हंगेरी २: गुयाश कम्युनिझम

Submitted by टवणे सर on 19 January, 2013 - 14:54

साम्यवादाबद्दल मला लहानपणापासून जबर कुतुहल होते. पुढे महाविद्यालयात असताना विविध खरी-खोटी पुस्तके वाचून साम्यवादाबद्दल वेगवेगळ्या कल्पना डोक्यात होत्या. पुर्वाश्रमीच्या एखाद्या साम्यवादी देशातल्या लोकांकडून साम्यवाद, त्यावेळची राजकीय परिस्थिती, समाजजीवन ह्याबद्दल बरेच ऐकावे, बोलावे असे मनात होते. पण हंगेरीत ते मात्र अजूनही पुर्ण झालेले नाही. त्यामुळे ह्यात जे लिहिन ते बरेचसे मी वाचलेल्या व बघितलेल्या गोष्टींवर अवलंबून आहे आणि थोडेसेच इथल्या लोकांकडून ऐकलेल्या गोष्टींवर.

१९२०-३०च्या जागतिक मंदीवर हंगेरीने फॅसिस्ट जर्मनी-इटली ह्यांच्याबरोबर भरपूर व्यापार करून मात करायचा प्रयत्न केला. त्यात त्यांना बर्यापैकी यशही आले. ट्रायनॉनचा करार आणि त्याची जखम ताजी होती. हंगेरीची त्यामागली दोन-तीनशे वर्षे ऑस्ट्रियन लोकांबरोबर गेलेली होती. ऑस्ट्रियादेखील जवळपास जर्मनीच्या अमलाखाली गेला होता आणि एक ऑस्ट्रियन आता जर्मनीचा सर्वेसर्वा बनला होता. अश्या सगळ्या परिस्थितीत हंगेरी 'शत्रुराष्ट्रांबरोबर' युद्धात उतरला. त्याचा फायदा म्हणुन हंगेरीला त्यांची ट्रायनॉनच्या करारात गमावलेली बराचसा भूभाग बक्षिस म्हणुन परत मिळाला. ह्या बक्षिसांना 'विएन्ना बक्षिसपत्रे' म्हणतात. १९३० नंतर मध्य युरोप अगदी अशांत-अस्थिर भुमी झाली होती. नाझी जर्मनीने झेकोस्लावाकिया बरखास्त करून झेक आणि स्लोवाक गणाराज्य स्थापले ज्यात स्लोवाकांना अधिक स्वतंत्रता दिली. त्याचवेळी हंगेरीयान सैन्य स्लोवाकियात शिरून १९२०पुर्वीची आपली भूमी पुन्हा काबीज करत होते - आणि तेसुद्धा फासिस्ट जर्मनीच्याच आशिर्वादाने. झेक सैन्याने महायुद्धाच्या शेवटापर्यंत जर्मनांविरुद्ध उघड-छुपा लढा दिला. हंगेरी मात्र जवळपास शेवटापर्यंत जर्मनांच्या बाजूने राहिला.

जेव्हा जर्मनांनी रशियाविरुद्ध आघाडी उघडली तेव्हा मात्र युद्ध थेट हंगेरीत आले. बुडापेस्टची युद्धात बरीच हानी झाली. पण जसे जर्मनीचा पडाव होउ लागला आणि सोविएट हंगेरीत शिरले तसे हंगेरिअन राजकारण्यांनी सोव्हिएतांबरोबर पण करार केले. पण काही हंगेरिअन लष्करी तुकड्या शेवटपर्यंत जर्मनांसोबत लढत राहिल्या. साधारण ४४ ला हंगेरी पुर्णपणे लाल सैन्याच्या अंमलाखाली गेला. ह्याच सुमारास जगाची भांडवलशाही-साम्यवादी (पश्चिम-पूर्व) अशी विभागणी झाली.

सोव्हिएट रशियाला हंगेरीत (आणि बरोबरीने पोलंड, रोमेनिया, अल्बेनिया, झेकोस्लावाकिया वगैरे वगैरे) साम्यवादी सरकार आणायचे होते. त्यासाठी प्रचंड प्रचार करण्यात आला. साधारण ३०-४०च्या दशकात मध्य (तसेच पश्चिम) युरोपात तरुण-विद्यार्थी वर्गात सामयवादी विचारधारा प्रबळ होती. पण तरिही ४६च्या निवडणुकीत साम्यवादी पक्षाची धूळधाण उडाली. झोल्टन टिल्डीच्या नेतृत्वाखाली एक युती सरकार आले. पण सोव्हिएट रशियाने निवडून आलेल्या पक्षाला/सरकारला वाकवून करुन स्वतःला धार्जिणे साम्यवादी पक्षाची लोकं महत्वाच्या पदांवर बसवली. लाझ्लो रायक त्यापैकी एक. हा हंगेरीचा गृहमंत्री बनला. ह्या लाझ्लो रायकची कहाणी एकदम टिपिकल १९८४/डार्कनेस अॅट नून सारख्या कादंबर्यांसारखी आहे.

१९४९ मध्ये राकोशि माथ्याश साम्यवादी पक्षाचा आणि पर्यायाने हंगेरीचा नेता बनला. हा एकदम स्टालिनचा खंदा पुरस्कर्ता आणि त्याच्या पावलावर पाउल टाकून चालणारा होता. लाझ्लो रायकने गृहमंत्री असताना हंगेरीत राजकीय पोलिसदलाची (secret police) स्थापना केली आणि त्याचा उपयोग इतर विचारधारेच्या तसेच स्वतःच्याच पक्षातील विरोधकांचा नाश करण्यासाठी केला गेला. ह्याच राजकीय पोलिसदलाला वापरून राकोशिने लाझ्लो रायकलाच पकडले आणि त्याच्यावर साम्यवादद्रोहाचा खटला दाखल केला. मग यथावकाश लाझ्लो रायकने तो ट्रॉट्स्की-टिटो प्रभृतींचा हस्तक होता वगैरे वगैरे जबाब दिला. ह्या खटल्याचा निकाल लागून त्याला संपवण्यात आले. हा संपूर्ण खटला - रायकला पकडणे, त्याने जबाब देणे, त्याला देशद्रोही ठरवून संपवणे - हा त्यावेळच्या साम्यवादी जगताचे एक छोटे चित्रण आहे. रायकच्या बरोबरीने राकोशिने सत्तेचे प्रबळ दावेदार पण एकतर संपवले किंवा पार्टीतून हाकलले.

४९ ते ५६ हा काळ हंगेरीसाठी काळा काळ होता. ह्यात स्टालिनच्या 'ग्रेट पर्जेस'च्या धर्तीवर अनेक हंगेरिअन संपवले (liquidate) गेले. सोव्हिएट रशियात स्टालिन हेच करत होता. पण स्टालिनचा अंत राकोशिचा देखील अंत ठरला. राकोशिच्या जागी हंगेरीत इम्रे नाज्यी (मॉज्यॉर मधला ज्य) पंतप्रधान झाला. अर्थात राकोशि पार्टीचा अध्यक्ष म्हणुन टिकून राहिला.

इम्रे नाज्यने अर्थव्यवस्थेची घसरण रोखण्यासाठी उदारीकरणाचे धोरण राबवायला सुरुवात केली. पण सगळ्यात टोकाचे पाऊल म्हणजे त्याने बहुपक्षीय निवडणुक व वार्सा करारातून हंगेरीला मुक्त करण्याची कुजबुज सुरु केली. पक्षाने (म्हणजे राकोशिने) नाज्यीला पदच्च्युत केले. पण १९५६मध्ये वीसाव्या कम्युनिस्ट ईंटरनॅशनलमध्ये निकिता कृश्चेव्हने त्याच्या भाषणात स्टालिन आणि त्याच्या पित्त्यांची जाहीर निर्भत्सना केली. लाझ्लो रायक पुन्हा हिरो बनला.

हंगेरीत सामान्य लोकांचा साम्यवादी सरकारला पाठिंबा नव्हताच. २३ ऑक्टोबर १९५६ ला बुडापेस्टमध्ये विद्यार्थांचा 'शांततेत' मोर्चा निघाला. तो मुख्यत्वेकरुन सोव्हिएत आणि साम्यवादविरोधी होता. त्याला हिंसक वळण लागून शहरभर दंगा उठला. पार्टीने घाबरून इम्रे नाज्यीला पुन्हा पंतप्रधान केलं. इम्रे नाज्यीने रेडिओवरुन भाषणात लोकांना सांगितले की आता लवकरच नवी पहाट होइल. पुढल्या काही दिवसातच इम्रे नाज्यी आणि त्याच्या सहकार्‍यांनी पार्टी ताब्यात घेतली, उजव्या विचारसरणीच्या लोकांना मुक्त करायला सुरुवात केली आणि १ नोव्हेंबरला इम्रे नाज्यीने हंगेरी 'वार्सा करारातून' बाहेर पडेल आणि तटस्थ राष्ट्र बनेल अशी घोषणा केली. त्याने युनोला मदतीची मागणी केली.
हंगेरीच्या दुर्दैवाने १९५६ मध्येच इजिप्तचा अध्यक्ष गमाल अब्दुल नासर आपले बाहु फुरफुरत होता. त्याने इस्राएलच्या अस्तित्वाला आव्हान देन 'तिरानचा चिंचोळा समुद्रीमार्ग' इस्राएलच्या वाहतुकीसाठी बंद केला. मग त्यावर्षीच्या जुलैमध्ये त्याने सुएझ कॅनाल कंपनीचे राष्ट्रीयीकरण केले आणि इस्राएली जहाजांना सुएझ कॅनालामधून जायला बंदी केली. २९ ऑक्टोबरला, म्हणजेच जेव्हा हंगेरीत एव्हडी उलथापालथ चालली होती तेव्हा, इस्राएलने इजिप्तवर हल्ला चढवून सिनाई पेनिन्सुला आपल्या ताब्यात घेतला. ह्या चढाईला ब्रिटिश आणि फ्रेन्च सैन्याची इस्राएलला मदत होती. सर्व जगाचे लक्ष पुन्हा एकदा स्फोटक अरब-इस्राएल प्रश्नाकडे वळले. इतक्या महत्वाच्या जागतिक संघर्षाच्या तुलनेत छोट्याश्या हंगेरीकडे आणि तीत होणार्‍या उठावाकडे कशाल कोण बघतोय. तसेच अमेरिकेला देखील रशियाचा थेट धिक्कार करणे अवघड होते कारण त्याचवेळी सुएझमध्ये इस्राएल इंग्लंड-फ्रेन्चांच्या मदतीने स्वायत्त इजिप्तवर हल्ला करत होता.
कृश्चेव्हने हंगेरीतल्या घडामोडींनी चिंतीत होवून लाल सैन्याला हंगेरीत घुसवले. प्रबळ सोव्हिएट सैन्याने हंगेरिअन सैन्याचा किरकोळीत पराभव केला. इम्रे नाज्यीला पदच्च्युत करून 'यानोश कादार'ला हंगेरीचा नेता बनवले. हा यानोश कादार पुढे १९८८च्या मे महिन्यापर्यंत म्हणजे तब्बल ३२ वर्षे हंगेरी सोशल वर्कर्स पार्टीचा (आणि पर्यायाने हंगेरीचा) अध्यक्ष राहिला. गुयाश कम्युनिझमचा उद्गाता हा कादारच!

भारत अमेरिका संबंधांमध्ये ह्या हंगेरिअन क्रांतिचा महत्वाचा संदर्भ आहे. नेहरुंनी इस्राएलने इजिप्तवर आक्रमण केल्याचा लगेच निषेध नोंदवला. आयसेनहॉवरच्या अमेरिकेने भारताला हंगेरीत रशिया करत असलेल्या क्रांति दडपण्याच्या अत्याचारांविरुद्ध निषेध नोंदवण्याची मागणी केली. पण भारताने चकार शब्द काढला नाही. 'तटस्थ' भारताच्या डाव्या बाजूला झुकलेल्या ह्या भुमिकेने अमेरीकी परराष्ट्र खात्यात भारताबद्दल असलेली नाराजी पक्की केली व पाकिस्तान अमेरिकेचा एक सच्चा दोस्त बनला (संदर्भः इन्डिया आफ्टर गांधी, रामचंद्र गुहा; इंदर वर्मांचे इन्डियन एक्स्प्रेसमधील सदर - ज्यात इस्राएल-अरब युद्ध व भारताची त्यावेळची भुमिका ह्यावर दोन-तीन वेळा लेख आले. ह्या घटनेबद्दल वेगवेगळी मते आहेत. हे माझे मत आहे जे चुकीचे असून शकते).

आजच्या हंगेरीत २३ ऑक्टोबर हा राष्ट्रीय सुट्टीचा दिवस आहे - हंगेरीअन क्रांतिच्या स्मरणार्थ. आणि इम्रे नाज्यी हा त्या क्रांतिचा नेता म्हणुन गौरवला जातो. हिरोज स्क्वेअर ह्या बुडापेस्टमधल्या चौकात ह्या क्रांतिच्या स्मरणार्थ सेकेशफेहेरवारमध्ये एके ठिकाणी ह्या क्रांतिच्या स्मरणार्थ एक मोठे छान शिल्प आहे. ग्रानाइटच्या दगडांच्या पट्ट्या वापरून एक पाण्याच्या ओघळाचे दृश्य बनवले आहे. अर्थात साम्यवादाचा पाडाव होइपर्यंत ही ऑक्टोबर क्रांति 'देशद्रोही' कारवाई म्हणुनच ओळखली जात होती आणि शाळातून देखील तशीच शिकवली जात होती.

हंगेरीअन खाद्यपदार्थ कुठला असा प्रश्न तुम्ही कोणा हंगेरिअनला विचारला तर पुढल्या क्षणी उत्तर येईल 'गुयाश' (हंगेरीयन स्पेलिंग gulyás - ly हे हंगेरिअन भाषेतले एक अक्षर आहे आणि त्याचा उच्चार 'इय' असा होतो). गुयाश म्हणजे मटणाचा रस्सा. अगदी दिसतो पण तसाच. फक्त त्यात आपल्याएव्हडे मसाले नसतात इतकच. बाकी एका तिकाटण्यावर टांगलेल्या भांड्यात तेलावर कांदा परततात, त्यात मॅरिनेट केलेले बीफ किंवा पोर्कचे तुकडे टाकतात, मग लाल तिखट, लसूण आणि पाणी टाकून रटारट उकळतात. मग गाजर, बटाटे वगैरे भाज्या सारतात. तर थोडक्यात बर्‍याच गोष्टींचे एकत्र मिश्रण जे सहसा इतर कुठे आढळत नाही (उदा: बीफ आणि बटाटा). हंगेरिअनांचे लाल तिखटावरचे प्रेम हे परत कधितरी, पण युरोपात मला इतर कुठेही पाप्रिका आणि लाल तिखट इतक्या आनंदाने खाणारे कुणी आढळले नाहियेत.

तर कादारसाहेबांनी मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट-ट्रॉट्स्किस्ट-स्टालिनिस्ट वगैरे साम्यवादाच्या वादांना एकत्र घुसळून, थोडेफार बदलून, आपल्याला हवे तसे वाकवून ३०-३२ वर्षे हंगेरीत एक जरासा बरा साम्यवाद राबवला. त्याला गुयाश कम्युनिझम म्हणु लागले. यानोश कादारने सर्वात प्रथम बदल केला तो पार्टीच्या मुख्य विचारवाक्यात - आधी ते 'जे आमच्याबरोबर नाहीत ते आमच्या विरोधात आहेत' असे होते. कादारने ये बदलून 'जे आमच्या विरोधात नाहीत ते आमच्या बरोबर आहेत' असे केले. ह्यामुळे गुप्त-राजकीय पोलिसांचा त्रास हंगेरीत बराच कमी झाला. इतर साम्यवादी राष्ट्रांच्या तुलनेत हंगेरीची आर्थिक परिस्थिती बरीच बरी राहिली. हंगेरीत वैयक्तिक-राजकीय मतस्वातंत्र्य, प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य 'लोखंडी पडद्या' पलीकडील राष्ट्रांमध्ये सर्वात जास्त होते.

माझ्याबरोबर काम करणारे अनेक जण - विशेषतः जे चाळिशीच्या आसपास वा पुढे आहेत ते गुयाश कम्युनिझम अनुभवलेले लोक. त्यांच्या तोंडून त्या काळाबद्दल फार शिव्या ऐकायला मिळत नाहीत. अश्या लोकांशी बोलण्यातून मला समजलेला तेव्हाचा हंगेरी त्यांच्या भाषेतः
"आजच्या तुलनेत तेव्हा नक्कीच कमी विचारस्वातंत्र्य होते. पण म्हणुन उठसुट कुणालाही अटक वगैरे होत नव्हती. धर्माला-चर्चला समूळ उखडून टाकले गेले नाही. लोक धार्मिक होते, चर्चला जात होते, सण साजरे करत होते. इतर साम्यवादी देश विशेषतः बल्गेरिया, रोमेनियाच्या तुलनेत बाजारात खूप व खूप प्रकारच्या वस्तु असत. अल्बेनियातला होझा आणि रोमेनियातल चेचेस्कु वगैरेंच्या तुलनेत कादार खूपच चांगला होता (ह्याचा अर्थ कादार भला नेता होता असे मुळीच नाही). लोकांचा उन्हाळ्यात सुट्टी मिळत होती व लोक बालाटोनला किंवा इतर 'गरीब' साम्यवादी देशात सुट्टीला जात होते. लोकांना दोन प्रकारची पारपत्रे (पासपोर्ट) मिळत. एक लाल पारपत्र जे अर्ज केल्यावर लगेच मिळत असे. ह्या पारपत्रावर सर्व साम्यवादी देशात फिरता येत असे व त्यासाठी विसाची गरज नव्हती. दुसरे असे निळे पारपत्र जे मिळवणे बरेच अवघड होते. हे पारपत्र ऑस्ट्रिया आणि पुढे पश्चिमेकडे जाण्यासाठी जरुरी होते. अर्थात बर्‍याचदा ह्या पश्चिमी देशांच्या चलनाच्या तुलनेत हंगेरीचे चलन एव्हडे स्वस्त होते की ब्रेड विकत घेणेसुद्धा जीवावर येई. बाहेरच्या, विशेषतः पश्चिमी देशांबद्दलच्या बातम्या सेन्सॉर होउन येत असत. तरिही हंगेरीमध्ये एकुणात पश्चिम युरोप-अमेरिकेत सुबत्ता आहे आणि सोविएत आणि वार्सा करार देशात गरिबी हे सर्वांना माहिती होते.
शाळा-कॉलेजात सर्व शिक्षण हंगेरीअन भाषेतून होते (आजही सर्व शिक्षण अगदी वैद्यकीय, तांत्रिकी, कायदा, शास्त्रे वगैरे वगैरे हंगेरिअन भाषेतूनच शिकवले जाते). रशियन भाषा हे तेव्हाची इंग्रजी होती - म्हणजे शाळेत माध्यमिक वर्गांपासून रशियन शिकवले जाई. १९५० ते ९० पर्यंत शाळेत गेलेला प्रत्येक हंगेरिअन रशियन शिकला पण कुणालाही ती भाषा आवडत नसे. आज फारच क्वचित एखादा रशियन बोलू शकतो व समजू शकतो. थोडक्यात शाळेत शिक्षक, विद्यार्थी सर्वांनीच रशियन भाषेच्या पाट्या टाकल्या.
उत्तरेला झेकोस्लावाकिया, इशान्येला सोव्हिएत रशिया (आजचा युक्रेन) आणि पुर्वेला रोमेनिआ ह्यांच्याबरोबरच्या सीमा ओलांडायला तुलनेने सोप्या होत्या. युगोस्लाव्हिआला (म्हणजे आजची सर्बिया बरोबरची दक्षिणेची व क्रोएशिया व स्लोवेनियाबरोबरची वायव्येची सीमा) साम्यवादी समजत नसत. त्यामुळे युगोस्लावियात जाणे सोपे नव्हते. पण सर्वात प्राणपणाने राखली जायची ती ऑस्ट्रियाबरोबरची सीमा. सैन्यात काम करणे प्रत्येक मुलासाठी बंधनकारक होते. विएन्नाला जाणार्‍या रेल्वेमध्ये सीमेच्या अलिकडील गावात प्रत्येकाच्या कागदपत्रांची कसून तपासणी होत असे. तसेच त्यांच्याबरोबरचे सामान, मोठी गाठोडी, सामानाचे डबे त्यात कोणी लपले नाहिये ना ते बघायला तपासले जात असत. मग दोन सैनिक मोटरमनच्या केबिनच्या बाहेर गाडीच्या दिशेला तोंड करून आणि दोन सैनिक शेवटच्या डब्याच्या बाहेर लटकून सीमेपर्यंत गाडीतून कुणी उडी मारत नाहिये ना हे बघत जात असत. सीमेवर मुख्यत्वे कोणी ऑस्ट्रियात पळून तर जात नाहिये ना हे बघण्याचेच काम होत असे. बाकी सैन्यातली सक्तिची भरती म्हणजे डोक्याला तापच होता. जर शक्य असेल तर खोटी वैद्यकीय प्रमाणपत्रे देउन त्यातून सुटका करून घेण्याकडेच भर होता.
बाजारात फक्त ट्रबन्ट ही एकच चारचाकी मिळत असे - दोन वेगवेगळ्या रंगात. त्यासाठी पण नंबर लावावा लागत असे आणि लोक नंबर एकमेकांना विकत. ट्रबन्टमध्ये तीस-चाळीस वर्षात काहिही फरक पडला नाही.
आजच्या तुलनेत आयुष्य फार वेगळे होते असे म्हणता येणार नाही. आज बाजारात जास्त माल आहे, खूप वैविध्य आहे पण पुर्वी श्रीमंत-गरीब दरी फार नव्हती. आज ती खूप जोरात वाढत आहे."

साम्यवादाची हंगेरीत मला दिसणारी सगळ्यात मोठी निशाणी म्हणजे सर्वत्र असलेल्या चार मजली आणि दहा मजली सदनिका (अपार्टमेंट्स). मी ज्या इमारतीत राहतो ती अशीच एक चार मजली इमारत. इथे सर्व हंगेरीभर तुम्हाला ह्या एकसारख्या दिसणार्‍या फिकट चॉकलेटी बिस्किटाच्या रंगाच्या चार मजली इमारती नाहितर दहा मजली हिरवट-पिस्ताच्या रंगाच्या इमारती दिसतील. तोच आकार, रंग, ढाचा, दारं, पुढच्या चार पायर्‍या, पत्राच्या पेट्या वगैरे वगैरे. साठच्या दशकापासून ऐंशीच्या दशकापर्यंत हंगेरीत सरकारने ह्या इमारती बांधल्या. आज बहुतकरुन सर्व शहरातून लोक ह्या इमारतीतून राहतात. बर्‍याच इमारतींची गेल्या दहा-पंधरा वर्षात पुन्हा डागडुजी करण्यात आलेली आहे - त्यांना इन्सुलेशन बसवणे, रंग देणे वगैरे वगैरे. ह्या इमारतीतले फ्लॅट्स सर्व खाजगी मालकीचे आहेत - अगदी साम्यवादी हंगेरीतसुद्धा ते खाजगीच मालकीचे होते. तर ह्या सदनिका आणि बुडापेस्टमध्ये अजुनही दिसणार्‍या जुन्या बसगाड्या सोडल्यास बाकी साम्यवादी हंगेरीच्या फारश्या निशाण्या दिसत नाहीत. बुडापेस्टमध्ये 'हाउस ऑफ टेरर' संग्रहालय आणि केलेनफल्ड उपनगरात असलेले 'मेमेन्टो पार्क' हे त्याकाळच्या आठवणी सांभाळून आहेत. मेमेन्टो पार्कमध्ये बुडापेस्ट (व इतर हंगेरीतल्या गावातले देखील) मधले साम्यवादी नेत्यांचे भले मोठाले पुतळे जमवून ठेवले आहेत. पण माझ्या ऑफिसमधल्या काही लोकांच्या मते मेमेन्टो पार्कमधले पुतळे हे अगदीच किरकोळ आहेत. ते सांगतात की ८९च्या आधी प्रत्येक गावात लेनिनचा भव्य पुतळा व इतर यशस्वी कलाकारांचे पुतळे असत - ते रातोरात कुठे गायब झाले कोण जाणे.
अर्थात नोव्हेंबर १९८९ ला साम्यवादाला लाथ मारत लोकशाही आणण्यासाठी झालेल्या मोठ्या सभेत एक विशीतला तरुण फार जोशात बोलला होता. त्याचे नाव विक्टर ओर्बान. हा विक्टर सेकेशफेहेरवारचाच. आज हा विक्टर ओर्बान हंगेरीचा पंतप्रधान आहे आणि त्याच्या पक्षाकडे हंगेरीच्या पार्लमेंटमध्ये २/३ पेक्षा जास्त बहुमत आहे. अनेकांना विक्टर ओर्बानच्या प्रखर 'देशीय' भाषणबाजी व धोरणात काही जुन्या गोष्टींची झाक दिसते. त्याबद्दल पुन्हा कधितरी.

त.टि.: दिवसभर लॅपटॉपवर बसून हा भाग बडवल्यानंतर बायकोने फक्त एक कटाक्ष टाकला आणि केवळ लांबी बघूनच 'कोण वाचणार एव्हडं' असा तीन शब्दांचा पहिला अभिप्राय लेखाला दिला.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इतिहासात कोणी कधी काय केलं पेक्ष जर जे काय केलं त्याचा सामान्य लोकांच्या रोजच्या आयुष्यावर काय परिणाम झाला >>>

अगदी! माझीही यावरच अधिक नजर असते.

Pages