दुनिया खुशाल म्हणुदे चंदन असेल बहुधा
माझेच पोळलेले ते मन असेल बहुधा
"आलोच मागुनी मी, तू हो पुढे" म्हणाला
मृत्यूकडे स्वतःचे वाहन असेल बहुधा
सध्या कुठे कुणावर करतात प्रेम कोणी
सध्या कबूतरांचा सीझन असेल बहुधा
इतक्या उघडपणे ती का लाजली असावी
चोरून घेतलेले चुंबन असेल बहुधा
बाकी तिच्याकडेही आहेच काय दैवा
अर्पण करून बसली तन मन असेल बहुधा
मी ज्या दिशेस जातो तेथे अजाण ठरतो
चौफेर या जगाचे वाचन असेल बहुधा
शोधून शायराला गेली थकून झोपी
नशिबामधे गझलच्या लंघन असेल बहुधा
आशेवरी अश्या मी जीवन जगायचो की
मेल्यावरी हवे ते जीवन असेल बहुधा
लाखात लोळताना नाही मला कळाले
माजून बोलणारा निर्धन असेल बहुधा
जग का मला अताशा झिडकारते कळेना
माझे सुधारलेले वर्तन असेल बहुधा
बघण्यामधे तिच्या त्या भलताच घोळ होता
बंधन नसेल किंवा बंधन असेल बहुधा
नुकतेच टाकले जे कचर्यात नांव तुम्ही
त्या 'बेफिकीर'चे हे लेखन असेल बहुधा
-'बेफिकीर'!
व्वा!
व्वा!
Pages