काय? वाटलं ना जरासं नवल? कसला खजिना? कसली कोडी? आणि ती सोडवायची कुणी? अहो! चिंटू आणि त्याच्या दोस्तकंपनीनं! कोडी सोडवली तर खरंच खजिना मिळेल का त्यांना? हे काय गौडबंगाल आहे? तर आता या प्रश्नांची उत्तरं.
१९मेला 'चिंटू - २' प्रदर्शित होत आहे. चिंटू आणि त्याची मित्रमंडळी समरकँपला गेली असताना त्यांना मिळते एका गुप्त खजिन्याविषयी माहिती! या माहितीचा ते कसा वापर करून घेतात, काय धाडस करतात, खजिन्यापर्यंत पोचतात का, या प्रश्नांची उत्तरं मात्र मिळतील थेट चित्रपटातच!
दर चित्रपटागणिक माध्यम प्रायोजक मायबोलीकरांसाठी नव्या स्पर्धा, नवे खेळ घेऊन येतात. कधी प्रश्नमंजुषा, कधी चित्रकोडी, तर कधी पत्त्यांच्या खेळाच्या आठवणी.. 'चिंटू - २'निमित्त आम्ही घेऊन आलो आहोत एस्टीवाय अर्थात मायबोली गणेशोत्सवात गाजलेलं 'स्पिन द यार्न'! गोष्टीची सुरुवात आम्ही देत आहोत. चित्रपटात जसे ते सर्व समरकँपला जातात, तसंच आम्हीही गोष्टीत त्यांना समरकँपला पाठवलं आहे. पुढे काय होणार?, चिंटू आणि कंपनी काय काय साहसं करणार?, हे ठरवायचं तुम्ही आणि गोष्ट पुढे न्यायची आहे. आहात ना तयार?
दुपारची वेळ होती. ऊन बरंच तापत होतं म्हणून पप्पूच्या घरीच सगळेजण जमले होते. चिंटू, राजू, बगळ्या.. पण मिनी अजून आली नव्हती. मघाशी चिंटू तिला हाक मारायला गेला तेव्हा 'दहा मिन्टात जेवून आलेच!' असं म्हटली होती ती. आता अर्ध्या तासाच्यावर होऊन गेला तरी तिचा पत्ता नव्हता. ती आली नव्हती म्हणून उनो खेळायला सुरुवातही करता येत नव्हती. तिच्याशिवाय खेळ सुरू केला असता तर आल्याआल्या तिने भांडायला सुरुवात केली असती. त्यामुळे कुणीच खेळ सुरू करायची हिंमत करत नव्हतं. वेळ घालवायला राजू रूबिक क्यूब फिरवत बसला होता. बराच वेळ फिरवाफिरवी करूनही क्यूबचा एकही पृष्ठभाग एकाच रंगाचा करणं त्याला जमत नव्हतं. बगळ्याला त्याला ते समजावून द्यायची जबरी उबळ येत होती, पण 'राजूचा गुद्दा किती लागतो' हे त्याला नीटच माहीत असल्याने तो गप्प बसून बघत होता. तेवढ्यात बाहेरचं फाटक वाजलं.
"ही मिनीच असणार.." चिंटू म्हणाला.
"चला बरं झालं! उनोचा कॅट काढतो मी.." म्हणत पप्पू उठत होता तेवढ्यात मिनी आत आलीच. तिच्या हातात कसलेसे छापील कागद होते.
"दहा मिन्टात जेवून येणार होतीस ना? किती उशीर केलास. आणि हे कागद कसले?" चिंटूने विचारलं.
"तुझ्या कविता कुणीतरी छापून दिल्या की काय?" पप्पूने विचारलं आणि दुसर्या सेकंदाला पाठीत बसलेल्या गुद्द्याने त्याला आपली चूक नीटच कळून आली. परंतु, त्यावेळेला मिनीला सगळ्या गँगला दुसरंच काहीतरी महत्त्वाचं सांगायचं होतं, म्हणून एका गुद्द्यावर पप्पूची सुटका झाली.
"हे माहितीपत्रक आहे. कोकणात मुरुड-हर्णै वगैरे भाग आहे की नाही? तिकडे एक काका आहेत काळे नावाचे. ते आपल्याएवढ्या मुलांसाठी समरकँप आयोजित करतात. समुद्रकिनारी रहायचं, डॉल्फिन पहायला नेतात, तिथे पाण्यात एक सुवर्णदुर्ग नावाचा किल्ला आहे तिथे नेतात, रोज मस्त खेळ, कोकणचा मेवा, खेरीज आकाशदर्शन... त्यांच्याकडे एक भारी दुर्बीणसुद्धा आहे. आपण सगळे जाऊयात का? आईबाबा मला पाठवायला तयार झालेत. पण तुम्ही सगळे नसाल तर काय मजा?"
सगळ्यांना समरकँपचं वर्णन भारीच आवडलं. अजून शाळा सुरू व्हायला तब्बल दीड महिना होता. इकडे रोज दुपारी भरपूरच ऊन असल्याने 'बाहेर जाऊ नका. घरातच बसून खेळा.' हे ऐकून सगळेच कंटाळले होते. जोशीकाकूंच्या आंब्याला यंदा मोहरही कमी होता. कैर्या दिसतच नव्हत्या झाडावर! सतीशदादाची कॉलेजची परीक्षा सुरू होती. तो कायम त्याच्या खिडकीत बसूनच अभ्यास करायचा आणि ही पोरं त्याच्या घरासमोर संध्याकाळी खेळायला गेली तरी 'आवाज करू नका रे.. माझी परीक्षा चालूये' असं दटावायचा. त्यामुळे समरकँपची आयडिया सगळ्यांनीच उचलून धरली. चिंटूचे बाबा, पप्पूचे बाबा सगळ्यांनी समरकँपबद्दल नीट माहिती घेतली काळेकाकांकडून! काळेकाका एकदम दिलखुलास स्वभावाचे गृहस्थ होते. त्यांचं मुरुड समुद्रकिनार्याजवळ मोठ्ठं घर होतं. त्यांनी काही वर्षांपूर्वी लष्करातून निवृत्ती घेतली होती. त्यांचं कुटुंब मुंबईत राहत असे. त्यांना मुलांची खूप आवड होती, म्हणून ते मुरुडातल्या घरी समरकँप आणि दिवाळीच्या सुट्टीतला छोटा कँप आयोजित करत असत.
ठरल्यादिवशी सगळी तयारी करून आपापलं सामान सांभाळत सगळी कंपनी छोट्या बसमध्ये चढली. सोनू लहान असल्याने त्याला यायला मिळालं नव्हतं. तो जरा नाराज होता. ड्रायव्हरजवळच्या सीटवर बसलेल्या काळेकाकांनी सगळ्या मुलांचं स्वागत केलं. मग शाळेतल्यासारखी हजेरीसुद्धा घेतली. आपापलं नाव घेतल्यावर हात वर करून 'हजर!' म्हणताना मुलांना फारच गंमत वाटत होती. बगळ्या तर शाळेतल्यासारखा 'प्रेझेंट सर' असं म्हणाला.
"इथे सर कोण आहेत बुवा?" काळेकाका गमतीने म्हणाले.
सगळ्यांची हजेरी झाल्यावर 'गणपतीबाप्पा मोरया!'च्या गजरात बस निघाली. सगळी मुलं हरखून बाहेर बघत होती. आसपास बसलेल्या नव्या मुलांशी ओळखी करून घेत होती. काळेकाकांनी मध्ये सगळ्यांना इडल्या खायला दिल्या. मग मुलांनी गाणी म्हटली, थोडी झोपही काढली.
बस मुरुडात शिरली तेव्हा रात्रीचे आठ वाजले होते. सगळीकडे मिट्ट काळोख होता, फक्त वस्ती होती तिथं उजेड दिसत होता. शहरात स्ट्रीट लाइटांनी उजळलेल्या रस्त्यांपेक्षा इथे फारच वेगळं दृश्य दिसत होतं. काकांच्या घरापाशी सगळे उतरले. घरात गेल्यावर पुन्हा एकदा हजेरी झाली. ड्रायव्हर अजून एका पोराच्या मदतीनं मुलांचं सामान आत आणून ठेवत होता.
"चला मुलांनो, हातपाय धुवून घ्या. इथल्या बाकी लोकांशी तुमची ओळख करून देतो. मग आपण जेवायला बसू. तसंच, दहा दिवसांसाठीच्या आवश्यक सूचनाही तुम्हांला द्यायच्या आहेत."
सगळी मुलं येऊन बसल्यावर काकांनी तिथल्या इतर लोकांशी मुलांची ओळख करून दिली. दहा दिवस स्वतः काळेकाका, स्वयंपाकाच्या मंगलाबाई, राधाबाई, मघाशी ड्रायव्हरबरोबर सामान आणणारा चंदू नावाचा मुलगा, केशव नावाचा अजून एक माणूस आणि काळेकाकांचा एक भाचा यश असे लोक मुलांबरोबर तिथे राहणार होते.
"सूचना नंबर एक - कुणीही एकेकटं कुठेही जायचं नाही. सूचना नंबर दोन - समुद्रावर खेळायला नेऊ तेव्हा मस्ती करायची नाही. सांगितलं तसंच करायचं. सूचना नंबर तीन - भांडाभांडी करायची नाही. सगळ्यांशी मिळून मिसळून राहायचं. कुणाशीही काही भांडण झालं तर ताबडतोब मला येऊन सांगायचं. ....आणि शेवटची सूचना - इथून डावीकडे पुढे जाऊन जो टोकाला बंगला आहे, तिकडे तर अजिबातच फिरकायचं नाही." काळेकाकांच्या सूचना देऊन संपल्या होत्या. मुलं आपापल्या नेमलेल्या खोल्यांमध्ये झोपायला गेली. समुद्राच्या लाटांचा आवाज आता स्पष्ट ऐकू येत होता.
"काय रे चिंटू, ते बंगल्याचं असं का म्हणाले असतील काळेकाका?" पप्पूचा प्रश्न आला तेव्हा चिंटू पेंगुळला होता.
"झोप आता... उद्या बघू." असं काहीतरी पुटपुटला तो!
***
एस्टीवाय रंगतदार व्हायला आपण काही संकेत पाळायचे आहेत.
१. भाग लिहायला सुरुवात करायच्या आधी बाफावर 'रुमाल' टाकून ठेवावा. म्हणजे तोवर दुसरे कुणी गोष्ट पुढे नेणार नाही. पण फार काळ रुमालाचे पोस्टात परिवर्तन न झाल्यास माध्यम प्रायोजक गोष्ट पुढे नेण्यासाठी इतरांना संधी देऊ शकतात.
२. 'हे सगळं स्वप्न होतं' वगैरे वापरून आधीच्या पोस्टांतल्या कथेचा ट्रॅक पूर्णपणे बदलून टाकणे टाळावे.
३. पात्रांची नावे, त्यांचे नातेसंबंध, आधीच्या पोस्टांतून नवीन आलेली पात्रे यांचा ताळमेळ राखावा.