डोक्यात कळ नेणारी टांचदुखी

Submitted by अमितकरकरे on 25 April, 2013 - 20:14

विजयाताई एका प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून काम करीत होत्या. दिवसातून साधारण ३-४ तास त्यांना उभे राहून शिकवावे लागे. बाईंचे फार वय झाले नसले तरी सध्या गेले काही महिने त्यांना अर्धा-पाऊण तास उभे राहिले की पायाचा घोटा आणि टाच या भागात रग लागल्यासारखे होई. शाळेतील उंच खुर्चीवर पाय लोंबते असलेल्या अवस्थेत बसले तरी गुडघ्याच्या खाली व टाचेत वेदना येत.

अरुण एका कारखान्यात फ्लोअरवर कामाला होता. कामाच्या निमित्ताने कारखान्यात त्याच्या साधारण दोन-चार चकरा तरी रोजच्या होत असत, त्यात पायात जाडसर सेफ्टी-शूज. काही दिवसांपासून हालचालींना सुरवात करताना त्याच्या टाचेमधून असह्य कळ निघत असे, काही पावले चालले की त्यात आराम पडे. कदाचित सारखे उभे राहिल्याने अथवा जास्त चालणे झाल्याने होत असेल असे समजून त्याने आधी दुर्लक्ष केले पण त्याचे प्रमाण वाढतच गेले. शेवटी क्ष-किरण तपासणीत टाचेच्या हाड वाढले आहे असे दिसून आले.

सुनीताबाई एक गृहिणी होत्या. सकाळी स्वयंपाकाचा वेळ सोडला तर त्यांना दिवसभरात बाकी फारसे काम नसे. पण तरीही त्यांना सकाळी उठल्या-उठल्या खाली पाय टेकवल्यावर टाचेतून वेदना होण्याचा त्रास सुरु झाला होता. इतका की काही काळ त्यांना पाय टेकवावासासुद्धा वाटत नसे. संध्याकाळी टीव्हीवरच्या सिरीअल बघण्यासाठी अर्धा तास एकाजागी बसून उठताना हीच तऱ्हा.

विजयाताई, अरुण किंवा सुनीताबाई - व्यवसाय वेगवेगळे असले तरी त्रास एकच, डोक्यात कळ नेणारी टाचदुखी!
वैद्यकीय भाषेमध्ये ‘प्लान्टर फेशिआयटीस’ (plantar fasciitis) या नावाने ओळखला जाणारा हा विकार साधारण शंभरातील दहा लोकांना आयुष्यात एकदा तरी त्रास देतो. पूर्वीच्या काळी प्रामुख्याने धावपटूंमध्ये जास्त प्रमाणात आढळून येणारा आजार शक्यतो ज्यांचे फार काळ उभे राहून काम करणे होते अशांमध्ये जास्त दिसून येतो. अचानक वाढलेले वजन, पायाला मार बसणे, चालत्या बसमधून जोरात उतरल्यामुळे बसणारे हादरे किंवा उंच जागेवरून कठीण पृष्ठभागावर उडी मारणे अशा इतर कारणांमुळेही याची सुरवात होऊ शकते.

नक्की काय होते?

आपण जेव्हा उभे असतो, तेव्हा आपले गुडघे आणि पावले यांच्यावर आपल्या संपूर्ण वजनाचा भार पडत असतो. वर्षानुवर्षे हा भार पेलता यावा यासाठी निसर्गाने आपल्या पायाचे तळव्यांची रचना किंचित वक्राकार ठेवली आहे. आपल्या टाचेच्या हाडापासून ते चवड्यापर्यंत एक जाडसर स्नायूचा पडदा ताणून बसविलेला असतो, त्यालाच प्लान्टर फेशिआ असे म्हणतात. या रचनेमुळे एखाद्या स्प्रिंग अथवा सस्पेन्शन सारखे काम या पडद्याकडून होते व आपल्या वजनाचा आपल्या पावलावर पडणारा भार हलका होण्यात मदत होते. खाचखळग्यातुन चालताना होणारी पावलाची वेडीवाकडी हालचालही या रचनेमुळे सुकर होते. असे असले, तरी त्या स्नायूच्या भार पेलण्याला काही मर्यादा आहेत. त्यावर नियमितपणे जास्त भार, दाब अथवा ताण पडत राहिला; किंवा काही कारणाने त्याला इजा झाली तर या स्नायूच्या टाचेच्या बाजूच्या भागाला सूज येऊ लागते. यालाच वैद्यकीय भाषेत ‘प्लान्टर फेशिआयटीस’ असे म्हणतात. याच सुजेमुळे सुमारे ७०% रुग्णांमध्ये टाचेच्या हाडाची एखाद्या गुलाबाच्या काट्यासारखी वाढ होऊन (कल्केनिअल स्पर) झालेल्या सुजेमध्ये भरच पडते. अगदी आतल्या बाजूस असलेली ही सूज वरून फारशी दिसत नसली तरी दुखण्याचे मूळ कारण ही येणारी सूज हेच!

बहुतांशी रुग्णांमध्ये टाचेच्या आतली बाजू दुखण्याने आजाराची सुरवात होते. साधारणपणे हालचाल सुरु करताना – जसे सकाळी उठून पहिली काही पाउले चालताना, अथवा अर्धा-पाऊण तास एका जागी बसून उठल्यावर चालणे सुरु करताच टाचेमधून असह्य कळ येते. काही काळ चालल्याने त्यात लक्षणीय आराम पडतो. औषधोपचार न केल्यास पुढे संपूर्ण टाच दुखणे, पुढे चवड्यांपर्यंत दुखणे जाणे व त्याच सोबत टाचेच्या वर घोट्याच्या मागील भागाला रग लागणे असा त्रास बळावतो. दुखण्याच्या कालावधीमध्ये वाढ होते – म्हणजे पूर्वी चार पावले चालले की बरे वाटे पण आता अर्धा तासानंतर जरा कमी होते. पुढे पुढे तर दिवसभर टाचदुखी चालूच राहते.

होमिओपॅथिक उपचार:

होमिओपॅथिक औषधांपैकी कल्केरिया फ्लुर, वलेरीआना, सेपिया, पल्सेटीला, नॅट्रम कार्ब, मँगॅनम व हेक्ला लावा या औषधांचा प्रामुख्याने या आजाराच्या उपचारांत वापर होतो. होमिओपॅथिक उपचारपद्धतीप्रमाणे सर्वांना ढोबळमानाने एकच औषध न देता प्रत्येक रुग्णाची विशिष्ठ लक्षणे अभ्यासून त्यानुसार वरीलपैकी अथवा लक्षणानुसार त्याहून वेगळ्या अशा औषधाची निवड करण्यात येते.

याच्या जोडीला गरम पाण्यात पाय घोट्यापर्यंत बुडवून शेकल्याने बऱ्याच रुग्णांना तात्पुरता आराम मिळतो.
या प्लान्टर फेशिआ नावाच्या स्नायुबंधाला आलेली सूज कमी करणे हा उपचारांचा एक भाग झाला; पण सूज जाऊन दुखणे कमी झाल्यावर त्या स्नायुमधील शक्ती व लवचिकता वाढविण्यासाठी विशिष्ठ व्यायाम करणे हा त्याहूनही महत्वाचा भाग. या व्यायामात नियमितपणा राखल्यानेच हा त्रास भविष्यात पुन्हा कधीही उद्भवू नये याची काळजी घेता येते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता या महिन्यात टाचदुखी झाली. मागील वर्षी तसे झाले होते तेव्हा युरिक अ‍ॅसिड वाढले होते. आताही थोडे वाढले होते.परत डॉ कडे गेलो. गोळ्या घेतल्यावर हळू हळू कमी झाले. हा गाउटचा प्रकार आहे.हिवाळ्यात पाणी कमी प्यायले जाते त्यामुळे शरीरात युरिक अ‍ॅसिड वाढते. शरीराच्या टेंडन्सीचा तो प्रकार असतो. युरिक अ‍ॅसिड वाढल्यावर प्रोटीन डाळ वगैरे पदार्थ कमी करायला सांगितले होते.पाणी भरपूर प्यायला सांगितले.

Pages