कॅन्सर

Submitted by अमितकरकरे on 25 April, 2013 - 01:05

ब्रेस्ट-कॅन्सरचे निदान ऐकून मनात येणाऱ्या भावनांचे हे विविध टप्पे...
...प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे अनुभवलेले.

काल होते नीट, आज गमावला सूर;
भासू लागे सारे मला, धूसर धूसर
काय केला गुन्हा, आला आजार हा भाळी;
माझीयाच घरा लागे नजर का माझी ?
गमावले सुख, सारे एकाच क्षणात;
रीती झाली संध्याकाळ, तनात-मनात
मनी वाटे, सांगू नये कोणालाही काही;
आपलेच भोग, मन एकटेच साही
काढले चिमटे, तरी दु:स्वप्न तुटेना;
सैरभैर मन, कशामधेही रमेना
सख्या येती भेटायाला, सांगती अनुभव;
कोठल्या, कोणाची, एक तरी आठवण
बोलता सांगता, फेरा इतरांचा कळे;
घरटी एक माता याच्या आगीमधे जळे
एकाकी सोसले काही जणींनी हे दु:ख;
क्लेश झाले कमी, दिसे दु:खातही सुख
नशिबी आले भोग जरी आज माझ्यासाठी;
फुलापरी ठेवी लेक, बहिणी आणि पती
जन्मा आली नवी नाती, नवे भावबंध;
हळव्या मना धीर देई मायेचा सुगंध
आज खरा कळे मज नात्याचा पसर;
लेक होई आई, घाली मनाला फुंकर
दूर होई मनावरी साठले मळभ;
बदलली नाही, माझी एकही ओळख
रोग फक्त शरीराला ग्रासुनिया जाई;
मन परी अ-बाधित, निरोगीच राही
मी असेन याही पुढे, काल होते तशी;
पाण्यापरी नितळ, माझ्या मनापरी जशी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users