१५ ऑगस्ट १९४७ ह्या दिवशी भारताला स्वातंत्र्य तर मिळालं, परंतु त्याआधीचा १५० वर्षांपुर्वीचा भारत ते स्वातंत्र्य मिळाल्यादिवशीचा भारत ह्या कालावधीत इंग्रजांनी त्यांच्या राजकारण आणि राज्यकारण सुकर होण्यासाठी केलेले बदल ह्यामुळे भारत कित्येक बाबतीत परावलंबीच राहिला होता. कारण त्या बदलांमुळे भारतीयांचे राहणीमान बदलले होते आणि ते त्या बदलांना स्वबळावर निभावून, जनतेला पुढे घेऊन जाणे हे स्वतंत्र भारतापुढे एक आव्हान होते. अश्याच अनेक आव्हानांपैकी एक होते इंधनामध्ये स्वावलंबी होणे. जळाऊ लाकूड ते केरोसिन/घरगुती वापराचा गॅस, बैलगाडी किंवा घोडागाडी ते मोटार, मातीचे रस्ते ते डांबरी रस्ते आणि सर्वच बाबतीत औद्योगीकरणाकडे चाललेली वाटचाल ह्यामुळे आता पाय मागे घेणे शक्य नव्हते. एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून जगात पाय रोवताना भारताची विकसनशील राष्ट्र म्हणून ओळख निर्माण होणे अत्यावश्यक होते. पाण्यात पडल्यावर गटांगळ्या खात खात का होईना, पोहायला शिकले जाते तसेच स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या मंत्रीमंडळाने भारत घडवण्यासाठी जी पावले उचलली त्यातलंच एक म्हणजे इंधन तेल क्षेत्रातील स्वावलंबनासाठी निर्माण झालेली भारताची मूळ राष्ट्रीय तेल कंपनी - इंडियनऑयल.
पंडित नेहरूंच्या दूरदृष्टीमुळे तेल शोधणे, तेल शुद्धिकरण आणि तेल खरेदी/विक्री व्यवहार चालवण्यासाठी १००% सरकारच्या मालकीच्या इंडियन रिफायनरीज् लिमिटेडची स्थापना ऑगस्ट १९५८ मध्ये झाली. तसेच, देशभरचे तेल विक्री व्यवहार सांभाळण्यासाठी अजून एका १००% सरकारी मालकीच्या कंपनीची स्थापना ३० जून १९५९ रोजी झाली ती म्हणजे ’इंडियन ऑयल कंपनी लिमिटेड'. ह्या कंपनीचे कार्य होते, दळणवळणाच्या/भौगोलिक अडचणींवर मात करून प्रांत आणि ऋतूमानाप्रमाणे बदलणार्या गरजांप्रमाणे देशाच्या कानाकोपर्यापर्यंत इंधन तेल पुरवणे. भारताच्या स्वबळावर इंधन मिळवण्याचा श्रीगणेशा ह्या कंपनीद्वारे १७ ऑगस्ट १९६० रोजी झाला. रशियामध्ये उत्पादन केल्या गेलेल्या ११३९० मेट्रिक टन डिझेलची पहिली आयात "एम.व्ही. उझ्गोरोड" ह्या जहाजाने मुंबई बंदराच्या पिरपाव धक्क्याला उतरवली गेला. त्यावेळी तेल क्षेत्रावर बर्मा शेल, एस्सो इस्टर्न इन्कॉर्पोरेशन, कॅल्टेक्स (इंडिया) लिमिटेड, इंडो-बर्मा पेट्रोलियम आणि आसाम ऑइल कंपनी ह्यांचे साम्राज्य होते. इंडियनऑयलच्या समोरचे पहिले आणि मोठे आव्हान होते ते ह्या भारतात घट्ट पाय रोवलेल्या बाहेरच्या कंपन्यांशी सर्वशक्तीनिशी टक्कर देणे. दरम्यान, १ सप्टेंबर १९६४ रोजी इंडियन ऑयल कंपनी, इंडियन रिफ़ायनरीज् लिमिटेडचे तिच्यात विलिनीकरण झाल्यावर, तेल शुद्धीकरण व विक्रीचे संयुक्त कार्य असलेली इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड ह्या नावाने स्वतंत्र कंपनी म्हणून ओळखली जाऊ लागली.
कालांतराने एकापाठोपाठ एक करत तेल शुद्धीकरण प्रकल्प निर्माण केले गेले. भारताचे स्वत:चे तेल शुद्धीकरण प्रकल्प सुरू व्हायच्या आधी तयार पेट्रोलियम पदार्थ आयात करावे लागत. त्यासाठी परकीय चलनाचा जास्त व्यय होत असे. तेल शुद्धिकरण कारखाने आल्यावर तेल उत्पादक देशांकडून कमी किंमतीत मिळणारे कच्चे तेल आयात करून देशांतर्गतच काही प्रमाणात तयार पेट्रोलियम पदार्थांची कमी खर्चात निर्मिती होऊ लागली आणि परकीय चलनाची भरपूर बचत होऊ लागली.
भारताची ओ.एन.जी.सी. जरी तेल उत्खननात कार्यरत असली तरी जगातील तेल उत्पादक देशांच्या वर्चस्वाला दबून, लागेल त्या किंमतीने आपल्या देशाची वाढती गरज पुरवण्यासाठी इंधन आयात करावे लागते. ह्या परिस्थितीला छेद देण्यासाठी इंडियनऑयल प्रतिवाह (अपस्ट्रीम) तेल क्षेत्रातही देशांतर्गत आणि देशाबाहेरही सहभाग वाढवत आहे. एवढंच नाही तर ज्या देशाला स्वत:चा तेल उद्योग नव्हता त्या देशाची मूळ तेल कंपनी आज हळूहळू बहुराष्ट्रीय कंपनी बनत आहे.
इंडियनऑयलच्या जनुकांमध्ये भारताच्या संरक्षण यंत्रणांचे सेवा करण्याचे समीकरण बसवले गेले आहे. ह्याचा पुरावा म्हणजे, १९६५च्या युद्धामध्ये, इंडियनऑयल परिवाराने आपल्या तिन्ही संरक्षण दलांना अविरत तेल पुरवठा नेटाने आणि जिवावर उदार होऊन केला होता. ही गरज लागू शकते म्हणून तेलाचा मोठा साठा असलेला श्रीनगर डेपो १९६३मध्येच स्थापन केला गेला होता. इंडियनऑयलचा विमानांना लागणार्या इंधनाचा व्यवसायही १९६४ मध्ये आपल्या हवाई दलाला इंधन पुरवूनच सुरू झाला आणि पुढे नागरी हवाई वाहतुकीसाठी १९६५ पासून इंधन पुरवले गेले. पुन्हा १९७१च्या युद्धामध्येही हेच कार्य कुठल्याही वित्त अथवा मनुष्यहानीची पर्वा न करता केले गेले. बांगलादेश मुक्ती संग्रामाच्या वेळी तर इंडियनऑयलने ’चितगाव रिफ़ायनरी’लाही कच्च्या तेलाचा पुरवठा केला होता. युद्धांनंतर सैनिकांच्या विधवांना, अपंग सैनिकांना, स्वातंत्र्य सैनिकांना इंधन विक्रीची डिलरशिप देण्यात आली आणि ही प्रथा अजूनही चालू आहे. १९९९ च्या कारगिल येथील 'ऑपरेशन विजय’ला सहकार्य म्हणून लेह आणि कारगिलच्या डेपोंवर बाँब वर्षाव होत असतानाही इंडियनऑयलने युद्ध क्षेत्राला इंधन पुरवठा बंद केला नाही, बंद पडू दिला नाही. नियंत्रण रेषेवरुन बाँब गोळे येत असतानाही अत्यंत ज्वलनशील इंधन भरलेले टॅंकर संरक्षण दलांसाठी अरुंद रस्त्यांवरून ये-जा करत होते. इंडियनऑयलचे सगळे जाळे युद्धपातळीवर कामाला लागले होते.
देशाबाहेरून निर्माण केल्या गेलेल्या आपत्कालिन परिस्थितीला तोंड देण्यासाठी जशी देशवासियांच्याबरोबर इंडियनऑयल उभी राहतेय तशीच देशावर ओढवलेल्या नैसर्गिक आपत्तींमध्येही सर्व शक्तीनिशी मदतीला उभी राहतेय. पूरग्रस्त परिस्थिती, भूकंप अश्या आपत्तींमध्ये स्वत:चेही नुकसान होऊनसुद्धा स्थानिक प्रशासनाच्या एका हाकेसरशी अत्यंत बिकट ठिकाणीही जाऊन पोहोचतेय. नुकत्याच झालेल्या उत्तराखंडमधील दुर्घटनेमध्ये, इंडियनऑयलने सगळे अत्यावश्यक पेट्रोलियम पदार्थ पूरग्रस्त भागांमध्ये भारतीय सैन्य, हवाई दल, आय.टी.बी.पी, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन आणि इतर बचाव दलांना अखंडपणे पुरवले. ह्या कामासाठी समर्पित केलेला चमू रात्रंदिवस पूरग्रस्त भागामध्ये पेट्रोल, डिझेल, केरोसिन आणि स्वयंपाकाचा गॅस पुरवत होता आणि पुरवठा नियंत्रणात ठेवत होता. फ़िरते हवाई इंधन रिफ़्युएलर खूप दूरच्या अंतरावर आणि पोहोचण्यास अत्यंत कठीण ठिकाणी नेण्याची पराकाष्ठा करत जोशीमठ, धारसु, बागेश्वर, पिठोरगढ आणि उत्तराखंडमधील इतर ठिकाणी पोहोचवले गेले जेणेकरुन बचावकार्यात सामिल असलेल्या हेलिकॉप्टर्सना त्वरित इंधन मिळेल आणि हवाई दलाच्या दिमतीसही हे रिफ़्युएलर दिले गेले जेणेकरून जास्तीचे इंधन तयार असेल.
भारतातली असंख्य खेडीपाडी, गावे आणि शहरांशी जोडली जावीत म्हणून इंडियनऑयल रस्ते बांधणीसाठी बिटूमेन (डांबर) पुरवते. भारत हा शेतीप्रधान देश असल्याने ग्रामीण भागातील ग्राहक आणि शेतकर्यांच्या सहाय्यासाठी १९७५मध्ये ’मल्टीपर्पज डिस्ट्रिब्युशन सेंटर’ स्थापन करणारी ही पहिली तेल क्षेत्रातील कंपनी ठरली. ही केंद्रं शेतकर्यांसाठी ’एक थांबा सुलभ विक्री केंद्र’ ठरली आणि त्यातूनच पुढे आधुनिक पद्धतीची ’किसान सेवा केंद्र’ २००६ साली शेतकर्यांच्या सेवेत दिली गेली. कमीतकमी ५००० किसान सेवा केंद्रं भारतभर कार्यरत असून शेतकर्यांच्या विविध गरजा, जसे की, बियाणे, खते, किटकनाशके, शेतीची अवजारे, औषधे, ट्रक/ट्रॅक्टरचे सुटे भाग, ट्रॅक्टर इंजिन ऑईल, पंपसेट ऑईल ह्या देखिल इतर वाहन इंधने आणि केरोसिनच्या जोडीने पुरवल्या जातात.
देशाच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये जबाबदारी उचलण्याच्या बर्याच प्रयासांमधील उल्लेखनीय गोष्टी म्हणजे,
१) कमी उत्पन्न गटासाठी दिल्या जाणार्या शालेय, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकीय व व्यवस्थापनातल्या शिक्षणासाठीच्या शिष्यवृत्ती,
२) अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, बिलियर्ड्स व स्नूकर, बुद्धीबळ, क्रिकेट, गोल्फ़, हॉकी, टेबल टेनिस, टेनिस वगैरे खेळांसाठी दिल्या जाणार्या शिष्यवृत्ती,
३) खेड्यांमध्ये स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा असलेली सामुदायिक स्वयंपाकघर सुविधा, इस्पितळे आणि सांस्कृतिक केंद्रे.
४) कंपनीच्या मोठ्या प्रकल्पांच्या जवळपासच्या भागांमध्ये शाळा व सांस्कृतिक केंद्रांमध्ये हातपंप, कूपनलिका, पाण्याच्या टाक्या, नळाच्या जोडण्या, पावसाच्या पाण्याचा साठा करण्याच्या सुविधा, पाणी शुद्धीकरण संच बसवणे,
५) कुटुंबनियोजन, इम्युनायझेशन, एड्सबद्दल जागरुकता, पल्स पोलिओ, डोळे तपासणी, रक्तदान, गर्भवतीची व बाळ-बाळंतिणींची काळजी, औषधांचे आणि गर्भनिरोधकांचे विनामुल्य वाटप इत्यादींची शिबिरे भरवणे इत्यादी,
६) स्वच्छतागृह बांधणी, डासांच्या जाळ्या वाटप, इस्पितळांना रुग्णवाहिका दान करणे, कर्णबधीरांसाठी यंत्रं, अपंगांसाठी चाकाच्या खुर्च्या, इस्पितळांना निधी देणे,
७) मथुरा, दिग्बोई येथे कमी खर्चाची इस्पितळे चालवणे आणि व्यवस्था बघणे, त्या इस्पितळांतर्फ़े फ़िरते दवाखाने चालवणे.
८) दिग्बोई, आसाम येथे ’आसाम ऑईल स्कूल ऑफ़ नर्सिंग’ स्थापन करुन त्या शिक्षणाचा खर्च उचलणे आणि विद्यार्थ्यांना शिक्षण भत्ता देणे.
९) देशाचा ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तूंचे संरक्षण, जतन करण्यासाठी ’इंडियनऑयल फ़ाऊंडेशन’ची स्थापना केली गेली. देशातील प्रत्येक राज्यातील, केंद्रशासित प्रदेशातील एकतरी ऐतिहासिक स्थळ ह्या फ़ाऊंडेशनतर्फ़े जतन करणे हे उद्दिष्ट असेल.
आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला १५ ऑगस्ट, २०१३ रोजी ६६ वर्षं पूर्ण झाली. उर्वरित जगाला स्पर्धा देत, अंतर्गत समस्या सोडवत सोडवत आपण वाटचाल करतच आहोत. आपला देश इथल्या नागरिकांच्या आणि विविध संस्थांच्या निस्वार्थी योगदानामुळे बनला आणि घडला आहे. ह्याचाच एक भाग म्हणून ’इंडियनऑयल’ आत्मनिर्भरतेच्या मूळ उद्दिष्टाबरोबरच देशाच्या इतर जडणघडणीलाही आपली व्यावसायिकता सांभाळून हातभार लावत आहे. आज ही कंपनी महत्वपूर्ण अश्या जागतिक फ़ॉर्च्यून ५०० यादीमधील सर्वोच्च भारतीय कंपनी असून त्याच यादीत जगातल्या सर्वात मोठ्या कंपन्यांमध्ये ८८वं स्थान पटकावून भारताचं अस्तित्व इतर प्रगत राष्ट्रांच्या कंपन्यांच्या गर्दीतही दाखवून देते आहे.
जय हिंद !!
संदर्भ : www.iocl.com
अभिनंदन केश्विनी, अत्यंत
अभिनंदन केश्विनी, अत्यंत वेगळा विषय.एका पब्लिक सेक्टर यूनिटच्या यशोगाथेवर , त्यासाठी अनेकांनी घेतलेल्या कष्टावर , त्यांच्या विविधांगी कार्यावर खूप नवीन माहिती देणारा लेख.
एस्सो बर्मा शेल आदि ब्रिटनधार्जिण्या तेलकंपन्यांचे वर्चस्व संपवण्यासाठी नेहरूजींनी दूरदृष्टीने स्थापलेला, विस्तारवलेला हा तेलशुद्धीकरण प्रकल्प.डोकेदुखी ठरणारा तेलखर्च आणि त्यावरचं जागतिक राजकारण या पार्श्वभूमीवर भारताला स्वातंत्र्याचे नवेनवे अर्थ शोधावे लागले, त्याचा हा पहिला टप्पा होता. .
’इंडियनऑयल’ आत्मनिर्भरतेच्या
’इंडियनऑयल’ आत्मनिर्भरतेच्या मूळ उद्दिष्टाबरोबरच देशाच्या इतर जडणघडणीलाही आपली व्यावसायिकता सांभाळून हातभार लावत आहे.>> वाचून छान वाटले.
तुझ्याकडून हा लेख आला, हे बरे झाले. पेट्रोलिअम प्रोडक्टसवर आपले आयुष्य कितीतरी अवलंबून आहे आणि सामान्यपणे आपल्याला या कंपन्यांबद्दल किती कमी माहिती आहे. लेखाबद्दल धन्यवाद.
लै भारी..... आला अश्वीचा लेख.
लै भारी.....
आला अश्वीचा लेख. भरपुर माहिती. एक नवीन पैलु कळाला विषयाचा.
छान विषय आणि माहिती..
छान विषय आणि माहिती..
व्वा अश्विनी, मस्त लेख.
व्वा अश्विनी, मस्त लेख. माहिती आवडली.
भारती, स्वाती, मुग्धा, पराग
भारती, स्वाती, मुग्धा, पराग आणि कंसराज, धन्यवाद
भारती, तेव्हाचे युनियन मिनिस्टर फॉर पेट्रोलियम, हुमायून कबीर ह्यांनी एका प्रसंगी, बहुतेक बराऊनी रिफायनरी देशाला समर्पित करताना, भाकित केलं होतं की ही कंपनी पहिल्या ५ वर्षांतच ब्रिटिशधार्जिण्या तेल कंपन्यांची भारतातील मक्तेदारी निम्म्यावर आणेल. त्याप्रमाणे पहिल्या ५ वर्षांत ६०% बिझिनेस ह्या कंपन्यांकडून भारताने स्वतःकडे वळवला.
वा, वा भारताबद्दल चांगले
वा, वा भारताबद्दल चांगले काहीतरी. आनंद वाटला.
लेह आणि कारगिलच्या डेपोंवर
लेह आणि कारगिलच्या डेपोंवर बाँब वर्षाव होत असतानाही >>
थोडेसेच करकेश्न : लेह रिजन मध्ये कधीही बॉम्ब वर्षाव झाला नाही. द्रास आणि कारगिल मध्येच युद्ध चालू होते. कारगिल - लेह महामार्गावर एक छोटा डेपो आहे त्यावर मात्र शेल्स पडल्यामुले आग लागली होती असा एक प्रवाद आहे. अजून त्याबद्दल खात्रीशिर माहिती सरकार ने रिलिज केली नाही बहुदा.
माझ्या प्रत्यक्ष भेटीत (तेथील पंपाला कारण एकच आहे) अशी माहिती मिळाली की पंपापर्यंत युद्धाची झळ बॉम्ब पोचली नाही.
(होप यु डोन्ट माईंड)
बाकी आढावा उत्तमच आहे.
झक्की, केदार, धन्यवाद लेह
झक्की, केदार, धन्यवाद
लेह महामार्गावर एक छोटा डेपो आहे त्यावर मात्र शेल्स पडल्यामुले आग लागली होती >>> तोच डेपो, त्यालाच लेह डेपोच म्हणतात ही कारगिल युद्धाच्या वेळची लिंक पण बघ http://freepresskashmir.com/shells-hit-kashmir-lube-depot-indian-oil/
कारगिलच्या शेल्ड डेपोचे फोटो मी स्वतः पाहिले आहेत. तिथे पोस्टेड असलेल्या अगदी तरुण ऑफिसरचा फोटो पाहिला होता. तो ऑफिसर जिवाला धोका असूनही लोकेशन सोडून गेला नव्हता. नियंत्रण रेषेजवळून जाणारे टँकर्स, उत्तराखंड दुर्घटनेच्या वेळेस खचलेल्या रस्त्यांवरुन पेट्रोलियम प्रॉडक्ट्सची ने-आण करताना फसलेल्या टँकर्सचे फोटोही पाहिले आहेत, बचावदलांच्या लोकांमध्ये इक्वली मिसळलेल्या इंडियनऑयलच्या एम्प्लॉयीजचे व रिफ्युएलरचे (विथ लोगो) फोटो पाहिले आहेत. प्रताधिकारमुक्त फोटो न मिळाल्यामुळे मला इथे देता आले नाहीत आणि मी विनंतीही केली नाही. इंडियनऑयलने राष्ट्राच्या तेल क्षेत्रातील स्वायत्ततेसाठी आणि नंतरही राष्ट्रासाठी जे जे चांगलं केलंय किंवा व्यावसायिक नुकसान सोसलंय त्याची पब्लिसिटी केली नसल्यामुळे लोकांपर्यंत फारसं पोहोचलंच नाही. ती कंपनी फक्त ऑईल मेजर म्हणूनच बिझिनेसमुळे जनतेला माहित आहे. आत्ता सहज चाळता चाळता हे मिळालं http://www.afaqs.com/news/story/7397_Indian-Oil:-Taking-the-high-ground-...
(होप यु डोन्ट माईंड) >>> अर्रे! काय तू!
Kshvi, mast mahiteepurN
Kshvi, mast mahiteepurN lekh!
ekdam from horses mouth
ka kaay mhaNatat tasa!
shubhechchaa!
धन्यवाद वत्सला! ekdam from
धन्यवाद वत्सला!
ekdam from horses mouth >>> काय म्हणालीस!!!
केश्विनी,, मस्त लेख. छान
केश्विनी,, मस्त लेख. छान लिहिलं आहेस.
(No subject)
छान माहिती. (तुला
छान माहिती. (तुला सत्कारासाठी कुठला एस्कलेटर हवा तो सांग :फिदी:)
सर्वात मोठ्या कंपन्यांमध्ये ८८वं स्थान >>> हे नव्यानं कळलं.
नंदिनी, सुजा, लले, धन्यवाद
नंदिनी, सुजा, लले, धन्यवाद
लले, थोडा व्हेन्यू चेंज करु शकत असशील तर गिरगाव चौपाटी एस्कलेटरवर जाऊया का? द. मुंबईची सैर करु त्या निमित्ताने. खूप दिवस पेंडिंग आहे आपला हा द.मुं. प्रोग्रॅम.
लले मी तुझ्या पोस्टीची वाटच
लले
मी तुझ्या पोस्टीची वाटच बघत होते
आता ५ आणि ६ नंबरला पण एस्कलेटर बसवलेत. केश्विकडे खूप पर्याय आहेत
त्यादिवशी लिहिल्याप्रमाणे सत्कारानंतरच्या खानपान कार्यक्रमाला मला बोलवा
मंजू मंजूडीने मुद्रितशोधन
मंजू
मंजूडीने मुद्रितशोधन करुन दिल्याबद्दल आणि बागुलबुवाने ह्या लेखाचे इंग्रजी ट्रान्स्लेशन तपासून दिल्याबद्दल (काही फॉर्मॅलिटीज पुर्ण करण्यासाठी मला ह्या लेखाचे इंग्रजी ट्रान्स्लेशन करावे लागले होते) त्या दोघांचे आभार
अगदी वेगळ्या आणि महत्त्वाच्या
अगदी वेगळ्या आणि महत्त्वाच्या विषयावर लेख. अभिनंदन.
<<<थोडा व्हेन्यू चेंज करु शकत असशील तर गिरगाव चौपाटी एस्कलेटरवर जाऊया का?>>>
अर्र, तुम्हाला उशीर झाला.
अश्विनी.... निबंध स्पर्धेसाठी
अश्विनी....
निबंध स्पर्धेसाठी असला "आकडेमोडी" चा विषय [जो त्यामुळेच बर्याचवेळा रूक्ष बनण्याचा धोका असतो] तुम्ही निवडून तो किती वाचनीय होऊ शकतो हे छानपैकी नमुना म्हणून दाखविले आहे. मागे अशाच एका स्पर्धेच्यावेळी एकाने 'इंडियन रेल्वे' हा विषय निवडला होता व त्याने चारही रेल्वेचे जाळे असे काही विणले होते की वाचणार्याला जणू काय त्याने प्रत्यक्ष प्रवास घडविला होता. तुमचा हा "इंडिअन ऑयल" निबंध केवळ त्या कंपनीची स्थापना व कार्य सांगत नाही तर स्वातंत्र्योत्तर काळात कंपनी आणि भारतीय जीवन कसे एकमेकात मिसळून गेले आहे तो प्रवास सुंदररितीने दाखवितो. कंपनीने समाजकार्यात केलेल्या वा करीत असलेल्या सेवेचा आणि प्रकारांचा उल्लेख स्पष्ट करतो की त्यांचा भारतीय जीवनात किती मोठा हिस्सा आहे.
"...नियंत्रण रेषेवरुन बाँब गोळे येत असतानाही अत्यंत ज्वलनशील इंधन भरलेले टॅंकर संरक्षण दलांसाठी अरुंद रस्त्यांवरून ये-जा करत होते...." याची भारतीय चित्र समाचारची एक फिल्म २०-२२ वर्षापूवी चित्रपटगृहात पाहिल्याचे आठवते. त्यावेळी अभिमानाने ऊर भरून आला होता. त्यावेळी आम्हाला अभिमान वाटला होता तो त्या सैनिक आणि ड्रायव्हर लोकांचा; पण आता लक्षात येते की त्या श्रेयातील सिंहाचा वाटा इंडियन ऑयलला देणे आवश्यक आहे.
या स्पर्धेच्या निमित्ताने अनेक अभ्यासू निबंध इथे येत आहेत ही बाब खूप आनंदाची.
अशोक पाटील
अभ्यासपूर्ण आणि वाचनीय लेख,
अभ्यासपूर्ण आणि वाचनीय लेख,
मनःपूर्वक शुभेच्छा!!
अश्विनी, चांगला लेख लिहिला
अश्विनी, चांगला लेख लिहिला आहेस.
सुरेख माहितीपूर्ण लेख. आवडला.
सुरेख माहितीपूर्ण लेख. आवडला.
संयोजक, बरहामधून इथे कॉपी
संयोजक, बरहामधून इथे कॉपी पेस्ट करताना 'र्या' चं 'र्या' झालेलं अजून आढळलं. ते दुरुस्त केलं आहे. आणि एकेठिकाणी " च्या ऐवजी ' घातलं आहे. आधीची तशीच दुरुस्ती संपर्कातून कळवली होती. धन्यवाद
भरत मयेकर, अशोक काका, लाल टोपी, गजा आणि कौशिकनगरकर, धन्यवाद
भरत, खरंच उशीर झाला
अश्वे, छान माहितीपुर्ण लेख
अश्वे, छान माहितीपुर्ण लेख
माहीतीपूर्ण लेख. मस्त!
माहीतीपूर्ण लेख. मस्त!
माहितीपुर्ण लेख आवडला..
माहितीपुर्ण लेख आवडला..
धन्यवाद कवे, स्वाती आणि
धन्यवाद कवे, स्वाती आणि शोभनाताई
ऑयल आणि ऑईल असे झाले आहे. ते
ऑयल आणि ऑईल असे झाले आहे. ते सगळीकडे ऑईल असे एकच ठेवा की ओ केश्वीतै..
अरे लोगोमध्ये इंडियनऑयल असाच
अरे लोगोमध्ये इंडियनऑयल असाच एकच शब्द आहे ना! पुर्ण नावातही ऑयलच असतं. थांब, नावातही ऑयल करते. संयोजक,
उत्तम परीचय. शेतकर्यांसाठी
उत्तम परीचय. शेतकर्यांसाठी कंपनी करत असलेले कार्य माहित नव्हते.
ज्यांच्या बद्दल अजूनही आदर आहे अशा मोजक्याच कंपन्या / समुह आज शिल्लक आहेत. त्यातली एक इंडियन ऑयल.
Pages