तिची- माझी

Submitted by vaiju.jd on 21 April, 2013 - 03:11

।। श्री ।।

माझे काका वारले,तेव्हा ते साताऱ्याला मुलीकडे म्हणजे माझ्या चुलतबहिणीकडे होते. आणि योगायोगाने ती माझी 'जाऊ'ही लागते. माझे वडिल हयात नसल्याने माझे कन्यादान माझ्या या काका-काकूंनीच केले होते. वयस्कर, आजारी काकांनी शेवटच्या दिवसात मुलीकडे राहण्याची इच्छा प्रदर्शित केली, त्यामुळे अंतसमयी ते साताऱ्याला होते.

कळले तसे आम्ही सर्वजण साताऱ्याला जमलो. सगळे दिवस होईपर्यंत अगदी घरात घरात राहून आमची छोटी मुले सगळी कंटाळली होती. 'दिवस' झाल्यावर चुलतभाऊ त्याच्या बायकोला म्हणाला, "तू आणि वैजयन्ती सगळ्या मुलांना जरा बागेत नेऊन आणा."

साताऱ्याच्या राजवाड्यासमोर प्रशस्त छान उद्यान होते आणि यादो गोपालपेठेतल्या आमच्या घरापासून जवळही होते. त्यामुळे घरातली सगळी सहासात मुले घेऊन मी आणि वाहिनी तिथे गेलो. मुले खूप खेळली, हुंदडली , आनंदली. अंधार पडायला लागला तसे घरी जायचे ठरवले, पण मुलांना तहान लागली होती म्हणून बागेत सोय होती तिथे पाणी प्यायला घेऊन गेलो. माझी वाहिनी मुलांकडे लक्ष ठेवायला तिथे थांबली आणि मी तिचा छोटा आठनऊ महिन्यांचा मुलगा घेऊन उभी राहिले.

इतक्यात तिथे एका झाडाच्या बुंध्याजवळ जमिनीवर मांडी घालून बसलेली बाई मला म्हणाली. "तुम्ही काय सवती सवती काय? न्हाई इतक्या समद्या पोरांना घिऊन आलेल्या दिसता?"

मी तिच्या प्रश्नाने एकदम गडबडलेच. बाई खेडवळ होती.नॉयलॉनची साडी साधीच नेसलेली, डोक्यावर पदर , तोंडाला उठून दिसण्याइतकी पावडर लावलेली. मांडीवर दहा अकरा महिन्यांचे मूल, आजूबाजूला आणखीन चारपांच मुले, मुलींच्या वेण्यांना रंगीबेरंगी रिबिनी लावून वेण्या घातलेल्या, अंगात शिवून घेतलेले एकाच ताग्यातल्या कापडाचे फ्रॉक. सगळी मुले मिळून एक वर्ष ते पांच वर्षातल्या वयोगटातली!

मी एकदम गडबडून म्हणाले, " छे छे ! आम्ही नणंद भावजया आहोत. ती वाहिनी आहे माझी."

"आंस व्हय ! बरीच सगळी पोरं घिऊन आलेल्या दिसला तवा म्हनलं सवती कां काय? म्हंजी काय,आम्ही दोघी सवती आहोत नां. भायेर जाताना सगळी पोरं घिऊन जातो नां म्हणून!"

"तुम्हाला सवत आहे ? "

"हां ना! त्याचं काय झालं मला करून चार वर्ष झाली तर मला पोरच व्हईना. मग तिला करून आणली.तिला वर्साच्या आत पोरगी झाली. पन बगा ती चांगल्या पायगुनाची! ती आली आन मला दुसऱ्याच वर्षी पोरगा झाला आन मागच्या वर्साला आमाला दोघींना मुलीच झाल्या. आन मग गेल्यासाली तिला मुलगा झाला बगा. हा काय मांडीवर हाये नां हा तिचा धाकटा!"

"मग तुम्ही एकत्रच राहता?"

"हां ,येकाच घरात!काय होतं सांच्याला धनी आमचं दमूनभागून येतात.कधी थोडी घिऊन पण येतात. हा धाकटा सारखा रांगत मधी मधी जातो. धड जिऊ देत नाय का बसु देत नाय! म्हनून मी सर्वाला घिऊन हिते बगिच्यात येते. आता जरा काळवंडल की जानार घरी! तवर तिनी समदं आवरून ठिवलं असेल."

"भांडण नाही होत कधी तुमचं? कशा राहता?"

"कशापायी भांडायचं? बरोबरच हाये ना,तिला करून आणली आन ती पायगुनाची बी निगाली. मालकांचं नाव चालवायला कोन?"

मला तिला आणखी बरेच विचारावेसे वाटले. नवरा काय काम करतो? एवढा मोठा प्रपंच कसा चालतो? आणि इतरही काही प्रश्न!

पण माझी वाहिनी शेजारी येऊन उभी राहिली होती.तिने माझ्या जवळून मुलालाही घेतले होते ती कंटाळल्या चेहऱ्याने मला म्हणाली, "चल निघायचे कां?"

ती बाई म्हणाली, " निगा, निगा, समदी मुलं घिऊन जायचंय, सावकाशीनं जावा."

आम्ही रास्त्यावर आलो तसी वाहिनी वैतागल्या स्वरात मला म्हणाली, " काय तू त्या बाईशी गप्पा मारत होतीस? काहीतरीच!" मी वाहिनीला काही बोलले नाही पण मनात असंख्य विचार होते.

किती सहजपणे तिने आयुष्याशी समझोता केला होता. ती अशिक्षित होती म्हणून? कां तिच्यात जास्त लवचिकता होती?

कां नवऱ्याने सोडून दिले तर काय, एवढाच विचार प्रबळ ठरला असेल? 'व्दिभार्या प्रतिबंधक कायदा' वैगेरे हक्काच्या गोष्टी तिला समझत असतील? नवऱ्याच्या वाटणीचा विचार त्या दोघींनी कसा पचवला असेल?

'सुशिक्षित' समाजात अशा प्रसंगात काय झाले असते? काडीमोड, कोर्टकेस, दोषारोप, भरपाई आणि सगळे दोन्ही बाजूंना हवे तसे होऊनही दोन्ही बाजू दु:खी!

इथे दोघीजणी किती आनंदाने आपले आईपण भोगत होत्या. किती सुखाने संसार करत होत्या. समाधानाने आपले आयुष्य जगात होत्या.

पण मग आपण शिक्षण 'आयुष्य सुखसमाधानाने जावे' म्हणून घेतो नां? पण प्रत्यक्षात तसे चित्र दिसत नाही, असेकसे काय? का समजुतदारपणा, तडजोड, समाधानयाला 'अशिक्षित- सुशिक्षित'तेच्या मोजपट्टीचा वापर करता येत नसावा? काही चुकतेय कां? काय बरोबर आहे, तिची अशिक्षित तडजोड कां आपली सुशिक्षित हक्काची जाणीव?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छोट्यामोठ्या चोर्‍या करणारा एखादा माणुसही समाधानी दिसला तर काय आपण नोकरी सोडून चोरी करणार का? (शिक्षणानी असमाधान येतं असा निष्कर्ष काढून.)

प्रत्येकाच्या उचित आणि अनुचित याच्या कल्पना वेगळ्या असू शकतात. त्या बाईच्या मते नव-याने दुसरे लग्न करणे हे उचित होते म्हणून तिला तसा प्रश्न पडला नाही, पण शिक्षित स्त्रीला मात्र हे अनुचित वाटेल. अशावेळी अनुचित वाटणे आणि त्यामुळे दु:ख होणे स्वाभाविक आहे.

असो, पण तुमचा विचार आणि प्रश्न आवडला...

vaiju.jd,

एका बाईची एक खरी गोष्ट आहे. मित्राची मैत्रीण आहे. मी फक्त नाव ऐकलंय. भेटलो नाहीये तिला.

तर झालं असं की तिचा होता प्रेमविवाह. लग्नानंतर दोनेक वर्षांत रीतसर मूल झालं. एकमेव अपत्य, जे आता कॉलेजात आहे.

मित्राचं आणि तिचं ऑफिस जवळजवळ असल्याने दुपारी लंचला भेटंत असंत. त्यांचा जुना ग्रूप होता. त्याने एके दिवशी तिला ऑफिसात गाठलं. नंतर दोघे आणि अजून काही मित्र (मैत्रिणी नाहीत) सिनेमाला गेले. सिनेमा झाल्यावर तिला घरी सोडायला त्याच्या दोघे कारने निघाले. बोलताबोलता त्याने तिला विचारलं की तू इतकी बिनधास्त कशी. एकटी बाई असून खुशाल मित्रांसोबत येतेस.

ती म्हणाली की मी आयुष्य एन्जॉय करणार. नवरा आणि अपत्य त्यांचं त्यांचं लाईफ मस्तपैकी जगतात. यावर मित्राने पुन्हा छेडलं आणि गमतीत म्हणाला की नवऱ्याचं लफडं आहे का. तर ती हो म्हणाली. पुढे म्हणाली की आक्रस्ताळेपणा करून काही होणार नाहीये. मला जे स्वातंत्र्य मिळतंय ते कुठल्या बाईला मिळणार!

एक वेगळा दृष्टीकोन! स्वातंत्र्य मिळालं असलं तरी ती स्वैर नसावी बहुतेक.

आ.न.,
-गा.पै.