ती वेळ मुर्ख होती...

Submitted by मुग्धमानसी on 14 January, 2013 - 01:30

ती वेळ मुर्ख होती, अन् काळ धूर्त होता
सर्वस्व संपण्याचा, तोची मुहूर्त होता!

अस्वस्थ फार होते, माझ्या मनात गाणे
सूर धीट होते मात्र, स्वर आर्त आर्त होता!

झाली अवेळ सांज, आला तुझा निरोप
झाले अबोल तोही, माझाच स्वार्थ होता!

निष्क्रीय वल्गना ही, वाटेल तुज तरीही
प्रत्येक अक्षराला, माझ्याच अर्थ होता!

ठावूक ना तुलाही, उरले असे न काही
प्रत्येक दडवण्याचा, तो यत्न व्यर्थ होता!

डोळ्यात पूर आला, स्वर कंप कंप झाला
तु आठवात येणे, हा अन्वयार्थ होता!

निमिषात घात केला, माझाही ज्या क्षणाने
मज अडकवून तो क्षण, जन्मी कृतार्थ होता!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कविता म्हणून सुंदर आहे. गझलेचे तंत्र जाणून घ्यावे ही विनंती. सध्या ही रचना कविता विभागात हलवावी ही विनंती. सुंदर अहेत सगळे खयाल.

छान आहे कविता, प्रत्येक कडवं छान आहे.. सुंदर उतरलय. गझल म्हणुन प्रयत्न छानच होता. गझल नसली तरी प्रामाणिक कविता आहे. काही गझलांत काव्य नसतच त्या पेक्षा ही कविता उत्तम. पुलेशु