घुंगराची लेक भाग २

Submitted by कथकली on 12 February, 2013 - 02:47

भाग 2-

यंदाच्या लावणी महोत्सवाचा निकाल लागला आणि घरात नुसता जल्लोश सुरू झाला. बातमी आली तेव्हा चंदाक्का आणि प्रेमाबाई दोघी मायलेकी घरात होत्या. रेश्मा, मयुरी, ताराबाई, अशोक्, दिपक सगळीजणं दौ-यात होती. अचानक प्रफुल चा फोन आला सांगवीहून. म्हणाला आक्का हायट्रीक मारली आपण यंदापण आपणच जिंकलोय. पानतावण्यांनी आत्ताच कळवलंय् अजून ऑफिशियली जाहीर व्हायचंय पण तयारी करा आता पुरस्कार तिस-यांदा घेण्याची. प्रेमाबाईंना काय बोलावं ते सुचेना! "खरंच काय? चेष्टा नको करूस हं प्रफुल्"

"अगं चेष्टा नाही, खरंच सांगतोय. उद्या जाहीर करतीलच निकाल. बघ मग तेव्हा.”
देव करो नी असंच होवो. काय मेहनत घेतलेली पोरींनी. दिवसरात्र तालीम केली बया. थांब बाईला सांगते आगुदर.” बाई..अग बाई... प्रेमाबाई चंदाक्कांच्या खोलीकडे धावल्या.

पुरस्कार समारंभ दृष्ट लागावी असा झाला. झाडून सगळे चॅनलवाले हजर होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना चंदाक्कांना आभाळ ठेंगणं झाल. दुस-या दिवशी पेपरात कव्हरेज होत. दोघी पोरी नुसत्या नाचत होत्या. दिवसभर फोन घेउन घेउन थकला एकूण एक जण. सांगवीहून प्रफुल, प्रिया दोघेही आले होते. चव्हाण सेंटरला जेवण होते रात्री. सगळे सरकार हजर होते.

"काय बाई शीण आलाय नुसता. आता नका ग घेऊ सुपा-या थोडे दिवस. जरा निवांत असावं वाटतया. प्रेमाबाई म्हणाल्या. सगळीजणं आज घरी होती. सगळ्या साथीदारांना आज घरी जेवण होतं. मटण अंगावर आलेल. जेवण खाण झाल्यावर मस्क-या सुरू झाल्या. रेश्मा आघाडीवर.

“मयू बघीतलंस का तू, त्या कोलगावच्या फडातला तो ढोल कसा मुरडत होता तो? काय ते वजन आणि काय तो नाच.”

“आणि अक्का अगं त्यांच्या झिलकरणींमधली एक जण चक्क चकणी बघत होती.”
दोघी फिदी फिदी हसायला लागल्या.

“ए पुरे ग. झाली यांची टिंगल सुरू" प्रेमाबाई.

"सगळी मेहनत बाईची हं. तुम्हाला स्टेप्स दिल्या कुनी होत्या. अस्सल पारंपारिक "ताराबाई.

"मंजे काय आम्ही नाचलो ते कुठेच गेल.” पोरी.

अगं नाचणारे लई असत्यात. पन नाचवणाराच खरा असतोया. डायरेक्टर म्हनत्यात डायेरेक्टर.
ताराबाई म्हणाल्या.

"पण आपल्या गायकवाड मास्तरांनी सगळ्या ढोलकी वाल्यांना तोडलं. काय चाट वाजत होती राव.”
दिपक.
व्हय गं आक्का बा बा बा बा कसली वाजवली ढोलकी. त्यो परिक्षक निसता नाचत होता आतून्.
अशोक.
असे सुखाचे संवाद चंदाक्का बसून ऐकत होत्या. सुख सुख ते या पेक्षा वेगळं काय असतं अशा त्यांच्या भावना होत्या. आता तमाशाचा फड, तंबू पालं हे सगळं संपलं होतं मुंबईच्या उपनगरात एक घर होतं तिथेच रहायचे सारेजण्. गावोगावची भटकंती आता संपली होती. दौरे मात्र जोरात चालू होते. त्या स्वतः दौ-यावर जात नव्हत्या, पण प्रेमा, तारा नाचत होत्या. मुली नवीन पिढीच्या. त्या ही नाचत होत्या. तमासगीरांना जरा बरे दिवस आले पण पण ज्यांच्या कडे पुढची पिढी नाचणारी नव्हती त्यांचे खूप हाल झाले. त्या दृष्टीनं सांगवीकर भाग्यवान म्हणायचे. पुढची सगळी पिढी कलेचा वारसा जोपासत होती. रेश्मा, मयुरी तर कॉलेज पर्यंत शिकलेल्या. प्रेमाक्कांनीच जिद्दीनं शिकवलं होतं त्यांना. आम्ही अशा निरक्षर, यांचं मात्र तसं नको. दोघी पोरीही हुशार निघाल्या. भराभर पुढे गेल्या. पण आम्ही पण नाचणार म्हणाल्या. प्रेमाबाईंनी जबरदस्ती केली नाही. दिपक, अशोक पण दहावी पर्यंत शिकले. सांगवीकर पाटील गेले तरी त्यांच्या कुटुंबीयांनी संबंध तोडले नव्हते. त्यांचा मुलगा प्रफुल डॉक्टर होता. सांगवीकर पाटलीण बाईंची मुलींवर मर्जी होती. प्रत्यक्ष भेटी फार कमी वेळेला होत. सांगवीकर गेले त्या वेळेनंतर प्रफूलच्या लग्नात भेटल्या तेवढ्याच. प्रफुल यायचा मुंबईत. प्रेमा, तारा राखी बांधायच्या त्याला. फोन तर नेहमी असायचे.

लावणी महोत्सवात तिस-यांसा विजेतेपद मिळालं आणि घरातली सगळीच सेलिब्रिटी झाली. रेश्मा, मयुरीला चित्रपटातून बोलावणी यायला लागली. चंदाक्कांच्या मुलाखती छापून यायल्या लागल्या. त्यांना 'आत्मचरित्र लिहा' म्हणून प्रकाशक मागे लागले. ताराबाईंना परीक्षक म्हणून चॅनलवाले बोलवायला लागले. प्रेमाबाईंच्या कार्यक्रमाला चहुंकडून मागणी यायला लागली. अशोक, दिपकची धावपळ व्हायला लागली पैसा चहुबाजूनी यायला लागला.

म्हणायला मुलींना बाप होता पण त्याने दोघींना जन्म देण्यापलीकडे काही केलं नाही. तमासगीरांचा कसला आलाय संसार त्याची अपेक्षा कुणालाच नव्हती. खरं तर 'त्या' ने फसवलंच दोघींना. प्रेमा आणि तारा यां दोघींना एकाच वेळी आपल्या जाळ्यात ओढलं. त्यातूनच पुढची ही पिढी जन्माला आली. प्रेमाबाईंना रेश्मा, अशोक तर ताराबाईंना मयुरी, दिपक. त्याच्या वागण्याला कंटाळल्या दोघी. जबाबदारी सोडाच पण यांच्याच जिवावर पैसे कमवायचा. सांगवीकरांच्या अगदी विरुद्ध. शेवटी त्याला हाकलून दिलं एकदा घरातून. मुलं लहान होती. त्याचं नाव कुणीच घेत नसे. मग प्रेमाबाई ताराबाई कार्यक्रमात व्यस्त तर चंदाक्का घरात मुलांकडे बघायच्या. त्यांची शाळा, कॉलेज सगळं काही चंदाक्कांनीच पाहिलं. सांगवीकर गेल्यापासून त्यांनी बोर्डावर नाचणं सोडलच होतं. पण आपल्या कलेचा वारसा चंदा, ताराकडे देउन्.

परवा ते मराठी चॅनलवाले प्रेमाबाईंना बोलवायला आले. एका वाहिनीवरच्या लावणीच्या रिऍलिटी शो मधे त्यांना प्रेमाबाईं परीक्षक म्हणून हव्या होत्या. ती माणसे हात जोडून जोडून विनंती करत होती. मानधन ही चांगलं देतो म्हणाले. प्रेमाबाईं तयार होईनात्.
“जा की ग काय होतुया गेलीस तर. ईथं जवळच तर शुटींग आहे. न्यायचं आणायचं समदं त्ये करतात म्हनत्यात. " चंदाक्का त्यांना आग्रह करित होत्या. पण प्रेमाबाईंचं एकच. “नको ग अक्का. तारीला सांग जायला" मला बाई गोंधळल्यासारखं होतया त्या टिव्ही वर. नाचाया सांग बोर्डावर कितीबी. त्येच काय नाय.”

प्रेमाबाईंनी असं काहीतरी कारण सांगितलं खरं, पण आजकाल का कोण जाणे त्या फार निरुत्साही दिसायच्या. मागच्या दौ-यात त्यांना किती दम लागला होता नाचता नाचता, सगळ्यांना ठाऊक होतं. अशी निरुत्साही प्रेमा आजपर्यंत कुणी पाहिली नव्हती. चंदाक्का म्हणायच्या मी म्हातारी बरी तुज्यापेक्षा. पण त्यांनाही काहीतरी बिनसल्याची जाणीव झाली.

काय गं, बरं वाटत नाही का? चल, प्रफुलला दाखवूया काय? नको ग आक्का बरं हाय. पन लई दमायला होतं आजकाल. ताराबाई म्हणायच्या, “जरा दम खा पायजेल तर. मी अन पोरी बघतो कार्यक्रमाचं. आक्काबरोबर थांब तू घरी. पण ते प्रेमाबाईंना नको वाटे. प्रेमाबाईं सांगवीकर आज नाचणार नाहीत हे ऐकताच प्रेक्षकांचा नाही म्हटलं तरी विरस व्हायचाच. प्रेक्षक तर मायबाप. त्यांना दुखवून कसं चालेल? असे चंदाक्का, गोजरबाईंचे संस्कार.
आज त्या खरंच घरी थांबल्या. मुंबईत दामोदर हॉलला शो होता. मुली, ताराक्का म्हणाल्या बर नाही तर कशाला चढतीस बोर्डावर. आराम कर घरीच. आमी बगतो शो चं. सारे निघून गेले. चव्हाण मास्तर आले होते चंदाक्कांना भेटायला कोल्हापुरहुन ते अन चंदाक्का बैठकीत बोलत बसले होते. जुने सहकारी. अशाच इकडच्या तिकडच्या गप्पा चालल्या होत्या.
प्रेमाबाई आत जरा पडल्या होत्या. तोच दोन माणसे आली. म्हणाली आम्ही राज्य सरकारच्या सांस्कृतिक खात्यातून आलोय. प्रेमाबाई सांगवीकरांना भेटायचय्.
चंदाक्का म्हणाल्या, "काय काम हाये? तिची तब्बेत बरी न्हाई. ती झोपलीया आत.”
"त्यांच्याशीच बोलायचय्, जरा उठवाल का त्याना “?

"सायेब, तिलाच भेटायचं असंल तर थांबाबं लागंल" नाहीतर मला सांगा मी निरोप देते तिला.

त्या पैकी एका माणसाने मोबाईल लावला कुणालातरी, म्हणत होता, साहेब बाई आहेत पण त्यांना भेटू देत नाहीत माणसं.
“तिच्या मायला त्या तमासगिरांच्या" पलीकडची व्यक्ती बोलत होती.”

इतक्यात प्रेमाबाईच उठून बैठकीत आल्या, “काय गं आक्का? कोण आलंय?”
ती माणसे बोलायला लागली, सांस्कृतिक खात्यातून आलोय. उद्या आमच्या खात्याचा कार्यक्रम आहे. क्रीडासंकुलात. 'साहेबांचा' निरोप आहे तुम्हाला यायलाच लागेल.
प्रेमाबाई हसल्या, म्हणाल्या, साहेबांना सांगा. नक्की आले असते. पण तब्येत बरी नाही. नायतर कशाला बसले असते अशी घरात"
पायजेल तर आक्का येईल माझ्या ऐवजी.
"नको नको ते काही नाही. साहेबांचा हुकूम आहे”. माणसे ऐकायलाच तयार नव्हती.
प्रेमाबाईंचा नाईलाज झाला. होकार घेऊनच माणसे गेली.

क्रमशः

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान रंगतीये कथा!

काही संदर्भ कथेत पुन्हा पुन्हा आलेत तेवढे दुरुस्त करा. उदा. -

<<< सांगवीकर पाटलीण बाईंची मुलींवर मर्जी होती. प्रत्यक्ष भेटी फार कमी वेळेला होत. सांगवीकर गेले त्या वेळेनंतर प्रफूलच्या लग्नात भेटल्या तेवढ्याच. प्रफुल यायचा मुंबईत. प्रेमा, तारा राखी बांधायच्या त्याला. फोन तर नेहमी असायचे. >>>>

कृ. गै. न.

पुढील भागाची प्रतिक्षा आहे.

मुग्धमानसी. पुन्हा आलेले संदर्भ दुरूस्त केलेत. चूक लक्षात आणून दिल्याबद्दल आभारी आहे. अजूनही काही वाटल तस तर अवश्य सांगा.

भानूप्रिया, शुभांगी कथेत पात्रे जास्त आहेत हे खरे आहे. मलाही तसे ते वाटले. पण ती आवश्यक वाटली. ती नसती तर एका तमासगीरणीची आत्मकथा असे वाटले असते. शिवाय कथेचा आधुनीक काळातला संदर्भ पहाताही ते टाळण्यासारखे नव्हते. नंतर वाटले की हा विषय एखाद्या लघु कादंबरीसाठी योग्य होता. असो. असेच प्रतिसाद देत चला. आपली मोकळेपणाने मांडा, बरे वाटते.