डॅडी, मुसलमान म्हणजे काय ?

Submitted by उद्दाम हसेन on 4 July, 2013 - 13:17

रविवारी मित्राकडे पार्टीला गेलो होतो. आम्ही गप्पा मारत असताना त्याचा लहान मुलगा - वय वर्षे पाच आमच्याजवळ आला. त्याने मित्राचे गाल धरून विचारलं, डॅडी मुसलमान म्हणजे काय ? मित्राचा चेहरा पडला.कारण एक मुसलमान मित्रही बरोबर होता. मित्राच्या बायकोने अरे असं काही नसतं असं सागून त्याला ओढलं. तेव्हां आमचा मुस्लीम मित्र मधे पडला. मित्राने मग सावरत त्याला विचारल कुठूनही काहीही ऐकून येतोस. कुणी सांगितला तुला हा शब्द. तर त्याने आईचं नाव घेतलं. आता त्याच्या बायकोचा चेहरा खर्रकन उतरला. ती कावरी बावरी होऊन इतर बायकांना सांगू लागली कि मुलाने विचारलं कि आमीर खानचं नाव आमीर खान का आहे ? आप्लं नाव खान का नाही, तेव्हां तिने घाईत असल्याने तो मुसल्मान आहे ना म्हणून खान असं उत्तर दिलं होतं. त्यांची समजूत काढली.

पण डोक्यातून ते गेलं नाही. घरी आल्यावर बायकोला म्हटलं हे कुणाच्याही बाबतीत घडू शकतं. माझाही मुलगा त्याच वयोगटाचा. त्यालाही हे माहीत नाही. पण आपण २४ तास सावध असू शकत नाही. एखादे वेळी मूल आजूबाजूला आहे याचं भान न राहवून अनेक गोष्टी तोंडातून निसटतात. मुलांना या वयात या गोष्टी समजूच नये असं सर्वांचंच मत असतं. पण मित्राकडे झाला तसा प्रसंग कुठेही आणि कुणाच्याही बाबतीत घडू शकतो असं वाटतं. शाळेत अभ्यासक्रमात देखील हे नसतं. मुलांच्या तोंडात हिंदू मुसलमान असे शब्द आले तर टीचर बोलावून घेऊन समज देतील असं वाटतं. एक ना एक दिवस हे मुलांना समजणार आहे हे नक्की. हे बोलणं चालूच होतं तर माझ्याही मुलाने तोच प्रश्न विचारला. मुलाला मित्राकडे नेलं होत, तिथं या मुलांच्या गप्पा झाल्या असणार.

खरंच या मुलांना कुठल्या वयात कुठल्या गोष्टी आणि कशा प्रकारे सांगाव्यात ? माझी तर मतीच गुंग झाली आहे. साधक बाधक परिणामांचा विचार करून काय करता येईल याबद्दल प्लीज बोला ही विनंती.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किरणराव,
एक हिंदू धर्माचा बाफ होता मी माबोवर आलो तेव्हा.एक्झॅक्ट नांव्/लिंक आठवत नाहिये.
तिथे हाच प्रश्न विचारून मी सुरूवात केली होती, की हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन इ. म्हणजे काय? या वयातल्या मुलांना काय सांगावे?
सापडला तर लिंक देईन.

बाकी तुमच्या शोधाकरता व पुढील चर्चेकरिता शुभेच्छा!

सापडला तर लिंक देईन. >> जरूर द्या. चांगला बाफ असेल तर या बाफचं काहीच प्रयोजन नाही. उत्तर मिळाल्याशी कारण.. Happy

मुसलमान म्हणजे काय हा प्रश्न विचारणं म्हणजे गुन्हा असल्यासारखा लेख का लिहिला आहे? मुलगा लहान आहे त्याला सगळं सांगून समजणार नाही हे कबूल आहे पण वेगवेगळे धर्म आणि त्याला समजेलशा भाषेत ओळख करुन द्यायला काय हरकत आहे?
आपण चोवीस तास सावध असू शकत नाही, मतीच गुंग झाली आहे, साधक बाधक परिणामांचा विचार वगैरे जरा अतिशयोक्ती वाटतेय. तेव्हा तुम्ही सर्वप्रथम कशाचा बाऊ करायचा/नाही हे शिका आणि मगच मुलाला शिकवा.

किरण्यके,
त्या बाफवर कुणीही उत्तर दिले नव्हते.

शाळेत तरी त्या वयात शिकवतात, देवळात जातो तो हिंदू, मशिदीत जातो तो मुसलमान, चर्चमधे जातो तो ख्रिश्चन गुरुद्वारात जातो तो शिख. असे बेसिक शिंपल उत्तर असते.

मुसलमान म्हणजे काय हा प्रश्न विचारणं म्हणजे गुन्हा असल्यासारखा लेख का लिहिला आहे? मुलगा लहान आहे त्याला सगळं सांगून समजणार नाही हे कबूल आहे पण वेगवेगळे धर्म आणि त्याला समजेलशा भाषेत ओळख करुन द्यायला काय हरकत आहे?
सायो +१

<<इब्लिस |
शाळेत तरी त्या वयात शिकवतात, देवळात जातो तो हिंदू, मशिदीत जातो तो मुसलमान, चर्चमधे जातो तो ख्रिश्चन गुरुद्वारात जातो तो शिख. असे बेसिक शिंपल उत्तर असते.>>

अनुमोदन

आध्यात्मिक दृष्ट्या विचार करता मी हिंदू, मी मुसलमान, मी ख्रिश्चन इ या अस्मितेच्या विविध पायर्‍या आहेत

मात्र अस्मितेला अभिनिवेशाची बाधा झाली की chaos निर्माण होतो असे पातंजल योगशास्त्र सांगते.

सर्वांस नमस्कार . . . .

किरण्यके !

मुलाचा पुढला प्रश्न असेल कि मग आपण फक्त मंदिरातच का जातो ? मस्जिद वा चर्च मध्ये का नाही ?

पुढे . . . . मस्जिदीत जातात ते मुसलमान का ? मंदिरांत जाता ते का नाही ?

वर सायो, शैलजा, स्वामिजी, श्री जे म्हणत आहेत त्याचे एक सर्व साधारण त्याच्या बुध्दीला पटेल असे उत्तर तयार ठेवा.

उदा : हे आधी कुठेतरी सांगितले होते मी . . . सूर्य्-सूरज-Sun / चंद्र्-चाँद-moon, पण हे असुनही सूर्य एकच , चंद्रही एकच , तसेच सर्वशक्तिमान परमेश्वरही एकच, पण त्याची निरनिराळी नांवे आपापल्या समजुतिप्रमाणे लोकांनी घेतलेली वेगवेगळ्या प्रदेशांमधुन आणी त्याच मुळे आता आपण सगळे प्रांतीय एकत्र राहातो एकाच देशात गुण्यागोविंदाने, आणी म्हणुनच ज्याने जो समजला देव त्याच स्थानात जाऊन तो त्याची प्रार्थना-पूजा करत असतो, त्यात खास असे काहिच नाही . . . .अश्या प्रकारे समजवाल तर पुढे कधीही त्रास अनुभवणार नाही तुम्ही.
सत्यच सांगा पण त्याला गोष्तीरुपाने वा आवडेल अश्या रितीने . . . .

त्याचे पिता आहात . . . . तुमच्या शिवाय ह्या जगात तो कोणाचच ऐकुन समाधान मानणार नाही . . . .
कच्ची माती आहे ती देवाने तुम्हाला प्रदान केलेली किरण्यके !

ह्या मातीला आता तुम्हीच हळुवारपणे जे आकार द्याल तोच पुढे त्याच आकारात पूर्ण व्याप्तता दर्शवेल.

आता अशी वेळ येते कधी कधी कि देवावर संपूर्ण विश्वास ठेवावासा वाटेल,

देशाचे पुढील भविष्य घडविण्याचा हा तुमचा एक तुमच्याकडुन केलेला प्रयत्न आणी सहभाग असेल.

कल्याणम् अस्तु ||

सायो, इब्लिस +१.

प्रश्नाचं उत्तर न देणे किंवा थातुरमातुर उत्तर देणे हीच खरी चुक आहे. त्या लहान मुलाला (समजा) गणपती आवडत असेल, तर तो गणेशभक्त, वगैरेसुद्धा साम्गुन समजावता येईल. पण तेही पुरेसे वाटत नाही.

खरं तर धर्म म्हणजे जीवन जगण्याची पद्धत, हे शिकवणे मला अभिप्रेत आहे... जो तो आपल्या कुटुंबापासुन ही पद्धत शिकतो, त्याला पुढे ते अंगवळणी पडते.... डोक्यावरुन जाईल का त्या मुलाच्या? ....

सायो +१

सर्वांचेच आभार. प्रॅक्टिकल प्रतिसाद आहेत. Happy

इब्लीस
इयत्ता दुसरीला मशीद चर्च, देऊळ अशी चित्रं आहेत शाळेच्या पुस्तकात. तसंच सण आहेत. इद, दिवाळी, ख्रिसमस इ शाळेच्या सोबतीने ओळख करून देताना आवश्यक तेव्हढी ओळख करून द्यायचीच आहे. मुलगा सीनिअर केजी ला आहे. आता त्यांना यातलं काहीच नाही. उगाचच ओळख करून द्यावी असंही वाटत नाही पण वर दिलेल्या प्रसंगात मुलांपर्यंत आपल्याला नको असलेली माहिती कशी पोहोचते हे पाहीलं. मित्राला ओशाळं वाटलं ते यासाठी कि जमलेले लोक काय म्हणतील.. यांच्या घरात लहान मुलांना काय शिकवतात. हेच त्याने बोलून दाखवलं. किमान त्या दोघांना सफाई देता आली. पण मुलं काहीतरी ऐकतात आणि कुठेही काहीही बोलतात. मुलांपर्यंत येणारी सेन्सिटीव्ह माहिती आपल्याकडूनच मिळावी असं वाटतं.. पण इतक्या लहान वयातल्या मुलांनाही ती कशी, कुठून, कुठल्या स्वरूपात मिळेल यावर नियंत्रण उरलेलं नाही याची झालेली जाणिव हा चिंतेचा विषय आहे.
आज मुलाने हा प्रश्न विचारला, उद्या आणखी काही विचारेल, काही प्रश्न विचारणारही नाही.. धोक्याचं वाटतं. किंवा मी फार जास्त काळजी करत असेन.

( आज यातले कुठलेही संस्कार नसल्याने माझा मुलगा ना हिंदू आहे, ना मुसलमान, ना ख्रिश्चन ना कुणी. पण माझ्याही इच्छेविरुद्ध ज्या क्षणी मुसलमान म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर मी त्याला देणार आहे त्या क्षणी तो कुणीतरी होणार आहे. अर्थात हे विचार प्रॅक्टीकल आयुष्यात निरुपयोगी आहेत... पण मनातून जात नाहीत खरे )

पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद.
सायो. नक्कीच लक्षात ठेवीन

सायो +१

ह्या प्रश्नाला मी पण तोंड दिले आहे. माझ्या लेकीच्या वर्गात तिच्या शेजारी एक मुस्लिम मुलगा बसायचा. तिच्या टिचर पण मुस्लिम होत्या. तिने एकेदिवशी मला विचारले की आई, रोजा म्हणजे काय? आणि आपण का नाही रमजानचा उपास करत? ( ती तेंव्हा पहिलीत होती)

त्या वर मी तिला उत्तर दिले होते की जसे आपल्या घरी गणपती बाप्पा येतो, आपण जसे गणपती, देवी ह्यांची पूजा करतो तसे अल्ला नावाच्या देवाची पूजा करणार्‍या लोकांकडे रमजान चा उपास करतात. जे असा उपास करतात त्यांना मुसलमान म्ह्णतात.

ह्या उत्तराने तिचे समाधान झाले. अजुनही तो मुलगा तिच्या शेजारी बसतो ( त्यांचे रोल नंबर पुढे मागे आहेत) आणि तिचा चांगला मित्र आहे. आता तर मुस्लिम धर्माबद्दल तिला माझ्या पेक्षा जास्त महिती आहे. ती आणि तिच्या वर्गातले काही त्या मित्राच्या घरी "ईफ्तार" पण करुन आले आहेत. तो पण आमच्या कडे गणपतीला आलेला आहे.

आपण खान नाही ह्या प्रश्नाचा इतका बाऊ कशा साठी ? माझे अनेक मित्र व मैत्रिणी आणि ऑफिस मधले कलीग मुस्लिम आहेत. माझ्या बोलण्यातुन अनेकदा त्यांचे नाव डोकावते. अनेक जण घरी येतात. आमच्या शेजारी तर क्रिश्चन रहातात. माझ्या इमारतीत ७-८ क्रिश्चन कुटूंबे आहेत. ते पण आपल्या बरोबर सगळे सण साजरे करतात.

ह्या प्रश्नाचा खरा फोबिया आपल्या डोक्यात आहे, मुलांच्या नाही.

ह्या प्रश्नाचा खरा फोबिया आपल्या डोक्यात आहे, मुलांच्या नाही. >>> काय लिहिलय... वाह ...

माझ्या लेकीचा आवडता हिरो आमीर आहे त्यामुळे हा प्रश्ण आमच्याकडेही आला.

मी तिला तिचा आवडता बाप्पा विचारला.. मग शंकर का नाही? गणपतीच का? कारण तिला तो फार आवडतो म्हणून. तसेच बाकी काही लोकांनी त्यांच्यासाठी "अल्लाह" निवडलाय.

पुढचा प्रश्ण - सगळे एकच बाप्पा का नाही आवडून घेत?

उत्तर - तु मराठी का बोलतेस? तुझे आई बाबा बोलतात म्हणून .. पोळी भाजी का खातेस? ब्रेड का नाही? तुझे आई बाबा, आजी आजोबा असच जेवतात म्हणून ... सवयीने. तसच बरेच जण आपल्या आई बाबांचा आवडता बाप्पा सवयीने मान्य करतात. पण शाळेत तुला इंग्रजी शिकवतात आणि तू ते आवडीने/गरजेनुसार कधी कधी बोलतेस .. तसे काही जण आवडीने आणि/किंवा गरजेनुसार बाप्पा निवडतात. काही जणांचा जसे आमीरचा बाप्पा अल्लाह आहे आणि अश्या लोकांना मुसलमान म्हणतात.

टिप = ख्रिश्चॅनिटीबद्दल तिला विशेष प्रश्ण पडले नाहीत कारण संकुलात रहाणारे काही ख्रिश्चन आहेत व त्यांना हिच्या वयाची मुले आहेत त्यामुळे त्यांच्याबरोबर व युरोपात शाळेबरोबर ख्रिस्तमस साजरा केल्याने तिला बरीच कल्पना आहे.

तिने तो प्रश्ण चार चौघात विचारला असता तरी मी त्याचा बाऊ केला नसता कारण तसं केल्याने तिची उत्सुकता संपली नसती आणि मनात आहे ते आई बाबांशी बोलण्याबद्दल भिती वाटली असती.

>>> ह्या प्रश्नाचा खरा फोबिया आपल्या डोक्यात आहे, मुलांच्या नाही.<< आणि मुले समजण्याच्या वयात आ ली की तुम्ही योग्य वाटल्यास तो मुलांबरोबर शेअर करू शकता. फक्त मुलांच आणि तुमचे अवकाश आणि अनुभवविश्व वेगळं आहे सो मुलांना हा फोबिया पटेलच असे नाही०

सध्याचा प्रश्ण हिजडा म्हणजे काय? आणि तो बॉय आहे की गर्ल? असा आहे.

जाईजुई - +१००.

पण शेवटच्या प्रश्नाच उत्तर कसं दिलं तेही लिहाच... कदाचित उपयोगी पडेल.

>>>> मुसलमान म्हणजे काय हा प्रश्न विचारणं म्हणजे गुन्हा असल्यासारखा लेख का लिहिला आहे? <<<<< अचूक प्रश्न! या प्रश्नासमोर धागाच व्यर्थ आहे.
याचबरोबर निरनिराळ्या हिन्दी गाण्यातील व वेगवेगळ्या मुस्लिम व (अज्ञानामुळे) मुस्लिमेतर लोकान्चे बोलण्यात "काफर", कुफ्फर असे शब्द येतात, ते ऐकल्यावर माझ्याही मुलिने मला हाच प्रश्न विचारला होता, बाबा काफर म्हण्जे काय? Proud पण त्यावर धागा काढून लोकान्ना सल्ले विचारावेत इतका महत्वाचा तो नसल्यामुळे मी तिला ये जगातील सर्व धर्मान्ची मला ज्ञात असलेली माहिती दिली व काफर ही मुसलमानी "कन्सेप्ट" तिला समजावुन सान्गितली!

वरच्या बर्‍याच जणांना + १.
मुलाने प्रश्न विचारण्यात त्याचं काहीच चुकलं नाही पण वडिलांचा चेहेरा पडणे, आईने कावरेबावरे होणे ह्या प्रतिक्रिया नक्कीच चुकल्या Happy त्या मित्रासमोरच अगदी नेहेमीच्या स्वरात एक फॅक्ट म्हणून हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, धर्म, बौद्ध असे वेगवेगळे धर्म असतात असे सांगणे योग्य ठरले असते.

असेच प्रश्न मुलं एकटे पालक, डिव्होर्स, लैंगिकता, मृत्यू ह्याविषयीही विचारु शकतात ( धर्माशी संबंध नाही पण उत्तर द्यायला कठीण वाटतील असे प्रश्न ). विकिपिडियावर एखाद्या विषयाची जशी वस्तुनिष्ठ व्याख्या वाचतो तसेच मुलाच्या आकलनशक्तीनुसार व्याख्या सांगावी.

पण माझ्याही इच्छेविरुद्ध ज्या क्षणी मुसलमान म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर मी त्याला देणार आहे त्या क्षणी तो कुणीतरी होणार आहे. >>> असं का बरं ? मुळात आपल्याला धर्म ह्या संकल्पनेच्या पलीकडे जायचे असेल तर त्याबद्दल अज्ञान असून कसे चालेल ? फक्त माहिती देताना शक्य तितक्या वस्तुनिष्ठपणे मुलापर्यंत पोचतेय ना हे पाहणे महत्त्वाचे.

आमच्या कडेपण सॅनफ्रान्सिस्कोला जाउन आल्या पासून "आई गे म्हणजे काय? आपण गेलोहोतो त्या रस्त्या वर ओन्ली फॉर गे असं का लिहिलं होतं?" हा प्रश्न सध्या चर्चेत आलेला आहे.

त्याचं उत्तर देताना बरीच कसरत केली आहे.

वरच्या बर्‍याच जणांना + १.

मुलं आहेत ती प्रश्न विचारणार नाही तर काय करणार्? अशा वेळेला "त्याने काहीतरी चुकीचं विचारलंय" असा चेहरा केल्यास त्या सोबत असलेल्या मुसलमान मित्राला नक्कीच ऑकवर्ड झाले असणार. शिवाय आपल्यापाठून हे लोक आपला उल्लेख मुसलमान असाच करतात की काय असा प्रश्नदेखील पडला असेल त्याच्या मनात.

अगदीच काही जमत नसेल तर अशावेळेला मुसलमान म्हणजे हे आपले काका, तू त्यांनाच विचार बघू. असे उत्तर देता येऊ शकते. त्या मुस्लिम काकांनी त्यांच्या धर्माविषयी माहिती दिली असती मुलाला.

हल्ली कशावर धागा निघेल काय सांगता येत नाही.

जाई-जुई, जियो.
सायो... अगदी बर्रोब्बर.
<<उगाचच ओळख करून द्यावी असंही वाटत नाही पण वर दिलेल्या प्रसंगात मुलांपर्यंत आपल्याला नको असलेली माहिती कशी पोहोचते हे पाहीलं.>>
किरण्यके (ओरिजिनल)... खान हे नाव मुसमलानांच्यात असतं. ह्यात नको असलेली माहिती काय ते कळलं नाही.
मला असं वाटतं की आपण सगळेच फार फार सेन्सिटेव्ह झालोय. धर्मं अन त्यातही मुसलमान म्हटलं की पोलिटिकली करेक्ट काय असेल ह्याचा विचार आधी करतो आपण... तुमची चूक नाही.

"... आई, हिंदू म्हणजे काय?" ह्या प्रश्नाला किती दचकला अस्तात? किंवा आपण सगळेच? तितकच महत्वं द्यायचं मुसलमान, ख्रिश्चन, वगैरेच्या प्रश्नांना.

किरण्यके (ओरिजिनल)... खान हे नाव मुसमलानांच्यात असतं. ह्यात नको असलेली माहिती काय ते कळलं नाही. ..>> अगदी बरोबर आहे दाद. मुलाला दुसरीमधे जेव्हां हा अभ्यासक्रम येणार आहे तेव्हां शाळेच्या निमित्ताने आवश्यक तेव्हढी ओळख करून द्यायची आहे. मुलीला त्याच टप्प्यावर योग्य त्या रितीने ओळख झाली. तेव्हां तिचं समाधान होईल अशीच उत्तरं तिला मिळालीत. मुलगा अजून लहान आहे, तेव्हां आताच नको असं म्हटलंय.

(नंदीनी - तुमचा प्रॉब्लेम समजला. तुम्हाला इतरत्र दिलेलं उत्तर हे तुम्हाला उद्देशून नव्हतं हे तुमच्या लक्षात आलं असेल असं वाटलं होतं. असो. तुमची चूक नाही )

नंदीनी - तुमचा प्रॉब्लेम समजला. तुम्हाला इतरत्र दिलेलं उत्तर हे तुम्हाला उद्देशून नव्हतं हे तुमच्या लक्षात आलं असेल असं वाटलं होतं. असो. तुमची चूक नाही >>. आं??? मला कुठे काय उत्तर दिले होतेत? किरण्यके ओरिजिनल आयडीने का?

मुळात मायबोलीवर "मुलांचे लाजवणारे किस्से" हा धागा आहे, तिथे हा किस्सा टाकता आला असता की. नवीन धागा उघडायचे काही खास कारण??

किरण्यके ओरिजिनल आयडीने का? >>> आता तिथे हाच आयडी दिसू लागला असेल Wink

धागे काढणे हा एखाद्याचा टीपी असू शकतो, आपण कोण आक्षेप घेणारे वगैरे वगैरे उत्तरं मिळतील त्याची तयारी ठेवा असं काहीसं उत्तर होतं ते.. आलं लक्षात ?

या विषयावर विपूत बोललं तर चालेल ?

हम्म

एखाद्याला तोंडावर मुसलमान म्हणणे किती भीतीदायक वाटते ना ? (मी ओक्वर्ड म्हणणार नाही ). पण जर हिंदूला तोंडावर हिंदू म्हणून घेण्यात अभिमान वाटतो तर मुसलमानांना मुसलमान म्हणण्यात का वाटत नाही? का आपण हिंदू लोक या सर्व गोष्टींना घाबरतो? त्यांनाही तोंडावर मुसलमान म्हणणे स्वीकारले पहिजे, असे मला वाटते.

Pages