राजं...परत फ़िरा...

Submitted by santosh watpade on 26 February, 2013 - 21:55

राजं यवु नगा...परत फ़िरा
राजं यवु नगा....
तुमच्या मावळ्यांनी मिशा कापल्यात कव्हाच,
डोस्क्याच्या पगड्या सुटल्यात कव्हाच...
मावळे निजलेत ढोरावाणी...राजं...
राजं यवु नगा...राजं तुम्ही यवु नगा...

तुमचा म्हाराष्ट्र इकलाय पहारेकर्‍यांनी,
किल्ले लुटले तुमचे किल्लेदारांनी....
सोवळी सुटलीत कस्पटावाणी....राजं..
राजं यवु नगा...राजं तुम्ही यवु नगा...

आमच्या तलवारी गंजलात समद्या,
भिताडाला लटकत्यात दांडपट्टे आता...
भगवा आता सरंजामांनी चोरला...राजं....
राजं यवु नगा...राजं तुम्ही यवु नगा...

राजं..आमचं रगात पाणी झालंय कव्हाच,
माणुसकीची सुंता झालीय राजं तव्हाच...
घरात बसतो आम्ही षंढावाणी...राजं....
राजं यवु नगा...राजं तुम्ही यवु नगा...
राजं शपथ हाय तुम्हाला यशवंतीची...शपथ तुम्हाला बाजीप्रभुची...शपथ हाय त्या तडफ़दार तान्हाजीची..

समदी गावं डुकरांनी भरलीत राजं...
मुलुकाचा उकिरडा बनलाय राजं....
आमच्या माना झुकल्यात लाजंनी....राजं...
राजं यवु नगा...राजं तुम्ही यवु नगा...

आमच्या लेकीबाळी संस्कार इसरल्यात राजं,
नऊवारीची लक्तरं झालीत आता राजं...
आमच्या जिजाऊ दगडाच्या हायेत... राजं..
राजं यवु नगा...राजं तुम्ही यवु नगा...

तुमची देवळं मांधली आम्ही राजं...
तुमची पुतळी मांधलीत आम्ही राजं.....
तुमच्या तसवीरीला माळा घालतो आम्ही राजं....
तुमच्यावाणी दाढी वाढिवतो आम्ही राजं....
शपथ हाय तुम्हाला जिजाऊंची....शपथ तुम्हाला रायबाची...शपथ तुम्हाला आपल्या भगव्याची..

दुपारच्या वक्तापासुन दारु गुत्ते भरत्यात राजं,
तुमचं कारभारी डोळं झाकुन फ़िरत्यात राजं...
जिडं तुमी भगवा नांदिवला सोताच्या रक्तानं....
तिडं तुमचा मरहट्टा नाचतोय नागव्यानं राजं...

आपली प्रजा सुखात हाय राजं,
आपली येवस्था लावुन घेतलीय तीनं,
फ़िरंग्यांनी पेरली हुती जी धसकतं,
सार्‍या गवतात पसरलीय त्यांची मुळं......

तुम्ही हरलात...राजं तुम्ही हरलात....
तुमचा मरहट्टा पांगलाय आता कव्हाच...
तुमची कुर्बाणी इसरलाय तो कव्हाच....
फ़कस्त कुळाचं नाव गाजवतोय आम्ही..राजं.....
राजं यवु नगा...राजं तुम्ही परत फ़िरा...
राजं.....राजं.....राजं.........
-----संतोष वाटपाडे (नासिक)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त.