आमचे गोंय (भाग ९) : गोव्याची सांस्कृतिक जडणघडण

Submitted by टीम गोवा on 4 February, 2013 - 00:46

***
आमचें गोंय- प्रास्तविक(१)
आमचें गोंय- प्रास्तविक(२)
आमचें गोंय- भाग १ - प्राचीन इतिहास
आमचें गोंय- भाग २ - मध्ययुग व मुसलमानी सत्ता
आमचें गोंय- भाग ३ - पोर्तुगीज(राजकीय आक्रमण)
आमचे गोंय - भाग ४ - पोर्तुगिज (सांस्कृतिक आक्रमण)
आमचे गोंय - भाग ५ - शिवकाल आणि मराठेशाही
आमचे गोंय - भाग ६ - स्वातंत्र्यलढा १
आमचे गोंय - भाग ७ - स्वातंत्र्यलढा २
आमचे गोंय (भाग ८) - स्वातंत्र्यानंतर आणि घटकराज्य

***
हिंदू आणि ख्रिश्चन धर्माची, चालीरीतींची मिळून एक सुंदर गुंफण गोव्याच्या समाजजीवनात आपल्याला आढळून येते. याला कारण १५१० पासून गोव्यात असलेला पोर्तुगीजांचा प्रभाव. सुरुवातीच्या काळात हा प्रभाव छळाच्या स्वरूपात होता. अगदी अलीकडच्या इतिहासात, म्हणजे १९१० नंतर खर्यात अर्थाने हिंदू ख्रिश्चन सामंजस्य गोव्यात सुरू झालं. पोर्तुगीजांच्या आगमनानंतर गोव्यात त्यानी प्रथम मुस्लिमांचं अस्तित्व संपवलं, त्यामुळे इतर ठिकाणांप्रमाणॅ गोव्यात हिंदू मुस्लिम दंगे किंवा तेढ यांचा इतिहास नाही. मुस्लिम लोकसंख्याच अगदी कमी आणि पोर्तुगीजाना भिऊन राहिलेले मुस्लिम दबून गेलेले, हे त्याचं कारण. हिंदूंवर पोर्तुगीजांकडून जे अत्याचार झाले, त्यामुळे आपला धर्म टिकवण्यासाठी गोव्यातले हिंदू जास्तच पुराणमतवादी म्हणता येतील असे झाले. ही धर्म टिकवण्यासाठी नैसर्गिक प्रतिक्रिया होती. त्याशिवाय १९६१ पर्यंत गोवा इतर भारतापासून तुटलेला होता हेही एक कारण झालं.

लोकांचा देवभोळेपणा आणि सोवळं इतकं की पूजेसाठी लागणारी उपकरणंच काय, नैवैद्यासाठीची भांडी सुद्धा वेगळी ठेवतात. अगदी तूप, रवा वगैरे गोष्टी वेगळ्या ठेवतात. त्याला ‘कसलेतरी हात लागू नयेत म्हणून!’ आमच्या ऑफिसात महालसेचा पुजारी काम करायचा, तो इतर कोणाकडचंही काही खात नसे. पार्टी वगैरे केली तर भटासाठी फळं आणायची. कोणालाही त्यात काही वावगं वाटत नव्हतं. अगदी शहरात रहाणार्‍या ब्राह्मणांच्या स्वयंपाकघरात बाकी लोकाना प्रवेश नाही, त्यानी इतरांकडे काही खायचं नाही, हे अगदी हल्लीपर्यंत पाहिलंय. एकूणच गोव्यात जाती कटाक्षाने पाळल्या जातात असं निरीक्षण. अगदी सक्तीचा धर्मबदल केलेले आजचे ख्रिश्चन लोकसुद्धा लग्न जुळवताना आपल्या बाटण्यापूर्वीच्या जातीतलीच सोयरीक शोधतात. इथले ख्रिश्च्स्न हे बहुतेकसे रोमन कॆथॉलिक आहेत. पण किरिस्तांव बामण आणि किरिस्तांव खारवी वगैरे ऐकताना कोणाला त्यात काही विचित्र वाटत नाही.

भौगोलिक दृष्ट्या लगतच्या सिंधुदुर्ग जिल्हा आणि कारवार प्रमाणेच गोव्यात गणपती आणि शिमगा (इथे त्याला शिगमो म्हणतात) हे प्रमुख उत्सव होते, आहेत, पण घरात गणपती उत्सव साजरे करण्यात जास्त पारंपरिकता दिसून येते. अगदी सजावटीचं मखर पिढ्यानपिढ्या तेच वापरणे, फळाफुलांची माटोळी बांधणे हे असतंच, पण पोर्तुगीजानी मूर्ती पूजा करायला बंदी घातल्यामुळे कागदावरच्या गणपतीच्या चित्राची पूजा काही घरांत गणेशोत्सवात केली जाते. ही प्रथा का आणि कधी सुरू झाली याचं उत्तर फार कोणी देऊ शकत नाहीत, पण पोर्तुगीजांची भीती, हेच मुख्य कारण दिसतं. म्हणजे बाहेरून गणपतीची मूर्ती आणायला नको, आणि तिचं विसर्जन घराबाहेर जाऊन करायलाही नको.

matoli.jpg

पण सर्वसामान्य गोंयकार हा अत्यंत श्रद्धाळू. देवाला कौल लावल्याशिवाय काही करणार नाही. तीच प्रवृत्ती बाटलेल्या ख्रिश्चन लोकांमधे राहिली आहे. मूळची नावं आडनावं कुलदैवतं त्यानी पिढ्यानपिढ्या लक्षात ठेवली आहेत. लग्न झाल्यावर नव्या नवरानवरीने मूळ देवाला जायचं आणि बाहेरून प्रसाद घ्यायचा ही पद्धत अजून काही ख्रिश्चन लोक पाळतात. तसंच कौल लावायची सवय अंगात इतकी भिनलेली, की ख्रिश्चन देवाला कौल लावता येत नाही, मग चर्चमधल्या फादरला चिट्ठ्या देतात. एखाद्या मुलीबरोबर लग्न करू की नको म्हणून. ख्रिश्चनांच्या लग्नातही चुडा भरणे वगैरे विधी असतातच.

शिगमो म्हणजे मौजमजेचा सण. ख्रिश्चनांचा कार्निव्हालही याच्या जवळच्या काळात ठेवलेला. कार्निव्हालच्या मोठ्या मिरवणुका असतात. इस्टरपूर्वीचा ४० दिवसांचा उपास संपला की पणजीमधे किंग मोमोचं राज्य राज्य ३ दिवसांसाठी सुरू होतं. सगळ्या प्रमुख गावात मुखवटे चित्ररथ वगैरेनी सजलेल्या मिरवणुका निघतात. सगळ्यात पहिल्या गाडीत किंग मोमो, राणी असते आणि मग इतर वेगवेगळ्या विषयावरचे चित्ररथ असतात. शिगम्याच्याही मस्त मिरवणुका असतात. त्यात वेगवेगळी सोंगं, रोमटामेळ असतं. वाळपईला उत्तरेतून आलेला घोडेमोडणीचा नाच असतो. हा बहुधा राण्यांच्या पूर्वजांबरोबर आला असावा.

ghodemodani.jpggoa-carnival.jpg

इतर सगळे हिंदूंचे सण इतर ठिकाणांप्रमाणेच उत्साहात साजरे केले जातात. दिवाळी दसरा पाडवा असतोच. अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत दिवाळीत मात्र फटाके लावत नसत. फटाके, फराळाचे पदार्थ वगैरे करायचे ते गणपतीतच. दिवाळीच्या दिवशी पोह्यांचे ५ प्रकार करायचे. लक्ष्मीपूजनही महत्त्वाच. गोव्यातल्या दिवाळीत एक मजेशीर प्रकार असतो, तो म्हणजे नरकासूर दहन. उत्तर भारतातल्या रामलीलेसारखे कागद, चिंध्या आणि फटाके भरलेले नरकासुराचे पुतळे नरकचतुर्दशीच्या पहाटे जाळतात. ही पद्धत नक्की कधी आणि कशी सुरू झाली माहिती नाही, पण आहे खरी! दिवाळीच्या आधी लहान मुलं येणार्यात जाणार्यां कडून पैसे गोळा करतात, आणि एक मोठा मुखवटा विकत आणतात. त्याला शोभेल असं अंग आणि कपडे घालतात आणि चतुर्दशीच्या पहाटे नरकासुराचं दहन करून झोपायला जातात. कोणाचा नरकासुर जास्त चांगला याच्या स्पर्धा घेतल्या जातात.

narakasur.gif

ख्रिश्चनांसाठी नाताळ मोठा. नाताळात हिंदूंच्या दिवाळीच्या किल्ल्यांसारखे ख्रिस्तजन्माचे देखावे असलेले "गोठे" तयार करतात, त्यांच्या स्पर्धा आणि मोठमोठी बक्षीसं असतात. पणत्यांऐवजी मेणबत्त्या आणि आकाशकंदिलांऐवजी चांदण्या लावतात. दिवाळीसारखं एकूण वातावरण ख्रिश्चनही तयार करतात. फराळाचे वेगवेगळे पदार्थ तयार करतात. एकूण त्या त्या ऋतूत आनंद साजरा करायचा, नाव कोणतंही का असेना!

महालय म्हणजे म्हाळ हा गोव्यातल्या हिंदूंचा एक मोठा सण’. अगदी 2/2 दिवस रजा घेऊन म्हाळ वाढणारे लोक मला माहिती आहेत. तसेच ख्रिश्चनही मृतांच्या सन्मानार्थ एक दिवस पाळतात. हिंदूंसाठी तुळशीचं लग्न हा अजून एक मोठा महत्त्वाचा सण. गोव्यात या सगळ्या परंपरा कमालीच्या श्रद्धेने पाळल्या जातात. गावोगावच्या देवळांच्या जत्रा हे मोठंच प्रस्थ असतं. अशा जत्रांमधे ते कुलदैवत असेल त्या कुटुंबानी हजेरी लावलीच पाहिजे. काणकोणची गड्यांची जत्रा प्रसिद्धच आहे. तशी शिरगावची लईराई जत्रा आणि त्यात निखार्‍यावर चालत जाणारे भक्त हेही प्रसिद्ध आहेत. हिंदूंच्या जत्रांसारखीच ख्रिश्चन लोकांच्या चर्चमधली फीस्ट’. एक कथा आहे, त्याप्रमाणे लईराई देवीच्या बहिणीचं ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करण्यात आलं. ती म्हापश्याची मिलाग्रिस सायबीण’ लईराईची जत्रा आणि मिलाग्रिस फीस्ट पाठोपाठच येतात. हे दोन्ही उत्सव एका दिवशी आले तर मोठे उत्पात घडून येतात असं लोक समजतात.

गोव्यात ठिकठिकाणी प्रसिद्ध देवळं आहेत. काही देवळांची पोर्तुगीजांच्या भीतीने तेव्हा मराठ्यांच्या किंवा आदिलशहाच्या ताब्यात असलेल्या प्रदेशात स्थलांतरं झाली आहेत. पण अजूनही अशी देवळं मूळ गावच्या नावाने ओळखली जातात. फातर्प्याला शांतादुर्गेची दोन देवळं आहेत, एक शांतादुर्गा फातर्पेकरीण आणि एक शांतादुर्गा कुंकळेकरीण. कारण ती मूळ कुंकोळी गावची! गोव्यात शांतादुर्गा म्हणजेच सांतेरी काही ठिकाणी वारूळाच्या रूपात पुजली जाते. रवळनाथ बेताळ सारखे राखणदार देव फार मानले जातात. ही सगळी मूळ रहिवाशांची देणगी. पण स्थलांतर करून कर्नाटकात स्थायिक झालेले लोक अजूनही आपापल्या कुलदैवताना धरून आहेत. स्वातंत्र्यानंतर त्यानी या देवळाना मोठमोठ्या देणग्या देऊन ऊर्जितावस्था आणली.

या मूळ रहिवाशांचे नाच जसे धालो, फुगड्या अजून गावांमधे मोठ्या प्रमाणात पहायला मिळतात. धालो हा महिलांचा नाच. मोठ्या समूहात केला जातो. धालो साठी ठरलेली जागा असते, त्याला धालो मांड म्हणतात. सगळ्या बायका समोरासमोर दोन रांगा करून कोकणी आणि मराठी गाणी म्हणत मागे पुढे लयीत नाचतात. गणपतीत मृदंगासारखं घुमट वाद्य साथीला घेऊन घुमट आरती केली जाते. या घुमट आरत्यांचीही स्पर्धा घेतली जाते. ख्रिश्चन गावड्यांचा आवडता प्रकार म्हणजे मांडो’. यासाठी ठराविक वेषभूषा असते. पोर्तुगीज आणि भारतीय दोन्ही प्रकारच्या संगीताचं मिश्रण असलेली करूण गीतं मुख्यत: मांडो प्रकारात म्हटली जातात.

dhalo.gif

गोंयकार जातीचा कलाप्रेमी. मराठी नाटकं आणि कोंकणी तियात्र हा आवडीचा विषय. सगळ्या जत्रांमधे 2/3 तरी मराठी नाटकं झालीच पाहिजेत! सुविहित संगीत मराठी नाटकाची सुरुवात अण्णासाहेब किर्लोस्करानी केली. बेळगावला असताना ते गोव्यात कामानिमित्त आले होते, कुडचड्याच्या एका देवळात पौराणिक आख्यानांचे खेळ तेव्हा जत्रेनिमित्त त्यांनी पाहिले. हे खेळ देवळाचे पुजारी बांदकर भट बसवून घेत असत. अण्णासाहेबाना ते खेळ आवडले. त्यानी भटजीना हे खेळ घेऊन गोव्याबाहेर यायची विनंती केली. पण “आपण देवाची सेवा म्हणून हे खेळ करतो, तुम्हाला देवाचा प्रसाद देतो, तो घेऊन तुम्हीच असे खेळ सुरू करा असं बांदकरानी अण्णासाहेबाना सांगितलं. अण्णासाहेबांवर पारशी नाटकांचा प्रभाव पडला तसा या गोव्यातील नाटकांचाही पडला, असं बा. द. सातोस्करानी संकलित केलेल्या ‘गोवा प्रकृती आणि संस्कृती’ या पुस्तकात म्हटलं आहे.

तियात्र हा खास कोंकणी प्रकार. विनोदी फार्सिकल, आणि पाश्चात्य पोर्तुगीज पद्धतीचं संगीत यात असतं. तात्कालिक राजकारण, सामाजिक प्रश्न असे विषय असतात. स्टेजवरून राजकारण्याना मारलेले टोमणे ऐकून स्वत: तो राजकारणी हसत असल्याचं दृश्य इथे तुम्हाला सहजच बघायला मिळेल. या तियात्रांनाही गोव्यात भरपूर प्रेक्षकवर्ग मिळतो आणि मराठी नाटकांनाही. गोव्याने मराठी रंगभूमीला अनेक गुणी रत्नं बहाल केली. पं जितेन्द्र अभिषेकी आणि दीनानाथ मंगेशकर हे दोघे तर एकाच मंगेशी प्रियोळ गावातून आलेले. या दोघांबद्दल नव्याने सांगावं असं काही आता शिल्लक नाही.

याशिवाय गायकांमधे मोगुबाई कुर्डीकर, केसरबाई केरकर, किशोरी आमोणकर, पं. प्रभाकर कारेकर हे जरा आधीच्या पिढ्यांतले, तर प्रह्लाद हडफडकर, अजित कडकडे, हेमा सरदेसाई, रेमो फर्नांडिस हे जरा अलीकडच्या काळातील गोव्यातून पुढे आलेले. आणखी एक महत्त्वाचे गायक १९ व्या शतकाच्या उत्तरार्धातले प्रसिद्ध ख्यालगायक रामकृष्णबुवा वझे यांनी नागेशी आणि डिचोली इथे राहून अनेक प्रसिद्ध शिष्य तयार केले. ते केसरबाई केरकर, शिवरामबुवा वझे, दीनानाथ मंगेशकर, केशवराव भोसले विनायकबुवा पटवर्धन यांचे गुरू. तसेच खाप्रुमामा पर्वतकर हे अतिशय प्रसिद्ध तबलापटू गोव्यातलेच. पण इथल्या काहीशा जुनाट समाज रचनेमुळे असेल किंवा मुंबई हे गुणी जनांना व्यासपीठ मिळवून देणारं शहर म्हणून असेल, पण या सार्‍यांना मुंबईत जाऊन मगच यश मिळालं.

गोव्यातल्या देवळातील देवदासी पद्धतीतून अनेक कलाकार निर्माण झाले. गोव्यात याना भाविणी’ किंवा कलावंतिणी’ म्हटलं गेलं. त्यातील काही कलाकार मुंबईत स्थायिक झाले आणि त्यानी कल्पनातीत यश मिळवलं. गोव्यात आजही यांचा एक मोठा वर्ग आहे, पण आता त्यात सुधारणा झाली आहे. म्हणजे याना एका जातीचा दर्जा मिळाला आहे. देवदासी प्रथा आता देवळातून बंद झाली आहे, आणि या समाजातल्या मुली लग्न करून इतर कोणत्यही समाजाप्रमाणेच सुखाने रहात आहेत.

याशिवाय पाश्चात्य संगीतातील दिग्गज पियो पीटर डिसूझा, ख्रिस पेरी, लोर्ना कॉर्दिरो, लुसिओ मिरांडा हे गोव्यातलेच. सुपर कॉप” पद्मभूषण जुलिओ फ्रांसिस रिबेरो हेही मूळ गोव्यातले. प्रसिद्ध आर्किटेक्ट चार्ल्स कोरिया हे मूळ गोव्यातले. अनिल काकोडकर आणि रघुनाथ माशेलकर हे प्रसिद्ध शास्त्रज्ञ गोव्याचे सुपुत्र. फुटबॉलपटू ब्रह्मानंद शंखवाळकर, क्रिकेटियर दिलीप सरदेसाई आणि हॉकीपटू ज्योकिम कार्व्हाल्हो हेही गोव्यातलेच. धर्मानंद कोसंबी, त्यांचे सुपुत्र दामोदर धर्मानंद कोसंबी, पं. महादेवशास्त्री जोशी जुझे कुन्हा, हे संस्कृतीचे अभ्यासक आणि तज्ञ, मारिओ मिरांडा, सुबोध केरकर यासारखे चित्रकार, वर्षा उसगावकरसारखी अभिनेत्री हे सारे गोव्यातलेच.

फ्रॆंक मोराएस, डोम मोराएस, जुझे परेरा, टिओटोनिओ डिसूझा, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते रवीन्द्र केळेकर हे सारे गोव्याचेच सुपुत्र. त्यांच्या कामाला गोव्याच्या भूमीत सुरुवात झाली पण प्रसिद्धीसाठी सगळ्यानाच महाराष्ट्र आणि त्यातही मुंबईने मदत केली. मंगेशकर भावंडांचे आजही गोव्याशी जवळचे संबंध आहेत. पं. हृदयनाथ मंगेशकर एका कार्यक्रमासाठी गोव्यात आले होते, तेव्हा “गोव्याला मी महाराष्ट्राचं टोक समजतो” असं म्हणाले आणि प्रेक्षकात बसलेल्या आजी माजी मुख्यमंत्र्यानी या वाक्याला हसून दाद दिली होती!

असा हा गोवा. बराचसा पारंपरिक, पण पोर्तुगीजांच्या शेकडो वर्षांच्या प्रभावामुळे काहीसा बदललेला. जे काही रसायन तयार झालंय, ते मात्र सगळ्यांनाच मोहवणारं!

क्रमशः
**
विशेष सूचना - या लेखमालेचे स्वरूप एकंदरीतच ललित लेखनाच्या अंगाने जाणारे पण गोव्याच्या समृद्ध इतिहासाचे, आणि वर्तमानाचेही, दर्शन वाचकांना करून देणे एवढेच आहे. वाचकांना विनंती की त्यांनीही ते तेवढ्याच बेताने घ्यावे. आम्ही कोणीही इतिहासकार / इतिहासतज्ञ वगैरे नाही आहोत. पण थोडे फार वाचन करून, माहिती जमा करून इथे मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. तपशीलात अथवा आमच्या निष्कर्षात चूक / गल्लत असू शकते. पण काही चांगले लेखन यावे आणि गोव्याची रूढ कल्पना सोडून त्याहून वेगळा गोवा काय आहे हे लोकांना कळावे म्हणूनच हा सगळा लेखमालेचा उद्योग.

- टीम गोवा (ज्योति_कामत, प्रीत-मोहर, बिपिन कार्यकर्ते )

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान माहीती.. परंतु अजुन विस्ताराने हवी होती.. घुमट आरती बद्दल अजुन थोडे लिहा.. तसेच गणपतीत अनेक ठिकाणी बायकांची भजनी मंडळे असतात.. बरेचदा गणपती पुढे गोफ वीणला जातो.. सिंधुदुर्ग मध्ये माटोळीसाठी खरी फळे वापरली जातात तर गोव्यात बरेचदा लाकडी फळे दिसतात..
यंदा ८ ते १२ फेब्रु. दरम्यान कार्निवल आहे..

छान माहिती.. ही गोव्याची खरी संस्कृती आहे..लोकांपर्यन्त मात्र खूप चुकीच्या कल्पना जातात..त्यामुळे टीम गोवाचं विशेष अभिनंदन..

दिवाळीत पोह्यांचे ५ च प्रकार नाहीत..जमेल तेवढे असतात..अगदी स्पर्धा असतात्,तुझ्या घरी ११ तर मझ्या घरी १२ प्रकार अशा.. Happy

सतिश आणि पिशी अबोली, धन्यवाद!

सतिश, खरं आहे. एकेका सणाबद्दल एकेक लेख लिहिता येईल. पण पुन्हा तेच कारण! थोडक्यात आणि आटोपशीर पण शक्य तेवढी माहिती वाचकांसमोर ठेवायची होती.

घुमट आरती इथे प्रत्यक्षच पहा!

पिशी अबोली, खरे आहे. पोह्यांचे असंख्य प्रकार करता येतात, पण सगळ्यांनाच आता धावपळीत तेवढे जमत नाही म्हणून शक्यतः ५ तरी करायचेच!

आमच्या घरी तर दिवाळीत गावचे सगळे लोक प्रत्येकाच्या घरी जातात पोहे खायला. आणि जाणे कंपल्सरी / मँडेटरीच असते. एखादी अडचण आल्यासच एखादा चुकतो अथवा नाही .सुरवात आमच्या घरुन होते. Happy

इतर लेखांप्रमाणेच हा लेख सुद्धा वाचनीय आहे. खुप छान माहिती. मी मुळची सिंधुदुर्गातली पण गोव्यात १२ वर्ष राहीले आहे. तुम्ही म्हणता त्या प्रमाणे खरचं दोन्ही कड्च्या सण साजरा करण्याच्या पद्धती थोड्याफार फरकाने सारख्याच आहेत. लवकरच पुढचा भाग येऊदे. धन्यवाद.

<<<आमच्या घरी तर दिवाळीत गावचे सगळे लोक प्रत्येकाच्या घरी जातात पोहे खायला. आणि जाणे कंपल्सरी / मँडेटरीच असते. एखादी अडचण आल्यासच एखादा चुकतो अथवा नाही .सुरवात आमच्या घरुन होते. >>>
Happy
अगदी खरं..जाम मजा असते पण पोहे खायला जाण्याची..आणि रात्रभर जागून नरकासूर स्पर्धा बघण्यातपण स्वर्ग आहे.. Happy