ऋतुचक्र

Submitted by अवल on 10 February, 2013 - 23:51

उन्हाच्या झळा, आता तीव्र होऊ लागतात
कोकिळाला आपला सूर, बरोब्बर सापडू लागतो
आसमंतात आंब्याचा गंध, दरवळू लागतो
वाळक्या सुक्या फांद्यात, हिरवा रंग घुमू लागतो
अन रानातल्या झाडांमधून, "वसंत" पिंगा घालू लागतो

आभाळात काळे-निळे ढग, डोकावू लागतात
मधूनच वा-याच्या अंगात, वादळ घुमू लागते
भूमीची तृषा अजूनच, भेगाळत वाढत जाते
कोकिळाची लकेर, आता अधिकच तीव्र होऊ लागते
अन त्या तिथे, नैऋत्येकडून "ग्रीष्मा"ची चाहूल येऊ लागते

आता फुटतो, आवाज "पेर्ते व्हा" ला
शेता शेतात, लगबग वाढीस लागते
झाडांच्या निष्पर्ण टोकांना, उभारी येऊ लागते
अन आकाशातून जीवन, अक्षरशः कोसळू लागते
सा-या सृष्टीला नाहू घालण्यासाठी, "वर्षा"राणी धाऊन येते

लेकूरवाळ्या फांद्या, डोईवर हिरवा पदर घेऊ लागतात
गोजि-या रंगबिरंगी फुलांची, परडी सजू लागते
दाट धुक्याची ओढणी ,धरती अलगद ओढून घेते
नदी धीर गंभीरपणे, संथ-शांत वाहू लागते
"शरदा"च्या शीतल चांदण्यात, मुलायम स्वप्न फुलत जाते

गारवा हळुहळु, सारीकडे पसरू लागतो
दिवसाचा प्रहर, छोटा-छोटा होत जातो
सूर्यनारायणाचे तेज, विझू-विझू होऊन जाते
सारी सॄष्टी, चिडिचूप होऊन जाते
अन "हेमंता"ची थंडीची दुलई, सारी सृष्टीच पांघरून घेते

थंडीचा कडाका, हळुहळू वाढत जातो
आता नाहीच सहन होत, झाडांना पाने
पिवळ्या पानांचे जडशीळ शालू, उतरवले जातात
भल्या थोरल्या रात्री, आता जागत सजवाव्या वाटतात
अंगावर शिरशिरी उमटवत, "शिशीर" आपले ठसे उमटवत जातो

अन मग पुन्हा, नवा कोकिळ, आपला सूर शोधतो
अन एका नव्याच वसंताची चाहूल, सा-या सृष्टीला लागते
जुन्याचा मागोवा संपवून, नव्याचा शोधात ती गुंगून जाते
ऋतू मागुनी ऋतू, असे बदलते-असे गरजते-असे बरसते- असे सजते....
युगायुगांच्या सुपीक कुशीत, "ऋतुचक्र" हे असे नव्याने उमलत राहते....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेकूरवाळ्या फांद्या, डोईवर हिरवा पदर घेऊ लागतात
गोजि-या रंगबिरंगी फुलांची, परडी सजू लागते
दाट धुक्याची ओढणी ,धरती अलगद ओढून घेते
नदी धीर गंभीरपणे, संथ-शांत वाहू लागते
"शरदा"च्या शीतल चांदण्यात, मुलायम स्वप्न फुलत जाते

पिवळ्या पानांचे जडशीळ शालू, उतरवले जातात

व्वा ! काय कल्पना आहे. मस्त आहे.

ॠतूंचं वर्णन चांगलं केलंय..... आवडलं.

पण अशा वर्णात्मक कविता छंदात जास्त खुलतात, भावतात
हे माझं वैम.

एक एक ऋतु एक एक संग्रह लिहून झाला तरी संपणार नाही .तरीही पाच पाच ओळींचे शिवधनुष्य उचलले पेलले .सुंदर ..