गझल विभाग व गझलेवरचे प्रतिसाद

Submitted by एक प्रतिसादक on 29 December, 2012 - 04:12

हे मनोगत बरेच दिवसांपासून लिहायचे होते. मायबोलीमधे काय सुधारणा करता येतील या बाफवर लिहायचे निश्चित केले होते. पण गझलविषयक असल्याने विचारांती स्वतंत्र लेख म्हणून पेश करत आहे.

सर्वप्रथम प्रस्तुत लेख हा गझल अथवा गझल लिहीणारे यांच्या विरोधात नाही हे स्पष्ट करतो. गझल हा एक मराठी साहीत्याला समृद्ध करणारा प्रकार आहे याबद्दल दुमत नाही. मायबोली हे संकेतस्थळ असे आहे कि इथे अनेक जण अनेक कारणांसाठी येतात. हे काही गझलेला वाहीलेले अथवा साहीत्यविषयक संस्थळ नाही तर इथल्या सदस्यांची अभिरूची, लेखनशैली आणि संयोजक व प्रशासनाचे उपक्रम यामुळे ईसाहीत्यामधे आपली छाप सोडणारे एक संस्थळ म्हणून मायबोली सर्वदूर ज्ञात झाले आहे.

अशा या संकेतस्थळावर आपले लेखनकौशल्य अजमावून पहावे म्हणून अनेक जण येतात. काहींचे लिखाण अगदीच कच्चे असते तर काहींचे आश्वासक. अशा आश्वासक लिखाणाला इथे नेहमीच प्रोत्साहन आणि चांगले सल्ले मिळालेले आहेत. एखाद्या शिकण्याची इच्छा असलेल्याला चांगले मार्गदर्शन देखील मिळालेले आहे. आजवर इथे कधीही मूळ लिखाणावर वरताण असे लिखाण प्रतिसाद म्हणून पाहण्यात आलेले नाही. आपल्याला जे म्हणायचे आहे ते कमीत कमी शब्दात जेव्हा म्हणता येते तेव्हाच त्यात प्रतिसादक पारंगत आहे हे जाणवते.

गेल्या काही दिवसांपासून गझल या विभागातले प्रतिसाद हा चर्चेचा विषय बनलेला आहे. छोट्याशा गझलेवरही एका छोट्या पुस्तिकीएव्हढा प्रतिसाद आणि उलटसुलट वाद हे नेहमीचे झाले आहे. प्रतिसादक सल्ला किंवा मार्गदर्शन याऐवजी उर्दू शायरी, गझलेचा इतिहास इथपासून सुरू करतात आणि थांबता म्हणता थांबत नाहीत. कधीकाळी कंपूशाही विरुद्ध शंख फुंकलेल्यांना इथे स्वतःच्या कंपूद्वारे एखाद्या नव्या गझलेवर तुटून पडताना काहीच चुकीचे वाटत नाही.

पर्यायी शेर, ;पर्यायी शब्द असावेत का, हे शब्द सुचवताना ते वृत्तात बसतात का याची शहानिशा न करता आलेल्या अनेक सूचना टाळता येण्याजोग्या असू शकतात असं वाचकांना वाटतं. गझल आवडली म्हणून प्रतिसाद द्यावा तर त्यावर उसळलेल्या वादामुळे नकोसे वाटते. कारण प्रतिसादकालाही हल्ली असा प्रतिसाद का दिला म्हणून विचारणा होऊ शकते याची जाणिव वाचकांना आहे.

एखाद्याला एकच गोष्ट वारंवार सांगूनही तो ऐकत नसेल तर काय करायचं याचं शिक्षण बालपणापासून इसापनीती, पंचतंत्र सारख्या बोधकथांमधून मिळालेले असते. प्रतिभावंतांना त्याबद्दल काय सांगायचं ? असं सांगून कुणा प्रज्ञावंताचा अवमान हातून व्हावा असं वाटत नाही.मायबोली चालवण्यासाठी आहे तेच लोक समर्थ आहेत. त्यांना शिकवण्याचा किंवा अवमान करण्याचा इथे हेतू नाही. मायबोलीवरच्या अकरा लाख वाचकांपर्यंत एक दमदार गझलविभागच पोहोचावा हा एकमेवर विचार यामागे आहे. गझलविभागाची सद्यस्थिती पाहता त्याबाबत काहीतरी पावले उचलण गरजेचे आहे. एक जुनीच सूचना कराविशी वाटते. सध्या हा विभाग क्लोज ग्रुप करण्यात यावा या मागणीला बहुतेक मायबोलीकरांचा पाठिंबा असेल असं वाटतं.

लेखाच्या लेखकाचा गझलेतले ज्ञान असल्याचा बिल्कुल दावा नाही. गझल तांत्रिक दृष्ट्या आणि आशयदृष्ट्या कशी आहे हा प्रतिसाद त्यातले जाणकारच देणार ( जाणकार देणारच !). काय प्रतिसाद द्यावा हे त्यांनीच ठरवायचे, पण प्रतिसाद कसे असावेत हे समजायला तज्ञ असण्याची काहीच गरज नाही. इथे काही उत्तम प्रतिसाद देणारेही आहेत. सध्याच्या या अवस्थेमुळे ते कुणाच्याही गझलेवर प्रतिसाद देत नसल्याचे दिसून येते. नावं घेऊ नयेत पण मिल्या, ज्ञानेश, अनंत ढवळे, डॉ कैलास गायकवाड यांच्या गझला या सहजसुंदर आणि उच्च दर्जाच्या आहेत. यांचे प्रतिसादही तसेच सहज आल्याचे दिसतात. क्रांती, प्राजक्ता, ममता या कवयित्रींच्या गझलादेखील खणखणीत आहेत. गझल लिहू शकणारे पण न लिहीणारे असे उल्हास भिडे यांचे प्रतिसाद देखील न दुखावता नेमक्या त्रुटी स्पष्ट करणारे असतात. विद्या विनयेन शोभते !

या सर्व परिस्थितीचा विचार करून ज्यावेळी काही प्रतिसादकांचा स्वतःचा अभ्यास पूर्ण होईल आणि प्रतिसाद थोडक्यात व रसभंग न करणारे येऊ लागतील तेव्हाच हा विभाग सार्वजनिक व्हावा. सध्या मिळून करूयात अभ्यास वैश्विक गझलेचा, पाळा माझे नियम, ठेवा मान माझ्या शब्दांचा अशी जी अवकळा या विभागाला आली आहे त्यातून हा विभाग बाहेर पडेपर्यंत या व्हेंटिलेटरचा विचार व्हावा ही नम्र विनंती.

धन्यवाद

सूचना

१. गझलेवर चर्चा करण्यासाठी कवी आणि कविता असा एक स्वतंत्र विभाग आहे त्यात अभ्यासपूर्ण चर्चा झडू शकतात हे लक्षात घेतलं तर ब-याच गोषटी टाळता येतील अशी एक सूचना कराविशी वाटते.

२. पुन्हा एकदा नम्र विनंती : ही वैयक्तिक टीका नाही. संबंधितांनी अयोग्य वाटल्यास निषेध जरूर करावा पण योग्य वाटल्यास कळवावे. धन्यवाड.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यापेक्षा वाचुच नये हा उपाय अवलंबावा. कुणीही गझलाकार सांगत येत नाही की माझी गझल आणि त्यावरचे प्रतिसाद वाचा आणि मानसिक त्रास करुन घ्या.

@सस्मित - वाचू नये सांगणे सोप्पे आहे. पण "नविन लेखन" मधे निम्म्या ओळी ह्या गजला आणि कवितांनी व्यापलेल्या असतात. त्यामुळे काही चांगल्या लेखांपर्यंत पोचतच नाही.
म्हणुन quota ठरवून द्यावा.

पण "नविन लेखन" मधे निम्म्या ओळी ह्या गजला आणि कवितांनी व्यापलेल्या असतात. त्यामुळे काही चांगल्या लेखांपर्यंत पोचतच नाही.
म्हणुन quota ठरवून द्यावा.<<<

तुम्हाला पंधराच आठवड्यात गझलांचा बराच त्रास झालेला दिसत आहे. सगळेच गझलकार रोज गझला रचत व प्रकाशित करत सुटलेले आहेत का हो? की कोणी एकच गझलकार रोज गझला प्रकाशित करत आहेत? आणि चांगले लेख हे वाचल्याशिवाय कसे कळतात की ते चांगले आहेत? म्हणजे चांगले लेख तुम्ही मागे जाऊन शोधून काढताच ना? की पहिले सोडून बाकीच्या पानांवरील धाग्यांना क्लिक करायची सोय नाही आहे येथे? बरं, तुम्हाला वाहत्या पानांचा काहीच त्रास होताना दिसत नाही आहे. वाहती पाने हे तर काही चांगले लेख नाहीत ना? मग ती सगळी एकाच धाग्यात सामावून तो क्लिक केला की आपल्याला हवे ते पान दिसावे असे काही सजेशन नाही वाटते सुचले तुम्हाला? आणि कोटा कसा ठरवणार? गझल प्रकाशित करता येण्यासाठी रॉकेलसारखी रांग लागलेली असते असे वाटले का आपल्याला?

फार आवडल्यासच प्रतिसाद द्यावा आणि आवश्यक नसल्यास (हे ही स्वतःच ठरवायला हवे) प्रतिसाद न देणे हा मला सर्वोत्तम उपाय वाटतो. इग्नोअर मारायलाच शिकायला हवे. टाळी एका हाताने वाजत नाहीच. शब्दाला शब्द वाढतो तसा प्रतिसादामागून प्रतिसाद वाढतात. समोरच्याला मुद्दा पटवून देणे आणि त्याला समजावणे (त्याच्या आडमुठेपणामुळे म्हणा किंवा स्वतःमध्ये तेवढी क्षमता नसल्यामुळे म्हणा) अशक्य आहे हे कळल्यावर मुकाट माघार घेण्यात कमीपणा कसला? (मी स्वतः अनेकवेळा हे केलं आहे, इथल्या अनेकांना हे माहित आहे)

केवळ एका आयडीमुळे अख्ख्या संकेतस्थळावरचे समस्त आयडी आपला बहुमुल्य वेळ असा वाया घालवत आहेत हे खरंच योग्य नाही, असं मनापासून वाटतं. 'गझल' हा प्रकार एखाद-दुसर्‍या गझलकारापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आणि भव्य आहे हे आपण सगळेच जाणतो. इग्नोअर यार!! जस्ट इग्नोअर इट!

इथे स्वत:चे अस्तित्त्व दाखवणे, विषयाची माहिती/ज्ञान असणे, मुळात सोशल नेचर असणे, चर्चांमध्ये सामील व्हायची आवड असणे, अवांतर गप्पा मारण्याइतका भरपूर वेळ असणे ही मुख्यतः लांबणार्‍या दीर्घ चर्चांमागची आणि इथे पडीक असण्यामागची कारणे वाटतात. मुख्य मुद्दा जर प्रतिसादांच्या धबधब्यांचा असेल तर स्वतःला आवर घालणे हाच सर्वोत्तम उपाय नाही का?

अवांतरः इथे गझलांइतकेच अनावश्यक वाटू शकणारे धागे कायम पहिल्या पानांवर झळकत असतात. गझल प्रामुख्याने 'बदनाम' होत आहे एवढंच! त्यामुळे, 'इग्नोअर' करून थेट आतल्या पानावर जाणे, हे सोयिस्कर! (मी हे अनेकदा करतो. त्यासाठी दुसर्‍या/तिसर्‍या/... पानाची लिंक सेव्हच करून ठेवली आहे.)

प्रसाद यांच्याचसाठी हा दुसरा प्रतिसादः

आणि हे सगळे करण्याआधी दर चार दिवसांनी स्वतःच्या सदस्यत्वाचे नांव बदलणार्‍या आय डीं सारख्या आय डींना नाव बदलण्याचा अधिकार वर्षातून एकदा मिळावा असे काहीतरी नियम करायला हवे आहेत खरे तर!

Pages