खोल खोल मनामध्ये....

Submitted by बागेश्री on 14 January, 2013 - 00:14

धुंद आठवांची रात, जेव्हा डोळ्यात निजेल
खोल खोल मनामध्ये तूच तूच दाटशील

एक एक पान माझे, सुटे सुटे रे होईल
हर एक अक्षराला, गंध तुझाच असेल

चंद्र खिडकीशी पुन्हा, रेंगाळेल, खोळंबेल
गळालेले रितेपण मुठी भरून घेईल

तुझ्या सयी सार्‍या स्निग्ध, सभोताली फुलतील
तुझ्या गालातले हसू, माझ्या ओठी उमलेल

हूरहूर, रूखरूख, चित्त बेभान करेल
जरा शहाणे झालेले, मन पुन्हा वेडावेल

तेच रूप ह्या जगाचं, पण नवीन भासेल
तेच काजळ डोळ्याचं, पण नव्याने हसेल

खुळ्या मनाच्या भ्रमांची, भूल मलाही पडेल
तुझ्या असण्याचे भास, नसण्याला असतील

कंच बहर फुलांचा, जरी उद्या ओसरेल
ताजा आठव तुझाच, माझ्या ओंजळी असेल

---------------------------------------------------------------

-ब्लॉगवरही प्रकाशित: वेणूसाहित्य http://venusahitya.blogspot.com/

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाहवा. फार म्हणजे फार सुंदर कविता.

मराठी शाळेतील दिवस आठवले. चालीवर म्हणावीशी वाटली ही अष्टाक्षरी.

एक एक पान माझे, सुटे सुटे रे होईल

गळालेले रितेपण मुठी भरून घेईल

जरा शहाणे झालेले, मन पुन्हा वेडावेल<<<

कवितेची शैली मोहक आहे. वातावरण निर्मीतीही आवडली. वरील ओळी विशेष आवडल्या. धन्यवाद.

छान.

हूरहूर, रूखरूख, चित्त बेभान करेल
जरा शहाणे झालेले, मन पुन्हा वेडावेल

खुळ्या मनाच्या भ्रमांची, भूल मलाही पडेल
तुझ्या असण्याचे भास, नसण्याला असतील

आय हाय !

व्याकुळ प्रेमिका उभी राहिली डोळ्यासमोर....जियो !!!

व्याकुळ प्रेमिका >> वेल सेड सुप्रिया ताई.

खूप व्याकुळ करणारी कविता आहे. कोणताही आकांत नाही, आक्रोश नाही.... अगदी संयतपणे मनाचा ठाव घेणारे शब्द व्याकुळच करणार ना?

अप्रतिम सुंदर!
व्वाह!

'तुझ्या असण्याचे भास, नसण्याला असतील'

ही ओळ खूप म्हणजे खूप काही बोलते.

अप्रतिम झाली आहे बागेश्री...

रसपशी सहमत. उत्कृष्ट वातावरणनिर्मिती... आतुर, व्याकूळ तरीही संयमित एक्सप्रेशन्स.. थेट पोचणारी रचना...
प्रत्येक द्विपदीमधला भाव तोच असला तरी तिचं वेगळेपण जाणवण्याइतकं रेखलं गेलंय...

अभिनंदन! Happy

धन्यवाद दोस्तहो...

खूप दिवस मनात रेंगाळत होती ही कविता.. उतरवताना नेमकी कशी असेल ह्याची मलाही उत्सुकता होती.. तुम्हा सगळ्यांच्या प्रतिसादामुळे आपल्याच कविता कधी नव्याने समजतात... आभारी आहे.. लोभ असावा Happy