियनऑयलने ’चितगाव रिफ़ायनरी’लाही कच्च्या तेलाचा पुरवठा केला होता. युद्धांनंतर सैनिकांच्या विधवांना, अपंग सैनिकांना, स्वातंत्र्य सैनिकांना इंधन विक्रीची डिलरशिप देण्यात आली आणि ही प्रथा अजूनही चालू आहे. १९९९ च्या कारगिल येथील 'ऑपरेशन विजय’ला सहकार्य म्हणून लेह आणि कारगिलच्या डेपोंवर बाँब वर्षाव होत असतानाही इंडियनऑयलने युद्ध क्षेत्राला इंधन पुरवठा बंद केला नाही, बंद पडू दिला नाही. नियंत्रण रेषेवरुन बाँब गोळे येत असतानाही अत्यंत ज्वलनशील इंधन भरलेले टॅंकर संरक्षण दलांसाठी अरुंद रस्त्यांवरून ये-जा करत होते. इंडियनऑयलचे सगळे जाळे युद्धपातळीवर कामाला लागले होते.
देशाबाहेरून निर्माण केल्या गेलेल्या आपत्कालिन परिस्थितीला तोंड देण्यासाठी जशी देशवासियांच्याबरोबर इंडियनऑयल उभी राहतेय तशीच देशावर ओढवलेल्या नैसर्गिक आपत्तींमध्येही सर्व शक्तीनिशी मदतीला उभी राहतेय. पूरग्रस्त परिस्थिती, भूकंप अश्या आपत्तींमध्ये स्वत:चेही नुकसान होऊनसुद्धा स्थानिक प्रशासनाच्या एका हाकेसरशी अत्यंत बिकट ठिकाणीही जाऊन पोहोचतेय. नुकत्याच झालेल्या उत्तराखंडमधील दुर्घटनेमध्ये, इंडियनऑयलने सगळे अत्यावश्यक पेट्रोलियम पदार्थ पूरग्रस्त भागांमध्ये भारतीय सैन्य, हवाई दल, आय.टी.बी.पी, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन आणि इतर बचाव दलांना अखंडपणे पुरवले. ह्या कामासाठी समर्पित केलेला चमू रात्रंदिवस पूरग्रस्त भागामध्ये पेट्रोल, डिझेल, केरोसिन आणि स्वयंपाकाचा गॅस पुरवत होता आणि पुरवठा नियंत्रणात ठेवत होता. फ़िरते हवाई इंधन रिफ़्युएलर खूप दूरच्या अंतरावर आणि पोहोचण्यास अत्यंत कठीण ठिकाणी नेण्याची पराकाष्ठा करत जोशीमठ, धारसु, बागेश्वर, पिठोरगढ आणि उत्तराखंडमधील इतर ठिकाणी पोहोचवले गेले जेणेकरुन बचावकार्यात सामिल असलेल्या हेलिकॉप्टर्सना त्वरित इंधन मिळेल आणि हवाई दलाच्या दिमतीसही हे रिफ़्युएलर दिले गेले जेणेकरून जास्तीचे इंधन तयार असेल.
भारतातली असंख्य खेडीपाडी, गावे आणि शहरांशी जोडली जावीत म्हणून इंडियनऑयल रस्ते बांधणीसाठी बिटूमेन (डांबर) पुरवते. भारत हा शेतीप्रधान देश असल्याने ग्रामीण भागातील ग्राहक आणि शेतकर्यांच्या सहाय्यासाठी १९७५मध्ये ’मल्टीपर्पज डिस्ट्रिब्युशन सेंटर’ स्थापन करणारी ही पहिली तेल क्षेत्रातील कंपनी ठरली. ही केंद्रं शेतकर्यांसाठी ’एक थांबा सुलभ विक्री केंद्र’ ठरली आणि त्यातूनच पुढे आधुनिक पद्धतीची ’किसान सेवा केंद्र’ २००६ साली शेतकर्यांच्या सेवेत दिली गेली. कमीतकमी ५००० किसान सेवा केंद्रं भारतभर कार्यरत असून शेतकर्यांच्या विविध गरजा, जसे की, बियाणे, खते, किटकनाशके, शेतीची अवजारे, औषधे, ट्रक/ट्रॅक्टरचे सुटे भाग, ट्रॅक्टर इंजिन ऑईल, पंपसेट ऑईल ह्या देखिल इतर वाहन इंधने आणि केरोसिनच्या जोडीने पुरवल्या जातात.
देशाच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये जबाबदारी उचलण्याच्या बर्याच प्रयासांमधील उल्लेखनीय गोष्टी म्हणजे,
१) कमी उत्पन्न गटासाठी दिल्या जाणार्या शालेय, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकीय व व्यवस्थापनातल्या शिक्षणासाठीच्या शिष्यवृत्ती,
२) अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, बिलियर्ड्स व स्नूकर, बुद्धीबळ, क्रिकेट, गोल्फ़, हॉकी, टेबल टेनिस, टेनिस वगैरे खेळांसाठी दिल्या जाणार्या शिष्यवृत्ती,
३) खेड्यांमध्ये स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा असलेली सामुदायिक स्वयंपाकघर सुविधा, इस्पितळे आणि सांस्कृतिक केंद्रे.
४) कंपनीच्या मोठ्या प्रकल्पांच्या जवळपासच्या भागांमध्ये शाळा व सांस्कृतिक केंद्रांमध्ये हातपंप, कूपनलिका, पाण्याच्या टाक्या, नळाच्या जोडण्या, पावसाच्या पाण्याचा साठा करण्याच्या सुविधा, पाणी शुद्धीकरण संच बसवणे,
५) कुटुंबनियोजन, इम्युनायझेशन, एड्सबद्दल जागरुकता, पल्स पोलिओ, डोळे तपासणी, रक्तदान, गर्भवतीची व बाळ-बाळंतिणींची काळजी, औषधांचे आणि गर्भनिरोधकांचे विनामुल्य वाटप इत्यादींची शिबिरे भरवणे इत्यादी,
६) स्वच्छतागृह बांधणी, डासांच्या जाळ्या वाटप, इस्पितळांना रुग्णवाहिका दान करणे, कर्णबधीरांसाठी यंत्रं, अपंगांसाठी चाकाच्या खुर्च्या, इस्पितळांना निधी देणे,
७) मथुरा, दिग्बोई येथे कमी खर्चाची इस्पितळे चालवणे आणि व्यवस्था बघणे, त्या इस्पितळांतर्फ़े फ़िरते दवाखाने चालवणे.
८) दिग्बोई, आसाम येथे ’आसाम ऑईल स्कूल ऑफ़ नर्सिंग’ स्थापन करुन त्या शिक्षणाचा खर्च उचलणे आणि विद्यार्थ्यांना शिक्षण भत्ता देणे.
९) देशाचा ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तूंचे संरक्षण, जतन करण्यासाठी ’इंडियनऑयल फ़ाऊंडेशन’ची स्थापना केली गेली. देशातील प्रत्येक राज्यातील, केंद्रशासित प्रदेशातील एकतरी ऐतिहासिक स्थळ ह्या फ़ाऊंडेशनतर्फ़े जतन करणे हे उद्दिष्ट असेल.
आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला १५ ऑगस्ट, २०१३ रोजी ६६ वर्षं पूर्ण झाली. उर्वरित जगाला स्पर्धा देत, अंतर्गत समस्या सोडवत सोडवत आपण वाटचाल करतच आहोत. आपला देश इथल्या नागरिकांच्या आणि विविध संस्थांच्या निस्वार्थी योगदानामुळे बनला आणि घडला आहे. ह्याचाच एक भाग म्हणून ’इंडियनऑयल’ आत्मनिर्भरतेच्या मूळ उद्दिष्टाबरोबरच देशाच्या इतर जडणघडणीलाही आपली व्यावसायिकता सांभाळून हातभार लावत आहे. आज ही कंपनी महत्वपूर्ण अश्या जागतिक फ़ॉर्च्यून ५०० यादीमधील सर्वोच्च भारतीय कंपनी असून त्याच यादीत जगातल्या सर्वात मोठ्या कंपन्यांमध्ये ८८वं स्थान पटकावून भारताचं अस्तित्व इतर प्रगत राष्ट्रांच्या कंपन्यांच्या गर्दीतही दाखवून देते आहे.
जय हिंद !!
संदर्भ : www.iocl.com
छान माहीतीपूर्ण लेख!
छान माहीतीपूर्ण लेख!
के अश्विनी. चांगल्या
के अश्विनी. चांगल्या विषयावरचा चांगला आणि सकारात्मक लेख. अभिनंदन.
)
(अअॅ डमिन इथं पण ?
लेखातल्या विषयाचं महत्व पटलं.
लेखातल्या विषयाचं महत्व पटलं. माहिती पण छान दिलीय.
अशोक मामा +१
छान आढावा केश्विनी. 'ते बदल
छान आढावा केश्विनी.
'ते बदल झेपवणे' ही शब्दरचना बदल प्लीज.
व्वा ! अभिमानास्पद.
व्वा ! अभिमानास्पद.
मस्त लेख अश्विनी. अत्यंत
मस्त लेख अश्विनी. अत्यंत वेगळा विषय.
लेख खुप आवडला.
रैना, मान्य संयोजक, 'ते बदल
रैना, मान्य
संयोजक, 'ते बदल झेपवणे' इथे थोडा बदल केला आहे.
माधव, स्वाती२, खटासि खट, किरणू, रैना, विजय देशमुख आणि सावली, धन्यवाद
अश्विनी के, फक्त शुद्धलेखनाचे
अश्विनी के,
फक्त शुद्धलेखनाचे बदल करण्यास परवानगी आहे. व तीही संयोजकांना अगोदर कळवून.
यापुढे प्रतिसादांमध्ये सुचवलेले बदल कृपया करू नका.
चिनूक्स, आत्ता केलेला बदल
चिनूक्स, आत्ता केलेला बदल पुन्हा रिव्हर्ट करु का? की राहूदे?
राहूदे.
राहूदे.
उत्तम लेख केश्वी.
उत्तम लेख केश्वी. माझ्यातर्फे तुला पाच किलो सफोला तेल.
धन्यवाद चिनूक्स आणि अमा
धन्यवाद चिनूक्स आणि अमा
छान अश्विनी. नेहमी कां नाही
छान अश्विनी. नेहमी कां नाही लिहीत तू ??
छान लिहीलं आहेस अश्विनी. खूप
छान लिहीलं आहेस अश्विनी. खूप नवी माहिती मिळाली. इं.ऑ. इतरही इतकी लोकाभिमुख कामे करते हे नव्यानेच कळले.
भ्रमा आणि शुगोल, धन्यवाद
भ्रमा आणि शुगोल, धन्यवाद
फारच रंजक इतिहास अन
फारच रंजक इतिहास अन माहिती.
मार्केट शेअर कॅप्चर करण्यासाठी काय स्ट्रॅटेजीस वापरल्यात, गेल्या ६-७ दशकातली वाढती लोकसंख्या अन वाढती डिमांड यासाठी स्ट्रॅटेजिक प्लानिंग कसं करतात हे सुद्धा वाचायला आवडलं असतं.
छान लिहीलं आहेस अश्विनी. खूप
छान लिहीलं आहेस अश्विनी. खूप नवी माहिती मिळाली. इं. ऑ. इतरही इतकी लोकाभिमुख कामे करते हे नव्यानेच कळले. >>>> +१०...
आज वर आल्यावर सगळ्या
आज वर आल्यावर सगळ्या प्रतिक्रिया वाचल्यावर आढळले की मी याआधी प्रतिक्रिया दिलीच नाहीये. एक मस्त लेख.
खूप नवीन माहिती मिळाली. इं. ऑ. इतरही इतकी लोकाभिमुख कामे करते हे नव्यानेच कळले. >>>> +१
खूप नवीन माहिती मिळाली. इं.
खूप नवीन माहिती मिळाली. इं. ऑ. इतरही इतकी लोकाभिमुख कामे करते हे नव्यानेच कळले. >>>> +१
कसंकाय मिसलं कुणास ठाऊक हे
कसंकाय मिसलं कुणास ठाऊक हे लिखाण! आत्ता वाचलं... खूप छान लिहिलयं.
देशाच्या ग्रामीण भागात महिला
देशाच्या ग्रामीण भागात महिला कित्येक तास जळणासाठी लाकडं गोळा करायला घालवतात आणि जंगल तोड करतात. चुलीच्या धुराचा घरातली स्त्री व इतर सदस्यांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतच असतो. अजूनही देशातल्या ६७% घरांमध्ये चुलीवर अन्नं शिजवलं जातं.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने 'मिशन स्मोकलेस व्हिलेज' हा प्रोजेक्ट हाती घेतला असून त्या प्रोजेक्ट अंतर्गत गावांमध्ये स्वयंपाकाचा गॅस उपलब्ध करुन दिला जात आहे. 'विचकुरहल्ली' हे कर्नाटकातील एक गाव. ह्या गावात २७४ घरांमध्ये अजूनही चुलीवरच अन्नं शिजायचं. IOC ने हे गाव पुर्णपणे स्मोकलेस केलं आणि हे गाव देशातील पहिलं स्मोकलेस व्हिलेज ठरलं आहे. ह्यासाठी गावकर्यांमध्ये बरीच जागृती करावी लागली. आधी हे लोक आपली चूलच बरी आहे म्हणत व गॅसची काय गरज? असे विचारत. पण चुलीमुळे होणार्या प्रदुषणाची व पर्यावरणावरील परिणामाची कल्पना दिल्यावर गावकरी स्वयंपाकाचा गॅस व शेगडी खरेदी करायला तयार झाले. आता प्रत्येक घरात LPG आहे. आता अश्या धूरमुक्त गावांची संख्या वाढत जाईल.
नुकतीच पॅरिसमध्ये प्रदुषणाच्या समस्येसाठी आंतरराष्ट्रीय परिषद झाली तेव्हा परिषदेच्या आदल्या दिवशी आपल्या पेट्रोलियम मंत्र्यांनी ट्विट करुन 'विचकुरहल्ली' हे पहिले धूरमुक्त गाव ठरल्याची बातमी देवून गावकर्यांचं कौतुक केलं.
Pages