निळंशार आभाळ... त्याखाली निळाशार खळाळणारा स्वच्छ समुद्र. समुद्राच्या लाटा केवढ्या उंच! सोनेरी मऊशार वाळूवर पाय पोटाशी घेऊन पाठमोरं बसलेलं कुणीतरी. समुद्राकडे बघत. तीचं शरीर कमनीय. अंगावर रेशमी वस्त्र. मोकळे लांबसडक काळेभोर केस थेट वार्याशी गप्पा करणारे. डाव्या खांद्यावरून हवेत बेदरकारपणे उडणारा निळाशार पदर. ती हलत नाही, डुलत नाही. युगानुयुगे पुतळ्यासारखी ती जणू तिथंच थांबून राहिली आहे! थोडं पुढे होऊन तिला हलवुयात का? कोण बाई तु? कुठुन आलीस? इथे अशी का बसलीयस? विचारावे का? तिच्या दिशेने थोडेसे पाऊल पुढे टाकावे तर.... पोचलो तो थेट.... पायाखाली खळाळणारा, हुळहुळणारा रुद्र समुद्र! चहूबाजुंनी उंचच उंच लाटा! समुद्राचा रंग सोनेरी... गडद भगवा. आणि पाठिशी... पाठिशी थेट क्षितीज! समोरच्या पिसाळल्यासारख्या उंच उड्या मारणार्या लाटा आपण पडदे सरकवावेत तशा सरकवतो आणि दूरवर किनार्यावर दिसते एक आकृती... एक स्त्री! दोन अनिमिष नेत्र... आपल्यावर रोखलेले! एवढ्या लांबून ती नजर आपल्याला सहज येऊन भिडते... नेम धरून... बाणासारखी! प्रतिकारादाखल आपणही उचलले आपले शस्त्र... हातात होतेच... तिच्यादिशेने रोखावे तर आणले आपल्याच ओठापाशी.... आणि....
कुठल्यातरी झटक्याने ह्रषिकेशची झोपमोड झाली. अशी अर्धवट झालेली झोप म्हणजे वैताग नुसता! कुणी उठवलं च्यायला? तांबारलेल्या डोळ्यांनी त्यानं आजूबाजूला पाहीलं. तिथंला सगळा गोतावळा आणि गोंधळ बघून त्याचा उरला सुरला उत्साह सुद्धा मावळला आणि प्रश्न सुद्धा मनातच विरले. त्याच्या भोवती किमान शे-पन्नास माणसं होती. समोरच्या बाकड्यावर एक संपूर्ण कुटुंब. एक बाप्या, त्याची बापी आणि तीन-चार... किंवा कदाचित जास्तच असावीत... सगळ्या वयोगटांतली, लिंगांतली, अवस्थेतली आणि सगळ्या शक्य तितक्या मार्गांनी आईबापाला आणि डब्यातल्या सगळ्यांना वात आणणारी पोरं-टोरं! त्यातली दोन कार्टी सध्या ह्रषिकेशच्या जवळच्या खिडकित उभी होती आणि एकमेकांना ढकलून स्वतःला जागा करण्याच्या भांडणात तोंडातून अतर्क्य मोठमोठे आवाज काढत होती. कुटुंबातली बापी मधेच त्यांच्याकडे बघून विचित्र आवाजात खेकसायची आणि तिच्याच आवाजाने तिच्या मांडीवरचं सगळ्यात शेवटच्या नंबरचं कार्ट पुन्हा उठून किंचाळत रडू लागायचं. बाप्या मात्र जगाशी काहीही घेणं-देणं नाही... असे निर्लेप संन्यासी भाव चेहर्यावर धारण करून निवांत गाडिच्या छताकडे ध्यान लावून चक्क झोपला होता. पलिकडच्या सीटवर चारजण बॅगेचं टेबल करुन त्यावर पत्ते कुटत बसले होते. ह्रषिकेशशेजारी एक म्हातारा एक पाय पोटाशी घेऊन मान मागे झोकून डोळे निपचित पडला होता. आल्यापासून असाच होता. मधे मधे नाक वगैरे खाजवायचा म्हणून... नाहीतर मेला-बिला कि काय म्हातारा असंही वाटून गेलं असतं कुणाला...
पलिकडे कुठेतरी राजकिय विषयांवर चर्चा रंगली होती. कुठूनतरी भजनांचे कर्कश्य आवाज येत होते. आणि या सगळ्या गोंधळात आपण चक्क झोपलो होतो? कसं शक्य आहे? हं.... झोपूनच राहिलो असतो तर छान झालं असतं. ही रटाळ माणसं बघण्यापेक्षा... उगाच उठलो. ह्रषिकेश डोळे मिटून पुन्हा झोपायचा प्रयत्न करू लागला. स्वप्न... काय बरं स्वप्न पडत होतं आपल्याला...? काहितरी विलक्षण... सुंदर... दैवी... आता आठवत नाही नीट. आठवतोय तो फक्त निळा रंग! स्वप्नभर भरुन राहिलेला! आणखी काहितरी होतं... हातात.... आणि दोन डोळे... थेट रोखलेले... धुसर सगळं! च्यायला... उगाच उठलो! त्याची भयंकर चिडचिड झाली. झोप पुन्हा येईना. खिडकित भांडणार्या कार्ट्यांना एक-एक करुन उचलून गाडिबाहेर फेकून द्यावसं वाटलं त्याला. तिरिमिरीत तो उठला. खिडकिजवळची जागा सोडणं हा मुर्खपणाच! त्या दोन्ही कार्ट्यांना तर स्वतःच्या भाग्यावर विश्वासच बसेना! आता भांडणाचा रोख ती रिकामी जागा बळकावण्याकडे वळला. तिथं लक्षही न देता ह्रषिकेश वाटेतल्या गोतावळ्याला ओलांडत, धक्के खात गाडिच्या दारापाशी आला. वार्याचा जोरदार झोत चेहर्यावर आला तसं त्याला ताजंतवानं वाटू लागलं. दोन्ही पाय दरवाजाबाहेरच्या पायरीवर ठेवून दरवाजातच तो चक्क बसला! ’आई असली असती आत्ता तर काय उचकली असती आपल्याला असे बसलेले पाहून...!’ आई... पुन्हा आई... मानेला एक झटका देऊन त्याने सगळे विचारही झटकून टाकले. सवयीने हात खिशाकडे गेला. सिगारेटचं पाकिट चाचपण्यासाठी. सिगरेट बाहेर काढणार तेवढ्यात लक्षात आलं आपण गाडीत आहोत. ’धुम्रपान निषिद्ध!!!’ हात तसाच रिकामा खिशाबाहेर आला. रिकाम्या हाताकडे पाहत उगाच हसू आले त्याला.
"व्यसनाशिवाय जगणे म्हणजे... अवघडच! व्यसनाचे जगणे हे जगण्याच्या व्यसनासाठी घातक... कि आवश्यक? जगण्याचे व्यसन असते का? आई म्हणायची व्यसन कसलेही वाईटच... तीनं शिकवलेलं एक एक करत सगळंच पुसलं म्हणा आपण... पण कल्पनेपलिकडचं घाणेरडं आयुष्य ओढत तीही जगलीच की शेवटपर्यंत! मेली तेंव्हाही जगायचेच होते तीला. म्हणजे जगण्याचे हे व्यसन तिलाही चुकले नाहीच! हेच व्यसन सगळ्यात वाईट च्यायला! मला जन्माला घालायच्या आधीच मेली असती बिचारी तर जगण्या-मरण्याच्या संकल्पनेवर विचार करायला आपण आज इथे उरलोच नसतो! तिच्यासोबत गेलं असतं तिचं गर्भाशय... आणि त्यातुन भविष्यात जगण्याचं व्यसन घेऊन जन्माला येणारी कित्येक पिढ्यांची... अर्थहीन आयुष्य जगणारी... आणि त्या अर्थहीनतेची जाणिवही नसणारी... एक विचित्र भयंकर वंशावळ!"
मान झटकून आता कंटाळा आला. पण डोक्यातली विचित्र विचारांची मालिका काही संपेना. हाही एक त्रासच आहे च्यायला!
लेदर जॅकेटच्या आतल्या खिशात हात घालून त्यानं बाहेर काढलं त्याचं दुसरं व्यसन... एक लहानशी.... पिवळ्या रंगाची... सोनेरी नक्षीची बासरी! त्याची सखी! पाच-सहा वर्षांपुर्वी कर्नाटकच्या बाजूला एका लहानश्या खेड्यात एका छोट्या कारागिराकडून विकत घेतलेली ही बासरी त्याची सगळ्यात जवळची मैत्रिण बनली होती. तिला ओठाशी धरली की आपलंच मन आपल्याशी बोलतंय असं वाटायचं त्याला. बघुयात तरी.... आज काय बोलायचंय मनाला...
वार्याचा झोत टाळण्यासाठी तो किंचित मागे सरकला आणि बासरी ओठाला लावून त्यात प्राण फुंकू लागला. श्वासांनी सूर धरला... ह्रदयानी ताल पकडला. बोटे बासरिच्या पोकळ नळीवर बागडू लागली आणि शरिरातली नसन् नस त्या सूरांच्या तालावर थिरकू लागली. बंद डोळ्यांना दिसू लागलं बेधूंद संगीत!
तो वाजवू लागला त्याचा सोनेरी पावा.... भोवतालच्या उंच उंच लाटा फेर धरून त्याच्या भोवती नाचू लागल्या. त्याच्या पाठिशी क्षितिजाचा रंग झाला एकदम गडद निळा! मावळतीचा सूर्य त्यानं मस्तकी धारण केल्यासारखा... त्याच्या तेजाने निष्प्रभ झाल्यासारखा! आकाशात तारकांचा अभूतपूर्व नाच रंगलेला जणू... सगळी नक्षत्रे एकत्र आकाशात! आणि अचानक... तीरासारखी एक नजर भेदत येते या सगळ्यालाच. काळीभोर नजर.... मोठेमोठे नेत्र..... सूरांचे कवच भेदून.... लाटांना दूर सारून... मला चक्क जाणवतो आहे त्या नजरेचा... प्रत्येक क्षणाचा प्रवास! पोचते आहे ती नजर वार्याच्या वेगाने... माझ्या अगदी जवळ... जवळ...
"हां...." दचकून ह्रषीकेश भानावर आला. समोरून विरुद्ध दिशेने दुसरी ट्रेन अत्यंत भिषण चित्कार काढीत निघून गेली आणि काही क्षण प्रचंड धक्क्यातून सावरायच्या प्रयत्नात तो तसाच बसून राहीला. काय झालं? कुठे आहोत आपणं? कोण आहे तिथं? काय चाललंय? कोण असं पाहतंय आपल्याकडे? का? मी कोण आहे?
गर्रकन् वळून त्यानं मागे पाहीलं. काहीतरी भीषण, अनपेक्षित पहायला मिळणार आहे अशा अपेक्षेने... दोन डोळ्यांत पंचप्राण आणून... ती नजर... ते डोळे... कोण आहे ते?
___________________________
ती ट्रेनमध्ये बसायच्या आधीपासून पहात होती त्याच्याकडे. प्लॅटफॉर्मवर गाडीची वाट पहात उभी होती तेंव्हा दूरून आलेल्या बासरीच्या धूंद स्वरांचा मागोवा काढत तीची नजर पोहोचली त्याच्यापर्यंत! आणि तेंव्हापासून तिथंच अडकून पडलेले तिचे डोळे तिनं हजारदा तरी सोडवून घेतले होते. असं का होतंय? बासरी पहिल्यांदा ऐकतोय का आपण? पण अशी मोहिनी आजवर कधी पडली नव्हती! असं भान कधी हरपलं नव्हतं! सोबत नवरा आहे आपल्या. शेजारीच बसला आहे. आपला हात त्यानं हातात घेतलाय... काळजीनं... मायेनं... अधून मधून तो काहीबाही आपल्याशी बोलतो आहे. बोलता बोलता आपल्या टम्म फुगलेल्या पोटावरून मायेनं हात फिरवतो आहे.... पण त्याचे शब्द कानावर पडता पडता अचानक हवेत विरुन गेले......! पुन्हा कानात घुमताहेत तेच सूर... तेच संगीत.... तेच.... काहितरी दैवी.... निळंशार!
सोनेरी वाळूवर पाय पोटाशी मुडपून बसलो आहोत आपण.... काळेभोर केस वार्यावर मोकळे सोडून. समोर पसरलेला बेफाम अफाट दर्या... पिसाटल्यासारखा खिदळतो आहे... उधळतो आहे स्वतःलाच. मी स्तब्ध. त्या लाटांचं लक्षही नाही माझ्याकडे? गालावर काजळासह ओघळून आलेले थेंब... माझ्या पायातले पैंजण... वार्यावर उधळणारा पदर... उडणारे केस... आणि भरकटलेलं चित्त... काहीच आवरावेसे... सावरावेसे वाटत नाही. नजर फक्त स्थिर! समुद्रापलिकडे त्या मावळतीच्या क्षितिजावर खिळलेली!
मागून येते आहे कुणीतरी... ही चाहूल अगदिच ओळखीची! मी मागे वळून पहाणार तोच.... समोरचे क्षितिज होते गडद निळेशार! कोण... कोण आहे तिथं? धावत जाते आपली नजर क्षितिजाच्या दिशेने आणि... आणि पुन्हा... भान हरपते! तेच सूर.... तीच मोहीनी.... नको रे... नको रे कान्हा... श्रीरंगा... ह्रषीकेशा....
पतीच्या खांद्यावर विसावलेलं मस्तक दचकून तीनं बाजूला घेतलं. अंगांगाला दरदरून सुटलेला घाम! "काय गं? काय झालं? बरं वाटत नाहीये का? बोल नं... काय झालं?"
तीनं चमकून पाहीलं तिच्या बाजूला बसून तिचा हात हाती घेतलेल्या तिच्या नवर्याकडे. पण क्षणभर ओळखलंच नाही तिनं... हा कोण? याच्या डोळ्यात का इतके प्रश्न? तो कुठे गेला?
"काही त्रास होतोय का गं? तुला सांगत होतो मी. काळजी घेत जा गं..."
"काही नाही होते हो मला. स्वप्न पडलं काहीतरी... एवढंच. नका काळजी करू..." - तीला नव्हतं फार बोलायचं. पण त्याचे प्रश्न नव्हते संपत. ती त्रासली... मग मनातच शरमली.
आपल्याला खरोखर फार फार बोलायचं होतं आज... आता मला माहेरी सोडून हे माघारी वळले की पूढे दोन महिन्यांचा विरह होता. माझ्याशिवाय रहायची सवय नाही.... कसं करतील सगळं? कसं निभावतील? अगदि काही तासांपुर्वीच किती काळजी होती उरात... किती भिती होती... पहिलं वहिलं बाळंतपण. नीट होईल ना सगळं? माझं बाळ... त्याची जिवणी नाजूक असेल. जावळ कुरळं... बापासारखं... रंग गोरा.... माझ्यासारखा... मुलगा असेल? माझा बाळकृष्ण....
कृष्ण.... त्याच्या बासरीची मोहीनी पडायची म्हणे.... काय होतंय हे आपल्याला?
आजी म्हणायची गर्भारपणात पावा ऐकू नये.... चळ लागतो!
नकोच तो कृष्णाचा विचार. त्या पाव्याचा उल्लेखही नको. आपण काही वैरागी नाही... संसारात अडकलेला पायच बरा...! बांधून ठेवतो जमिनीशी... नात्यांशी... आपल्याला उडण्यासाठी चौकट आखून देतो...! सुरक्षित अवकाश देतो... जगण्यासाठी आधार देतो. हे सगळं झुगारुन वैराग्याचं आव्हान स्विकारणं नकोच... आणि स्विकारावं तरी का? हे जे आहे ते निश्चित माझं आहे... ते सोडून अनिश्चिततेच्या... पळत्याच्या मागे का जावं? माझा संसार हेच माझं गोकूळ. माझा पती हाच माझा सखा. माझ्या उदरात वाढतो आहे तोच माझा बाळकृष्ण.... मला तो क्षितिजावरचा कृष्ण नको... त्याचा पावा नको....
पुन्हा... पुन्हा वाजते आहे... ती बासरी... ते सूर... मंतरताहेत....
मी शोधलं त्याला.... लाटांच्या पलिकडे... क्षितिजाच्या अगदी जवळ! मी हेरलं त्याला.... तो दुष्ट... हलकट... मला खेचतो आहे. बोलावतो आहे...
तुच गेलास ना मला सोडून त्या क्षितिजापलिकडे? माझा हात झटकून... मला टाकून? तुला निभवायची होती तुझी कर्तव्यं. तुझं राज्य... तुझी सत्ता... तेंव्हा तु फक्त म्हणालास आणि मी उतरले ना निमुटपणे तुझ्या सिंहासनावरून? नाही मागितला तुझा मुकूट... नाही मागितले माझे हक्क... तू ज्याला समंजसपणाचं नाव दिलंस ते माझं प्रेम तिथंच विव्हळत ताटकळत उभं ठेवून निघून गेलास... मी हाक मारली नाही. साद घातली नाही. पण तू... तू आता का डिवचतो आहेस मला? का पुन्हा बोलावतो आहेस? निर्लज्जा... बंद कर तो पावा.... बंद कर.... बंद कर म्हणते ना....
___________________________________
क्षणार्धात कुणालाही समजायच्या आत ती जागची उठली... गाडिच्या दरवाजाकडे धावली. समोरुन धडधडत एक ट्रेन विरुद्ध दिशेने निघून गेली. तो आवाज विरतानाच मागे वळून बघणार्या त्याच्या नजरेत नजर मिसळून ती ओरडली.... "थांबव... थांबव तो पावा निर्लज्जा. हे बघ मी आले. चल आता. यावेळेस नाही सोडणार तुझा हात!"
एक पिवळी... सोनेरी नक्षीची बासरी ट्रेनबाहेर उडून गेली आणि त्या मागोमाग दोन देह.... तिच्या निळ्या पदराचा तुकडा दाराशी अडकून फडफडत राहीला. आणि मागून हवेला चिरून एक आर्त किंकाळी अवकाशभर घुमत राहिली.... "राधा......................."
__________________________________
मुग्धमानसी
अरे देवा!!!
अरे देवा!!!
ओह्ह! झक्कास जमली आहे
ओह्ह!
झक्कास जमली आहे
तुम्ही छान लिहिता... शुभेच्छा
छान आहे कथा. आवडली
छान आहे कथा. आवडली
आवडली
आवडली
झक्कास जमली आहे >>>>>
झक्कास जमली आहे >>>>> +१
आवडलीच.
आवडली
आवडली
धन्यवाद!
धन्यवाद!
छान लिहिली आहे, खिळवून ठेवलं,
छान लिहिली आहे, खिळवून ठेवलं, खुपच छान विस्तार अन चुटपुट लावणारा शेवट...मस्त!
शेवट बाकी कथेतील आलेले विचार
शेवट
बाकी कथेतील आलेले विचार खुप खोल.
अल्सो रॅन कॅटॅगरीतल्या अतिसामान्य माणसाचे...
अतिशय सुंदर जमलीये. कथाबीज,
अतिशय सुंदर जमलीये. कथाबीज, फुलवणं, पात्रं, स्वगत... अगदी अप्रतिम.
धन्यवाद सगळ्यांना. दाद...
धन्यवाद सगळ्यांना. दाद... तुझ्या दादीने खरंच उभारी मिळते बघ! खुप आभारी आहे.
झकासराव, अल्सो रेन कॅटॅगरी म्हणजे काय? समजवाल का? कुतुहल आहे.
मुग्धमानसी .....त्रास होतं हे
मुग्धमानसी .....त्रास होतं हे जे काही होतं ते....हा पावा आता माझ्याही डोक्यात भुंगा घालत राहणार....
लिहिलं तेव्हाच वाचलेलं, पण
लिहिलं तेव्हाच वाचलेलं, पण मोबाईलवरुन रिप्लाय नाही देता आला.. अगदी मुग्ध करणारं होतं लिखाण..
आवडली.
आवडली.
धन्यवाद मयी, चिमुरी, अखी,
धन्यवाद मयी, चिमुरी, अखी,
बापरे मानसी!!! शेवट अगदीच
बापरे मानसी!!!
शेवट अगदीच अनपेक्षीत!
आवडली यात शंकाच नाही!
धन्यवाद सखी!
धन्यवाद सखी!
नाही आवडली.. कारण नसताना
नाही आवडली..
कारण नसताना वैफल्यग्रस्त माणसं पटत नाहीत.
आयुष्याचा सुरुवात होण्यापूर्वीचा शेवटही नाही.
सुंदर.
सुंदर. आवडलीच.
नानबा,वैफल्यग्रस्त नाही वाटली. उलट जन्मोजन्मींचे दोन सोलमेट्स अचानक सामोरे आलेत आणि सामान्य परिस्थितीत जखडलेल्या रोजच्या जीवनातूनही त्यांनी एकमेकांना साद घातलीये.
...... शेवट असाच हवा होता का? माहित नाही. कदाचित एखादा संदिग्ध शेवट जास्त खुलून दिसला असता असं वाटून गेलं. शिवाय राधा-कृष्ण, राम-सीतेचा संदर्भ दिल्यामुळे 'तिच्या' शेवटच्या स्वगतात शिव्या नको होत्या असंही वाटतं. इतक्या तरल स्वगतात शिव्या खटकताहेत.
मस्त लिहिलिय !
मस्त लिहिलिय !
आवडली. तुमची शैली एकदम खास
आवडली. तुमची शैली एकदम खास आहे.
धन्यवाद सर्वांना! नानबा, या
धन्यवाद सर्वांना!
नानबा, या कथेत कुणीही वैफल्यग्रस्त आहे असे नाही वाटत मला. मला भावनिक आंदोलने दाखवायची होती. आपल्याच मनातल्या भावना कधीकधी आपल्याही नकळत एवढ्या तीव्र वेगाने आपल्या विचारांत बदल घड्वून आणतात की आपल्या ध्यानी-मनीही नसलेलं काहितरी आपल्याकडून करवून घेतात. स्त्रीच्या गर्भारपणाच्या कालावधीत तिच्यात घडणारे हे भावनिक बदल अधिक तीव्र असतात. गर्भारपणात स्त्रीने अनेक भावनाप्रधान गोष्टी करणे टाळावे असे म्हणतात ते याचमुळे!
मामी, माझ्या लेखनाचा एवढा विचार केलात त्याबद्द्ल धन्यवाद! शिव्यांच्या वापराबद्द्ल तुमचे मत पटले. पण मला तिच्या भावनांची उत्कटता... तीव्रता दाखवायची होती. त्यामुळे तुमचा रसभंग झाला असल्यास क्षमा असावी!
मस्त!! खूप छान!
मस्त!! खूप छान!
आवडली
आवडली
धन्यवाद!!!
धन्यवाद!!!
Hridayala bhidali yaar..
Hridayala bhidali yaar.. Apratim likhan ahe
APRATIM, SHIVI CHYA AIVAJI
APRATIM, SHIVI CHYA AIVAJI DUSRA SHABD ASLYAS... BAKI SAGLA KHUP TARAL!!
भावनांची उत्कटता छान वर्णन
भावनांची उत्कटता छान वर्णन केली आहे. आवडली कथा