'सूरज का सातवाँ घोडा' ही धर्मवीर भारती यांची कादंबरी. संकल्पना अशी की, सूर्याच्या रथाला सात घोडे असतात. सहा घोडे चाकोरीबद्ध मार्गाने धावतात. पण सातवा घोडा सर्वात लहान आहे आणि त्यामुळे इतरांच्या गतीने धावू शकत नाही. कदाचित लहान असल्याने अवखळपणे आखलेला मार्ग सोडून धावायची त्याला मुभा आहे. त्यामुळे रथाच्या धावण्याची गती-मार्ग-ध्येय त्याच्यावर अवलंबून आहे. आपापली आयुष्य जगताना कदाचित आपणही असेच सूर्याच्या रथाचे घोडे असू. पण तो सातवा घोडा बनण्याची इच्छा आणि धमक किती जणांत असते?
'सूरज का सातवाँ घोडा' सात कथांभोवती गुंफला आहे. पहिल्या व दुसर्या कथेला नांव आहे. ’नमक की अदायगी’ व ’घोडे की नाल’. नंतरच्या कथा बिनानावाच्याच आहेत. या सार्या मात्र स्वतंत्र कथा नसून एकमेकांत गुंतल्या आहेत. या कथा गावातल्या लोकांच्या, त्यांच्या जीवनाच्या आणि एकमेकांची आयुष्ये घडवणार्या आणि बिघडवणार्या. खरंतर या कथांचा केंद्रबिंदू आहे माणिक मुल्ला (रजत कपूर) याच्या आयुष्यात आलेल्या तीन स्त्रिया. एक सुशिक्षित, एक मध्यमवर्गीय तर तिसरी कनिष्ठवर्गीय. या तिघींच्या कथा लघुकथेच्या रूपात येतात. आणि कळतं, खरंतर या सगळ्या लघुकथांचा संच म्हणजे एकच सलग दीर्घकथा आहे. माणिक मुल्ला आपल्या वडिलोपार्जित घरी एकटा राहात मित्रमंडळींचं टोळकं जमवून या कथा सांगतो आणि ते सगळे तींवर चर्चा करत राहतात. या कथांमध्ये देवदास आहे, कार्ल मार्क्स आहे आणि चेकॉव्ह सुद्धा आहे. कथा सांगण्याचं तंत्र, तंत्राशिवायची गोष्ट असं सगळंच काही आहे.
साधारण एकाच छोट्या गावात राहणारी माणसे. जमुना आणि तिचे आई-बाबा हे एक कुटुंब, शेजारीच राहणारा जमुनाचा प्रियकर तन्ना आणि त्याच्या दोन बहिणी-बाबा-बाबांची ठेवलेली बाई हे दुसरं, लिली आणि तिची आई हे तिसरं, माणिक आणि त्याचे दादा-वहिनी हे एक आणि लढाईत हात गमावलेला एक फौजी-चमन ठाकूर आणि त्याने सांभाळलेली अनाथ मुलगी-सत्ती हे शेवटचं कुटुंब. साधारण हीच पात्रे सगळ्या कथांमधून येत राहतात. नाही म्हणायला दुसर्या गावातला जमीनदार अन त्याचा नोकर रामधन हीच काय ती बाहेरची माणसे. जमुना-मध्यमवर्गीय, लिली-उच्चशिक्षित, सत्ती-कनिष्ठवर्गीय असे समाजाचे सरळसरळ तीन स्तर इथे दिसतात. एक तन्नाचे बाबा सोडले तर मुख्य व्यक्तिरेखांमधलं कुणीच थेट खलप्रवृत्तीचं नाही.
.
जमुना माणिकला शाळेत असताना भेटते तर लिली आणि सत्ती या इंटरला असतानाच्या काळात. जमुनावरचं त्याचं प्रेम हे पौगंडावस्थेतलं आकर्षण असतं आणि ते तेवढंच टिकतं. सत्तीच्या बाबतीत त्याला ती आवडत असते आणि तिला त्याच्याबद्दल प्रचंड आदर असतो. इथं प्रेमापेक्षाही जिव्हाळा आणि आपुलकीचं नातं जास्त आहे. लिलीवरती मात्र माणिकचं प्रेम असल्याचं दिसतं पण इथेही तो काढता पाय का घेतो हे कळत नाही.
त्याच्या कथानायिकांपैकी पहिली आहे जमुना. मध्यमवर्गीय घरातील एकुलती मुलगी. कादंबर्या वाचणारी, त्यांच्या स्वप्नील जगात रमणारी एक हट्टी मुलगी. शेजारच्या घरातल्या तन्नावर तिचं प्रेम आहे. तशी ती बेधडक आहे आणि आपल्या प्रेमासाठी आपल्या आणि त्याच्याही घरातल्यांशी टक्कर घेण्यास तयार आहे. तिच्या दुर्दैवानं तन्ना मात्र कचखाऊ आहे. तिचं लग्न मात्र शेवटी तिच्या बाबाच्या वयाच्या दोनदा विधुर झालेल्या जमीनदाराशी होतं. लेखकाच्या मते प्रेमकथांचं तात्पर्य खरंतर आर्थिक आणि वर्णव्यवस्थेवर अवलंबून असतं. इथं जमुना उच्चवर्गीय परंतु आर्थिक परिस्थिती हलाखीची आणि तन्ना खालच्या गोत्राचा. त्यामुळे त्यांची प्रेमकहाणी यशस्वी न होता अर्थ आणि वर्ण या दोन्ही पातळींवर वरचढ ठरलेल्या जमीनदाराशी तिचा विवाह होतो.
दुसरी लिली, ललिता. शिकलेली, सुंदर, श्रीमंत, एकुलती आणि त्यामुळे आपसूक असणारा गर्विष्ठ भाव असणारी. तिला मनातून हे लग्न करायचंच नसतं पण पुन्हा एकदा नियतीपुढे तिचं काही चालत नाही. तिचे बाबा वारले आहेत आणि आई ही टिपिकल ’मी बाईमाणूस’ अशा वृत्तीची आहे. तन्नाशी लग्न झाल्यावर ती काही त्याच्याशी जुळवून घेत असताना दिसत नाही. कदाचित तो बापाच्या तालावर नाचतो याचा राग तिला अधिक आहे.
सत्ती ही खरंतर अनाथ मुलगी. तिला चमन ठाकूर या फौजीनं सांभाळलं. ही कामाला वाघ आहे. तशी फटकळ पण मायेचा ओलावाही पुष्कळ आहे. माणिकला शिक्षणासाठी गरज आहे म्हटल्यावर लगेच आयुष्याची पुंजी हवाली करणारी अशी साध्या सरळ मनाची आहे. मात्र ज्याने वडिलकीच्या नात्याने सांभाळलं त्यानेच पैशांपायी विकलं म्हटल्यावर ती जाम चिडते, वैतागते आणि माणिककडे मदतीसाठी येते.
जमुना प्रथमता दिसते ती अवखळ, हट्टी, स्वप्नांत रमणारी व एकदम बेधडक. तन्नाच्या घाबरटपणामुळे चिडून ती माणिकवर प्रेम करू लागते. लग्न झाल्यावर मात्र तिचा आवेश बदलतो. एक शांत, पोक्तपणा हालचालींमधून जाणवतो. इतकंच नव्हे तर आईबाबांपेक्षा तिला आता तिच्या अजून न झालेल्या मुलाच्या भवितव्याची काळ्जी वाटते. आईचा विरोध डावलून तिचा तन्नासोबत विवाह करण्यास परवानगी देणार्या बाबांसोबतही ती अत्यंत स्वार्थीपणे वागते. एकूणातच, तिचं पुढचं आयुष्यही सोपं होत नाही. कदाचित इतक्या वृद्ध नवर्याकडून संसारसुख मिळत नसल्याने ती पुन्हा तन्नाकडे आकर्षित होते. लेखक पुन्हा एकदा अर्थ-जातिव्यवस्थेला नांवे ठेवतो की ज्यांच्यामुळे अशा अनेक जमुना आपल्या समाजात तयार होतात. .
लिली शारिरीक दृष्ट्या नसली तरी मानसिक रित्या खंबीर आहे. तन्नाशी लग्न ठरल्यानंतर ’नवर्यापेक्षा बायको जास्त शिकलेली नको’ किंवा’ बाईच्या जातीला इतकं शिकून काय करायचंय” असं म्हणून तिचं शिक्षण थांबवलं जातं. परिस्थितीपुढे हार पत्करलेली लिली एकंदर प्रकरण लक्षात येताच ’हमें किसी मर्द की जरूरत नहीं’ असं सासर्याला ठणकावून सांगून सरळ आईकडेच राहाते. खरंतर तन्ना थोडा खंबीर असतात तर या जमुना आणि लिलीची इतकी परवड झाली नसती. तीच गोष्ट माणिकची. जमुनाच्या वेळी तो शाळेत जाणारा-बहुधा तिच्याहून लहान असावा, परंतु लिलीच्या वेळी त्याने काढता पाय का घेतला हे कळत नाही.
सत्ती ही तिघींमधली फटकळ, सतत चाकू घेऊन फिरणारी, कुणाला न घाबरणारी अशिक्षित मुलगी. इतकी खंबीर असूनही सर्वात जास्त अन्याय मात्र तिच्यावरच होतो. तिच्याशी माणिकची हिशोब लिहिण्याच्या निमित्ताने ओळख होते. दोघे अगदी प्रेमात नसले तरी तिचा त्याच्यावर खूप जीव असतो. साठवलेले सगळे पैसे ती एकदा त्याच्या उच्चशिक्षणासाठी आणून देते. पण जेव्हा खरी मदतीची अपेक्षा असते तेव्हा माणिक डरपोक निघतो आणि आयुष्यभर त्याला याचा सल राहतो.
या सर्वांत तन्ना हा दुष्ट जगातला बिचारा प्राणी वाटतो. तो आयुष्यभर दबलेलाच राहातो. शेवटी मृत्यूपूर्वी त्याचे पाय कापले जाणं त्याच्या असहाय्यतेची परिसीमा आहे. तर त्याचा बाबा हा दुष्टतेचा अर्क आहे. दिसेल त्या बाईवर नजर मारणं आणि नंतर मुलाच्या सासरी भ्याडासारखं लपून बसणं, प्रसंगी विहिणीवरतीही लाईन मारणं म्हणजे कळसच!
इथं तन्ना, माणिक, सत्ती, जमुना, लिली सगळ्यांना सूरज का सातवॉं घोडा बनायची संधी असते, ती फक्त लिलीच घेते असं दिसून येतं. किमान तिच्यापुरतं तरी ती सासरी खितपत पडण्यापेक्षा तिचं जगणं बदलते. शेवटाकडे धुक्यात दिसणार्या सत्तीकडे धावत जाताना माणिकही प्राप्त परिस्थितीला शरण न जाता जगणं बदलू पाहण्याचा प्रयत्न करताना दिसतो. तो यामध्ये यशस्वी होतो की नाही हे मात्र इथं गुलदस्त्यात आहे.
मूळ कादंबरी सात कथांत विभागली आहे आणि कथा ज्या क्रमाने घडतात त्याच क्रमाने येतात असंही नाही. चित्रपटाचा फॉर्मही तोच आहे. काही प्रसंग दुसर्या कथेत दुसर्या पात्राच्या दृष्टीमधूनही दिसतात आणि एकाच प्रसंगासाठीचं प्रत्येकाचं वेगवेगळा दृष्टीकोन (परिप्रेक्ष्य) दिसतं.
उदा. तन्ना आणि जमुनाच्या घराची गच्ची जवळजवळ आहे, इतकी की एकीवरून दुसरीवर जाता येतं. एका संध्याकाळी तन्नाला आईची आठवण येत असते आणि तो उदास असतो. तो जमुनाला भेटतो, पण तिला त्याच्या मनःस्थितीची कल्पना येत नाही. ती त्यातून तिला सोयीस्कर वाटलेला अर्थ काढते आणि त्याच्यासाठी खायला आणायला जाते. पुढच्या कथेत कधीतरी सगळं रामायण कळतं. त्याचे बाबा आणि त्यांची बाई शयनगृहात असताना हा तिथे हुक्का ठेवायला जातो. ते दोघे चिडतात. आधीच बाबा रागीट त्यात ती बया आगीत तेल ओतत राहाते. बहिणीही आसुरी आनंद बाळगणार्या. त्यामुळे त्यांच्याकडूनही आधारापेक्षा कुत्सित टोमणेच मिळतात. दुखावलेला तन्ना जमुनाला भेटायला जातो तर ती अल्लडपणे त्याच्यासाठी मालपुए आणायला जाते. दुसर्या एका प्रसंगात जमुना पहिल्यांदा सासरहून येते तो प्रसंग इतरांच्या किंबहुना आईच्या नजरेतून मुलीच्या सुखश्रीमंतीचं कौतुक करणारा दिसतो तर नंतर तो कधीतरी लग्न होऊन आलेली प्रेयसी आणि आपल्या दारात उभा राहून पाहात असलेला प्रियकर यांच्यातला अवघडलेला पण ते अवघडलेलपण दाखवू न देण्याचा प्रयत्न करणारा असा येतो.
मी मूळ कादंबरी अर्धीअधिक वाचली. कादंबरी असल्यानं प्रसंग खुलवण्यासाठी शब्दमर्यादा नाही, परंतु त्याच सगळ्या गोष्टी अनावश्यक प्रसंग-व्यक्ती टाळून तोच इफेक्ट कसा आणावा यासाठी बेनेगलांना खरंच मानलं. आतापर्यंतची उदाहरणं-दा विंची कोड, शाळा, गोळाबेरीज, पिंजर पाहता पुस्तकाला चित्रपटाने न्याय दिला नाहीय असं माझं मत होतं. इथं मात्र पुस्तकाहून मला चित्रपट अधिक चांगला वाटला.
उत्कृष्ट हिंदी आणि सहजसुंदर अभिनय ही चित्रपटाची बलस्थानं म्हणायला हवीत. रजत कपूरचा(माणिक) हा पहिला चित्रपट असेल असं वाटत सुद्धा नाही. जमुना(राजेश्वरी)चा हा आयत्या घरात घरोबानंतरचा दुसराच चित्रपट. लग्न झाल्यानंतर सतत भरजरी शालूचा पदर सावरणारी आणि नंतर एकदा दरवाजात आत आल्यावर तो उडवून लावणारी जमुना तिच्या देहबोलीतून छान दिसून येते. लिली(पल्लवी जोशी) या एकाच प्रसंगात शिक्षणामुळं आणि श्रीमंतीमुळंही आलेला गर्व, आत्मविश्वास, थोडीशी बेफिकिरी, लग्नामधून आलेली कटुता आणि घेतलेला निर्णयावर ठाम असणं हे कसं दाखवून देते पहा.
इथे एम्बेड केलेला कोड चालत नाहीसं दिसतं आहे. ही व्हिडिओची लिंकः http://www.youtube.com/embed/41h4piZeAK4
मूळ कादंबरी इथं वाचायला मिळेल.
कादंबरीच्या शेवटी दिलेली काही वाक्यं इथं देण्याचा मोह आवरत नाहीयः
"हुआ यह है कि हमारे वर्ग-विगलित, अनैतिक, भ्रष्ट और अँधेरे जीवन की गलियों में चलने से सूर्य का रथ काफी टूट-फूट गया है और बेचारे घोड़ों की तो यह हालत है कि किसी की दुम कट गई है तो किसी का पैर उखड़ गया है, तो कोई सूख कर ठठरी हो गया है, तो किसी के खुर घायल हो गए हैं। अब बचा है सिर्फ एक घोड़ा जिसके पंख अब भी साबित हैं, जो सीना ताने, गरदन उठाये आगे चल रहा है। वह घोड़ा है भविष्य का घोड़ा, तन्ना, जमुना और सत्ती के नन्हें निष्पाप बच्चों का घोड़ा; जिनकी जिंदगी हमारी जिंदगी से ज्यादा अमन-चैन की होगी, ज्यादा पवित्रता की होगी, उसमें ज्यादा प्रकाश होगा, ज्यादा अमृत होगा। वही सातवाँ घोड़ा हमारी पलकों में भविष्य के सपने और वर्तमान के नवीन आकलन भेजता है ताकि हम वह रास्ता बना सकें जिन पर हो कर भविष्य का घोड़ा आएगा; इतिहास के वे नए पन्ने लिख सकें जिन पर अश्वमेध का दिग्विजयी घोड़ा दौड़ेगा। माणिक मुल्ला ने यह भी बताया कि यद्यपि बाकी छह घोड़े दुर्बल, रक्तहीन और विकलांग हैं पर सातवाँ घोड़ा तेजस्वी और शौर्यवान है और हमें अपना ध्यान और अपनी आस्था उसी पर रखनी चाहिए।"
--धर्मवीर भारती
मस्त लिहिलय. काही
मस्त लिहिलय.
काही वर्षांपुर्वी दुरदर्शनवर पाहिल्याचं आठवतय.
या चित्रपटावर मायबोलीवर आधी
या चित्रपटावर मायबोलीवर आधी झालेले लिखाण
http://www.maayboli.com/node/23694
माझाही आवडता चित्रपट
दुव्याबद्दल धन्यवाद
दुव्याबद्दल धन्यवाद वरदा.
त्या लेखाची सुरूवात अ प्र ति म झालीय, फक्त नंतर पूर्ण कथानकच सांगायच्या नादात सगळी सरमिसळ झालीय.
मस्त लिहिलय...
मस्त लिहिलय...
ही प्रायोगिकता /प्रतीकात्मकता
ही प्रायोगिकता /प्रतीकात्मकता त्या काळाचं वैशिष्ट्य होती, तिचा अतिरेकही होत असे.. मी सिनेमा पाहिलेला नाही अन कादंबरीही वाचलेली नाही.पण परिचय मात्र छानच..
मस्त लेख. मी हा सिनेमा पाहिला
मस्त लेख.
मी हा सिनेमा पाहिला होता. खूप लहान होतो तेव्हा बहुतेक दूरदर्शनवर लागला होता. काहीच आठवत नाही. आता पुन्हा एकदा पाहीन.
धन्यवाद !!
सिनेमा मध्यंतरी एकदा
सिनेमा मध्यंतरी एकदा युट्युबवर पाहिला होता. मुद्दाम रजत कपूरसाठी.
लेख खूप छान जमलाय. श्याम बेनेगल सारखे दिग्दर्शक स्वतःच्या स्टाईलला सोऑट होईल असेच चित्रपट का बनवत नाहीत कुणास ठाऊक?
बेनेगलांचा झुबैदा सारखा कृत्रिम सिनेमा पाहताना फार वाईट वाटलं होतं.
मस्त! माझाही आवडता सिनेमा.
मस्त!
माझाही आवडता सिनेमा.
ती संकल्पना ठीक आहे . . . .
ती संकल्पना ठीक आहे . . . . पण ह्या सात घोड्यांची नांवे काय आहेत?
ती संकल्पना ठीक आहे . . . .
ती संकल्पना ठीक आहे . . . . पण हा कोणता घोडा आहे ? त्याचे नांव काय ?
एका सुंदर चित्रपटाविषयी सुंदर
एका सुंदर चित्रपटाविषयी सुंदर लिहिले आहे!
हे तर नाटक आहे. ह्याला सिनेमा
हे तर नाटक आहे.
ह्याला सिनेमा कशाला म्हणायचे? फक्त कॅमेर्याने शूटींग करुन पडद्यावर दाखवले म्हणुन?
वाचते. परीक्षण/ओळख/ओळख आवडली.
वाचते. परीक्षण/ओळख आवडली.
काय सुन्दर कथा आहेत. सग ळ्या
काय सुन्दर कथा आहेत. सग ळ्या वाच ल्या. Could not keep the book down.
कुठे बघायला मिळेल हा चित्रपट?
कुठे बघायला मिळेल हा चित्रपट?
यूट्यूब वर
यूट्यूब वर