लहानपणी घरातल्या मोठ्या व्यक्तींना नमस्कार केला की आशीर्वाद मिळतो, “यशस्वी भव!” तेव्हा नकळतपणे मनात कुतूहल निर्माण होतं.. “आजी ‘यशस्वी भव’ म्हणजे गं काय?” इथेच सुरुवात होते त्या प्रवासाची..
शोध सुरु होतो काय असतं ते यश? ते यशस्वी होणं? आयुष्याच्या कुपीतले दिवस जसे उलगडत जातात, तशी या प्रश्नांची उत्तरे मिळत जातात. कधी बरोबर कधी चूक कधी अचूक कधी फसवीसुद्धा मग सोबतच मन बांधत जातं एक प्रतिमा यशाची, यशस्वीतेची आणि ती साध्य करण्यासाठी प्रत्येकजण अक्षरशः धडपडत असतो. सुरुवात होते घरापासून. 'खूप मोठं व्हायचंय' हे स्वप्न पाहायला शिकवणारं, थोडं उडाल्यावर तोंडभरून कौतुक करणारं, मागे वळून पाहिल्यावर अजून उंच उड म्हणणारं, चुकलं तर रागे भरणारं.. आणि आपलं पाखरू उंच आकाशात दिसेनासं झालं तरी डोळ्यात प्राण आणून त्याची वाट बघणारं.. ते घर च पाखराच्या पंखात बळ देत असतं उंच आकाशात झेपावण्याचं..!
'खेळताना माझा पतंग सर्वात उंच जायला हवा.. त्यासाठी मी काय वाट्टेल ते करीन' हे म्हणताना बाळगलेली जिद्द किंवा गल्लीमध्ये क्रिकेट खेळताना सुद्धा टीम मधल्या प्रत्येकाची घेतलेली काळजी.. थोडीशी भांडणं आणि मारामारी.. धावण्याच्या शर्यतीत प्रतिस्पर्ध्याला मागे टाकून पुढे सरण्यासाठी निर्माण झालेली चुरस.. ६० जणांच्या वर्गात पहिले आल्यावर होणारा आनंद.. जिंकलेल्या स्पर्धा,सामने.. आपल्या टीम ला प्रोत्साहन देण्यासाठी दिलेल्या घोषणा, ढोल, ताशे, मिरवणुका आणि सेलिब्रेशन... वाटतं हेच ते यश..आणि कधी कधी भरकटही होते. ह्या क्षणांना भाळून पुढे जायचा विसरही पडतो तेव्हा.. अशावेळी 'चढलेली प्रत्येक पायरी केवळ मैलाचा दगड असून यशाचं शिखर तर अजून फार दूर आहे', असा संस्कार पुढे जायची प्रेरणा देत असतो.
मनामध्ये अनेक आदर्श उभे असतात त्यांच्यासारखं होण्यासाठी कसोशीनं प्रयत्न चालू असतात. काळ सरतो तसे जुने आदर्श मागे पडतात नवे उभे ठाकतात पण सोबतच मनातली यशस्वीतेची प्रतिमा भक्कम होत जाते.. त्या प्रतिमेशी स्वतःची नकळतपणे बरोबरी तर रोजच होत असते मग त्याबरोबरच स्वतःच स्वतःला जोखणंही..
यशाकडे मार्गस्थ होताना महत्त्वाचं ते योग्य वाटा निवडणं.. ह्या वाटा पारखताना आपला नैसर्गिक कौल ओळखून बहुतेकदा वाट निवडली जाते.. साधारणतः साधी सोपी वाट निवडण्याकडेच सामान्य माणसांचा कल असतो.. पण काही वेळा आपला कौल नसून सुद्धा आव्हान म्हणून एखादी वेगळी वाट निवडली जाते. अशा वेळी शेवटपर्यंत पोचण्याची खात्री असो अथवा नाही.. पण अशी वेगळी वाट निवडण्यानेच व्यक्ती मोठी झालेली असते.. जगातली जास्तीत जास्त माणसे अनुयायी मानसिकतेचे असताना स्वतंत्र विचारांनी चाकोरीबाहेरची वाट निवडण्यासाठी हिम्मत लागते.. प्रवाहाविरुद्ध पोहताना प्रवाहाचा विरोध सहन करावा लागतो खरं.. मात्र दुर्दम्य इच्छाशक्तीपुढे झिजलेली पायवाटही नमते.. अशाच ठिकाणी सुरवात होते एका नव्या महामार्गाची..आणि प्रस्थापितांना हलवून टाकणाऱ्या विक्रमाची.
चाकोरीबद्ध जगण्यासाठी सुद्धा कौशल्य लागतं. आणि ते कौशल्यानं जगणं फार कमी जणांना जमतं. चौकटीत लागू होणारे नियमांचं पालन आणि बंधनांचा स्वीकार करत जगण्याला सामोरं जाणं हे प्रत्येक नवीन पिढीसाठी आव्हानात्मक ठरतं.
बऱ्याचदा नियती वाट निवडण्याची संधीच देत नाही.. ती स्वतःच एखाद्या वाटेवर आपल्याला आणून सोडते.. अशावेळी आत्मविश्वासानं पुढली पावलं उचलणं हा खरा पुरुषार्थ ठरतो.
एवढ्यातच ‘यश म्हणजे काय?’ ह्या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाला त्याच्या अंतर्मनाकडून वेगळ मिळत असतं.. ते कालानुरूप अधिकाधिक प्रगल्भ होत जातं आणि त्याला वास्तवात आणायला प्रत्येकजण आपल्या योग्यतेप्रमाणे अक्षरशः झिजत असतो. मध्येच काही वळणं येतात.. काही अडथळे.. आणि काही विश्रांतीची ठिकाणही.. मग येतो एक वाटाड्या.. आपला हितचिंतक, मार्गदर्शक! सर्वात आधी ज्याचे पाय धरावे असं म्हटला जातं तो वंदनीय गुरु, हातात प्रकाशमान दिवा घेऊन सारी वाट उजळून टाकत..दाखवतो, ‘ध्येय अजून खूप लांब आहे..’ अशावेळी मनातल्या श्रद्धेने पावलं टाकली की अंतर कमी होत जातं.
कधी निवडलेली वाट चुकते..प्रयत्न कमी पडतात.. आहे त्या गोष्टीत समाधान मिळत नाही..कदाचित त्यालाच ‘अपयश’ म्हणतात. आपण चुकीच्या मार्गावर आहोत किंवा अजून प्रगती करण्यास संधी आहे हे दर्शवणारी आणि पुढे अधिक योग्य निर्णय घेण्यास भाग पाडणारी अपयशाशिवाय दुसरी कोणती घटना असू शकते.? युद्ध म्हटलं की विजय आणि पराजय ह्या दोन परस्पर विरोधी गोष्टी येतात. पण अपयश ही काही यशाच्या विरोधी घटना नव्हे.. तिला यशोमार्गातील दीपस्तंभ म्हणणे वावगे ठरणार नाही.
यशस्वी होताना अभिजात गुणांसह घेतलेले कष्ट आणि वेळोवेळी ध्येयाला जागृत ठेवणारा सकारात्मक दृष्टीकोन जसा गरजेचा तितकच कामाचं आणि वेळेच योग्य नियोजनही. वैयक्तिक यशासोबतच समूहाच्या यशासाठी सहकाऱ्यांवर टाकलेला विश्वास, आणि लोकांनी आपल्यावर टाकलेल्या विश्वासाचे चीज करणं, इतरांसाठी झोकून देणं.. स्वतः जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ असून राष्ट्रपती होऊन देशाची सेवा करणारे अब्दुल कलाम, स्वतःचे विक्रमांवर विक्रम झाल्यानंतरही बराच काळ टीम साठी खेळणारा सचिन अशी अनेक उदाहरणं जगण्याची प्रेरणा बनून जातात.
गेल्या वर्षी कॉलेज मध्ये मुलाखतीच्या निमित्ताने शंकर महादेवन, पंडित जसराज, अतुल कुलकर्णी, नीलिमा मिश्रा, मंगेश पाडगावकर, सिंधुताई सपकाळ, अण्णा हजारे, पोपटराव पवार अशा अनेक दिग्गजांची भेट झाली. मुलाखत हे माध्यम होतं पण त्यातूनच ह्या व्यक्तींशी जवळून परिचय होऊ शकला.. त्यांच्यासोबत सावलीसारखं वावरणारं यशस्वीतेच रहस्य..त्यांच्या वागण्याबोलण्यातून, त्यांच्या साधेपणातून निथळत होतं..आणि नकळत ते मनावर कोरलं जात होतं..
त्यांच्या उत्तुंगतेकडे पाहूनच सहज वाटून गेलं, ‘केवळ प्रतिस्पर्ध्यावर विजय म्हणजे यश नव्हेच. आपण ठरविलेल्या ध्येयापर्यंत समाधानाने पोचणे म्हणजे यश.. यश म्हणजे सुरवात एका नव्या विचाराची.. यश म्हणजे जाण स्वतःच्या योग्यतेची..यश म्हणजे धडपड अनंतापर्यंत पोचण्याची.. सातत्याने, विश्वासाने केलेला एक अनोखा प्रवास..! म्हणूनच आनंदाने आयुष्य जगणारा प्रत्येक जीव यशस्वी आहे..’
आनंदाचे डोही...
Submitted by Manasi R. Mulay on 25 January, 2013 - 14:28
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान लिहलय.......
छान लिहलय.......
अपयशी मानसाने हा लेख वाचायला
अपयशी मानसाने हा लेख वाचायला हवा. फारच छान.
छान लेख अन्वया.
छान लेख अन्वया.
श्यामराव, अश्विनीमामी,
श्यामराव, अश्विनीमामी, बहारश्री प्रतिसादाबद्दल धन्यवाद!