अखंड कालप्रवाहाच्या प्रवासात एक वर्ष सरले
आठवणी, सुख - दुखा:च्या, एवढेच मनी उरले
बरेच काही घडले, घरात, गावात आणि जगात
हुरहुर मनी, बरेच काही करायचे राहीले
वाटते सगळेच झाकोळले ह्या नव्या जगात
व्यवहार सगळा उरला, वाटे निराशा, तरीही
कृतज्ञतेने देऊ धन्यवाद त्या जगदीशाला
असंख्य कण मोदाचे जगताना सापडले
सावली संकटांची उगाच वाटते मोठी
कोसळतो वाटता, हात सावरणारेही आले
नीट मांडा जमाखर्च, असेल थोडे गमावले
तरीही पहा आठवून खूप काही मिळवले
हसुनी करुया स्वागत नव्या वर्षाच्या दिनकराचे
ठरवूया, ह्या वर्षी खूप भले चांगले करायचे
मिळूनी सगळे बनू आपण नवीन तेजोमय भास्कर
साथीने करुनी शुभ संकल्प, दुष्ट तिमीर भेदायचे
नववर्षाच्या शुभेच्छा तुम्हाला, होवो मनाजोगते
सुख, समाधान, समृद्धि, कृपाकवच परमेशाचे
झटकून सारी निराशा, आळस, लागू कामाला
करायचे आहे शुभकार्य, नवा समाज घडवायचे