वत्सल सुधा - उत्तरार्ध (कथा)

Submitted by अवल on 23 December, 2012 - 08:59

पूर्वार्ध : http://www.maayboli.com/node/39766
( हा उत्तरार्ध लिहिताना माझी इतिहासकाराची कवचं काढून ठेवली आहेत; म्हणून ही कथा. या सर्व लिखाणासाठी केवळ माझी आई, मामा, मावशी यांच्या आठवणीच मदत करू शकल्या. कोणतेच लेखी पुरावे नाहीत. त्यामुळे याला मी लेख नाही म्हणु शकत. अन मग कथा लिहायची तर त्याचे काही नियम, काही सवलती मी स्विकारले, घेतल्यात. आशा आहे तुम्ही समजून घ्याल.
कधी कधी मला वाटतं सामाजिक इतिहासात या कथांमागचे बीज जात महत्वाचे काही सांगते. उदाहरणार्थ, या कथेत सांगितलेल्या घटनांपेक्षा त्या घटना सांगाव्या, आठवणीत ठेवाव्यात हे वाटणं अन त्या काळात लोकांनी तिच्या ताकदीवर विश्वास ठेवणे, तिच्या आधाराने उभे राहणे; यातून प्रत्यक्ष त्या कारणांपेक्षा तिच्याप्रति त्यांचा असणारा विश्वासच खूप काही सांगून जातो असं मला वाटतं.
भले त्यातल्या काही घटना काहींना (अगदी मलाही ) अशक्य किंवा बुद्धीला न पटणा-या वाटतील. पण अशा गोष्टींवर त्या काळातल्या लोकांचा गाढ विश्वास होता हे तर नाहीना नाकारू शकत ( अगदी मीही) . माझ्या दृष्टीने महत्वाचे हे आहे की तिच्या कर्तृत्वाने, तिच्या कामाने; तिने हा लोकांचा विश्वास संपादन केला होता. सावत्र मुलांसाठी ती करत असलेली धडपड आणि स्वार्थ बाजूला ठेवण्याचे इतके स्वच्छ उदाहरण दुसरे कोणते नसावे. हे लोकांना वाटत, पटत असणे मला जास्त महत्वाचे वाटते.
अशा अनेक व्यक्ती त्या काळात झाल्या; ज्यांनी आपल्या कामातून असा लोकांचा विश्वास प्राप्त केला. त्यांच्या आयुष्याची उदाहरणे अनेकांना प्रेरणादायी ठरली. माझी ही आजी जिला मी पाहिलेपण नाही तिला अन अशा सर्वांना माझी ही भावांजली !
)

वत्सला, सुधा म्हणून नव्या घरात आली तर खरी, पण अनेक आव्हाने तिच्यासमोर उभी होती. मुळात स्वतःच्या दु:खावर, अडचणींवर मात करून ती अतिशय कष्टाने अन अनेकांचा विरोध पत्करून स्वतःच्या पायावर उभी राहिली होती. शिक्षिका म्हणुन नोकरीला लागलेल्या वत्सलाने आपल्या कष्टाने अन हुषारीने हेडमिस्ट्रेस पर्यंत मजल मारली होती. ठाण्यासारख्या शहरात धाकट्या भावंडांना घेऊन राहात होती. अडीनडीला काकांचा आधार होता, पण तिचा स्वाभिमान तिला तो नेहमी घेऊ देत नसे. स्व बळावर भावंडांची शिक्षणं, लग्न करून दिली तिने. अन स्वतःचेही जीवन कर्तृत्वाने, कणखरपणे जगत होती. अशा परिस्थितीत प्रधानांबरोबर लग्न करण्याचा तिचा निर्णय एक मोठीच उडी होती. त्यातून नव्यानेच संमत झालेल्या घटस्फोटाच्या कायद्याचा आधार घेऊन एका नव्या बदलाचे ती प्रतिनिधित्व करत होती. पहिला वाईट अनुभवही वाकुल्य दाखवत असे. अन हे नवे जीवन जगण्यासाठी तिला नोकरीही सोडावी लागणार होती कारण पाच मुलांना वाढवण्याची जबाबदारी तिला उचलायची होती.
परंतु प्रधानांसारख्या सदगृहस्थांच्या साथीवर तिचा विश्वास होता. त्याच्या जोडीने तिने या नव्या घरात प्रवेश केला. या नव्या घरात होती तीन चिल्लीपिल्ली, दोन अडनिड्या वयातली मुलं, एक वयोवृद्ध सासरे अन तिच्या दिवंगत सवतीची वृद्ध आई !

प्रधानांची प्रथम पत्नी गुलाब ही तिच्या आईची एकुलती एक लेक. त्यातून वडिल अगदी तिच्या जन्माच्या आधीच, आई गरोदर असतानाच गेलेले. त्यामुळे गुलाब अन तिची आई या दोघींची ताटातूट कधी झालीच नव्हती. झाली ती गुलाबच्या जाण्यानेच. त्यामुळे प्रधानांच्या घरी गुलाबबरोबर तिची आईही प्रधानांकडेच रहात असे. त्यातून प्रधानांना नोकरी निमित्ताने बाहेरगावी जावे लागे. तेव्हा गुलाबही त्यांच्याबरोबरी कधी कधी जात असे. मुलं मात्र आजीकडे, आईच्या आईकडे प्रेमाने राहात. स्वाभाविकच मुलांना या आजीचा खूप लळा लागला होता.

प्रधानांना त्या वेळेस नोकरी निमित्ताने गुजरातला अंकलेश्वरला जावे लागले. मुलांना मोठ्या सुट्ट्या नसल्याने ती तिघं आजी जवळ ठाण्यालाच राहिली. लहान दोघांना घेऊन प्रधान अन गुलाब अंकलेश्वरला गेले. तिथेच अचानक एके दिवशी देवाची पुजा करताना दिवा लावल्यावर उजळलेली काडी विझली असे वाटून गुलाबने काडी मागे टाकली. दुर्दैवाने ही पेटती काडी तिच्या नऊवारीच्या कासोट्याला लागली अन लक्षात येईपर्यंत गुलाब उभी पेटली. प्रधान कार्यालयात गेलेले अन मुलं अंगणात खेळत होती. गुलाबचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे धावत आले पण घडायचे घडून गेले होते. गुलाब काळवंडून गेला होता.

आईचे हे जाणे सगळ्याच मुलांना अन प्रधानांना अन त्या वेळच्या आसपासच्या सर्वांनाच जिव्हारी लागले. सर्वात लहान मुलगा केवळ चार वर्षाचा होता. आजी जरी घरी असली तरी तिचे वय पाहता मुलीच्या मृत्यूचा हा धक्का तिला सहन करून मुलांना वाढवणे फार अवघड होते. त्यामुळे प्रधानांच्या बहिणीने तू पुन्हा लग्न कर असा प्रस्ताव मांडला. काही काळ गेल्यावर प्रधानांचे मन वळवण्यात बहिणीला यश आले. आणि यातूनच वत्सला अन प्रधान यांची गाठभेट झाली अन दोघांनी प्रस्ताव मान्य केला. यात मोठा अडथळा होता तो वत्सलाच्या घटस्फोटाचा. पण तोही श्री. माधवराव हेगडेंच्या मदतीने पार पडला अन वत्सला सुधा बनून प्रधानांच्या घरी प्रवेश करती झाली.

सुधाचा स्वभाव अन तिने घेतलेला जगाचा अनुभय यांच्या मुळे या नव्या घरात ती हळुहळू रुळली. धाकटी तिघे तशी अजाणत्या वयात होती. त्यांना सुधाच्या वात्सल्याने आपलेसे केले. मोठी मुलगी १५ वर्षांची अन मुलगा १३ वर्षांचा, ही मात्र जाणत्या वयात होती.तशात गुलाबनेही मुलांना खूप मोकळेपणाने वाढवले होते. अगदी मोठ्या मुलीला स्वातंत्र्यलढ्यातील प्रभातफे-यांमध्ये भाग घ्यायलाही तिने प्रोत्साहन दिले होते;अगदी वडील सरकारी नोकरीत मामलेदार असूनही. आपल्या सख्ख्या आइच्या अनेक आठवणी त्यांच्या मनात कोरलेल्या होत्या. पण या दोघांशीही तिने फार चांगला संवाद साधला. एक आदर्श सावत्र आई कशी असावी याचे ती द्योतकच होती. आणि तिचा मोठेपणा हा की ती नेहमी बोलून दाखवी, " मोठ्या दोघांनी मला खूप चांगली साथ दिली. त्यांच्यामुळे मी सारे निभावून नेले. त्यांच्या सहका-यानेच मी त्यांची आई होऊ शकले."
एकंदरच प्रधानांच्या घराची घडी पुन्हा बसायला लागली.

वर्षभरात सुधाबद्दल, तिच्या मुलांना वाढवण्याबद्दल विश्वास वाटला म्हणुन गुलाबच्या आईने आपले बस्तान नागपूरला आपल्या भावाकडे हलवले. आपल्या लेकीची मुलं योग्य हातात आहेत, त्यांचा प्रेमाने सांभाळ होतोय या आनंदात आजी मामाकडे गेली.

याच सुमारास सुधाच्या सास-यांना स्मृतिभ्रंश होऊ लागला. काळ, वेळ, जेवण सगळेच भान हरवू लागले. अनेकदा जेवून झाल्यावर मोकळ्या पानात, मला जेवायला का वाढत नाहीस ? असे विचारू लागले. हळुहळू त्यांचे सगळे भान हरपत चालले. त्यांचे सर्व अगदी लहान मुला प्रमाणे करावे लागे. अन सुधा हे अगदी न कंटाळता, न चिडता करी. जवळ जवळ दोन वर्षे हे असेच चालू राहिले. एकीकडे मुलांना वाढवणे अन दुसरीकडे सास-यांची काळजी घेणे हे सुधाला करावे लागले.

तशात स्वतः प्रधान आजारी पडले. आता मात्र सुधाच्या पयाखालची जमीन हादरली. पाच पाच सावत्र मुले, आजारी सासरे यांची सारी जबाबदारी येऊन पडली अन हाती नोकरीही नाही, आता कसे निभायचे अशी भिती तिला वाटू लागली. सुदैवाने काही महिन्यात प्रधानांची तब्ब्येत पूर्ववत झाली, धोका टळला. या सर्व काळात तिला आधार होता तो तिच्या श्रद्धेचा.

तुळजाभवानी आणि एकवीरेवर तिची नितांत श्रद्धा होती. परंतु तिची ही श्रद्धा तिने इतरांवर लादली नाही. तिचा स्वतःचा मात्र तुळजाभवानी आणि एकविरेवर प्रचंड विश्वास होता. दर मंगळवारी ती एक आण्याचा एक पेढा, २ आण्याच्या दोन वेण्या अन ४ आण्याचे दोन हार असा खूप खर्च करते म्हणुन नातेवाईकांनी खूप गलका केला. परंतु " मी माझ्या नव-याच्या पैशातून करते. अन त्यांचा याला विरोध नाही' हे तिने ठाम पणे सांगितले. ज्या गोष्टी तिला पटत त्या ती कोणाचीही भिडभाड न ठेवता करत असे. आपण जर चांगल्यासाठी करतोय तर घाबरायचे कशाला अन कोणाला, हा तिचा विचार असे. नातेवाईकांचे हे सगळे बोलणे ती आपल्या भक्तीपोटी सहन करी.

या तिच्या भक्तीने तिला एक मोठा वरही मिळाला होता. अनेकदा भावी घडणा-या घटना तिला स्वप्नात दिसत. आगावू सूचनाच जणू तिला मिळत. भावी काळातील सुख - दु:ख पेलण्यासाठी अशी स्वप्न तिला अन जवळच्यांना बळ देत. हे अनुभव तिच्या जवळच्या अनेकांनी, अनेकदा घेतले.
एके दिवशी मोठी मुलगी खोल काळ्या डोहात निपचित पडली आहे असे तिला दिसले. अन मोठे काका अन भाऊ तिला वाचवताहेत असे दिसले. याच वेळेस मोठी मुलगी अतिशय आजारी पडली. मोठे दिर अन त्यांच्या मुलाने धावपळ करून डॉक्टरांना आणले. अन उपचार सुरू झाले. अन मोठी लेक दुखण्यातून बाहेर पडली.
एक दिवस सकाळी उठल्यावर तिला स्वप्नात मधली मुलगी लंगडत चालतेय असे दिसल्याचे तिने सांगितले. थोड्याच दिवसात त्या मुलीच्या पायाला मोठे गळू झाले. ते ऑपरेशन करून काढावे लागले अन त्या काळात तिला लंगडताना पाहून सुधाच्या स्वप्नाची आठवण प्रत्येकाला झाल्यापासून राहिली नाही.
एके दिवशी सुधाच्या स्वप्नात गुलाब आली अन खुप छान हसत राहिली. काही दिवसातच मोठ्या मुलीचे लग्न ठरले तेव्हाही हेच घडले.
काही दिवसांनी सुधाने काळजीने सांगीतले, तुमची आई सारखी रडत होती काल. पुढच्याच आठवड्यात एका लग्नात सुधाने बनारसी शालू नेसला होता, जो गुलाबचा होता. लग्न लागल्यावर सुधाने साडी बदलली अन बनारसी शालू घडी करून पिशवीत घालून सगळ्या सामानात ती पिशवी ठेवली. कशी कोणजाणे पण त्या व-हाडात चोरी झाली अन इतर काही गोष्टींबरोबर हा बनारसी शालूही चोरीस गेला.
अशा किती तरी आठवणी. म्हटले तर विश्वास बसाव्यात अशा, म्हटले तर निव्वळ योगायोग.

सुधाच्या बाबतीत अजून एक वेगळेपण म्हणजे तिचे एकविरेचे सहस्रनाम. वर्षातून सोळावेळा ती एकविरेचे सहस्रनाम करी. श्रावणात फुलांचे अन बाकीचे वर्षभर कुंकवाचे. तिच्या भक्तीचे बळ अनेकांनी अनुभवले होते. सहस्रनामाच्या वेळेस देवीला वाहिलेले कुंकू नंतर अनेकजण येऊन अंगारा म्हणून घेऊन जात. अनेकांना हा अंगारा आपल्याला संरक्षण देतो असे वाटत असे. घरातले तर सर्वच हे कंकू लावूनच बाहेर पडत. परंतु तिच्या भक्तीची प्रचिती अनेक ओळखी लोकांनाही आली होती.

अशा रितीने वात्सल्याचे अमृत घेऊन केवळ प्रधान, त्यांची मुले, कुटुंबीयच नव्हे तर आपल्या आसपासच्या सर्वांचेच आयुष्य तिने उजळून टाकले. आपल्या दोन्ही नावांना सार्थक झाली; वत्सल सुधा !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवल, सत्यकथेचे दोन्ही भाग अत्यंत हृदयस्पर्शी आहेत. ''त्या'' काळातली एक स्त्री इतकी कर्तबगार,
वेळप्रसंगी जाचक सामाजिक रुढींशी टक्कर देणारी आणि तितकीच त्यागाची मूर्ती. अतिशय प्रेरणादायी
व्यक्तिमत्व आहे सुधाआजींचं. हे सर्व आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल खूप धन्यवाद.
तुझी लेखनशैली साधी, सरळ, ओघवती म्हणून तुझं खास कौतुक.

मनापासून धन्यवाद अनिताताई Happy तुमच्या सारख्या स्नेह्यांमुळेच मायबोलीवर अगदी मनातले, मनाजवळचे लिहावेसे वाटते Happy

व्यक्तिचित्रण छान जमलं आहे. उत्तरार्ध जरा उरकल्यासारखा वाटला. लेखात खूपदा आलेला सावत्र हा उल्लेख खटकला. कबूल की तुमच्या आजीचं आणि मुलांचं नातं सावत्र होतं पण आपलेपणाने जर दोन्ही पार्टींनी एकमेकांना स्विकारलं होतं तर मग सावत्र ह्या लेबलाची गरज उरतेच कुठे?

आठवणी आवडल्या Happy पण दुसरा भाग खूप त्रोटक वाटला. प्रधान त्या दुखण्यातून उठले का ? ( उठले असावेत असं वाटलं पण तसा थेट उल्लेख नाही. ) त्यांना किती वर्षं सहजीवन अनुभवता आले ? नातवंडं खेळवता आली का ? असतील तर नातवंडांना आजीच्या काय आठवणी आहेत ? शाळेत एवढ्या मोठ्या पदावरुन निवृत्त झाल्यावर नंतरच्या आयुष्यात त्यांचा परत कधी शिक्षकी पेशाशी संबंध आला का ? त्यांना कुठले विशेष छंद होते का ? अशा अनेक गोष्टी जाणून घ्याव्या असे वाटले.

सायो, ओ, असं झालय का? बघते हं. शक्य तिथे काढते. कारण तशी अपेक्षा नाहीये लिहिताना, मनापासून धन्यवाद Happy
अखी, सायो,अगो अगं किती लिहावं, कंटाळा तर येणार नाहीना वाचताना; ही भीती होती. धन्यवाद सर्वांना Happy
अगो, तुझ्या काही प्रश्नांसाठी तपशील. हो त्या दुखण्यातून प्रधान वाचले (वर तसे एडिट करते, थॅक्स). जवळजवळ १२ वर्षे त्यांचे सहजीवन सुखाने गेले. १९६० साली पोटाच्या दुखण्यात निदान न होताच आजी गेली. तो पर्यंत माझ्या मोठ्या दोघी बहिणींचा जन्म झाला होता. परंतु आई तेव्हा नवसारीला असल्याने फार सहवास नाही मिळाला. परंतु माझी दोन नंबरची बहिण अगदी गुलाबसारखी दिसते असे मात्र आवर्जून आजी म्हणायची Happy शिक्षकीपेशाशी मात्र पुन्हा संबंध नाही आला तिचा. अन छंदांबद्दल म्हणशील तर घरात इतकी व्यवधाने होती की तिला इतर काही करायला बहुदा वेळ मिळाला नसावा. हां पण तिच्या एकविरेच्या भक्तीचा जो त्रोटक उल्लेख केला आहे तोच तिचा मोठा आधार होता. इथे काहींना आक्षेपार्ह वाटेल म्हणुन सविस्तर लिहिलं नाही.परंतु आई कडून तिच्या अंगा-याबद्दलच्या अनेक गोष्टी ऐकून चकीत व्हायला होतं. तशी माझी आईही बुद्धिवादी परंतु तीने प्रत्यक्ष अनुभवलेले असल्याने तिचा विश्वास आहे त्या सर्वावर.

सायो, तुला असं का वाटलं ? कारण या कथेच्या संदर्भात; समरीत एकदा ( सावत्र मुलांसाठी ती करत असलेली धडपड)
आणि खाली कथेत दोनदा ( एक आदर्श सावत्र आई कशी असावी, पाच पाच सावत्र मुले ) असे एकूण तिनदाच उल्लेख आलेत इथे. अन तेही केवळ परिस्थिती स्पष्ट व्हावी यासाठी.
माझं शोधायला काही चुकतय का? Uhoh
शक्यता आहे की माझ्या लिखाणाच्या पार्श्वभूमीवर ते सतत असेल. पण मला वाटतं की तिचं नुसतं आई म्हणून हे वागणं पेक्षा एक सावत्र आई असून हे वागणं मला जास्त भावत आलय.त्यामुळे शक्य आहे की ते प्रतित झालं असेल अनवधानाने. पण त्यामागे कुठेही सहानुभूती मिळवणं किंवा ते अधोरेखित करणं हा हेतू नाहीये. मनापासून सांगतेय, खरच. अन तसं काही होत असेल तर मनापासून क्षमस्व.

छान झालाय हा भाग ही अवल, पण थोडक्यात वाटला. अर्थात तू आठवणी संग्रहित करून लिहील्यास .. तरी मुलांशी तिचे कसे जुळत गेले अस काहीस वाचायला मिळेल असे वाटले.. अर्थात हेही आवडलेच. Happy

अवल, सत्यकथेचे दोन्ही भाग अत्यंत हृदयस्पर्शी आहेत. ''त्या'' काळातली एक स्त्री इतकी कर्तबगार,
वेळप्रसंगी जाचक सामाजिक रुढींशी टक्कर देणारी आणि तितकीच त्यागाची मूर्ती. अतिशय प्रेरणादायी
व्यक्तिमत्व आहे सुधाआजींचं. हे सर्व आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल खूप धन्यवाद.
तुझी लेखनशैली साधी, सरळ, ओघवती म्हणून तुझं खास कौतुक. >>>> +१०००....

नितांत सुंदर लेख.