धूमकेतु - मृत्यूघन्टा की जीवनदाता ?

Submitted by kaushiknagarkar on 10 March, 2013 - 23:53

हॅलो ...

अरे एक प्रश्न आहे. 'मी' बोलतोय.

बोल ना. 'मी' बोलतोय ते लगेच समजलं मला. काय हवय?

कॉमेट. कॉमेट बद्दल विचारायच आहे.

कसली कॉमेंट? कुणी केली?

कॉमेंट नाहीरे. बहिरा झालास की काय? कॉमेट म्हणालो मी? ते आकाशात असतात ते. कॉ मे ट.

हो, हो. समजलं. ओरडू नकोस, फक्त स्पष्ट बोल. काय विचारतोयस?

कॉमेटला मराठीत काय म्हणतात?

धूमकेतु म्हणतात. शेंडेनक्षत्र असं सुध्दा म्हणतात.

म्हणतात ना? म्हणतात ना? काय म्हणालो मी. जिंकलो की नाही? हा हा हा.

अरे मित्रा, काय म्हणालास? काय जिंकलास?

अरे, विशेष काही नाही. पैज लागली होती. ती जिंकलो. मी सांगत होतो त्यांना की शेंडेफळ म्हणतात म्हणून. आता एक चहा फुकाट.

शेंडेफळ नाही, शेंडेनक्षत्र. पण जाउदे. क्लोज इनफ.

येनकेन प्रकारेण चहा मिळाल्याशी कारण. काय? बरं आणखी एक प्रश्न आहे. हे धूमकेतु म्हणजे काय असतं रे नक्की?

अरे बापरे. हा प्रश्न पहिल्या इतका सोपा नाही उत्तर द्यायला. मला आता एक मीटींगपण आहे. आपण संध्याकाळी बोलुया का?

ठीक आहे. संध्याकाळी नक्की?

हो. नक्की. का रे? अजुन एक पैज लागली अाहे वाटतं?

नाही. पैज नाही, निर्भेळ उत्सुकता. चल पळ अाता. मिटींग अाहे ना तुला? बाय.

बाय.

---

हॅलो

हं मी बोलतोय.

हो. मी ऐकतोय.

संध्याकाळी फोन कर म्हटला होतास.

होय. धूमकेतु म्हणजे पाणी, इतर काही वायू, मेथेनसारखे आणि थोडीफार धूळ, खडे आणि दगडगोटे यांच्या मिश्रणातून बनलेला एक बर्फाळ थंडगार गोळा असतो. आकारानेही ओबडधोबडच असतो जरा. झालं.

झालं? संध्याकाळी फोन करायला लावून हे एवढच उत्तर? हे तर दुपारीच नसतं का सांगता आलं?

असतं. पण मग तू प्रश्न विचारले असतेस आणि ते वाढत गेलं असतं.

अच्छा, मग मी प्रश्न विचारायला हवेत तर एकंदर. पण मित्रा हे धूमकेतु प्रकरण इतकं अनोळखी आहे की प्रश्न काय विचारायाचे हे तरी कळलं पाहिजे ना? शाळेत असताना जे शिकलो ते तेथेच सोडून आलो. आठवतायत ती फक्त चित्रं. भुईनळ्यासारख्या दिसणार्‍या धूमकेतुंची. हां एक 'इकेयासेकी' अस नाव आठवलं बघ. कोण होता रे तो?

अरे वा. इकेया-सेकी आठवतोय तुला? तो गाजलेला कॉमेट होता. आपण शाळेत असताना नुकताच येऊन गेला होता तो.

असेल. मला एवढं माहितीयं की तेव्हा या इकेयासेकीला जाम टरकून असायचो मी. रात्री झोपेत असताना तो घात करणार आणि जग नष्ट होणार अशी भिती असायची मला.

अरेरे. बिच्चारा. इतकी वर्ष धास्तीत घालवलीस? तो इकेया-सेकी तेंव्हाच फुटून त्याचे तुकडे झाले होते.

ए ते मी आपलं शाळेत असतानाचं सांगितलं. म्हणजे मी काय भिऊन राहात नव्हतो इतके दिवस. कायतरीच काय? पण तो इकेयासेकी फुटून गेला ते एक बरं झालं.

इतकं मनावर घेऊ नको रे. धूमकेतुला घाबरायचं, त्याला अशुभ मानायच ही तर साऱ्याजगभरची पुराणी परंपरा आहे. धूमकेतू आला म्हणजे आता काहितरी उलथापालथ होणार, राजवट बदलणार, क्रांती होणार, दुष्काळ पडणार, रोगराई येणार अशा समजुती सार्वत्रिक होत्या. धूमकेतू राजाला वाईट असा ठाम विश्वास सर्वत्र होता. आणि साहजिकच आहे ते. काहितरी अनपेक्षित, अनाकलनीय, अद्भुत आणि अविस्मरणीय असं दिसलं, की तिथे काहितरी अतर्क्य, अलौकिक शक्ती असणार असं आपण मानतो, भितो, नतमस्तक होतो आणि त्या शक्तीला घाबरुन राहातो. आता धूमकेतु पाहिला तर या सगळ्या कसोट्यांना उतरतो. तो आकाशात अचानकपणे अवतीर्ण होतो. 'धूमकेतुसारखा तो उगवला' असा वाक्प्रचार आहेच आपल्याकडे. जितक्या अचानकपणे येतो तसेच त्याचे तेजही झपाट्याने वाढत जाते. पाहाता पाहाता काही धूमकेतु शुक्रापेक्षा, इतकच काय चंद्रापेक्षाही तेजस्वी बनतात, दिवसा देखिल तळपू लागतात. आकाशातल्या दुसर्‍या कोणत्याही गोलापेक्षा (object) ते अत्यंत वेगाने सुर्याकडे धाव घेतात. त्याकाळी, किंबहुना गेल्या पन्नास वर्षापूर्वीपर्यंत, आकाशात विमाने, सॅटेलाईटस्, रॉकेटस् वगैरे काही काही नसे हे लक्षात घे. आणि सर्वावर कळस म्हणून त्याला लांबच लांब तलवारीसारखी शेपटी फुटते, कधी कधी अर्धे आकाश व्यापुन टाकेल एवढी. इकेया-सेकी तसाच ग्रेट कॉमेट होता. त्यानंतर एवढा चमकदार धूमकेतु अलिकडच्या काळात आलेला नाही. अाणि सगळ्याच समजुती पूर्णपणे चुकीच्या अाहेत असं ठामपणे म्हणता येत नााही.

काय सांगतोयस काय? म्हणजे धूमकेतु अरिष्ट अाणतात हे म्हणणं खरयं?

असं म्हणालो का मी? माझ्या म्हणण्याचा मतितार्थ असा की, धूमकेतु अाकाशात अााला अाणि त्याचवेळी पृथ्वीवर काहीतरी वाईट घडामोडी घडल्या असं अनेकदा झालेलं अाहे. पुराणकालापासून तशा नोंदी अापल्याकडे, चीनमधे, ग्रीसमधे केलेल्या अाढळतात. त्यातल्या राजकीय उलथापालथी या 'सायकॉलॉजिकल फॅक्टर्स' मुळे होतात अस मानलं - म्हणजे पहा, 'धूमकेतु राजाला अनिष्ट' हा पूर्वग्रह जिच्या मनात घर करून बसलेला अाहे, अशी सेना अालेल्या परचक्राला पराभूत भावनेनेच सामोरी गेली तर नवल नाही ना? तसं पाहिलं तर अालेला धूमकेतु दोन्ही राजांना अनिष्ट ठरायला नको का? - तर हे सायकॉलॉजिकल फॅक्टर्स दूर ठेवले तरी, धूमकेतुंचे अागमन अाणि त्याचवेळी झालेले पर्यावरणातले बदल यांचे; म्हणजे अतिवृष्टी, अनवृष्टी, धरणीकंप, रोगराई अशा घटनांचे; स्पष्टीकरण; 'निव्वळ योगायोग (coincidence) एवढेच' असे असू शकत नाही. त्यापेक्षा भक्कम असे हवे, असे मला म्हणायचे होते.

हं. विचार करणीय अाहे तुझं म्हणणं; पण कळणीयं नाही फारसं. ते जाऊदे सध्यातरी. पण तू ज्या कसोट्या सांगितल्यास धूमकेतुच्या, तेच माझे प्रश्न अाहेत असं माझ्या लक्षात अालं तू बोलत असताना. अाणि मग पुढचं मी फार नीटपणे ऐकलचं नाही.

म्हणजे, कामावर मिटींगमधे जे करतोस तेच. मग अाता मी सुध्दा मिटींगमधे असल्याप्रमाणेच वागून तुला सांगणार अाहे की 'स्पेसि्िफक' प्रश्न विचार. जरी मला माहिती असलं तुला काय विचारायचं अाहे ते, तरी.

असं का गुरूजी? ठिकाय. विचारतो. '.. असे म्हणून तो विचारता झाला - हे महामती, धूमकेतुबद्दल अापण जे सांगितलेत त्याने माझी उत्कंठा अधिकच वाढली अाहे. हे धूमकेतु कोण असतात? त्यांचे स्वरूप काय? त्यांचे प्रकार कोणते? ते कोठून येतात? कोठे जातात? त्यांच्या तेजाचे कारण काय? त्यांना खड.गाप्रमाणे रूद्रभयंकरअशी शेंडी का फुटते? अाणि सर्वात महत्वाचे म्हणजे, हे धूम्रध्यानी, असा धूमकेतु मला - दूरूनच - पहायला कधी मिळेल? अशा प्रकारच्या नानाविध प्रश्नांनी त्रस्त असा मी ज्ञानपिपासेने व्याकुळ झालो अाहे. ही तृष्णा शांत करेल असा या त्रिभुवनात कोण अाहे अापल्याशिवाय (गुगल अाणि विकिपिडिया सोडल्यास)? तर हे धूम्रकर्ता, अापण अापल्या ज्ञानाची वृष्टि करून माझी ही तहान लवकरात लवकर भागवावी - अशी विनंती करून नंतर तो अधोमुख होत्साता त्या फोनरूपी गुरुमुखाचे अवलोकन करू लागला ..' हे एवढं पुरे? की अजून पाहिजे?

हे मूढमती, तुझ्या नम्रतेने मी प्रसन्न झालो अाहे. पूर्वसंचितामुळे जरी तू रिक्तमस्तक असलास (तुझे अाई-वडील नॉर्मल वाटतात, तेव्हा हे जेनेटिक नसणार) तरी तुझ्या अल्पमतीला पेलेल अशातऱ्हेने मी तुला हे धूम्रज्ञान देतो. ते तू एकाग्र चित्ताने ग्रहण कर. जर तू यात कर्तव्यदक्ष राहिला नाहीस तर, इकेयासेकी नावाचा तो घोर धूमकेतु परत तुझ्या राशीला लागेल. तुझ्या …

पुरे. पुरे. मुद्याचं बोला. वायफट बडबड पुरे. रिक्तमस्तक काय? प्रत्यक्ष भेट म्हणजे मग माझ्या हस्तकाची तुझ्या मस्तकाशी भेट घडवून धूम्रकर्ण बनवतो तुला.

Ok. लाईटस् कॅमेरा अॅक्शन ..

Ok.

हे बघ धूमकेतु दोन प्रकारचे असतात. शॉर्ट-टर्म अाणि लॉंग-टर्म. शॉर्ट-टर्म जे असतात, त्यांचा सूर्याभोवतीचा भ्रमणकाल सुमारे दोन ते दोनशे वर्षांचा असतो, ते कायपर पट्ट्यातून (Kuiper Belt) येतात. लॉंग-टर्म धूमकेतु ऊर्ट क्लाउडमधून (Oort Cloud) अालेले असतात. त्यांचा भ्रमणकाल दोनशे ते दोनहजार वर्षांचा किंवा त्याहूनही अधिक असतो. काही काही तर फक्त एकदाच सूर्याला धावती भेट देउन जातात. हे बर्फाचे गोळे (dirtballs) अॅस्टेरॉईडस् प्रमाणे अखंड पाषाणाचे नसतात, उलट भुसभुशीत अाणि ठिसूळ असतात. साधारणपणे पंधरा ते पंचवीस किलोमीटर लांबी-रूंदीचे, पण अनियमीत अाकाराचे (not spherical) हे छोटे गोळे सूर्याजवळ अाले की एकदम प्रकाशमान होतात अाणि पृथ्वीवरून दिसू लागतात.

आता हा कायपर बेल्ट आणि ऊर्ट क्लाउड हा काय प्रकार आहे हा प्रश्न ओघानेच आला. त्यासाठी आपल्याला सूर्यमालेशी नव्याने ओळख करून घ्यायला हवी. सूर्यमाला किंवा सूर्यमंडळ हे फक्त सूर्य आणि अष्टग्रह इतपतच मर्यादित नाही. गेल्या काही दशकात आपले लक्ष परत आपल्या नजिकच्या अवकाशाकडे वळले आणि अनेक नवनवीन शोध लागले. आपल्या घरातल्याच वस्तु आपल्याला नव्याने सापडतात तसे. त्यातला एक म्हणजे प्लुटोचा शोध आणि कालांतराने त्याचे लघुग्रह असे झालेले वर्गीकरण. * दुसरा, प्लुटोच्या 'डिमोशन'ला कारणीभूत ठरलेला शोध कायपर बेल्ट्चा. जेरार्ड कायपर* या खगोलतज्ञाने असे १९५० च्या दशकात असे भाकित वर्तवले की सूर्यमालेची निर्मिती होत असताना उद्भवतलेले दगडगोटे आणि पाषाण (planetesimals) सूर्यापासून दूर अंतरावर जमा होउन सुर्याभोवती फिरत असले पाहिजेत. हे सारे अर्थातच भौतिकशास्त्राचे नियम आणि गणिती आकडेमोड या आधाराने केलेले भाकित होते. या वस्तुंच्या कक्षांची मर्यादा तीस ते पनास ए. यू. (३० - ५० अ उ) अशी वर्तविली गेली. एक अ.उ. म्हणजे पृथ्वीचे सूर्यापासुनचे सरासरी अंतर (अव्ग दिस्त).* नेपच्यूनची कक्षा अाहे ३० ए.यू. या पट्ट्यातल्या ग्रहखंडांचा अाकार साधारणपणे ५० ते १००० किलोमीटर एवढा. गुरू अाणि मंगळ यांच्यामधे जो अॅस्टेरॉईड बेल्ट अाहे ितथेही असेचह ग्रहखंड अाहेत. मात्र अॅस्टेरॉईडस् मुख्यत्वे पाषाणाच्या अाणि धातुच्या (metal) असतात, याउलट केबीओ (कायपर बेल्ट ऑबजेक्टस् ) मधे गोठलेले पाणी आणि वायु (ices) यांचा अंश जास्त असतो. १९३० साली प्लुटो सापडला तेंव्हा कायपर बेल्टची कल्पनाच नव्हती. मात्र त्याच्या कक्षेचा विचित्रपणा लवकरच लक्षात अालेला होता. पुढे १९९२ मधे या कायपर बेल्ट मधले ऑबजेक्टस् सापडू लागले. एरिस (Eris) हा सुमारे २६०० किलोमीटर व्यासाचा केबीओ सापडला (२००५ साली) तेव्हा पासून लघुग्रह ही नवी वर्गवारी निर्माण करून त्यात प्लुटोसह पाच लघुग्रह अाजमितीस समाविष्ट केले अाहेत. नेपच्यून हा मधूनमधून या पट्ट्यातला एखादा ऑब्जेक्ट खेचून काढतो अाणि गुरूत्वाकर्षणाचा खेळ होऊन तो केबीअो बिचारा लंबवर्तुळाकार कक्षेत फिरायला लागून त्याचा शॉर्ट-टर्म धूमकेतु बनतो. अशी सर्वसाधारण थियरी अाहे.

बस का? म्हणजे हे नक्की नाहीच का?

बरचसं नक्की पण तुला माहितीच अाहे, 'शास्त्र चालले पुढे'. नवीन शोध लागले की काही अाधीचे समज, चुकीचे ठरून बाद होणार. बरं, अजून लॉंग-टर्म धूमकेतुबद्दल बोलायच राहूनच गेलयं पण अाज इथेच थांबूया का?

अगदी नक्की. मी वाटच पाहात होतो कधी थांबूया म्हणतोस त्याची. पण मग कधी?

उद्या चालेल? याचवेळी?

होय. उद्या फोन करतो. गुड नाइट.

(अपूर्ण …)

हॅलो?

लॉंग-टर्म धूमकेतु ऊर्ट क्लाउडमधून येतात बरका. हा ऊर्ट क्लाउड कायपर बेल्टच्या पार पल्याड अाहे.

बरं. बरं. अाज सूर्य पश्चिमेला उगवलेला दिसतो. जेवून करणारच होतो मी फोन तुला. पण चालू दे. मी ऐकतोय.

जेवून घेउन नंतर करतोस का?

नाही. नाही. जेवायची तशी घाई नाहीये. उगाच काहितरी कारण उपटून फोन राहून जायला नको. हे चालू दे. हा ऊर्ट कोण त्याची अाता उत्सुकता लागलीय.

ठीक अाहे. तर मी काय सांगत होतो की हा ऊर्टचा ढग, ढग हा शब्द तसा अयोग्य वाटतो. कवच. कवच हा शब्द कदाचित अधिक अर्थपूर्ण होईल. पण ते जाऊ दे. अापण क्लाउडच म्हणूया सोयीसाठी. चालेल ना?

काहिही म्हण रे. क्लाउड म्हण. कवच म्हण. मला काय फरक पडत नाही. अाधी सांगतर त्याच्याबद्दल.

अरेच्चा, खरच की. सॉरी. हं तर हा ऊर्ट क्लाउड फार दूर तीस ते पन्नास हजार ए. यू. इतक्या अंतरावर अाहे. म्हणजे सू्र्यमालेली ही वेसच अाहे म्हण ना. यापुढे सुरू होते खरे अवकाश (स्पेस). सूर्याचा सर्वात जवळचा तारा अाहे मित्र (नरतुरंग, Alpha Centauri). अंतर ४ प्रकाशवर्षे. ऊर्ट क्लाउड अर्ध्यारस्त्यात अाहे म्हणेनास.

फँटॅस्टिक. पुढे?

ऊर्ट क्लाउड मधे लक्षावधी, नव्हे कोट्यावधी छोटे गोल अाहेत. गोठलेले पाणी, अाणी मेथेन, अमोनियासारखे वायु यापासून बनलेले. थोडी धूळ अाणि कचरा शोभेसाठी. डर्टी अाईसबॉल असं त्याचं चपखल वर्णन केलेलं अाहे इंग्रजीत. अाणि हा ऊर्ट क्लाउड कायपर पट्ट्याप्रमाणे थाळीसारखा वर्तुळाकार नसून चेंडू प्रमाणे गोलाकार अाहे.

हे काही समजलं नाही बुवा. हि थाळी अाणि चेंडू कुठून अाले मधेच?

असं म्हणतोस? ठीक अाहे. अापण दुसऱ्या मार्गाने जाऊ. मला सांग, सूर्यमाला म्हटल्यावर तुझ्या डोळ्यासमोर काय चित्र उभं राहातं?

अम्. म्हणजे एक सूर्य अाहे मधे आणि त्याच्याभोवती ग्रह फिरतायत. सगळ्यात अात बुध,मग शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस मग नेपच्यून अाणि प.. प्लुटो?

हो अगदी बरोबर. प्लुटो ग्रह नसला तरी, तो अाहे तिथेच अाहे. बर अजून काही?

हो. प्रत्येक ग्रहाचा उपग्रह, किंवा अनेक उपग्रह त्या त्या ग्रहाभोवती फिरतायत. अाणि हो कायपर बेल्ट अाहे कुठेतरी तिथेच. अाणि अॅस्टेरॉइडस्, त्यापण असतात इकडेतिकडे.

अाता गडबड व्हायला लागली ना? तीच दूर करायचा प्रयत्न करत होतो. असं कर, एक संत्र घे. म्हणजे मनातल्या मनात. हा समज सूर्य अाहे. अाता तो कापून अर्धा कर. केलास?अाता अशी कल्पना कर की एक भलंामोठा कागद अाहे. त्या कागदावर तो अर्धा कापलेला संत्रसूर्य ठेव. रस गळेल. गळू दे. कल्पनेतलाच अाहे. अाता त्या सूर्याभोवती तू सांगितल्या क्रमाने ग्रह फिरत अाहेत अापापली पिलावळ घेऊन. मात्र या ग्रहांमधले अंतर वाढते अाहे अाणि मंगळ व गुरू यांच्यामधे बरेच जास्त अंतर अाहे. तिथे अाहे अॅस्टेरॉईड बेल्ट. कायपर बेल्ट अाहे सर्वात बाहेर, म्हणजे नेपच्यूनच्या कक्षेबाहेर. प्लुटोच्याही पलिकडे. अाणि हे सारे एकाच पातळीत (plane). या साऱ्या कक्षा सूर्याच्या विषुववृत्ताच्या पातळीत अाहेत. त्या कागदाची जेवढी जाडी अाहे त्याबाहेर कोणत्याही गोलाची कक्षा नाही, अगदी प्लुटोचीसुध्दा. हे सारे रेसच्या मोटारी फिरतात तसे गरागरा फिरत अाहेत सूर्याभोवती. हे चित्र डोळ्यापुढे अालं? ok मग अाता या सगळ्या पसाऱ्याच्या बाहेर, खूप खूप बाहेर सर्वबाजुनी वेढून गोल गोल फिरणारं एक मधमाशांच मोहोळ अाहे अशी कल्पना कर. ते मोहोळ म्हणजे ऊर्ट क्लाउड अाणि त्या मोहोळातली प्रत्येक मधमाशी म्हणजे तो बर्फाचा गोळा उर्फ भावी धूमकेतु.

वा. म्हणजे अगदी मधमाशाी प्रमाणेच सूर्याला डंख मारायला धावतात ना ते? पण कसे? नेपच्य़ून तर फार दूरवर राहिला.

हं. धावून येतात मधमाशीसारखे पण सूर्याजवळ पोचल्यावर पतंगासारखे जळून जातात किंवा कापरासारखा उडून जातात, हे अधिक योग्य वर्णन होइल. पण ते तिथे काय करतायत अाणि त्यातले काहीच गोळे अातल्या सूर्यप्रणालीत (inner solar system) का येतात यासंबंधी थियरी पेश केली ऊर्टने (Jan Hendrik Oort). त्याने असा प्रस्ताव मांडला की सूर्य अाणि ग्रह निर्माण होत असताना तयार झालेला कचरा (debris) हे गुरू, शनी अादी महाकाय बाह्यग्रहांच्या गुरूत्वाकर्षणामुळे दूरवर फेकले जाऊन सूर्यप्रणालीच्या सुदूर प्रदेशात (outer reaches) जमाहोऊन फिरत राहिलेत. सूर्याचे अाकर्षण कितीही दुर्बल असले तरी त्याहून बलवान असे दुसरी शक्ति नसल्यामुळे. अधुनमधून, म्हणजे दहाहजार, किंवा लक्ष वर्षातून एकदा जवळून जाणारा एखादा तारा, नाहीतर अाकाशगंगेत झालेला एखाद्या सुपरनोव्हाचा धक्का बसून एखाद्या गोळ्याची कक्षा थोडी बदलून तो अातल्या सूर्यप्रणाली कडे प्रवास सुरू करतो.

हॅ. हे काही पटत नाही बुवा.

अरे अजून तरी ही नुसती थियरी अाहे. हा प्रदेश इतका दूर अाहे अाणि हे गोळे इतके लहान की त्यांचे प्रत्यक्ष दर्शन शक्यच नाही सध्यातरी. परंतु जे धूमकेतु सूर्याजवळ पोहोचून दृष्यमान होतात त्यांच्या भ्रमणमार्गाचा अभ्यासकरून असा निष्कर्ष निघतो की हे दूरअंतरावरून अालेले प्रवासी अाहेत. अापल्या लोकल अॅस्टेरॉईड बेल्टमधून अालेले नाहीत. थियरी चुकीची निघाली तर दुसरं काही तरी स्पष्टीकरण शोधावं लागेल. सूर्य जेंव्हा जन्मला तो एका तारकासमूहात (star cluster). तारे सहसा एकटे दुकटे जन्मत नाहीत, माणसांसारखे. कुत्र्यांची असते तशी पिलावळ जन्मते एकाच वेळेस. तर या सहोदर ताऱ्यांच्या खेचाखेचीचा परिणाम म्हणजे ऊर्ट क्लाउड अशी देखील एक थियरी अाहे. जे काही सत्य असेल ते हळूहळू स्पष्ट होत जाईलच.

ठीक अाहे. तू म्हणतोस तर जाउ देतो सध्या. पण परत असं करू नकोस.

तर असा धूमकेतु, कोणताही धूमकेतु जेंव्हा सूर्याच्या फार निकट जातो (त्याच्या लंबवर्तुळाकार कक्षेमुळे) तेंव्हा सूर्याच्या ऊष्णतेने त्या धूमकेतुमधे गोठून बसलेल्या वायूंचे फवारे उडायला लागून ते मुक्त होतात. एवढासा पिटुकला तो गोळा, त्याच्यामधे काही हे वायू धरून ठेवायची शक्ती नसते. ते वायू मग सौरवाताच्या झोतावर अारूढ होउन पसार होतात. तीच धूमकेतुची शेंडी, शेपटी किंवा पिसारा.

लागलास का परत फेकायला? म्हणजे थियऱ्या रे. 'सौरवात' म्हणे. उद्या सांगशील त्याला 'वास' असतो म्हणून. काय?

नाही बुवा. मी फेकत नाहीये. खरोखरच सौरवात (Solar Winds) असतात, अाणि मंदशीतल वगैरे नसून चांगले झंजावाती असतात. सूर्य ही एक अतिप्रचंड अणुभट्टी अाहे हे तर मान्य अाहे? त्या भट्टीतून दरक्षणी अब्जावधी इलेक्ट्रॉनस् अाणि प्रोटॉनस् बाहेर फेकले जात असतात. सूर्याच्या तबकडीभोवती जे तेजोवलय (corona) खग्रास ग्रहणाच्यावेळी दिसते तिथले तपमान लक्षावधी डिग्री सेल्शियस असते. तिथे बागडणाऱ्या या अणुभागांना प्रचंड ऊर्जा मिळून त्यापैकी काही सूर्याच्या गुरूत्वाकर्षणाच्या कचाट्यातून मुक्त होतात अाणि अतिवेगाने दाही दिशांनी वाहात राहातात. हे असं अखंड चालू अाहे सूर्योत्पत्तीपासून. सर्वसाधारणपणे दर तासाला चारशे कोटी टन एवढया वजनाचे हे अणुभाग सूर्य उधळीत असतो. आणि ही उधारीची उधळपट्टी नाही, खिशातली चिल्लर आहे सूर्याजीरावांच्या. 'कोटी कोटी किरण तुझे अनलशरा उधळिती ... दाहक परि संजीवक तरुणरून किरणप्रभा ...' क्या बात है.

खरच, हे कविलोक गाणी अशी लिहितात ना एकेकदा! पण तू आता एक गोंधळ करून ठेवलास.

काय केलं बुवा मी?

हे गाणं डोक्यात घुसवून दिलस. आता ते ऐकल्याशिवाय जिवाला चैन पडणार नाही. आता यापुढे तू काहीही सांगितलस तरी ते डोक्यात शिरणार नाही.

हो रे. तुला नाही, आणि मलाही नाही. आजचा क्लास संपला. पण, पण जाताजाता हा एक विचार आला मनात तो ऐक. तू म्हणालास ना सौरवाताला 'वास' असेल का? अवकाशात आवाज नसतो तसा वासही, पण तरीही वास घेता येइल असं मानलं क्षणभर तर सौरवाताताच वास जळका असेल नाही का? खूप तापलेल्या इस्तरीचा येतो तसा? पण मग मेथेन आणि अमोनियायुक्त अशा त्या लक्षावधी किलोमीटर पसरलेल्या धूमकेतुच्या शेपटीचा वास कसा असेल?

धन्यवाद मित्रा.

यू आर वेलकम. क्लास डिसमिस.

(अजूनही अपूर्णच …)

उर्वरित लेख या ठिकाणी सापडेल http://www.maayboli.com/node/42061
तसदी बद्दल क्षमस्व.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जीवेत शरदः शतम|

ज्यांच्या प्रश्नांमुळे आणि प्रोत्साहनामुळे या (आणि इतरही) लेखांचा प्रपंच मांडला, त्या माझ्या वडिलांना, 'काकांना', वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा !

कौशिक

अरेच्या, इथे फारच आवरता घेतलात हात ??? जर्रा कुठे विषय सुरु होतोय तोच संपला पण !!!!!

अजून येऊंद्या - मस्त लिहिताय - अगदी सामान्यांना समजेल असं ....... आणि रोचकशैलीतही ....

आपल्या वडिलांना, 'काकांना', वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा !

त्यांच्या 'प्रश्न आणि प्रोत्साहन' यांचा आम्हालाही छान फायदा होतो आहे. Happy

हर्पेन +१. तुमचे लिखाण वाचायला खरंच खूप मजा येते. क्लिष्ट विषय असूनदेखील तुम्ही ज्या पद्धतीने समजावत आहात ते खरंच कमाल आहे. Happy

छान!
>> सगळ्याच समजुती पूर्णपणे चुकीच्या आहेत असं ठामपणे म्हणता येत नाही.
हे नाही कळलं?

>>आणि साहजिकच आहे ते. काहितरी अनपेक्षित, अनाकलनीय, अद्भुत आणि अविस्मरणीय असं दिसलं, की तिथे काहितरी अतर्क्य, अलौकिक शक्ती असणार असं आपण मानतो, भितो, नतमस्तक होतो आणि त्या शक्तीला घाबरुन राहातो>>
मूढमतींचे नमस्कार आणि आभार.पुढचा भाग येऊ द्या.

इकेया-सेकी >>>>>>>>>>> हॅले चा धुमकेतु ???????? की हा दुसराच कोणता आहे.......?
.
मी आपल्यापेक्षा नविन असल्याने फक्त हॅले चाच धुमकेतु माहीत आहे Happy

प्रतिसाद आणि प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे आभार.
पॅनस्टार्स हा धूमकेतु पाहाण्यासाठी मी परवा बाहेर पडलो. उंच 'सिरस' ढगांची पश्चिम क्षितिजावर दाटी झालेली असल्यामुळे पॅनस्टार्सचे दर्शन हुकले, पण इतरत्र आकाश निरभ्र असल्याने आकाशगंगा, गुरू, मृगनक्षत्र आणि इतर काही अवकाशातील चमत्कृतींचे निरीक्षण करता आले.

हा झाला तांत्रिक भाग. परंतु भाग्यवंतांनी पूर्णकाळ्या रात्री, चंद्र नसताना, भरगच्च तार्‍यांनी डवरलेल्या आकाशगंगेचे दर्शन घेतलेले आहे, त्यांना जाणवले असेल की मी जे अनुभवले ते या रूक्ष 'रिपोर्ट' मधे अजिबात आलेले नाही. म्हणून हा कविताप्रपंच.

आकाशगंगा http://www.maayboli.com/node/41809

त्यातील काही उल्लेख (संदर्भ) आकाशप्रेमीना लगेच समजतील असे वाटते. हवे असल्यास नंतर स्पष्टीकरण देईन.

मला स्वत:ला कविता वाचायचा कंटाळा येतो. कविता या सांगाव्या आणि ऐकाव्या, त्यातच मजा आहे असे वाटते. तेंव्हा तुम्ही वाचाच असा आग्रह कसा धरु? जमल्यास वाचा. या तात्कालिक पथ-भर्कटनानंतर हा लेख पूर्ण करण्यावर लक्ष पुन्हा केंद्रित करत आहे.

Happy

संभाषण थोडे 'टाईट' चालले असते.
उर्वरीत भाग वेगळा टाकलात आणि इथे लिंक दिली तर जास्त लोक वाचतील.

अस्चिग यांच्या सूचनेनुसार लेख सुधारून, वाढवून नव्या शिर्षकाखाली सादर केला आहे.

उर्वरित लेख या ठिकाणी सापडेल http://www.maayboli.com/node/42061

संभाषण 'टाईट' आहे की नाही ते तुम्हीच ठरवा.

तसदी बद्दल क्षमस्व.

सॅम,

खूपच उशीराने उत्तर देत आहे. क्षमस्व.

>> सगळ्याच समजुती पूर्णपणे चुकीच्या आहेत असं ठामपणे म्हणता येत नाही.
हे नाही कळलं?

उदाहरणार्थ, धूमकेतुमुळे रोगराई येते ही समजूत खरी असू शकेल. ही लिंक पहा
http://www.nasa.gov/connect/chat/hartley_chat.html