तुझ्यापाशीच येतो तू कितीही दूर केल्यावर
तसा विश्वासही नाही तुझ्याव्यतिरिक्त कोणावर
कधी निष्पर्ण माळावर कुठुन नकळत झुळुक यावी
तसे आपण अचानक भेटलो ओसाड जगल्यावर
मनाच्या कागदावरती तुझे अस्तित्व जपलेले
तसे राहील का कायम तिथे अक्षर उमटल्यावर?
तुझ्या हसण्यातुनी बरसे मुका पाऊस ओढीने
तरी अतृप्त ओंजळ मी, तृषाही पूर्ण शमल्यावर
अचानक पावले निघती नव्या कुठल्या उमेदीने?
तुझ्यामाझ्या प्रवासाचे पहाटे स्वप्न पडल्यावर!
किती सोसेल ही माती? तिचाही जीव इवलासा!
कुणाशी मोकळे व्हावे तिने आभाळ रुसल्यावर?
बरसण्याची तुझ्या आहे प्रतीक्षा या धरेलाही
सरी येणार केव्हा? तू रित्या मेघांत रमल्यावर!
खुळे आभास जपण्याची कधी थांबेल ही धडपड?
पुन्हा येती मला ऐकू, तुझे आवाज विरल्यावर
कुणासाठी? जगासाठी? तुझ्यासाठी? स्वतःसाठी!! -
तुझा हमखास होतो स्पर्श, कायम ओळ लिहिल्यावर!
उन्हाच्या आडवाटेवर तुला चोरून बघणारे
खुळे हे रान ओशाळे, धुके अलगद सरकल्यावर
जरा रेंगाळूया येथे, ठसे सोडून जाऊया
कधी होणार अपुली भेट या गर्दीत शिरल्यावर?
तुझ्यामाझ्यातले नाते फुलाया लागले आहे
हवेपासूनही लपवूच, ते बहरून आल्यावर!
- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2013/03/blog-post_11.html)
(संपूर्ण गझल ब्लॉगवर आहे. इथे निवडक दिले आहेत)
आवडली मस्तच
आवडली
मस्तच
वा! खूपच सहज गझल. अनेक खयाल
वा! खूपच सहज गझल. अनेक खयाल वेगळे आहेत, छान मांडले आहेत.
हरेक शेर वाचल्यावर पुढचा कसा असेल याची उत्सुकता चाळवत होती. केवढी लांबलचक गझल!! असे वाटले नाही
पुलेशु!
कधी निष्पर्ण माळावर कुठुन
कधी निष्पर्ण माळावर कुठुन नकळत झुळुक यावी
तसे आपण अचानक भेटलो ओसाड जगल्यावर.............वा !!
किती सोसेल ही माती? तिचाही जीव इवलासा!
कुणाशी मोकळे व्हावे तिने आभाळ रुसल्यावर?.... बढिया..
कुणासाठी? जगासाठी? तुझ्यासाठी? स्वतःसाठी!! -
तुझा हमखास होतो स्पर्श, कायम ओळ लिहिल्यावर!
तुझ्यामाझ्यातले नाते फुलाया लागले आहे
हवेपासूनही लपवूच, ते बहरून आल्यावर!
क्या बात है!!!!
आवडली गझल.... इन अ क्लास ऑफ नचिकेत्स ओन.
तुझ्यामाझ्यातले नाते फुलाया
तुझ्यामाझ्यातले नाते फुलाया लागले आहे
हवेपासूनही लपवूच, ते बहरून आल्यावर!>>> आवडेश
छान!
छान!
हट्ट या शब्दात बदल करावा
हट्ट या शब्दात बदल करावा लागेल वृत्तासाठी
'कधी हा हट्ट थांबावा' इत्यादी इत्यादी
संपूर्ण गझल छान आणि एकदम
संपूर्ण गझल छान आणि एकदम फ्रेश वाटली
व्वाह!!!
<<<मनाच्या कागदावरती तुझे अस्तित्व जपलेले
तसे राहील का कायम तिथे अक्षर उमटल्यावर?
तुझ्या हसण्यातुनी बरसे मुका पाऊस ओढीने
तरी अतृप्त ओंजळ मी, तृषाही पूर्ण शमल्यावर>>> छान वाटले
<<<किती सोसेल ही माती? तिचाही जीव इवलासा!
कुणाशी मोकळे व्हावे तिने आभाळ रुसल्यावर?>>> मला हा शेर खूsssssप आवडला
<<<जरा रेंगाळूया येथे, ठसे सोडून जाऊया
कधी होणार अपुली भेट या गर्दीत शिरल्यावर?>>> हाही
फक्त,
<<<ओसाड जगल्यावर>>> ही कन्सेप्ट नाही समजली. म्हणजे, आतापर्यंत जीवन भकास होतं, आणि तुझी भेट होणं हे, निष्पर्ण माळावर आलेल्या झुळुकेसारखं आहे हा लाक्षणिक अर्थ झाला, पण माळच ओसाड असतं, निष्पर्ण झाड असतं. अशावेळी, त्याला निष्पर्ण म्हणणे आणि जीवनाला ओसाड म्हणणे हे थोडसं सुसंगत वाटत नाहीये... चुभूदेघे
तुझ्या हसण्यातुनी बरसे मुका
तुझ्या हसण्यातुनी बरसे मुका पाऊस ओढीने
तरी अतृप्त ओंजळ मी, तृषाही पूर्ण शमल्यावर
किती सोसेल ही माती? तिचाही जीव इवलासा!
कुणाशी मोकळे व्हावे तिने आभाळ रुसल्यावर?
व्व्व्वा !
तुझ्यामाझ्यातले नाते
हा मिसरा सहजतेमुळे आवडला.
हट्टबद्दल वर आले आहेच.
आभाळ रुसल्यावर नंतरच्या शेरात जवळजवळ तोच खयाल पुनरूक्त झाल्यासारखा वाटला. वै म.
बाकी गझल प्रचंड आवडली.
मतला वगळता गझल आवडली नाही.
मतला वगळता गझल आवडली नाही.
तुझ्यापाशीच येतो तू कितीही
तुझ्यापाशीच येतो तू कितीही दूर केल्यावर
तसा विश्वासही नाही तुझ्याव्यतिरिक्त कोणावर......खल्ल्लास मतला !
अचानक पावले निघती नव्या कुठल्या उमेदीने?....मस्त मिसरा
किती सोसेल ही माती? तिचाही जीव इवलासा!
कुणाशी मोकळे व्हावे तिने आभाळ रुसल्यावर?....वाह वा वा !!!
तुझा हमखास होतो स्पर्श, कायम ओळ लिहिल्यावर!...व्व्वा !
अनेकानेक सुंदर प्रतिमा
अनेकानेक सुंदर प्रतिमा रेंगाळत रहातात ही गझल वाचल्यावर.
सगळीच गजल
सगळीच गजल अप्रतिम.....
कुणासाठी? जगासाठी? तुझ्यासाठी? स्वतःसाठी!! -
तुझा हमखास होतो स्पर्श, कायम ओळ लिहिल्यावर! >>>>> हे अतिशय म्हणजे फारच आवडले रे....
अजून एक सुंदर गझल
अजून एक सुंदर गझल नचिकेत!!
मला गझलतंत्रातले अ ब ही बिल्कुलच कळत नाही पण ही अभिव्यक्ती आवडलीय.
शेवटचे तीन शेर अफाट आवडले!
उन्हाच्या आडवाटेवर तुला चोरून बघणारे
खुळे हे रान ओशाळे, धुके अलगद सरकल्यावर >> केवढी अलवार कल्पना! मस्त!
जरा रेंगाळूया येथे, ठसे सोडून जाऊया
कधी होणार अपुली भेट या गर्दीत शिरल्यावर? >> सुंदर आशय
तुझ्यामाझ्यातले नाते फुलाया लागले आहे
हवेपासूनही लपवूच, ते बहरून आल्यावर! >> कित्ती छान!
लिहित रहा रे!
अचानक पावले निघती नव्या
अचानक पावले निघती नव्या कुठल्या उमेदीने?
तुझ्यामाझ्या प्रवासाचे पहाटे स्वप्न पडल्यावर!
जरा रेंगाळूया येथे, ठसे सोडून जाऊया
कधी होणार अपुली भेट या गर्दीत शिरल्यावर?
हे शेर सर्वात आवडले.
सर्वांना धन्यवाद! पौर्णिमा,
सर्वांना धन्यवाद!
पौर्णिमा, विशेष धन्स!
बेफिकीर, बदल केला आहे.
हर्षल,
सुंदर!
सुंदर!
अप्रतिम्..............खूप खूप
अप्रतिम्..............खूप खूप आवडली.......
नचिकेत, मस्तं झालीये संपूर्ण
नचिकेत, मस्तं झालीये संपूर्ण गज़ल.. अनेकानेक शेर आवडलेत.
अभिनंदन आणि शुभेच्छा
तुझ्यापाशीच येतो तू कितीही
तुझ्यापाशीच येतो तू कितीही दूर केल्यावर
तसा विश्वासही नाही तुझ्याव्यतिरिक्त कोणावर
चांगला मतला!
अफाट, अचाट... भन्नाट!! खूप
अफाट, अचाट... भन्नाट!!
खूप सुंदर गझल.
खूप वेळा वाचली. प्रत्येकवेळा तितकीच आवडली.
तुझ्यामाझ्यातले नाते फुलाया
तुझ्यामाझ्यातले नाते फुलाया लागले आहे
हवेपासूनही लपवूच, ते बहरून आल्यावर!<< आवडले.
तुझ्यापाशीच येतो तू कितीही
तुझ्यापाशीच येतो तू कितीही दूर केल्यावर
तसा विश्वासही नाही तुझ्याव्यतिरिक्त कोणावर
व्वा.
मनाच्या कागदावरती तुझे अस्तित्व जपलेले
तसे राहील का कायम तिथे अक्षर उमटल्यावर?
दुसरी ओळ अधिक भावली. एक विचार आला की मुळातच अक्षर म्हणजे न मिटवता येणारे.
त्याच्या अस्तित्वाविषयी शंका उपस्थित करणे भावले. तुकारामाच्या कवितेत ही अनुभूती वारंवार येते.
तुझ्यामाझ्यातले नाते फुलाया लागले आहे
हवेपासूनही लपवूच, ते बहरून आल्यावर!
हा शेरही आवडला.
सर्वांचे आभार! समीर, तुकाराम
सर्वांचे आभार!
समीर, तुकाराम म्हणजे फारच वरची पायरी झाली माझ्यासाठी..
आभाळ रुसल्यावर नंतरच्या शेरात जवळजवळ तोच खयाल पुनरूक्त झाल्यासारखा वाटला. वै म.
धन्यवाद!
>> राजीव, मागच्या प्रतिसादात लिहायला विसरलो. ते दोन्ही शेर अतिशय वेगळ्या परिस्थितीबद्दल सुचले होते, एवढं मला नक्की आठवतंय..
सुरेख !
सुरेख !
मतला आणि आभाळ हे शेर फार
मतला आणि आभाळ हे शेर फार आवडले!!
सुंदर गझल. आवडली.
सुंदर गझल. आवडली.
धन्यवाद
धन्यवाद