विजयाताई एका प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून काम करीत होत्या. दिवसातून साधारण ३-४ तास त्यांना उभे राहून शिकवावे लागे. बाईंचे फार वय झाले नसले तरी सध्या गेले काही महिने त्यांना अर्धा-पाऊण तास उभे राहिले की पायाचा घोटा आणि टाच या भागात रग लागल्यासारखे होई. शाळेतील उंच खुर्चीवर पाय लोंबते असलेल्या अवस्थेत बसले तरी गुडघ्याच्या खाली व टाचेत वेदना येत.
अरुण एका कारखान्यात फ्लोअरवर कामाला होता. कामाच्या निमित्ताने कारखान्यात त्याच्या साधारण दोन-चार चकरा तरी रोजच्या होत असत, त्यात पायात जाडसर सेफ्टी-शूज. काही दिवसांपासून हालचालींना सुरवात करताना त्याच्या टाचेमधून असह्य कळ निघत असे, काही पावले चालले की त्यात आराम पडे. कदाचित सारखे उभे राहिल्याने अथवा जास्त चालणे झाल्याने होत असेल असे समजून त्याने आधी दुर्लक्ष केले पण त्याचे प्रमाण वाढतच गेले. शेवटी क्ष-किरण तपासणीत टाचेच्या हाड वाढले आहे असे दिसून आले.
सुनीताबाई एक गृहिणी होत्या. सकाळी स्वयंपाकाचा वेळ सोडला तर त्यांना दिवसभरात बाकी फारसे काम नसे. पण तरीही त्यांना सकाळी उठल्या-उठल्या खाली पाय टेकवल्यावर टाचेतून वेदना होण्याचा त्रास सुरु झाला होता. इतका की काही काळ त्यांना पाय टेकवावासासुद्धा वाटत नसे. संध्याकाळी टीव्हीवरच्या सिरीअल बघण्यासाठी अर्धा तास एकाजागी बसून उठताना हीच तऱ्हा.
विजयाताई, अरुण किंवा सुनीताबाई - व्यवसाय वेगवेगळे असले तरी त्रास एकच, डोक्यात कळ नेणारी टाचदुखी!
वैद्यकीय भाषेमध्ये ‘प्लान्टर फेशिआयटीस’ (plantar fasciitis) या नावाने ओळखला जाणारा हा विकार साधारण शंभरातील दहा लोकांना आयुष्यात एकदा तरी त्रास देतो. पूर्वीच्या काळी प्रामुख्याने धावपटूंमध्ये जास्त प्रमाणात आढळून येणारा आजार शक्यतो ज्यांचे फार काळ उभे राहून काम करणे होते अशांमध्ये जास्त दिसून येतो. अचानक वाढलेले वजन, पायाला मार बसणे, चालत्या बसमधून जोरात उतरल्यामुळे बसणारे हादरे किंवा उंच जागेवरून कठीण पृष्ठभागावर उडी मारणे अशा इतर कारणांमुळेही याची सुरवात होऊ शकते.
नक्की काय होते?
आपण जेव्हा उभे असतो, तेव्हा आपले गुडघे आणि पावले यांच्यावर आपल्या संपूर्ण वजनाचा भार पडत असतो. वर्षानुवर्षे हा भार पेलता यावा यासाठी निसर्गाने आपल्या पायाचे तळव्यांची रचना किंचित वक्राकार ठेवली आहे. आपल्या टाचेच्या हाडापासून ते चवड्यापर्यंत एक जाडसर स्नायूचा पडदा ताणून बसविलेला असतो, त्यालाच प्लान्टर फेशिआ असे म्हणतात. या रचनेमुळे एखाद्या स्प्रिंग अथवा सस्पेन्शन सारखे काम या पडद्याकडून होते व आपल्या वजनाचा आपल्या पावलावर पडणारा भार हलका होण्यात मदत होते. खाचखळग्यातुन चालताना होणारी पावलाची वेडीवाकडी हालचालही या रचनेमुळे सुकर होते. असे असले, तरी त्या स्नायूच्या भार पेलण्याला काही मर्यादा आहेत. त्यावर नियमितपणे जास्त भार, दाब अथवा ताण पडत राहिला; किंवा काही कारणाने त्याला इजा झाली तर या स्नायूच्या टाचेच्या बाजूच्या भागाला सूज येऊ लागते. यालाच वैद्यकीय भाषेत ‘प्लान्टर फेशिआयटीस’ असे म्हणतात. याच सुजेमुळे सुमारे ७०% रुग्णांमध्ये टाचेच्या हाडाची एखाद्या गुलाबाच्या काट्यासारखी वाढ होऊन (कल्केनिअल स्पर) झालेल्या सुजेमध्ये भरच पडते. अगदी आतल्या बाजूस असलेली ही सूज वरून फारशी दिसत नसली तरी दुखण्याचे मूळ कारण ही येणारी सूज हेच!
बहुतांशी रुग्णांमध्ये टाचेच्या आतली बाजू दुखण्याने आजाराची सुरवात होते. साधारणपणे हालचाल सुरु करताना – जसे सकाळी उठून पहिली काही पाउले चालताना, अथवा अर्धा-पाऊण तास एका जागी बसून उठल्यावर चालणे सुरु करताच टाचेमधून असह्य कळ येते. काही काळ चालल्याने त्यात लक्षणीय आराम पडतो. औषधोपचार न केल्यास पुढे संपूर्ण टाच दुखणे, पुढे चवड्यांपर्यंत दुखणे जाणे व त्याच सोबत टाचेच्या वर घोट्याच्या मागील भागाला रग लागणे असा त्रास बळावतो. दुखण्याच्या कालावधीमध्ये वाढ होते – म्हणजे पूर्वी चार पावले चालले की बरे वाटे पण आता अर्धा तासानंतर जरा कमी होते. पुढे पुढे तर दिवसभर टाचदुखी चालूच राहते.
होमिओपॅथिक उपचार:
होमिओपॅथिक औषधांपैकी कल्केरिया फ्लुर, वलेरीआना, सेपिया, पल्सेटीला, नॅट्रम कार्ब, मँगॅनम व हेक्ला लावा या औषधांचा प्रामुख्याने या आजाराच्या उपचारांत वापर होतो. होमिओपॅथिक उपचारपद्धतीप्रमाणे सर्वांना ढोबळमानाने एकच औषध न देता प्रत्येक रुग्णाची विशिष्ठ लक्षणे अभ्यासून त्यानुसार वरीलपैकी अथवा लक्षणानुसार त्याहून वेगळ्या अशा औषधाची निवड करण्यात येते.
याच्या जोडीला गरम पाण्यात पाय घोट्यापर्यंत बुडवून शेकल्याने बऱ्याच रुग्णांना तात्पुरता आराम मिळतो.
या प्लान्टर फेशिआ नावाच्या स्नायुबंधाला आलेली सूज कमी करणे हा उपचारांचा एक भाग झाला; पण सूज जाऊन दुखणे कमी झाल्यावर त्या स्नायुमधील शक्ती व लवचिकता वाढविण्यासाठी विशिष्ठ व्यायाम करणे हा त्याहूनही महत्वाचा भाग. या व्यायामात नियमितपणा राखल्यानेच हा त्रास भविष्यात पुन्हा कधीही उद्भवू नये याची काळजी घेता येते.
होमेओपथिचे तीनही लेख
होमेओपथिचे तीनही लेख माहितीपूर्ण आहेत. पण जर सावकाश टाका ना १- १ भाग.
मला कांहीं वर्षांपूर्वीं हा
मला कांहीं वर्षांपूर्वीं हा त्रास व्हायला सुरवात झाली होती व आमच्या डॉक्टरानी हेंच निदान केलं होतं. पण औषधं न देतां त्यानी नरम सपाता व बूटांत पातळसा स्पंज ठेवण्याचा सल्ला दिला होता. पंधरा दिवसांत मला त्रास होणं बंद झालं. कदाचित सुरवातीलाच ही काळजी घेतल्यामुळे औषधांशिवाय हा त्रास गेला असेल.
चान्गली माहिती धन्यवाद
चान्गली माहिती धन्यवाद
होमिओपॅथिक उपचार: होमिओपॅथिक
होमिओपॅथिक उपचार:
होमिओपॅथिक औषधांपैकी कल्केरिया फ्लुर, वलेरीआना, सेपिया, पल्सेटीला, नॅट्रम कार्ब, मँगॅनम व हेक्ला लावा या औषधांचा प्रामुख्याने या आजाराच्या उपचारांत वापर होतो. होमिओपॅथिक उपचारपद्धतीप्रमाणे सर्वांना ढोबळमानाने एकच औषध न देता प्रत्येक रुग्णाची विशिष्ठ लक्षणे अभ्यासून त्यानुसार वरीलपैकी अथवा लक्षणानुसार त्याहून वेगळ्या अशा औषधाची निवड करण्यात येते.
पण ही औषधे कशा प्रकारे परिणाम करतात? हे लिहिलं तर फार बरं होईल.
डॉ कैलास गायकवाड वरील उल्लेख
डॉ कैलास गायकवाड
वरील उल्लेख केलेली सगळी औषधे ही प्रामुख्याने फायब्रस टिश्यू च्या विकारांवर उपयोगी आहेत; anti-inflammatory गुण असलेली.
अमितकरकरे, तुम्ही होमिओपॅथिक
अमितकरकरे, तुम्ही होमिओपॅथिक डॉ/तज्ज्ञ आहात का? विचारण्याचे कारण, एकाच दिवसाच्या माबोवावरात होमिओपॅथीविषयी एवढे लेख पाडलेत, म्हणून उत्सुकता वाटली. गै.स. नसावा.
@ धारा, गुगलले असता अमित
@ धारा,
गुगलले असता अमित करकरे हे होमिओपॅथीचे डॉक्टर आहेत बहुधा. खालील लिंक त्यांचीच असावी.
http://www.dramitkarkare.com/home.html
मलाही टाचदुखीचा त्रास एक दोन्दा झाला होता. आठ दिवस चालता येत नव्हते. हळूहळू फरक पडला.
धन्यवाद डॉक्टर!सर्वसामान्याना
धन्यवाद डॉक्टर!सर्वसामान्याना समजेल अशा भाषेत उपयुक्त लेख लिहिलेत.
मलहि सकाळि उठ्ल्यावर काहि
मलहि सकाळि उठ्ल्यावर काहि पाउले चालण्यास टाचे मधे वेदना होतात पन कधि कधि जसे जास्त Driving केल्यावर किवा जास्त चाल्ले कि दुसर्या दिवशि.
साधारन ६ महिन्यापुर्वि मला काहि दिवस रोज त्रास होत होता पन अचनक बन्द हि झाला. काल जास्त Driving झाले अनि आज सकाळि साधारन ८/१० पाउले चलल्यावर कळा येने बन्द झले.
क्रुपया सान्गा मला काहि TEST कराव्या लगतिल का जेनेकरुन जस्त त्रास होन्याअगोदर उपाय करु शकेन.
विजय, यासाठी आत्ता तरी काही
विजय,
यासाठी आत्ता तरी काही टेस्ट करण्याची गरज नाही.
मी होमिओपॅथिक डॉक्टर आहे. या
मी होमिओपॅथिक डॉक्टर आहे.
या लेखांचे प्रयोजन आजार व त्यावरील उपलब्ध असलेले होमिओपॅथिक उपचार व विचार असे आहे.
मी वैयक्तिक प्रश्नांना जाणीवपूर्वक सल्ला देणे टाळू इच्छितो कारण ती ही जागा नाही असे मला वाटते - प्रत्येक पॅथीमध्ये पेशंटला तपासणे गरजेचे असते. त्यानंतरच योग्य निदान होऊ शकते. कृपया समजून घ्यावे
Thank you अमित for your
Thank you अमित for your reply.
Medorrhinum पण खूप उपयोगी
Medorrhinum पण खूप उपयोगी आहे.
८-१० वर्षांपूर्वी मला हा
८-१० वर्षांपूर्वी मला हा त्रास झाला होता,त्यावेळी डॉक्टरांनी सांगितले की वजन कमी करा.नाही थांबले की
अल्ट्रासाउंड रेजचा शेक घ्या.कशामुळे माहित नाही,महिनाभर चालताना लक्षात आले आता दुखत नाही.
नंतर डॉक्टरांकडे गेले नाही.(वजनामुळे असेल तर माहितीतील एकजण बारिक असून त्यालाही हा त्रास झाला
होता.तसेच ती व्यक्ती मधुमेह असल्याने रोज चालत असे.) नंतर दुसर्या पायालापण त्रास झाला होता.पण कमी
दुखायचे.त्यावेळी मागील अनुभवावरून डॉक्टरांकडे न जाता चालत राहिले. अर्थात त्यात सातत्य
नव्हते. कालांतराने कोणतेही औषध न घेता माझे दुखणे गायब झाले.
अरे बापरे टाच दुखायला लागली
अरे बापरे टाच दुखायला लागली आता माझी. स्पोर्ट मेडिसीनच्या डॉक्टर कडे गेलो. टेंन्डोनायटीस अस काहीतरी सांगितल आहे त्यावर त्यांनी कोणतेही औषध न देता व्यायाम सांगितला आहे. मागच्या वेळी एकदा टेंडोकेअर नावाच्या गोळ्या घेतल्या होत्या. त्या मी मनानचे आणल्या आहेत. आज चालता येत नाहीये. काहीतरी जादू होउन बर झाल पाहिजे ब्वॉ हे दुखण. १२ तारखेला ट्रिपला जायच आहे. कस काय होणार काय समजत नाही! नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न.
वरील माहिती उपयुक्त आहेच. पण
वरील माहिती उपयुक्त आहेच. पण एकदम टाचेत कळ येणे, जबडा दुखणे ही हार्ट अॅटेकची पूर्वसूचना असू शकते. तरी ते चेक करून घ्यावे. माझ्या वडिलांना तुम्ही लिहीले आहे तो विकार झाला होता.
गेल्या एक महिन्यापासून सकाळी
गेल्या एक महिन्यापासून सकाळी उठल्यावर पहिली पाच ते दहा पावले माझ्या पण टाचा दुखतात.
काय करावे?
छे बुवा आता पर्॑त उजवी टाच
छे बुवा आता पर्॑त उजवी टाच दुखू लागली.परमेश्वर आठवतो बुवा! मागच्या वेळी स्पोर्ट्स मेडिसीनच्या डॉक्टरांनी फक्त व्यायामच दिला होता. त्यानंतर हळू हळू कमी झाली.
माझ्या एका स्नेह्यांना
माझ्या एका स्नेह्यांना कांहीं वर्षांपूर्वीं हा त्रास व्हायला सुरवात झाली होती व त्यांच्या फॅमिली डॉक्टरानी हेंच निदान केलं होतं. पण कोणत्याही पॅथिचे औषधं न देता त्यांच्या फॅमिली डॉक्टरानी त्यांना नरम सपाता व चपला / बूटांत टाचेच्या खाली एक स्पंजचा तुकडा ठेवण्याचा सल्ला दिला होता. पंधरा दिवसांत त्यांचा टांच दुखीचा त्रास कमी होत गेला व काही महिन्यात बंद झाला. कदाचित सुरवातीलाच ही काळजी घेतल्यामुळे औषधांशिवाय हा त्रास गेला असावा. माझ्या आईला जेव्हां असाच टांच दुखीचा त्रास सुरू होताच कुणीतरी सल्ला दिला की टांचेला रोज रात्री गोडे तेल लावून चोळत जा. आणि आश्चर्य म्हणजे १५ दिवसात टांच दुखीचा त्रास पूर्ण बंद झाला.मला आठवते की डॉ. ह. वि. सरदेसाई ह्यांनी लोकमान्यनगर पुणे येथे तीन वर्षांपूर्वी एका व्याख्यानात हाच उपाय सांगितला होता.
१) नरम सपाता वापरणे व बूटांत
१) नरम सपाता वापरणे व बूटांत पातळसा स्पंज ठेवणे.
२) बर्फाची बाटली घेवून त्यावर पाय ठेवून रोल करावे.
३) रात्री झोपताना तेल/तूप/फूट क्रीम लावुन पायांत मौजे घालून झोपणे.
४) नियमित १०/२० मिनिटे तरी गवतावर किंवा असेच चालणे.
५) एकाच जागेवर १०/१५ मिनिटांशिवाय न बसने.
हे वरील उपाय नियमित अमलात आणल्यास हा आजार बराचसा आटोक्यात येतो.
मला हा त्रास मागिल
मला हा त्रास मागिल वर्षभरापासून होत आहे आणि मी मिलिंद मोडक ह्यांना देखील दाखवले आहे. कुणीही उपाय सुचवला नाही.
सकाळी झोपेतून उठलो की अर्धातास टाचदुखी इतकी असह्य होते. नेमकी ही टाचदुखी सकाळी का होते ह्याचे कारण कळेल का? पुरेसा रक्तपुरवठा होत नसावा का झोपेत टाचेला?
विजयनी जसे लिहिले आहे तसाच हा त्रास आहे. मी नाईकाचा जोडा वापरतो.
मला हा त्रास मागिल
मला हा त्रास मागिल वर्षभरापासून होत आहे आणि मी मिलिंद मोडक ह्यांना देखील दाखवले आहे. कुणीही उपाय सुचवला नाही.
सकाळी झोपेतून उठलो की अर्धातास टाचदुखी इतकी असह्य होते. नेमकी ही टाचदुखी सकाळी का होते ह्याचे कारण कळेल का? पुरेसा रक्तपुरवठा होत नसावा का झोपेत टाचेला?
विजयनी जसे लिहिले आहे तसाच हा त्रास आहे. मी नाईकाचा जोडा वापरतो.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>'बी' जी, वरील उपाय जरूर करून पहा (जमतील तसे ) फार फरक पडतो मला लागू झाला म्हणून मी सुचवते आहे.
माझीही अशीच टाचदुखीची तक्रार
माझीही अशीच टाचदुखीची तक्रार जवळपास दोन महिने होती, नवाने सांगितलेले उपायाशिवाय १) पलंगाजवळच मऊ चप्पल ठेवायची ती घालूनच चालायच २) एका बाटलीत गरम पाणी व एकात बर्फाच पाणी , आलटून पालटून रोल करायचं ३) झोपण्यापूर्वी तेल/तूप/क्रीम लावणे
करुन बघेन. पण ह्या दुखण्याचे
करुन बघेन. पण ह्या दुखण्याचे शास्त्रिय नाव काय? गुगलवरुन आणखी माहिती मिळवता येईल.,
डोक्यात कळ नेणारी टाचदुखी!
डोक्यात कळ नेणारी टाचदुखी! वैद्यकीय भाषेमध्ये ‘प्लान्टर फेशिआयटीस’ (plantar fasciitis) या नावाने ओळखला जातो.
पण फक्त टाचदुखी असेल तर काय
पण फक्त टाचदुखी असेल तर काय नाव आहे?
आत्ताच ही लिंक वाचली आणि आपला
आत्ताच ही लिंक वाचली आणि आपला आजार नक्की काय आहे हे कळल्यानंतर बरं वाटलं. मी मिलिंद मोडकांना देखील हे नीट समजवून सांगितल पण त्यांनाही उलगडता आलं नाही.
लिंकमधे लिहिले आहे की वजन खूप असले की असे होते. माझे वजन फक्त ५६ किलो आहे. हो पण एक अजून त्यांनी सांगितले की उभे राहणे खूप चालले ह्यामुळे देखील होते. तर मी खूप चालतो आणि उभे पण रहायची वेळ येतेच ट्रेनमधे. अजून एक की खूप वजन उचलणे. हो हेही खूप केले आहे मी. सोबत लॅपटॉप असतोच. सतत देशात विदेशात फेर्या असतातच.
धन्यवाद सर्वांचे.
मला हा टाचदुखीचा त्रास खूपच
मला हा टाचदुखीचा त्रास खूपच होतो आहे. कुणाकडे काही खास उपाय आहे का? पुर्वी फक्त पहाटे झोपेतून उठल्यावर व्हायचा. आता तो कधीही होतो.
मला कधीकधी होतो.एखाद्या दिवशी
मला कधीकधी होतो.एखाद्या दिवशी खूप दमणूक धावपळ झाली असेल तर(नेहमीजास्त चालण्याने होत नाही, पण आपल्याला न आवडणारी/दमवणारी किचकट कामे केल्यावर.)
डॉ ना विचारले त्यांचे म्हणणे कॅल्शियम डिपॉझिट मुळे किंवा प्रोटीन जास्त खाल्ले गेल्याने (शाकाहारी लोकात अती डाळी आणि उसळी) होऊ शकते. मसाज करु नका, हिल इन्सर्टस वापरा(नेहमीच्या बुटाच्या आत वापरता यीत, कुठेही मेडीकल मधे किंवा अमाझॉन इ. वर मिळते.)
पुण्यात आणि मुंबईत धनसई नावाची एक लॅब आहे ते म्हणे नीट पायाचे माप घेऊन कस्टमाईझ चांगले सँडल बनवून देतात डाय्बेटीक आणि टाचदुखी वाल्यांसाठी.
हे दुखणे परत त्रास द्यायला
हे दुखणे परत त्रास द्यायला लागले. या वेळी दुसर्या अर्थो कडे गेलो. त्यांनी ब्लड मधे युरिक अॅसिड तपासणी करायला सांगितली असता त्याचे प्रमाण जास्त आढळले. पथ्य व औषधे दिली आहेत. मला हा गाउटचा प्रकार वाटतो
Pages