(सियाचीन ग्लेशीयर (टाईम मॅगझीन कडून साभार))
(सियाचीन ग्लेशीयर - सियाचीन हिमनद काराकोरम पर्वतरांगेत आढळतो. ह्या पर्वतरांगा हिमालयाचाच भाग आहे. ह्या हिमनदाचा पत्ता काहीसा वेगळा आहे, नकाश्यावर एन जे ९८४२च्या बिंदू पासून वर ईशान्य बाजूच्या भागाला सियाचीन ग्लेशियर म्हणता येईल. एन जे ९८४२ह्या बिंदूपासून पुढे भारत पाकिस्तान मधली प्रत्यक्ष नियंत्रण रेखा संपते. पुढे दोन्ही देशांमध्ये ही रेखा निश्चित नाही. ह्या मुळे दोन्हीही देश सियाचीन ग्लेशीयर ‘आमचा आहे’, ‘आमचा आहे’ असे म्हणत. पण नुसतेच म्हणत, तेथे जाण्याची कोणाची छाती होत नव्हती. १९८४ मध्ये भारताने तेथे सैन्य पाठवून त्याचा ताबा घेतला. हा हिमनद ७० ते ७५ किलोमीटर लांब पसरलेला आहे. काराकोरम पर्वतरांगेत तसे अजून छोटे छोटे हिमनद आहेत पण सगळ्यात मोठा हाच., सियाचिनाचा हा हिमनद, धृवप्रदेश सोडला तर जगातला दुसरा मोठा हिमनद. १९००० फुटावर असलेल्या इंदिरा कोल पासून हळूहळू समुद्रसपाटीपासूनची उंची कमी होत बेसकॅम्प पर्यंत ११००० फुटावर खाली येते. वारशी लोकांची वस्ती बेस कँपच्या खाली १० मैलावर आहे. त्या पुढे लोकवस्ती नाही.)
----------------सियाचीन ग्लेशीयर बद्दल बरेच दिवस लिहायचे होते. मध्यंतरी इंग्रजीत एक गोष्ट वाचनात आली. एका निवृत्त फौजीनीच लिहिली आहे ती. तेव्हाच मी ठरवले की ‘ह्या’ गोष्टीचे भाषांतर करायचे. त्या लेखकाला गाठले व त्याच्याकडून भाषांतर करून ‘मायबोली’ वर छापायची लिखित परवानगी घेतली. त्याचे आभार मी ‘मायबोली’ वर शेवटच्या भागात मानीन. ....
--------------- हे लिहीत असतानाच १६ डिसेंबर २०१२ला रेडिओवरून एक बातमी ऐकायला मिळाली. आपण काहींनी ऐकली असेल. काहींनी नसेल. तेथे सेवा केल्यामुळे अशा बातम्या माझ्या नजरेतून सुटत नाहीत व बरेच दिवस घर करून राहतात. कालची बातमी होती ‘सियाचीन मध्ये झालेल्या एवलॉन्च मध्ये सहा जवान ठार झाले व एक बेपत्ता आहे. बचावाचे काम चालू आहे.............’
------------ग्लेशियरला हिमनद म्हणतात. एवलॉन्चला अवधाव म्हणतात. मला स्वत:ला हिमलोट हा शब्द वापरायला आवडेल. क्रिव्हासला हिमविदर म्हणतात. मला हिमखाई वापरायला आवडेल.......... पण काही ठिकाणी मी मुद्दामून इंग्रजीच शब्द वापरले आहेत. का कोण जाणे मला वापरावेसे वाटले म्हणून वापरले.......‘जाज्वल्य’ मराठी प्रेमींचा मी क्षमस्व आहे............
आयुष्याची दोरी
– एक सत्यकथा ...... का काल्पनिक?.. कारण कल्पनेतच असे होते.
--------------------------------------------------खऱ्या आयुष्यात थोडेच होत असणार.
............पण ग्लेशियर मध्ये? …………….असे होते?
चंडीगढचा २८९ ट्रांझिट कँप.................वेडेपण व शहाणपण ह्यातला शेवटचा दुवा तसेच भयाणता व वसती ह्या मधलाही.
१७ फेब्रुवारीची रात्र. मी रात्री साडेदहाला ट्रांझिट कँप मध्ये येऊन दाखल झालो. भयानक थंडी पडली होती. येथे साधारण ह्या वेळेला अशीच थंडी पडते. आकाश साफ होते. नावाला सुद्धा कोठे ढग नव्हते. जेव्हा इतके साफ आभाळ असते तेव्हा कडाक्याची थंडी पडते. आभाळ भरून आल्यावर दिवसभराची उष्णता जशी काही जमीन व दाटलेल्या ढगांमध्ये अडकून बसते व तापमानात घट होत नाही. त्याच्या उलट आकाश निरभ्र असेल तर उष्णता निघून जाते व तापमान घटते.
ट्रांझिट कँपच्या रिसेप्शनच्या रजिस्टरात मी माझे नाव लिहिले. मिश्राजीने माझे नाव दुसऱ्या दिवशीच्या आय एल च्या मॅनिफेस्ट लिस्ट मध्ये घातले. "साब वेदर एकदम क्लिअर है। आय एल ग्राउंड के लिये आर्मी बस सबेरे पाँच बजे ट्रांझीट कँप ग्राउंड सें निकलेगी। सामान की लॉरी उसके आगे जायेगी। सामान तैय्यार रखना।"
सियाचीनला जायचे म्हणजे चंडीगढला असलेल्या २८९ ट्रांझीट कँप मध्ये नाव दाखल करावे लागते. रोज सकाळी भारतीय वायुसेनेची तीन, चार अजस्त्र मोठी आय एल ७६ ही विमाने जवानांना व अधीकाऱ्यांना घेऊन लेह जवळ असलेल्या ‘थॉईस’ ह्या विमानतळावर उतरवतात. पुढे टप्प्या टप्प्याने सैन्याला सियाचीनला पाठवले जाते.
माझे नाव मॅनिफेस्ट मध्ये नोंदले गेल्या मुळे माझ्याकडे करायला तसे काही राहिले नव्हते. सामान बांधलेले होते ते रात्रीसाठी उघडायचे नव्हते. भल्या पहाटे जायचेच तर होते. मग काय. आता फक्त रात्र घालवायची बाकी होती. व एकच जागा सोयीस्कर होती व ती म्हणजे ट्रांझिट कँपच ऑफिसर्स मेसचा बार! ऑफिसरर्स् मेसचा बार मस्त ठेवलेला असतो. पण तो युनिटच्या मेसचा बार. त्याच्या उलट ट्रांझीटकॅम्पचा बार एकदम साधा होता. हा बार फक्त मनापासून पिणाऱ्यांसाठी होता, वेळ घालवणाऱ्यांसाठी नाही.
कमिशन झाल्यावर पहिलेच पोस्टिंग सियाचीनला. सियाचीन बद्दल वेगवेगळ्या गोष्टी ऐकल्या होत्या. त्यामुळे त्या गुढा बद्दल आकर्षण व कुतूहल दोन्ही होते. कमिशन मिळाल्या मिळाल्या आपल्याला देशाच्या सगळ्यात अवघड जागेवर सेवा करायची संधी मिळाली ह्या कल्पनेनेच मनात गुदगुल्या होत होत्या. जोष खूप होता. आमची युनिट सियाचीनला आधीच पोहोचली होती. पण नुकतेच कमिशन मिळाल्या मुळे मला युनिट बरोबर सियाचीनला जाता आले नाही. मला आमच्या रेजीमेंटच्या रेजीमेंटलसेंटर मध्ये एकवीस दिवसांच्या अभ्यासक्रमासाठी जावे लागले होते. येथे आमच्या रेजीमेंटच्या नुकत्याच कमिशन झालेल्या माझ्या सारख्या तरुण अधीकाऱ्यांना, युनिट्स मध्ये जाण्या अगोदर दिशानिर्देशन केले जाते. ते ज्ञानामृत पिऊन मी चंडीगढला पोहोचलो होतो. सियाचीन मधल्या युनिट मध्ये रुजू व्हायला.
मी येता क्षणी बारमॅनने माझ्याकडे त्रासदायक नजरेने पाहिले. बार बंद होण्याची वेळ झाली होती व त्यात अजून मी आल्यामुळे आता त्याला त्या थंडीत बार बंद करायला उशीर होणार होता. मला पण आतले रडके, उदास वातावरण बघून क्षणभर परत जावेसे वाटले होते. पण क्षणभरच. मनात विचार आला, उद्या ह्याच वेळेला आपण बेस कँपला असू म्हणजे सियाचीन टप्प्यात आले. अशावेळी ‘एक ड्रिंक बनता है।’ असे स्वत:च्याच मनाला म्हणून बारला चिकटलो. त्या अंधाऱ्या बार मध्ये मध्यपान करणारा अजून एकच इसम होता. एका हातात मद्याचा ग्लास घेतलेला व अंगयष्टीवरून साधारण चाळीशी उलटलेला असावा असा कयास. म्हणजे बहुतेक कर्नल असावा. जर नोकरी करताना कोठेतरी, कोणीतरी त्याच्या करिअरला धक्का दिला नसेल तर चाळिशीत कर्नल पदावरच असतात सैन्यातले अधिकारी.
बार मधल्या अंधारात सुद्धा त्याच्या चेहऱ्यावरची निराशा माझ्या डोळ्यांनी हेरली. पण बारमध्ये मी व कर्नल एवढेच असल्यामुळे त्या खिन्न दिसणाऱ्या कर्नलच्या जवळच्या स्टूलावर बसण्या व्यतिरिक्त दुसरे गत्यंतर नव्हते. ग्लेशियरला जाणारी लोकं अशी एवढी खिन्न का असतात कोण जाणे. का ह्याचा चेहराच असा आहे? काहीकाही लोकं अशीच खिन्न दिसतात, नसतील कदाचित पण दिसतात मात्र. उगाचच हजार प्रश्न माझ्या मनात वावरत होते.
कोणताही सीनियर दिसला की त्याला ज्युनिअरने अभिवादन करण्याचा शिष्टाचार, आयएमएच्या शिक्षणामुळे इतका भिनला होता की, माझ्या तोंडून "गुड ईव्हिनिंग सर" केव्हा निघाले माझे मलाच कळले नाही. माझ्या ‘गुड ईव्हिनिंगवर’ त्याने आपली मान माझ्या कडे वळवण्याचा प्रयत्न केला, पण मध्येच त्याला त्यात फार स्वारस्य वाटले नाही का काय कोण जाणे, कारण माझ्याकडे न बघताच "ह्ह" असे काहीसे घशातून आवाज काढत डोके हालवल्या सारखे केले. बारमॅनने मला विचारले - "ड्रिंक साब?" बारमॅनच्या चेहऱ्यावर कंटाळा ओसंडून वाहत होता. बहुतेक त्याला वाटत होते, हा साहेब, फोन करण्यासाठीच जर फक्त आला असेल, तर किती बरे होईल म्हणजे फक्त त्या कर्नल साहेबाला निपटले की सुटलो. तेवढ्यात मी त्याला म्हणालो "एक लार्ज व्हिस्की, सोडा" ह्या माझ्या ऑर्डर करण्याने, मी बारमधून जाण्याची बारमॅनला वाटणारी थोडीशी जी धुगधुगी होती ती पण गेली.
व्हिस्कीचा एक मोठा घोट घेऊन मी स्टूलाला थोडेसे फिरवून कर्नल साहेबाच्या दिशेने वळवले. पण तो जो मघा पासून दगडासारखा बसला होता, त्यात आता सुद्धा काहीही बदल नव्हता. चेहऱ्यावर काही भाव नाहीत, हालचाल सुद्धा अगदी मोजकीच. मी दबकत विचारले "कमिंग बॅक फ्रॉम लिव्ह सर?" मला परत एक "ह्ह" असे घोघऱ्या आवाजात ऐकायला मिळाले. मी पण कसा आहे पहा. हा काही विचारायचा प्रश्न आहे. जो सुट्टीवरून परत ग्लेशियरवर जायला येतो तोच असा ह्या बारमध्ये निराश बसलेला आढळेल, ज्याला सुट्टी मिळाली आहे व जो सियाचीन ग्लेशियरवरून खाली चंडीगढला घरी जायला आला आहे तो काय अश्या काळोख्या बार मध्ये आपला वेळ वाया घालवत बसेल? सुट्टीवर जाणाऱ्याला पंख नसतात, तेवढीच एक कमी असते, नाही तर आपल्या घरी उडतच गेला असता. पण मी खरे म्हणजे काहीतरी संभाषण सुरू करायचे म्हणून हा प्रश्न विचारला होता. उत्तर दिले तर समजावे, बोलायला उत्सुक आहे म्हणून, आणि जर उत्सुक नसेल तर बरेच. मला थोडेच त्या कंटाळवाण्या कर्नल जवळ बसून मन उदास करवून घ्यायचे होते.
मी माझे ड्रिंक संपवले व बारमॅनला अजून एका लार्जसाठी खुणावले. बारमॅनने मोठ्या नाखुशीने व्हिस्कीचा एक लार्ज ग्लासमध्ये ओतला. सोडा ओतत असताना, मी बारमॅनला विचारले "सिगरेट, नेव्ही कट"
"नही है साब, सिर्फ चार्म्स् है।". उशिरा आलेल्या साहेबाला, त्याची जागा दाखवून हिरमुसले केले असे वाटून त्याचा चेहरा उजळला.
"एक पॅकेट भी नही?" मी सोडतो का. मी त्याला परत विचारले.
"नही साब सिर्फ चार्म्स्" त्याने पण सोडले नाही.
तेवढ्यात त्या उदास दगडासारख्या बसलेल्या कर्नलने माझ्या दिशेने टेबलावर काही तरी सरकवले. मला पसंत असलेले नेव्ही कटचे पॅकेट होते. वाटले दाखवायलाच का होईना, त्या कर्नलला ‘नो थॅन्क्स् सर’ असे म्हणावे, पण तो आग्रह करण्यारातला वाटत नव्हता. माझ्या नो थॅन्क्स् वर ते पॅकेट लगेच त्याच्या खिशात गेले असते व मी असाच कोरडा राहिलो असतो, त्या पेक्षा "थॅन्क्स् सर" असे तोंडातल्या तोंडात बरळलो व त्याने पुढे केलेल्या सिगारेटच्या पाकिटातून एक सिगारेट काढली व शिलगावली.
"मी आजच एकाच्या अंत्यविधीला जाऊन आलो" कर्नल सिगारेट शिलगावीत कोरड्या आवाजात पहिल्यांदाच माझ्याशी बोलला, आणि काय बोलला तर हे बोलला. सिगारेट घेऊन चूक झाली असे वाटले. आता मला नेव्ही कट सिगारेटच्या बदल्यात त्याचे रामायण ऐकावे लागणार होते. सियाचीन सारख्या भयाणतेत जाताना अंत्ययात्रा, अंत्यविधी सारखे दु:खी शब्द कानावर पडू नयेत असे मला वाटत असताना नेमके तेच ऐकायला मिळत होते.
मनात नसताना मान द्यायचा म्हणून मी विचारले, "अरेरे. कोण? कोणी घरातले? जवळचे? नात्यातले?"
ह्यावर त्याने माझ्याकडे तिरकस नजरेने बघत म्हटले "हss. असे म्हणू शकतोस, घरातलाच.... जवळचाच....नात्यातलाच......होता तो"
असे म्हणत मला नको असताना केव्हाच त्याने त्याची गोष्ट सुरू केली होती. मला ऐकण्यावाचून गत्यंतर नव्हते.
त्याने एक मोठा उसासा टाकला, सिगारेटचा मोठा झुरका मारला व दारूचा एक घोट घशात उतरवत म्हणाला. "मला घरच्या काही समस्याने घेरले होते. नेहमीचा नातेवाइकांमधला कलह रे. त्यातून सुटायचे होते. दोन महिन्यापूर्वी माझ्या मित्राने, "ह्यातून सुटायचे असेल तर सियाचीन ग्लेशियरला बदलीवर जाण्यासाठी आपण होऊन नाव दे" असा मला सल्ला दिला. नाव दिले व घरच्या अडचणीतून सुटलो. त्या वेळे पर्यंत मला सियाचिन बद्दल एवढी माहिती नव्हती, फक्त एवढे जाणत होतो की ती जागा अत्यंत थंड आहे. अवघड आहे. वाटले तेवढेच जरा वेगळेपण, घरातल्या नातेवाइकांच्या रोजच्या भांडणाला अगदी त्रस्त झालो होतो. मिड लाईफ क्रायसिस दुसरे काय." मला त्याच्या मिड लाईफ क्रायसिसशी काही देणेघेणे नव्हते. पण सियाचीन बद्दलची माहिती हवी होती.
"मी सियाचीनला जाण्यासाठी आपणहोऊन नाव दिले व माझी बदली दुसऱ्याच आठवड्यात झाली. ह्या नाव दिल्यादिल्या लागलीच आलेल्या माझ्या बदलीनेच माझे डोळे उघडले. पुढे काय वाढून ठेवले असेल त्याची कल्पना आली. कोणी वेडाच किंवा विक्षिप्तच माणूस सियाचीनला जाण्यासाठी आपण होऊन नाव देईल. कोणी स्वतःहून थोडेच विहिरीत उडी घेतो. मला त्यातली गंभीरता समजली पण उशीर झाला होता. कामावर रुजू होण्याची तारीख पक्की झाली. आता जाण्यावाचून पर्याय नव्हता. मी असाच चंडीगढ मार्गे, टप्प्या टप्प्याने थॉईसला पोहोचलो. समुद्रसपाटी पासून ११००० फुटावर असलेल्या त्या थॉईसच्या मेस मध्ये मी, ग्लेशियरमध्ये प्रवेश करण्या आधीचे अखेरचे ड्रिंक घेतले. मला सियाचीन बद्दल माहिती करून घ्यायची होती. कोणी त्याला नरक म्हणत, कोणी त्याला भारताचा सैबेरीया म्हणत. माझे कुतूहल क्षणाक्षणाला वाढत चालले होते. कुतूहल वाढणारच. पुढचे संपूर्ण वर्ष घालवणार होतो मी त्या ग्लेशियर मध्ये, आणि मला जिवंत परत यायचे होते. माझ्या घरासाठी. माझ्या मुलांसाठी. ......कर्नल ने आपला ग्लास भरला."
माझे कुतूहल जागे झाले. मी पण त्याच ‘नरकात’ दुसऱ्या दिवशी पोहचणार होतो. कर्नलची गोष्ट ऐकायची इच्छा अनावर झाली.
सर तुम्ही एक वर्षासाठी गेला होतात पण मग येथे? अपघात झाला का? - माझा प्रश्नार्थी चेहरा पाहून विचारायच्या आधीच कर्नलने खुलासा केला.
अपघात. मोठा अपघात .... ग्लेशियरमध्ये.
"कसा?"
कर्नलने परत मोठा श्वास घेतला. स्टूल फिरवून माझ्या कडे तोंड वळवले. त्या थंडीच्या रात्री, आता त्याचा चेहरा त्या मिणमिणत्या प्रकाशात दिसायला लागला. त्याने क्षणभर मला न्याहाळले. त्याचे चमकणारे डोळे पाहून मी जाणले व थोडा चपापलो. नक्कीच कमांडींग ऑफिसर असणार. मला माहीत होते माझ्या युनिटाच्या कमांडींग ऑफिसरच्या डोळ्यात अशीच चमक होती. अशी चमक कमांडींग ऑफिसरच्याच डोळ्यात येते. सैन्यात कमांडींग ऑफिसर होणे हे सैन्याधीकाऱ्याचे स्वप्न असते. कमांडींग ऑफिसरचे पद असे एकमेव आहे की ज्या मध्ये लेजिस्लेटीव्ह, ज्यूडीशियल व एक्झिक्युटिव्ह पॉवर्स एकवटलेल्या असतात. भारतात तरी ह्या तीनही शक्ती सैन्य सोडले तर दुसऱ्या कोणालाच एकत्र दिलेल्या नसतात. कमांडीग ऑफिसरला न्यायाधीशाचे अधिकार दिलेले असतात. ह्या अधिकाराने आर्मीएक्ट प्रमाणे तो शिक्षा ठोठावू शकतो. तसेच त्याच्याकडे आदेश देण्याचे व ते सक्तीने पाळायला लावणारे वैधानिक अधिकार आहेत. ह्या बरोबरच प्राशासनिक अधिकार आहेत हे वेगळे सांगायला नकोच. युनिट मध्ये त्याने दिलेले आदेश सर्वोच्च मानले जातात. जवळ जवळ निरंकुश सत्ता. जबाबदारी पण तेवढीच असते. आठशे जवानांचे आयुष्य खांद्यावर घेऊन तो कमांड करत असतो. त्यामुळे कमांडींग ऑफिसरचा मान काही वेगळाच व रुबाबही.
त्या चमकणाऱ्या डोळ्यांनी मला न्याहाळल्यावर, कर्नल मला विचारतो, "तू पहिल्यांदा जात आहेस ग्लेशियवर?"
"येस सर्"
"ओह, तुला ऐकायचाय ग्लेशियर बद्दल?"
"हो सर मला जेवढी मीहिती मिळेल तेवढी चांगलीच. तेवढी माझी मनाची तयारी होईल.
एव्हाना अजून एक सिगारेट शिलगावली गेली होती – त्याने पण व मी पण. तीच. नेव्ही कट.
तो पुढे सांगायला लागला. सत्य घटना..... एक तर तो खूप प्यायला तरी होता, किंवा माझी खेचत तरी होता, उगाचच घाबरवायचा प्रयत्न करत होता असे वाटत होते. ग्लेशियर इतके भयानक नसणार....... कारण कल्पनेतच असे होते. खऱ्या आयुष्यात थोडेच होत असणार.
"जर का आपल्या पृथ्वीवर कोठे नरक असू शकेल तर ते येथे आहे. सियाचीन ग्लेशियर. सियाचिनाचा हिमनद. एक भयानक, थिजलेले, शतकानुशतकांच्या बर्फाने गोठलेले, जो बर्फ कधी वितळळाच नाही असे ठिकाण. अन् ते सुद्धा जेथे बेसकॅम्प आहे त्या समुद्रसपाटीपेक्षा ११००० फुटांच्या उंची पासून ते १९००० फुटांपर्यंत जाणारा! जिवंतपणाची जर काही चाहूल असेल तर एकच, ती पण ग्लेशियरच. एका अजस्त्र अक्राळविक्राळ अजगरा सारखा, त्याच्या आवाक्यात येणारी प्रत्येक गोष्ट हळूहळू गिळणारा, नामशेष करणारा असा हा हिमनद. सियाचीन."
(सियाचीन ग्लेशीयर - बिबिसी न्युज कडून साभार)
"थंड बर्फावरून जोरजोरात घोंघावणारे वादळी वारे. वारा कसला झंझावात तो. आजूबाजूच्या प्रचंड पर्वत शिखरांवर आदळणारा झंझावात आधीच शून्य असलेले तापमान अजून खाली खेचून घेतो. अगदी शून्याखाली ३० डिग्री सेल्सियस पर्यंत. घातलेले कपडे चिरून, आपल्या चामड्याला फाडून हा थंड झोंबणारा वारा आपल्या हाडांपर्यंत पोहोचतो - हजारो टाचण्या टोचाव्या तशा. इतके की क्षणार्धात आपले शरीर व आपले मन बधिर करून टाकतात. जिवंत राहण्याची आपली इच्छाशक्तीच मालवून टाकतात. येथे सूर्य सुद्धा निस्तेज तळपतो. तळपतो कसला तो दिसतो म्हणून आहे म्हणायचे. पण बाकी सगळी बिरबलाची खिचडीच."
"ह्या जागेला इथले राहणारे सुद्धा घाबरतात. त्यातून ही वस्ती अगदी तुरळक. जवळ जवळ नाहीच. असली तर बेसकॅम्पच्या अलीकडे खाली दहा मैलावर समुद्रसपाटी पासून १०००० फुटांच्या उंचीवर. ग्लेशियर वर फक्त आपणच. भारतीय सैन्याचे तुझ्या माझ्या सारखे असंख्य जवान. १०००० फुटावर राहणारी इथली वस्ती ह्या जागेला जीवघेणा कर्दनकाळ म्हणतात. तर अजून उंचीवर काय असेल त्याचा विचार कर. ग्लेशियर क्रूर आहे. जीवघेणा आहे. त्याच्या पांढऱ्या बर्फाच्छादित चादरीमुळे कोठेकोठे चांगले दृश्य दिसते. कोणी त्याला सुंदर म्हणेल. पण फक्त फोटोतली सुंदरता. बाकी तेथे राहायचे व काम करायचे म्हणजे त्याची क्रूरताच अनुभवायला मिळते. सुंदरता नाही. सुंदरता विसरून जावी अशी क्रूरता. येथे पावलापावलावर मरण लपलेले आहे. खरोखरीच. जीवघेण्यासाठी ग्लेशियरमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. त्यात एवलॉन्च किंवा हिमलोट व क्रेवास म्हणजेच हिमविदर किंवा हिमखाई, हे सगळ्यात मोठे शत्रू. ह्या दोन्हीमध्ये आम्ही क्रेवासला सगळ्यात घाबरतो आणि त्याला कारणे पण तशीच आहेत. एवलॉन्चचा अंदाज बांधता येतो. एव्हलॉन्च कधी सुरू होणार हे ग्लेशियर मधल्या थोड्या अनुभवाने आपण जाणू शकतो. काही दिवस राहिल्याने आपल्याला कळायला लागते. एव्हलॉन्च होणार आहे ह्याचा इशारा जणूकाही तोच देतो. एव्हलॉन्च होण्या लायक काही ठराविक जागा असतात. निमुळते उंच पर्वताचे कडे जे रात्रीच्या टनांनी पडणाऱ्या बर्फाचे वजन घेऊ शकत नाहीत, अशा जागा सहजच ओळखता येतात किंवा ज्या जागांवर दिवसभरात जास्त वेळ सूर्याचा प्रकाश पडतो तेथला बर्फ थोडा ढिला होतो, व हळूहळू ओघळायला सुरवात होते अश्या जागा. काही पर्वतराशी इतक्या जवळ व निमुळत्या असतात की हलक्या झालेल्या पृथ्वीच्या पोटातल्या हालचालीचे स्वरूप वाढणाऱ्या आंदोलनात होते की ती निमुळते पर्वतराशी शहारे यावे तसे हालून त्यांच्या खांद्यावर साठलेला हजारो किलो वजनाचा वर्षानुवर्षे झोपलेला बर्फ खडबडून उठल्या सारखा खाली कोसळतो. पण तरी सुद्धा ह्या सगळ्याचा अनुभवाने अंदाज बांधता येतो. येवढेच काय, पण तिथे राहणाऱ्या जवानांनी अशा होऊ शकणाऱ्या एव्हलॉन्चच्या जागांचा अभ्यास करून पोस्टवरती जायच्या तशा प्रकारानेच वाटा ठरवल्या आहेत. कधी कधी तर इंजिनियरस्च्या युनिट्स छोटे छोटे स्फोटके वापरून एव्हलॉन्च घडवून वाट मोकळी करतात. आपणच घडवून आणलेल्या अशा एव्हलॉन्चनी पुढे अकस्मात होणारा एव्हलॉन्च आधीच झाल्यामुळे होणारी हानी टळते व वाट मोकळी होऊ शकते."
"पण सकाळच्या वेळी त्यातल्या त्यात हे राक्षस झोपलेले असतात. कधी कधी एखादा दुसरा उठतो तेव्हा मग अपघात होतात. त्यामुळे दिवसभराची रसद पोहचवणे किंवा गस्त घालताना करायला लागणाऱ्या हालचाली फक्त सकाळच्या सुर्योदया पासून चार तासात संपवायच्या. ही वेळ अशी असते की, रात्रीची जीवघेणी थंडी आणि शून्याखाली ३० सेल्सीयश गेलेले तापमान, आपसूक त्या पडलेल्या बर्फाला पर्वतांच्या कड्यांवर बांधून ठेवतात. कारण मग जशी सूर्याची किरणे पडायला लागतात तसे बर्फ थोडा ठिसूळ व तकलादू बनतो... एव्हलॉन्चला टाळण्यासाठी जे सुरक्षेचे उपाय करायचे ते केले तर खूपदा जीवनहानी होत नाही. एव्हलॉन्च होण्याच्या जागे जवळून आपण सकाळीच हाललेलो असल्या मुळे दुपारी त्याच जागेवर झालेल्या एव्हलॉन्चनी हानी होत नाही."
"पण क्रिव्हास एव्हलॉन्च पेक्षा निष्ठुर, क्रूर व दुष्ट असतो. हजारो वर्ष लागली असतील ग्लेशियर बनायला. वर्षानुवर्षे सततच्या शून्याच्या खाली राहिलेल्या तापमानाने बर्फाचे थरच्या थर तयार झाले. एवढेच काय पण ग्लेशियर मध्ये हजारो लाखो टन जे पाणी बर्फाच्या रूपात दडलेले आहे, त्यात अगदी हळूहळू स्थित्यंतरे होत राहतात. जसे काही झोपलेल्या माणसाने हळूच कूस बदलावी तसे. त्यातच ग्लेशियरच्या पोटातल्या ढवळाढवळीने त्या जवळ जवळ ७० किलोमीटरच्या ग्लेशियर मध्ये लांबच लांब भेगा, उंच उंच पर्वत शिखरे, मोठ मोठे खळगे, खोल खोल हिमखाई व कठीण कठीण कड्याकपारे तयार झाल्या. अर्थात ह्या सगळ्याल्या टनाने पडलेल्या बर्फाने आच्छादलेले असते हे ओघाने आलेच. काही भेगा व खाई इतक्या खोल तयार झाल्या की जर कोणा मध्ये मोठा दगड टाकला व तो खाली जातानाचा आवाज ऐकायचा प्रयत्न केला तर खाईच्या कड्या कपारींना आपटण्याचा बराच वेळ आवाज येतच राहतो व हळूहळू तो आवाज कमी होत जातो तरी सुद्धा तो थांबत नाही. इतके खोल की तळाचा पत्ताच लागत नाही."
"कधीकधी वाटते त्या खाईंना स्वतःचे असे मन असते, जिवंत प्राण्या सारख्या वागतात. त्या ग्लेशियरच्या पोटातल्या चालणाऱ्या हालचालींनी एक भयानक रूप त्यांना मिळते. काही हिमखाई आताच गिळून निपचीत पडलेल्या अजगरा सारख्या वर्षानुवर्षे पडलेल्या असतात. पण कधीकधी काही हिमखाई अगदी ह्याच्या उलट. एखाद्या सळसळणाऱ्या सापा सारख्या. अस्थिर. एकमेकांवर लादला गेलेला हजारो टन वजनाचा गोठलेला बर्फ त्याच्याच भाराने तात्पुरता वितळत राहतो व लागलीच गोठत राहतो ह्यामुळे होणाऱ्या हालचालीचे पर्यवसान हिमखाईची रचना सतत बदलत राहण्यात होते. काही हिमखाई अगदी अरुंद व सरळ असतात जसे काही ग्लेशियरमध्ये भेग पडली आहे असे वाटावे किंवा कोणी राक्षसाने भल्या मोठ्या सूऱ्याने ग्लेशियर वर वार करावे तसे. काही खाईंची तोंडे खूप मोठाली असतात, मैलभर लांब सुद्धा. तळाकडे जाताना निमुळते होत जातात. एखाद्या नसंपणाऱ्या घसरगुंडी सारख्या. जणुकाही एखाद्या खुनी माणसा प्रमाणे किंवा कोणाला मारण्याची सुपारी घेतल्या सारखे सतत तेथे असणाऱ्या जवानांच्या मागे दबा धरून घात करायला तयार असतात. चालताना चुकलात, थोडे वजन जास्त पडले, पाय घसरला, समजले नाही, वाट चुकलात किंवा नशिबाने पाठ फिरवली तर पटकन सावज साधायला तयार."
(क्रमशः)
आपण राष्ट्रव्रत घेतले का? त्या बद्दल येथे वाचा
http://rashtravrat.blogspot.com/2010/05/rashtravrat.html
आणि येथे
http://bolghevda.blogspot.com/2010/10/blog-post.html
(मराठी ब्लॉग)
मस्तच !
मस्तच !
येथे सूर्य सुद्धा निस्तेज
येथे सूर्य सुद्धा निस्तेज तळपतो. तळपतो कसला तो दिसतो म्हणून आहे म्हणायचे. पण बाकी सगळी बिरबलाची खिचडीच." काय सुंदर वाक्य आहे.
युध्द /सैन्य /गुप्तचर्/पोलीस कथा वाचणे मला आवडते. बहुदा कथेच्या गुढतेमुळे /भिषणतेमुळे अश्या कथा रंजक होतात. इथे ही कथा हे वर्णन मात्र जसेच्या तसे वर्णन मात्र केवळ अश्या वाक्यांनी रंजक झाले आहे.
जबरदस्त. साहेब, पुढचे भाग
जबरदस्त.
साहेब, पुढचे भाग लवकर लवकर येऊ द्या.
मस्त
मस्त
पुढचे भाग वाचायला उत्सुक!
पुढचे भाग वाचायला उत्सुक!
मस्तच !!! पुढचे भाग लवकर
मस्तच !!!
पुढचे भाग लवकर लवकर येऊ द्या.
सुरेख सर
सुरेख सर
मस्तच. पुढच्या भागाच्या
मस्तच. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
नुकतेच 'शिखरावरुन' हे एडमंड हिलरी यांचे भाषांतरीत पुस्तक वाचले. त्यात एव्हलाँचला 'हिमकोसळा' असा शब्द वापरला आहे. पण तो फारसा आवडला नाही मला.
जबरदस्त. !!!! पुढचे भाग
जबरदस्त. !!!!
पुढचे भाग लवकर लवकर येऊ द्या.
Great. Pudhcha bhag dya
Great. Pudhcha bhag dya lavkar.
मस्तं वर्णन पु.भा.प्र.
मस्तं वर्णन
पु.भा.प्र.
आवडले.... पुढच्या भागाच्या
आवडले.... पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
वा ! छानच ! पु. भा. प्र.
वा ! छानच !
पु. भा. प्र.
ग्रेट
ग्रेट
जबरदस्त ! पुढच्या भागाच्या
जबरदस्त !
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
ओह, खूपच उत्कंठा वाढवलीत
ओह, खूपच उत्कंठा वाढवलीत साहेब, पुढचे लवकर येऊद्यात.
मस्तच! पुढच्या भागाच्या
मस्तच! पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत......
भयानक ! अंगावर काटा आला
भयानक ! अंगावर काटा आला
आपल्या सगळ्यांच्या
आपल्या सगळ्यांच्या प्रतिसादासाठी धन्यवाद
आजच सियाचीन मधे वापरण्यासाठी
आजच सियाचीन मधे वापरण्यासाठी (पशुपक्ष्यांचा चिवचिवाट, पानांची सळसळ, समुद्राच्या लाटांचा आवाज, विविध प्रकारचं हवामान याचा अनुभव देणारे) स्पेशल बंकर्स बनवले आहेत अशी बातमी वाचली. नुकतंच हे वाचलेलं असल्याने त्याची गरज, तीव्रता अगदी जाणवली.
मस्त
मस्त
जबरी सुरुवात. सियाचेनबद्दल
जबरी सुरुवात.
सियाचेनबद्दल प्रथम कॉलेजमध्ये असताना वाचले. आपल्याइथे शाळेतल्या मुलांना ही अशी हवी ती माहिती देतच नाहित. नको ते डोक्यावर मरत असतात.
मस्त सुरवात. अलास्काला गेलो
मस्त सुरवात. अलास्काला गेलो होतो तेव्हा हे ग्लेशिअर्स, हिमखाई, त्या प्रचंड खोल भेगा सगळं लांबून का होईना बघितलय. त्याची आठवण झाली. आज आता सगळे भाग एकदम वाचणार आहे. पुढचा प्रतिसाद सर्वात शेवटी.
ते "Azad Kashmir" खुपतंय ,
ते "Azad Kashmir" खुपतंय , जरा ते बदलून "POK" करता येईल का?