मी मल्हारगड बोलतोय....

Submitted by उमेश थरकुडे on 7 February, 2013 - 02:13
ठिकाण/पत्ता: 
मल्हारगड, सासवड नजीक.

मी मल्हारगड बोलतोय....

राम राम मंडळी मी मल्हारगड. इतिहासाचा एक साक्षीदार. महाराष्ट्राच्या इतिहासातील शेवटचा बांधला गेलेला मीच तो किल्ला. परंतु आता माझी अवस्था हि खूप केविलवाणी झाली आहे. माझे खांदे आता निखळत चालले आहेत. मला तुमच्या आधाराची खूपच गरज आहे अन्नथा माझं अस्तित्व हे फक्त पुस्तकात दिसेल. माझं बांधकाम इ. स. १७५७ ते १७६० या काळात झाले. पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख भीमराव पानसे यांनी आपल्या सोनोरी गावाच्या संरक्षणासाठी व दिवे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी गावाचा उत्तरेच्या डोंगरावर माझी बांधणी केली म्हणून मला सोनोरीचा किल्ला असेही म्हणतात.
माझं काम चालू असताना एके ठिकाणी कुदळीचा घाव घातल्यावर रक्त वाहू लागले. सरदार भीमराव पानसेनी खंडोबाला साकडे घातले आणि किल्ल्यावर मंदिर बांधण्याचा संकल्प केला. म्हणून ह्या किल्ल्याला त्यांनी मल्हारगड हे नाव दिल्याची कथा प्रचलित आहे. ८०० मीटर उंचीचा दुहेरी तटबंदी असलेला मी, दिवे घाटाचा पूर्वेस अवघ्या ५ कि. मी. अंतरावर वसलेलो आहे. गडावर सोनोरी गावातून मळलेल्या पायवाटेने अर्धा तासात पोचता येते. प्रत्येक दुर्गप्रेमीने एकदा तरी येऊन आवर्जून पहावा.
सुस्थितीत असण्याऱ्या पूर्व दरवाजात आपण येताच गडाचा लहान आणि त्रिकोणाकृती आकार लक्षात येतो. गडाची संपूर्ण फेरी करण्यासाठी एक तास लागतो. दिवे, झेंडेवाडीकडूनही आपल्याला एक लहान दरवाजातून गडावर प्रवेश करता येतो. गडावर विहीर, पाण्याचे तळे असूनही वापराअभावी त्यातील पाणी पिता येत नाही. वाड्याचे अवषेश पाहून गडाचा टोकावरच्या बुरुजावर आपल्याला जाता येते. या बुरुजाखालच्या दरवाजा मातीने निम्म्यापेक्षाहि जास्त बुजून गेला आहे. गडावरचा सर्वात प्रेक्षणीय भाग बाले किल्ला आहे. उत्तर बाजूला बालेकिल्ल्यात जाणारा रस्ता आहे. दोन मंदिरांचा शिखराकडे आपले लक्ष अपोआप वेधले जाते. शिवलिंग असणारे महादेवाचे मंदिर त्यामानाने प्रशस्थ आहे. दुसऱ्या मंदिरातील अश्वरूढ खंडोबाची म्हाळसा बरोबरची मूर्ती पाहून आपल्याला प्रसन्ना वाटते आणि हरकून जेजुरीची आठवण होते. मला मल्हारगड हे नाव याच मंदिरामुळे पडल्याची आपली खात्री पटते. खंडोबाचा मूर्ती शेजारी अनेक छोट्या छोट्या पुरातन मूर्त्या आपल्याला दिसतील.
बालेकिल्ला फिरताना आपल्याला सदरच्या इमारतीचे अवशेष दिसतात. त्याचबरोबर एक बुजलेली विहारही आढळते या बालेकिल्ल्याची तटबंदी चौकोनी आकाराची आहे. या गडावर शिबंदी ठेवण्यासाठी पेशव्यांनी वार्षिक ३००० रू ची नेमणूक केल्याचा उल्लेख आढळतो. श्रीमंत माधवराव पेशवे स्वतः १७७१-७२ मध्ये या गडावर येऊन गेले आहेत. असा हा पेश्वेकालात बांधला गेलेला शेवटचा किल्ला पाहताना आपल्याला बांधकामातील त्रुटीही लगेच जाणवतात. चिलखती तट-बुरुज-माची ऐवजी चौकोनी ठोकळेबाज बांधकाम आणि गोमुखी प्रवेशद्वाराजवळ सरळ दिसणारे प्रवेशद्वार, हे आपल्याला सहज लक्षात येते.
इंग्रजांच्या विरुद्ध बंडात उमाजी नाईक आणि वासुदेव बळवंत फडके यांनी माझा आश्रय घेतला होता. किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या सोनोरी गावात देहभान हरपणारी श्रीकृष्ण मूर्ती असणारे मुरलीधराचे मंदिर आणि ६ बुरुज तटबंदीचा पानसे वाडा या दोन गोष्टी आवर्जून पाहण्यासारख्या आहेत. वाड्यामध्ये चोरवाटा, भुयारे, पोलादी, सुळे मारलेले लाकडी दरवाजे, कलापूर्ण खिडक्या, वैशिष्टपूर्ण विहीर, अष्टकोणी हत्ती तलाव आणि गणेशाचे व लाक्ष्मिनारायनाचे मंदिर आहे.
दुर्देवी बाब अशी कि माझ्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे माझी बरीच पडझड झाली आहे. काही इतिहासप्रेमी व दुर्ग संवर्धक स्वखर्चाने मला वाचवण्याचे प्रयत्न करीत आहेत . त्यांना सहकार्य कराल अशी माफक अपेक्षा करीत आहे. कृपा करून मला वाचवा .........

उमेश थरकुडे - एक दुर्ग संवर्धक (Vinsys Fort Restoration Group)
९८५०१९९८४०

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, December 21, 2012 - 21:30 to Thursday, February 7, 2013 - 01:45
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किल्ले मल्हार गडच्या संवर्धना उपक्रमाबाबत (http://epaper1.esakal.com/3Feb2013/Enlarge/PuneCity/page4.htm )

आपण जाणता कि गड, किल्ले हे महाराष्ट्राचा ऐतिहासिक ठेवा व वैभव आहे. परंतु काळाच्या ओघात अनेक गडांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे, त्यांची पडझड झाली आहे. आपले हे वैभव जतन करणे हि काळाची गरज झालेली आहे.
छत्रपती शिवरायांचा केवळ जयघोष न करता त्यांचे स्फूर्तीदायी काम नव्या पिढी समोर मांडणे आपल्या सर्वांची जवाबदारी व कर्तव्य आहे. याच विचाराने लोकसहभागातून व मित्र परिवाराचा मदतीने आम्ही दुर्लक्षित किल्ल्यांची दुरुस्ती करावयाचे ठरविले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात शेवटचा बांधला केला गेलेला मल्हार गड (सासवड) या किल्ल्याला असाधारण महत्व असल्याने आम्ही येथे काम करीत आहोत.
ह्या कामाचा शुभारंभ व दुर्गापूजा दि .२२ डिसेंबर १२ ला सकाळी ९ वा. करण्यात आला आहे.
या प्रकल्पा मध्ये सर्वप्रथम किल्ल्याची साफसफाई, गडावर धोकादायक बाजूंना कठडे बसवणे, किल्ल्यावर जाणारा रस्ता तयार करणे , पडझड झालेले पूर्ववत बांधकाम करणे , विहिरीचे काम करणे, टाक खोल करून गडावर पाण्याची सोय करणे, मार्गदर्शिका लावणे व मंदिराची डागडुजी करणे तसेच दुर्ग-पर्यटन बाबत जनजागृती करणे ह्या प्रकारचे तसेच इतर अनेक प्रकारची कामे असतील.
आपणास एक प्रतिष्ठित नागरिक ह्या नात्याने विनंती करू इच्छितो कि आम्ही जो वसा हाती घेतला आहे त्यास आपले मार्गदर्शन व सहकार्य अपेक्षित आहे. ह्या कामामधे साधन, सामुग्री, पैसे, मनुष्य बळ अश्या अनेक गोष्टीची गरज भासणार आहे. आपण काही स्वरुपात जर मदत करू शकला तर ती सदुपयोगात आणू ह्याची आम्ही शाश्वती घेतो.

उमेश थरकुडे - एक दुर्ग संवर्धक
९८५०१ ९९८४०

उमेश थरकुडे, तुमच्या कार्यास मानाचा मुजरा. तुमच्यासारखे लोक हेच महाराष्ट्राचं खरंखुरं वैभव आहेत.
आ.न.,
-गा.पै.

प्रिय गा.पै.

धन्यवाद
महाराष्ट्राचं खरंखुरं वैभव असन्याजोग अजुन काम केलेल नहिये. पण तुमच्या सारखे लोक साथिला असले तर आपला उद्देश साध्य होइल.